Tuesday, November 21, 2017

‘वादे वादे जायते कंठशोषः’



एखादा वारकरी ज्या भक्तीभावानं पंढरीच्या वारीला जातो त्याच ओढीनं मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जातो. तिथं लेखकांच्या, साहित्य रसिकांच्या, वाचकांच्या गाठीभेटी होतात. सगळा गोतावळा जमतो. म्हणूनच 2003 पासून माझी ही संमेलनवारी सुरू आहे. यातल्या सर्वच संमेलनाच्या अनेक आठवणी माझ्या पोतडीत आहेत आणि त्या मी वेळोवेळी विविध माध्यमांतून मांडल्याही आहेत; मात्र गेल्या काही संमेलनातील वाद आणि ‘चपराक’ची भूमिका याविषयी इथे थोडक्यात उहापोह करणार आहे.

गेल्या काही वर्षात साहित्य संमेलनाच्या निमित्तानं वाद आणि वितंडवादाची परंपराच निर्माण झाली आहे. त्यात समन्वय साधण्याच्या दृष्टिनं ‘चपराक’नं आग्रही भूमिका घेतली आहे. काहीवेळा मात्र प्रस्थापितांविरूद्ध हंटर उगारणं अपरिहार्य ठरतं. साहित्य संमेलन आणि त्यातील राजकारण याविषयी आम्ही सजगपणं अनेक विषय पुढे आणले आहेत.

महाबळेश्‍वर येथील 82 व्या साहित्य संमेलनात आनंद यादव जेव्हा संमेलनाध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’वरून मोठं वादळ निर्माण झालं. या कादंबरीत त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांविषयी काही आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यानं आम्ही आवाज उठवला होता. त्यावेळी यादवांनी ‘कादंबरी वाचण्याची एक पद्धत असते; घनश्याम पाटलांना कादंबरी वाचता येत नाही. कादंबरी म्हटले की कल्पनाविलास हा आलाच! तो गृहित धरून ती वाचायला हवी,’ असं विधान केलं. आता यातली मेख अशी होती की, ‘संतसूर्य तुकाराम’च्या पहिल्याच पानावर त्यांनी एक वाक्य ठळकपणे छापलं होेतं. ते होतं, ‘संशोधन सिद्ध करून लिहिलेली वास्तववादी कलाकृती.’ म्हणजे एकीकडं ‘कादंबरी म्हणजे कल्पनाविलास’ म्हणायचं आणि दुसरीकडं ‘वास्तववादी कलाकृती’ असंही म्हणायचं! हा सरळ सरळ दुटप्पीपणा होता. कल्पना आणि वास्तव ही दोन टोकं एकत्र आणणारे यादव हे मराठीतील पहिले लेखक असावेत. म्हणून आम्ही त्याविरूद्ध जोरकस आवाज उठवला. ह. भ. प. बंडातात्या कर्‍हाडकर यांच्यासारखे काही वारकरी रस्त्यावर उतरले. त्यांनी ‘टाळ’ आंदोलन सुरू केलं आणि यादवांनी देहूला जाऊन सगळ्यांची जाहीर माफी मागितली.

खरंतर यादवांनी हे लिहायला नको होतं आणि लिहिलंच तर त्यावर ठाम रहायला हवं होतं. ‘मला संमेलनाध्यक्षपद नको, पण मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे’ असं त्यांनी सांगितलं असतं तर त्यांचा कणखरपणा दिसला असता. मात्र तसं काही घडलं नाही. झुंडशाही आणि दडपणाला ते बळी पडले आणि वारकर्‍यांना शरण गेले. यादवांनी त्यांची चूक मान्य केल्यावर मी त्यांचा विरोध सौम्य केला आणि ‘यांना आवरा, त्यांना सावरा’ असा विशेष लेख लिहिला. त्यात वारकर्‍यांच्या झुंडशाहीला आवरणं आणि यादवांना या परिस्थितीतून सावरणं गरजेचं आहे हे स्पष्टपणे नोंदवलं; पण यादव संमेलनाध्यक्ष होऊनही साहित्य संमेलनाला जाऊ शकले नाहीत. मराठी साहित्याच्या दृष्टिनं ही काळीकुट्ट घटना ठरली.

पुण्याच्या साहित्य संमेलनाचे आयोजक होते पुण्यभूषण संस्थेचे डॉ. सतीश देसाई. ते माझे स्नेहीच आहेत. पुण्याचे उपमहापौर, नगरसेवक, साहित्य परिषदेचे पदाधिकारी, त्रिदल संस्था, पुण्यभूषण या माध्यमातून त्यांनी चांगलं काम केलंय. मात्र पुण्यातील संमेलन साहित्यबाह्य विषयांवरूनच गाजलं. त्यात अमिताभ बच्चन हे प्रमुख आकर्षण होतं. डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्यासारखा प्रतिभावंत संमेलनाध्यक्ष असूनही चर्चा मात्र अमिताभचीच होती. त्यानं मराठीत ‘नमस्कार मित्रांनो’ कसं म्हटलं, त्याचा पेहराव कसा होता, तो व्यासपीठावर कसा आला आणि ‘मधुशाला’च्या ओळी कशा म्हणून दाखवल्या याचीच माध्यमांनी चर्चा घडवली.

तर या संमेलनाच्या आयोजनानंतर आयोजक संस्थेनं महामंडळाला हिशोब द्यायला बराच वेळ घालवला. महामंडळानं सातत्यानं मागणी करूनही त्यांनी टंगळमंगळ केली. शेवटी या संमेलनातून नऊ लाख रूपये उरल्याचं त्यांनी जाहीर केलं. माध्यमांनी आरडाओरड केल्यानंतर मात्र डॉ. सतीश देसाई यांनी तब्बल 82 लाख रूपये परत केले आणि तेव्हापासून त्या निधीतून संमेलनाध्यक्षला वर्षभर साहित्यसेवेसाठी फिरावे लागते, म्हणून एक लाख रूपये देण्याची परंपरा सुरू झाली. 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून हे 82 लाख रूपये मिळणे पुढच्या अध्यक्षांसाठी मोलाचे ठरले. त्यावेळी ‘कुणाचे पुण्य, कुणाचे भूषण?’ असा जळजळीत लेख लिहून मी यावर घाव घातले होते.

86 वं साहित्य संमेलन झालं ते चिपळूणला. या संमेलनाचे अध्यक्ष होते डॉ. नागनाथ कोत्तापल्ले. त्यांच्याविरूद्ध ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांनी चांगली लढत दिली होती. साहित्यनिर्मिती आणि कर्तबगारी या पातळीवर हमो कितीतरी पटीने अव्वल होते. मात्र त्यांनी त्यांच्या परिचय पत्रकात ब्राह्मण समाजासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली होती. आम्ही हमोंच्या पाठिशी ठामपणं उभे होतो; पण ही माहिती त्यांनी देऊ नये असं आम्हास वाटत होतं. त्याविषयी आम्ही त्यांना स्पष्टपणे बोललो पण त्यांचं म्हणणं होतं, ‘‘मी जे केलंय ते मतदारांपुढं मांडायला हवं.’’ ते पत्रक मी सर्वप्रथम ‘चपराक’मधून प्रकाशित केलं आणि त्यावर्षीच्या सर्व मतदारांपर्यंत पाठवलं. अपेक्षेप्रमाणं त्यावरून वाद निर्माण झाला आणि संभाजी ब्रिगेडसारख्या संघटना हमोंविरूद्ध रस्त्यावर उतरल्या. चिपळूणच्या आयोजक संस्थेनंही ‘जातीयवादाला खतपपाणी घालणार नाही’ म्हणून हमोंविरूद्ध भूमिका घेतली. खरंतर हमोंची साहित्य कारकिर्द अफाट होती पण झुंडशाहीपुढं त्यांचा निभाव लागला नाही. त्यावेळी ‘मराठ्यांची ढाल व्हा’ असं म्हणत मी त्यांच्या पाठिशी उभा होतो. मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यापासून त्यांना संरक्षण देण्यापर्यंत आमचा पुढाकार होता. माझे मित्र भालचंद्र कुलकर्णी यांनीही त्यावेळी उत्तम संघटनकौशल्य दाखवलं होतं. हमो यांच्यासारखा ताकदीचा साहित्यिक संमेलनाध्यक्ष होऊ शकला नाही याची खंत कायम आहे.

87 वं साहित्य संमेलन झालं ते सासवडला. या संमेलनाचे अध्यक्ष होते कवी फ. मुं. शिंदे. तेव्हाचे महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठालेपाटील यांचा त्यांना पाठिंबा होता. फमुंविरूद्ध सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी उभे होते. इथेही राजकारण आणि वशीलेबाजीनंच बाजी मारली. मराठीत 85 कादंबर्‍या लिहिणारा संजय सोनवणी यांच्यासारखा बलाढ्य लेखक पराभूत झाला आणि एका रंगमंचीय कवीच्या गळ्यात विजयाची पताका पडली. त्यावेळी मी ‘व्यासपीठावर आई या विषयावर कविता सादर करणारा हा कवी व्यासपीठावरून खाली उतरला की बाईचा विचार सुरू करतो, हे मराठी कवितेचं दुर्दैवच’ अशा स्पष्ट शब्दात हल्ला चढवला होता. 

88 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सर्वार्थानं वेगळं ठरलं. हे संमेलन झालं पंजाबमधील घुमान या खेड्यात. घुमान ही संत नामदेवांची कर्मभूमी. इकडं माझे मित्र संजय नहार यांचं अफाट काम. त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्यांना साथ मिळाली ती भारत देसरडा या उद्योजक आणि साहित्यप्रेमी मित्राची. दोघांनी नेटानं सर्व व्यवस्था केली. संत साहित्याचे अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रा. सदानंद मोरे यावेळी निवडून आले. अर्थातच मोरे यांच्या विजयासाठीही सर्व राजकीय यंत्रणा कामाला लागली होती.

घुमानच्या संमेलनात अध्यक्षपदाच्या उमेदवारांनी फार वाद घातला नाही. त्यावेळी ठिणगी टाकली ती प्रकाशक परिषदेनं. ‘अमराठी भागात साहित्य संमेलन होत असल्यानं पुस्तक विक्री होणार नाही. त्यामुळं एकही मराठी प्रकाशक या संमेलनात सहभागी होणार नाही’ अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. ‘एकही मराठी प्रकाशक सहभागी होणार नाही’ हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? म्हणून मग मी ठाम भूमिका घेतली, ‘‘आफ्रिकेच्या जंगलात जरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं तरी आम्ही तिथं जाणार! कारण धंद्यापेक्षा धर्म महत्त्वाचा...’’ 

असं ठणकावल्यावर प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानं त्याची जोरदार दखल घेतली. मुंबई सकाळ, झी 24 तास, साम टीव्ही यांनी विशेष बातम्या करून माझ्या भूमिकेचं समर्थन केलं.

प्रकाशक परिषदेचा हा विरोध मोडून काढताना केवळ त्यांना विरोध अशी मर्यादित भूमिका नव्हती. अमराठी भागात जर साहित्य संमेलन होत असेल तर त्यांना मराठीचं वैभव कळायला हवं. दोन्ही भाषा भगिनीत समन्वय साधायला हवा अशी त्यामागची तळमळ होती. त्यामुळं ‘चपराक’च्या भूमिकेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. रेल्वेचा डबा भरून पुस्तकं आम्ही घुमानला नेली. ‘चपराक’ची सोळा सदस्यांची टीम त्यासाठी घुमानला गेली. 

या साहित्य संमेलनात पंजाबचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सर्वांनी हजेरी लावली. या संमेलनामुळं त्या गावचा कमालीचा विकास झाला. आज जर कोणी घुमानला गेलं तर या संमेलनाचं महत्त्व त्याच्या लक्षात येईल. यावेळी अ. भा. साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा होत्या डॉ. माधवी वैद्य. त्यांना कमालीची मिरवण्याची हौस. व्यासपीठावर सर्व मान्यवर असताना नऊवारी साडी, नाकात नथ आणि हातात तलवार घेऊन त्यांनी ‘फाटो सेशन’ केलं. त्यात संमेलनाध्यक्ष मोरे पार दुसर्‍या रांगेत मागं ढकलले गेले. तो फाटो प्रकाशित करून मी ‘कॅपशन’ दिली होती, ‘संमेलनाथ नथ दिसली पण नाक मागं गेलंय...’ मोरेंचं अंग अवघडून मागं स्वतःला सावरत थांबणं आणि वैद्यबाईंचं मिरवणं त्यामुळं चांगलंच चर्चेत आलं.

मुख्य म्हणजे ज्या प्रकाशक परिषदेनं या संमेलनाला विरोध केला होता त्याचे पदाधिकारी मात्र इथल्या परिसंवादात सहभागी होते. असो. ‘चपराक’च्या पुस्तकांची प्रचंड विक्री झाली. कवितासंग्रह तर आम्ही ग्राहकांना भेट देण्यासाठीच नेले होते मात्र एकही कवितासंग्रह भेट द्यायची वेळ आली नाही. मराठी प्रकाशकांची इंग्रजी वृत्तपत्रे चार ओळीतही दखल घेत नाहीत, हा इतिहास असताना ‘इंडियन एक्सप्रेस’सारख्या मान्यवर दैनिकानं दिल्ली आवृत्तीला माझी मुलाखत प्रकाशित केली. केवळ एका धाडसी भूमिकेमुळं हे असं सारं वाट्याला आलं. माधवी वैद्य यांच्याशी माझे वैचारिक मतभेद आहेत; मात्र या संमेलनातनंतर पुण्यात वसंत व्याख्यानमालेत बोलताना त्यांनी जाहीरपणे ‘चपराक’च्या भूमिकेचं कौतुक केलं आणि ‘चपराक’नं प्रकाशकांतील तिढ सोडवल्याचं सांगितलं.

89 वं साहित्य संमेलन म्हणजे माझ्यासाठी मोठं मानसिक द्वंद होतं. आमचे तेव्हाचे सल्लागार डॉ. श्रीपाल सबनीस या निवडणुकीला उभे होते. त्यांच्यासाठी आम्ही दिवसरात्र एक केला होता. सातआठ महिने आमची तयारी सुरू होती. त्यांच्या अर्ज भरताना महाराष्ट्र साहित्य परिषदेत झालेल्या पहिल्या पत्रकार परिषदेत मी त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित होतो. सबनीस यांच्यासाठी आम्ही दिवसरात्र जी मेहनत घेतली होती त्यानुसार त्यांच्या विजयाची केवळ औपचारिकताच शिल्लक होती. 

मात्र त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी ‘राष्ट्रवादी’ मासिकाचे संपादक सुधीर भोंगळे यांच्यापुढं लोटांगण घातलं आणि सांगितलं की, ‘तुम्हाला नमस्कार म्हणजे हा शरद पवारांना नमस्कार. संमेलनाध्यक्ष पदाची भीक माझ्या पदरात घाला...’ या प्रकारानंतर मी अतिशय अस्वस्थ झालो. त्यांच्या सौभाग्यवती ललिताताई यांनी हातावर बांधलेली राखी उदासपणं पाहत कार्यालयात आलो आणि ‘चपराक’च्या सल्लागार पदावरून त्यांना बडतर्फ केलं. अंकावरून त्यांचं नाव कमी करणं हा माझ्या पद्धतीनं त्यांचा निषेध होता. कालपर्यंत मी त्यांची बाजू समर्थपणं मांडत होतो आणि आज मला आतला आवाज सांगत होता की आपण अयोग्य माणसाला डोक्यावर घेतलं. त्यामुळं मी त्यांच्याविरूद्ध एक शब्दही लिहिला नाही.

पुढं निकाल जाहीर झाल्यावर त्यांचा वारू सुसाट सुटला. ज्यांना ज्यांना त्यांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं त्या त्या मतदारांनी त्यांना अभिनंदनाचे फोन केल्यावर त्यांनी सांगितलं, ‘‘मला तुमच्या शुभेच्छाही नकोत...’’ केवळ माझ्या शब्दाखातर ज्यांनी कसलीही ओळख नसताना यांना मतदान केलं होतं ते त्यामुळं अस्वस्थ झाले आणि मी पेटून उठलो. मग त्यांनी अध्यक्षपदासाठी काय काय उठाठेवी केल्या याचा पंचनामा करणारा एक लेख मी लिहिला. त्याचं शीर्षक होतं, ‘कुत्र्याला खीर पचली नाही.’

हा लेख प्रचंड व्हायरल झाला. त्यावरूनही काही वृत्तपत्रांनी, वृत्त वाहिन्यांनी बातम्या केल्या. पिंपरीत साहित्य संमेलनात हा अंक आम्ही विक्रीसाठीही ठेवला होता. पहिल्या दिवशी या अंकाची बेफाम विक्री झाली. 

दुसर्‍या दिवशी सकाळी मी आवरण्यासाठी म्हणून घरी आलो. तेवढ्यात मला ‘झी 24 तास’चे संपादक उदय निरगुडकर यांचा फोन आला. तो लेख आवडल्याचं त्यांनी सांगितलं. तब्बल पंधरा मिनिटं ते त्या लेखावरच बोलत होते. त्यांचा फोन मी ठेवला आणि संमेलनातील ‘चपराक’च्या ग्रंथ दालनातून मला फोन आला. त्यांनी सांगितलं ‘‘दादा, आपले अंक आयोजकांनी जप्त केले...’’ हा माझ्यासाठी खरंतर मोठा धक्का होता. मी लगेच निरगुडकरांना पुन्हा फोन केला आणि सांगितलं, ‘‘ज्या लेखाचं तुम्ही तोंडभरून कौतुक केलं त्या लेखाचं बक्षीस मला मिळालं. आत्ताच चपराकचे अंक ग्रंथ दालनातून जप्त केले.’’ त्यांनी तो फोन तसाच त्यांच्या स्टुडिओत जोडला आणि माझा ‘फोनो’ महाराष्ट्राला ऐकवला. मी तसाच ग्रंथ दालनात पळालो. तिथं तोपर्यंत सगळ्याच प्रसारमाध्यम प्रतिनिधींची गर्दी झाली होती. सगळ्यांनी माझ्या लाईव्ह प्रतिक्रिया चालवल्या. ‘चपराक’च्या ग्रंथदालनात तुडुंब गर्दी झाली. थोड्याच वेळात आयोजक पी. डी. पाटील आणि संमेलनाध्यक्ष श्रीपाल सबनीस ‘चपराक’च्या दालनात आले आणि त्यांनी ‘अनावधानाने’ झालेल्या प्रकाराबद्दल माध्यम प्रतिनिधींसमोर माफी मागितली. दुसर्‍या दिवशी ‘नवा काळ’सह अनेक वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर ती मुख्य बातमी केली. माझा संपूर्ण लेख पुनर्मुद्रित केला. काहींनी तर ‘चपराक’वर विशेष अग्रलेख केले. ‘कोण हे श्रीपाल सबनीस?’ असा प्रश्‍न विचारणार्‍यांना ‘सबनीस कोण?’ याचे सणसणीत उत्तर दिले होते.

डोंबिवलीच्या साहित्य संमेलनात मी परिसंवादात सहभागी होतो. मराठी भाषा, साहित्य, समीक्षा, संस्कृतीला प्रतिसादशून्यतेचं जे ग्रहण लागलंय त्यावर मी जोरकस हल्ला चढवला. त्याचीही प्रसारमाध्यमांनी योग्य ती दखल घेतली. डॉ. अक्षयकुमार काळे हे या संमेलनाचे अध्यक्ष होते पण त्यांचा प्रभाव संमेलनात कुठंच दिसला नाही. या साहित्य संमेलनात निमंत्रितांच्या कवीसंमेलनात एका कवयित्रीनं अंजली कुलकर्णी यांची कविता ढापली. चक्क साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरच साहित्यचोरी झाल्यानं मी आणि माझ्या सहकार्‍यांनी तिथंच आवाज उठवला. माध्यमांनी त्याहीवेळी आमची साहित्य तळमळ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली.

आगरकरांनी त्याकाळातही ‘वादाला का भीता?’ असा सवाल केला होता. वाद व्हायला हवेत. त्यातून चांगले ते बाहेर येते. समुद्रमंथन झाल्याशिवाय त्यातून रत्ने बाहेर कशी येणार? मात्र सध्याचा काळ बदललाय. हे वाद इतके निरर्थक आहेत की त्यात वैयक्तिक मानपान आणि हेवेदावे, मत्सर याशिवाय काहीच नाही. त्यामुळे साहित्य संमेलनांचीही अप्रतिष्ठा होत आहे. हे असेच चालू राहिले तर हा केवळ वेळ आणि पैशाचा अपव्यय ठरेल. भविष्यात साहित्याला आणखी चांगले दिवस यायचे असतील तर या क्षेत्रातील मान्यवरांनी व्यापक आणि दीर्घकालिक विचार करायला हवा.

मला नेहमी वाटतं की, साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांना किमान विधानपरिषदेवर घ्यायला हवं. राज्यकर्त्यांनी त्यांचे पडके वाडे बांधण्याऐवजी मसापचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, महामंडळाचे अध्यक्ष यांच्यापैकी कुणाला तरी सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून घ्यायला काय हरकत आहे? ‘वादे वादे जायते तत्त्वबोधः’ असं म्हटलं जायचं. साहित्य संमेलनात मात्र वाद इतक्या खालच्या पातळीवर जात आहेत की ‘वादे वादे जायते कंठशोषः’ असं म्हणायची पाळी येतेय.

साहित्य क्षेत्राला अजूनही प्रतिष्ठा आहे. साहित्य संमेलनांनी ती जाणिवपूर्वक जपावी. मराठी भाषेच्या सर्जनासाठी ते अत्यावश्यक आहे. 
- घनश्याम पाटील
संपादक ‘चपराक’, पुणे 
7057292092
(पूर्वप्रसिद्धी - ‘रानफूल’ दिवाळी अंक)

Sunday, November 12, 2017

जो बदलतो तो टिकतो!

एखादा माणूस मेला तर त्या कुटुंबाचे नुकसान होते. तो कर्तबगार असेल तर समाजाचीही ती हानी असते! पण एखादी संस्था संपली तर त्याचा फटका आणि दुःखाची तीव्रता आणखी असते. त्यातही बुद्धिच्या, ज्ञानाच्या क्षेत्रात तत्त्वनिष्ठ भूमिका घेऊन काम करणारी संस्था बंद होणे म्हणजे समाजाचे मोठे नुकसानच! ‘अंतर्नाद’ हे मासिक बंद करण्याचा निर्णय त्यांच्या व्यवस्थापनाने घेतला आणि मराठी साहित्यविश्वात बरीच उलट-सुलट चर्चा झाली. एखादे चांगले मासिक बंद होणे हे जितके दुःखद आहे त्याहून वाईट आहे त्यांच्या संचालकांची नकारात्मक मानसिकता! सर्वत्र वाचनसंस्कृती कमी होत असल्याचे चित्र रंगवले जात असताना अशा बातम्या म्हणूनच अनेकांची उमेद संपवणार्‍या ठरतात.

वयानुसार धावपळ होत नाही, एकहाती काम करण्याच्या नादात संस्था पुढे चालवू शकेल असे नेतृत्व निर्माण करू शकलो नाही, आजारपण, अन्य व्याप, आधुनिक तंत्रज्ञानाच्या ज्ञानाचा अभाव किंवा बिघडलेले आर्थिक व्यवस्थापन अशा कारणांमुळे एखादे नियतकालिक बंद होऊ शकते; मात्र इथे ‘अंतर्नाद’च्या संपादकांनी ते बंद करताना जी कारणे दिलीत त्यातले एक प्रमुख कारण आहे, ‘नवीन लेखक मिळत नाहीत...’

एकीकडे लेखनासाठी व्यासपीठ नाही म्हणून अनेक नवोदित धडपडत असताना ‘लेखक नाहीत’ म्हणणे म्हणजे मोठी विसंगती आहे. ‘आम्ही उच्च सांस्कृतिक अभिरूची जोपासतो’ असे म्हणत नव्याने लिहिणार्‍यांच्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे आणि असे खापर त्यांच्यावर फोडणे म्हणूनच स्वतःच्या नाकर्तेपणावर पांघरूण घालण्यासारखे आहे. आजच्या फळीतील उमेदीच्या लेखकांच्या दृष्टिने हे अन्यायकारक आहे.

आजच्या काळात मराठीत कोणते मासिक नव्याने सुरू झाल्याने फार मोठी क्रांती होणार नाही किंवा एखादे मासिक बंद पडल्याने समाज रसातळालाही जात नाही. प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे बंद पडल्याने हळहळ वाटावी अशा ‘तत्त्व’ बाळगून असणार्‍या संस्था आजच्या काळात नगण्य आहेत. असे म्हणतात की, आपला समाज तमाशाने बिघडत नाही आणि कीर्तनाने सुधारत नाही. तरीही ‘अंतर्नाद’बद्दल अनेकांना दुःख का वाटावे? कारण आपला समाज अजूनही सद्गुणांची पूजा बांधतो. चांगले ते स्वीकारतो आणि वाईट ते अव्हेरतो. 

बावीस-तेवीस वर्षे सुरू असलेल्या मासिकाची साधी वेबसाईटही नसावी यावरून त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष दिसून येते. अकरा कोटीच्या महाराष्ट्रात पाच-दहा हजार लोकांनाही ज्या मासिकाचे नाव माहीत नव्हते ते बंद पडल्याने चर्चेत येणे म्हणूनच आश्चर्यकारक आहे. बरे, अशी मासिके स्वतःचे वेगळे वाचक घडवतात, लेखक तयार करतात असेही नाही. वाचकांची साहित्यिक अभिरूची वाढावी, त्यांचे मनोरंजनातून प्रबोधन व्हावे यासाठी काही उपक्रम त्यांनी राबवलेत का? मग ठराविक कंपुने ‘मराठी साहित्यावर दुःखाचा फार मोठा डोंगर कोसळला’ म्हणून गळे काढण्यात काय अर्थ? कोणत्याही भाषेतील, कोणतेही मासिक बंद होणे हे वाईटच असले तरी त्यामुळे त्यांनी वाचकांना किंवा लेखकांना दोष देणे सर्वस्वी चुकीचे आहे.

मागच्या वर्षीची नोटाबंदी, जीएसटी अशा कारणांमुळे यंदा अनेक दिवाळी अंकांना फटका बसल्याच्या ‘अफवा’ अशाच काही ‘नाकर्त्या’ लोकांकडून पसरवल्या जात आहेत. त्यामुळे किंमतीत केेलेली लक्षवेधी वाढ, पानांची घटलेली संख्या, कमी दराने वाढवलेल्या जाहिराती हे सारे पहावे लागत आहे. ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशातला हा प्रकार आहे. महाराष्ट्रात जवळपास सातशे ते आठशे दिवाळी अंक प्रकाशित होतात. त्यातील अडीचशे ते तीनशे अंक शासनाकडे नोंदणीकृत नाहीत. केवळ ठराविक लोकांच्या जाहिराती मिळवणे आणि नफा कमावणे या उद्देशाने निघणारी ही बेकायदेशीर मासिके, नियतकालिके सरकारी धोरणांचा बागुलबुवा करत आहेत. त्यांची साहित्यिक जाणीव आणि लेखनभान तपासून बघितले तर हाती मोठा भोपळा येईल. आरएनआय म्हणजे ‘रजिस्ट्रेशन ऑफ न्युजपेपर्स फॉर इंडिया’ या संस्थेकडून साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक, वार्षिक या सर्वांची नोंदणी करणे बंधनकारक असताना अनेकजण हवे ते नाव घेऊन बिनबोभाट ‘धंदा’ करतात. काहींनी कित्येक वर्षांपूर्वी केवळ ‘टेंपररी’ परवाना मिळवला असून अनियमिततेमुळे तो रद्द झालेला असतानाही ही मंडळी कोणतीही सरकारी बंधने, निकष न पाळता ‘अधूनमधून’ अंक काढतात आणि समाजात संपादक, पत्रकार म्हणून मिरवत असतात.

आम्ही ‘चपराक’ हे मासिक 2002 सालापासून चालवतो. सहा राज्यातील मराठी वाचकांपर्यंत ते प्रभावीपणे पोहोचले आहे. ज्यांचा शालेय अभ्यासक्रमानंतर वाचनाशी कसलाच संपर्क राहिला नव्हता त्यांची अभिरूची वाढवून आम्ही त्यांना ‘वाचते’ केेले आहे. प्रत्येक वाचकामध्ये एक लेखक दडलेला असतो हे ध्यानात घेऊन त्यातील अनेकांना ‘लिहिते’ही केले आहे. म्हणूनच ज्यांनी आयुष्यात कधी प्रेयसीला साधे प्रेमपत्रही लिहिले नाही असे अनेकजण आज कथा-कादंबर्‍या लिहित आहेत. 

सध्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीही दर्जेदार मराठी मासिके नाहीत. जी आहेत त्यातील बहुतेकजण विविध विचारधारांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे सर्व विषयांना स्पर्श करणारे आणि माहिती, मनोरंजन आणि ज्ञान एकाचवेळी देणारे ‘चपराक’सारखे मासिक अल्पावधीत वाचकप्रिय ठरत आहे. लेखकांची आडनावे, गावे बघून आम्ही कधीही साहित्य छापले नाही. गुणात्मकदृष्ट्या जे अव्वल आहे ते दिल्याने वाचकांनी ते स्वीकारले. हीच भूमिका घेऊन काम करणारी एक पिढी सध्याच्या महाराष्ट्रात कार्यरत आहे. ‘अंतर्नाद’ बंद पडत असतानाच मुकुल रणभोरसारखा इवलासा पोर ‘अक्षर मैफल’सारखे मासिक सुरू करण्याचे धाडस दाखवतो इकडे आम्ही सोयीस्कर कानाडोळा करतो. नकारात्मक मानसिकता आणि प्रस्थापितांची प्रतिसादशून्यता हे मराठी साहित्याला लागलेलं ग्रहण सुटणं म्हणूनच गरजेचं आहे. 

2002 ला आम्ही ‘चपराक’ मासिक सुरू केले तेव्हा पहिली पंचवार्षिक वर्गणी ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांनी भरली होती. त्यांच्याविषयी वाटणार्‍या आदरातून त्यांची वर्गणी घ्यायला नकार दिल्यानंतर ते म्हणाले होते की, ‘‘तुम्हाला मदत करायची म्हणून मी वर्गणी भरत नाही. ही वर्गणी घेतल्यावर पुढची पाच वर्षे मला अंक पाठवणे ही तुमची नैतिक जबाबदारी असणार आहे. जर तुम्ही पाच वर्षे अंक टिकवला तर ब्रह्मदेवाचा बापही तुम्हाला थोपवू शकणार नाही.’’

निळुभाऊंचे ते शब्द अक्षरशः खरे ठरले. केवळ वाचकांच्या जिवावर चालणारे मासिक म्हणून ‘चपराक’ पुढे आले. ज्या भानू काळे यांनी त्यांचे ‘अंतर्नाद’ मासिक बंद करण्याचा दुर्दैवी निर्णय जाहीर केला त्याच काळे यांनीही मध्यंतरी ‘चपराक’ला अनपेक्षितपणे पाच हजार रूपयांचा धनादेश पाठवून आमच्या कामाचा गौरव केला होता. असा गुणग्राहक माणूस जेव्हा नकारात्मक बोलू लागतो तेव्हा ते अधिकच घातक असते. नियतकालिक चालवणार्‍या प्रत्येकाने नव्या काळाची आव्हाने समजून घेणे गरजेचे आहे. ‘जो बदलतो तो टिकतो’ हा डार्विनचा सिद्धांत कुणीही विसरून चालणार नाही. आपल्या तत्त्वावर ठाम राहतानाच नव्याचे स्वागत जो कोणी उदारपणे करेल त्याच्यासाठी या क्षेत्रात असंख्य संधी आहेत.
- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२

Friday, November 3, 2017

प्रकाशन विश्वातील नकारात्मकतेला चपराक



वाचनसंस्कृती कमी होत असल्याचं सांगितलं जात असताना आणि त्यामुळं प्रकाशनविश्वाला घरघर लागलेली असतानाच काही प्रकाशन संस्था मात्र सातत्यानं वैविध्यपूर्ण विषयांवरील पुस्तकं प्रकाशित करीत आहेत. त्यांच्या पुस्तकांना मागणीही उत्तम असून नवीन वाचक घडविण्याचं काम त्यांनी नेटानं केलंय. आजच्या तरूणाईला हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या आणि नकारात्मकतेचं मळभ दूर सारून ग्रंथ व्यवहारात चेतना निर्माण करणार्‍या पुण्यातील ‘चपराक प्रकाशन’चे तरूण संपादक आणि प्रकाशक घनश्याम पाटील यांच्याशी नगर येथे होणार्‍या विभागीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार ना. सुर्वे यांनी साधलेला हा संवाद.

* नगरला विभागीय साहित्य संमेलन होतंय. अशी साहित्य संमेलनं कितपत महत्त्वाची आहेत?

- साहित्य माणसाच्या मनाला उभारी देतं, त्याचं नैराश्य दूर सारून त्याला दिशा दाखवतं. त्यामुळं या साहित्याकडं सामान्य माणसाला आकर्षित करून घ्यायचं झालं तर अशा संमेलनांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. संमेलनात वाचक-रसिकांना लेखक भेटतात, त्यांचे विचार जवळून ऐकता येतात. छोट्या संमेलनात लेखक आणि वाचकांचा थेट संवाद होतो. त्यामुळं विभागीय साहित्य संमेलनं ही मोलाची आहेत. नगरला होणारं साहित्य संमेलन त्यामुळंच महत्त्वपूर्ण आहे.

* अशी अनेक विभागीय साहित्य संमेलनं होत असताना अ. भा. मराठी साहित्य संमेलनाची काय गरज? ते बंद करावं अशी मागणी सातत्याने होते. त्याबाबत तुमचं मत काय?

- अनेक छोट्याछोट्या नद्या एकत्र येऊन मोठा प्रवाह तयार होतो आणि तो पुढं सागराला मिळतो. त्यामुळं छोट्या नद्या आणि सागराचं महत्त्व कमी होत नाही. दोन्ही तितकेच गरजेचे आहेत. या छोट्या नद्या तो तो भाग संपन्न करतात. आजूबाजूच्या जमिनीचं, गावाचं भवितव्य त्यांच्यावर असतं. या नद्यांचं पाणी जसं झिरपत, मुरत येतं तसंच छोट्या आणि विभागीय साहित्य संमेलनामुळं आपली साहित्यिक भूक भागवली जाते. यातूनच चांगले वाचक तयार होतात, लेखक तयार होतात. साहित्याची गोडी निर्माण होण्यासाठी, ती वृद्धिंगत होण्यासाठी ही संमेलनं मोठी भूमिका पार पाडतात. त्याचे विशाल रूप म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. अध्यक्षपदाच्या निवडीपासून ते आयोजनापर्यंत आणि जेवणाचे पदार्थ कोणते असावेत इथपासून ते सहभागी लेखक-कवी कोण असावेत इथपर्यंत तिथं सातत्यानं वाद आणि वितंडवाद होत असले तरी या संमेलनांचं योगदान आणि परंपरा मोठी आहे. काळानुसार तिथंही आवश्यक ते बदल होत आहेत. त्यामुळं संमेलनच काय, तर कोणताही विधायक उपक्रम बंद करण्याची मागणी अप्रस्तुत आणि दुर्दैवी आहे.

* वाचनसंस्कृती कमी होतेय, अशी ओरड असताना तुम्ही नवनवीन पुस्तकं सातत्यानं कशी काय प्रकाशित करता?

- काही ठराविक प्रकाशकांनी हा बागुलबुवा निर्माण केलाय. वाचक कमी होत असल्याची ‘अंधश्रद्धा’ ‘चपराक’ने प्रयत्नपूर्वक दूर केलीय. आमची सर्व पुस्तकं ‘बेस्ट सेलर्स’ ठरली. त्यामुळं त्यात काही तथ्य आहे असं मला वाटत नाही. जर जुन्या आणि नामवंत प्रकाशकांची पुस्तकं खपत नसतील तर त्यांना काळाबरोबर चालता येत नाही. आजच्या काळाची गरज ओळखून नवे साहित्य पुढे यायला हवे. वाचक कमी झालेत असे म्हणण्यापेक्षा त्यांची वाचनाची अभिरूची आणि माध्यमं बदललीत हे आपण समजून घ्यायला हवं. ‘अंतर्नाद’सारखं एक चांगलं मासिक बंद पडल्याबद्दल आपण हळहळतो; पण त्यांची साधी वेबसाईटही नव्हती किंवा नवे वाचक तयार करण्यासाठी त्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत इकडं आपण दुर्लक्ष करतो. त्यामुळं नकारात्मकता बाजूला सारून आपण जोमानं कार्यरत राहिलं पाहिजे. आम्हाला हे जमलं म्हणून आम्ही नवनवीन पुस्तकं प्रकाशित करू शकलो.

* ‘चपराक’चा विस्तार राज्याबाहेरही झाला. तो कसा काय?
- हो! आमच्या मासिकाचे सहा राज्यात सभासद आहेत.  शिवाय अनेक अंक, पुस्तके देश-विदेशात पोहोचली. मराठी माणूस जगभर विखुरलाय. आपण त्यांचा कधी विचारच करत नाही. त्यांचीही साहित्यिक भूक मोठी आहे. त्यासाठी ते आसुसलेले असतात. अकरा कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रातही एखादे मासिक प्रभावीपणे पोहोचू शकत नाही. त्यामुळं इतर तर त्यांच्या खिजगणतीतही नसतात. आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. बेळगाव, गुलबर्गा, हैद्राबाद, बेंगलुरू, कारवार, अमृतसर, दिल्ली, इंदूर, भोपाळ, सूरत, अहमदाबाद, चेन्नई, पणजी अशा महत्त्वाच्या शहरातील मराठी वाचकांपर्यंत आम्ही पोहोचलो. तिथे जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांना दर्जेदार साहित्य उपलब्ध करून दिलं. त्यातील अनेकजण सध्या लिहितेही झाले आहेत. प्रत्येक वाचकांमध्ये एक लेखक दडलेला असतो. त्याला जागे करण्याचे काम ‘चपराक’ने केेले.

* मराठी मासिकांची पिछेहाट का झाली? 
- मी सुरूवातीलाच सांगितल्याप्रमाणं नवे वाचक तयार व्हावेत यासाठी कोणीही फार प्रयत्न केले नाहीत. अनेक मासिकं विविध विचारधारांत अडकून पडली. कोणी समाजवादी आहे तर कोणी हिंदुत्त्ववादी. मग तेच तेच विचार वाचकांच्या माथी मारले जातात. त्यामुळं ती मासिकं कोणी वाचत नाही. सत्तर वर्षांची पंरपरा सांगायची आणि सात हजार वाचकांपर्यंतही पोहोचायचं नाही हे त्यामुळंच होतं. मग ठरलेल्या विचारधारांचा उदोउदो करायचं, पाककृतीपासून मेहंदीपर्यंत विशेषांक काढायचे आणि आलेला दिवस ढकलायचा अशी यांची गत होणे स्वाभाविक आहे; पण त्यामुळे नवे वाचक नाहीत किंवा मासिकांची पिछेहाट झालीय असे म्हणता येत नाही. फक्त पर्याय बदललेत. ‘चपराक’सारख्या अनेक मासिकांचा उदय आणि त्यांना भरभरून मिळणारा वाचकाश्रय हेच सिद्ध करतो.

* वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कोणते प्रयोग केले?
- एकतर आम्ही भारतातील सर्व प्रमुख शहरात गेलो. तिथल्या मराठी लोकांशी संवाद साधला. अगदी इंदूरसारख्या शहरात जाऊन तिथंही ‘चपराक’चा साहित्य महोत्सव घेतला. घुमानच्या साहित्य संमेलनातील प्रकाशकांची कोंडी फोडली. लिहित्या हातांना बळ दिलं. ते करताना त्यांचं नाव, गाव, प्रांत, धर्म, लिंग याचा कधीही विचार केला नाही. त्यामुळं केवळ ‘चपराक’मध्ये तुम्हाला साहित्याचं इतकं वैविध्य दिसेल. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही दरवर्षी ‘चपराक’चाही साहित्य महोत्सव घेतो. त्यात एकाचवेळी राज्यातील वेगवेगळ्या भागातल्या लेखकांची, वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील पुस्तके प्रकाशित होतात. परिसंवाद, मुलाखत, कवी संमेलन, अभिवाचन, अभ्यासपूर्ण व्याख्यानं, इतर दिवाळी अंकांचा गौरव असे उपक्रम त्यात असतात. मुख्य म्हणजे त्यात वाचकांचाही सहभाग घेतला जातो. त्यामुळं अल्पावधीत ‘चपराक’ वाचकाभिमुख झालाय.

* पाचशे पानांचा दिवाळी महाविशेषांक काढण्यामागची संकल्पना काय?
- आम्ही पहिल्या अंकापासून म्हणजे 2002 पासून दिवाळी विशेषांक प्रकाशित करतो. गेल्या काही वर्षात चर्चा होती की, नव्यानं कोणी फारसं चांगलं लिहित नाही, दिवाळी अंकांचं दिवाळ निघतंय. ते बंद पडत आहेत. या व अशा नकारात्मक चर्चेला उत्तर म्हणून आम्ही ‘चपराक’चा दिवाळी महाविशेषांक करायचा ठरवलं. त्याला वाचक आणि लेखकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. नवोदित आणि प्रस्थापित यांचा समन्वय साधत आम्ही सर्वोत्तम ते वाचकांना दिलं. त्यामुळं अनेकजण नव्यानं लिहिते झाले. वाचकही म्हणतात, दहा दिवाळी अंक घेण्यापेक्षा ‘चपराक’चा एकच दिवाळी महाविशेषांक घ्यावा! म्हणजे पैसेही वाचतील आणि दर्जेदार साहित्य वाचल्याचे समाधानही मिळेल.

* नवीन लेखकांना काय सांगाल?
- उत्तमोत्तम वाचत रहा, लिहित रहा. लिखाणाचं स्वयंपाकासारखं आहे. रोज केलात तर चपात्या उत्तम होतील. कधीतरीच करायला गेलात तर जगाचा नकाशा होणे अटळ आहे. सध्या समाजमाध्यमासारखं महत्त्वाचं शस्त्र तरूणांच्या हातात आहे. अनेक युवकांच्या ब्लॉगला लाखो वाचक मिळतात. त्यामुळं कोणी दखल घेत नाही म्हणून हतबल होऊ नकात, निराश होऊ नकात. तुमची दखल त्यांनी स्वतःहून घ्यावी इतके स्वसामर्थ्य बाळगा. गुणवत्तापूर्ण, दर्जेदार लेखन करणार्‍यांना आणि त्यात सातत्य ठेवणार्‍यांना या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळं केवळ हौस म्हणून न लिहिता उत्तमतेच्या ध्यासातून कार्यरत रहा म्हणजे तुम्हाला कोणीही थांबवू शकणार नाही.