Friday, October 18, 2019

चला, बदल घडवूया!

घनश्याम पाटील
‘साहित्य चपराक’ दिवाळी विशेषांक 2019

जो बदलतो तो टिकतो, हे वैश्विक सत्य मानलं जातं. डार्विननंही हा सिद्धांत सांगितला! मात्र सध्याच्या बदलत्या मनोवृत्तीतील बदल क्लेशकारक आहेत. परिवर्तनाचा वारसा चालवणारे कुबड्या घेतल्याशिवाय चालू शकत नाहीत आणि ज्यांना बदलाशी काही देणंघेणं नाही ते इतके बदललेत की ‘ते हेच का?’ असा प्रश्न कुणालाही सहज पडावा. 

सध्या आपल्याकडे राजकीय पक्ष बदलण्याचा ‘ट्रेंड’ आलाय. सकाळी एका पक्षात असलेले दुपारी दुसर्‍याच पक्षात आणि संध्याकाळी आणखी भलत्याच नेत्यांसोबत दिसतात. विचारधारा, निष्ठा असे सगळे शब्द कालबाह्य झालेत. आपल्या माजी मुख्यमंत्र्यांनी ‘आदर्श’ शब्द कसा बदनाम केला तसेच सत्तेतल्या अनेक नेत्यांनी ‘मेगाभरती’च्या नावावर अनेक ओंगळवाण्या प्रवृत्ती दाखवून दिल्या. सत्ताधारी कोण, विरोधक कोण हेच समजायला मार्ग नाही. एखाद्या विद्यार्थ्याला परीक्षेत राजकारणावर काही प्रश्‍न आला आणि त्याने व्यवस्थित उत्तर लिहिले तरी ती प्रश्नपत्रिका तपासायला जाईपर्यंत सगळं चित्र बदललेलं असेल. हे असे बदल आपण सध्या सर्वत्र अनुभवत आहोत.

बरं, हे बदल फक्त राजकारणातच आहेत असंही नाही. आज एका वृत्तपत्रात असलेले संपादक दुसर्‍या दिवशी त्यांच्या प्रतिस्पर्धी वृत्तपत्रात असतील. आज रात्रीच्या बातम्या सांगणारा वृत्तनिवेदक उद्या आणखी कोणत्या वाहिनीच्या स्टुडिओत मेकअप करताना दिसेल. व्यवस्थेत, यंत्रणेत मूलभूत बदल होत नसल्याने असे वरवरचे बदल निश्चितपणे अस्वस्थ करणारे आहेत.

सध्या म्हणे समाज बदललाय. लोकाची अभिरूची बदललीय. त्यांच्या गरजा बदलल्यात. एकंदरीत त्यांचं जगणंच बदललंय. या बदलाच्या केंद्रस्थानी कोण आहे? हे बदल स्वागतार्ह आहेत की आणखी काळोखाच्या खाईत लोटणारे आहेत? 

भारताच्या कोणत्याही शहरात फिरताना माझं काळीज चर्रर होतं. जागोजागी वेगवेगळे श्रद्धांजलीचे फलक. त्यावर हमखास तरूणांचे फोटो. कोणी अपघातात गेलंय, कोणी प्रेमभंगानं तर कोणी नैराश्यानं आत्महत्या केलीय. कोणी व्यवसायातील अपयशानं जिंदगीशी हार मानलीय. कुणाचा ‘सेल्फी’ काढताना करूण अंत झालाय तर कोणी काही आजारानं मृत्युच्या आहारी गेलाय. हे कसले बदल म्हणावेत? असलं पोकळ परिवर्तन आपल्याला हवं होतं का? विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोज नवनवीन शोध लागताहेत आणि आपल्याकडं तरूण मुलं पब्जीसारखे कसलेतरी गेम खेळताना मरतात. हे बदल नेमकं कशाचं द्योतक म्हणावं? 

आजही जात-धर्म अशा विषयांवरून आपल्याला झुंजवलं जातं. या सामाजिक दर्‍या कमी होण्याऐवजी अधिक विस्तारत चालल्यात. कमालीचा कट्टरपणा वाढत चाललाय. कुणाचा कशावरून स्वाभिमान दुखावेल आणि कोण कशामुळे कसा वागेल हे ब्रह्मदेवही सांगू शकणार नाहीत. नेमकं असं काय बदललंय की आपण माणसाशी माणूस म्हणूनही वागू शकत नाही. काही चांगले बदल घडावेत यासाठी अनेक महापुरूषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. अनेकांनी त्या-त्या विषयात काम करण्यासाठी आपलं आयुष्य खर्ची घातलं. आपण मात्र जुनाट थोतांड दूर सारून आयुष्य बदलण्याऐवजी आणखी रानटी होत चाललोय. स्वतःला बदलण्याऐवजी कायम बदला घेण्याच्या आविर्भावात वावरतोय. 

सध्या समाजात सगळंच काही नकारात्मक चाललंय असंही एक चित्र विविध माध्यमातून सातत्यानं रंगवलं जातं. ते आधी बदललं पाहिजे. सद्गुणांची पूजा बांधताना आपण जे-जे सकारात्मक आहे त्याची वकिली केली पाहिजे. जगाकडून काही अपेक्षा ठेवण्याऐवजी आपण आपल्या वागण्यात काही बदल केले तरी खूप काही बदलू शकेल. सगळं अनिष्ट गाडून टाकण्याची, सगळं हलाहल पचवण्याची आणि प्रतिकूलतेवर मात करत स्वतःचं विश्‍व निर्माण करण्याची धमक आणि कुवत मराठी माणसात आहे. शौर्य आणि पराक्रमाचा वारसा चालवणारा मराठी माणूस मरगळलेला असेल; पण त्याच्या विचाराची धार कमी झालेली नाही. जगभर मराठी माणसानं आपल्या विद्वत्तेचा, कृतीशीलतेचा ठसा उमटवलेला असताना हे बदल आपल्याला टिपता आले पाहिजेत.

गेल्या काही काळापासून आपलं जे अधःपतन सुरू आहे ते पाहता कुण्याही विवेकी माणसाला चिंता वाटावी. सृष्टीत बदल होतोय. प्राणीमात्रात बदल होतोय. हे बदल स्वीकारण्याची, पचवण्याची आपली क्षमता आहे का? सामाजिक, आर्थिक, वैचारिक बदल होताना त्याचे सामर्थ्य आणि मर्यादा या दोन्हींचाही विचार केला पाहिजे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील बदल स्वीकारतानाच त्यापासून होणारे बरे-वाईट परिणाम आपण लक्षात घ्यायला हवेत.

जग बदलायला निघालेली माणसं स्वतःतही बदल करत नाहीत. मध्यंतरी माझे मित्र शिरीष देशमुख म्हणाले, स्वतःच्या धडावर स्वतःचं शिर असावं! पण त्या शिरात (डोक्यात) मात्र आम्ही घालून दिलेले विचारच असावेत असं काहीसं वातावरण सध्या आहे.

आम्हीही ठरवलं आपणही काही बदल घडवूया! हे बदल समाजात असतील, स्वतःत असतील! मात्र कसलं काय? ही जालिम दुनिया काही करू देईल तर शपथ! गेला काही काळ प्रकाशनक्षेत्राच्या दृष्टिनं नेमकं कसाय हे ठरवणंही मुश्किल आहे. 

म्हणजे होतंय असं, पुण्या-मुंंबईचा साहित्याचा केंद्रबिंदू ग्रामीण महाराष्ट्राकडं वळलाय. ‘वाचणारी’ एक नवी पिढी तयार झालीय. ती कमालीची सजग आहे. ‘माझं किती अवाढव्य वाचन आहे’ असला तकलादू अहंकार या पिढीत नाही. ‘काय वाचावं?’ हे या पिढीला चांगलं कळतं. त्यामुळं ही ‘ज्ञानोपासक’ पिढी अक्षरशः चातकाप्रमाणं चांगल्या पुस्तकांची वाट पाहत असते. स्वतःची भूक मारून पुस्तकं विकत घेणारी तरूण पोरं बघितली की अभिमान वाटतो. विद्यालयातून पुस्तकी किडे तयार होतात आणि मद्यालयातून गुंड तयार होतात. देवालयातून कट्टरतावादी जन्मताहेत. या सगळ्यात ‘माणूस’ संपत चाललाय. अशा बिकट परिस्थितीत ही ‘वाचणारी’ सजग तरूणाई मात्र जग वाचवायचा प्रयत्न करतेय. हे बदल निश्चितच स्वागतार्ह म्हणावे लागतील.

एस. एम. जोशी म्हणायचे, ‘एखाद्या गावात देशी दारूची दहा दुकानं असतील आणि तिथं एकच दूध डेअरी असेल तर दुधवाला दुधात पाणी घालतोय म्हणून तक्रार करण्यात काही अर्थ नसतो. उलट दारूची दुकानं कमी होऊन दुधाची दुकानं कशी वाढतील यासाठी काही करता आले तर करावे!’ 

आम्हीही तोच ध्यास घेतलाय. समाजात टीका करावी, धिक्कार करावा अशी ‘मानवी जनावरं’ कमी नाहीत. त्यांचा हिंस्त्रपणा भयंकरच आहे. त्यांच्यावर आसूड ओढतानाच जे जे उदात्त, व्यापक आहे तेही डोक्यावर घेऊन नाचायला हवे. ते काम आम्ही करतोय. हे बदल घडविण्यासाठी आमच्यासोबत यायला अनेकांची झुंबड उडालीय.

ग्रंथव्यवहाराचा विचार केला तर ‘कमिशन’ वृत्तीनं या क्षेत्राचं अतोनात नुकसान केलंय. विक्रेते, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते ‘आणखी हवा’च्या भस्मासुरानं चटावलेत. अर्थात, वर्षानुवर्षे निष्ठेनं काम करणारेही अनेकजण आहेत पण या झुंडशाहीपुढं त्यांचा निभाव लागताना दिसत नाही. इथली सरकारी व्यवस्थाही दलालांच्या पुढं झुकलेली असते.

मासिक ही संकल्पनाच मृतावस्थेला गेलेली असताना त्याला पुन्हा ऊर्जितावस्था मिळावी म्हणून सध्या अनेकजण गंभीरपणे धडपडत आहेत. मराठी मासिकं सध्या बदलत आहेत. हा बदल आनंददायी आहे. अकरा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात किमान एक लाख सभासद असणारी निदान पंचवीस मासिकं असायला काय हरकत आहे? 

‘चपराक’ची त्या दृष्टिनं वाटचाल सुरू आहे. आमचे असंख्य वाचक, विक्रेते, हितचिंतक, सभासद, जाहिरातदार या सर्वांचे त्यात मोठे योगदान आहे. जागतिक मंदी, मध्यंतरी झालेली नोटबंदी, जीएसटीसारखे तुघलकी कायदे यामुळे अनेकांना मोठा फटका बसलाय. सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कामगारकपात झालीय. संघटित कामगार किमान त्यांच्या न्याय्य हक्कासाठी एकत्र येऊन लढतात. असंघटित कामगारांचे हाल मात्र बघवत नाहीत. यंदा अनेक दिवाळी अंकांच्या जाहिराती घटल्यात. मंदीचा तर मोठा फटका बसलेला आहेच पण यंदाच्या पुरासारख्या आपत्तीत अनेक उद्योजकांनी सढळ हातांनी मदत केलीय. आता त्यांचे जाहिरातीचे बजेट संपलेय. त्यामुळे नाईलाज झालाय. ते त्यांच्याठिकाणी बरोबर असले तरी याचा मोठा फटका अनेकांना बसून अनेक दिवाळी अंकांचे दिवाळे निघालेय.

गेली 15 वर्षे सातत्याने ‘चपराक’ला जाहिरात देणार्‍या एका उद्योजकाची उलाढाल तीनशे कोटीहून अधिक होती. मध्यंतरी घरबांधणी क्षेत्रावर जे अरिष्ट ओढवले त्यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. त्यांच्या शेकडो कर्मचार्‍यांचे गेले आठ महिने पगार थकले होते. शेवटी त्यांनी त्यांचा राहता बंगला विकून सगळ्यांचे पगार केले आणि व्यवसाय थांबवला. हे चित्र अत्यंत वेदनादायी आहे. असे बदल आपल्याला हवेत का? 

प्रश्न विचारणारी, शंका उपस्थित करणारी पिढी राज्यकर्त्यांना नकोय. त्यांच्या ‘हो’ ला ‘हो’ मिळवले की ते त्यांच्यासाठी खूप काही करत असल्याचा दिखावा निर्माण करतात. लोकशाहीचा मूळ उद्देश कधीच धुळीला मिळालाय. समाजातली निकोपता हरवत गेलीय. स्वार्थाच्या मागे लागलेला माणूस ‘स्व अर्थ’ विसरतोय. आपण जगतोय कशासाठी? हेही अनेकांना कळत नाही. जेव्हा कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. भारत हा सर्वाधिक तरूणांचा देश असल्याचे ढोल गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पिटले जातात. याचाच अर्थ आणखी काही वर्षांनी भारत हा सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांचा देश असेल. नवनवीन औषधोपचारांमुळे आयुर्मान वाढत चाललंय. अर्थात ते निरोगी नाही. सत्तर टक्केहून अधिक लोकाना मधुमेहासारखे आजार असतात. अनेक व्याधींनी ग्रस्त असूनही ते स्वतःची जीवनशैली बदलत नाहीत. मग रडत, कुढत जगणं अटळ असतं. 

अशा सगळ्यांत किमान सजगता निर्माण व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. वैविध्यपूर्ण विषयांवरील वाचनीय आणि दर्जेदार पुस्तकं प्रकाशित करणं, ती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहचवणं आणि त्यांना वाचायला भाग पाडणं या सगळ्या आघाड्यांवर आम्हाला अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळतंय. हा बदल आम्ही करतोय. करत राहू. भविष्यात ललित, वाङ्मयीन पुस्तकाबरोबरच माहिती आणि तंत्रज्ञान, विविध ज्ञानशाखा अशी सर्व पुस्तकं ‘चपराक’ची असावीत असा आमचा प्रयत्न आहे. ही पुस्तकं फक्त मराठीपुरती मर्यादित राहणार नाहीत. मराठीतलं दर्जेदार साहित्य जगभर पोचावं यासाठी आमचे प्रयत्न आहेत.

ज्याला जे जमतं त्यानं ते करावं, या न्यायानं आम्ही हा ज्ञानयज्ञ आरंभिला आहे. त्याला मिळणारा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. अवघड वाटणार्‍या गोष्टी आम्ही अगदी सहजपणे केल्यात. ज्या अशक्य वाटतात त्यासाठी थोडा वेळ लागेल इतकंच! 

दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. अंधार दूर सारताना आपण ज्ञानाच्या पणत्या लावणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आम्ही जागल्याची भूमिका पार पाडतोय. यात तुमचाही सहभाग नक्की द्या! जंगलाला आग लागल्यानंतर आपल्या इवल्याशा चोचीतून पाणी आणून तो वणवा विझवण्याचा प्रयत्न करणार्‍या चिमणीची गोष्ट आपल्याला माहीतच आहे. आपणही ‘विझवणार्‍या’सोबत राहूया. पेटवणारे तर कमी नाहीत! ते प्रत्येक काळात राहतील. पेटवणार्‍यांपेक्षा विझवणारे चिरंतन असतात, शाश्‍वत असतात एवढी जाणीव झाली तरी पुरेसं आहे. हे बदल घडावेत.  
तुर्तास, आपणा सर्वांना या प्रकाशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!
- घनश्याम पाटील
7057292092

1 comment:

  1. खूप छान...सुंदर दिवाळी अंक आहे

    ReplyDelete