- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092
‘शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी केमिस्ट्रीचे प्राध्यापक होते असं सांगितलं जातं. आजवर त्यांनी जी विधानं केली ती पाहता या माणसाच्या शिक्षणाचा आणि त्यांच्या जगण्याचा काही संबंध आहे की नाही? असा प्रश्न कुणालाही पडल्यावाचून राहणार नाही. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता, अमूक बागेतला आंबा खाल्ला तर मुलगाच होतो, जो जितका जास्त शिकलेला तो तितका मोठा गांडू, कोरोना हा जगायला लायक नसलेल्या लोकांनाच होतो, असा कोणताही आजार नसून जो या रोगानं मरतो तो गांडू अशी अनेक वादग्रस्त विधानं त्यांनी सातत्यानं केली. हे सगळं पाहता वाटतं की, गुरूजींनी आता तोंडावर आवर घालायला हवा.
‘मनोहर’ नावाच्या या माणसानं जर ‘संभाजी’ हे नाव धारण केलं असेल तर छत्रपती संभाजीराजांचे काही गुण तरी त्यांच्या अंगात असायला हवेत. निर्धार म्हणजे काय, पराक्रम म्हणजे काय यासह संभाजीराजांचे सद्गुण त्यांना कळायला हवेत. संभाजीराजांचं नाव वापरायचं तर तसं वागलं पाहिजे. नाही तर मग मनोहर हे नाव ठीकच होतं. नाही मनोहर तरी, आहे मनोहर तरी, गेला मनोहर तरी, चुकला मनोहर तरी हे असं चालू शकतं. छत्रपती संभाजीराजांचं नाव घ्यायचं तर त्यांच्या किमान एखाद्या गुणाच्या पदचिन्हावर चालण्याची मनोवृत्ती असायला हवी. जर तुम्ही केमिस्ट्रीचे गोल्ड मेडिलिस्ट असाल तर विज्ञानाचा आणि तुमचा काय संबंध? असा प्रश्न आम्हाला पडण्याइतपत तुमची घसरण का झाली?
पश्चिम महाराष्ट्रात तुम्हाला सर्वपक्षिय नेत्यांनी मोठं करण्याचा प्रयत्न केला. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानला जी ताकद दिली गेली, जे बळ दिलं गेलं ते केवळ संभाजी ब्रिगेडची दहशत कमी करण्यासाठी दिलं गेलं हे अनेकदा सांगितलं जातं. यामध्ये निश्चितच तथ्य आहे आणि हे कुणीही विसरता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल तरूणांना असणार्या आकर्षणातून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना उभी केली गेली. ही संघटना काही वेगळं निर्माण करेल असं वाटत होतं. संभाजी ब्रिगेडनं छत्रपती संभाजीराजांचं नाव घेत विध्वंसाचं, द्वेषमूलक राजकारण केलं. दत्तोपंत ठेंगडी म्हणतात त्याप्रमाणे ‘‘कोणतीही क्रांती ही मत्सरप्रेरित, स्पर्धात्मक वा द्वेषमूलक नको.’’ ब्रिगेडचा तर पायाच हा होता. एकीकडं संभाजीराजांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडं ब्राह्मणांना ठोकायचं, त्यांच्या स्त्रियांविषयी वाटेल तसं विष पेरायचं यामुळं ब्रिगेडला बाकी सोडा पण मराठा समाजातूनही पाठिंबा मिळू शकला नाही. संभाजी ब्रिगेडची अशी दहशत अनुभवत असतानाच संभाजी भिडे नावाचा एक माणूस पुढं येतो आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या माध्यमातून तरूणांना बळ देतो हे सकारात्मक चित्र होतं. मात्र ब्रिगेडप्रमाणेच तुमच्याही अनेक भूमिका द्वेषमूलक आणि कट्टरतावादी दिसल्या. कोणताही कट्टरतावाद हा समाजासाठी घातकच असतो. त्यामुळं जी वाताहत ब्रिगेडची झाली तशीच केविलवाणी अवस्था तुमचीही झाली. दुर्दैवानं ब्रिगेडच्या मागं असणारे असतील किंवा तुमच्या सोबत असणारे कार्यकर्ते असतील त्यांची मात्र पुरती ससेहोलपट आणि यथेच्छ फरफट झाली. ‘कट्टर’ कार्यकर्ते तयार करण्याऐजवी ‘निष्ठावान’ अनुयायी मिळवले असते तर आजच्या महाराष्ट्राचं चित्र वेगळंच असतं.
तुम्ही वेगवेगळ्या गडावरच्या दुर्गयात्रा काढल्या. व्यसनमुक्त नवीन पिढी घडविण्यासाठी तुमच्याकडून काही चांगले प्रयत्न केले गेले पण त्याचा वापर जर तुम्ही अशाप्रकारे राजकारणासाठी करत असाल तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज कळाले नाहीत असंच दुर्दैवानं म्हणावं लागेल.
आजवरच्या तुमच्या अनेक भूमिका हास्यास्पद आणि विकृत वाटाव्यात अशाच आहेत. तुमच्या बागेतला आंबा खाऊन मुलगा होतो? अहो गुरूजी, असं काही असतं तर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक निपुत्रिक दिग्गजांनी तुमची आमराई कधीच मुळासकट पळवली असती. तुम्ही अंधश्रद्धांना अशा पद्धतीनं खतपाणी घालत असाल तर तुम्ही ज्या हेतूनं संघटना चालवताय ती पुढं कशी जायची? तुमचा बचाव करणार्या तुमच्या कार्यकर्त्यांचीही आता गैरसोय होतेय. तुमच्या वादग्रस्त विधानामुळं ते तोंडघशी पडत आहेत. परवाच कुपवाडच्या एका धारकर्याचा एक फोन व्हायरल झाला. त्यात गेल्या वीस वर्षांपासून तुमचा धारकरी असलेला तो कार्यकर्ता तुमच्या एका अध्यक्षाला विचारतोय की ‘‘माझे काका कोरोनानं गेले तर ते गांडू होते का? त्यांची जगण्याची लायकी नव्हती का? इतकी वर्षे तुमच्या विचारावर ठाम राहत काम करतोय पण आज मला घरातून बाहेर पडणं अवघड झालंय.’’ त्यावर तुमचे अध्यक्ष सांगताहेत की, ‘‘वयानुसार असं होतं, ते चुकीचं बरळले, त्यांचं चुकलं, घ्या सांभाळून!’’
अमेरिकेनं एकादशीला सोडलेलं चांद्रयान वरती गेलं? कारण त्यादिवशी ब्रह्मांडातील स्थिती संतुलित असते? अरे तुम्ही बोलताय काय? छत्रपती शिवाजी महाराजांनीही अशा भंकस गोष्टीवर कधी विश्वास ठेवला नाही. किंबहुना त्यांनी सर्व लढाया अमावस्येला लढल्या. ते एकादशीची वाट बघत बसले नाहीत. मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला शिवाजी महाराज प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाला भेटले आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. स्वतःच्याच लाल महालावर शिवाजी महाराजांनी जो छापा मारला तो 5 एप्रिल 1664 ला मारला. ज्या दिवशी छापा मारला तो तर रमजानचा महिना होता आणि तेव्हा मुस्लिम समाजाचे रोजे सुरू होते. महाराज एकादशीची वाट बघत बसले असते तर भिडे गुरूजी आज दिसले नसते आणि त्यांना ‘संभाजी’ हे नावही धारण करता आलं नसतं. ज्या महापुरूषांची नावं घेऊन पुढं चालण्याचा प्रयत्न करताय त्यांची थोडी तरी बूज राखा.
तुम्हाला शिवसेनेच्या दारातून म्हणजे ‘मातोश्री’वरून भेट न देताच हाकलून लावलं. तुमचा तो अवमान बघून आम्हालाही वाईट वाटलं होतं; मात्र तुमच्या सततच्या भूमिका बघता तेच बरोबर होते असं वाटायला लागलंय. तुम्हाला गुरूजी म्हणत गावागावात तुमच्या मागं लोक आले. तुमच्या साधेपणावर ते भाळले. छत्रपती शिवाजी महाराजांचं 32 मण सोन्याचं सिंहासह तुम्ही तयार करणार आहात म्हणून तुमच्या सोबत आले. अरबी समुद्रातल्या महाराजांच्या सगळ्यात मोठ्या स्मारकाला मात्र तुमचा विरोध आहे. तरीही शिवप्रेमींनी तुम्हाला सिंहासनासाठी पैसे दिले. तुमचा विरोध वैचारिक पातळीवर आहे का? महाराजांचं स्मारक करण्यापेक्षा घराघरात महाराज पोहोचायला हवेत असं तुम्हाला वाटतं का? तसं तुम्हाला काही वाटत नाही! तुमचं म्हणणं इतकंच की महाराजांचं सोन्याचं सिंहासन करायचं आणि त्यासाठी मीच पैसे गोळा करणार! ज्या राजानं हिंदुंचं आरमार तयार केलं त्याच्या समुद्रातील स्मारकाला तुमचा विरोध का? कुणी काही चांगली गोष्ट केली की तुम्ही त्याला विरोध केलाच म्हणून समजा.
गुरूजी, नवीन पिढी विज्ञाननिष्ठ बनू द्या. तुमच्या भल्या मोठ्या मिशा तुमचं संरक्षण करत असतील पण इतरांना मास्क घालण्यापासून रोखू नका. सामान्य माणसाला ही अशी आजारपणं परवडणारी नाहीत. कोरोना जर फक्त गांडू लोकांनाच होत असेल तर मोहनजी भागवत, भैय्याजी जोशी, अमित शहा, राज्यपाल कोश्यारी या सर्वांना काय म्हणाल? अमित शहा यांना तर दोन वेळा कोरोना झाला होता. मग तुमच्या भाषेत ते ‘डबल गांडू’ ठरतात का? सुधाकरपंत परिचारिक यांच्यापासून ते रत्नाकर मतकरी यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न लेखकांपर्यंत अनेकजण कोरोनाचे बळी ठरले. त्या दुःखातून मराठी माणूस सावरलेला नसताना तुमचं हे विधान तुम्हाला स्वतःला तरी पटतं का?
तुम्ही गुरूजी असूनही तुमची भाषा नेहमी अशी शिवराळ का बरं असते? किमान सभ्यता आणि सुसंस्कृतपणाही अंगी नसावा? अशी भाषा वापरायचा अधिकार महाराष्ट्रात राज ठाकरे, अजित पवार अशा मोजक्याच लोकांना आहे. तुम्हाला ती शोभत नाही. शिवभक्ताची भाषा कशी असावी? महाराजांच्या आयुष्यातून तुम्ही नेमकं काय शिकलात? तुमचे कार्यकर्ते काय कौतुक करतात? तर ‘‘व्याख्यानाच्या वेळी गुरूजी दीड तास एकाच ‘पोझिशन’मध्ये होते... ते हलले सुद्धा नाहीत... बोलायला बसल्यावर ते जसे बसले होते तसेच एक हात गुडघ्यावर आणि एक हात माईकवर ठेऊन होते...’’
अरे हा काही कौतुकाचा विषय नाही! तुम्ही गदागदा हललात तरी चालेल. त्यानं काही फरक पडत नाही! पण असं काहीही बोलून लोकांना त्रास देऊ नका. तुम्ही स्वतःचे कपडे स्वतः धुता याचंही कौतुक तुमचे शिष्य करत असतात. त्यासाठी तुम्ही एखादी बाई कामाला ठेवली तरी चालेल पण समाजात जातिद्वेष, धर्मद्वेष निर्माण करू नका. दंगली निर्माण होतील असं वागू नका. तुमच्या वागण्यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना छोटं करू नका. तुमचं कौतुक करताना त्यांना कमीपणा येईल असं कोणीही वागू, बोलू नये याचं तरी भान ठेवा.
गावातली दारू-मटका विकणारी, छोटी-मोठी कामं करणारी, कामाच्या शोधात असणारी, वडाप वाहतूक करणारी पोरं तुमच्या पाठिशी उभी राहिली. त्यांचं आयुष्य काय बदललं? थोडक्यात काय तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षात ज्यांना फारसा थारा मिळत नव्हता त्यांना तुम्ही मोठं व्यासपीठ दिलं. साळी, कोळी किंवा इतर बारा बलुतेदारांच्या पोरांना कुठंच स्थान मिळत नाही. त्या तरूणांना तुम्ही प्राधान्य दिलं. त्यांचं अस्तित्व निर्माण करून दिलं. तुमचं बघून पोरं सायकल वापरू लागली, साधे कपडे घालू लागली, काहींनी मिशा वाढवल्या. आता हीच तरूण मंडळी तुमचं बघून, तसंच अनुकरण करायचं म्हणून अशीच भाषा बोलतील. त्यांच्या तोंडात ओव्याऐवजी शिव्या असतील! तुम्ही जर म्हणता ‘जो जितका जास्त शिकला तो तितका मोठा गांडू...’ तर गुरूजी यातल्या किती तरूणांनी तुमची शिकवण ऐकत त्यांचं शिक्षण सोडलं? तुम्ही विज्ञान शाखेचे पदवीधर आहात हे ते सगळीकडं अभिमानानं का सांगतात? त्यांना तुम्हाला ‘सुपर गांडू’ म्हणायचं असतं का? तुमच्यामुळं जर त्यांनी त्यांचं शिक्षण अर्धवट सोडलं असेल तर त्याला नेमकं जबाबदार कोण? मग काय कळले तुम्हाला महाराज? महाराजांचे गडकिल्ले अशासाठी पहायचे की त्यातून महाराजांचा पराक्रम शोधावा आणि नव्या पिढीनं प्रेरणा घेऊन नवा इतिहास निर्माण करावा. एका पिढीनं तुम्हाला त्यांचा गुरू मानलं असताना असा विश्वास तुम्ही त्यांच्या मनात निर्माण केला का?
पंढरीच्या वारीत वारकरी म्हणून सहभागी व्हायचं असेल तर वारकरी म्हणून या ना! तुम्हाला कोणी अडवलंय? गळ्यात तुळशीची माळ घालून भक्तिमार्गानं तुम्ही जरूर या!! हजारो पिढ्या पंढरीच्या वारीत भाविक सहभागी होतात. तुम्ही तिथं तलवार घेऊन येताय? इथं कसला शक्ती-भक्तीचा संगम आलाय? तलवार घेऊन जायचं तर सीमेवर जा ना! जो एकाचवेळी अनेक शस्त्र चालवू शकतो तो धारकरी! मग वारकरी आणि धारकरी हे कसलं समीकरण मांडताय? धारकर्यांनी सीमेवर जाऊन त्यांचा पराक्रम सिद्ध करावा. सियाचीन भागातल्या चिनी घुसखोरांना बाहेर काढणं तुमचे पट्टशिष्य असलेल्या मोदींना जमत नाहीये. तिकडं जाऊन त्यांना काही मदत करा. संभाजीराजांच्या काळात वारकर्यांना संरक्षण देण्यात आलं हे खरंय पण आता त्याची गरज आहे का? आणि तुम्ही स्वतःची तुलना संभाजीराजांसोबत करता का? भक्तीचा संगम पांडुरंगाच्या दारात असताना तिथं तलवार कशाला?
जागतिक महामारीच्या काळात सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचं काम कोणीही करू नये. संभाजीराजांच्या मृत्युच्या आधी तुम्ही बलिदान सप्ताह साजरा करता आणि महाराजांची न निघालेली अंत्ययात्रा काढता? मृत्युच्या छाताडावर थयथया नाचून जगाच्या इतिहासात अजरामर झालेले छत्रपती संभाजीमहाराज येशू ख्रिस्तापेक्षा महान आहेत. या धर्मयोध्याची कसली अंत्ययात्रा काढता? मृत्युशी झुंज देत मृत्युलाही पराभूत करणारा जगाच्या इतिहासातील हा अद्वितीय योद्धा आहे. त्यांचं चरित्र समजून घ्यायचं असेल तर त्यांची अंत्ययात्रा काढण्याऐवजी महिनाभर त्यांच्या चरित्राचं पारायण करा. एकाचवेळी हा योद्धा अनेकांशी लढत होता. हे त्यांचं अलौकिक वेगळेपण होतं. ते पुढं यायला हवं.
महाराष्ट्रात कोरोनाच्या लसी कमी पडत असूनही महाविकास आघाडीची नेतेमंडळी तितक्या आक्रमतेनं लढताना दिसत नाहीत. लसींचा तुडवडा असताना त्यावरून वातावरण तापण्यापूर्वी लक्ष वेधून घ्यायचं म्हणून संभाजी भिडे गुरूजींना हे विधान करायला लावलं की काय असं वाटण्यासारखी परिस्थिती आहे. सामान्य माणसाचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न तुमच्या बोलण्यामागं असू शकतो. या वयात तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून ‘एजंटगिरी’ करताय की वयानुसार तुम्ही ‘भ्रमिष्ट’ झालाय हे कळायला मार्ग नाही. स्वतःच थोडंफार केलेलं काम स्वतःच्याच हातानं पुसून टाकण्याचा विक्रम मात्र तुम्ही करत आहात. एक शिवप्रेमी म्हणून आमच्यासाठीही हे सगळं तटस्थपणे पाहणं वेदनादायी आहे.
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092
संवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम चपराक देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरल्याचे वाचक आवर्जून सांगतात. विविध विषयांवर चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष भावनेने केलेला लेखनप्रपंच म्हणजे 'दखलपात्र' हा ब्लॉग!!
Monday, April 12, 2021
भ्रमिष्टपणा की एजंटगिरी?
Wednesday, April 7, 2021
राजकारणातल्या संघटित गुन्हेगारांच्या टोळ्या आवरा
- घनश्याम पाटील
संपादक आणि प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092
महाराष्ट्राने आजवर कधीही झुंडशाहीला पाठिंबा दिलेला नाही. रॅन्डच्या काळातही ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?’ असं विचारणार्या लोकमान्य टिळकांची परंपरा महाराष्ट्राला आहे. एखादा माणूस माझ्या मनाविरूद्ध लिहितो म्हणून त्याच्यावर आक्रमण करायचं ही महाराष्ट्राची परंपरा नाही.
फ्रेंच तत्त्वज्ञ व्हाल्टेअरने फ्रान्समधील अनियंत्रित राजेशाही, स्वार्थी धर्मगुरू आणि विलासी उमरावांवर कडाडून हल्लाबोल केला. दोन हजारहून अधिक पुस्तके लिहिणारा व्हाल्टेअर म्हणतो, ‘‘एखाद्या माणसाचे आणि माझे विचार एकमेकांशी जुळत नाहीत, तो माझ्या विरूद्ध बोलतोय, ते मला आवडत नाही पण तरीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न कोणी केला तर मी तसे प्रयत्न करणार्यांच्या विरूद्ध जाईन! कारण माझ्याविरूद्ध बोलणार्यालाही बोलण्याचा मुलभूत हक्क आणि अधिकार आहे. त्याचं बोलणं ऐकून घेण्याची क्षमता निर्माण होणं गरजेचं आहे.’’
‘शंभर उंदरापेक्षा एका सिंहाचं राज्य केव्हाही श्रेष्ठ’ असं म्हटल्यामुळं व्हाल्टेअरला दोनदा तुरूंगात डांबलं होतं आणि फ्रान्समधून हद्दपार सुद्धा करण्यात आलं होतं. त्याच्या विचारामुळं जागृती झाली आणि लोकांनी तिथल्या अन्याय आणि जुलूमाच्या विरूद्ध बंड पुकारलं. याच विचारवंताच्या म्हणण्याप्रमाणे समोरच्या माणसाचं ऐकून घेण्याची क्षमता जर आपल्यात नसेल तर ही लोकशाही समृद्ध होण्याची लक्षणं नाहीत. प्रत्येकानं आपले काही आयडॉल्स ठरवलेले आहेत. त्या मूर्तींना किंवा त्यांच्या आयडॉल्सबद्दल बोलल्यानंतर काही समुदायांना असा काही राग येतोय की ते समुदाय कुठलाही विधिनिवेष न ठेवता अशा पद्धतीनं लेखन करणार्याविरूद्ध आक्रमण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा आक्रमकांना एकविसाव्या शतकाच्या सुरूवातीला रोखलं नाही तर महाराष्ट्राचं पुढचं स्वरूप फारसं चांगलं नसेल.
आजची पत्रकारितेता कशी आहे?, पत्रकारितेचं स्वरूप काय?, पत्रकारितेत कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत?, कोणत्या वाईट गोष्टी आहेत? याबाबतची चर्चा परत कधीतरी करूच! प्रश्न एवढाच आहे की एखाद्या व्यक्तिविरूद्ध, एखाद्या गटाविरूद्ध, एखाद्या पक्षाविरूद्ध लिहिल्यानंतर लिहिणार्यालाच आम्ही पकडू, त्याला बडवू, त्याच्याकडे बघून घेऊ, मारू, त्याला धमक्या देऊ अशा प्रवृत्ती वाढता कामा नयेत. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो हे वाक्य काय फक्त आमच्यासारख्यांच्या श्रद्धांजली सभेतच वापरणार का? याचं प्रशिक्षण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या नेत्यांनी देणं गरजेचं आहे.
एखाद्या व्यक्तिचं लेखन आवडलं नाही तर त्याच्याशी वैचारिक वाद आणि प्रतिवाद करा! कारण वैचारिक वाद आणि प्रतिवाद करण्याची आमची क्षमता नाही म्हणून आम्ही तुमच्याशी मारामारीच करू असं तुम्हाला वाटत असेल तर या देशातल्या निवडणुका रद्द करून टाका. मग होऊन जाऊ द्या मारामार्या! प्रत्येक पक्षानं बाऊंसर गोळा करावेत, पैलवान, ब्लॅक बेल्टवाले कराटेपटू गोळा करावेत. ज्याच्याकडं जास्त शक्तिमान लोक असतील त्यांना सत्ता देऊन टाका. सभा नकोत, पत्रकार परिषदा नकोत, राजकीय आंदोलनं नकोत, चर्चा तर नकोच नको! असलं काहीच नको. लोकशाहीच्या मुलभूत तत्त्वांना हरताळ फासणार्या या प्रवृत्ती महाराष्ट्रात जर काम करत असतील तर त्यांना थांबवण्याची जबाबदारी इथल्या प्रत्येक सुजाण नागरिकाची आहे.
हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. महाराजांचे सहिष्णुतेचे संस्कार अनेक वर्षे महाराष्ट्रावर झालेत. महाराष्ट्राला संत परंपरा लाभलीय. सहिष्णुता म्हणजे काय हे संतांनी त्यांच्या स्वतःच्या जीवनातून लोकांना दाखवून दिलंय. असा महाराष्ट्र असताना आम्ही या दोन्ही परंपरा विसरणार असू आणि एखाद्यानं आमच्याविरूद्ध, आमच्या नेत्याविरूद्ध लिहिलं म्हणून त्याच्या मागं लागणार असू तर ते वाईट आहे. विचार मांडणार्यांना धमक्या देणं हा प्रकार तुम्ही करत असाल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि इथल्या संतांच्या विचारांचा विसर तुम्हाला पडलाय आणि त्यांचं नाव घ्यायचा अधिकार तुम्हाला नाही.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विरूद्ध ‘केसरी’ आणि ‘मराठा’मध्ये लेखन येत होतं. एकदा शाहू महाराज जेवायला बसले असताना लोकमान्यांच्या मृत्युची बातमी आली. त्यावेळी महाराजांनी समोरचं ताट बाजूला सारलं. एक चांगली व्यक्ती गेली म्हणून त्यांनी जेवण बंद केलं. महाराष्ट्राला अशी एक सशक्त परंपरा आहे. माधव गडकरी, गोविंद तळवलकर, आचार्य अत्रे अशा अनेकांनी यशवंतराव चव्हाणांना वेळोवेळी फैलावर घेतलं. यशवंतरावांनी तर त्या त्या लेखक आणि संपादकांचं वेळोवेळी कौतुकच केलेलं आहे. शरद पवार यांच्याकडूनही विरोधात लिहिणार्या संपादकांवर हल्ले झाले नाहीत. आपल्याविरूद्ध लिहिणार्या व्यक्तिंच्या मताचा आदर करणं, त्याला सन्मानानं वागवणं, विरोधी विचारधारेचं स्वागत करताना त्याच्या आत्मसन्मानाला धक्का लागू न देणं हे सुसंस्कृत आणि प्रगल्भ राजकीय नेतृत्वाचं लक्षण असतं. असं व्यापक दर्शन आपण महाराष्ट्राला घडवणार आहोत की नाही?
ज्यांना व्यापक हिंदुत्व स्वीकारायचंय त्यांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेत तर असहिष्णुता बसतच नाही. सहिष्णु वृत्तीनं विचारांचा विरोध विचारांनी न करता अशा पद्धतीनं लेखन करणार्यांना तुम्ही बोलणार असाल तर भविष्यात कोणी लिहिणारच नाही, आपले विचार चांगल्या पद्धतीनं आणि प्रामाणिकपणे मांडणारच नाही. भविष्यात लिहिणारे हात तुम्ही असं वागून कलम करणार असाल तर उद्याच्या महाराष्ट्रातले चार चांगले लेखक संपवण्याचा अक्षम्य अपराध तुमच्याकडून घडतोय.
सभागृहात बोलणार्यांना विशेष संरक्षण असतं. सभागृहाच्या बाहेर असं संरक्षण नसतं. सभागृहाच्या बाहेर सत्य बोलून लोकशाही बळकट करण्याचं काम जर कोणी करत असेल तर आमच्यासारखे लोक करतात. आम्हाला संरक्षण देणं सोडा तुम्ही किमान सभ्यताही पाळत नाही. ‘‘मी माझ्या मताशी आणि विचारांशी ठाम आहे, मी माझी मतं आणि विचार बदलणार नाही’’ असं सांगणार्या सॉक्रेटिसला विषाचा प्याला प्यायला भाग पाडलं गेलं. विचारवंत म्हणून जी वेळ सॉक्रेटिसवर आली तीच वेळ प्रत्येक पिढीत त्याच्या वारसांवर यावी असं आवर्जून म्हणण्याची गरज नाही. महाराष्ट्राला अशाप्रकारची झुंडशाही लाजीरवाणी आहे. ‘काचेच्या कपाटातील सिंह’ म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आचार्य अत्र्यांनी लेख लिहिल्यावर त्यांच्यावर पुण्यातील एका कॉलेजच्या सभेत हल्ला झाला होता. त्यानंतर आचार्य अत्रे यांनी ‘मला मारणारे मेले, मी जिवंत आहे’ अशा आशयाचा लेख लिहिला होता. अत्र्यांना त्या काळातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या राजकीय पक्षांनी आणि वृत्तपत्रांनी पाठिंबा दिला होता. हा महाराष्ट्र अशा झुंडशाहीला सातत्यानं विरोध करत आलाय याची किती उदाहरणं द्यायची?
अलीकडं हे झुंडशाहीचं प्रमाण प्रचंड वाढलंय. त्याची कारणं काय आहेत याचं मूल्यमापन त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी करावं आणि बोलणार्यांना नावं ठेवण्यापेक्षा, त्याला ट्रोल करण्यापेक्षा, त्याला धमक्या देण्यापेक्षा आपल्याबद्दल असं का बोललं जातंय याचं आत्मचिंतन करावं. त्या त्या पक्षाची राजकीय अधिवेशन होत असती, वार्षिक सभा होत असत्या, चर्चासत्रं होत असती, बौद्धिकं होत असती तर त्यांना व्यक्त व्हायला संधी मिळाली असती. कोणत्याही पक्षाकडून कार्यकर्त्यांना व्यक्त व्हायची संधी मिळत नसल्यानं अशा पद्धतीनं बेजाबदार वागून आपण आपला पुरूषार्थ गाजवतोय, आपल्या निष्ठा सिद्ध करतोय असं त्यांना वाटतं.
जो माझ्या विचारांच्या विरोधी बोलेल, जो माझ्या विचारांना विरोध करेल त्याच्याशी कुस्तीच खेळायली, त्याला मारायचं, ठोकायचं ही प्रवृत्ती जर वाढत गेली तर ती गोष्ट लोकशाहीला जसी शोभा देणारी नाही तशी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेलाही शोभणारी नाही. आपण जेव्हा म्हणतो की हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे, फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे तेव्हा एका सुसंस्कृत महाराष्ट्राचं स्वप्न आपल्या डोळ्यासमोर असतं. अशा महाराष्ट्रात लेखन केलं आणि वैचारिक विरोध केला म्हणून त्याला विचारांनी उत्तर न देता त्या व्यक्तिला धमक्या देणं, त्याचं वैयक्तिक आयुष्य डिस्टर्ब करणं असे प्रकार होत असतील तर असे प्रकार करणार्यांविरूद्ध कडक कारवाई व्हायला हवी. त्यांच्या विरूद्ध गुन्हेही दाखल व्हायला हवेत. अशा पद्धतीनं लेखन करण्याचं सामर्थ्य भविष्यात कोणी दाखवलं नाही तर ही एकतर्फा हुकूमशाहीकडं होणारी वाटचाल ठरू शकते. प्रत्येक पिढीत सर्वांना पुरून उरणारा आचार्य अत्रे जन्माला यावा अशी अपेक्षा ठेवण्याचं काहीही कारण नाही. सर्वसामान्य माणसाचा आवाज जेव्हा जेव्हा दाबण्याचा प्रयत्न झालाय तेव्हा तेव्हा त्या त्या समाजसमूहात विपरित घटना घडलेल्या आहेत. सामान्य माणसाचा आवाज कोणत्याही संघटित टोळीनं बंद करू देत त्या टोळीचा विनाश हा ठरलेला आहे. अशा टोळ्यांच्या प्रमुखांनी स्वतःच्या टोळ्या सांभाळताना लोकशाही प्रक्रिया चांगल्या पद्धतीनं पुढं जाईल याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. जर तुम्ही भारतीय संविधानावर विश्वास ठेऊन लोकशाही मार्गानं राजकीय पक्ष चालवत असाल तर तुम्हाला तुमच्यावरची टीका स्वीकारता आली पाहिजे आणि त्या टिकेला वैचारिक उत्तरही देता आलं पाहिजे. मात्र हे न करता लिहिणाराच मूर्ख आहे, तो विकला गेलेला आहे, त्याच्याकडं बघून घेतो, त्याला हिसका दाखवतो ही आणि याहून कठोर भाषा महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी चांगली नाही इतकंच.
- घनश्याम पाटील
संपादक आणि प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092
Monday, April 5, 2021
जगाला हेवा वाटेल अशी ‘सेटलमेंट’ मला करायचीय!
- घनश्याम पाटील
संपादक आणि प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांनी सातत्याने ज्या भूमिका बदलल्या त्या पाहता या पक्षाच्या भवितव्याची काळजी वाटतेय. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सर्वात मोठा ‘नटसम्राट’ म्हणून राज ठाकरे यांना पुरस्कार द्यायला हवा असे कुणाला वाटल्यास त्यातही आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ‘सगळ्या जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला घडवायचाय’ असे बेंबीच्या देठापासून ओरडत सांगणारे राज ठाकरे ‘जगाला हेवा वाटेल अशा कोलांटउड्या’ मारत आहेत.
‘नाणार, नाही म्हणजे, नाही म्हणजे, नाही म्हणजे, नाही!’ हे त्यांनी केवढ्या आवेशात सांगितले होते! त्यानंतर नाणारची मंडळी त्यांना भेटली आणि लगेच त्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला. टोलनाक्यावरून त्यांनी जे आंदोलन हाती घेतले त्यावेळीही त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. समर्थ रामदास स्वामी म्हणायचे, ‘जयाचे जिवाशी वाटते भय, त्याने क्षात्रधर्म करू नये.’ लालूप्रसाद यादव तुरूंगात जाऊन बसले. देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘टाका मला जेलमध्ये. बघेन मी काय करायचं ते.’ शरद पवार तर ‘काय करताय ते बघू’ म्हणत न बोलावता स्वतःच इडीच्या ऑफिसमध्ये जाऊन धडकले. राज ठाकरे मात्र इडीला घाबरले असे चित्र आहे.
उत्कृष्ट वक्तृत्व असणं एवढंच नेतृत्वाला पुरेसं नाही. ज्याला स्वतःला कशाचीही भीती वाटते तो नेतृत्व करू शकत नाही. छगन भुजबळ तीन वर्षे तुरूंगात राहिले, बाहेर पडले आणि पुन्हा सत्तेत सहभागी झाले. वाय राजशेखर रेड्डीचा मुलगा आंध्रचा मुख्यमंत्री झाला. त्यांच्याविरूद्धही केसेसचा पाऊस पडला होता. राजकारण काहीही असू द्या पण एकेकाळी तडीपार केलेले अमित शहा देशाचे गृहमंत्री झाले. जर तुम्ही मराठी पोरांना लढायला सांगताय, ‘केसेस पडल्या तर पडू द्या, मी आहे तुमच्या पाठिशी’ असा धीर देताय तर एका इडीच्या केसला काय घाबरता? ‘लाव रे तो व्हिडीओ’पासून ‘राहू दे तो व्हिडिओ’पर्यंत केवढ्या भूमिका बदलल्या तुम्ही?
प्रारंभी मराठी माणसाच्या कल्याणाची भूमिका घेणार्या राज ठाकरे यांनी अचानकच मराठी माणसाला वार्यावर सोडले असे दिसतेय. राजकारणातल्या घराणेशाहीवर सतत बोलत असणार्या या नेत्याने आता त्यांच्या मुलाला यात सक्रिय केले आहे. कथनी आणि करणीत एवढे अंतर का बरे? ‘बोले तैसा चाले’ या उक्तीचा आणि राज ठाकरे यांचा काही संबंध आहे का? त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वावर फिदा होऊन, मराठी माणसांसाठी काहीतरी करायचेय अशी इच्छा उराशी बाळगून असलेले अनेक तरूण दिशाहीन झालेत. त्यांना दिशा देणे, मार्गदर्शन करणे हे कर्तव्य असताना आज अशा तरूणांची ओळख ‘खंडणीखोर’ अशी होतेय.
पंधरा वर्षात मराठी भाषेसाठी काय केले? याचे उत्तर आता राज ठाकरे यांनी द्यायला हवे. किमान त्या बेळगावच्या सीमा प्रश्नात तरी मनसेचे अस्तित्व दाखवून द्यायला हवे होते. प्रत्येक निवडणुकीत तुमची भूमिका वेगळी! दहा वर्षांपूर्वी गुजरातचा दौरा करून आल्यावर भूमिका घेतली की, ‘नरेंद्र मोदी चांगले नेतृत्व आहे, तुम्ही मला मत द्या म्हणजे मी माझ्या खासदारांचा त्यांना पाठिंबा देतो.’ लोकांना मध्यस्थ नकोच होता. त्यामुळे लोकांनी थेट भाजपला मतदान केले. या सगळ्यात ‘गुजरातच्या विकासापासून ते गुजरातच्या विनाशापर्यंत’ बोलण्याइतकी तुमची भूमिका बदलली. काळ बदलला की माणूस बदलतो, दिवस बदलतो. रोजच्या रोज अनेक संदर्भही बदलतात. हे सगळे खरे आहे पण तुमच्यात होणारे हे जे बदल आहेत ते राजकारणाला पसंत नाहीत, सामान्य माणसाला पसंत नाहीत, समाजाला पसंत नाहीत, इतकेच काय, जीवशास्त्रालाही असे इतके बदल पसंत नाहीत. आत्तापर्यंत ज्या ज्या सरड्याच्या प्रजाती सापडल्या त्याही इतक्या वेगात रंग बदलू शकत नाहीत. इतक्या झपाट्याने भूमिका बदलण्यामुळे नेमके काय साध्य होतेय राजसाहेब?
तुम्हाला सामान्य मराठी माणूस हवाय तो पक्ष वाढवायला. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा हवीय तीही पक्ष विस्तारायला. शिवसेनेने निदान महाराजांचे नाव घेत पक्ष तरी वाढवला. महाराजांची राजमुद्रा वापरायची तर महाराजांच्या विचारांसाठी, त्यांच्या विचारांच्या प्रचारासाठी काही कराल की नाही? कोणत्याही विशिष्ट विचारांच्या वळचणीला न बांधले जाता निदान जो कोणी शिवभक्त आहे त्या प्रत्येकाला प्रेमाने मिठी मारायचे तरी धाडस दाखवा. कॉमे्रड डांगेंनी मांडलेले शिवचरित्र असेल, पानसरेंचे शिवचरित्र असेल, बाबासाहेब पुरंदरेंच्या कादंबर्या असतील किंवा श्रीमंत कोकाटेंची मांडणी असेल! ‘जो कोणी शिवचरित्रापासून प्रेरणा घेईल आणि आपल्या सामर्थ्याने सामाजिक हिताचे काम करेल तो माझा भाऊ’ असे तुम्ही म्हणायला हवे. अर्थात, त्यांची चुकीची मांडणी तुम्ही दुरूस्त करू शकाल पण प्रत्येक शिवप्रेमीच्या पाठिशी तुम्ही उभे असायलाच हवे. पक्षाच्या झेंड्यात तुम्ही राजमुद्रा वापरलीय म्हणून हे तुमच्याकडून अपेक्षित आहे. हीच राजमुद्रा इतर कोणत्या पक्षाने वापरली असती तर काय प्रतिक्रिया उमटल्या असत्या हे आम्ही तुम्हाला सांगायला हवे? ‘राज ठाकरे’ या नावामुळे आणि त्याच्या भूमिकेमुळे तुम्हाला राजमुद्रा वापरायला विरोध झाला नाही याचे भान तुम्ही ठेवायला हवे. शिवाजी महाराजांची राजमुद्रा जर तुम्हाला वापरायची असेल तर जेव्हापासून तुम्ही ही राजमुद्रा वापरायला सुरूवात केली त्या दिवसापासून महाराष्ट्रात जिथे जिथे स्त्रियांवर अन्याय, अत्याचार झाले तिथे तिथे तुम्ही संघटना म्हणून त्यांच्या पाठिशी उभे राहणे अपेक्षित होते.
या देशात अत्यंत स्वार्थी आणि हलकट जर कोणी असतील तर आपल्याकडील कला आणि क्रीडा क्षेत्रातील लोक आहेत. अत्यंत नीच आणि स्वार्थी माणसे या क्षेत्रात कार्यरत आहेत. जे कोणी भारतरत्न आहेत ते त्यांच्या सोयीनुसार भूमिका घेतात आणि तुम्ही त्यांच्या बाजूने बाह्या सरसावून उभे राहता? कोणत्या शेतकर्याला हे पसंत पडेल? तुम्ही पक्ष चालवताय की सुरक्षा एजन्सी हे तरी एकदा जाहीर करा. अमुकला संरक्षण, तमुकला संरक्षण असं करण्यापेक्षा सरळ सिक्युरेटी एजन्सी चालवा ना!
प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांच्या स्वतःच्या काही वैचारिक भूमिका होत्या. मतदारसंघातील जातीचे प्राबल्य न पाहता बाळासाहेबांनी अनेकांना उमेदवार्या दिल्या आणि केवळ हिंदू म्हणून त्यांना निवडून आणायला लावले. मित्रपक्षाने चार महत्त्चाच्या जागा घेतल्या तर ‘त्यालाच निवडून द्या, त्याला पाडायला तो काय पाकिस्तानी आहे का? आपल्या पक्षाचा नसला म्हणून काय झाले? तो हिंदू आहे इतके पुरेसे नाही का?’ असे खडसावण्याचे त्यांचे धाडस होते. जी गोष्ट मोदी आणि योगींना जमली नाही तो चमत्कार बाळासाहेबांनी करून दाखवला होता. तुमच्याकडे तोही करिष्मा दिसत नाही. आपले मतदारसंघ तयार करावे लागतात, तिथल्या कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते याचा तुम्हाला विसर पडतोय का? एक साधा पंचायत समितीचा सदस्य सोडून चालला तर अजित पवार त्याला भेटून अडचणी समजून घेतात. गरज पडलीच तर स्वतः शरद पवार त्याला विचारतात, ‘तुझी अडचण काय?’ आणि तुम्ही म्हणताय, ‘राम कदम गेला आणि पक्ष शुद्ध झाला...’, ‘प्रवीण दरेकर गेला’ आणि पक्षाची स्वच्छता झाली? अरे होतेच कोण तुमच्याकडे? आहे ते सगळे सोडून जाताहेत आणि तुम्ही पक्ष शुद्ध करत बसलाय? एवढ्या एकाच बाबतीत तुमची आणि राहुलबाबाची बरोबरी होऊ शकते. जाणार्यांना थांबवायचं नाही, अडवायचं नाही हा प्रकार अतिशय घातक असतो. तुमच्या पक्षाचे झेंडे किती तर दोन! आणि आमदार किती? तर एक! खासदार नाही. लोकसभेला उमेदवारच नाहीत. मग ‘सगळा महाराष्ट्र माझा मतदारसंघ आहे’ असे का म्हणता? ‘मला महाराष्ट्राची बारामती करायचीय’ असे म्हणताना तुम्ही नेमके काय करता हे स्पष्ट व्हायला हवे.
लोकांना फक्त विकासाची ब्ल्यू प्रिंट देऊन चालत नाही. ती स्वप्ने सत्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तुमचे नेते आणि कार्यकर्तेही ही ब्ल्यू प्रिंट सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडले हे सत्य तुम्ही लक्षात का घेत नाही? कार्यकर्त्यांसाठी मेहनत घेणे, त्यांना उभे करणे, त्यांना ताकद देणे, त्यांना सगळ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करणे हे सगळे फक्त उत्तम भाषणे करून साधणार नाही. भाषणे देऊन पक्ष उभे राहत असते तर आज अमोल मिटकरी मोदींना टक्कर देणारा नेता झाला असता. बानुगडे पाटील यांनी शहाची जागा घेतली असती. गोपीचंद पडळकर केंद्रीय नेतृत्वात दिसले असते.
राज ठाकरे यांच्याकडे नेतृत्वाचे अनेक गुण असल्याचे वाटल्याने या राज्याने त्यांना अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. मराठी माणसाने त्यांच्यावर निर्व्याज आणि आत्यंतिक प्रेम केले. मात्र पंधरा वर्षात पक्षसंघटना, विचार या सगळ्याची माती झालीय. तुमची बांधिलकी नेमकी कुणाशी हे तरी एकदा स्पष्ट करा. खडसेसारखा नेता इडीला घाबरत नाही. राऊत यांच्यासारखे बोरूबहाद्दर इडीला घाबरत नाहीत. ममता बॅनर्जी सगळ्यांच्या अंगावर चालून जातात आणि हा मराठी गडी इडीला घाबरला? हा काही क्षात्रधर्म नाही हो! ‘जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे’ अशी डरकाळी फोडणारे बाळासाहेब आठवा. प्रबोधनकारांच्या ज्वलंत भूमिका पुन्हा एकदा समजून घ्या. राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श आणि त्यांचा विचार प्रबोधकारांनी पुढे नेला. बाळासाहेब आणि प्रबोधकारांच्या विचारात साम्य नसले तरी एक गोष्ट महत्त्वाची होती ती म्हणजे दोघेही ‘रोखठोक’ होते. त्यांच्याकडे विचारांसाठी लागणारी किंमत मोजण्याची निर्भयता होती. तुम्ही कोणत्या बाबतीत त्यांच्या जवळपास फिरकता हे तरी एकदा कळू द्या.
प्रत्येक विषयावरची तुमची मते एकदा विस्ताराने लोकांपर्यंत यायला हवीत. आरक्षणाबाबत तुमचे मत काय? मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे की विरोध? दीपाली चव्हाण नावाच्या एका तरूण अधिकारी असलेल्या महिलेला आत्महत्या करावी लागली तरी तुम्ही गप्पच? अॅट्रोसिटी कायद्याबद्दल कधी तरी मत मांडाल की नाही? पत्रकार परिषदा घेणे म्हणजे पक्ष चालवणे नाही. पक्ष चालवणे ही एक वेगळी प्रक्रिया आहे हे तुम्हाला तुमचे कोणतेही सल्लागार सांगत नाहीत का? मध्यंतरी एकदा पवार साहेबांनी तुम्हाला सांगितले होते की ‘पक्ष चालवायचा असेल तर सकाळी लवकर उठावे लागते आणि रात्री कार्यकर्ते भेटायला आल्यावर त्यांना ओळखता येईल इतक्या शुद्धित असावे लागते.’ पवार साहेबांना तुम्ही म्हणालात, ‘मी शिकतो.’ ती ‘शिकवण’ तुमच्या आचरणात दिसून का येत नाही?
तुमची नेमकी भूमिका कोणती? तुम्ही पवार साहेबांची मुलाखत घेतली. त्या आधी श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत घेतली. पवारांच्या मुलाखतीची स्क्रिप्ट बारामतीहून आली होती असाही आरोप झाला. तुम्ही मुलाखतकार आहात का? आमच्या सुधीर गाडगीळांसोबत तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर मग राजकीय नेतृत्वाची अपेक्षा सोडून द्या आणि इथेच पूर्णवेळ करिअर करा. ज्या त्वेषाने, ज्या तळमळीने, वैयक्तिक माझ्यावर अन्याय झाला म्हणून ज्या जिद्दीने तुम्ही शिवसेना सोडून बाहेर पडलात ते पाहता तुमचा प्रवास नेमका कुठून सुरू झाला आणि आता तुम्ही नेमके कुठे आहात? हे पडताळून बघितले पाहिजे. तुमचे विधानसभेत आमदार नाहीत, लोकसभेत खासदार नाहीत. एकदा म्हणता महाराष्ट्राच्या विकासासाठी मला सत्ता द्या, एकदा म्हणता मला विरोधी पक्ष कसा चालवायचा हे दाखवायचेय... नाशिकमध्ये तुम्ही खरेच खूप विकासाची कामे केली. तरीही त्याठिकाणी सत्ता का गेली याचे कधीतरी आत्मचिंतन करा. तुकाराम मुंडे यांच्यासारखा एखादा हेकट, मनमानी करणारा अधिकारी असला तरी लोक त्याच्या पाठिशी उभे राहतात. सगळं प्रशासन, सत्ताधारी, विरोधक त्यांच्या विराधात असले तरी लोक त्यांना पाठिंबा देतात. त्यांनी घरपट्टी वाढवली, कर्मचार्यांचे निलंबन केले तरीही ते त्या त्या ठिकाणहून बदलून गेले त्या त्या वेळी नागरिकांनी त्यांना अडवले. त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. सामान्य माणूस जर चांगल्या अधिकार्याच्या मागे उभे राहण्यासाठी उत्स्फूर्तपणे येत असेल तर तुमची कामे इतकी प्रामाणिक आणि पारदर्शी असूनही लोक का दूर ढकलताहेत? ‘एवढे सगळे करूनही नाशिकच्या लोकांनी आम्हाला नाकारले’ अशी खंत जेव्हा तुम्ही व्यक्त करता तेव्हा ते सामान्य माणसावरचे दोषारोप असते. लोकांना असे नालायक समजणे, गद्दार समजणे बरे नाही!
नाना पटोलेंनी परवा संजय राऊतांना ‘तुम्ही यूपीएचे घटक नाही त्यामुळे तुम्ही यावर बोलू नका’ म्हणून झापडले. ‘तुम्ही प्रवक्ते शिवसेनेचे आहात की राष्ट्रवादीचे? आणि पवारसाहेब राष्ट्रवादीचे आहेत की शिवसेनेचे? हे एकदा कळू द्या’ असेही त्यांनी सांगितले. तशीच तुमची अवस्था झालीय. फडणवीसांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’चे स्क्रीप्ट बारामतीहून आलेय, असे सांगितले होते. आता वाझे प्रकरणात त्याच फडणवीसांची बाजू तुम्ही घेता तेव्हा हे स्क्रिप्ट नागपूरच्या रेशीमबागेतून आले असे म्हणायचे का? बॅन्डवाले जसे जिकडे सुपारी मिळेल तिकडे वाजवायला जातात तसे तुमचे झालेय का? निदान स्वतःशी तरी प्रामाणिक रहा. मनसेचे ‘बॅन्डपथक’ होऊ देऊ नका. जो सर्वोत्तम बॅन्ड वाजवतो तो त्यांचा प्रमुख होऊन त्याला सगळीकडून सुपार्या येतात. कुणाचेही लग्न असले तरी बॅन्डवाला हजरच! बॅन्ड चांगला वाजतो म्हणून लोकही ऐकतात. यापेक्षा तुमचे खूप मोठे स्टेटस आहे याचा तुम्हाला विसर पडतोय का?
नाणार प्रकल्पात तुम्ही तुमची भूमिका बदलली असेल तर ती का बदलली हे राज्यातल्या लोकांसमोर आले पाहिजे. नाणारला तुमचा विरोध का होता आणि आता पाठिंबा का दिला हे जाहीरपणे सांगा. तुम्ही महाराष्ट्रातले सगळे टोलनाके बंद करणार होता. ते तर बंद झालेच नाहीत पण तुमचे आंदोलन का बंद झाले ते सांगा. महाराष्ट्रातल्या गावागावातल्या दुकानावरचे फलक मराठी भाषेत करणार होतात, बँकांचे कामकाज मराठीत करणार होतात त्याचे पुढे काय झाले ते सांगा. हे प्रश्न विचारले की तुम्ही म्हणता, ‘‘हे मलाच का विचारता? मी एकट्याने ठेका घेतलाय का? मक्ता घेतलाय का? बाकीच्यांनाही विचारा की!’’ हा मुद्दा जर तुम्ही मांडला असेल, त्यासाठी लढण्याची तयारी तुम्ही दाखवली असेल, आमच्यासारख्या अनेक तरूणांनी त्यासाठी तुम्हाला पाठिंबा दिला असेल तर तुमची ही भाषा बरोबर नाही. त्यामुळे तुम्हालाच या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. फक्त दुसर्यांची टिंगल करून, त्यांना नावे ठेवून एखादी संघटना किंवा पक्ष उभा राहू शकत नाही हे तुमच्यामुळे सगळ्या जगाला कळले.
महाराष्ट्राच्या इतिहासात जॉनी लिव्हरनंतर सर्वाधिक विनोदी कलाकार म्हणून तुमची नोंद व्हावी की उत्तम नेतृत्वगुण असलेला समाजाभिमुख नेता म्हणून दखल घेतली जावी हे आता तुमचे तुम्ही ठरवायचे आहे. ‘ईव्हीएममुळे नरेंद्र मोदी निवडून आले’ हे तुम्ही ठामपणे मांडलेत. त्यासाठी ममता बॅनर्जींनाही जाऊन भेटलात आणि त्यांनाही याबाबतची काळजी घ्यायचा सल्ला दिला. तुम्हाला असे वाटत होते तर तुम्ही या मुद्याच्या शेवटपर्यंत का गेला नाहीत? त्यासाठी तुम्हाला कोणी फासावर लटकवणार होते का? गरज पडलीच तर चार महिने, सहा महिने जा ना तुरूंगात! काही फरक पडत नाही त्यामुळे. चुकीच्या प्रकरणात सूडबुद्धिने तुम्हाला त्रास दिला गेला असता तर बाहेर आल्यावर तरी हिरो झाला असता. तुम्ही घाबरलात. ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा गुण ज्याच्यात नाही त्याला मराठी नेता म्हणवून घ्यायचा काय अधिकार आहे? मराठी माणूस उभा राहिला, कोलमडून पडला पण त्याने कधी पळपुटेपणा केला नाही हे मागच्या बाराशे-चौदाशे वर्षात अनेकदा दिसून आलेय. छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, माधवराव पेशवे या सर्वांनी हेच तर दाखवून दिलेय.
माधवराव पेशव्यांच्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग आहे. माधवरावांनी त्यांच्या मामाला, मल्हारराव रास्तेंना दंड केला. पुण्यात निजामाने घरे लुटली आणि जाळली तेव्हा त्यांना घरे दाखवण्यात मल्हारराव होते यावरून त्यांना दंड केला होता. त्यावेळी माधवरावांच्या आईंनी सांगितले की ‘‘माझ्या भावाला दंड भरायला लावायचा नाही.’’
त्यावर माधवराव म्हणाले की ‘‘ठीक आहे, मामाला जमत नसेल तर त्यांचा दंड मी भरतो.’’
आई म्हणाल्या, ‘‘तुही दंड भरायचा नाही. माझ्या माहेरच्या परिस्थितीला काही भीक लागली नाही. ते दंड भरू शकतात पण शिक्षा म्हणून तो दंड माफ कर.’’
माधवरावांनी सांगितले की ,‘‘काहीही झाले तरी दंड माफ होणार नाही.’’
त्यावर आईने सांगितले, ‘‘तसे असेल तर मी पुण्यात राहणार नाही. मी पुणे सोडून निघून जाईल.’’
त्यावर माधवरावांनी सांगितले, ‘‘तुझी इच्छा. तुला कुठे जायचे, कुठे रहायचे!’’
त्यांनी स्वतःच्या निर्णयात बदल केला नाही. अशा न्यायनिष्ठुर आणि कर्तव्यकठोर, ‘मोडेन पण वाकणार नाही’ अशा मराठी माणसाचा हा महाराष्ट्र आहे. माधवराव हे फक्त एक उदाहरण आहे. बहलोलखानच्या हजारोच्या फौजेवर चालून गेलेले कुडतोजी गुजर आणि त्यांचे सहा मावळे ज्यांच्याविषयी तात्यासाहेबांनी ‘वेडात दौडले वीर मराठी सात’ असे लिहून ठेवलेय त्यांना आठवा. मुघलांच्या खजिन्यावर एकाचवेळी दोन वाघांनी हल्ला केला होता. एक खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे प्रतापराव तथा कुडतोजी गुजर. ‘म्यानातुन उसळे तलवारीची पात’ अशी स्वाभिमानी माणसे प्रत्येक पिढ्यात मराठी मुलखात जन्माला आलीत. कराडच्या साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाण असताना अणीबाणीच्या विरूद्ध बोलणार्या आणि यशवंतराव चव्हाणांना ‘तुमचे राजकीय जोडे संमेलनाच्या बाहेरच काढून या’ असे ठणकावणार्या दुर्गाबाई भागवतांचा हा महाराष्ट्र आहे.
असे सगळे असताना तुम्ही प्रत्येक ठिकाणी मोडताय, वाकताय, शब्द फिरवताय. मग तुमचा पक्ष काय क्रांती करणार? तुमच्या पक्षात येणे म्हणजे स्वतःची फरफट करून घेणे नाही का? तुमचा आजवरचा प्रवास पाहता सुरूवातीच्या काळातला जोश कुठे गेला? तुमच्या भूमिकांवर, विचारांवर आम्ही प्रेम केले पण आता तो विचार कुठेच दिसत नाही. इंग्रजीत एक म्हण आहे, तुम्ही काही लोकांना काही काळ मूर्ख बनवू शकता. काही लोकांना सर्वकाळ मूर्ख बनवू शकता. सर्व लोकांना काही काळ मूर्ख बनवू शकता पण सर्व लोकांना सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही! आता तुम्ही आणि तुमचा पक्ष या चौथ्या स्टेजला आहात. या पक्षाचे आकर्षण राहिलेले नाही किंवा या पक्षाला महाराष्ट्रात 248 जागा मिळण्याची शक्यता राहिलेली नाही. नेतृत्वाबद्दल प्रेम राहिलेले नाही आणि तुमची दिशा कोणती असेल हेही कुणाला सांगता येणार नाही.
तुमचे सल्लागार कोण आहेत? याबाबत तुम्हाला कोणी काही सांगत नाही का? पक्षाचे वार्षिक अधिवेशन नाही, निवडणुकीत उमेदवार नाहीत. विचारधारा नाही, भूमिका नाही. फक्त पत्रकार परिषदा घेऊन तुम्ही पक्ष चालवताय. बाळासाहेब ठाकरे यांनी दसर्याला मेळावा सुरू केला म्हणून तुम्ही पाडव्याला मेळावा सुरू केला. त्यांनी ते मेळावे सगल घेऊन दाखवले. अशी ‘सलगता’ हे तर तुमचे वैशिष्ट्यच नाही. दरवेळी यू टर्न (यूटी म्हणजे उद्धव ठाकरे नव्हे) हेच तुमचे वैशिष्ट्य. ‘सगळ्या जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट’ तुम्ही करताय की काय असे वाटावे अशी परिस्थिती आहे.
राजसाहेब, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्र अजूनही एका संक्रमणावस्थेत आहे. मागच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते, ‘महाराष्ट्राचा शरद पवारांचा वेढा संपुष्ठात येतोय.’ त्यांनी तसे विधान केले असले तरी त्यात सत्य नाही हे एव्हाना सिद्ध झालेय. पुढची पाच-सात वर्षे ती शक्यताही दिसत नाही. मात्र शरद पवारांचा वेढा जेव्हा संपुष्टात येईल तेव्हा महाराष्ट्राचे एकहाती नेतृत्व करण्याची क्षमता आम्हाला फक्त तुमच्यात दिसतेय. त्यासाठी तुम्ही दिवसरात्र लोकांत मिसळायला हवे. त्यांचे सुखदुःख समजून घ्यायला हवे. घराबाहेर न पडणे, दुसर्यांच्या नकला करणे म्हणजे पक्ष चालवणे नाही. तुमच्या पक्षाचा एखादा नेता बाहेर पडत असेल तर किमान त्याचा अभ्यास करा. कसा जातोय, का जातोय, कुठे जातोय, काय करतोय, आधी काय केलेय इतके तरी बघा. तुमचे वेगळेपण तुमच्या कामातून दिसू द्या. महत्त्वाच्या बैठकींना जाताना, पत्रकार परिषदा घेताना मास्क न लावता जाणे हे वेगळेपण असू शकत नाही. ते वेडेपण आहे. नरेंद्र मोदींवर, भाजपवर टीका करायची आणि म्हणायचे, नितीन गडकरी चांगला माणूस आहे... हे कसले वेगळेपण? स्वतःची जर इतकी द्विधा अवस्था असेल तर कोण कशाला थांबेल तुमच्याबरोबर? कोण तुम्हाला पाठिंबा देणार? कोण तुमच्या मागे उभे राहणार?
तुम्ही आता एक विचार, एक झेंडा, एक भूमिका, एक नेतृत्व ठेवले आणि पक्ष चालवला तर अजूनही लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, बाबासाहेब पुरंदरे हे आमच्यासाठीही वंदनीयच आहेत पण ते म्हणजेच महाराष्ट्र नाही. इथल्या शेतकर्यांपर्यंत, श्रमिकांपर्यंत पक्षाचे काम जाऊ द्या. साहित्यिक आघाडी बळकट करा. उद्या तुम्ही कंगना रानौत आणि अर्णब गोस्वामीच्या संरक्षणासाठीही उभे राहिलात तर आश्चर्य वाटणार नाही इतकी घसरण होऊ देऊ नका. गेल्या पाच-सात वर्षात बेळगावात कन्नड राज्यकर्त्यांचा अत्याचार कमालीचा वाढतोय. तुम्ही मराठीचा मुद्दा घेतला असेल तर त्याविरूद्ध सर्वप्रथम आवाज तुम्ही उठवायला हवा होता. कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात 2019 ला प्रचंड पाऊस पडला. आलमट्टीच्या बॅक वॉटरमुळे भयावह पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागले. त्यावेळी सगळे नेते या भागाच्या पाहणीसाठी आले होते. फक्त तुम्ही नव्हता. काय करत होता तेव्हा मुंबईत? अशावेळीही काय काम असते तुम्हाला? तुम्ही इकडे वहिनींना पाठवलंत. ही कुठली पद्धत? मोदींनी किमान अमित शहांना पाठवले. ते हेलिकॉप्टरने का असेना पण येऊन गेले. पवारसाहेब भरपूर फिरले. गिरीश महाजनसारख्या लोकांनी येऊन किमान नौकेत बसून सेल्फी काढले. त्यावेळी या सगळ्यांनी या लोकांना काय दिले? पवारसाहेब तर तेव्हा सत्तेतही नव्हते! पण नेत्यांचा आश्वासक हात पाठिवर पडला, त्यांच्याकडून सांत्वन झाले तर समाज उभा राहतो. लोकांना किमान तुम्ही असा धीर द्या, आधार द्या. भलेही मदत काय करायची हे तुम्ही ठरवा पण लोकांच्या दुःखात त्यांच्याबरोबर उभे तरी रहा. तुमच्याकडे चांगले सल्लागार नसले तरी अशा गोष्टी तुम्ही पवारसाहेबांकडे पाहून शिकू शकता. दरवेळी त्यांनी तुम्हाला सल्ले द्यावेत ही अपेक्षाही बाळगू नका.
पक्षाचा सामान्य कार्यकर्ता तुमच्यासमोर हे सगळे मोकळेपणे बोलू शकत नाही. कोकणातले नगरसेवक, नगराध्यक्ष तुम्हाला भेटायला आले तर तुम्ही कुत्र्यासोबत खेळत बसता? त्याच्याशी खेळत ‘‘काऽऽय रे! काय काम आहे? कशाऽऽला आलाय?’’ असे तुम्ही विचारता? ही तुमची भाषा? त्यापेक्षा तो राहुलबाबा परवडला. तो अशा लोकांना भेटतच नाही. मला वेळ नाही, असेच सांगतो आणि कुत्र्याबरोबर खेळत बसतो.
तुमचं राजकारण म्हणजे बाळासाहेबांची नक्कल आहे. नक्कल करायला अक्कल लागते हे जरी खरे असले तरी आता तुमच्याकडचे अस्सल बाहेर येऊ द्या. तुम्ही खरे हिरो असताना कितीकाळ स्टंटमॅन म्हणून काम करणार? तुमचे आजोबा, काका, वडील हे सगळे रिअल हिरो होते. तुम्ही तसेच हिरो म्हणून पुढे या.
या सगळ्यात तुमची एकच गोष्ट मला चांगली वाटली. तुम्ही दहावी आणि बारावीच्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवसोहळ्याला कधी जात नाही. ‘मला दहावी-बारावीला खूप कमी मार्क होते म्हणून मी अशा सोहळ्यांना जात नाही’ असे तुम्ही प्रांजळपणे सांगितले. असा प्रामाणिकपणा सगळीकडे ठेवा. तसेच जगा. आमचे अमितभैय्या देशमुख लातूर जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत एकेका दिवशी पंधरा-पंधरा, वीस-वीस सभा घेतात आणि तुमची रोज फक्त एकच सभा? सत्तर वर्षांचे मोदी रोज स्वतःच्या अनेक सभा लावतात. तुम्ही जर महाराष्ट्रात सभा करत होतात आणि उत्तर प्रदेश, बिहार, गुजरातमधून तुम्हाला ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या सभेसाठी निमंत्रणे असतील तर तुम्ही का गेला नाहीत? राजकारणात संकटाला संधी माणून काम करावे लागते. संधी आल्यावर असे पळणारे नेते कसे होऊ शकतात?
निवडणुका लढवताना भूमिका निश्चित असायला हव्यात. सत्तेची महत्त्वाकांक्षा ठेवायला हवी. समाजकारण तर करावेच लागते पण राजकीय पक्षांचे ध्येय निवडणुका लढणे, त्या जिंकणे, सत्ता मिळवणे, त्याचे लाभ पदरात पाडून घेणे, आपली विचारधारा राबवणे आणि जनतेच्या हिताची कामे करणे हे असावे लागते. त्यासाठी स्वतःची विचारधारा निश्चित करावी लागेल. तुम्ही फक्त ‘सेटलमेंट’मध्येच कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही असा संदेश जाणे कितपत योग्य आहे?
सध्या तुमच्या पक्षाला उतरती कळा लागलीय. रेल्वे इंजिन रूळावरून घसरलेय. ही वेळ आहे ते इंजिन परत रूळावर आणायची. ही वेळ आहे रेल्वे इंजिनला दिशा देण्याची. ही वेळ आहे एका चांगल्या पद्धतीने प्रवास करण्याची. ही वेळ जर तुम्ही चुकवली तर तुम्हाला काळ माफ करणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात एक चांगला, यशस्वी राजकारणी म्हणून किंवा अयशस्वी, फसलेला राजकारणी म्हणून तुमची ओळख व्हावी. जॉनी लिव्हरची कॉमेडी ब्रेक करणारा, इतरांच्या नकला करणारा मिमिक्री कलाकार म्हणून महाराष्ट्राने तुमची नोंद घ्यावी असे आम्हास वाटत नाही. त्यासाठी सिंहावलोकन करावे लागेल, आत्मपरीक्षण करावे लागेल.
अजूनही तुमच्या अवतीभोवती काही चांगली माणसे आहेत. पुण्यासारखं शहर हलवणारा आणि सर्वांवर अंकुश ठेवणारा वसंत मोरे यांच्यासारखा सच्चा कार्यकर्ता अजूनही तुमच्यासोबत दिसतोय. ‘मनसेची वाघिण’ अशी ओळख असलेल्या अॅड. रूपालीताई ठोंबरे पाटील तुमच्या पक्षात आहेत. मराठी भाषेच्या विकासासाठी धडपडणारे गणेशअप्पा सातपुते अजूनही तुमच्यासोबत आहेत. सगळ्यात जास्त समर्पण देणारी माणसे तुमच्यासोबत आली पण तुम्हाला त्यांचा उपयोग करून घेता आला नाही. महाराजांची राजमुद्रा वापरायची असेल तर त्यांच्यासारखे वागण्याचा थोडाफार प्रयत्न तरी करावा लागतो. हे सगळे तुम्हाला सांगण्याचा हेतू म्हणजे आमचे तुमच्यावर खरेखुरे प्रेम आहे. एक चांगला नेता, एक चांगला मराठी माणूस, महाराष्ट्रातला, या नव्या पिढीतला, वक्तृत्वाचे इश्वरी वरदान लाभलेला नेता म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय. भाटगिरी करणारे अनेकजण तुमच्या अवतीभोवती असतील, आहेत पण तटस्थपणे हे सगळे तुमच्यासमोर मांडण्याची गरज होती म्हणून अंतःकरणापासून लिहितोय.
एका घरातली दोन माणसे मारली जाऊनही राहुलबाबा सगळीकडे बिनधास्त फिरतोय. जर राहुल गांधी असे धैर्य बाळगतोय तर प्रबोधनकार ठाकरेंच्या नातवाकडून आम्ही काही भल्याच्या अपेक्षा का बाळगायच्या नाहीत? जननिंदेला, जनटिकेला जराही न घाबरता आणि स्वतःच्या विचारांपासून जराही विचलित न होता लेखन करणारे ते प्रबोधनकार, त्यांचे विचार आजही प्रक्षोभक वाटतात. त्या काळात तर त्यांनी केवढी खळबळ माजवली होती! अशा प्रबोधनकरांचा वारसा सांगणार्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. महाराष्ट्राला सध्या एक चांगली विचारधारा असणारा राजकीय पक्ष हवाय. काँग्रेस आणि भाजपची परस्सरविरोधी विचारधारा कायम असतानाही एका नव्या विचारधारेची सध्या फार मोठी गरज आहे. ती पोकळी तुम्ही भरून काढाल म्हणून हा शब्दप्रपंच! गोपाळकृष्ण गोखल्यांची काँग्रेस, प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी स्थापन केलेल्या संघाच्या मदतीवर उभा राहिलेला भाजप, ‘संधीसाधू पक्ष’ अशी ओळख असलेला राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष यात एक चांगला पर्यायी पक्ष हवाय. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची विचारधारा पूर्णपणे संपवलीय. राष्ट्रवादीवाले सत्ता घेऊन सेटलमेंट करतात. तुम्ही तर सत्ता न घेताही सेटेलमेंट करता असा आरोप तुमच्यावर सातत्याने होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका बदनाम होऊनही किमान शेतकरी प्रश्नावर बोलतो, महिला अत्याचारावर बोलतो. सामान्य माणूस हे सगळे उघड्या डोळ्यांनी बघत असतो. तुम्ही अनेक कलाकारांना, खेळाडूंना मार्गदर्शन करत असता. आता एकदा स्वतःचे मूल्यमापन स्वतःच करा. या सिंहावलोकनातून काही चांगले साध्य झाले तर आम्हाला आनंदच वाटेल.
- घनश्याम पाटील
संपादक आणि प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092
Tuesday, March 30, 2021
परिवर्तनाची नांदी?
दैनिक पुण्य नगरी, 30 मार्च, 2021
पश्चिम बंगाल हा नेहमी परिवर्तनाच्या बाजूनं उभा राहिलेला प्रांत आहे. या देशात महाराष्ट्र, पंजाब आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यात सर्वाधिक क्रांतिकारक निर्माण झाले. त्यातल्या दोन राज्यात भाजपची सत्ता नाही. पश्चिम बंगालमध्येही त्यांना फार काही अनुकूल चित्र आहे अशी परिस्थिती नाही. नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं विरोधकांची पर्वा न करता शासन चालवतात, वाटेल तसे निर्णय घेतात तशाच ‘मिनी नरेंद्र मोदी’ म्हणून पश्चिम बंगालमध्ये ममतादीदी काम करतात. या बाई मोदींचेच दुसरे रूप आहेत. अतिशय आक्रमक असलेल्या ममता एकछत्री पक्ष चालवतात. स्वतःच्या प्रतिमेची आत्यंतिक काळजी घेत कुठंही फिरतात.
पश्चिम बंगालमधला मतदार हा एका संक्रमणावस्थेत आणि संभ्रमावस्थेत आहे. तिथं अनेक वर्षे डाव्या आघाडीचं आणि कम्युनिस्टांचं वर्चस्व राहिलेलं आहे. ती भूमी स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, गुरूवर्य रवींद्रनाथ टागोर यांची भूमी म्हणून भारताला परिचित आहे. विकासाच्या दृष्टीनं विचार केल्यास कोलकत्ता शहर सोडलं तर हे राज्य महाराष्ट्रापेक्षा किमान पाच-पंचवीस वर्षे मागं आहे. तिथं अजूनही भिंती रंगवून प्रचार सुरू आहे. जग हायटेक होत असताना हे लोक आहेत तिथंच आहेत. बांगलादेशातून आलेले सर्वाधिक घुसखोर हे पश्चिम बंगालमध्ये आहेत. राजकीय नेतृत्वाच्या आशीर्वादानं ते तिथं आनंदानं राहतात.
डावी आघाडी आणि काँग्रेस या दोनच विचारधारा तिथं प्रभावी आहेत. भाजपाच्या विचारधारेला तिथं पूर्वी कधी फारसं स्थान नव्हतं आणि आजही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपत्तीच्या काळात दिवसरात्र खपून तिथं जे सेवाकार्य केलं त्यामुळेच भाजपचं तिथलं अस्तित्त्व टिकून आहे. सेवा आणि संघटन या संघाच्या गुणांचा भाजपला लाभ होईल. तिथं आयात केलेले जे उमेदवार आहेत त्यांच्या जोरावरच भाजप निवडणूक लढवतो आहे. पश्चिम बंगालचा भाजपचा नेता कोण? सत्ता आलीच तर राज्याचं तिथलं नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न केला तर अनेकांना लवकर कोणतंच नाव आठवणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच तिथल्या प्रचाराचे आयडॉल आहेत. पंतप्रधानपद सोडून ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदासाठी उभे असावेत इतकं त्यांचं लक्ष त्या राज्यात आहे. प्रत्येक फ्लेक्सवर फक्त मोदी आहेत. ‘पश्चिम बंगालमध्ये सत्ता दिल्यास आम्ही सर्व भ्रष्टाचार्यांना शिक्षा देऊ’ असं मोदी आणि शहा सांगत असले तरी सत्ता आलीच तर शिक्षा देण्यासाठी त्यांच्याकडं कोणीच उरलं नाही; कारण ज्यांना शिक्षा द्यायला हवी ते भाजपमध्ये येऊन पावन झालेत. जर सत्ता आलीच तर हरियाणात जसा एक मनोहरलाल खट्टर पकडला तसा तिथं एखादा नेता पकडून राज्याची सूत्रं त्याच्या हाती देण्याची वेळ भाजपवर येईल.
ममता बॅनर्जी यांचे आडाखे, राजकीय गणितं, समीकरणं, मतांचं राजकारण हे सगळं नीट अभ्यासलं पाहिजे. या बाईनं बुद्धदेव भट्टाचार्य यांची सत्ता उलथवून लावली. पश्चिम बंगालच्या विकासाचा, विचारांचा, संस्कारांचा वारसा आपल्याकडं यावा असं भाजपवाल्यांना वाटत असलं तरी तसं त्यांचं तिथं काही काम नाही. कोलकत्ता हे धर्मनिरपेक्ष शहर आहे. जिथं सामाजिक क्षेत्रात अनेक पिढ्या अव्याहतपणे खपल्यात तिथं जात-धर्म असे निकष चालत नाहीत. राजाराम मोहन रॉय यांच्यापासून जी काही सामाजिक आंदोलनं झालीत ती पाहता इथं धार्मिक संघर्षावर मतविभाजन होईल असं वाटत नाही. ममतादीदींनी तिथं फार मोठ्या प्रमाणात घुसखोरांना आश्रय दिला असा विरोधकांचा आक्षेप आहे. तो असताना मोदी सांगतात की बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात मी सहभागी होतो. यामागे तिथल्या मुस्लिमांना खूश करण्याचा प्रयत्न असू शकतो. भाजपचं तिथलं दुर्दैव असं की त्यांना तिथं युती करायलाही कोणी सोबत नाही. त्यांना बिहारमध्ये नितीशकुमार सापडले, महाराष्ट्रात अनेक वर्षे शिवसेना सोबतीला होती. तिथं मात्र डावे भाजपबरोबर युती करायला तयार नाहीत, काँग्रेस युती करायला तयार नाही आणि ममता तर नाहीतच नाहीत. त्यामुळं तिथं भाजप एकटा पडलाय. या निवडणुकांपूर्वी राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जी यांना ईव्हीएममध्ये घोटाळा होतोय, त्यामुळे तुम्ही इव्हीएमद्वारे निवडणुका घेऊ नका असा वैधानिक इशारा दिला होता. ममता यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे आणि स्वभावाप्रमाणे तिकडं पूर्ण दुर्लक्ष केलं. दुसर्याचं ऐकायचं, तिकडं लक्ष देऊन त्याला किंमत द्यायची हे जसं ममतांना सल्ला देणार्या राज ठाकरे यांना माहिती नाही तसंच तो सल्ला ज्यांना दिला गेला त्या ममतांनाही माहिती नाही. त्यामुळं जर या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला तर राजसाहेबांचं ऐकलं नाही, साहेबांनी वेळीच इशारा दिला होता पण त्यांनी दुर्लक्ष केलं, म्हणूनच त्यांचा पराभव झाला असं मनसैनिकांना आनंदानं म्हणता येईल.
आत्तापर्यंत भाजपला स्वबळावर किंवा कुणाशी युती करून पश्चिम बंगालमध्ये कोणतीही मोठी संधी मिळाली नाही. अत्यंत प्रयत्न करून आपले पाय तिथं रोवण्याचा प्रयत्न भाजपनं केलाय. त्यामुळं भाजपचं स्वरूप थोडं अधिक व्यापक होईल असं वाटतंय. निवडणुकांचे ट्रेंडस, त्यांचं स्वरूप पाहता ममता बॅनर्जी काँग्रेस किंवा डाव्यांची मदत घेऊन सरकार स्थापन करू शकतात. जशी मागच्यावेळी एकहाती सत्ता होती तशी मात्र मिळण्याची शक्यता नाही. तिथं भाजपही ओरिजनल नाही. इतर पक्षातले नेतेच त्यांच्याकडं आयात केलेले आहेत. इथला मुस्लिम मतदार काँगे्रसकडे जातो, डाव्यांबरोबर जातो की भाजपची बी टीम असलेल्या एमआयएमच्या माध्यमातून छुप्या मार्गानं भाजपला मतदान करतो हे लवकर कळेल.
भाजपच्या हातात जी राज्ये आहेत तिथं त्यांनी फार चमकदार कामगिरी केलीय असंही नाही. पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीपर्यंत गेलेत. कन्हैय्याकुमारनं परवा पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभेत बोलताना सांगितलं की एकजण म्हणतोय की आम्ही ‘शेर’ पाळलाय. शेर पाळणं ही सामान्य गोष्ट नाही. त्यामुळं पेट्रोल शंभर रूपये लिटरनं खरेदी करावंच लागणार आहे. भाजपच्या या अशा बोलघेवड्या लोकांच्या नादाला लागू नका. त्यांच्या आविर्भावाला बळी पडून तुम्ही परत सत्ता त्यांच्याकडं दिली तर पेट्रोल दीडशे रूपये लिटर झाल्याशिवाय राहणार नाही.
उद्योगपती, धनदांडग्यांच्या विरोधात जेव्हा जेव्हा सशस्त्र क्रांती झालीय तेव्हा तेव्हा पश्चिम बंगाल अग्रेसर राहिलेला आहे. ‘माटी, माँ आणि मानूस’ या तत्त्वावर बंगाली लोक प्रेम करतात. त्यांना नौटंकी चालत नाही. त्यांच्याकडे सगळे ओरिजनल हिरो आहेत. त्यामुळं त्यांना स्टंटबाज चालत नाहीत. पश्चिम बंगालचा मतदार विचारानं, शिक्षणानं आणि संस्कारानं अधिक प्रगल्भ आहे. एक मोठी साहित्यिक आणि सुधारणांची परंपरा त्यांच्याकडं आहे. या पार्श्वभूमीवर एकविसाव्या शतकातल्या तिसर्या दशकातली पहिली निवडणूक तिथं होत आहे. या राज्यात मोदी आणि शहांचा अश्वमेध रोखण्यात डाव्यांना आणि ममतांना यश आलं तर ती भाजपला 2024 साठी धोक्याची फार मोठी घंटा असेल. मात्र ही निवडणूक मोदी आणि शहा जिंकू शकले तर 2029 पर्यंत देशात सत्तेत येण्याचं स्वप्न हे काँग्रेसनं आणि भाजपच्या अन्य विरोधकांनी सोडून द्यावं. इथं भाजपला स्पष्ट बहुमत मिळणं तसं अवघड आहे. ममता किंवा, काँग्रेसला, डाव्यांना स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर ते एकमेकांना पाठिंबा देतील. भाजपचं तसं नाही. त्यांचं तिथं ‘एकला चलो रे’ आहे. त्यामुळं तिथं नेमलेल्या राज्यपालांशिवाय त्यांच्यासोबत कोणीही राहणार नाही.
पश्चिम बंगालमध्ये आजवर भाजपला कधीही कौल मिळाला नाही. त्यामुळं मोदी-शहांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भारतीय राजकारणावर पुढची किमान दहा वर्षे या निवडणुकीचा प्रभाव असेल. यात ममता जिंकल्या तर हा प्रांत कधीही जिंकण्याची मनीषा भाजपने बाळगू नये, हा संदेश जाईल आणि आयात केलेल्या, उसन्या घेतलेल्या माणसांच्या बळावर लढाया जिंकल्या जात नाहीत हा धडाही मिळेल. मात्र या निवडणुकीत मोदी-शहा जिंकले तर 2029 पर्यंत भारतीय राजकारणात काही परिवर्तन घडेल हा विचारही राहुलबाबाने सोडून द्यावा आणि बँकॉकला परत विपश्यनेला जायला सुरूवात करावी.
आणखी एक गोष्ट यावेळी चर्चेत राहिली ती म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखी वेशभूषा आणि त्यांच्यासारखी दाढी पंतप्रधानांनी राखली. भाजपकडे आजही त्यांच्याशिवाय दुसरा कोणी स्टार प्रचारक नाही. कोणी कोणासारखं दिसून निवडणुका जिंकू शकतं का? या प्रश्नाचं उत्तरही या निवडणुकीत मिळणार आहे. भारताला नोबेल मिळवून देणारे साहित्यिक म्हणून रवींद्रनाथ टागोर सुपरिचित आहेत. त्यांच्या स्वप्नातला भारत खूप वेगळा होता. आजवर कोणत्याही सत्ताधार्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करता आलेलं नाही. ही भूमी योगी अरविंदांची आहे. क्रांती आणि परिवर्तनाचे विचार सर्वप्रथम तिथून येतात. अशा परिस्थितीत तिथले मतदार काय करतात याबाबत उत्सुकता आहे.
देवेंदू बरूवा हे तिथले एक नेते होते. इंदिरा गांधीवर इथल्या लोकांनी खूप प्रेम केलं. देवेंदू बरूवा त्यावेळी जाहीरपणे म्हणाले होते की, आमच्या मंत्रीमंडळात एकच पोलादी पुरूष आहे तो म्हणजे इंदिरा गांधी. बाकी सगळे आम्ही मंत्रीमंडळातल्या पुरूषी वेशातल्या बायका आहोत. अशा भाटगिरीमुळे नेतृत्वाला कसं खूश करावं आणि बदलाचे वारे कसे स्वीकारले जावेत हे समजण्याइतका बंगाली माणूस कायमच चतुर राहिलेला आहे हे दिसून येतं. त्यातही बदलाचे वारे स्वीकारले नाहीत तर सार्या जगाच्या विरोधात काम करण्याची ताकतही बंगाली माणूस ठेवतो. त्यामुळंच या निवडणुकीत नेमकं काय होतं हे पाहणं औत्स्तुक्याचं असेल.
- घनश्याम पाटील
7057292092
Monday, March 22, 2021
अपप्रवृत्तींचा ‘एन्काऊंटर’ व्हावा
सचिन वाझे हे महाराष्ट्रातले एक पोलीस अधिकारी होते. एपीआय दर्जाचं पद त्यांच्याकडं होतं. ‘एन्काऊंटन स्पेशालिस्ट’ अशी त्यांची ओळख होती. त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर ते शिवसेनेते गेले आणि शिवसैनिक झाले. म्हणजे पोलीस अधिकारी म्हणून त्यांना जो दर्जा होता त्यापेक्षा ‘बढती’ झाली असे म्हणूया. शिवसेना त्यानंतर भाजपच्या बरोबरीनं सत्तेत आल्यावर वाझेंना पुन्हा नोकरीत घ्यावं म्हणून सेनेचा सर्वाधिक दबाव होता असं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केलं.
इथपर्यंतचा प्रवास बरोबर असण्याची शक्यता आहे. एका एन्काऊंटर स्पेशालिस्टचं निलंबन झाल्यावर त्यांना आघाडी सरकारनं पुन्हा नोकरीत सामावून घेणं यात त्यांचा ‘गॉडफादर’ दिसतोच आहे. सत्तेत असताना फडणवीस याबाबत का बोलले नाहीत हा प्रश्न निरर्थक आहे, कारण त्यावेळी सेना-भाजपची युती होती. अगदी छोट्या दर्जाच्या अधिकार्याचं निलंबन, बदली, त्याला रूजू करून घेणं हे सगळं राजकारण्यांना करावंच लागतं. कुणाचे हितसंबंध असतात, कुणावर अन्याय झालेला असतो, कुणाचे आणखी काही हेतू. अनेक कार्यकर्त्यांकडून, नेत्यांकडून अशा शिफारशी येत असतात आणि त्यावर यथायोग्य निर्णयही सत्ताधार्यांना घ्यावेच लागतात. त्यामुळे मित्रपक्षाची ही मागणी अगदीच गैर होती असे म्हणता येणार नाही.
आता प्रश्न निर्माण होतो की, सचिन वाझेंना पुन्हा रूजू करून घेतल्यानंतर ते नेमकं काय करत होते? एपीआय दर्जाच्या अधिकार्याला स्वतंत्र पोलीस ठाणं सुद्धा मिळत नाही. मग ते असं कोणतं काम करत होते की सतत रडारवर आणि प्रसिद्धीच्या झोतात होते? सचिन वाझेंच्या कामाचं नेमकं स्वरूप काय होतं हे समोर येणं गरजेचं आहे. सचिन वाझेविषयी सभागृहात जेव्हा प्रश्न उपस्थित केले गेले, आक्षेप घेतले गेले तेव्हा ‘सचिन वाझे म्हणजे लादेन नाही’ असं मुख्यमंत्र्यांनी विनाविलंब तिथल्या तिथं जाहीर केलं. अशी क्लीनचिट इतक्या तातडीनं का देण्यात आली? त्यानंतर चारच दिवसात वाझेंना अटक केली गेली.
अंबानींच्या घरासमोरील जिलेटिननं भरलेली गाडी वाझेंनी उभी केली असावी असा संशय घेतला जात आहे. वाझेंनी हे स्वतः केलं का? त्यामागे सत्ताधार्यांचा किंवा आणखी कुणाचा हात आहे का? असे प्रश्न निर्माण होतात. राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत जे सांगितलं त्यावर विचार झाला पाहिजे. ते म्हणाले, अंबानींचे आणि मुख्यमंत्र्यांचे अतिशय मधुर संबंध आहेत. त्यामुळे वाझेंना त्यांनी तिकडं पाठवलं यात काही तथ्य नाही. शेतकरी आंदोलनामुळे अनेकांचा अंबानी गु्रपवर प्रचंड राग आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, विशेषतः पश्चिमी उत्तर प्रदेशात अंबानींचे आणि रिलायन्सचे जे टॉवर्स होते तेही लोकांनी उखडून टाकलेत. अशा परिस्थितीत स्वतःविषयी सहानुभूती मिळावी आणि या विघातक चर्चेतून बाहेर यावं म्हणून असा काही बनाव केला गेलाय का?
गृहमंत्र्यांनी शंभर कोटींचं ‘टार्गेट’ दिलं, हे परमबीरसिंहांनी सांगितलं. हे त्यांनी कधी सांगितलं तर त्यांना पोलीस आयुक्त पदावरून काढल्यानंतर. शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार तत्पूर्वी परमबीरसिंह, देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाऊन आले. त्यानंतर त्यांनी हे पत्र लिहिलं. ते मुख्यमंत्र्याना पोहोचण्याच्या आधी प्रसारमाध्यमांपर्यंत जाईल याची व्यवस्था केली गेली. या सगळ्याची लिंक पाहता वाझे सर्वप्रथम चर्चेत आले ते अर्णब गोस्वामीला अटक करण्याच्या प्रकरणात. कोण हे सचिन वाझे ज्यांच्याकडे ही कामगिरी दिली गेली? असा प्रश्न लोकांना पडला. सर्व केंद्रीय यंत्रणा अर्णवच्या बचावासाठी पळत असतानाही त्यांची वाझेंनी मुंबईपासून अलिबागपर्यंतची ससेहोलपट सीताफिने केली. अर्णबला अशा पद्धतीनं वागवल्यामुळं वाझेंना टार्गेट केलं जातंय का? की अंबानींच्या बचावासाठी काही वेगळी संहिता तयार केली गेली होती?
जेव्हा जेव्हा बिल्डर लॉबीला दणका दिला जातो तेव्हा तेव्हा बिल्डर लॉबी प्रचंड पैसा सोडते. मग मुख्यमंत्री असोत किंवा गृहमंत्री ते या लॉबीला त्रास देत असतील तर त्यांना दूर सारण्याची धमक त्यांच्याकडे असते हे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे. अनिल देशमुख बिल्डरांना अंगावर घेत होते. त्यामुळे त्यांना दूर करण्यासाठी हा बनाव केला गेला आहे का?
प्रत्येक गावात रोज निदान दहा मोबाईल चोरीला जातात. तो मोबाईल एखाद्या पत्रकाराचा असेल, राजकारण्याचा असेल किंवा न्यायाधीशाचा. तो सहसा परत मिळत नाही. हे चोरीचे मोबाईल महाराष्ट्राबाहेर जाऊन विकणार्यांची मोठी टोळी कार्यरत आहे. त्यातून कोट्यवधी रूपये उभे केले जातात. गेल्या पंचवीस वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाहतूक केली जाते. अवैद्य वाहतूकीतून प्रचंड व्यवहार आणि गैरव्यवहार होतात. एसटी महामंडळ तोट्यात जाण्यात या खाजगी वाहनांचा मोठा वाटा आहे. ही वाहनं नेमकी कुणाची आहेत? या सर्वातून गोळा होणारा पैसा फक्त अधिकारीची खातात की तो राजकारण्यांपर्यंतही पोहोचवला जातो? अनेक ठिकाणी हातभट्टी सुरूच आहेत. मटका अनेक ठिकाणी सुरू आहे. गुटख्यावर बंदी असूनही तो दुप्पट-तिप्पट भावाने मिळतो. रस्त्यावर अनधिकृतपणे बसून व्यवसाय करणार्यांकडून यंत्रणेतले लोक पैसा घेतात. अनेक मोठे हॉटेल, बिअरबार यांच्याकडून पैसे घेतले जातात. विविध नियमांची भीती दाखवून आणि चुकीच्या कामांना सांभाळून घेण्यासाठीही कंपन्यांची लूट केली जाते. बाकी सोडा पण विविध शिक्षण संस्था, रूग्णालये यांनाही या ना त्या कारणाने अधिकार्यांना, सत्ताधार्यांना हप्ते द्यावे लागतातच.
हे व असे पैसे कुणाकुणाकडून घेतले जातात? ते कोण घेतं? त्याची यंत्रणा काय? या पैशांचं वाटप कसं होतं? याबाबतची माहिती सचिन वाझे प्रकरणाच्या निमित्तानं तपास करताना बाहेर यायला हवी. प्रत्येक मुख्यमंत्र्याला नेहमी गृहखातं आपल्याडंच असावं असं का वाटतं? छगन भुजबळ एकदा म्हणाले होते की, इतर कुठल्याही खात्याचा मंत्री म्हणून काम करताना तुम्ही लोकप्रिय व्हाल किंवा तुमच्याबद्दल लोक चांगलं बोलतील पण सगळ्यात चांगला गृहमंत्री कोणता? तर ज्याला लोक कमीतकमी शिव्या देतील!
मुंबईतलं अंडरवर्ल्ड, चित्रपटसृष्टी बेमालूमपणे काम करत आहे. त्यांचे राजकारण्यांशी आणि अधिकार्यांशी लागेबांधे असतातच असतात. मुंबईत गांजा, अफू इतक्या सहजपणे कसं काय उपलब्ध होतं? महाराष्ट्रात सामान्य माणसाला घराबाहेर पडणं शक्य नसताना वाधवान बंधू हे मुंबईतून महाबळेश्वरपर्यंत कुटुंबीयांसह येऊन मौजमजा करतात याची उदाहरणं ताजी आहेत.
महाराष्ट्राचे पोलीस कर्मचारी खूप कमी पगारात मोठं काम करतात. कोरोनाच्या काळात तर जिवावर उदार होऊन त्यांनी सेवा बजावली. त्यांच्या बदल्यांचे रेटही ठरलेले आहेत. सामान्य कर्मचारी असे योगदान देत असताना त्यांचे अधिकारी मात्र लूटीचं नियोजन करत असतात. याबाबत शरद पवारांनीच एक आठवण सांगितली होती. वसंतदादा मुख्यमंत्री असताना एक पोलीस अधिकारी त्यांच्याकडं आला. त्याला एका ठिकाणी बदली हवी होती. पवारांनी दादांना सांगितलं की त्याला एकाच गोष्टीसाठी तिथं बदली हवी होती की तिथं जास्त पैसा खाता येणं शक्य होतं. मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी शिफारस केली होती म्हणून पवार त्यांना जाऊन भेटले आणि वस्तुस्थिती सांगितली. त्यावर दादांनी सांगितलं, जाऊ दे रे, तिथं कोणीही असलं तरी पैसे खातंच तर मग या बिचार्याला चार पोरी आहेत. त्याचा खर्च भागत नाही तर करू दे लहानसहान उद्योग!
दाऊदला फरफटत आणू म्हणणारेही आपल्याकडं होऊन गेले. गृहखात्याचा गैरवापर करून मलिदा लाटण्याचा उद्योग गेली पन्नास वर्षे सुरूच आहे. आर. आर. पाटील यांच्यासारखे काही अपवाद सोडले तर यात नवीन काहीच नाही. अप्रामाणिकपणाचा उद्योग प्रामाणिकपणे करणार्यांच्या स्वच्छतेची आता वेळ आलेली आहे, हे सचिन वाझेंनी दाखवून दिलंय. सचिन वाझेंना टार्गेट दिलं गेलं की नाही हे कळेलच पण अशाप्रकारची टार्गेट प्रत्येक खात्यात दिली जातात हे सत्य आहे. असे पैसे गोळा करणार्यांची आणि ती वाटून घेणार्यांची साखळी आता थांबवली पाहिजे. ‘सद्रक्षणाय आणि खलनिग्रहणाय’ हे ब्रिदवाक्य असणारे पोलीस फक्त टार्गेटपुरते मर्यादित राहिले असतील तर ही शोकांतिका आहे.
पोलिसांनाही अशी टार्गेट दिली जातात हे सत्य सचिन वाझे यांच्यामुळं सामान्य माणसांपर्यंत पोहोचलं आणि यावर चर्चा सुरू झाली. ज्यांना सरकारी कार्यपद्धतीची माहिती आहे त्यांच्यासाठी यात नवीन काहीच नाही. आजवर आपल्याकडे अनेक एन्काऊंटर स्पेशालिस्ट होऊन गेलेत. आता पोलीस दलातल्या भ्रष्टाचाराचा, राजकारण्यांच्या अविवेकाचा, प्रशासकीय अधिकार्यांच्या स्वार्थी वृत्तीचा एन्काऊंटर झाला पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री या नात्यानं किमान असे प्रयत्न जरी केले तरी बाळासाहेब ठाकरे यांच्या कीर्तीत भर पडेल.
- घनश्याम पाटील
7057292092
वारकरी दहशतवाद घातक
महाराष्ट्रात गेली सातशे-आठशे वर्षे सामाजिक समतेचा संदेश वारकर्यांनी पोहोचवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रकार्याला आणि हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीला त्याचा मोठा उपयोग झाला. मात्र सध्या वारकरी संप्रदायातील तो उद्देश शिल्लक राहिला आहे का? हे एकदा तटस्थपणे पडताळून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. या क्षेत्रात घुसलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा याबद्दल कोणी काही बोलले की लगेच त्याला धर्मद्रोही, समाजद्रोही ठरवणे हे पांडुरंगाला तरी पसंत पडेल का?
शरद तांदळे नावाचे एक लेखक आहेत. त्यांनी ‘राक्षसांचा राजा रावण’ ही कादंबरी लिहिली. ते तरूणांना उद्योजकतेविषयी मार्गदर्शन करत असतात. अडीच-तीन वर्षांपूर्वी त्यांनी ‘पैसे कमावण्याचे उद्योग’ या विषयावर एक व्याख्यान दिले. त्यात ते म्हणाले की, ‘‘कीर्तन करणे हाही एक उद्योग झालाय. कीर्तनकाराला टॅक्स भरावा लागत नाही. चार अभंग पाठ केले की त्याचे भागते. हरीपाठासारखा एखादा ‘डायलॉग’ आला की रामकृष्ण हरी म्हणत विषय बंद करता येतो.’’
त्यांची ही क्लिप आत्ता कोणीतरी शोधून काढली आणि अनेक तथाकथित वारकरी त्यांचा आईबहिणीवरून उद्धार करत आहेत. त्यांना मारण्याच्या, कापण्याच्या धमक्या येत आहेत. शरद तांदळे यांच्या या विचारांचे समर्थन करणारा एक व्हिडिओ मी ‘द पोस्टमन’ या यू ट्यूब चॅनलवरून प्रसारित केला तर मलाही असंख्य लोकांनी भंडावून सोडले आहे. ‘‘तुमचा हिंदू धर्माशी काय संबंध? तुम्ही पाकिस्तानात जा,’’ असाही सल्ला त्यांच्याकडून देण्यात येतोय. यातले पाच-पन्नास फोन माझ्याकडे रेकॉर्ड आहेत. त्यातला एखादा अपवाद वगळता कोणीही तात्त्विक चर्चा केली नाही. आजच्या वारकरी संप्रदायात किती कुविचारी लोक घुसले आहेत याचेच हे द्योतक आहे.
आळंदीत जोग महाराजांसारख्या जाणत्यांनी ज्या संस्था चालू केल्या त्यांचा उद्देश सफल झाला का असाच प्रश्न ही सगळी दहशत पाहून पडतो. आज गावागावात बुवा-बाबांचे पेव फुटले आहे. त्यांनी या क्षेत्राची विश्वासार्हता आणि प्रतिष्ठा धुळीला मिळवली आहे. नुकतेच बीड जिल्ह्यातील एका मठपतीने एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणे असो किंवा एका महाराजाने तीन लग्ने करून केलेले पलायन असो याला काय म्हणावे? अनेक मांसाहारी हॉटेलांची उद्घाटने करण्यासाठी काही महाराज सुपार्या घेतात. पुण्यात गेल्याच महिन्यात ‘अंडा सिंग’ या हॉटेलचे उद्धाटन एका कीर्तनकाराच्या हस्ते झाल्याचे समोर आले होते.
गळ्यात माळ घातली आणि हातात टाळ घेतला की आपण वारकरी झालो या समजातून यांनी या क्षेत्राचे वाटोळे केले आहे. अनेकांच्या दहाव्याला-बाराव्याला, वाढदिवसालाही पैसे घेऊन कीर्तनसेवा देणारे आपल्याकडे कमी नाहीत. यू ट्युबवरील अशा भामट्यांची कीर्तने ऐकली ते एकपात्री कार्यक्रमच वाटतात. त्यासाठी हे महाराज लोक लाखो रूपये घेतात. त्यांच्यासोबतचे टाळ, वीणा, मृदंग वाजवणारे सहकलाकारही दणकून बिदागी घेतात. कीर्तनसेवेसाठी धन घेणे किंवा यजमानाच्या घरी अन्नग्रहण करणे याला जगद्गुरू तुकाराम महाराजांनी कठोर शब्दात फटकारले आहे. आजच्या स्पर्धेच्या आणि महागाईच्या काळात अशा महाराज लोकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपजीविकेचा विचार करता तेही स्वीकारता येण्यासारखे आहे. या लोकांच्या दोन-दोन, तीन-तीन वर्षाच्या तारखा कीर्तनासाठी बुक असतात. ते त्यांची कीर्तने ठेवा म्हणून कुणावर जबरदस्ती करत नाहीत. मात्र त्यांच्या कीर्तनातून नेमका कोणता सामाजिक संदेश दिला जातो, सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने ते काय प्रबोधन करतात याचा विचार केल्यास पदरात निराशाच पडते.
समाजप्रबोधनाच्या या अत्यंत प्रभावी माध्यमांचा वापर स्वातंत्र्यलढ्याच्या काळातही अनेक कीर्तनकारांनी केला. राष्ट्रीय कीर्तनकार दत्तोपंत पटवर्धनबुवा यांचं चरित्र आम्ही ‘चपराक प्रकाशन’कडून प्रकाशित केलं. निष्णात वैद्य असलेल्या पटवर्धनबुवांना लोकमान्य टिळकांनी सांगितलं की, ‘‘देशासाठी तुम्हाला काही करायचं असेल तर लोकांचं प्रबोधन करा. त्यांच्या शारीरिक आरोग्याच्या दुरूस्तीसाठी अनेक वैद्य आहेत मात्र त्यांच्या मानसिक आरोग्याच्या सुदृढतेसाठी काम करा.’’ त्यासाठी पटवर्धनबुवांनी कीर्तनाचं माध्यम निवडलं. एकही रूपया न घेता कीर्तनसेवा दिल्यानं त्यांच्या कुटुंबाची जी परवड झाली ती वाचूनही उचंबळून येतं. महाराष्ट्राला अशा निस्पृह कीर्तनकारांची परंपरा असताना ज्यांनी या क्षेत्राचा बाजार मांडलाय ते पाहून माझ्यासारखा कुणीही संवेदनशील माणूस व्याकूळ झाल्याशिवाय राहणार नाही.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या त्याकडे चमत्कार म्हणून न पाहता त्यामागचे नेमके विज्ञान काय होते याबाबतचे ‘विज्ञानमूर्ती ज्ञानोबा तुकोबा’ हे दत्तात्रेय गायकवाडांचे पुस्तकही आम्ही प्रकाशित केले. पटवर्धनबुवांचे ‘आर्यांची दिनचर्या’ हे दुर्मीळ पुस्तक तब्बल साठ वर्षांनी पुन्हा उपलब्ध करून दिले. शरद तांदळे यांनी रावण या विषयावर लिहिले असेल पण आम्ही नरहरी पत्तेवारांचे ‘श्रीराम एक चिंतन’ हे पुस्तक प्रकाशित केले. सध्या संत नामदेव महाराजांच्या 750 व्या जन्मवर्षानिमित्त त्यांच्यावरील काही पुस्तके प्रकाशित करीत आहोत. आध्यात्मिक मार्गावरून चालताना संत साहित्यात असा खारीचा वाटा उचलूनही आजचे तथाकथित वारकरी ‘वारकरी संप्रदायाशी तुमचा काय संबंध?’ असा प्रश्न विचारत असतील तर त्यांच्या अज्ञानाचे आश्चर्य वाटते.
तांदळे यांनी ‘रावण’ विषयावर लिहिले. त्यांनी काय लिहावे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचे साहित्य न वाचणे किंवा त्यांच्या लेखनाचा वैचारिक प्रतिवाद करणे हे तुमच्या हातात आहे. मात्र त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. अभ्यास करावा लागतो. शिवाजी सावंतांनी कर्णाचे केलेले उदात्तीकरण असेल किंवा तांदळेंनी रावणाची केलेली मांडणी असेल हा त्यांच्या लेखनस्वातंत्र्याचा भाग आहे. ते लेखक आहेत, आपले शत्रू नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. तसे न होता सामाजिक झुंडीचे प्रदर्शन करत वारकरी संप्रदायाचा पाया नेस्तनाबूत करणारे असे आततायी अतिरेकी हेच वारकरी संप्रदायाचे खरे शत्रू आहेत.
कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करणार्या काहींनी सामाजिक कामाचा संदेश देत अनुकरणप्रियताही दाखवली. कालच्या माझ्या व्हिडोओबद्दल विशेष अभिनंदन करताना अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य गोविंददेव गिरी यांनी बंडातात्या कराडकर यांच्या समाजकार्याची माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘बंडातात्यांनी राजीव दीक्षित यांच्या नावाने शाळा सुरू केली. जे काम संघ-भाजपवाल्यांना, पतंजलीवाल्यांना करता आले नाही ते तात्यांनी करून दाखवले. महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं संघटन करणार्या बंडातात्यांनी समाजाला योग्य दिशा देण्याचे काम केले आहे.’’
निवृत्ती महाराज इंदोरीकर हेही शेतकर्यांच्या मुलांसाठी एक सुसज्ज शाळा चालवतात. या माध्यमातून असे जे काही प्रयोग होतात त्याचे कौतुकच करायला हवे.
महाबळेश्वरच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आनंद यादव यांची निवड झाली. त्यावेळी त्यांचे ‘संतसूर्य तुकाराम’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यातील लेखनावर वारकर्यांनी आक्षेप घेतला. आनंद यादव यांनी देहूला तुकाराम महाराजांच्या मंदिरात येऊन नतमस्तक होत वारकर्यांची, मराठी माणसाची क्षमायाचना केली. त्या पुस्तकाचे प्रकाशक असलेल्या ‘मेहता प्रकाशन’नेही पुस्तक माघारी घेतले. इतके सारे होऊनही काही वारकर्यांनी टोकाची भूमिका घेतली. यादव लोकशाही मार्गाने संमेलनाध्यक्षपदी निवडून आले होते, मात्र त्यांना संमेलनाला जाता आले नाही. वारकर्यांची ही वाढती दहशत त्यांची असहिष्णुता दाखवून देते.
कोणताही वारकरी कुणालाही अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणार नाही. वैश्विकतेची शिकवण देणार्या या संप्रदायात काही कुप्रथा निर्माण झाल्या असतील तर यातील ज्येष्ठांनी पुढाकार घेत योग्य ती चिकित्सा करायला हवी. धर्म आणि आध्यात्माच्या पायावर आपल्या समाजाची उभारणी झालीय. देव, देश आणि धर्मावर प्रेम करणार्यांना जर शत्रू समजून दूर लोटण्याचा अतिरेकी प्रयत्न झाला तर त्यात समाजाचेच नुकसान आहे. आपल्या कोणत्याही संतांनी, आपल्या परंपरेनं ही शिकवण दिली नाही. आध्यात्माचा मार्ग माणसे जोडण्याचे काम करतो. माणसे दुरावणारे, एकमेकांची मने दुखावणारे अध्यात्म असूच शकत नाही. त्या सगळ्या बोगस आणि अविचारी प्रवृत्ती आपण भागवत संप्रदायाचे कसे पाईक आहोत म्हणून सर्वत्र मिरवत आहेत.
तांदळे यांनी हरीपाठालाही ‘डायलॉग’ म्हटल्याने अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे. ‘डायलॉग’ म्हणजे संवाद. माणसामाणसाला जोडण्याचे कामच कोणताही डायलॉग करतो. संवाद आणि संघर्षाची भूमिका घेताना म्हणूनच आपला विवेक शाबूत ठेवणे गरजेचे आहे. त्यापुढे जाऊन सांगावेसे वाटते की तांदळे यांच्यासारख्या अन्य कुणीही काही चुकीचे विधान केेलेच तर त्यामुळे वारकरी संप्रदायाला धोका पोहचेल, त्याचा पाया नष्ट होईल इतका आपला संप्रदाय दुबळा नाही. आपण सर्वजण जातीपातीच्या, धर्माच्या राजकारणाला सामोरे जात असताना हा कट्टरतावाद घातक आहे एवढंच.
- घनश्याम पाटील
7057292092
Tuesday, March 9, 2021
आवाजाची नव्हे, सभागृहाची ‘उंची’ वाढवा!
महाराष्ट्राच्या विधिमंडळात आजपर्यंत खूप मोठे वक्ते होऊन गेलेत. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शेकापचे एन. डी. पाटील, केशवराव धोंडगे, आचार्य अत्रे, डॉ. बापूसाहेब काळदाते, रामभाऊ म्हाळगी, गोपीनाथ मुंडे, शरद पवार, आर. आर. पाटील, मृणाल गोरे, विलासराव देशमुख, शालिनीताई पाटील, पतंगराव कदम अशा अनेकांनी महाराष्ट्राचं विधिमंडळ गाजवलेलं आहे. शरद पवार यांची स्वतःची विधिमंडळातली भाषणं अतिशय अप्रतिम आणि गाजलेली आहेत.
विधिमंडळाचं समालोचन वाचणं हा अभ्यासाचा विषय असायचा. वृत्तपत्रांतून सविस्तर भाषणं छापून यायची आणि त्यावर गावागावात चर्चाही व्हायची. सध्या मात्र विधिमंडळाच्या सभागृहाचा दर्जा एवढा खालावलाय की लाईव्ह भाषणं सुरू झाली तरी अनेकजण लगेच चॅनल बदलतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं हे मोठं अपयश म्हणावं लागेल.
राज्यासमोरील विविध प्रश्नांचा अभ्यास असेल, पोटतिडिक असेल, त्या प्रश्नांच्या सोडवणुकीविषयी आत्मियता असेल, मांडणार्या प्रश्नांविषयी कळवळा असेल तर संबंधितांचं भाषण आपोआप एका वेगळ्या उंचीला जाऊ शकतं. दुर्दैवानं विविध वक्तृत्व स्पर्धेतून पुढे आलेल्या काहींनी हवी तशी पोपटपंची करून सभागृहाची शान घालवली आहे. शालेय वक्तृत्व स्पर्धेतून पाठ केलेली भाषणं द्यावीत असं त्यांचं बोलणं असतं. आक्रस्ताळेपणा करत विषय भरकटत न्यायचा, पदाचा आणि अधिकारांचा वापर करत त्यावर आपल्या गटात चर्चा घडवून आणायची, यू ट्यूबसारख्या बिनखर्ची माध्यमांचा वापर करत आपापल्या वर्तुळात ते फिरवायचं आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची असा काहीसा प्रकार सध्या रूढ होत आहे. सत्ताधारी आणि विरोधक दोघंही ‘मोले घातले रडाया, नाही आंसू आणि माया, तैसा भक्तिवाद काय, रंगबेगडीचा न्याय’ अशा पद्धतीनं सभागृहात बोलत असतात. त्यामुळं त्यांची भाषणं अतिशय सुमार दर्जाची होताहेत.
विधिमंडळात कागदपत्रं हातात घेऊन चर्चा करायची असते, प्रतिपक्षांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरं द्यायची असतात, शाब्दिक कोट्या करून टाळ्या घेणं यासाठी विधिमंडळाची जागा नाही हे उद्धव ठाकरे यांना मनोहरपंतांसारख्या अनुभवी नेत्यानं समजावून सांगणं गरजेचं आहे. पंत नाराज असले तरी ते उद्धवरावांना इतकं समजावून सांगू शकतील. मुळात ते ‘सर’ असल्यानं इतरांना शिकवण्याचा त्यांचा अनुभव दांडगा आहे. ते तुम्हाला शिकवतील, फक्त तुमची शिकायची तयारी असायला हवी. हे काम अजितदादाही चांगल्या पद्धतीनं करू शकतात. सध्याच्या काळात ते सर्वाधिक आनंदी दिसताहेत. त्यांच्याकडं भरपूर वेळ आहे. विरोधीपक्ष उद्धव ठाकरे यांच्यावर तुटून पडत आहे आणि ठाकरे त्यांच्यावर नको नको ते आरोप करत आहेत, हे पाहत अजितदादा शांतपणे बसून आहेत. अजितदादा सध्या अजिबातच व्यक्त होत नाहीत आणि विरोधीपक्षही त्यांच्यावर काही टीका करत नाही. साडेतीन दिवसाच्या मधुचंद्राच्या आठवणी दोघंही जपताहेत की काय असं एकंदरीत चित्र आहे. त्यामुळं अजितदादांनी किमान मुख्यमंत्र्यांना चार अनुभवाचे बोल सांगायला हवेत. महाराष्ट्राचा इतिहास सर्वांना वारंवार सांगणारे, पश्चिम बंगालमध्ये काय झालं पाहिजे, अयोध्येत काय केलं पाहिजे याबाबत अखिल विश्वाला मार्गदर्शन करणार्या संजय राऊतांनी तरी हे मनावर घ्यायला हवं. त्यांनी विधिमंडळातील यापूर्वीची काही गाजलेली भाषणं मुख्यमंत्र्यांना वाचायला दिली तरी थोडाफार फरक पडू शकतो.
छगनराव भुजबळ यांचीही सुरूवातीची भाषणं अत्यंत आक्रमक आणि अभ्यासू आहेत. तीही त्यांनी स्वतः काढून वाचायला हवीत. नवीन पिढीतल्या आमदारांची भाषणं तर वक्तृत्व कसं नसावं याची मूर्तिमंत उदाहरणं आहेत. त्यांची शैली हा एक भाग आहे आणि लोकांच्या प्रश्नांचं प्रतिबिंब त्यात किती प्रमाणात उमटलंय हा दुसरा भाग आहे. दुसर्या भागात हे सुमार आमदार काठावरही पास होत नाहीत, हे रोहित पवार यांनी सभागृहात वाचलेली कविता पाहता कोणीही मान्य करेल. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यात युक्तिवाद काय केला जाणार असा खुळचट प्रश्न विधानपरिषदेच्या सभागृहात केला गेला. शेवटी लॉ कॉलेजचे प्राचार्य राहिलेल्या विधिज्ञ रामराजे निंबाळकरांना सभागृहात सांगावं लागलं की ‘‘हे असे विषय मांडता येत नाहीत, खाली बसा!’’ सभागृहाचं कामकाज कसं चालतं याचं प्राथमिक ज्ञानही नसलेले आपले सध्याचे लोकप्रतिनिधी आहेत. हे पाहता विधिमंडळ हे महाराष्ट्रातल्या बारा कोटी जनतेच्या प्रश्नांचं आणि आशा-आकांक्षांचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे की नाही असा प्रश्न पडतो. यांना मुद्देसूद भाषणं करायची असतात की अभ्यासाचा दिखाऊ शो करायचा असतो हेच कळत नाही. हा कसला व्हरायटी शो आहे का? त्यासाठी भाषणाचे स्टंट केले जातात? लोकांच्या प्रश्नांशी यांना काही देणंघेणं आहे की नाही? अनेक आमदार सभागृहात आपलं तोंड बंद करून समाजमाध्यमातून कायम टिवटिव करत राहतात. ट्विटरवर व्यक्त होण्यापेक्षा तुमच्या बुद्धिचा पसारा काय आहे हे विधिमंडळात दिसू द्या ना! त्यासाठीच तुमच्या मतदारांनी तुम्हाला या सभागृहात पाठवलंय.
या सगळ्यात मला वाईट ते फडणवीसांचं. त्यांनी जी टीम तयार केलीय ती अत्यंत होपलेस आहे. त्यांच्यासोबतच्या बोलघेवड्यांमुळं फडणवीस विनोदाचा विषय ठरताहेत. राधाकृष्ण विखे-पाटील, राणाजगजितसिंह पाटील असे काँग्रेस-राष्ट्रवादीतून जे भाजपात आले त्यांची तर तोंडं बंदच आहेत. त्यांना काहीच बोलू द्यायचं नाही असं भाजपचं धोरण दिसतंय. ‘त्यांनी पक्षांतर करून भाजपमध्ये आल्यावर आता त्यांना काय वाटतं?’ या विषयावर चर्चा ठेवली तरी ती रंजक होईल.
सरकारनं अवर्षणग्रस्त शेतकर्यांना भरीव मदत केली नाही. महाराष्ट्रातल्या शेतकर्यांना जो वीज पुरवठा करताय तो किमान दिवसा करा. महानगरातल्या फ्लेक्सवर, फलकांवर जी वीज वाया जाते तिथं बचत करता आली तर बघा. शेतकर्यांना पुरेशी आणि वेळेत वीज मिळावी यावर एकही आमदार बोलत नाही. एकमेकांवर टीका करणं, प्रसिद्धीच्या झोतात राहणं हेच अनेक आमदारांचं ध्येय दिसतं. ‘आम्ही पाच रूपयात शिवभोजन थाळी देतोय, थाळी वाजवायची का थाळी घ्यायची...’ हे सभागृहातलं भाषण होऊ शकतं का? विरोधीपक्षनेत्यांनी जे प्रश्न त्यांच्या भाषणातून उपस्थित केलेत त्यांना उत्तरं द्या. राजकीय सभेत काहीही बोललं तरी चालतं. तिथं टाळ्या वाजवायला, रेकॉर्डिंग करायला, ते भाषण व्हायरल करायलाही तुमचीच माणसं असतात. प्रत्येक चॅनलमध्ये तुमचा एखादा अर्णव गोस्वामी तुमची बाजू घ्यायला असतोच असतो. मग सभागृहाचे संकेत कोण पाळणार? तुमच्या भाषणानं तुमचं स्वतःचं तरी समाधान होतं का?
संजय राठोडच्या राजीनाम्यानंतर त्याचं पुढं काय करणार? सुशांतसिंह प्रकरणाचं पुढं काय झालं? गॅस-पेट्रोलचे दर वाढल्यानं सामान्य माणूस मेटाकुटीला आलाय. त्यावर काय करता येईल? केंद्रातले रोजगार कमी झालेत, त्यावर चर्चा करा. राज्यातले रोजगार किती वाढलेत ते सांगा. पोलीस भरती कधी करताय ते कळू द्या. स्पर्धा परीक्षातल्या भ्रष्टाचारावर बोला. सध्याच्या सत्ताधार्यांनी वेगळं काय केलंय? हे सांगायला हवं. फडणवीसांनी भ्रष्टाचार केलाय असं म्हणणं असेल तर त्यांच्यावर कारवाई करायला हवी. या सगळ्या विषयांवर विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडूनही काही चमक दाखवायला हवी. भंडार्यात जी मुलं होरपळून गेली त्याचं पुढे काय झालं हा विषय अंबानीपेक्षा नक्कीच महत्त्वाचा आहे. फुले, शाहू, आंबेडकरांचा आधुनिक महाराष्ट्र म्हणताना असे विषय फक्त श्रद्धांजली वाहून संपवू नका. ‘सामान्यांच्या प्रश्नांकडं दुर्लक्ष करणारे निर्लज्ज राजकारणी’ अशी तुमची ओळख कृपा करून होऊ देऊ नका. तुमच्याविषयीच्या जिव्हाळ्यातून नाही तर सभागृहाच्या पावित्र्याची जपणूक म्हणून ही अपेक्षा व्यक्त करतोय.
विधिमंडळ हे जर लोकशाहीचं मंदिर असेल तर इथं चांगले वक्ते येणं, त्यांनी अभ्यासपूर्ण प्रश्न उपस्थित करणं अपेक्षित आहे. या विधिमंडळात आजवर अनेक चांगली, वाङ्मयीन, गुणात्मक भाषणं केली गेलीत. लोकांचे प्रश्न जसे रस्त्यावर मांडले जातात तसे सभागृहात मांडले गेलेत. ज्या ताकतीनं शरद पवार बाहेर बोलायचे तसंच ते विधिमंडळात बोलायचे. चंद्रशेखर यांचा जो घणाघात संसदेच्या बाहेर असायचा तसाच तो सभागृहात दिसायचा. अटलजींचं जे विलक्षण काव्यात्मक वक्तृत्व त्यांच्या मतदारसंघात असायचं तसंच ते संसदेत बोलायचे. प्रमोद महाजन हे सभेत बोलताना लोक जसे मंत्रमुग्ध व्हायचे तशीच त्यांची तोफ सभागृहात धडधडत असायची. असं आपल्या आमदारांचं वक्तृत्व आहे का? ते सामान्य माणसांचे प्रश्न सभागृहात मांडत आहेत का? दोन-तीन टर्म आमदार असलेले काहीजण सभागृहात तोंडही उघडत नाहीत. त्यांची यादीही जाहीर करायला हवी. त्यांचे मतदार त्यांचं काय करायचं ते ठरवतील.
काही हितसंबंधी गटांचं संरक्षण करणं यापेक्षा सध्या कोणी काही विचार मांडताना दिसत नाही. लाचार आणि निष्ठावंतांच्या टोळ्या दिसतात पण स्वाभिमानी नेते सध्या दिसत नाहीत. लोकांच्या प्रश्नांना दिशा देणं, नवे कायदे करणं हे तुम्हाला जमत नसेल तर सभागृहाचा दर्जा आणखी खालावण्याऐवजी अशी अधिवेशनं बंद करा आणि काही नाचगाण्याचे, तमाशाचे कार्यक्रम करा. त्यामुळं तरी महाराष्ट्रातल्या जनतेचं निखळ मनोरंजन होईल आणि तुमच्याकडूनच्या अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येणार नाही.
- घनश्याम पाटील
7057292092