Sunday, December 13, 2015

मानवतेचा संदेश देणारी कविता

 
महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर ‘लोकसंख्या विस्फोट’ या विषयावर व्यंग्यचित्रांचे शंभरहून अधिक प्रदर्शन भरविणारे आणि ‘मार्मिक राज्यस्तरीय व्यंग्यचित्र पुरस्कार’ विजेते प्रा. बी. एन. चौधरी यांना मी ‘खान्देशचे मंगेश तेंडुलकर’ म्हणून ओळखायचो. व्यंग्यचित्रांच्या निमित्ताने त्यांच्याशी संपर्क आला आणि या अवलियाची प्रतिभा पाहून मी चाटच पडलो. अध्यापक, व्यंग्यचित्रकार, पत्रकार, कवी, लेखक आणि महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी... सर्वच भूमिकांत समरसून गेलेले बी. एन. तथा नाना चौधरी! त्यांचा ‘बंधमुक्त’ हा काव्यसंग्रह नुकताच वाचला. तो वाचून ‘मुक्त’ होण्याऐवजी एक दृढ बंधनात आणखी अडकलो, समरसून गेलो.
हे बंध कुठले?
तर एका सच्च्या आणि अच्छ्या सुहृदयाशी जोडलेल्या जिव्हाळ्याचे, ऋणानुबंधाचे! नानांचा परिवर्तनवादी विचार आणि त्यांच्या कवितांचे सामर्थ्य सामान्य माणसांचा आवाज बुलंद करणारे आहे. प्रकाशपर्व आणण्यासाठी सूर्यालाच ‘थोपवून’ ठेवण्याचा दुर्दम्य आशावाद त्यांनी ‘बंधमुक्त‘मध्ये पेरलाय. कर्तृत्त्वाची, विद्वत्तेची, मानवतेची ‘जात’ प्रत्येकाला असावी असे सांगताना फुले, आंबेडकर, गांधी यांचे ऋण आपण अजून फेडले नाहीत ही वस्तुस्थिती ते डोळसपणे निदर्शनास आणून देतात.
मेलेल्या माणसांच्या वस्तीत अंधार असला तरी ही ‘काळरात्र’ नाही याचे भान या कविला आहे. त्यातूनच ते त्वेषाने लिहितात,
अश्‍वत्थाम्यासारखं
माझं दुःख जेव्हा
भळाभळा रक्त ओकू लागतं
तेव्हा वाटतं
अभिमन्यू होऊन
जातीचं चक्रव्यूह भेदून टाकावं
अगस्ती होऊन
भेदाभेदाचा सागर पिऊन टाकावा...

‘बंधमुक्त’मध्ये मानवतेचा संदेश देणार्‍या साठ रचना आहेत. सुलभ शैली, आशयसंपन्नता आणि मानवी नैतिक मुल्यांवरील अढळ श्रद्धा यामुळे बालकवी ठोंबरे यांच्यानंतर धरणगावातील या सारस्वताने आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. खान्देशचा साहित्यिक वारसा समर्थपणे आपल्या खांद्यावर पेलून धरत मराठीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारे बी. एन. नाना म्हणूनच गौरवास पात्र ठरतात. ‘माणूस माणूस जोडत जावा’ हा त्यांच्या जगण्याचा मूलमंत्र आहे. त्यातूनच त्यांच्या कवितांचा सुगंध सर्वत्र दरवळतोय, कथांना बहर येतोय, चित्रांना धुमारे फुटताहेत आणि ललित-वैचारिक साहित्य वाचकांच्या मनामनात घर करतेय. मुख्य म्हणजे संस्कार आणि संस्कृतीचे जतन करताना ते विवेकाच्या, विज्ञानाच्या कसोटीवरही संपन्न आहेत. त्यांच्यातला संवेदनशील कवी आणि विद्यार्थीहितदक्ष शिक्षक शब्दाशब्दातून दिसून येतो.
जगी भासे माय, जसं प्रेमाचं मंदिर
आटता आटेना तिच्या, प्रेमाचा तो पूर
(माय : अभंग)
अशा शब्दात अभंगाद्वारे मायीची महती गाणारे चौधरीनाना मातृभक्त आहेत.
घरातून माझ्या गेलं
गेलं घरपण
मायबिगर घरा आलं
आलं रितपण
(माय : ओसरी)
ही आई दूर गेल्यावरची मनोअवस्था वाचल्यानंतर कुणाचेही डोळे आपोआप पाणावतील. आईलाच परमेश्‍वर मानणार्‍या या हळव्या कविच्या या काही ओळी पहा -
मायेची गोधडी
प्रेमाची गोधडी
घेता अंगावर
दुःख मारे दडी
(माय : गोधडी)

फाटकाच पदर तिचा
दिसे त्यातूनच काया
वाहे त्यातून झरझर
तिच्या अंतरीची माया
(माय : माऊली)
आईच्या उमाळ्याने ओथंबून आलेले हे शब्द म्हणजे मराठीतील आईविषयक कवितांचे शिखर ठरावे. प्रत्येक जिंदादिल माणसाच्या हृदयाला स्पर्श करणार्‍या प्रा. बी. एन. चौधरी यांचे कवी म्हणून असलेले श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी आणखी दाखले देण्याची गरज नाही!
समाजातील वास्तव टिपताना, जिथे ‘सभ्यता’ विकली जाते तिथली विसंगती मांडताना ‘कणाहीन’सारखी वेगळी कविता हेलावून सोडते. त्यांची निरीक्षण क्षमता दाखवून देते.
प्रा. चौधरी लिहितात,
गड्यांनो सदोदित कुठेही
वाकणारी आणि झुकणारी
माणसं जेव्हा मी पाहतो
तेव्हा मला प्रश्‍न पडतो
यांना कधी काळी...
पाठीचा कणा होता की नाही?
एवढ्यात,
एकाच्या पाठीवर थाप पडते
कडाडत...
ही थाप असते लाचारीची
गरीबीची आणि स्वार्थाची
थोड्या वेळापूर्वीचा तो
क्षणार्धात वाकतो रबरासारखा
मग मला उमगते रहस्य...
पाठीचा कणा नसलेल्या
कणाहीन माणसांचं...

सामान्य माणसाच्या व्यथा आणि वेदनेशी एकरूप झालेल्या प्रा. चौधरी यांचे समाजभान यातून दिसून येते.
गुलामास तू जागविले
बंडाची दिली ‘दीक्षा’
प्रज्ञा, शील, करूणा करती
सर्वांची रक्षा!
(दीक्षा)
हे महामानव बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान इतक्या सोप्या भाषेत सांगणारे प्रा. बी. एन. चौधरी महाराष्ट्राच्या काव्यपरंपरेतले महत्त्वाचे पाईक ठरावेत! जीवनाच्या विविध रूपांचे, विविध प्रवाहांचे यथार्थ दर्शन घडविणारी त्यांची कविता आहे. त्यांच्या कवितेतील चिंतनसूत्रे व्यापक आणि माणुसकीचा वेध घेणारी आहेत. मराठीत कवितेचा विजयध्वज डौलात फडकत रहावा यासाठी प्रा. बी. एन. चौधरी यांच्यासारख्या अस्सल प्रतिभावंतांचे योगदान मोठे आहे. जाताजाता ‘असं झालं तर’मध्ये ते सांगतात,
सखे
फक्त प्रेमानेच
पोट भरलं असतं
तर...
किती बरं झालं असतं?
पोट भरण्यासाठी तरी
सर्वांनी एकमेकांवर
प्रेम केलं असतं!

‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ असाच संदेश देणार्‍या प्रा. बी. एन. नानांना त्यांच्या पुढील साहित्यिक कारकिर्दीस ‘चपराक’ परिवारातर्फे खंडीभर शुभेच्छा! 

(साप्ताहिक 'चपराक' पुणे)

 - घनश्याम पाटील
7057292092




No comments:

Post a Comment