Tuesday, September 15, 2020

संभाजी बिडी आणि राजकारणाचा धुरळा

पूर्वप्रसिद्धी - दै. पुण्य नगरी, मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

आपल्याला जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिलं. मृत्युला असं बेदरकारपणे सामोरा जाणारा असा दुसरा योद्धा, दुसरा सेनापती, दुसरा राज्यकर्ता जगाच्या इतिहासात दिसत नाही. मात्र आपल्याकडं छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा उपयोग केवळ आणि केवळ राजकारणासाठी करण्यात आलेला आहे. 


 एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं एक बिडी यायची. आचार्य अत्रे यांनी त्याला कडाडून विरोध केल्यावर ती बंद झाली आणि पुढे ‘छत्रपती संभाजी बिडी’ सुरू झाली. त्यातील ‘छत्रपती महाराज’ हा उल्लेखही काढून टाकण्यात आला. मात्र ‘संभाजी’ हे नाव वापरत इतकी वर्षे ही बिडी सुरूच आहे. आता शिवप्रेमींच्या रट्ट्यानंतर या बिडीचे नाव बदलण्याचा निर्णय त्यांच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. निलेश राणे, रोहित पवार असे युवा नेते या बदलासाठी आग्रही आहेत. यांच्या वडिलांना, काकांना छत्रपती संभाजी महाराजांचा हा अपमान दिसला नव्हता मात्र या नेत्यांनी या नावाच्या बिडीला विरोध करत राजकारण तापवले आहे.

ज्या राष्ट्रपुरूषांच्या प्रतिमा आपल्या हृदयात आहेत त्यांचा इतकी वर्षे अपमान होत असेल आणि आपण गप्पच असू तर ते सगळ्यात वाईट आहे. दरवेळी सिनेमा आला, नाटक आलं, पुस्तक आलं की वाद निर्माण होतात. बाजीराव पेशव्यांवर सिनेमा आला आणि त्यात त्यांना नाचताना दाखवलं तरच आमचा स्वाभिमान दुखावतो. इतर वेळी त्यांच्या विचारांचं, कार्यकर्तृत्वाचं आम्हाला काही देणंघेणं नसतं. त्यासाठी आपल्या राष्ट्रपुरूषांच्या कर्तबगारीचा अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा राजकीय वापर सुरू केलाय. यामुळं महाराजांच्या मुद्रेची माहिती जनसामान्यांपर्यंत जाणार असेल तर त्याचं फारसं वावगं वाटण्याचं काही कारण नाही. छत्रपतींच्या इतिहासावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाची ती अभिमानाची निशाणी आहे. त्यावर मनसेचा किंवा राजघराण्यातील कुणाचाही खाजगी अधिकार नाही. त्यामुळं ती जास्तीतजास्त शिवप्रेमीपर्यंत पोहोचायलाच हवी.

छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्यायचं तर एखाद्या महाविद्यालयाला द्या, हॉस्पिटलला द्या, महाराष्ट्राच्या विधानभवनाला द्या, एखाद्या विमानतळाला द्या, मात्र संभाजी महाराजांच्या नावानं एखादी बिडी, सिगारेट निघत असेल तर ते वाईटच आहे. हे नाव बदलण्याची मागणी त्यांच्या व्यवस्थापनाने मान्य केलीय. त्यासाठी त्यांनी थोडा वेळ मागितलाय. खरंतर सध्याच्या करोनाच्या काळात ‘सर्व व्यसनापासून दूर रहा’ असं सगळेच सांगत असताना या नावाची बिडी असावी की नसावी असा वाद घालणं हे सुद्धा खुळेपणाचं आहे. कोणत्याही महापुरूषांच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल असं कोणतंही उत्पादन कधीही नसावं. साबळे-वाघिरे या उद्योजकांना संभाजी हे नाव हवंच असेल तर त्यात थोडा बदल करून ‘संभाजी भिडे गुरूजी बिडी’ असं करता येईल. त्यावर फार कुणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. कदाचित काहीजण अंधभक्तीतून त्याचं मार्केटिंगही करतील. हा असा बदल करावा असं आमचं म्हणणं नाही पण बिडीसाठी संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख प्रत्येकाला खटकणाराच आहे.

जगाच्या इतिहासात स्वदेशासाठी, स्वधर्मासाठी आणि स्वतःच्या तत्त्वासाठी संभाजीराजांनी ज्याप्रमाणे हौतात्म्य पत्करलं तसं हौतात्म्य येशू ख्रिस्ताशिवाय आणखी कोणी पत्करलेलं दिसत नाही. ख्रिश्‍चन जगतातले सगळे विचारवंत, शास्त्रज्ञ, कलाकार, अभिनेते, डॉक्टर, वकील दर रविवारी प्रार्थनेसाठी चर्चमध्ये एकत्र येतात. येशू ख्रिस्ताच्या मूर्तीपुढे नतमस्तक होतात आणि अपार शांतीचा अनुभव त्यांना अनुभवता येतो. तसंच किंवा त्याहून मोठं बलिदान भारतीय समाजात कोणी पत्करलं असेल तर ते केवळ आणि केवळ छत्रपती संभाजी महाराज आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचं कुठं मंदीर नाही. त्यांचं मंदीर उभारून त्यांचं दैवतीकरण करण्याची गरजही नाही. मात्र त्यांच्या दुर्दम्य पराक्रमाचा, आशावादाचा विसर आपल्याला पडू नये. त्यांच्या स्मृतीसुद्धा आपल्या विस्मृतीत गेल्याने आपण अशा दुर्दशेला पोहोचलो आहोत.

छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आपल्याकडे अनेक प्रवाद आहेत. त्यावर सातत्यानं चर्चा करून महाराजांचं व्यक्तिमत्त्व कायम वादग्रस्त करण्यात आलं. त्यांच्यावर पुस्तकं लिहिली गेली, मालिका काढण्यात आल्या त्या सुद्धा अशाच संशयास्पद पद्धतीनं करण्यात आल्या. संभाजी महाराज निर्व्यसनी होते हे पुन्हा पुन्हा पुराव्यासह सिद्ध झालेलं असताना त्यावर चर्चा कशासाठी? तरीही संभाजीराजांना कोणती व्यसनं होती याची चर्चा स्वतःच्या हातातल्या पेगकडं बघत करणारी माणसं प्रत्येक पिढीत निर्माण झाली. या लोकानी आणि संभाजी महाराज कसे निर्व्यसनी होते हे सांगणार्‍या व्यसनी कादंबरीकारांनीच महाराजांना अधिक बदनाम केलं. या सगळ्या व्यापात संभाजी बिडीकडं इतकी वर्षे आमचं दुर्लक्ष झालं आणि ती चालूच राहिली.

जो आदर, जो सन्मान, जी प्रतिष्ठा ख्रिस्ती जगतात येशू ख्रिस्तांना प्राप्त झाली ती भारतीय समाजात संभाजी महाराजांना करून देण्याची जबाबदारी आपणा सर्व शिवप्रेमींची आहे. फक्त ‘संभाजी बिडी बंद करा’ अशी मागणी करायची आणि लगेच हात पुढे करत एकगठ्ठा मतं मागायला पुढं यायचं असंच इतकी वर्षे सुरू आहे. मराठा आरक्षणावरून एक झालेल्या मराठा समाजाला ‘संभाजीकार्ड’ वापरून झुलवत ठेवायचं अशीच यातील राजकारण्यांची वृत्ती दिसतेय. छत्रपतींच्या विचारांशी यांची काही बांधिलकी आहे असं कधीच दिसलं नाही. चुकीच्या मालिका निर्माण करून, आरडाओरडा करत भाषणं ठोकून महाराज सामान्य माणसांपर्यंत पोहोचणार नाहीत.
 
आपल्या वडिलांच्या मृत्युनंतर औरंगजेब नावाचं वादळ नऊ वर्षे आपल्या छातीवर झेलणारा हा पराक्रमी राजा होता. आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्यासाठी इतक्या तरण्याबांड वयात कसलीही तडजोड न करता, कोणताही पराभव न स्वीकारता हा राजा धारातीर्थी पडला. त्याची दखल इतिहासानं घेतली असली तरी वारंवार त्यांच्याविषयी वाद आणि प्रवाद निर्माण करण्यात आले आहेत. औरंगजेबाचा अकबर नावाचा मुलगा होता. तो दक्षिणेत उतरला. या अकबरानं औरंगजेबाच्या विरूद्ध बंड केलं. राजस्थानात ते फसलं. मग त्यानं आपल्या बापाविरूद्ध त्या काळातल्या भारतातल्या सर्व सत्ताधीशांकडे आश्रय मागितला. त्यात आदिलशहा होता, कुतुबशहा होता, डच होते, पोर्तुगिज होते, दक्षिणेतल्या अनेक सत्ता होत्या. मात्र त्याला आश्रय देणं म्हणजे औरंगजेब नावाचं एक आस्मानी आणि सुलतानी संकट अंगावर घेणं हे या सर्वांना माहीत होतं. त्यामुळं कोणीही हे धाडस दाखवलं नाही. मात्र कधीतरी आपल्याला या सत्तांशी संघर्ष करायचाच आहे आणि त्यात औरंगजेबाचा हा अकबर नावाचा मुलगा आपल्या कामाला येईल हे संभाजीराजांना माहीत होतं. त्याची सोबत असेल तर मोगलांविरूद्ध लढताना आपल्याला मदत होईल या विचारातून सतराव्या शतकात त्याला आश्रय देण्याचं धाडस संभाजीराजांनी दाखवलं. वयाच्या बावीसाव्या-तेवीसाव्या वर्षी असं धाडस दाखवणारा हा छावा होता.
 
जर अकबर नावाच्या या मुलाला आश्रय देण्याचं धाडस महाराजांनी दाखवलं असेल तर हा राजा अतिशय निधड्या छातीचा होता, संकटं अंगावर झेलणारा होता, परिणामांची फिकिर न बाळगता काम करणारा होता, या राजाचे राजकीय डावपेच आणि क्षमता चांगल्या होत्या हा सगळा इतिहास वाचकांपर्यंत सातत्यानं मांडण्याची गरज आहे. गोदुबाई, चंपाबाई, कमळाबाई हा महाराजांचा इतिहास नाही. त्याची चर्चा करण्याची आणि त्याचीच बडबड करण्याचीही गरज नाही. अशाच विषयांची चर्चा होईल अशा मालिकांची आणि पुस्तकांचीही गरज नाही.

विश्‍वास पाटील नावाच्या एका लेखकानं राजांच्या जीवनावर ‘संभाजी’ नावाची एक कादंबरी लिहिली. राज्याभिषेकाच्या दिवशी कसल्या तरी शोभेच्या तोफा उडणार होत्या. त्या शोभेच्या तोफा महाराजांच्या दिशेनं वळवायच्या आणि त्यात खरंखुरं बारूद भरायचं असलं काहीतरी कारस्थान होतं. कुणीतरी गोदाबाई नावाची एक बाई होती. तिनं आपल्या नवर्‍यानं कसा काही कट केल्याची माहिती महाराजांना दिली. अशी काहीतरी वर्णनं या कादंबरीत आहेत. अरे चोंग्यांनो, शिवाजीमहाराजांचं व्यवस्थापन आणि त्यांची गुप्तहेर खाती अशी लुळीपांगळी नव्हती. आजही जागतिक स्तरावर त्याचा अभ्यास होतोय. राजधानीतील तोफात वाटेल तशी दारू भरण्याची कुणात हिंमत असेल का? कादंबरीच्या नावावर असं जे काही आजवर खपवलंय ते बंद झालं पाहिजे. महाराजांच्या नावानं बिडी असणं जितकं वाईट आहे तसंच किंबहुना त्याहून घाणेरडं हे असं लेखन आहे. अशा काल्पनिक लेखनावर, त्या आधारे होणार्‍या मालिकांवर बंदी घालण्याची मागणी खर्‍या शिवप्रेमींनी करायला हवी.

महाराष्ट्राला ‘महाराष्ट्र धर्म’ प्राप्त करून देणारा हा दुसरा छत्रपती राजा आहे. विलक्षण प्रतिभासंपन्न असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. एकाचवेळी ते पोर्तुगिज, डच, ब्रिटिश, मोगल, सिद्दी अशा सर्वांशी ते एकहाती लढले. एका तरूण राजानं दिलेली ही झुंज आहे. त्याचा जर आपल्याला यथायोग्य सन्मान ठेवता येत नसेल तर अवघड आहे. स्वाभिमान म्हणजे काय असतं, समर्पण म्हणजे काय असतं हे त्यांनी आम्हाला दाखवून दिलं.

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हा आजच्या राजकारण्यांच्या आवाक्यातला विषय नाही. त्यामुळं त्यांनी त्यांच्यावरून राजकारण करू नये. महाराजांचा विचार, त्यांचा पराक्रम जगभर पोहोचावा यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत. त्यांचा स्वाभिमान, स्वधर्म आणि स्वराज्याच्या पराकोटीच्या त्यागाची, निष्ठेची प्रेरणा लोकाच्या मनात निर्माण व्हायला हवी. संभाजी बिडीच्या निमित्तानं का असेना पण ज्यांच्या जाणीवा सजग आहेत त्यांनी संभाजी महाराजांचा पराक्रम सामान्य माणसांपर्यंत पोहोचवावा. राजकारण्यांच्या तावडीतून त्यांची सुटका करावी.

वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाशी लढताना हा तरूण राजा त्याला शरण गेला नाही, माफी मागितली नाही, तह केले नाहीत. या स्वाभिमानाचं इतकं दाहक दर्शन त्यांनी घडवलं तो संस्कार त्यांना कुठून मिळाला? तो संस्कार 12 मे 1664 ला त्यांना मिळाला. या तरूण राजाच्या वडिलांनी त्याला आग्र्याला नेलं. तिथं ‘‘मी अपमान सहन करणार नाही, माझं डोकं कापलं तरी चालेल पण बादशहाच्या दरबारात मी पुन्हा पाऊल टाकणार नाही’’ असं छत्रपती शिवाजीमहाराजांनी ठणकावलं. असा संतप्त ज्वालामुखी या मुलानं वयाच्या नवव्या वर्षी वडिलांच्या रूपात बघितला, अनुभवला. त्याची धग त्यांच्या हृदयात होती. संस्कार फक्त शब्दांनी किंवा काही सांगून होत नाहीत. संस्कार अनुभवातून येतात. संभाजी महाराजांवर स्वाभिमानाचे आणि आत्मसमर्पणाचे संस्कार त्यांच्या सगळ्या अनुभवातून आले होते. आपल्या वडिलांच्या एका शब्दासाठी तानाजींनी हौतात्म्य पत्करलेलं त्यांनी बघितलं होतं. बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह तीनशे बांदलांनी घोडखिंड अडवलेली आणि आपल्या वडिलांचे प्राण वाचवलेेले त्यांनी बघितलं होतं. हा सगळा आदर्श म्हणजे त्यांचं जगणं आणि वागणं होतं.

छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी जितकं लिहावं-बोलावं तितकं कमीच आहे. त्यांच्यासारखा स्वाभिमान इथल्या सामान्य माणसाच्या मनात निर्माण व्हावा अशी प्रांजळ अपेक्षा व्यक्त करतो.
- घनश्याम पाटील
7057292092

पूर्वप्रसिद्धी - दै. पुण्य नगरी, मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

19 comments:

  1. नेहमीप्रमाणे रोखठोख !

    ReplyDelete
  2. राष्ट्रीय प्रतीकं अबाधित राहिली पाहिजेत. त्यांचा सन्मान झाला पाहिजे. बिअर बार, खानावळींना पण दैवतांची नावे काढून टाकली जावीत!👍
    सुंदर लेख सरजी!!!👌👍💐💐💐

    ReplyDelete
  3. संभाजी महाराज यांचे चरित्र संपुर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे यात शंकाच नाही पण त्यांचे नावाच्या वापराविषयी आपल्या सुचना अधिक वाद वाढवून " इलाज भयंकर " ठरू शकतात. त्याचप्रमाणे संभाजी भिडे गुरूजींचा अपमान करून आपण काय साधले हे समजत नाही. आपला नेहमीचा संयम आणि शाब्दिक चपराक दिसत नाही हे ही जाणवलं !

    ReplyDelete
    Replies
    1. नेहमीप्रमाने सडेतोड अन् समर्पक .

      Delete
  4. अत्यंत चिकित्सक लेख आहे सर...याचबरोबर बिअरबार व ढाब्यांन रायगड शिवनेरी अशाच गडांची व थोर पुरुषांची नावे
    नावे दिलेली आहेत त्यावत्यावरही बोलावे.

    ReplyDelete
  5. अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणे क्लेशकारक आणि संताप आणणारे आहे.
    नेहमीप्रमाणे सडेतोड आणि जबरदस्त लेख!!

    ReplyDelete
  6. आजच्या घडीला अत्यावश्यक पद्धतीने लिहिलेला एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक लेख......!
    🙏🙏🙏✅

    ReplyDelete
  7. नवी दृष्टी देणारा लेख,
    यामुळे किमान आमच्या पुढाऱ्यांच्या अज्ञानाच्या अंधाराचे जाळे फिटावे हीच अपेक्षा

    ReplyDelete
  8. संपादक महोदय
    अतिशय सुंदर लेख

    ReplyDelete
  9. सर सुंदर लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे मॅनेजमेंट जग प्रसिद्ध आहे. सर्जिकल स्ट्राईक त्यांच्या काळात त्यांनी केले होते. त्यामुळे तुम्ही लिहिल्या प्रमाणे त्यांचे छत्रपती संभाजी महाराजांवरील संस्कार तितकेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या दोन्ही राजांचे कर्तृत्व प्रत्येक भरातीयापर्यत पोचायला हवं! नेहेमी प्रमाणे लेख आवडला.

    ReplyDelete
  10. अप्रतिम लेख,अतिशय पोटतिडकीने लिहिला आहे. छत्रपती संभाजी महाराजां बद्दलचे प्रेम, आदर,अभिमान पदोपदी जाणवते. खरोखर हीच भावना सर्वांची असावयास पाहिजे, आहेही. ती आणखी वाढायला पाहिजे.
    त्याची तळमळ दिसून येते.
    छत्रपती संभाजी महाराजांना शतशः प्रणाम !!!

    ReplyDelete