काळाप्पान्ना तोरगल्ली! कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज या गावचे एक निवृत्त कर्मचारी. त्यांना वृत्तपत्रे आणि मासिके वाचण्याचा छंद. त्यातून ते विधायक कार्य करणार्या लोकांची यादी तयार करत. आपल्या दैनंदिनीत त्यांची नावे आणि कामाचे स्वरूप यांचा तपशील लिहायचा त्यांचा नित्यक्रम. पुढे त्यांना अर्धांगवायू झाला. मग त्यांनी ठरवले, आजवर ज्यांच्या कामाची दखल दैनंदिनीत घेतलीय त्यांना आपली संपत्ती दान करायची. झाले! त्यांनी घरात हा निर्णय सांगितला. पत्नी विजयाबाई आणि घरातील इतर सदस्यांनी कसलीही खळखळ न करता तो मोठ्या मनाने मान्य केला. मग काय? ही जबाबदारी आली सूनबाईंवर. त्यांनी त्याचे नियोजन करावे.
उत्तूरचे निवृत्त प्राध्यापक, लेखक आणि उत्तम समाजभान असलेले प्रा. श्रीकांत नाईक हे या सूनबाईंचे शिक्षक. त्यामुळे त्यांनी नाईक सरांकडे धाव घेतली. आपल्या सासर्यांना काही संपत्ती विविध सेवाभावी संस्थांना दान करायची असल्याचे त्यांनी सांगितले. नाईक सरांनी हे काम करावे अशी त्यांची अपेक्षा. त्यांची तळमळ बघून नाईक सर काळाप्पाना भेटायला गेले. त्यांना वाटले दहा-वीस हजार ते एखाद्या संस्थेला देणार असतील!
काळाप्पांनी त्यांची दैनंदिनी दाखवली. अर्धांगवायूमुळे त्यांचे लेखन थांबले होते. मात्र ते वृत्तपत्रे आणि मासिके कुणाकडून तरी वाचून घेत आणि विधायक कामे करणार्यांच्या नोंदी ठेवत. त्यांनी नाईकांना आपली डायरी दाखवली आणि काही व्यक्ती व संस्थांना मदत करायचे असल्याचे सांगितले. ही मदत नाईकांनी संबंधितांपर्यंत पोहोचवावी अशी गळ घातली. नाईकांनी कागद बघितला. त्यावर काही नावे आणि रकमा लिहिल्या होत्या. आनंदवन पन्नास हजार, सिंधुताई सपकाळ पन्नास हजार, विकास आणि प्रकाश आमटे प्रत्येकी पन्नास हजार, नगरजवळील राजेंद्र धामणे पंचवीस हजार, हेल्पर्स ऑफ हॅन्डीक्राफ्ट या कोल्हापूरातील संस्थेला पन्नास हजार.... अर्धांगवायूमुळे शरपंजरी पडलेल्या या माणसाचा हा निग्रह आणि समाजाप्रती असलेली सामाजिक बांधिलकीची जाणीव पाहून नाईक थक्क झाले.
त्यांनी विचार केला, या सगळ्यांना ही मदत नेऊन देण्याऐवजी जर आपल्याला या मान्यवरांना काळाप्पांची भेट घालून देता आली तर...? ते कामाला लागले. या सर्वांना ही परिस्थिती सांगितली. आमटे बंधू आले. सिंधूताई आल्या. ‘मंदिर-मस्जिदींच्या दगडविटांच्या कामाला मदत करण्याऐवजी या लोकांच्या कामात देव दिसल्याने त्यांना हातभार लावायचाय...’ असे काळाप्पाना नाईकांना सांगत. या ‘देवां’ची समक्ष भेट त्यांना घडली. आपण ज्यांना फुल ना फुलाची पाखळी देणार आहोत त्यांना आपल्या घरी आलेले बघून काळाप्पाना भारावले.
पुढे काळाप्पांना देवाघरी गेले. मागे पत्नी श्रीमती विजयाताई तोरगल्ली आहेत. काळाप्पांनी शेवटच्या क्षणी शब्द घेतला, या दैनंदिनीत ज्यांची ज्यांची नावे आहेत त्यांना जमेल तशी मदत करा. तुम्हाला आणखी कुणी सकारात्मक काम करणारे दिसले तर त्यांनाही मदत करा... विजयाताईंनी त्यांना वचन दिले. आजही त्या वचनाची पूर्ती करत आहेत. काळाप्पानांच्या निधनानंतरही त्यांनी त्यातील अनेकांना मदत केली. प्रा. श्रीकांत नाईक त्यांना याकामी मदत करतात. बटकडल्ली आडनावाच्या एका विद्यार्थ्याला दिल्लीहून एका मोठ्या कंपनीत मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. सोबत लॅपटॉप असणे बंधनकारक होते. त्याच्या वडिलांची अचानक नोकरी गेलेली. परिस्थिती बेताचीच. केवळ लॅपटॉपअभावी त्याची ही संधी जाणार हे कळताच विजयाताईंनी नुकतेच त्याला बोलवून घेऊन तीस हजार रूपये दिले. तो दिल्लीला गेला आणि त्याच्या आयुष्याचेही सोने झाले. आता त्यांना अभय बंग यांना पन्नास हजार रूपये द्यायचे आहेत; मात्र बंग तालुक्यातील एका संस्थेच्या पूर्वीच्या काही गैरसमजामुळे गडहिंग्लजला यायचे टाळत असल्याचे कळते. डॉ. बंगांवर प्रेम करण्याचा अधिकार आम्हाला नाही का? एखाद्या संस्थेमुळे ते आम्हाला का अव्हेरतात? असा सवाल प्रा. नाईक करतात. या माध्यमातून कै. काळाप्पांनाचा दृष्टिकोन आणि त्यांच्या पवित्र भावना त्यांच्यापर्यंत जाव्यात अशी त्यांची इच्छा आहे.
या काळाप्पांनाकडून प्रेरणा घेतल्यानंतर प्रा. नाईकही जिद्दीला पेटले. मुळातच त्यांचा धडपड्या स्वभाव. वंचित, उपेक्षित यांच्या मदतीसाठी ते सदैव तत्पर. त्यात हा पर्वतासमान माणूस जवळून बघितलेला. प्रा. श्रीकांत नाईक, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, लेखक सदानंद पुंडपाळ, टी. के. पाटील, शैलेंद्र आमणगी, देशभूषण देशमाने, उद्योजक बाळासाहेब हजारे, बँकेतील निवृत्त कर्मचारी पी. एस. कांबळे या मंडळींनी समाजसेवेचा धडाका लावलाय. ‘कमी तिथे आम्ही’ आणि ‘उपेक्षित ते अपेक्षित’ हे त्यांचे सूत्र. गडहिंग्लज, आजरा आणि चंदगड तालुक्यात या मंडळींनी विधायक कामाचा आदर्श ठेवलाय. त्याचा कसलाही गाजावाजा ते करत नाहीत. या ‘समाजभान अभियाना’त त्यांना त्यांचे अनेक विद्यार्थी मदत करतात. हा ‘गडहिंग्लज पॅटर्न’ राज्यभर राबवला गेला पाहिजे. सरकारी मदतीवर अवलंबून न राहता जर असे काही प्रयत्न केले गेले तर राष्ट्राचा चेहरामोहरा बदलेल.
काय आहे हा पॅटर्न? या मंडळींनी असे कोणते प्रयत्न केले?
काही उदाहरणे पाहूया!
चांगल्या कामाला मदत करायची वृत्ती असावी लागते. ती असेल तर मोठ्यात मोठे काम उभे राहू शकते अशी यांची श्रद्धा! त्यामुळे कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे निर्माते एकनाथजी रानडे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी एक योजना राबवली. प्रत्येकाने ‘दाता’ व्हावे, त्याच्यात समाजभान निर्माण व्हावे म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, तुम्ही प्रत्येकी एक रूपया सामाजिक कार्याला द्यायचा. त्यापेक्षा जास्त रक्कम कुणाकडूनही स्वीकारली जाणार नाही. हा रूपया का द्यायचा हे मुलांनी त्यांच्या पालकांना घरी सांगायचे. गलेलठ्ठ पगार घेणार्या शिक्षकांनीही प्रत्येकी फक्त एक रूपया द्यायचा. भविष्यात या एक रूपयाला स्मरूण जिथे जिथे काही विधायक काम सुरू आहे आणि आपण सहज मदत करू शकतो तिथे मदत करायची, असा संकल्प प्रत्येकाने करायचा. एकेक रूपया गोळा करणे सुरू केले आणि बघता बघता तब्बल एकेचाळीस हजार रूपये जमले. ते मग त्यांनी ‘आनंदवन’ला पाठवले.
दुसरा उपक्रम रद्दीचा! ‘रद्दीतून बुद्धिकडे’ हे सूत्र. त्यांनी आवाहन केले की, तुमच्याकडील रद्दी टाकून देऊ नका. त्यातून तुम्हाला फार काही मिळत नाही. ती आमच्याकडे द्या. रद्दी विकून जे काही पैसे येतील त्यातून आम्ही विधायक कार्य करू! गरजूंना मदत करू! या आवाहनातून तब्बल पस्तीस हजार रूपयांची रद्दी जमली. ते पैसे त्यांनी हेमलकसा येथील आश्रमशाळेला पाठवले.
श्रीकांत नाईकांनी त्यांच्या मित्रांना आवाहन केले. शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री यांनी दर सोमवारी भात खाणे सोडण्याचे आवाहन देशबांधवांना केले होते. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. आपण दिवसभरातील अर्धा कप चहा सोडूया! अर्धा कप चहाला किमान पाच रूपये लागतात. म्हणजे वर्षभरात 1825 रूपयांची बचत. यातून ‘समाजभान’ ठेऊन प्रत्येकाने ते पैसे त्याला हवे त्याप्रमाणे विधायक कार्यासाठी खर्च करायचे. ते कुणाला द्यायचे? किती द्यायचे हे ज्याने त्याने ठरवावे; पण वर्षात एकदा बैठकीत त्याने त्याचा तपशील सांगावा. साधारण दोन हजार रूपये प्रत्येकी ‘समाजधन’ मिळू लागले. यातून त्यांचे ‘समाजभान’ दिसू लागले.
गडहिंग्लजचे साधारण वीस व्यापारी आहेत. या मंडळींनी त्यांची भेट घेतली. त्यांना सांगितले, तुम्ही महिन्याला फक्त शंभर रूपये समाजासाठी द्या. अन्य कोणत्याही धार्मिक उत्सवाची वर्गणी दिली नाही तरी चालेल; पण महिना फक्त शंभर रूपये समाजधन द्या! या सामाजिक ऋणातून उतराई व्हा! व्यापारी बांधवांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिला. या परिसरातील निवृत्त कर्मचार्यांचे या मंडळींनी संघटन केले. प्रत्येकाला सांगितले, आता तुम्ही नोकरीत नाही. तरीही सरकारच्या कृपेमुळे तुम्हाला निवृत्ती वेतन मिळते. त्याचा विनियोग विकासकामासाठी करा. प्रत्येकाने वर्षाला फक्त पाचशे रूपये द्या. त्यातून आपण काही सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ. गरजूंना मदत करू. कलाकारांना व्यासपीठ देऊ. जे आजारी आहेत आणि ज्यांची क्षमता नाही त्यांना वैद्यकीय मदत, वैद्यकीय उपकरणे देऊ. ही योजनाही फळाला आली. ‘रसिका तुझ्याचसाठी’सारखा बहारदार कार्यक्रम त्यातून सुरू झाला. निवृत्तांना आनंद मिळेल असे कार्यक्रम यातून सुरू झाले. कुणी सभासदाने एखाद्याची गरज सांगितली तर सगळे मिळून त्याला मदत करू लागले.
प्रा. श्रीकांत नाईक यांनी आणखी एक फार मोठे कार्य केले. मुळात ते शिक्षक. त्यामुळे वाचनाची त्यांना न आवरण्याइतकी हौस. यातून त्यांना तालुक्यात काही ग्रंथालये असावित असे वाटू लागले. मग त्यांनी त्यांच्या हितचिंतक आणि विद्यार्थी मित्रांना त्यासाठी तयार केले. छोट्या गावात ग्रंथालय सुरू करायला किमान तीनशे पुस्तके लागतात. नाईक सरांनी या सगळ्यांना पदरमोड करून प्रत्येकी दोनशे पुस्तके दिली. पन्नास वर्षात त्यांनी जी दुर्मीळ पुस्तके जतन करून ठेवली होती तो ठेवाही त्यांनी या ग्रंथालयांकडे सुपूर्त केला. रविंद्र पिंग्यांनी नाईकांना सांगितले होते, ‘वाचून झालेल्या पुस्तकांची रद्दी घरात नको. जी पुस्तके पडून राहणार आहेत ती इतरांना वाचायला द्यावीत...’ हा मंत्र ध्यानात घेऊन नाईक सरांनी थोडी थोडकी नव्हे तर चार लाख रूपयांची पुस्तके दान केली. त्यातून ही ग्रंथालये उभी राहिली. त्यांच्याकडे आज हजारो पुस्तके झालीत. सरकारचे अनुदान मिळतेय. या परिसरात ही ज्ञानकेंद्रे अनेकांची वाचनाची भूक भागवतात. श्रीकांत नाईक हे त्यांचे प्रेरणास्थान आहेत.
आजरा तालुक्यातील चिमणे हे एक छोेटेसे गाव. तेथील परेशराम कांबळे हा नाईक सरांचा विद्यार्थी. तो खाऊन-पिऊन सुखी आहे. नाईकांनी त्याला सांगितले, ‘काम प्रामाणिक केले की लोक आठवण ठेवतात. तू ग्रंथालय सुरू कर. सगळी संदर्भ पुस्तके उपलब्ध करून दे. ललित, वैचारिक पुस्तके ठेव. दर्जेदार पुस्तकांसाठी आणि कोणत्याही संदर्भासाठी या परिसरातील विद्वानांनी तुझ्याकडे आले पाहिजे.’
कांबळेंनी सल्ला ऐकला. त्याने गुरूऋण दाखवत आग्रहाने नाईक सरांनाच या ग्रंथालयाचा अध्यक्ष केले. नाईक सरांनी चेन्नईतील राजाराम मोहनरॉय ग्रंथालयाकडे पाठपुरावा करून या ग्रंथालयाच्या इमारतीसाठी साडेचार लाख रूपये मिळवले. आज चिमणे गावात ‘सकाळ सार्वजनिक वाचनालया’ची स्वतःची इमारत उभी आहे. या ग्रंथालयाला नाईक सरांनी एक लाख रूपयांची पुस्तके दिली.
आजरा तालुक्यातील मलिगरे हे असेच एक छोटेसे गाव. लोकवस्ती साधारण हजाराची. या गावात रमेश इंगवले हा सरांचा विद्यार्थी राहतो. त्याचा सिमेंटचा छोटासा व्यवसाय आहे. गावात शेती आहे. त्याच्या घरात लग्न, बारसे, वाढदिवस असा कोणताही कार्यक्रम असेल तर तो किमान पाचशे पुस्तके इतरांना भेट देतो. या दर्जेदार पुस्तकांवर वाचक तुटून पडतात. नाईक सरांनी कोल्हापूरच्या ‘अभिनंदन प्रकाशन’च्या मदतीन या तीन तालुक्यात साने गुरूजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाच्या किमान एक लाख प्रती वाटल्या आहेत. उत्तुरला ते दरवर्षी ‘संत ज्ञानेश्वर लोकशिक्षण व्याख्यानमाले’चे आयोजन करतात. साधारण दीडएक हजार लोक त्याचा लाभ घेतात. इतके उत्तम वक्ते आणि त्यांना दाद देणारे दर्दी ‘कानसेन’ हे चित्र उत्तुरमध्ये दिसते.
आज आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठीही सरकारवर अवलंबून राहतो. महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती, ग्रामपंचायती यांना दुषणे देतो. मात्र या देशाचे ‘सजग नागरिक’ म्हणून आपली काही कर्तव्ये आहेत की नाही? इतक्या छोट्या छोट्या कृतीतूनही मोठे काम उभे राहू शकते हे गडहिंग्लजच्या मंडळींनी दाखवून दिले आहे. त्यांचा हा आदर्श इतर तालुक्यांनी घ्यायला हवा. त्यातूनच आपल्या राष्ट्राची संपन्नतेकडे वाटचाल सुरू राहणार आहे. प्रा. श्रीकांत नाईक, ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे, सदानंद पुंडपाळ, टी. के. पाटील, शैलेंद्र आमणगी, देशभूषण देशमाने, बाळासाहेब हजारे, पी. एस. कांबळे आणि त्यांना सहकार्य करणार्या सर्वांनाच मनःपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांचा हा ‘समाजभान’ पॅटर्न राज्यभर, देशभर राबवला जावा अशी अपेक्षा व्यक्त करतो.
- घनश्याम पाटील
संपादक, 'चपराक', पुणे
७०५७२९२०९२