Sunday, November 12, 2017

जो बदलतो तो टिकतो!

एखादा माणूस मेला तर त्या कुटुंबाचे नुकसान होते. तो कर्तबगार असेल तर समाजाचीही ती हानी असते! पण एखादी संस्था संपली तर त्याचा फटका आणि दुःखाची तीव्रता आणखी असते. त्यातही बुद्धिच्या, ज्ञानाच्या क्षेत्रात तत्त्वनिष्ठ भूमिका घेऊन काम करणारी संस्था बंद होणे म्हणजे समाजाचे मोठे नुकसानच! ‘अंतर्नाद’ हे मासिक बंद करण्याचा निर्णय त्यांच्या व्यवस्थापनाने घेतला आणि मराठी साहित्यविश्वात बरीच उलट-सुलट चर्चा झाली. एखादे चांगले मासिक बंद होणे हे जितके दुःखद आहे त्याहून वाईट आहे त्यांच्या संचालकांची नकारात्मक मानसिकता! सर्वत्र वाचनसंस्कृती कमी होत असल्याचे चित्र रंगवले जात असताना अशा बातम्या म्हणूनच अनेकांची उमेद संपवणार्‍या ठरतात.

वयानुसार धावपळ होत नाही, एकहाती काम करण्याच्या नादात संस्था पुढे चालवू शकेल असे नेतृत्व निर्माण करू शकलो नाही, आजारपण, अन्य व्याप, आधुनिक तंत्रज्ञानाच्या ज्ञानाचा अभाव किंवा बिघडलेले आर्थिक व्यवस्थापन अशा कारणांमुळे एखादे नियतकालिक बंद होऊ शकते; मात्र इथे ‘अंतर्नाद’च्या संपादकांनी ते बंद करताना जी कारणे दिलीत त्यातले एक प्रमुख कारण आहे, ‘नवीन लेखक मिळत नाहीत...’

एकीकडे लेखनासाठी व्यासपीठ नाही म्हणून अनेक नवोदित धडपडत असताना ‘लेखक नाहीत’ म्हणणे म्हणजे मोठी विसंगती आहे. ‘आम्ही उच्च सांस्कृतिक अभिरूची जोपासतो’ असे म्हणत नव्याने लिहिणार्‍यांच्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आणि असे खापर त्यांच्यावर फोडणे म्हणूनच स्वतःच्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासारखे आहे. आजच्या फळीतील उमेदीच्या लेखकांच्या दृष्टिने हे अन्यायकारक आहे.

आजच्या काळात मराठीत कोणते मासिक नव्याने सुरू झाल्याने फार मोठी क्रांती होणार नाही किंवा एखादे मासिक बंद पडल्याने समाज रसातळालाही जात नाही. प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे बंद पडल्याने हळहळ वाटावी अशा ‘तत्त्व’ बाळगून असणार्‍या संस्था आजच्या काळात नगण्य आहेत. असे म्हणतात की, आपला समाज तमाशाने बिघडत नाही आणि कीर्तनाने सुधारत नाही. तरीही ‘अंतर्नाद’बद्दल अनेकांना दुःख का वाटावे? कारण आपला समाज अजूनही सद्गुणांची पूजा बांधतो. चांगले ते स्वीकारतो आणि वाईट ते अव्हेरतो. 

बावीस-तेवीस वर्षे सुरू असलेल्या मासिकाची साधी वेबसाईटही नसावी यावरून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते. अकरा कोटीच्या महाराष्ट्रात पाच-दहा हजार लोकांनाही ज्या मासिकाचे नाव माहीत नव्हते ते बंद पडल्याने चर्चेत येणे म्हणूनच आश्चर्यकारक आहे. बरे, अशी मासिके स्वतःचे वेगळे वाचक घडवतात, लेखक तयार करतात असेही नाही. वाचकांची साहित्यिक अभिरूची वाढावी, त्यांचे मनोरंजनातून प्रबोधन व्हावे यासाठी काही उपक्रम त्यांनी राबवलेत का? मग ठराविक कंपुने ‘मराठी साहित्यावर दुःखाचा फार मोठा डोंगर कोसळला’ म्हणून गळे काढण्यात काय अर्थ? कोणत्याही भाषेतील, कोणतेही मासिक बंद होणे हे वाईटच असले तरी त्यामुळे त्यांनी वाचकांना किंवा लेखकांना दोष देणे सर्वस्वी चुकीचे आहे.

मागच्या वर्षीची नोटाबंदी, जीएसटी अशा कारणांमुळे यंदा अनेक दिवाळी अंकांना फटका बसल्याच्या ‘अफवा’ अशाच काही ‘नाकर्त्या’ लोकांकडून पसरवल्या जात आहेत. त्यामुळे किंमतीत केेलेली लक्षवेधी वाढ, पानांची घटलेली संख्या, कमी दराने वाढवलेल्या जाहिराती हे सारे पहावे लागत आहे. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशातला हा प्रकार आहे. महाराष्ट्रात जवळपास सातशे ते आठशे दिवाळी अंक प्रकाशित होतात. त्यातील अडीचशे ते तीनशे अंक शासनाकडे नोंदणीकृत नाहीत. केवळ ठराविक लोकांच्या जाहिराती मिळवणे आणि नफा कमावणे या उद्देशाने निघणारी ही बेकायदेशीर मासिके, नियतकालिके सरकारी धोरणांचा बागुलबुवा करत आहेत. त्यांची साहित्यिक जाणीव आणि लेखनभान तपासून बघितले तर हाती मोठा भोपळा येईल. आरएनआय म्हणजे ‘रजिस्ट्रेशन ऑफ न्युजपेपर्स फॉर इंडिया’ या संस्थेकडून साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक, वार्षिक या सर्वांची नोंदणी करणे बंधनकारक असताना अनेकजण हवे ते नाव घेऊन बिनबोभाट ‘धंदा’ करतात. काहींनी कित्येक वर्षांपूर्वी केवळ ‘टेंपररी’ परवाना मिळवला असून अनियमिततेमुळे तो रद्द झालेला असतानाही ही मंडळी कोणतीही सरकारी बंधने, निकष न पाळता ‘अधूनमधून’ अंक काढतात आणि समाजात संपादक, पत्रकार म्हणून मिरवत असतात.

आम्ही ‘चपराक’ हे मासिक 2002 सालापासून चालवतो. सहा राज्यातील मराठी वाचकांपर्यंत ते प्रभावीपणे पोहोचले आहे. ज्यांचा शालेय अभ्यासक्रमानंतर वाचनाशी कसलाच संपर्क राहिला नव्हता त्यांची अभिरूची वाढवून आम्ही त्यांना ‘वाचते’ केेले आहे. प्रत्येक वाचकामध्ये एक लेखक दडलेला असतो हे ध्यानात घेऊन त्यातील अनेकांना ‘लिहिते’ही केले आहे. म्हणूनच ज्यांनी आयुष्यात कधी प्रेयसीला साधे प्रेमपत्रही लिहिले नाही असे अनेकजण आज कथा-कादंबर्‍या लिहित आहेत. 

सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही दर्जेदार मराठी मासिके नाहीत. जी आहेत त्यातील बहुतेकजण विविध विचारधारांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे सर्व विषयांना स्पर्श करणारे आणि माहिती, मनोरंजन आणि ज्ञान एकाचवेळी देणारे ‘चपराक’सारखे मासिक अल्पावधीत वाचकप्रिय ठरत आहे. लेखकांची आडनावे, गावे बघून आम्ही कधीही साहित्य छापले नाही. गुणात्मकदृष्ट्या जे अव्वल आहे ते दिल्याने वाचकांनी ते स्वीकारले. हीच भूमिका घेऊन काम करणारी एक पिढी सध्याच्या महाराष्ट्रात कार्यरत आहे. ‘अंतर्नाद’ बंद पडत असतानाच मुकुल रणभोरसारखा इवलासा पोर ‘अक्षर मैफल’सारखे मासिक सुरू करण्याचे धाडस दाखवतो इकडे आम्ही सोयीस्कर कानाडोळा करतो. नकारात्मक मानसिकता आणि प्रस्थापितांची प्रतिसादशून्यता हे मराठी साहित्याला लागलेलं ग्रहण सुटणं म्हणूनच गरजेचं आहे. 

2002 ला आम्ही ‘चपराक’ मासिक सुरू केले तेव्हा पहिली पंचवार्षिक वर्गणी ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी भरली होती. त्यांच्याविषयी वाटणार्‍या आदरातून त्यांची वर्गणी घ्यायला नकार दिल्यानंतर ते म्हणाले होते की, ‘‘तुम्हाला मदत करायची म्हणून मी वर्गणी भरत नाही. ही वर्गणी घेतल्यावर पुढची पाच वर्षे मला अंक पाठवणे ही तुमची नैतिक जबाबदारी असणार आहे. जर तुम्ही पाच वर्षे अंक टिकवला तर ब्रह्मदेवाचा बापही तुम्हाला थोपवू शकणार नाही.’’

निळुभाऊंचे ते शब्द अक्षरशः खरे ठरले. केवळ वाचकांच्या जिवावर चालणारे मासिक म्हणून ‘चपराक’ पुढे आले. ज्या भानू काळे यांनी त्यांचे ‘अंतर्नाद’ मासिक बंद करण्याचा दुर्दैवी निर्णय जाहीर केला त्याच काळे यांनीही मध्यंतरी ‘चपराक’ला अनपेक्षितपणे पाच हजार रूपयांचा धनादेश पाठवून आमच्या कामाचा गौरव केला होता. असा गुणग्राहक माणूस जेव्हा नकारात्मक बोलू लागतो तेव्हा ते अधिकच घातक असते. नियतकालिक चालवणार्‍या प्रत्येकाने नव्या काळाची आव्हाने समजून घेणे गरजेचे आहे. ‘जो बदलतो तो टिकतो’ हा डार्विनचा सिद्धांत कुणीही विसरून चालणार नाही. आपल्या तत्त्वावर ठाम राहतानाच नव्याचे स्वागत जो कोणी उदारपणे करेल त्याच्यासाठी या क्षेत्रात असंख्य संधी आहेत.
- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२

17 comments:

  1. साहित्यविश्वातील वास्तवाचा वेध तुम्ही या लेखातून घेतला आहे.

    ReplyDelete
  2. साहित्यविश्वातील वास्तवाचा वेध तुम्ही या महत्वाच्या लेखामधून घेतला आहे.

    ReplyDelete
  3. खरे आहे...
    आम्ही गेली 18 वर्षे आमची माती आमची माणसं हे कृषी मासिक नियमित पणे चालवतो आहे...गेली 17 वर्षे पोस्टल परवाना आहे... मासिकाची वेबसाईट आहे...कधीही अडचण आली नाही... लेख चांगला आहे...असेच लिहित रहा...।

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! आणि तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा!

      Delete
  4. जोरदार..वास्तववादी लेखन...।

    ReplyDelete
  5. जोरदार लेख सर । कुठल्याही कार्यात मेहनत आणि सातत्य सचोटीने आणि प्रामाणिकतेने ठेवून जर सकारात्मक दृष्टीकोन ठेवलात तर चपराक प्रकाशन सारखे यश सहज शक्य आहे हे तुम्ही वारंवार सिध्द केले आहे हे ह्या लेखातून अगदी स्पस्टपणे जाणवते । अभिनंदन सर

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद. यात तुमचा सर्वांचा वाटा मोठा आहे.

      Delete
  6. जो काळाची पावले ओळखतो .... त्यानुसार मार्गक्रमण करतो तोच टिकून राहतो हेच साहित्य चपराकने दाखवून दिले आहे .साहित्य चपराकचा हा आदर्श इतरांनी घेण्यासारखा आहे .नेहमी प्रमाणे झणझणीत अंजन घालणारा लेख .

    ReplyDelete
  7. पूर्वी आम्ही मौज ,सत्यकथेचे लेखक आहोत असे अनेक लेखक अभिमानाने सांगायचे . आता आम्ही "चपराक"चे लेखक आहोत असं सांगताना आम्हांला अभिमान वाटतो .

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद. आम्हालाही तुमचा अभिमान वाटतो.

      Delete