Tuesday, May 24, 2016

विवाहसंस्थेतील ‘स्फोट’क ‘अतिरेक’ टाळा!



परवा पत्रकारितेचे प्रशिक्षण घेणारे काही मुलेमुली 'चपराक' कार्यालयाला भेट द्यायला आले होते. तेव्हा अवांतर चर्चा करताना अनिल काळभोर नावाच्या एका विद्यार्थ्याने एक किस्सा सांगितला.
पुण्याजवळील लोणी काळभोर येथे बापूसाहेब गणपत गाडे नावाचे एक गृहस्थ होते. लोणी गावात मंडईजवळ त्यांचा चहा विक्रीचा गाडा होता. त्यांना मूलबाळ नव्हते. त्यांच्या पत्नीला अर्धांगवायु झाला होता. बापू पत्नीची खूप सेवा करायचे. स्वयंपाक बनवण्यापासून ते पत्नीला आंघोळ घालणे, नंतर साडी नेसवणे हे सारे ते आनंदाने करायचे. एके दिवशी दुपारी पत्नीशी बोलत असताना ती काहीच प्रतिसाद देईना. जवळ जाऊन बघितले तर त्यांनी देह सोडलेला! बापू अस्वस्थ झाले. त्यांनी पत्नीला आंघोळ घातली. आपल्या लग्नातील नऊवारी साडी नेसवली. मळवट भरला. सर्व दागदागिने घातले. तेवढ्यात शेजारची एक लहान मुलगी आली. आजीला त्यांनी इतके सजवलेले बघून तिने त्यांना त्याचे कारण विचारले. त्यांनी शांतपणे त्या मुलीच्या हातात दहा रुपये दिले आणि तिला भेळ आणायला पिटाळले. मुलगी घराबाहेर जाताच त्यांनी स्वतः गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपवली.
आत्महत्येचे आम्ही कधीही समर्थन करत नाही. आम्हाला हा पळपुटेपणा वाटतो; मात्र आपल्या आजारी पत्नीची इतकी सेवा करणारा आणि त्या वियोगात स्वतःला संपवणारा माणूस पाहून हेलावून गेलो. बापूंच्या पत्नीनिष्ठेला आमचे वंदन! समाजात असलेली अशी माणसे हेच आपल्या संस्कृतीचे बलस्थान आहेत. सहजीवनातील ही एकरूपता आणि एकमेकांवरील निस्सीम प्रेम, श्रद्धा कुणालाही लुभावणारी आहे. मुमताजसाठी थडगं बांधणार्‍यापेक्षा बापू गाडे यांचे प्रेम सर्व पातळ्यांवर म्हणूनच श्रेष्ठ ठरते. सध्या विवाहसंस्था, कुटुंबसंस्था धोक्यात आल्या असताना अशी दुर्मीळ उदाहरणे ऐकून वाळवंटातही पाण्याचा झरा दिसतो.
मध्यंतरी कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगलूर शहरातील एक बातमी वाचण्यात आली. एका उच्चशिक्षित मुलीचे लग्न ठरले. लग्नासाठी वरपक्षाकडील वर्‍हाडी मंगल कार्यालयात आले. रात्रीच्या जेवणात त्यांना मटण बिर्याणी हवी होती; मात्र वधुपक्षाने तीस किलो चिकन बिर्याणी मागवली. वरपक्षाने मटण बिर्याणीची फर्माइश केली. आता एवढ्या रात्री मटण कुठे मिळणार नाही म्हणून वधुपक्षाने कशीबशी समजूत घातली. दुसर्‍या दिवशी सकाळीही चिकण बिर्याणीच खायला दिल्याने कडाक्याची भांडणे सुरू झाली. मटण उपलब्ध नसल्याने वधूपक्ष हतबल झाला होता आणि ते मिळत नसल्याने वरपक्ष हातघाईवर आला होता. दोन अडीच तास त्यावरून खडाजंगी झाल्यानंतर नवरी मुलगी पुढे आली आणि तिने सांगितले, ‘अशा भांडकुदळ लोकांच्या घरी मी लग्न करून जाणार नाही.’ मुलीचा हा आक्रमक पवित्रा पाहून वरपक्ष शांत झाला आणि लग्नमुहूर्त टळून गेल्याने अक्षता टाकण्यासाठी त्यांनी आग्रह धरला; मात्र मुलगी आपल्या हट्टावर कायम राहिली आणि वरपक्षाला अपमानित होऊन उपाशीपोटीच परत जावे लागले. तीस किलो मटण बिर्याणीसाठी लग्न मोडण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली.
पुण्यातील अलका सिनेमागृह चौकात भारती विद्यापीठाची इमारत आहे. त्या इमारतीत कौटुंबीक न्यायालय आहे. तिथे घटस्फोटासाठी येणार्‍या जोडप्यांशी संवाद साधला तर आश्‍चर्य वाटते. लग्न होऊन केवळ दीड महिना झालेला. नवरा कामावरून परत येत असताना गाडी चालवत असल्याने त्याने घरून आलेला बायकोचा फोन घेतला नाही. झाले! एवढ्याशा कारणावरून बायकोने घटस्फोट मागितला. लग्नापूर्वी महाविद्यालयीन जीवनात एका कार्यक्रमात समूह फोटो काढताना आपली बायको एका मुलाच्या अगदी जवळ थांबलीय, या कारणाने एका मुलाने बायकोला सोडचिठ्ठी दिल्याचे प्रकरणही कानावर आले होते. अशा फुटकळ कारणावरून वेगळे होणारे महाभाग बघितले की, बापूंच्या पत्नीनिष्ठेला सलाम करावाच वाटतो.
माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मुलांच्या हातात पैसा खुळखुळतोय. नवरा बायको दोघेही कमावते. कामाच्या वेळाही निश्‍चित नाहीत. घरी आल्यानंतरही मोबाईल, लॅपटॉप या माध्यमातून कार्यालयीन आणि व्यावसायिक घडामोडी सुरूच असतात. त्यामुळे एकमेकांसाठी वेळ देता येत नाही. एकमेकांना समजून घेता येत नाही. मुलींच्यात निर्णयक्षमता आहे. त्यांना स्वातंत्र्य आहे. या स्वातंत्र्याची जाणीवही आहे. त्यामुळे त्या कोणत्याही कारणास्तव तडजोड करण्यास तयार नसतात. मुलेही काहीवेळा अति ताणतणावामुळे व्यसनाच्या आहारी जातात. पुण्यामुंबईसारख्या महानगरात तर रोज मद्यपान आणि धुम्रपान करणार्‍या मुलींची संख्याही कमी नाही.
अशा सर्व परिस्थितीत घरातील ज्येष्ठांनी दिलेले सल्लेही यांना पटत नाहीत. ‘आमच्या मर्जीचे आम्ही मालक’ या भूमिकेतून ही नवविवाहीत मंडळी वावरत असतात. ज्येष्ठांचीही एक गफलत होते. सर्व पालकांना त्यांच्या मुलींच्या जन्मानंतर पक्के ठाऊक असते, की एक दिवस ही लग्न करून दुसर्‍याच्या घरी जाणार. त्यामुळे त्यांची तशी मानसिकता झालेली असते; मात्र आपला मुलगा त्याच्या लग्नानंतर त्याच्या संसारासाठी म्हणून वेगळा राहिल हे सत्य पचवणे त्यांना जड जाते. जर तुम्ही मुलीच्या संसारासाठी त्यांची सासरी पाठवण करता तर एखाद्या मुलाला वेगळे रहावेसे वाटले तर आडकाठी कशासाठी? एकत्र कुटुंबपद्धतीचे महत्त्व न जाणणार्‍या मुलांना त्यांच्या इच्छेनुसार अवश्य वेगळे राहू द्यावे. त्यातूनच त्यांना जगरहाटी कळेल. अर्थात तरूण मुलांनी आपल्या वृद्ध आईवडिलांना वेगळे करावे, असे आम्हास म्हणायचे नाही! मात्र जर अशा कारणामुळे कुटुंबच उद्ध्वस्त होणार असेल, तर एकत्र राहून तरी काय फायदा? वेगळे राहून जर एकमेकांतील प्रेम, जिव्हाळा जोपासता येत असेल, नाती टिकवता येत असतील तर अशा गोष्टींचा बागुलबुवा कुणीही करू नये. ‘जन्मताना एकटाच आलोय आणि जातानाही एकटाच जाणार’ हे चिरंतन सत्य प्रत्येकाने ध्यानात ठेवावे.
स्त्री-पुरूष संबंध ही शारीरिक गरज तर आहेच; पण त्याहून अधिक ती मानसिक गरज आहे. शरीराच्या गरजा भागवताना मनाच्या कोंडमार्‍याचा विचार कुणी फारसा गांभिर्याने करताना दिसत नाही. आपल्यासाठी सर्व नाते सोडून आलेली मुलगी किती महान असणार? तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करणे हे मुलाचे कर्तव्यच आहे! आणि आपल्याला आयुष्यभराची साथ देणारा मुलगाही किती मोठा असणार? त्याचे मन जपणे, दोघांनीही एकमेकांचे नाते आणि नातेवाईक जपणे, सुखदुःखात भक्कम साथ देणे हेच तर सांसारिक जीवनाचे खरे यश आहे. एखाद्याला ‘कॅन्सर’ झाला तरी तो आयुष्यातून ‘कॅन्सल’ होतोच असे नाही, मात्र एखाद्याचा ‘घटस्फोट‘ झाला तर आपल्या संस्कृतीच्या आणि नैतिकतेच्या चिंधड्या उडवणारे ‘स्फोट‘ मात्र नक्कीच घडतील! विवाहसंस्था उद्ध्वस्त करू पाहणार्‍यांनी बापूसाहेब गाडे यांच्यासारख्यांचे आदर्श ठेवून जीवनातील अतिरेक टाळावा, हेच बरे!!
- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

1 comment:

  1. खूपच मार्मिक व सडेतोड लेख!

    ReplyDelete