- घनश्याम पाटील
संपादक आणि प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांनी सातत्याने ज्या भूमिका बदलल्या त्या पाहता या पक्षाच्या भवितव्याची काळजी वाटतेय. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सर्वात मोठा ‘नटसम्राट’ म्हणून राज ठाकरे यांना पुरस्कार द्यायला हवा असे कुणाला वाटल्यास त्यातही आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. ‘सगळ्या जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मला घडवायचाय’ असे बेंबीच्या देठापासून ओरडत सांगणारे राज ठाकरे ‘जगाला हेवा वाटेल अशा कोलांटउड्या’ मारत आहेत.
‘नाणार, नाही म्हणजे, नाही म्हणजे, नाही म्हणजे, नाही!’ हे त्यांनी केवढ्या आवेशात सांगितले होते! त्यानंतर नाणारची मंडळी त्यांना भेटली आणि लगेच त्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला. टोलनाक्यावरून त्यांनी जे आंदोलन हाती घेतले त्यावेळीही त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. समर्थ रामदास स्वामी म्हणायचे, ‘जयाचे जिवाशी वाटते भय, त्याने क्षात्रधर्म करू नये.’ लालूप्रसाद यादव तुरूंगात जाऊन बसले. देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘टाका मला जेलमध्ये. बघेन मी काय करायचं ते.’ शरद पवार तर ‘काय करताय ते बघू’ म्हणत न बोलावता स्वतःच इडीच्या ऑफिसमध्ये जाऊन धडकले. राज ठाकरे मात्र इडीला घाबरले असे चित्र आहे.
उत्कृष्ट वक्तृत्व असणं एवढंच नेतृत्वाला पुरेसं नाही. ज्याला स्वतःला कशाचीही भीती वाटते तो नेतृत्व करू शकत नाही. छगन भुजबळ तीन वर्षे तुरूंगात राहिले, बाहेर पडले आणि पुन्हा सत्तेत सहभागी झाले. वाय राजशेखर रेड्डीचा मुलगा आंध्रचा मुख्यमंत्री झाला. त्यांच्याविरूद्धही केसेसचा पाऊस पडला होता. राजकारण काहीही असू द्या पण एकेकाळी तडीपार केलेले अमित शहा देशाचे गृहमंत्री झाले. जर तुम्ही मराठी पोरांना लढायला सांगताय, ‘केसेस पडल्या तर पडू द्या, मी आहे तुमच्या पाठिशी’ असा धीर देताय तर एका इडीच्या केसला काय घाबरता? ‘लाव रे तो व्हिडीओ’पासून ‘राहू दे तो व्हिडिओ’पर्यंत केवढ्या भूमिका बदलल्या तुम्ही?
प्रारंभी मराठी माणसाच्या कल्याणाची भूमिका घेणार्या राज ठाकरे यांनी अचानकच मराठी माणसाला वार्यावर सोडले असे दिसतेय. राजकारणातल्या घराणेशाहीवर सतत बोलत असणार्या या नेत्याने आता त्यांच्या मुलाला यात सक्रिय केले आहे. कथनी आणि करणीत एवढे अंतर का बरे? ‘बोले तैसा चाले’ या उक्तीचा आणि राज ठाकरे यांचा काही संबंध आहे का? त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वावर फिदा होऊन, मराठी माणसांसाठी काहीतरी करायचेय अशी इच्छा उराशी बाळगून असलेले अनेक तरूण दिशाहीन झालेत. त्यांना दिशा देणे, मार्गदर्शन करणे हे कर्तव्य असताना आज अशा तरूणांची ओळख ‘खंडणीखोर’ अशी होतेय.
पंधरा वर्षात मराठी भाषेसाठी काय केले? याचे उत्तर आता राज ठाकरे यांनी द्यायला हवे. किमान त्या बेळगावच्या सीमा प्रश्नात तरी मनसेचे अस्तित्व दाखवून द्यायला हवे होते. प्रत्येक निवडणुकीत तुमची भूमिका वेगळी! दहा वर्षांपूर्वी गुजरातचा दौरा करून आल्यावर भूमिका घेतली की, ‘नरेंद्र मोदी चांगले नेतृत्व आहे, तुम्ही मला मत द्या म्हणजे मी माझ्या खासदारांचा त्यांना पाठिंबा देतो.’ लोकांना मध्यस्थ नकोच होता. त्यामुळे लोकांनी थेट भाजपला मतदान केले. या सगळ्यात ‘गुजरातच्या विकासापासून ते गुजरातच्या विनाशापर्यंत’ बोलण्याइतकी तुमची भूमिका बदलली. काळ बदलला की माणूस बदलतो, दिवस बदलतो. रोजच्या रोज अनेक संदर्भही बदलतात. हे सगळे खरे आहे पण तुमच्यात होणारे हे जे बदल आहेत ते राजकारणाला पसंत नाहीत, सामान्य माणसाला पसंत नाहीत, समाजाला पसंत नाहीत, इतकेच काय, जीवशास्त्रालाही असे इतके बदल पसंत नाहीत. आत्तापर्यंत ज्या ज्या सरड्याच्या प्रजाती सापडल्या त्याही इतक्या वेगात रंग बदलू शकत नाहीत. इतक्या झपाट्याने भूमिका बदलण्यामुळे नेमके काय साध्य होतेय राजसाहेब?
तुम्हाला सामान्य मराठी माणूस हवाय तो पक्ष वाढवायला. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा हवीय तीही पक्ष विस्तारायला. शिवसेनेने निदान महाराजांचे नाव घेत पक्ष तरी वाढवला. महाराजांची राजमुद्रा वापरायची तर महाराजांच्या विचारांसाठी, त्यांच्या विचारांच्या प्रचारासाठी काही कराल की नाही? कोणत्याही विशिष्ट विचारांच्या वळचणीला न बांधले जाता निदान जो कोणी शिवभक्त आहे त्या प्रत्येकाला प्रेमाने मिठी मारायचे तरी धाडस दाखवा. कॉमे्रड डांगेंनी मांडलेले शिवचरित्र असेल, पानसरेंचे शिवचरित्र असेल, बाबासाहेब पुरंदरेंच्या कादंबर्या असतील किंवा श्रीमंत कोकाटेंची मांडणी असेल! ‘जो कोणी शिवचरित्रापासून प्रेरणा घेईल आणि आपल्या सामर्थ्याने सामाजिक हिताचे काम करेल तो माझा भाऊ’ असे तुम्ही म्हणायला हवे. अर्थात, त्यांची चुकीची मांडणी तुम्ही दुरूस्त करू शकाल पण प्रत्येक शिवप्रेमीच्या पाठिशी तुम्ही उभे असायलाच हवे. पक्षाच्या झेंड्यात तुम्ही राजमुद्रा वापरलीय म्हणून हे तुमच्याकडून अपेक्षित आहे. हीच राजमुद्रा इतर कोणत्या पक्षाने वापरली असती तर काय प्रतिक्रिया उमटल्या असत्या हे आम्ही तुम्हाला सांगायला हवे? ‘राज ठाकरे’ या नावामुळे आणि त्याच्या भूमिकेमुळे तुम्हाला राजमुद्रा वापरायला विरोध झाला नाही याचे भान तुम्ही ठेवायला हवे. शिवाजी महाराजांची राजमुद्रा जर तुम्हाला वापरायची असेल तर जेव्हापासून तुम्ही ही राजमुद्रा वापरायला सुरूवात केली त्या दिवसापासून महाराष्ट्रात जिथे जिथे स्त्रियांवर अन्याय, अत्याचार झाले तिथे तिथे तुम्ही संघटना म्हणून त्यांच्या पाठिशी उभे राहणे अपेक्षित होते.
या देशात अत्यंत स्वार्थी आणि हलकट जर कोणी असतील तर आपल्याकडील कला आणि क्रीडा क्षेत्रातील लोक आहेत. अत्यंत नीच आणि स्वार्थी माणसे या क्षेत्रात कार्यरत आहेत. जे कोणी भारतरत्न आहेत ते त्यांच्या सोयीनुसार भूमिका घेतात आणि तुम्ही त्यांच्या बाजूने बाह्या सरसावून उभे राहता? कोणत्या शेतकर्याला हे पसंत पडेल? तुम्ही पक्ष चालवताय की सुरक्षा एजन्सी हे तरी एकदा जाहीर करा. अमुकला संरक्षण, तमुकला संरक्षण असं करण्यापेक्षा सरळ सिक्युरेटी एजन्सी चालवा ना!
प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांच्या स्वतःच्या काही वैचारिक भूमिका होत्या. मतदारसंघातील जातीचे प्राबल्य न पाहता बाळासाहेबांनी अनेकांना उमेदवार्या दिल्या आणि केवळ हिंदू म्हणून त्यांना निवडून आणायला लावले. मित्रपक्षाने चार महत्त्चाच्या जागा घेतल्या तर ‘त्यालाच निवडून द्या, त्याला पाडायला तो काय पाकिस्तानी आहे का? आपल्या पक्षाचा नसला म्हणून काय झाले? तो हिंदू आहे इतके पुरेसे नाही का?’ असे खडसावण्याचे त्यांचे धाडस होते. जी गोष्ट मोदी आणि योगींना जमली नाही तो चमत्कार बाळासाहेबांनी करून दाखवला होता. तुमच्याकडे तोही करिष्मा दिसत नाही. आपले मतदारसंघ तयार करावे लागतात, तिथल्या कार्यकर्त्यांना बळ द्यावे लागते याचा तुम्हाला विसर पडतोय का? एक साधा पंचायत समितीचा सदस्य सोडून चालला तर अजित पवार त्याला भेटून अडचणी समजून घेतात. गरज पडलीच तर स्वतः शरद पवार त्याला विचारतात, ‘तुझी अडचण काय?’ आणि तुम्ही म्हणताय, ‘राम कदम गेला आणि पक्ष शुद्ध झाला...’, ‘प्रवीण दरेकर गेला’ आणि पक्षाची स्वच्छता झाली? अरे होतेच कोण तुमच्याकडे? आहे ते सगळे सोडून जाताहेत आणि तुम्ही पक्ष शुद्ध करत बसलाय? एवढ्या एकाच बाबतीत तुमची आणि राहुलबाबाची बरोबरी होऊ शकते. जाणार्यांना थांबवायचं नाही, अडवायचं नाही हा प्रकार अतिशय घातक असतो. तुमच्या पक्षाचे झेंडे किती तर दोन! आणि आमदार किती? तर एक! खासदार नाही. लोकसभेला उमेदवारच नाहीत. मग ‘सगळा महाराष्ट्र माझा मतदारसंघ आहे’ असे का म्हणता? ‘मला महाराष्ट्राची बारामती करायचीय’ असे म्हणताना तुम्ही नेमके काय करता हे स्पष्ट व्हायला हवे.
लोकांना फक्त विकासाची ब्ल्यू प्रिंट देऊन चालत नाही. ती स्वप्ने सत्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. तुमचे नेते आणि कार्यकर्तेही ही ब्ल्यू प्रिंट सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडले हे सत्य तुम्ही लक्षात का घेत नाही? कार्यकर्त्यांसाठी मेहनत घेणे, त्यांना उभे करणे, त्यांना ताकद देणे, त्यांना सगळ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार करणे हे सगळे फक्त उत्तम भाषणे करून साधणार नाही. भाषणे देऊन पक्ष उभे राहत असते तर आज अमोल मिटकरी मोदींना टक्कर देणारा नेता झाला असता. बानुगडे पाटील यांनी शहाची जागा घेतली असती. गोपीचंद पडळकर केंद्रीय नेतृत्वात दिसले असते.
राज ठाकरे यांच्याकडे नेतृत्वाचे अनेक गुण असल्याचे वाटल्याने या राज्याने त्यांना अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. मराठी माणसाने त्यांच्यावर निर्व्याज आणि आत्यंतिक प्रेम केले. मात्र पंधरा वर्षात पक्षसंघटना, विचार या सगळ्याची माती झालीय. तुमची बांधिलकी नेमकी कुणाशी हे तरी एकदा स्पष्ट करा. खडसेसारखा नेता इडीला घाबरत नाही. राऊत यांच्यासारखे बोरूबहाद्दर इडीला घाबरत नाहीत. ममता बॅनर्जी सगळ्यांच्या अंगावर चालून जातात आणि हा मराठी गडी इडीला घाबरला? हा काही क्षात्रधर्म नाही हो! ‘जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे’ अशी डरकाळी फोडणारे बाळासाहेब आठवा. प्रबोधनकारांच्या ज्वलंत भूमिका पुन्हा एकदा समजून घ्या. राजर्षी शाहू महाराजांचा आदर्श आणि त्यांचा विचार प्रबोधकारांनी पुढे नेला. बाळासाहेब आणि प्रबोधकारांच्या विचारात साम्य नसले तरी एक गोष्ट महत्त्वाची होती ती म्हणजे दोघेही ‘रोखठोक’ होते. त्यांच्याकडे विचारांसाठी लागणारी किंमत मोजण्याची निर्भयता होती. तुम्ही कोणत्या बाबतीत त्यांच्या जवळपास फिरकता हे तरी एकदा कळू द्या.
प्रत्येक विषयावरची तुमची मते एकदा विस्ताराने लोकांपर्यंत यायला हवीत. आरक्षणाबाबत तुमचे मत काय? मराठा आरक्षणाला तुमचा पाठिंबा आहे की विरोध? दीपाली चव्हाण नावाच्या एका तरूण अधिकारी असलेल्या महिलेला आत्महत्या करावी लागली तरी तुम्ही गप्पच? अॅट्रोसिटी कायद्याबद्दल कधी तरी मत मांडाल की नाही? पत्रकार परिषदा घेणे म्हणजे पक्ष चालवणे नाही. पक्ष चालवणे ही एक वेगळी प्रक्रिया आहे हे तुम्हाला तुमचे कोणतेही सल्लागार सांगत नाहीत का? मध्यंतरी एकदा पवार साहेबांनी तुम्हाला सांगितले होते की ‘पक्ष चालवायचा असेल तर सकाळी लवकर उठावे लागते आणि रात्री कार्यकर्ते भेटायला आल्यावर त्यांना ओळखता येईल इतक्या शुद्धित असावे लागते.’ पवार साहेबांना तुम्ही म्हणालात, ‘मी शिकतो.’ ती ‘शिकवण’ तुमच्या आचरणात दिसून का येत नाही?
तुमची नेमकी भूमिका कोणती? तुम्ही पवार साहेबांची मुलाखत घेतली. त्या आधी श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत घेतली. पवारांच्या मुलाखतीची स्क्रिप्ट बारामतीहून आली होती असाही आरोप झाला. तुम्ही मुलाखतकार आहात का? आमच्या सुधीर गाडगीळांसोबत तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर मग राजकीय नेतृत्वाची अपेक्षा सोडून द्या आणि इथेच पूर्णवेळ करिअर करा. ज्या त्वेषाने, ज्या तळमळीने, वैयक्तिक माझ्यावर अन्याय झाला म्हणून ज्या जिद्दीने तुम्ही शिवसेना सोडून बाहेर पडलात ते पाहता तुमचा प्रवास नेमका कुठून सुरू झाला आणि आता तुम्ही नेमके कुठे आहात? हे पडताळून बघितले पाहिजे. तुमचे विधानसभेत आमदार नाहीत, लोकसभेत खासदार नाहीत. एकदा म्हणता महाराष्ट्राच्या विकासासाठी मला सत्ता द्या, एकदा म्हणता मला विरोधी पक्ष कसा चालवायचा हे दाखवायचेय... नाशिकमध्ये तुम्ही खरेच खूप विकासाची कामे केली. तरीही त्याठिकाणी सत्ता का गेली याचे कधीतरी आत्मचिंतन करा. तुकाराम मुंडे यांच्यासारखा एखादा हेकट, मनमानी करणारा अधिकारी असला तरी लोक त्याच्या पाठिशी उभे राहतात. सगळं प्रशासन, सत्ताधारी, विरोधक त्यांच्या विराधात असले तरी लोक त्यांना पाठिंबा देतात. त्यांनी घरपट्टी वाढवली, कर्मचार्यांचे निलंबन केले तरीही ते त्या त्या ठिकाणहून बदलून गेले त्या त्या वेळी नागरिकांनी त्यांना अडवले. त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव केला. सामान्य माणूस जर चांगल्या अधिकार्याच्या मागे उभे राहण्यासाठी उत्स्फूर्तपणे येत असेल तर तुमची कामे इतकी प्रामाणिक आणि पारदर्शी असूनही लोक का दूर ढकलताहेत? ‘एवढे सगळे करूनही नाशिकच्या लोकांनी आम्हाला नाकारले’ अशी खंत जेव्हा तुम्ही व्यक्त करता तेव्हा ते सामान्य माणसावरचे दोषारोप असते. लोकांना असे नालायक समजणे, गद्दार समजणे बरे नाही!
नाना पटोलेंनी परवा संजय राऊतांना ‘तुम्ही यूपीएचे घटक नाही त्यामुळे तुम्ही यावर बोलू नका’ म्हणून झापडले. ‘तुम्ही प्रवक्ते शिवसेनेचे आहात की राष्ट्रवादीचे? आणि पवारसाहेब राष्ट्रवादीचे आहेत की शिवसेनेचे? हे एकदा कळू द्या’ असेही त्यांनी सांगितले. तशीच तुमची अवस्था झालीय. फडणवीसांनी ‘लाव रे तो व्हिडीओ’चे स्क्रीप्ट बारामतीहून आलेय, असे सांगितले होते. आता वाझे प्रकरणात त्याच फडणवीसांची बाजू तुम्ही घेता तेव्हा हे स्क्रिप्ट नागपूरच्या रेशीमबागेतून आले असे म्हणायचे का? बॅन्डवाले जसे जिकडे सुपारी मिळेल तिकडे वाजवायला जातात तसे तुमचे झालेय का? निदान स्वतःशी तरी प्रामाणिक रहा. मनसेचे ‘बॅन्डपथक’ होऊ देऊ नका. जो सर्वोत्तम बॅन्ड वाजवतो तो त्यांचा प्रमुख होऊन त्याला सगळीकडून सुपार्या येतात. कुणाचेही लग्न असले तरी बॅन्डवाला हजरच! बॅन्ड चांगला वाजतो म्हणून लोकही ऐकतात. यापेक्षा तुमचे खूप मोठे स्टेटस आहे याचा तुम्हाला विसर पडतोय का?
नाणार प्रकल्पात तुम्ही तुमची भूमिका बदलली असेल तर ती का बदलली हे राज्यातल्या लोकांसमोर आले पाहिजे. नाणारला तुमचा विरोध का होता आणि आता पाठिंबा का दिला हे जाहीरपणे सांगा. तुम्ही महाराष्ट्रातले सगळे टोलनाके बंद करणार होता. ते तर बंद झालेच नाहीत पण तुमचे आंदोलन का बंद झाले ते सांगा. महाराष्ट्रातल्या गावागावातल्या दुकानावरचे फलक मराठी भाषेत करणार होतात, बँकांचे कामकाज मराठीत करणार होतात त्याचे पुढे काय झाले ते सांगा. हे प्रश्न विचारले की तुम्ही म्हणता, ‘‘हे मलाच का विचारता? मी एकट्याने ठेका घेतलाय का? मक्ता घेतलाय का? बाकीच्यांनाही विचारा की!’’ हा मुद्दा जर तुम्ही मांडला असेल, त्यासाठी लढण्याची तयारी तुम्ही दाखवली असेल, आमच्यासारख्या अनेक तरूणांनी त्यासाठी तुम्हाला पाठिंबा दिला असेल तर तुमची ही भाषा बरोबर नाही. त्यामुळे तुम्हालाच या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. फक्त दुसर्यांची टिंगल करून, त्यांना नावे ठेवून एखादी संघटना किंवा पक्ष उभा राहू शकत नाही हे तुमच्यामुळे सगळ्या जगाला कळले.
महाराष्ट्राच्या इतिहासात जॉनी लिव्हरनंतर सर्वाधिक विनोदी कलाकार म्हणून तुमची नोंद व्हावी की उत्तम नेतृत्वगुण असलेला समाजाभिमुख नेता म्हणून दखल घेतली जावी हे आता तुमचे तुम्ही ठरवायचे आहे. ‘ईव्हीएममुळे नरेंद्र मोदी निवडून आले’ हे तुम्ही ठामपणे मांडलेत. त्यासाठी ममता बॅनर्जींनाही जाऊन भेटलात आणि त्यांनाही याबाबतची काळजी घ्यायचा सल्ला दिला. तुम्हाला असे वाटत होते तर तुम्ही या मुद्याच्या शेवटपर्यंत का गेला नाहीत? त्यासाठी तुम्हाला कोणी फासावर लटकवणार होते का? गरज पडलीच तर चार महिने, सहा महिने जा ना तुरूंगात! काही फरक पडत नाही त्यामुळे. चुकीच्या प्रकरणात सूडबुद्धिने तुम्हाला त्रास दिला गेला असता तर बाहेर आल्यावर तरी हिरो झाला असता. तुम्ही घाबरलात. ‘मोडेन पण वाकणार नाही’ हा गुण ज्याच्यात नाही त्याला मराठी नेता म्हणवून घ्यायचा काय अधिकार आहे? मराठी माणूस उभा राहिला, कोलमडून पडला पण त्याने कधी पळपुटेपणा केला नाही हे मागच्या बाराशे-चौदाशे वर्षात अनेकदा दिसून आलेय. छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, माधवराव पेशवे या सर्वांनी हेच तर दाखवून दिलेय.
माधवराव पेशव्यांच्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग आहे. माधवरावांनी त्यांच्या मामाला, मल्हारराव रास्तेंना दंड केला. पुण्यात निजामाने घरे लुटली आणि जाळली तेव्हा त्यांना घरे दाखवण्यात मल्हारराव होते यावरून त्यांना दंड केला होता. त्यावेळी माधवरावांच्या आईंनी सांगितले की ‘‘माझ्या भावाला दंड भरायला लावायचा नाही.’’
त्यावर माधवराव म्हणाले की ‘‘ठीक आहे, मामाला जमत नसेल तर त्यांचा दंड मी भरतो.’’
आई म्हणाल्या, ‘‘तुही दंड भरायचा नाही. माझ्या माहेरच्या परिस्थितीला काही भीक लागली नाही. ते दंड भरू शकतात पण शिक्षा म्हणून तो दंड माफ कर.’’
माधवरावांनी सांगितले की ,‘‘काहीही झाले तरी दंड माफ होणार नाही.’’
त्यावर आईने सांगितले, ‘‘तसे असेल तर मी पुण्यात राहणार नाही. मी पुणे सोडून निघून जाईल.’’
त्यावर माधवरावांनी सांगितले, ‘‘तुझी इच्छा. तुला कुठे जायचे, कुठे रहायचे!’’
त्यांनी स्वतःच्या निर्णयात बदल केला नाही. अशा न्यायनिष्ठुर आणि कर्तव्यकठोर, ‘मोडेन पण वाकणार नाही’ अशा मराठी माणसाचा हा महाराष्ट्र आहे. माधवराव हे फक्त एक उदाहरण आहे. बहलोलखानच्या हजारोच्या फौजेवर चालून गेलेले कुडतोजी गुजर आणि त्यांचे सहा मावळे ज्यांच्याविषयी तात्यासाहेबांनी ‘वेडात दौडले वीर मराठी सात’ असे लिहून ठेवलेय त्यांना आठवा. मुघलांच्या खजिन्यावर एकाचवेळी दोन वाघांनी हल्ला केला होता. एक खुद्द छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे प्रतापराव तथा कुडतोजी गुजर. ‘म्यानातुन उसळे तलवारीची पात’ अशी स्वाभिमानी माणसे प्रत्येक पिढ्यात मराठी मुलखात जन्माला आलीत. कराडच्या साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाण असताना अणीबाणीच्या विरूद्ध बोलणार्या आणि यशवंतराव चव्हाणांना ‘तुमचे राजकीय जोडे संमेलनाच्या बाहेरच काढून या’ असे ठणकावणार्या दुर्गाबाई भागवतांचा हा महाराष्ट्र आहे.
असे सगळे असताना तुम्ही प्रत्येक ठिकाणी मोडताय, वाकताय, शब्द फिरवताय. मग तुमचा पक्ष काय क्रांती करणार? तुमच्या पक्षात येणे म्हणजे स्वतःची फरफट करून घेणे नाही का? तुमचा आजवरचा प्रवास पाहता सुरूवातीच्या काळातला जोश कुठे गेला? तुमच्या भूमिकांवर, विचारांवर आम्ही प्रेम केले पण आता तो विचार कुठेच दिसत नाही. इंग्रजीत एक म्हण आहे, तुम्ही काही लोकांना काही काळ मूर्ख बनवू शकता. काही लोकांना सर्वकाळ मूर्ख बनवू शकता. सर्व लोकांना काही काळ मूर्ख बनवू शकता पण सर्व लोकांना सर्वकाळ मूर्ख बनवू शकत नाही! आता तुम्ही आणि तुमचा पक्ष या चौथ्या स्टेजला आहात. या पक्षाचे आकर्षण राहिलेले नाही किंवा या पक्षाला महाराष्ट्रात 248 जागा मिळण्याची शक्यता राहिलेली नाही. नेतृत्वाबद्दल प्रेम राहिलेले नाही आणि तुमची दिशा कोणती असेल हेही कुणाला सांगता येणार नाही.
तुमचे सल्लागार कोण आहेत? याबाबत तुम्हाला कोणी काही सांगत नाही का? पक्षाचे वार्षिक अधिवेशन नाही, निवडणुकीत उमेदवार नाहीत. विचारधारा नाही, भूमिका नाही. फक्त पत्रकार परिषदा घेऊन तुम्ही पक्ष चालवताय. बाळासाहेब ठाकरे यांनी दसर्याला मेळावा सुरू केला म्हणून तुम्ही पाडव्याला मेळावा सुरू केला. त्यांनी ते मेळावे सगल घेऊन दाखवले. अशी ‘सलगता’ हे तर तुमचे वैशिष्ट्यच नाही. दरवेळी यू टर्न (यूटी म्हणजे उद्धव ठाकरे नव्हे) हेच तुमचे वैशिष्ट्य. ‘सगळ्या जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट’ तुम्ही करताय की काय असे वाटावे अशी परिस्थिती आहे.
राजसाहेब, अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्र अजूनही एका संक्रमणावस्थेत आहे. मागच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते, ‘महाराष्ट्राचा शरद पवारांचा वेढा संपुष्ठात येतोय.’ त्यांनी तसे विधान केले असले तरी त्यात सत्य नाही हे एव्हाना सिद्ध झालेय. पुढची पाच-सात वर्षे ती शक्यताही दिसत नाही. मात्र शरद पवारांचा वेढा जेव्हा संपुष्टात येईल तेव्हा महाराष्ट्राचे एकहाती नेतृत्व करण्याची क्षमता आम्हाला फक्त तुमच्यात दिसतेय. त्यासाठी तुम्ही दिवसरात्र लोकांत मिसळायला हवे. त्यांचे सुखदुःख समजून घ्यायला हवे. घराबाहेर न पडणे, दुसर्यांच्या नकला करणे म्हणजे पक्ष चालवणे नाही. तुमच्या पक्षाचा एखादा नेता बाहेर पडत असेल तर किमान त्याचा अभ्यास करा. कसा जातोय, का जातोय, कुठे जातोय, काय करतोय, आधी काय केलेय इतके तरी बघा. तुमचे वेगळेपण तुमच्या कामातून दिसू द्या. महत्त्वाच्या बैठकींना जाताना, पत्रकार परिषदा घेताना मास्क न लावता जाणे हे वेगळेपण असू शकत नाही. ते वेडेपण आहे. नरेंद्र मोदींवर, भाजपवर टीका करायची आणि म्हणायचे, नितीन गडकरी चांगला माणूस आहे... हे कसले वेगळेपण? स्वतःची जर इतकी द्विधा अवस्था असेल तर कोण कशाला थांबेल तुमच्याबरोबर? कोण तुम्हाला पाठिंबा देणार? कोण तुमच्या मागे उभे राहणार?
तुम्ही आता एक विचार, एक झेंडा, एक भूमिका, एक नेतृत्व ठेवले आणि पक्ष चालवला तर अजूनही लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, बाबासाहेब पुरंदरे हे आमच्यासाठीही वंदनीयच आहेत पण ते म्हणजेच महाराष्ट्र नाही. इथल्या शेतकर्यांपर्यंत, श्रमिकांपर्यंत पक्षाचे काम जाऊ द्या. साहित्यिक आघाडी बळकट करा. उद्या तुम्ही कंगना रानौत आणि अर्णब गोस्वामीच्या संरक्षणासाठीही उभे राहिलात तर आश्चर्य वाटणार नाही इतकी घसरण होऊ देऊ नका. गेल्या पाच-सात वर्षात बेळगावात कन्नड राज्यकर्त्यांचा अत्याचार कमालीचा वाढतोय. तुम्ही मराठीचा मुद्दा घेतला असेल तर त्याविरूद्ध सर्वप्रथम आवाज तुम्ही उठवायला हवा होता. कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात 2019 ला प्रचंड पाऊस पडला. आलमट्टीच्या बॅक वॉटरमुळे भयावह पूरपरिस्थितीला सामोरे जावे लागले. त्यावेळी सगळे नेते या भागाच्या पाहणीसाठी आले होते. फक्त तुम्ही नव्हता. काय करत होता तेव्हा मुंबईत? अशावेळीही काय काम असते तुम्हाला? तुम्ही इकडे वहिनींना पाठवलंत. ही कुठली पद्धत? मोदींनी किमान अमित शहांना पाठवले. ते हेलिकॉप्टरने का असेना पण येऊन गेले. पवारसाहेब भरपूर फिरले. गिरीश महाजनसारख्या लोकांनी येऊन किमान नौकेत बसून सेल्फी काढले. त्यावेळी या सगळ्यांनी या लोकांना काय दिले? पवारसाहेब तर तेव्हा सत्तेतही नव्हते! पण नेत्यांचा आश्वासक हात पाठिवर पडला, त्यांच्याकडून सांत्वन झाले तर समाज उभा राहतो. लोकांना किमान तुम्ही असा धीर द्या, आधार द्या. भलेही मदत काय करायची हे तुम्ही ठरवा पण लोकांच्या दुःखात त्यांच्याबरोबर उभे तरी रहा. तुमच्याकडे चांगले सल्लागार नसले तरी अशा गोष्टी तुम्ही पवारसाहेबांकडे पाहून शिकू शकता. दरवेळी त्यांनी तुम्हाला सल्ले द्यावेत ही अपेक्षाही बाळगू नका.
पक्षाचा सामान्य कार्यकर्ता तुमच्यासमोर हे सगळे मोकळेपणे बोलू शकत नाही. कोकणातले नगरसेवक, नगराध्यक्ष तुम्हाला भेटायला आले तर तुम्ही कुत्र्यासोबत खेळत बसता? त्याच्याशी खेळत ‘‘काऽऽय रे! काय काम आहे? कशाऽऽला आलाय?’’ असे तुम्ही विचारता? ही तुमची भाषा? त्यापेक्षा तो राहुलबाबा परवडला. तो अशा लोकांना भेटतच नाही. मला वेळ नाही, असेच सांगतो आणि कुत्र्याबरोबर खेळत बसतो.
तुमचं राजकारण म्हणजे बाळासाहेबांची नक्कल आहे. नक्कल करायला अक्कल लागते हे जरी खरे असले तरी आता तुमच्याकडचे अस्सल बाहेर येऊ द्या. तुम्ही खरे हिरो असताना कितीकाळ स्टंटमॅन म्हणून काम करणार? तुमचे आजोबा, काका, वडील हे सगळे रिअल हिरो होते. तुम्ही तसेच हिरो म्हणून पुढे या.
या सगळ्यात तुमची एकच गोष्ट मला चांगली वाटली. तुम्ही दहावी आणि बारावीच्या परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरवसोहळ्याला कधी जात नाही. ‘मला दहावी-बारावीला खूप कमी मार्क होते म्हणून मी अशा सोहळ्यांना जात नाही’ असे तुम्ही प्रांजळपणे सांगितले. असा प्रामाणिकपणा सगळीकडे ठेवा. तसेच जगा. आमचे अमितभैय्या देशमुख लातूर जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीत एकेका दिवशी पंधरा-पंधरा, वीस-वीस सभा घेतात आणि तुमची रोज फक्त एकच सभा? सत्तर वर्षांचे मोदी रोज स्वतःच्या अनेक सभा लावतात. तुम्ही जर महाराष्ट्रात सभा करत होतात आणि उत्तर प्रदेश, बिहार, गुजरातमधून तुम्हाला ‘लाव रे तो व्हिडिओ’च्या सभेसाठी निमंत्रणे असतील तर तुम्ही का गेला नाहीत? राजकारणात संकटाला संधी माणून काम करावे लागते. संधी आल्यावर असे पळणारे नेते कसे होऊ शकतात?
निवडणुका लढवताना भूमिका निश्चित असायला हव्यात. सत्तेची महत्त्वाकांक्षा ठेवायला हवी. समाजकारण तर करावेच लागते पण राजकीय पक्षांचे ध्येय निवडणुका लढणे, त्या जिंकणे, सत्ता मिळवणे, त्याचे लाभ पदरात पाडून घेणे, आपली विचारधारा राबवणे आणि जनतेच्या हिताची कामे करणे हे असावे लागते. त्यासाठी स्वतःची विचारधारा निश्चित करावी लागेल. तुम्ही फक्त ‘सेटलमेंट’मध्येच कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही असा संदेश जाणे कितपत योग्य आहे?
सध्या तुमच्या पक्षाला उतरती कळा लागलीय. रेल्वे इंजिन रूळावरून घसरलेय. ही वेळ आहे ते इंजिन परत रूळावर आणायची. ही वेळ आहे रेल्वे इंजिनला दिशा देण्याची. ही वेळ आहे एका चांगल्या पद्धतीने प्रवास करण्याची. ही वेळ जर तुम्ही चुकवली तर तुम्हाला काळ माफ करणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात एक चांगला, यशस्वी राजकारणी म्हणून किंवा अयशस्वी, फसलेला राजकारणी म्हणून तुमची ओळख व्हावी. जॉनी लिव्हरची कॉमेडी ब्रेक करणारा, इतरांच्या नकला करणारा मिमिक्री कलाकार म्हणून महाराष्ट्राने तुमची नोंद घ्यावी असे आम्हास वाटत नाही. त्यासाठी सिंहावलोकन करावे लागेल, आत्मपरीक्षण करावे लागेल.
अजूनही तुमच्या अवतीभोवती काही चांगली माणसे आहेत. पुण्यासारखं शहर हलवणारा आणि सर्वांवर अंकुश ठेवणारा वसंत मोरे यांच्यासारखा सच्चा कार्यकर्ता अजूनही तुमच्यासोबत दिसतोय. ‘मनसेची वाघिण’ अशी ओळख असलेल्या अॅड. रूपालीताई ठोंबरे पाटील तुमच्या पक्षात आहेत. मराठी भाषेच्या विकासासाठी धडपडणारे गणेशअप्पा सातपुते अजूनही तुमच्यासोबत आहेत. सगळ्यात जास्त समर्पण देणारी माणसे तुमच्यासोबत आली पण तुम्हाला त्यांचा उपयोग करून घेता आला नाही. महाराजांची राजमुद्रा वापरायची असेल तर त्यांच्यासारखे वागण्याचा थोडाफार प्रयत्न तरी करावा लागतो. हे सगळे तुम्हाला सांगण्याचा हेतू म्हणजे आमचे तुमच्यावर खरेखुरे प्रेम आहे. एक चांगला नेता, एक चांगला मराठी माणूस, महाराष्ट्रातला, या नव्या पिढीतला, वक्तृत्वाचे इश्वरी वरदान लाभलेला नेता म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतोय. भाटगिरी करणारे अनेकजण तुमच्या अवतीभोवती असतील, आहेत पण तटस्थपणे हे सगळे तुमच्यासमोर मांडण्याची गरज होती म्हणून अंतःकरणापासून लिहितोय.
एका घरातली दोन माणसे मारली जाऊनही राहुलबाबा सगळीकडे बिनधास्त फिरतोय. जर राहुल गांधी असे धैर्य बाळगतोय तर प्रबोधनकार ठाकरेंच्या नातवाकडून आम्ही काही भल्याच्या अपेक्षा का बाळगायच्या नाहीत? जननिंदेला, जनटिकेला जराही न घाबरता आणि स्वतःच्या विचारांपासून जराही विचलित न होता लेखन करणारे ते प्रबोधनकार, त्यांचे विचार आजही प्रक्षोभक वाटतात. त्या काळात तर त्यांनी केवढी खळबळ माजवली होती! अशा प्रबोधनकरांचा वारसा सांगणार्या तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. महाराष्ट्राला सध्या एक चांगली विचारधारा असणारा राजकीय पक्ष हवाय. काँग्रेस आणि भाजपची परस्सरविरोधी विचारधारा कायम असतानाही एका नव्या विचारधारेची सध्या फार मोठी गरज आहे. ती पोकळी तुम्ही भरून काढाल म्हणून हा शब्दप्रपंच! गोपाळकृष्ण गोखल्यांची काँग्रेस, प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी स्थापन केलेल्या संघाच्या मदतीवर उभा राहिलेला भाजप, ‘संधीसाधू पक्ष’ अशी ओळख असलेला राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष यात एक चांगला पर्यायी पक्ष हवाय. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची विचारधारा पूर्णपणे संपवलीय. राष्ट्रवादीवाले सत्ता घेऊन सेटलमेंट करतात. तुम्ही तर सत्ता न घेताही सेटेलमेंट करता असा आरोप तुमच्यावर सातत्याने होतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतका बदनाम होऊनही किमान शेतकरी प्रश्नावर बोलतो, महिला अत्याचारावर बोलतो. सामान्य माणूस हे सगळे उघड्या डोळ्यांनी बघत असतो. तुम्ही अनेक कलाकारांना, खेळाडूंना मार्गदर्शन करत असता. आता एकदा स्वतःचे मूल्यमापन स्वतःच करा. या सिंहावलोकनातून काही चांगले साध्य झाले तर आम्हाला आनंदच वाटेल.
- घनश्याम पाटील
संपादक आणि प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092