पिंपरी येथे होणार्या 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल हाती आला आणि प्रामुख्याने एकच प्रश्न चर्चेत आला, ‘‘कोण हे श्रीपाल सबनीस?’’
सबनीस ‘चपराक’चे सल्लागार होते. काही दिवसांपूर्वीच आम्ही त्यांची या पदावरून सुटका केली होती. आजपर्यंत वाटायचे की, सबनीसांना आपण जितके ओळखतो तितके कोणीच ओळखत नाही. मात्र ते अध्यक्ष होताच दुसर्या क्षणी वातावरण असे होते की, सर्वजण विचारत होते, ‘‘कोण हे सबनीस?’’ आणि सबनीसांना ओळखणार्यांना खुद्द सबनीसच विचारत होते की, ‘‘आपण कोण?’’
सबनीसांनी त्यांच्या जवळच्या लोकांना ‘आपण कोण?’ असा सवाल करेपर्यंत आम्हाला मात्र त्यांची खरी ओळख पटली होती.
कशी आहे ही ओळख? चेहरे आणि मुखवटे माणसांची इतकी दिशाभूल करतात की, त्यात आपण पुरते गुरफटून जातो! दांभिक आणि खोट्याची चीड यावी इतका प्रामाणिकपणा आपल्याकडे शिल्लक असल्याने आपण अस्वस्थ होतो. त्यामुळे ‘सबनीस कोण?’ हे आता आमच्या वाचकांना सांगणे हे आम्हाला आमचे सांस्कृतिक कर्तव्य वाटते.
संमेलनाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मातृसंस्था असलेल्या साहित्य परिषदेने रिवाजाप्रमाणे त्यांचा सत्कार सोहळा घेतला. या सोहळ्यात त्यांनी घुमानच्या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्यासमोर उपरोधिकपणे सांगितले की, ‘मी अपमान सहन करणार नाही...’
निवडून आलेल्या उमेदवाराला ‘आपण अपमान सहन करणार नाही’ असे जाहीरपणे का सांगावे लागले?
तर घुमानच्या संमेलनात राजकारण्यांची आणि साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांची इतकी लुडबूड वाढली की, सदानंद मोरे यांच्यासारख्या प्रज्ञावंताला अध्यक्षीय खुर्ची सोडून मागे यावे लागले.
हे पूर्ण सत्य होते का? असेल तर सबनीसांनी हे महामंडळाला सांगितले, डॉ. मोरे यांना सांगितले, पत्रकारांना सांगितले की त्यांच्या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्यांना सांगितले? ही खदखद यावेळी का बाहेर पडली?
त्याची अनेक कारणे आहेत. त्यातील एक प्रसंग आमच्या वाचकांना सांगणे क्रमप्राप्त आहे.
मागच्या, म्हणजे घुमानच्या 88 व्या साहित्य संमेलनासाठी सबनीसांनी जोरदार तयारी केली होती. त्याआधी सासवडला झालेल्या संमेलनावेळीही त्यांनी चाचपणी केली होती. मात्र फ. मुं. शिंदे, संजय सोनवणी, प्रभा गणोरकर अशा दांडग्या साहित्यिकांशी स्पर्धा करणे शक्य नसल्याने त्यांनी फार हालचाली केल्या नाहीत. फ. मुं. वरील आमची नाराजी त्यांना माहीत असल्याने त्यांनी संजय सोनवणी यांना ‘चपराक’च्या कार्यालयात आणले आणि ‘चपराक’ची सर्व ताकत आपण त्यांच्या पाठिशी उभी करू’ असा आग्रह धरला. सोनवणी यांच्या पाठिशी आम्ही आमची तोकडी शक्ती उभी केली पण मध्येच सबनीसांनी पूर्ण लक्ष काढून घेऊन आम्हाला आमच्या कामात लक्ष द्या, असे सांगितले. राजकीय हस्तक्षेपामुळे अपेक्षेप्रमाणे त्यावेळी फ. मुं. शिंदे निवडून आले.
घुमानच्या संमेलनाच्या वेळी मात्र सबनीसांनी जोरदार तयारी केली. आमचे दौरेही सुरू झाले. त्यांची परिचय पत्रके वाटली गेली. प्रशासकीय सेवेतील अधिकारी व्यक्तिमत्व असलेले भारत सासणे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत आणि श्रीपाल सबनीस यांनी अर्ज दाखल केले होते. घुमान हे संत नामदेवांचे कर्मक्षेत्र असल्याने संत साहित्याचा अभ्यासक संमेलनासाठी योग्य असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. ही चर्चा सुरू होताच सबनीसांनी घाईगडबडीत ‘संत नामदेवांची इहवादी भूमिका’ हे पुस्तक लिहिले. ते ‘चपराक’ने प्रकाशित करावे अशी गळ घातली. एकंदरीत तो फक्त ‘तयारी’चा भाग होता आणि हा ‘इहवाद’ आम्हाला पटणारा, पचणारा नव्हता; त्यामुळे आम्ही त्यांना नम्रपणे नकार दिला. ‘तुम्ही खर्चात पडू नकात; जो काही खर्च असेल तो सांगा; मी द्यायला तयार आहे’ असेही त्यांनी सांगितले. मात्र आम्ही तो विषय मोठ्या शिताफीने टाळला. पुढे त्यांनी ते पुस्तक आणखी एका प्रकाशकांकडून प्रकाशित करून घेतले. ‘या पुस्तकात मी इतकी कठोर चिकित्सा केलीय की घनश्याम पाटील यांच्यासारखा परखड बाण्याचा प्रकाशकही हे पुस्तक प्रकाशित करण्याचे धाडस करू शकला नाही’, असेही त्यांनी त्या प्रकाशकाला सांगितले. तो प्रकाशकही आमचा मित्रच असल्याने त्याने ही गोष्ट आमच्या कानावर घातली आणि ‘व्यवहार’ म्हणून ते पुस्तक प्रकाशित केले.
सासणे, कामत यांच्यावर काय काय आरोप करायचे, प्रचाराची भूमिका कशी ठेवायची याचे त्यांचे जोरात नियोजन चालू होते आणि अचानकच संत साहित्यातील व्यासंगी आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेल्या डॉ. सदानंद मोरे यांनी अर्ज दाखल केला. मग मात्र सबनीसांना घाम फुटला. त्यांनी आम्हाला सांगितले, ‘’नामदेवांच्या कर्मभूमीत संमेलन होत असल्याने ‘संत साहित्याचा अभ्यासकच अध्यक्ष असावा हा हट्ट चुकीचा आहे. अध्यक्षाचा दलित, वंचित, उपेक्षित, आदिवासी, ग्रामीण, विद्रोही साहित्याचाही अभ्यास असावा. या सर्व कसोट्यावर केवळ मी एकटाच खरा उतरतो’ अशा बातत्या तुम्ही छापून आणा!’’ हे आमच्या नैतिकतेत बसत नसल्याने आम्ही इथेही चालढकल केली आणि ‘माध्यमे अशा बातम्या छापत नाहीत’ असे सांगितले.
मग त्यांनी पुढची कल्पना सांगितली, ‘‘प्रकाशक म्हणून तुम्ही मोरेंना फोन करा आणि त्यांना सांगा की, सबनीसांची तयारी जोरदार आहे. तुम्ही तुकाराम महाराजांचे वंशज आहात. तुमचे मोठे नाव आहे. तुम्ही पडलात तर सगळी पुण्याई धुळीला मिळेल. त्यामुळे यावेळी तुम्ही लढू नकात, पुढच्यावेळी आम्ही तुम्हाला मदत करू...’’
आम्ही असा फोन करण्याचा खुळचटपणा करणे कदापि शक्य नव्हते. ते वारंवार त्यांना सांगूनही त्यांचा आग्रह सोडत नसल्याने शेवटी आम्ही एक पुडी सोडून दिली की, ‘मोरे सर शरद पवारांच्या अतिशय जवळचे आहेत. साहेबांनी त्यांना शब्द दिल्याने सगळी यंत्रणा कामाला लागलीय. त्यांना थांबवणे कुणालाही शक्य नाही...’
मग मात्र ते शांत झाले. त्यांनी सांगितले की ‘‘आपण पडण्यापेक्षा माघार घ्यायची आणि भारत सासणे यांना पाठिंबा द्यायचा. पुढच्यावेळी ते आपल्याला मदत करतील.’’
तोपर्यंत आमच्या बर्याचशा मतदार साहित्यिकांच्या गाठीभेटी झाल्या होत्या. ‘चपराक’मधून काही लेख, बातम्या छापून आल्या होत्या. ‘चपराक’च्या माध्यमातून दरमहा एक-दोन असे सलग कार्यक्रम झाले होते. ‘तुम्हाला कार्यक्रमाला दुसरा अध्यक्ष मिळत नाही का?’ असेही काही पत्रकार मित्रांनी आवर्जून विचारले पण सबनीसांना निवडून आणेपर्यंत कोणत्याही गोष्टींचा विचार करायचा नाही असे आम्ही ठरवले होते. त्यामुळे सासणे आणि कामत यांच्याविरूद्ध त्यांच्या विजयाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र ऐनवेळी मोरे सरांनी अर्ज भरल्याने त्यांचे धाबे दणाणले. सबनीसांनी माघार घेतली तर आपले सर्व श्रम वाया जाणार आणि नामुष्कीही ओढवणार हे दिसत होते.
आम्ही सबनीसांच्या पुढच्या सूचनेची वाट पाहत होतो आणि ऐनवेळी बातमी आली की, त्यांनी माघार घेऊन डॉ. सदानंद मोरे यांना पाठिंबा दिलाय. त्यापूर्वी त्यांच्यासाठी झटणार्या आम्हा कुणालाही साधी कल्पना देण्याचेही सौजन्य त्यांना दाखवावे वाटले नाही.
या प्रकाराने दुखावले गेल्याने आम्ही त्यांच्याकडे गेलो तर आधी त्यांनी हात जोडून माफी मागितली. त्यांनी सांगितले, ‘‘तुम्ही माझ्या मुलासारखे आहात त्यामुळे पाया पडत नाही; पण माझ्या मर्यादा समजून घ्या...’’ त्यांची ती केविलवाणी अवस्था पाहून आम्ही राग सोडला. मग त्यांनी सांगितले, ‘‘आळंदी येथे झालेल्या साहित्य संमेलनात याच मोरेंनी मला मारायला गुंड सोडले होते. वारकर्यांच्या नावावर हा राजकारण करतो. मी आता उभा राहिलो तर हा माझा आनंद यादव करेल. माझ्या साहित्यातल्या ‘तशा’ जागा तुम्हाला माहीतच आहेत. त्यामुळे आपला नाईलाज आहे.’’
मग त्यांनी सांगितले, ‘‘मोरेंना पाठिंबा देण्यासाठी मी स्वतः फोन करून त्यांना बोलवून घेतले. ते सकाळी दहा वाजता माझ्या घरी आले. सोफ्यावर बसतात न बसतात तोच त्यांनी पहिले वाक्य उच्चारले, ‘‘सबनीस, तुम्ही माघार घ्यायचा योग्य निर्णय घेतलात. यावेळी अशोक कामतांनी अर्ज भरलाय. ते संत साहित्यातले व्यासंगी आणि जाणकार आहेत. मात्र त्यांची निवडून यायची क्षमता नाही. मग कोणीतरी ‘सोम्यागोम्या’ निवडून येण्यापेक्षा आपणच का नको? असा सवाल माझे कार्यकर्ते करत आहेत, त्यामुळे नाईलाजाने मी अर्ज भरलाय.’’ ‘सोम्यागोम्या’ म्हणजे मीच हे मला कळत असूनही मी त्यांचे शाल घालून स्वागत केले कारण पुढच्या वेळी नाईलाजाने का होईना ते आपल्या पाठिशी राहतील. माझा इतका राग, अपमान मी पचवू शकतो तर तुम्ही माझ्यासाठी एवढेही करणार नाही का?’’
त्यांचे हे बोलणे ऐकून आम्ही सुन्नच झालो. म्हणूनच यंदा निवडून आल्यानंतर सर्वप्रथम त्यांनी ‘मी अपमान सहन करणार नाही’ असे सांगितल्याने त्याचे आम्हाला फार आश्चर्य वाटले नाही.
पुण्यातून आम्ही ‘साहित्य चपराक’ हे एक दर्जेदार मासिक, प्रभावी वृत्तसाप्ताहिक आणि वैविध्यपूर्ण विषयांवरील पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालवतो, हे आपणास माहीत आहेच. दरम्यानच्या काळात माझ्या अग्रलेखांचे पुस्तक व्हावे असा आग्रह माझ्या सहकार्यांनी धरला होता. मात्र ‘आधी इतरांची पुस्तके प्रकाशित करू. थोडेफार नाव झाल्यावर माझ्या पुस्तकाचे बघू’ असे म्हणत मी विषय टाळायचो. 2012 च्या ‘चपराक दिवाळी विशेषांक’ प्रकाशन सोहळ्यास ह. मो. मराठे आणि श्रीपाल सबनीस उपस्थित होेते. त्या अंकातील माझा लेख वाचल्यानंतर त्यांनी माझ्याकडे माझे पुस्तक प्रकाशित व्हावे म्हणून आग्रह धरला. सहकार्यांचा आग्रह मी डावलला होता मात्र मराठीतला एक समीक्षक आणि निवृत्त प्राचार्य आपल्या पुस्तकासाठी आग्रही आहे म्हणून मी ते मनावर घेतले. पुस्तकाची तयारी केली. ‘दखलपात्र’ हे नाव निश्चित केले. त्यासाठी निवडलेले लेख त्यांना वाचायला दिले. ते त्यांनी वाचले.
त्यांनी सांगितले, ‘घनश्याम, तुम्ही माझ्या मुलासारखे आहात. मी आजवर तुम्हाला काहीच मागितले नाही. ग. प्र. प्रधान यांच्यासारख्या विचारवंताने माझ्यासारख्या त्यावेळच्या सामान्य माणसाला आग्रह करून त्यांच्या पुस्तकाची प्रस्तावना लिहून घेतली. मी अनेक प्रस्तावना लिहिल्या मात्र असे पुस्तक वाचले नाही. या पुस्तकाला मीच प्रस्तावना लिहिणार. माझी ही आग्रही विनंती तुम्ही मान्य केलीच पाहिजे...’
त्यानंतर त्यांनी भली मोठी प्रस्तावना लिहून माझ्या लेखनाचा जोरदार गौरव केला. महाराष्ट्रातल्या अनेक धुरीणांशी माझी तुलना केली. अशी तुलना मला आवडत नसल्याने मी त्यांच्या कौतुकाकडे कानाडोळा केला. मात्र व्यासपीठावरून ते अंतःकरणापासून बोलायचे. त्यांची तळमळ आणि माझ्याविषयी ओतप्रोत प्रेमाने ओथंबलेला आवाज ऐकून मी प्रभावित व्हायचो. ‘प्रस्तावना या प्रकाराच्या मी विरूद्ध असनानाही डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आग्रहाने या पुस्तकाला प्रस्तावना लिहून माझा गौरव केला’ अशा स्पष्ट शब्दात मनोगतात उल्लेख करत मी हा प्रकार सूचकपणे मांडला. मात्र या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर आम्ही त्यांच्या प्रेमात पडलो. शब्दशः न्हाऊन निघालो. ‘चपराक’च्या प्रत्येक सदस्याचे तोंडभरून कौतुक आणि प्रत्येकावर जीव ओवाळून टाकणे यामुळे आम्हाला ते आमच्या परिवाराचाच भाग वाटू लागले. ‘चपराकचे सल्लागार’ अशी आम्ही प्रत्येक ठिकाणी त्यांची ओळख करून देऊ लागलो. व्यासपीठावरून त्यांचे दिवे ओवाळू लागलो. एका निखळ नात्याची अनुभूती असल्याने आम्ही त्यांना डोक्यावर घेऊन नाचू लागलो. त्यांची ही सारी ‘नौटंकी’ होती हे कळायला मात्र फारच वेळ गेला. एखाद्याची आर्थिक फसवणूक झाली तर ती भरून काढता येते मात्र एखाद्याच्या श्रद्धेला, विश्वासाला तडा गेला तर काय यातना होतात हे आम्ही या निमित्ताने अनुभवले.
मागच्या अपमानाची सल बोचत असतानाच त्यांनी यावर्षीच्या संमेलनाची जोरदार तयारी केली. या तयारीचा पहिला टप्प्पा कोणता होता? तर तो होता बृहनमहाराष्ट्र!
महाराष्ट्राबाहेरील जे मतदार आहेत त्या सर्वांशी संपर्क साधून त्यांनी त्यांच्या पुस्तकांची परीक्षणे लिहिण्याचा धडाका लावला. अनुराधा जामदार, डॉ. विद्या देवधर, भालचंद्र शिंदे, विश्वनाथ शिरढोणकर अशा साहित्यिकांच्या जवळ जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला. महाराष्ट्राबाहेरील मतदारांशी सतत फोनवर संपर्क ठेवल्याने त्यांना त्या मतांची खात्री होती. त्या सगळ्यांविषयी जेवढे भरभरून लिहिता येईल तितके त्यांनी लिहिले. परीक्षणांबरोबरच प्रस्तावनांचा सपाटा तर सुरूच होता. भोपाळ, इंदौर, बडोदा, हैद्राबाद, गुलबर्गा येथे त्यांनी दौरे काढले.
घुमानच्या संमेलनानंतर आम्ही यावर्षीच्या निवडणुकीची तयारी सुरू केली. सर्वप्रथम त्यांना ‘फेसबुक’चे अकाऊंट आम्ही सुरू करून दिले होते. अर्थात ते आम्हीच हाताळायचो. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधायचो. दरम्यान पुण्यातील ‘दिलीपराज प्रकाशन’ने त्यांचे ‘ब्राह्मणी सत्यशोधकाचे अब्राह्मणी सौंदर्यशास्त्र’ हे पुस्तक प्रकाशित केले. (किंवा सबनीसांनी ते ‘छापून’ घेतले.) त्यात त्यांनी ‘साहित्य संस्कृतीच्या विश्वात योगदान पेरणारा तरूण स्नेही’ म्हणून माझ्या नावाची दखल घेत ते पुस्तक अपर्ण केले. एकतर माझ्या स्वतःच्या पुस्तकासह आम्ही प्रकाशित केलेल्या अनेक पुस्तकांना त्यांच्या प्रस्तावना होत्या आणि आता त्यांनी त्यांचे एक पुस्तक आपल्याला ‘अर्पण’ केले म्हणून त्यांच्याविषयी आणखी जिव्हाळा वाढला होता.
हे सारे सुरू असतानाच काही विचित्र अनुभव आले, मात्र त्यांच्यावरील आंधळ्या प्रेमाखातर आम्ही तिकडे दुर्लक्ष केले. ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या ‘तपोभूमी नाशिक’ या पुस्तकाचे प्रकाशन नाशिक येथे करायचे ठरले. लेखकाने त्या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. मात्र ‘सबनीसांच्या हस्तेच त्याचे प्रकाशन व्हावे’ असा आग्रह आम्ही धरला. सबनीसांनी नेहमीप्रमाणे त्याला आनंदाने होकार दिला. कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आणि त्यांनी थेट लेखकाला फोन केला. ‘साहित्य क्षेत्रात आज माझे इतके नाव आहे आणि तुम्ही कार्यक्रमाचा मला अध्यक्ष करण्याऐवजी प्रमुख पाहुणे केलेय हे बरोबर नाही,’ असे म्हणत धारेवर धरले. लेखकाने भांबावून आम्हाला फोन केला आणि विचारले की, ‘‘यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांना अध्यक्ष म्हणून सांगितले आहे. मात्र सबनीस नाराज आहेत तर कार्यक्रमात बदल करू का?’’
त्यांची अगतिकता पाहून आम्ही त्यांना सांगितले, ‘‘सबनीसांशी आम्ही बोलतो, कार्यक्रम पूर्वनियोजित आहे त्याप्रमाणेच होऊ द्या. या कार्यक्रमाला ते आले नाहीत तर फरक पडणार नाही.’’
नंतर सबनीसांनी सांगितले की, ‘‘नाशिकला मला उत्तम कांबळे यांनाही भेटायला यायचेच आहे. आम्ही सपत्नीक कार्यक्रमाला येऊ. झाला प्रसंग विसरून जा आणि नाशिकला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करा.’’ आम्ही नाशिकला गेलो. उत्तम कांबळे यांच्याकडे जाऊन त्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. नाशिकचा कार्यक्रम उरकून आम्ही परत आलो, मात्र त्यावेळी त्यांनी तिथेही त्यांच्या भाषणातून लेखकाच्या कुटुंबियांची नाराजी ओढवून घेतलीच. उत्तम कांबळे यांच्याविषयी मात्र ते भरभरून बोलायचे. ‘उत्तम माझा सर्वात जवळचा स्नेही आहे’ हे सांगताना त्यांचा उर अभिमानाने भरून यायचा.
पुण्यात आल्यानंतर ‘चपराक’च्या तिसर्या साहित्य महोत्सवाची तयारी सुरू केली. डॉ. सदानंद मोरे आणि डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या उपस्थितीत आम्ही एकाचवेळी पंधरा पुस्तकांच्या प्रकाशनाच्या सोहळ्याचे आयोजन केले. त्यातील काही पुस्तकांच्या प्रस्तावना अर्थातच सबनीसांनी लिहिल्या होत्या. या कार्यक्रमाचे निमंत्रण दिल्यानंतर त्यांनी सांगितले की, ‘‘एवढ्या मोठ्या कार्यक्रमात मी रसिक म्हणून टाळ्या वाजवायला येऊ का? माझ्या प्रतिष्ठेचा तरी विचार करा.’’
त्यांच्या या विक्षिप्त विधानाने आम्ही दचकलोच आणि घुमानच्या संमेलनाची आठवण झाली. घुमानच्या संमेलनाला ‘चपराक’चे चौदा सदस्य गेलो होतो. त्यावेळीही आम्ही त्यांना सांगितले होते की, ‘‘तुमचे आणि ताईंचे आरक्षण आम्ही करतोय. आपण संमेलनाला आमच्यासोबत आलात तर आनंद वाटेल.’’ त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, ‘‘संमेलनात माझा कोणत्याही कार्यक्रमात सहभाग नाही तर मी कशाला येऊ?’’ त्यांच्या या वाक्याचे फारसे काही वाटले नव्हते मात्र आज आम्ही दुखावलो गेलो होतो. इतर कोणतेही कारण सांगून ‘येणार नाही’ असे सांगितले असते तरी आम्हाला फार काही वाटले नसते.
‘चपराक साहित्य महोत्सव’ पार पडला आणि त्यांनी पुन्हा निवडणुकीचे तुणतुणे लावले. आम्हीही झाले गेले सारे विसरून पुन्हा नव्या जोमाने कामाला लागलो. सबनीस मला मुलगाच मानत असल्याने त्यांना निवडून आणणे हे एकमेव ध्येय होते. त्यातूनच प्रथम साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांची त्यांना मी प्रथम ओळख करून दिली. डॉ. सदाशिव शिवदे, सुधीर गाडगीळ, बंडा जोशी यांच्यापासून ते शिवाजी चाळक, गुहागरचे कवी मित्र ईश्वरचंद्र हलगरे, लातूरचे पत्रकार प्रदीप नणंदकर, मुंबईच्या सुवर्णाताई जाधव यांच्यापर्यंत सर्वांना फोन केले. पुण्यात सबनीसांना गाडीवर घेऊन भेटीगाठीसाठी फिरायचो. (त्यातही त्यांच्या पत्नी सौभाग्यवती ललिताताई त्यांना कधी एकटे सोडत नाहीत आणि सबनीसांना मी दुचाकीवरून कुठे नेले तर ते ‘साडी नेसलेल्या’ बायकांप्रमाणे एका बाजूने बसतात; हे फार अवघड असते.) दरम्यान आमची सर्व कामे बाजूला सारून ‘मिशन सबनीस’ जोरात होते. ‘चपराक’चा प्रत्येक सदस्य त्यांच्यासाठी जिव्हाळ्याने पळत होता.
हे करताना एखाद्या पत्रकार मित्राला त्यांच्या घरी नेले की ते त्याचा इतका पाहुणचार करायचे की आम्हालाच अवघडल्यासारखे व्हायचे. बायकोला त्याचे औक्षण करायला सांगणे, नाश्ता देणे, त्याचा शाल श्रीफळ देऊन घरी सत्कार करणे अशा सारंजामामुळे तो भारावून जायचा आणि आम्हाला उगीच राजकीय निवडणूक असल्यासासारखे वाटायचे. नंतर मात्र बातम्यांसाठी ते त्याच्यामागे इतका लकडा लावायचे की विचारता सोय नाही. अशावेळचे अवघडलेपण फार विचित्र असते.
एक प्रसंग आवर्जून सांगावा वाटतो. प्रसन्ना जोशी यांनी ‘एबीपी माझा’ ही वाहिनी सोडली आणि ते ‘जय महाराष्ट्र’मध्ये रूजू होणार होते. मधल्या काळात त्यांनी काही मित्रांच्या भेटी घेतल्या. संजय सोनवणी यांनी या निमित्ताने आम्हा चार पाच मित्रांचा गप्पांचा छोटा कार्यक्रम त्यांच्या घरी ठेवला. त्यात सबनीसांना आणायची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. मी, प्रा. हरी नरके, सबनीस, प्रसन्ना असे निवडक चारपाचजण होतो. जेवण आणि दिलखुलास गप्पा झाल्या. रात्र बर्यापैकी उलटली होती आणि आम्ही परत निघालो. प्रसन्ना आता ‘जय महाराष्ट्र’ला महत्त्वाच्या हुद्यावर जाणार असल्याने त्यांनी त्यांना निघताना एखाद्या लहान मुलांप्रमाणे इतकी गळ घातली की विचारता सोय नाही. म्हणे ‘‘पुढचा कार्यक्रम माझ्याकडे झाला पाहिजे. कधीचा वेळ देताय ते लगेच सांगा! मला तुमच्यासारख्या मित्रांचे सहकार्य लागणार आहे.’’ मी गाडी पुढे काढत प्रसन्नाची त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका केली. सागर सुरवसेचेही तसेच. या माझ्या मित्राचा घरी बोलवून त्यांनी सत्कार केला आणि ‘‘तुमच्या वरिष्ठांना सांगून मला चर्चांच्या कार्यक्रमात बोलवा’’ म्हणून इतकी गळ घातली की आम्हाला त्यांना सांगावे लागले, ‘‘आम्ही प्रयत्न नक्की करू, पण ही चॅनल्स आमच्या मालकीची नाहीत...’’
दरम्यान महाराष्ट्रातील आणि बाहेरीलही आमचे सर्व हितचिंतक त्यांच्यासाठी कामाला लागले होते. बेळगावच्या अशोक याळगी यांच्यापासून सगळ्यांना मी जातीने झाडून फोन करून सबनीसांना मदत करण्याची विनंती केली होती. इकडे सबनीसांनी अनावश्यक आगाऊपणा सुरूच ठेवला होता. त्यांनी जातीनिहाय मतदारांची यादी केली. ‘किर्लोस्कर’च्या विजय लेलेंना सांगितले, ‘‘मागच्या तुमच्या आणि ‘चपराक’च्या दिवाळी अंकात मी मोदी यांच्याविषयी प्रेमाने लिहिले होते. नितीन गडकरी यांच्याशी माझा थेट संपर्क झालाय. नागपूरात त्यांनी मनोहर म्हैसाळकरांना ‘आदेश’ दिलाय. आता एकदा मोहनजी भागवतांची भेट काहीही करून घडवून आणा. म्हणजे नागपूर हातातून जाणार नाही. ब्राह्मण महासंघाचाही मला पाठिंबा मिळाला पाहिजे...’’
‘सत्याग्रही’त त्यांनी महाराष्ट्राबाहेरील साहित्यिकांवर लिहिले होते. त्यांना विनवण्या सुरूच होत्या. दलित कार्यकर्त्यांना सांगायचे, ‘‘माझी उभी हयात चळवळीत गेलीय. बाबासाहेबांवर मी इतकी पुस्तके लिहिली, इतकी व्याख्याने दिली. संवाद आणि संघर्षाची माझी भूमिका आहे. बामणांना आपण धडा शिकवला पाहिजे.’’
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुण्यातील नगरसेवक रविंद्र माळवदकर यांची आणि सबनीसांचीही भेट मीच घालून दिली होती. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगायला सुरूवात केली, ‘‘पवार साहेबांचा मला पाठिंबा आहे. त्यांनी पी. डी. पाटलांना फोन केलाय. आयोजकांची सारी मते आपल्याला नक्की मिळणार आहेत.’’
याचवेळी त्यांनी लातुरला डॉ. भास्कर बडे यांना फोन करून मदतीची याचना केली. डॉ. बडेंनी त्यांना सांगितले, ‘‘आम्ही कौतुकराव ठाले पाटील यांचे कार्यकर्ते आहोत. तुमच्याविषयी प्रेम आहे; मात्र ठाले पाटील सरांच्या विरूद्ध आम्ही जाऊ शकत नाही. ते सांगतील त्यांनाच आम्ही मतदान करणार. तुम्ही त्यांचे आशीर्वाद मिळवा!’’
झाले! सबनीसांनी सपत्नीक औरंगाबाद गाठले. ते ठाले पाटलांच्या पायाजवळ जाऊन बसले आणि त्यांनी सांगितले, ‘‘जोपर्यंत तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देत नाही तोपर्यंत मी येथून उठणार नाही. तुमची कृपाछत्रछाया माझ्यावर पाहिजे. पवार साहेबांनीही मला शब्द दिलाय. मी मराठवाड्यातलाच आहे आणि लातूर जिल्ह्यातला यापूर्वी एकही संमेलाध्यक्ष झाला नाही.’’ ठाले पाटील यांनी त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देत शुभेच्छा दिल्या.
प्रत्येकाशी खोटे बोलत, दिशाभूल करत सबनीस एक एक पाऊल पुढे पुढे टाकत होते आणि आम्ही मागे मागे सरत होतो. एकीकडे आमच्यावर निस्सिम प्रेम करणारे सबनीस दिसायचे तर दुसरीकडे त्यांचे हे दुटप्पी वागणे! मनाची घालमेल सुरूच होती. त्याचवेळी त्यांनी त्यांचे प्रचारमाहितीपत्रक तयार केले. त्यात त्यांच्याविषयी आजपर्यंत कोण कोण काय काय उद्गार काढलेत त्याचा भरणा केला. कुसमाग्रजापासून ते माधवी वैद्यापर्यंत सर्वांच्या विधानाचा त्यात समावेश होता. त्याची कच्ची प्रत पाहून आम्ही सांगितले की, ‘‘यातले किमान वैद्य बाईंचे नाव वगळा. एकतर त्यांचे नाव घेतल्याने आपल्याला तोटाच होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या महामंडळाच्या अध्यक्षा असल्याने प्रचारात सहभागी होऊ शकणार नाहीत.’’
त्यावर सबनीस म्हणाले, ‘‘त्यांचे माझ्यावर भावाप्रमाणे प्रेम आहे. मी त्यांच्या कानावर घालतो.’’
लगेच त्यांनी बाईंना फोन करून आशीर्वाद मागितले. त्या म्हणाल्या, ‘‘सबनीस, निवडणूक होईपर्यंत मी तुमची बहिण नाही आणि तुम्ही माझे भाऊ नाही. मी फक्त अध्यक्षा आहे आणि तुम्ही उमेदवार. त्यामुळे माझे नाव कुठेही वापरू नका.’’
आता मात्र ते टरकले. मात्र तरीही त्यांनी ते नाव आणि त्यांची प्रतिक्रिया कायम ठेवायचा निर्णय घेतला. ‘‘माधवी वैद्यांचा मला पूर्ण पाठिंबा असून त्या माझ्या मागे ठामपणे आहेत’’ असे ते वैद्यांच्या संबंधित लोकांना सांगायचे. हे प्रचारपत्रक तीन वेळा सर्व मतदारांना पाठवून झाले आणि तोपर्यंत एका प्रतिस्पर्धी उमेदवाराने आक्षेप घेतल्याने ‘‘मी हे पत्रक माघार घेतो’’ असे त्यांना जाहीर करावे लागले.
एखाद्या सराईत राजकारण्यांना लाजवेल अशी त्यांची तयारी चालली होती. रंगबदलूपणा प्रचंड वाढला होता. त्यांनी निवडणुकीचा अर्ज भरला. त्यानंतर साहित्य परिषदेत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मलाही त्यांच्यासोबत व्यासपीठावर बसायची विनंती केली. माधवी वैद्य यांनी असहकार्य केल्याने खाजगीत त्यांच्याविषयी ते वाटेल तसे बोलायचे. वैद्य यांच्याविषयी आमचे मत प्रतिकूल असूनही सबनीसांच्या तोंडची ही भाषा आम्हाला अजिबात आवडायची नाही.
कवी विठ्ठल वाघ, प्रकाशक अरूण जाखडे, शरणकुमार लिंबाळे आणि श्रीनिवास वारूंजीकर यांनी त्यांच्याविरूद्ध अर्ज भरले होते. या सर्वांना भेटून आणि काहींना घरी बोलवून त्यांनी सत्कार केला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. इतर वेळी मात्र त्यांच्या जवळच्या लोकांना गाठून यांनी माघार घ्यावी यासाठी त्यांच्यावर दबावही आणला. मात्र कोणीही त्यांना दाद दिली नाही. अरूण जाखडे यांना डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आणि प्रा. मिलिंद जोशी यांनी भरीस घालून उभे केल्याचा त्यांचा समज झाला होता. त्यामुळे या दोघांविषयीही ते वाट्टेल ते बोलू लागले. कोत्तापल्ले आणि प्रा. जोशी हेही आमचे स्नेही असल्याने ते आम्हास खटकत होते. शरणकुमार लिंबाळे यांना उत्तम कांबळे आणि अरूण खोरे यांनी उभे केल्याचा त्यांचा दावा होता. ज्या उत्तम कांबळेंचे ते इतके कौतुक करायचे ते त्यांना ‘गद्दार’ वाटू लागले. ‘आजपर्यंत सर्वात मोठा सुरा उत्तमने माझ्या पाठीत खुपसलाय. तुम्ही माझ्या मुलासारखे आहात, योग्यवेळी त्याला धडा शिकवून बदला घ्या’ अशी त्यांची विचित्र बडबड सुरू होती. ‘त्यांना एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जावे’ असेही आम्हाला यावेळी वाटले.
वेळ, पैसा आणि आत्तापर्यंत प्रामाणिकतेतून कमवलेली थोडीफार पुण्याई आम्ही त्यांच्या पाठीशी उभी केली होती. त्यांचा राखी पौर्णिमेच्या दिवशी आम्हाला हर्षोल्हासात फोन आला की ‘‘चपराकच्या संपूर्ण टीमसह ताबडतोब घरी या. मी आतुरतेने तुमची वाट पाहतोय.’’ कसलाही विचार न करता आम्ही आमच्या फौजफाट्यासह त्यांचे घर गाठले. तिथे शरद पवारांच्या गोटातले विश्वासू पत्रकार, ‘राष्ट्रवादी’ मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, ‘‘साहेबांनी पी. डी. पाटलाला फोन केलाय. राष्ट्रवादीची सगळी ताकत आपल्या मागे उभी आहे.’’ त्यानंतर सौभाग्यवती सबनीस यांनी औक्षणाचे ताट आणले. भोंगळे यांना राखी बांधली. भोंगळेंनी राखीच्या ताटात ओवाळणी टाकण्यासाठी शंभराची नोट काढली. त्याबरोबर सबनीस उठले आणि आमच्या सगळ्यांच्या देखत त्यांनी भोंगळेंच्या पायावर चक्क आपले डोके ठेवले. ‘‘ओवाळणीत पैसे नकोत. आमच्या ‘हिने’ तुम्हाला भाऊ मानले आहे. सध्या माझ्यासाठी तुम्हीच शरद पवार. तुम्हाला केलेला नमस्कार त्यांना मिळेल. एकदा संमेलानध्यक्ष पदाची भीक माझ्या पदरात घाला. त्यानंतर मी तुम्हाला कधीच काही मागणार नाही. माझी ही शेवटची इच्छा आहे.’’ आणि त्यांनी डोळ्यात पाणी आणले.
काही मिनिटात घडलेल्या या नाट्यमय घडामोडी पाहून आम्ही अवाक् झालो. भोंगळेंनी लगेच मतदार यादी पुढे घेतली आणि ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे, सासवडच्या संमेलनाचे आयोजक विजय कोलते, फ. मुं. शिंदे, रामदास फुटाणे अशा काहींना त्यांनी फोन केले. ‘‘अरूण, साहेबांनी सबनीसांना शब्द दिलाय. त्यांचा शब्द म्हणजे आपल्या सर्वांचा शब्द. तू शरणकुमारला माघार घ्यायला लाव. पुढच्या वेळी आपण त्याला मदत करू. मी उत्तम कांबळेशीही लगेच बोलतो. सबनीसासाठी आपल्याला आपली ताकत उभी करायची आहे. यावेळी तू कोणतेही कारण ने देता सबनीसांना मदत कर...’’
त्यांचा सगळ्यांना दरडावण्याचा उद्योग सुरू असतानाच मला अरूण खोरेंचा फोन आला. ‘‘घनश्याम, राष्ट्रवादीचा एक भाट शरणकुमार लिंबाळे यांनी माघार घ्यावी यासाठी माझा पाठपुरावा करतोय. लोकशाही व्यवस्थेत हे अन्यायकारक आहे. सबनीसांना पवारांनी पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले. ही साहित्याची निवडणूक आहे की ग्रामपंचायत आखाडा? आपण लवकरच भेटणे गरजेचे आहे. हा श्रीपाल सबनीस कोण हेही मला तुझ्याकडूनच समजून घ्यायचे आहे.’’ मी फोन बंद केला व सबनीस आणि भोंगळेंचा निरोप घेतला. ‘‘कार्यालयात तातडीचे काम निघाले, पुन्हा भेटू’’ असे म्हणत आम्ही कलटी मारली. मुळात हे सारे किळसवाणे आणि धक्कादायक होते.
आम्ही ‘चपराक’ला आलो आणि प्रथम संगणक सुरू करून आमच्या कार्यकारणीतून सबनीसांचे नाव ‘डिलीट’ केले. ‘आजपासून ‘चपराक’मधून तुम्हाला पदमुक्त करीत आहोत. खोटारडेपणाचा कळस गाठणारी मंडळी आमच्यासोबत नकोत’ असे त्यांना कळवले.
एकंदरीत साहित्यातील या प्रकाराविषयी आम्हाला घृणा वाटू लागली होती. राजमहालाच्या शिखरावर कावळा जाऊन बसला म्हणून तो काही गरूड होत नाही. सबनीस यांच्यामुळे आम्हाला ‘सबनीच’ हा शब्दही कळला. त्यातल्या भावना जाणवल्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून ते आचार्य अत्रे, डॉ. सदानंद मोरे यांच्यापर्यंत ज्यांनी हे पद भूषवले त्यावर इतका रंगबदलू माणूस बसणार असेल तर साहित्याला यापुढे कसलीही प्रतिष्ठा राहणार नाही असे आम्हाला वाटू लागले. आत्तापर्यंत आपली दिशाभूल झाली आणि प्रथमच आपण एका मुखवट्याला बळी पडलो अशी भावना मनात निर्माण झाली.
आता वेळ हातातून निघून गेली होती. त्यांना सहकार्य करावे म्हणून अनेकांकडे शब्द टाकून झाला होता. या ‘भोंगळे’ पुराणानंतर आम्ही त्यांच्याकडे फिरकलो नाही. त्यांना फोनही केला नाही. आश्चर्य म्हणजे नंतर त्यांचाही एकही फोन आला नाही. आमचा संदर्भ देत ते आम्ही जोडून दिलेल्या सर्वांशी मात्र रेटून बोलत होते. मतपत्रिका बर्यापैकी गेलेल्या होत्या. अनेकांचे आम्हाला फोन आणि एसएमएसही येत होते. ‘आम्ही शब्द पाळला’ असे ते सांगत होते आणि ‘धन्यवाद, मन:पूर्वक धन्यवाद’ असे म्हणत आम्ही त्यांचा निरोप घेत होतो. ‘आपलाच माल अन् आपलाच तराजू, कोणाला तोलून दावायचं? खपला तर खपला, नाहीतर सांगा कोणाला बोलून दावायचं?’ अशी काहीशी आमची अवस्था झाली होती.
अखेर निकालाचा दिवस उजाडला. ‘घात झाला, घात झाला’ असे म्हणत विठ्ठल वाघांचे कार्यकर्ते परिषदेतून बाहेर पडले. निवडणूक प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार आणि मतपत्रिकांची आदलाबदल केल्याचा आरोप वाघांनी केला. सबनीसांच्या बगलबच्च्यांनी जल्लोष सुरू केला. आम्ही औचित्य म्हणूनही त्यांना अभिनंदनाचा फोन किंवा एसएमएस केला नाही. त्यांचाही आला नाही. सबनीस निवडून आल्यानंतर त्यांच्यावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. अनेकांनी ‘कोण हे सबनीस?’ असाही सवाल सुरू केला. साहित्यिक गुणवत्ता असलेले आणि सामान्य वाचकाला झेपणारे एकही पुस्तक अध्यक्षांच्या नावावर नाही. त्यामुळे हा प्रश्न स्वाभाविक होता. ‘सबनीस कोण?’ या प्रश्नाचे उत्तर मात्र इतके सोपे नक्कीच नाही.
नुकतेच फ. मुं. शिंदे यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन सबनीसांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी शरद पवार यांच्या पंच्चाहत्तरी निमित्त पवारांचा गौरव सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात पवारांच्याच समोर त्यांनी ‘पवार साहेबांचे माझ्यावर कसलेही उपकार नाहीत’ असे ठासून सांगितले. खरेतर बारश्याला जाऊन बाराव्याची भाषा करणे औचित्यपूर्ण नसते. मात्र संमेलनाध्यक्षांना तेवढे भान असायला हवे ना?
मराठवाड्याच्या मातीतून आलेला हा माणूस नोकरीच्या निमित्ताने खाणदेशात गेला. शिक्षणक्षेत्रात बरबटलेले राजकारण केले. त्यांच्यावर ‘ऍट्रॉसिटी’ सारखे गुन्हेही नोंद झाले. त्या सगळ्यांना विविध प्रकारे पुरून उरत साहित्य संमेलनाध्यक्षाची महत्त्वकांक्षा उराशी बाळगत त्यांनी पुणे गाठले. ही महत्त्वकांक्षा पूर्णही केली. त्यासाठी अनेक तडजोडी केल्या. विचारांची दिशा बदलली. भूमिका बदलली. माणसांचा वापर केला. मराठी साहित्य क्षेत्रात मानाचे असलेले संमेलनाध्यक्ष पद कसलीही साहित्यिक कारकिर्द नसताना अकलेच्या आणि धूर्तपणाच्या बळावर बळकावता येते हे त्यांनी सिद्ध केले.
निवडून आल्यानंतर आमच्याशी संबंधित अनेकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी फोन केले. ‘मला तुमच्या शुभेच्छा नकोत’ अशा स्पष्ट शब्दात त्यांनी अनेकांना सुनावले. काहींना ‘आपण कोण’ असा उर्मट सवालही केला. रोज ज्यांना ते दहा वेळा फोन करायचे त्यांचे नंबर आणि ओळखही ते विसरले. नाईलाजाने ज्यांना ज्यांना आम्ही ‘सबनीसांना मदत करा’ अशी गळ घातली होती त्या प्रत्येकाला सांगावे लागले की ‘‘या ‘गजनी’ला शॉर्ट टर्म मेमरी लॉस हा आजार झालाय. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल आणि आपल्या चुकलेल्या निवडीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.’’ संमेलनाध्यक्ष पदापुढे काहीच नाही, इतर सगळे फुटकळ आहेत अशी त्यांची भावना झाली. हरी नरके, भालचंद्र नेमाडे, शोभा डे अशा प्रवृत्तींच्या विरूद्ध आम्ही अग्रलेख लिहिल्यानंतर पेढे वाटून आनंद साजरा करणारे सबनीस त्यांच्याच पंगतीत जाऊन बसले.
हा अग्रलेख लिहित असतानाच त्यांची काही गंभीर विधाने येऊन धडकली आहेत. देशाच्या पंतप्रधानाला ते ‘अरेतुरे’ करतात. त्यांची ही असभ्य भाषा मोदी विरोधकानांही आवडलेली नाही. ‘‘मोदी पाकिस्तानात असा फिरत राहिला तर त्याला कुठून गोळी लागली असती हेही कळले नसते. आज पाडगावकरांऐवजी मोदीला श्रद्धांजली वहावी लागली असती’’ पाडगावकरांसारखा महाकवी काळाआड गेल्यानंतर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने इतकी निलाजरी, बेअक्कल आणि दुर्दैवी विधाने करणे खरोखरीच क्लेशकारक आहे. एकतर मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. दुसरी गोष्ट सबनीस आंतरराष्ट्रीय प्रश्नाचे अभ्यासक नाहीत. गल्लीबोळात एखाद्या गुंडाला मारावे तसे आपल्या पंतप्रधानाला मारले जाईल असा मंदबुद्धीचा आणि बालीश विचार करणे हे आपल्या सांस्कृतिक कुपोषितपणाचे लक्षण आहे. 99 टक्के मराठी वाचकांना सबनीसांची साहित्य संपदा माहीत नसताना त्यांनी अशी विधाने करणे आश्चर्यकारक आहे. मराठी साहित्य, मराठी माणूस, मराठी संस्कृती याविषयी संमेलनाध्यक्षांनी भूमिका घेणे गरजेचे असताना ते असे तारे तोडत आहेत. ‘कुत्र्याला खीर पचली नाही’ असे एका वाक्यात त्यांच्या भूमिकेचे विश्लेषण करता येईल.
सबनीस हे साहित्य संमेलनाचे 89 वे अध्यक्ष आहेत. हा अध्यक्ष दरवर्षी बदलतो. ‘तीन दिवसाचा गणपती’ असे त्याचे स्वरूप असते. यापूर्वीचे अध्यक्ष किमान त्यांच्या साहित्यिक विचारधारेतून, कर्तृत्वातून, चारित्र्यातून जिवंत आहेत. मात्र दुर्दैवाने यंदाचे अध्यक्ष संमेलनापूर्वीच संपलेत. कुणालाही त्यांच्याविषयी जिव्हाळा वाटत नाही. पी. डी. पाटील यांच्यासारखा तगडा आयोजक आणि सबनीसासारखा भिकार मनोवृत्तीचा अध्यक्ष यंदा आपल्याला लाभलाय.
सातत्याने भूमिका बदलणारे सबनीस कधी पुरोगामी असल्याचा आव आणतात, तर कधी हिंदुत्ववाद्याच्या गोटात असल्याचे सांगतात. अशी माणसे कुणाचीच नसतात. असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून काहींनी ‘पुरस्कार वापसी’ची नौटंकी चालवली होती. सबनीसांनी त्याचे समर्थन केले होते. अध्यक्ष झाल्यानंतर ते साहित्यबाह्य विषयावरूनच चर्चेत आहेत. त्यामुळे मराठीचे वाटोळे करण्यात ही मंडळी पुढाकार घेत आहेत. ‘आपले पाय मराठी असले तरी मेंदू इंग्रजी असला पाहिजे’ असली खुळचट, वेडगळ आणि निर्बुद्धपणाची विधाने करत सबनीस स्वत:च त्यांची लायकी सिद्ध करत आहेत.
जाता जाता मराठी सारस्वतांना, वाचकांना आम्हाला मिळालेली माहिती सांगावीसी वाटते. शेतकर्यांचा, कष्टकर्यांचा कैवार घेत असल्याचा आव आणत, देशात असहिष्णूता वाढली असे सांगत श्रीपाल सबनीस नावाचा हा डोमकावळा साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनच पदाचा राजीनामा देणार असल्याचे कळते. मोदी आणि हिंदुत्व यांचा द्वेष करणारी, पुरोगामीपणाच्या नावावर विकृतपणे वागणारी ही मंडळीच आपल्या भाषा आणि संस्कृतीचा खून पाडत आहेत. दुर्दैवाने सबनीसांनी असा अविवेक दाखवू नये असेच आम्हास वाटते.
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे
७०५७२९२०९२