Thursday, April 28, 2016

महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले!

सेनापती बापट, आचार्य अत्रे अशा धुरिणांच्या प्रयत्नाने 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 106 हुतात्म्यांनी त्यासाठी बलिदान दिले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि ‘लोककल्याणकारी’ राज्याचं स्वप्नं जनतेनं बघितलं. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी ठरली. महाराष्ट्राने अनेक स्थित्यंतरे पचवली. मराठी माणूस काळासोबत बदलत गेला. आधुनिक तंत्रज्ञान आले. नवनवीन शोध लागल्याने लोकांचे जगणे समृद्ध झाले. मात्र आजवर महाराष्ट्राला मोठमोठे नेते लाभूनही महाराष्ट्र एका अराजकतेतून जातोय. महाराष्ट्र दिन साजरा करत असताना आज राज्याची काय परिस्थिती आहे हे पाहणे गरजेचे आहे.
बहुतांश काळ सत्तेत कॉंग्रेसच होती. शरद पवार हेच मागच्या पन्नास वर्षात महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढत आहेत.  लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर तितक्याच ताकतीच्या असलेल्या पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. देशभर त्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. अटलबिहारी वाजपेयी असोत अथवा नरेंद्र मोदी! पवारांच्या सल्ल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाहीत, हे महाराष्ट्राने अनेकवेळा पाहिले आहे, अनुभवले आहे. वाजपेयी-मोदी यांनी तशी जाहीर कबुलीही दिली आहे. मात्र या ‘जाणत्या राजा’ची दूरदृष्टी विकासात परावर्तीत झालेली दिसत नाही. त्यांच्या चेल्यांची मात्र ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ समोर येत आहेत.
सध्या महाराष्ट्राची परिस्थिती फारच दयनीय आहे. लोकांना रोजगार नाही. पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने जनावरे मरत आहेत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. हे सारे अराजक गेली अनेक वर्षे सुरू आहे. शरद पवार जेव्हा केंद्रीय कृषीमंत्री होते तेव्हा त्यांनी सभागृहात सांगितले की, ‘आपल्याकडील शेतकरी प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या करतात...’ यापेक्षा देशाचे आणि आपल्या राज्याचे आणखी मोठे दुर्दैव ते कोणते असणार? पुढे मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपवाले सत्तेत आले आणि तेही हाच कित्ता गिरवत आहेत. आजचे केंद्रीय मंत्रीही शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची ही आणि अशीच कारणे सांगत आहेत.
‘इंग्रज गेले आणि कॉंग्रेसवाले आले’ अशी परिस्थिती देशात दीर्घकाळ होती. ‘सबका साथ, सबका विकास’ अशी गाजरं मोदींनी दाखवली. त्यामुळे देशात परिवर्तन घडले. मोदी यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्याचा, देशहितदक्ष पंतप्रधान देशाला मिळाला. आपल्या राज्यातही परिवर्तन घडले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तुलनेने नवखा नेता आपल्याला मुख्यमंत्री म्हणून मिळाला. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र भाजपला प्रभावी नेतृत्व नव्हते. मात्र फडणवीस यांनी प्रयत्नपूर्वक ती जागा भरून काढली. मुंडे यांच्यासारखा जनाधार त्यांना अजूनतरी मिळाला नाही, हे वास्तव असले तरी सत्तेत असल्याने त्यांच्याकडून अनेकांच्या अनेक अपेक्षा आहेत.
एकनाथराव खडसे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, पंकजा पालवे असे त्यांचे सहकारी त्यांना समर्थ साथ देत आहेत. मात्र महाराष्ट्रात सध्या नको तेच विषय चर्चेला येतात आणि गाजतातही. पाण्याअभावी जनजीवन धोक्यात आले आहे आणि सध्या कोणते विषय चर्चेत आहेत? तर मंदिर प्रवेश आणि पंकजा मुंडे यांचा ‘सेल्फी!’
या सेल्फी वरून अनेक ‘सेल्फिश’ लोकांचे चेहरे उघड होत आहेत. पाण्याचा एकेक थेंब दुर्मीळ झालेला असताना पुण्या-मुंबईत क्रिकेटचे सामने होतात. त्यात कोट्यवधींचा चुराडा होेतो. लाखो लीटर पाणी त्यासाठी वाया जाते. मिरजकरांनी मोठ्या मनाने लातूरला पाणी दिल्याने ‘जलराणी’ लातूरला पोहोचली. मात्र तिथेही ‘श्रेयवादा’चा विषय चर्चेत आला. इतक्याशा पाण्याने काय होणार? असाही प्रश्‍न उपस्थित केला जातोय. रेल्वेने पाणी मागवणे लातूरकरांसाठी भूषणावह आहे का? आपण लातूरमध्येच पाणी नियोजनासाठी काय करणार आहोत? असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
मराठवाड्यात पाण्याची कमतरता असतानाही मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन घेतले गेले. साखर कारखाने, दारूचे कारखाने यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले गेले. अजूनही ते पाणी सुरूच आहे. एकेका घोटासाठी लोक तडफडत असताना ‘उद्योगांना पाणी मिळालेच पाहिजे’ अशी भूमिका सत्ताधारी आणि विरोधक एकदिलाने घेत आहेत. कारण याच मंडळींची कारखानदारी या पाण्यावर अवलंबून आहे. हे राजकारण न समजण्याएवढा मराठवाडी बांधव दुधखुळा नाही; मात्र ‘आलीया भोगासी असावे सादर’ म्हणत तो दिवस कंठत आहे.
माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे याच्यासारखे एखादे पिल्लू सोडून मराठवाडा, विदर्भ वेगळा करण्याची मागणी काही बांडगुळं करतात. कन्हैय्यावरून अकारण वातावरण तापवले जाते. तरूणांची माथी भडकवली जातात. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात  एका पाठोपाठ एक घोटाळे उघड व्हायचे. त्यावर जोरदार रणकंदन व्हायचे; मात्र विरोधकांकडे सध्या असे मुद्देच नाहीत. त्यांच्या दुर्दैवाने सत्ताधारी अजूनतरी कोणत्याही मोठ्या घोटाळ्यात अडकली नाहीत. त्यामुळे ‘असहिष्णुता’, ‘राष्ट्रवाद’, ‘मंदिर प्रवेश’, ‘सेल्फी’ असली काहीतरी खुसपट काढली जातात.
मराठवाड्याचा दुष्काळवाडा होतोय. मराठवाड्याचे राजस्थानसारखे वाळवंट होईल, असे अनेक अहवाल सांगत आहेत. त्याचवेळी ‘जलयुक्त शिवार’ सारखी प्रभावी योजना अंमलात येत असताना त्या विभागाच्या मंत्र्याने एखादा ‘सेल्फी’ काढला तर बिघडले कुठे? आपण करत असलेल्या कामाची होत असलेली पूर्तता पाहणे हा समाधानाचाच विषय असतो. मात्र ‘धरणात पाणीच नाही तर मी आता त्यात मुतू का?’ असा बिनडोक सवाल करणारे नेते आणि त्यांचे बगलबच्चे पंकजा मुंडे-पालवे यांना ‘सेल्फी’वरून जाब विचारत आहेत. या सगळ्या चोराच्या उलट्या बोंेबा आहेत.
यांच्या अकार्यक्षमतेचा मोठा फटका महाराष्ट्राला बसलाय. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची नेतेमंडळी हे चित्र बदलण्यासाठी काही प्रयत्न करत आहेत. राज ठाकरे यांच्यासारखा नेता मराठवाडा पिंजून काढतोय. शेतकर्‍यांची दुःखे समजून घेतोय! आणि दुसरीकडे हताश, हतबल झालेले, नैराश्य आलेले कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवाले नको ते वाद निर्माण करत आहेत.
महाराष्ट्राचे चित्रच त्यामुळे गंभीर दिसतेय. मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव हाणून पाडला पाहिजे. त्याचवेळी त्यांच्या चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना सहकार्यही केले पाहिजे. शिवसेनेसारखा मराठमोळा पक्ष शेतकरी हिताचे निर्णय घेतोय, त्यांच्या मदतीसाठी धावून जातोय, हे चित्र फारच आश्‍वासक आहे.
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी परवा म्हणाले, ‘हिमालय गेले, सह्याद्री गेले, डोंगर आणि टेकड्याही गेल्या... आता आहेत काही उंच तर काही खुजी वारूळे! आणि वारूळातल्या उंचीतली स्पर्धा जास्त भिषण असते...!’
संजय सोनवणी यांनी ही धोक्याची घंटा दिलीय. त्यातले सत्य सर्वांनाच ठाऊक आहे. तरीही काहीजण झोपेचे सोंग घेतात. त्यांनी आता जागे झाले पाहिजे. हे चित्र बदलण्यासाठी मोठे प्रयत्न होणे ही काळाजी गरज आहे. महाराष्ट्र दिन ‘साजरा’ करणे, त्यासाठी सरकारी तिजोरीतून कोट्यवधींची जाहिरातबाजी करणे याऐवजी थोडीशी संवेदनशीलता वाढवली तर ते अधिक लाभदायक ठरेल! आपल्या नाकर्तेपणामुळे, स्वार्थसंकुचित वृत्तीमुळे, वैयक्तिक हेवेदावे आणि ईर्षेमुळे महाराष्ट्र विनाशाकडे ढकलला जाऊ नये, एवढेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते. शेवटी सेनापती बापटांच्याच ओळी आठवतात,
महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले;
खरा वीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा!

- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

Saturday, April 16, 2016

कार्यसिद्धीस नेण्यास ‘समर्थ’!

मेघराज राजेभोसले (चित्रपट निर्माते)
कोणत्याही विश्‍वस्त संस्थेत अध्यक्ष, सभासद जेव्हा मालक झाल्यासारखे वागू लागतात तेव्हा त्या संस्थेचे मातेरे होते. अखिल भारतीय चित्रपट महामंडळही दुर्दैवाने याला अपवाद ठरले नाही. मोठमोठी उड्डाणे घेणार्‍या या संस्थेच्या मागच्या पंचवार्षिक कालावधीतील अध्यक्षांनी कायम स्वतःची तुंबडी भरली. हे करताना त्यांना त्यांच्या नैतिक कर्तव्याची तसूभरही जाणीव राहिली नाही. पाच वर्षात तीन अध्यक्ष आणि प्रत्येकाची तर्‍हा तीच! यांची खाबुगिरी इतक्या टोकाला गेली की अध्यक्षाला सभा अर्धवट सोडून रिक्षातून पळ काढावा लागला.
चित्रपट समाजमनावर परिणाम घडवणारा एक महत्त्वाचा घटक आहे. लोकजागृती, समाजप्रबोधन, मनोरंजन यासाठी चित्रपटासारखे अन्य प्रभावी माध्यम नाही. चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेचा विचार केला तर लेखक, पटकथाकार, अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ या सर्वांचाच मोठा वाटा असतो. अनेक खटपटी, लटपटी करून निर्माते चित्रपटावर काम सुरू करतात. त्यात त्यांना महामंडळाकडून सेन्सॉरचे प्रमाणपत्र आवश्यक असते. अर्थात असे प्रमाणपत्र देण्यासाठी ‘इम्पा’सारख्या अन्य संस्थाही आहेत; मात्र अखिल भारतीय चित्रपट महामंडळाला तुलनेने अधिक महत्त्व दिले जाते. सरकार आणि चित्रपट निर्माते यांच्यात समन्वय साधन्याचा महत्त्वाचा दुवा म्हणजे चित्रपट महामंडळ. महामंडळाच्या प्रमाणपत्रानंतरच चित्रपटाला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.
ज्या चित्रपटांना सरकारकडून अनुदान मिळते त्यातील दीड टक्के रक्कम महामंडळाला मिळते. त्यामुळे साहजिकच महामंडळाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले. पूर्वी प्रामुख्याने मराठी चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूरात व्हायचे. तो केंद्रबिंदू पुण्याकडे सरकला. सध्या अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण पुणे आणि पुणे जिल्ह्याच्या परिसरातच केले जाते. असे असतानाही पुण्यातील कार्यालय बंद करण्याचा अविवेकी निर्णय महामंडळाने घेतला. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि राजकारण यामुळे महामंडळाचे पुरते वाटोळे झाले आहे. कार्यक्रमासाठी महामंडळाच्या ठेवी मोडणे आणि त्यातून आर्थिक गैरव्यवहार करणे असेही प्रकार उघड होऊनही संबंधितांवर काहीच कारवाई केली जात नाही. उलट ‘माझ्या जवळील साडे सात लाख रूपये आयकर अधिकार्‍याला लाच देण्यासाठी ठेवले आहेत’ असे लाज आणणारे वक्तव्य महामंडळाचे अध्यक्ष सर्वसाधारण सभेत करतात. याबाबत जाब विचारल्यानंतर विषय अर्धवट सोडून सभेतून पळ काढतात. एखाद्या चित्रपटाला शोभावी अशीच चित्रपट महामंडळाची ही सारी कथा आहे.
परिवर्तन हा सृष्टीचा अटळ नियम असतो. त्यामुळे हे चित्र बदलणे आवश्यक आहे. स्वच्छ चारित्र्याचे, निष्कलंक, प्रामाणिक आणि काहीतरी भरीव करू पाहणार्‍या, या क्षेत्रात आपले योगदान पेरणार्‍या नेतृत्वाची महामंडळाला गरज आहे. गेली पाच वर्षे सातत्याने महामंडळातील अपप्रवृत्तीवर तुटून पडणारे निर्माते मेघराज राजेभोसले यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. चित्रपटाशी संबंधित सर्वच घटकांचा गंभीरपणे विचार करणारे, त्यांच्यासाठी अनेकानेक उपक्रम राबवणारे राजेभोसले महामंडळाला शिस्त लावण्यासाठी समर्थ आहेत. या क्षेत्रातील जुन्या नव्या कलाकारांचा, निर्मात्यांचा, तंत्रज्ञांचा समावेश करत त्यांनी ‘समर्थ पॅनेल’ची स्थापना करून निवडणुकीचे आव्हान स्वीकारले आहे. वर्षा उसगावकर यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीपासून ते वितरक असलेल्या मधुकरअण्णा देशपांडे यांच्यापर्यंत सर्वांचा संगम घडून आला आहे. ‘चमकोगिरी’ न करता सतत निरपेक्षपणे कार्यरत असलेले संजय ठुबे यांच्यासारखे सत्शील उमेदवार या पॅनेलमध्ये आहेत. जे काम करतात पण प्रसिद्धीच्या मागे धावत नाहीत अशा उमेदवारांचा हा समूह आहे.
आजूबाजूला अनेक दुर्दैवी घटना सातत्याने घडतात. गुन्हेगारी वाढत चाललीय. प्रत्येकजण आत्मकेंद्रीत बनत चाललाय. अशावेळी व्यवस्थेच्या नावाने खडे फोडण्याऐवजी प्रत्यक्ष बदल घडवू पाहणारे कुशल कर्मवीर नेहमीच श्रेष्ठ ठरतात. मेघराज राजेभोसले यांच्यासारखा क्रियाशील निर्माता चित्रपट महामंडळात बदल घडविण्यासाठी पुढाकार घेतोय हे चित्र आश्‍वासक आहे. आपण त्यांचे हात बळकट करायला हवेत. आधीच्या कार्यकारिणीने ज्या चुका केल्यात त्या सुधारायच्या असतील तर नेतृत्वबदल ही काळाची गरज आहे.
कोणतेही कार्य जिद्दीने, समर्थपणे हाती घेतल्यास त्यात यश येतेच येते. मराठी चित्रपटाला सध्या चांगले दिवस येत आहेत. त्यात आणखी सुधारणा घडाव्यात यासाठी निर्माते, सरकार आणि महामंडळ यांच्यात योग्य तो समन्वय असायला हवा. राजकीय बजबजपुरी बाजूला ठेवून हे सारे घडवून आणण्याचे कसब आणि कौशल्य राजेभोसले यांच्याकडे आहे. उमेदवारांची निवड करताना त्यांनी एकही डागाळलेला आणि भ्रष्ट चेहरा आपल्या पॅनलमध्ये घेतला नाही. शिवाय मुंबई, कोल्हापूर, सातारा, पुणे अशा सर्व परिसरातील उमेदवारांना प्राधान्य देऊन त्यांनी व्यापकता दाखवली आहे. या पॅनलमध्ये तीन महिलांचा असलेला समावेश हीदेखील महत्त्वाची बाब आहे. त्यामुळेच चारूकाका सरपोतदार यांच्यासारख्या ऋषितुल्य माणसानेही मेघराज राजेभोसले यांच्या ‘समर्थ पॅनेल’ला जाहीर पाठिंबा दिला आहे. सुप्रसिद्ध लेखक, कवी आणि निर्माते रामदास फुटाणे यांनी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष असताना या संस्थेच्या कार्यालयाला जागा उपलब्ध करून दिली. पुणे आणि कोल्हापूर येथील कार्यालये त्यांच्याच कारकिर्दित झाली. इतकेच नाही तर फुटाणे उत्तम चित्रकार असून चित्रपट महामंडळाचा लोगोही त्यांनीच तयार केला आहे. रामदास फुटाणे यांच्यासारख्या दिग्गजानेही या पॅनेलला दिलेला पाठिंबा ही मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.
मेघराज राजेभोसले यांचे ‘समर्थ पॅनेल’ या निवडणुकीत संपूर्ण सामर्थ्यासह उतरले आहे. ‘ध्येयं पारदर्शी, धोरणं दुरदर्शी’ हे मूलतत्व घेऊन त्यांनी या पॅनेलची रचना केली आहे. पतंग हे त्यांच्या पॅनलचे चिन्ह आहे. येत्या 24 तारखेला ही निवडणूक होणार असून ’समर्थ पॅनेल’ प्रचंड मताधिक्याने विजयी होईल आणि महामंडळाला आणखी चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ‘चपराक’ परिवारातर्फे त्यांना पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा देतो. 

- घनश्याम पाटील, 
संपादक ‘चपराक’
7057292092

Wednesday, April 6, 2016

जल है तो कल है!



महात्मा गांधींच्या गुजरातेतील साबरमती आश्रमातला प्रसंग. गांधीजी सूत कताई करत होते. तेवढ्यात त्यांच्याकडे एक ग्रहस्थ आले. ते म्हणाले, ‘‘बापूजी, मी आयुष्यभर नेकीने व्यापार केला. मला चार मुले आहेत. तीही मार्गी लागलीत. आता काहीतरी समाजसेवा करावीशी वाटतेय. तुम्ही मला एखादे काम सुचवा.’’
गांधीजी म्हणाले, ‘‘माझे हातातले काम पूर्ण होईपर्यंत थांबा.’’
ते सद्गृहस्थ बाहेर बसून होते. श्रीमंती थाटात आयुष्य गेल्याने कुणाची वाट पाहणे त्यांना माहीत नव्हते. तरीही महात्मा गांधी यांच्या सूचनेनुसार ते बाहेर बसून होते. पंधरा मिनिट, वीस मिनिट, अर्धा तास, पाऊण तास असे करत करत सव्वा तास गेला. हे उद्योजक कमालीचे बेचैन झाले होते. शेवटी बापूजी आले आणि म्हणाले, ‘‘बोला काय म्हणताय?’’
गृहस्थ म्हणाले, ‘‘मला समाजसेवा करायचीय. काय करू ते सुचत नाही. तुम्ही मार्गदर्शन करा.’’
बापूजी म्हणाले, ‘‘मिस्टर जंटलमन, मी तुम्हाला बसायला सांगितले. या दरम्यान तुम्ही चलबिचल होऊन चार-पाच वेळा उठलात. माठातून ग्लासभर पाणी घेतले. अर्धे पाणी प्यालात आणि अर्धे पाणी टाकून दिले. यापुढे एक काम करा, तुम्हाला जेवढी तहान असेल तेवढेच पाणी ग्लासात घ्या. पाण्याचा अपव्यय टाळा. एवढे जरी करू शकलात तरी तुमच्या हातून खूप मोठी समाजसेवा घडेल.’’ आणि ते आश्रमात निघून गेले.
महात्मा गांधींनी त्याकाळात पाणी बचतीचा दिलेला हा संदेश आजही आम्ही ध्यानात घेत नाही. त्यामुळे सगळीकडे पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले आहे. मैलोनमैल पायपीट करूनही घोटभर पाणी मिळत नाही. तिसरे महायुद्ध केवळ आणि केवळ पाण्यासाठी होईल असे जागतिक स्तरावरील अनेक संशोधक अभ्यासपूर्वक सांगत आहेत. इतके सारे असूनही पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत आपण ढिम्मच आहोत.
‘त्याने निवडणुकीत, लग्नात ‘पाण्यासारखा’ पैसा उधळला’ असे वाक्य आपण सर्रासपणे ऐकतो. म्हणजे पाणी हे ‘उधळण्यासाठी’च असते अशी आपली मानसिकता तयार झाली आहे. सध्या सर्वत्रच पाणी टंचाई जाणवत असून त्यामुळे समाजजीवन अडचणीत आले आहे. शेतीसाठी, घरातील वापरासाठी आणि पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. पुण्यापासून दूर असलेला मराठवाडा, विदर्भ तर सोडाच पण पुणे शहरातल्याच बावधनसारख्या महत्त्वाच्या उपनगरातही तब्बल बावीस ते पंचवीस दिवसात एकदा पिण्याचे पाणी येते. राजकीय महत्त्वकांक्षेपोटी बारामती लोकसभा मतदार संघाची भौगोलिक रचना विचित्र केल्याने बावधन परिसरही त्याला जोडला गेला. सुप्रिया सुळे या खासदार म्हणून या भागाचे प्रतिनिधित्व करतात. बारामतीजवळील अनेक खेड्यांचा पाणी प्रश्‍न तर गंभीर आहेच; मात्र पुण्याजवळील बावधनसारखी गावेही पाणी टंचाईला सामोरे जात आहेत.
परवा लातूरमधील एक स्नेही आमच्याकडे आले होते. त्यांनी सांगितले, त्यांच्या कुटुंबासाठी पाणी विकतच आणावे लागते. लातूरात सातशे रूपयात पाण्याचा टँकर येतो. पिण्याच्या पाण्याचे जार वेगळेच विकत आणावे लागतात. अर्ध्या बादलीत लातूरकरांना आता आंघोळ उरकावी लागते. भांडी घासण्यासाठी पाणी लागू नये म्हणून रोजच्या जेवणासाठी प्लास्टिकचे ताट, पत्रावळ्या, द्रोणांचा वापर करावा लागतो.
नांदेडमधील ज्येष्ठ पत्रकार कै. सुधाकर डोईफोडे यांनी मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्‍नाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. सपाट रस्ते, डोंगरांचा अभाव यामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात रेल्वेचे जाळे निर्माण करता येणे सहज शक्य आहे. कोकणपेक्षा मराठवाड्यात रेल्वेमार्ग तयार करणे तुलनेने खूपच सोपे आहे. दळणवळणाची अशी साधने निर्माण झाली तर व्यावसायिकदृष्ट्या मराठवाड्याचा विकास होऊ शकतो. हातात पैसा खुळखुळू लागला तर जनजीवन समृद्ध होईल. मराठवाड्यात रेल्वेने पाणी आणता येईल, असा विचार त्याकाळात डोईफोडे यांनी मांडला होता. तेव्हा अनेकांना ही कल्पनाच विनोदी वाटली. अनेक छोट्या देशात हा प्रयोग होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले होते; मात्र तरीही हा विषय कोणी गंभीरपणे घेतला नव्हता. आता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मराठवाड्याला, प्रामुख्याने लातूरला रेल्वेने पाणी देण्याचा प्रकल्प पुढे आणला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातून लवकरच लातूरला ‘पाण्याची रेल्वे’ सुसाट सुटेल.
पृथ्वीवर आणि माणसाच्या शरीरातही पाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तरीही पाण्यासाठी जंगजंग पछाडावे लागते. पाण्याची पातळी वाढावी यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत. आपल्याकडे ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’सारख्या योजना राबवण्याचा प्रयत्न सरकारने केला. ‘वनराई’सारख्या संस्थांनीही अनेक अभिनव उपक्रम राबवले. सध्या महाराष्ट्र सरकार ‘जलयुक्त शिवार’सारख्या योजना राबवत आहे. त्यात त्यांना यशही येत आहे. गावोगावी जलाशये निर्माण करण्याची कल्पना छत्रपती शिवरायांनी मांडली होती. मात्र आपण ते गंभीरपणे न घेतल्याचे परिणाम सध्या भोगत आहोत. अजूनही वेळ गेलेली नाही. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड थांबवली पाहिजे. वृक्षसंवर्धन करणे आणि पर्यावरण जपणे अत्यंत गरजेचे आहे.
शरीराला जखम झाली तर त्यातून रक्त बाहेर येते; मात्र एखादी गोष्ट मनाला लागली तर डोळ्यातून पाणी येते. रक्ताचा संबंध जखमेशी आहे तर पाण्याचा संबंध भावनेशी आहे. एखाद्याच्या भावना जपणे जितके पुण्याचे काम आहे तितकेच पाण्याचे जतन करणे ही काळाची गरज आहे. ‘जल है तो कल है’ हे सत्य आपण स्वीकारायलाच हवे!
- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

Saturday, April 2, 2016

विश्‍वास नसेकर!

विश्‍वास नसेकर!

वाद आणि वितंडवाद याशिवाय सध्या कोणतीही साहित्य संमेलने पार पडतच नाहीत. अनेकांचे हेवेदावे, आरोप-प्रत्यारोप, मानापमान, आयोजक यामुळेच संमेलने चर्चेत येतात. साहित्यिक विषयांवरून चर्चेत येणारी संमेलने दुर्मीळ होत चालली आहेत. भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा, संशोधन या व अशा क्षेत्रात कमालीचा दुष्काळ पडलाय. मोठमोठे लेखकही रतीब टाकल्याप्रमाणे तेचतेच विषय वेगवेगळ्या व्यासपीठावरून ठासून मांडत असतात. तेच कवी, त्यांच्या त्याच कविता यामुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही कंटाळवाणे होत चालले आहे. असो.
तर सध्या मराठवाड्यात चर्चा आहे ती 37 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाची. येत्या 9 व 10 एप्रिल रोजी जालना येथे हे संमेलन होणार आहे. दत्ता भगत हे संमेलनाचे अध्यक्ष आहेत. मागच्या वर्षी सुधाकर वायचळकर आणि रामचंद्र तिरूके यांनी प्रयत्न करून उदगीरमध्ये या संमेलनाचे आयोजन केले होते. कार्यक्रम पत्रिका ठरल्यानंतर त्याची तयारीही जोरदार झाली. मात्र ऐनवेळी कुठेतरी पाणी मुरले आणि उदगीरचे हे संमेलन रद्द करावे लागले. ‘प्रशासकीय अधिकारी’ अशी ओळख असलेले लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. उदगीरचे संमेलन रद्द झाल्याने नांदेड येथील एका जिल्हा दैनिकाने हे संमेलन घेतले. सुदैवाने अध्यक्षस्थानी देशमुखच होते.
काही महिन्यांपूर्वी मराठवाडा साहित्य परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत प्रा. कौतुकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने दणदणीत विजय मिळवला. सर्वच्या सर्व जागा पटकावण्यात ठाले पाटलांनी बाजी मारली. मराठवाड्यात त्यांचे मोठे प्रस्थ. साहित्य वर्तुळातही चांगलाच दबदबा. त्यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेचे नेतृत्व ते गेली अनेक वर्ष करीत आहेत. इतकेच नाही तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण असावे याबाबत ठाले पाटलांची भूमिका नेहमीच निर्णायक असते.
मराठवाडा साहित्य परिषदेच्या 37 व्या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी विनयकुमार कोठारी हे असून जालना संस्कृत महाविद्यालय समितिने या संमेलनाचे आयोजन केले आहे. प्रा. जयराम खेडेकर हे निमंत्रक तर डॉ. संजीवनी तडेगावकर या कार्यवाह आहेत. दत्ता भगत यांच्यासारखा तगडा संमेलनाध्यक्ष लाभल्याने अनेकांना आनंद झाला आहे. मुळचे मराठवाड्यातील असलेले मात्र सध्या पुण्यात स्थायिक झालेले कवी, लेखक आणि समीक्षक प्रा. विश्‍वास वसेकर यांनी अविवेक दाखवत यंदाच्या संमेलनावर बहिष्कार टाकला आहे.
मद्य, स्त्री, कविता आणि नश्‍वरतेची जाणीव यापैकी प्रत्येक गोष्ट माणसाला आयुष्यातून उठवते. मग या चारही गोष्टी ज्याच्या आयुष्यात आल्या असतील त्याचे काय होते हे पाहण्यासाठी विश्‍वास वसेकर यांच्यासारख्या लोकांकडे पहावे! वसेकर हे सातत्याने लिहित असतात. त्याबद्दल त्यांना राज्य पुरस्कारही मिळालेला आहे. आयुष्यभर अध्यापन क्षेत्रात कार्यरत असूनही त्यांच्यात म्हणावी तशी प्रगल्भता दिसत नाही. नुकतेच त्यांचे ‘तहानलेले पाणी’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. नवनिर्वाचित संमेलनाध्यक्षांशी असलेल्या संबंधांमुळे त्यांनी त्यांचे हे पुस्तक भगत यांना अभिप्रायार्थ पाठवले.
नवोदित किंवा अन्य लेखकांनी प्रस्थापित आणि मान्यवर लेखकांना आपली पुस्तके पाठवणे यात नवे असे काही नाही. भगत यांना ही पुस्तके मिळाल्यानंतर त्यांनी त्यांचे काम चोखपणे पार पाडले. या पुस्तकातील त्रुटी प्रांजळपणे दाखवून देत त्यांनी वसेकरांना प्रामाणिक अभिप्राय पाठवला. या प्रकाराने वसेकर बिथरले. आपण लिहिले ते सर्वोच्च, अशा भ्रमात काहीजण असतात. दत्ता भगत यांनी या पुस्तकातील सुमार बाजू पुढे आणल्याने वसेकरांचा पारा चढला. त्यामुळे त्यांनी ‘यंदाच्या संमेलनाध्यक्षांनी माझ्या साहित्याचा अपमान केला’ अशी बोंब ठोकत संमेलनावर बहिष्कार टाकला आहे.
विश्‍वास वसेकर यांचा निमंत्रितांच्या कवी संमेलनात सहभाग होता. मात्र दत्ता भगतांनी थारा न दिल्याने त्यांना संमेलनात जाणे ‘अप्रतिष्ठेचे’ वाटले. त्यामुळे भगत यांचा निषेध म्हणून ते संमेलनाला जाणार नाहीत. वसेकरांसारखी टिनपाट मंडळी संमेलनाला गेली नाहीत म्हणून असा कितीसा फरक पडणार? पण यानिमित्ताने त्यांनी आपला जो वैचारिक आणि बौद्धिक दुष्काळ दाखवून दिला आहे तो हास्यास्पद आहे.
विश्‍वास वसेकर यांना भगत यांनी पंधरा वर्षांपूर्वी डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्या घरात झाप झाप झापले होते. तेव्हापासूनच वसेकरांच्या मनात भगत यांच्याविषयी आढी असावी. त्यानंतर इतक्या वर्षांनी त्यांनी भगत यांना अभिप्रायार्थ पुस्तके पाठवली. भगतांनी अभिप्राय पाठवल्यानंतर वसेकरांनी त्यांना भलेमोठे पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यात वसेकर भगत यांना लिहितात, ‘‘तहानलेले पाणी हे माझे पुस्तक शुद्ध वाङ्मयीन अपेक्षेतून मी तुम्हाला पाठवले; पण आज कळले की तुम्ही स्वमनातल्या हिणकसाचे मोठेच संग्राहक आहात. तुमच्या या हिणकसाला तुम्ही स्वत:ची अस्मिता समजता हा फार मोठा अंतर्विरोध आहे. तुमचे हिणकस तुम्हाला लखलाभ असो. कुरूंदकरांच्या मृत्यूवार्तेने मी कमालीचा हादरलो, हळहळलो. त्यावेळी उत्स्फूर्तपणे मी सुंदर मृत्यूलेखही लिहिला आहे. माझी मर्यादा ही आहे की ‘रसाळ स्कूल’ मधून आल्यामुळे मी त्यांचा भक्त होऊ शकलो नाही! आणि कुरूंदकरांच्या मृत्यूमुळे आपण बालविधवा झालो असे नांदेडच्या लेखक कवींना वाटले तसे मला वाटले नाही. त्यांच्या लेखनापुढे आणि वक्तृत्वापुढे आपली बुद्धी गहाण टाकावी इतका मतिमंद मी नाही.’’
वसेकर यानिमित्ताने आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना लिहितात, ‘‘वाईट याचे वाटते की कुरूंदकरांना जाऊन जवळजवळ अर्धशतक लोटलं तरी त्यांचे शिष्य अजून अविकसितच आहेत. ते गेले तेव्हा त्यांच्या या बालविधवा धड ऋतुस्नातही झाल्या नव्हत्या. एकविसाव्या शतकात, वयात आल्यानंतरही त्यांनी पुनर्विवाह करू नये, जन्मभर त्यांची विधवा म्हणून जगावे हे आपला समाज अजूनही किती मागासलेला आहे याचे गमक आहे.’’
वसेकर यांनी भगत यांना अभिप्रायार्थ जी दोन पुस्तके पाठवली ती रजिस्टर पोस्टाने परत मागवली आहेत. मनाजोगता अभिप्राय न दिल्याने पुस्तके परत पाठवा किंवा त्याचे मूल्य पोस्टाने पाठवून द्या अशी तंबीही त्यांनी दिलीय. साहित्यक्षेत्र कोणत्या बजबजपुरीतून जात आहे याचेच हे उदाहरण!
विश्‍वास वसेकर हे ‘चपराक’चे लेखक आहेत. मागच्या वर्षी घुमान संमेलनाच्या आधी चार-पाच दिवस ते ‘चपराक’ कार्यालयात आले. त्यांचा ‘तरी आम्ही मतदारराजे’ हा काव्यसंग्रह ‘चपराक’ने प्रकाशित करावा यासाठी त्यांनी गळ घातली. चार-पाच दिवसात पुस्तक होणे शक्य नव्हते. मात्र ते उठायलाच तयार नाहीत. घुमानला त्याचे प्रकाशन झालेच पाहिजे, असा आग्रह त्यांनी धरला. आम्ही दिवसरात्र एक करून त्या धावपळीतही तो संग्रह प्रकाशित केला. 31 मार्चला घुमानच्या तयारीविषयी आमचे त्यांच्याशी बोलणेही झाले. मात्र दुसर्‍या दिवशी ते संमेलनाला आलेच नाहीत. शेवटी घुमानमध्ये त्यांच्या अनुपस्थितीत सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, आयोजक भारत देसडला यांच्या हस्ते आम्ही या संग्रहाचे प्रकाशन ‘चपराक’च्या ग्रंथदालनातच केले. तेव्हापासूनच त्यांचे नामकरण आम्ही ‘विश्‍वास नसेकर’ असे केले आहे.
जालना येथील संमेलनाला अध्यक्षांवर नाराज असल्याने ते जाणार नाहीत असे सांगत असले तरी 10 तारखेला विजय तरवडे यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ते करणार असल्याचे कळते. हा कार्यक्रम जालन्याच्याही आधी ‘पूर्वनियोजित’ आहे. त्यामुळे वसेकरांनी कितीही आव आणला तरी त्यांचे इप्सित साध्य होणार नाही.
दत्ता भगत यांनी वसेकरांच्या ‘तहानलेले पाणी’ या पुस्तकाबाबत मांडलेली मते फारच सौम्य आहेत. ‘क्लेषकारक आयुष्याचा माफीनामा’ या पठडीतले ते पुस्तक आहे. आपल्या मनातील लैंगिक वासना विकृत स्वरूपात मांडणे, कुणाकुणासोबत किती वेळा दारू प्यालो याचे रसभरीत वर्णन करणे, नागनाथ कोत्तापल्ले यांच्यासह अनेक ज्येष्ठांवर चिखलफेक करणे आणि वर आपण त्यांचे किती चांगले मित्र आहोत हे ठासून मांडणे, अनेक कपोलकल्पित गोष्टी चरित्राच्या नावावर खपवणे हे सारे उद्योग वसेकरांनी केलेले आहेत.
या पुस्तकासोबतच त्यांचे ‘पोट्रेट पोएम्स’ हे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. दलाई लामापासून ते इंदिरा गांधी, अमृता प्रीतम यांच्यापर्यंत त्यांच्यावर प्रभाव पाडणार्‍या अनेकांवर त्यांनी चरित्रात्मक कविता या संग्रहात केल्या आहेत. त्यांचा स्नेही म्हणून ‘राजकुमार’या शीर्षकाची एक सुंदर रचना त्यांनी ‘चपराक’चा संपादक या नात्याने माझ्यावरही केली आहे. हा माझा बहुमान असला तरी ‘तहानलेले पाणी’बाबतची प्रांजळ मते व्यक्त करणे हे दत्ता भगत यांच्याप्रमाणेच माझेही सांस्कृतिक कर्तव्य आहे.
- घनश्याम पाटील, 

संपादक ‘चपराक’
7057292092

Monday, March 28, 2016

‘लकवा’मार विकारवंत!

पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना बालगंधर्वला झालेल्या एका कार्यक्रमात राज्य सरकारवर टीका करताना शरद पवार म्हणाले होते, ‘मुख्यमंत्री कोणत्याही फाईलवर सह्या करत नाहीत. त्यांना ‘लकवा‘ झालाय.’
त्यापूर्वी राम मनोहर लोहिया यांनी सांगितले होते की, ‘‘आजच्या काही समाजवाद्यांना ‘लकवा’ झालाय! विचारावर ठाम नसणार्‍या आणि कृतीशुन्य समाजवादी कार्यकर्त्यांना ‘लकवामार समाजवादी’ म्हटले पाहिजे.’’
सध्या पुरोगामित्वाच्
या नावावर मिरवणारे काही तथाकथित समाजवादी याच ‘लकवामार विकारवंता’त मोडतात. कन्हैयाकुमारला छोट्या भावाची उपमा देणारे कुमार तथा सुमार सप्तर्षी याच विकारवंतांपैकी एक! अर्धसत्य माहिती ठासून मांडणे आणि आपणच समाजाला तारण्याचा ठेका घेतलाय अशा आविर्भावात असे ‘विकारवंत’ जगत असतात. सप्तर्षींनी एकेकाळी ‘युक्रांद’च्या माध्यमातून थोडेफार काम हाती घेतले होते; मात्र ज्याच्याकडे किमान सभ्यता आणि मूलभूत ध्येयनिष्ठा नाही तो समाजमनावर कितपत प्रभाव पाडू शकणार? एकीकडे ‘जातीअंताची लढाई’ असे बोजड शब्द वापरायचे आणि दुसरीकडे भेटणार्‍या प्रत्येकाला थेट त्याची जात विचारायची आणि आपण आयुष्यभर किती दिवे लावले याचे पाल्हाळीक चर्वितचर्वण करायचे यातच यांची हयात गेली. एकेकाळी अण्णा हजारे यांना ‘थोरले बंधू’ मानणारे सप्तर्षी आता कन्हैयाला ‘धाकल्या’ भावाची उपमा देत आहेत. त्याला पुण्यात गांधीभवनात आणण्याचा त्यांचा मानस आहे.
एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे असे एकेकाळचे समाजवादी आणि आजच्या काळातील कुमार सप्तर्षीसारखे सुमार लोक पाहिले की समाजवादी चळवळीला खीळ का बसली याचे उत्तर मिळते. समाजवादाच्या नावाने कोकलणार्‍यांनी समाजवादी नेत्यांनी कोणते संघटनात्मक कार्य केले याचे उत्तर द्यावे! राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाच्या विरूद्ध बोलणे, लिहिणे इतक्या मर्यादित स्वरूपात यांची पुरोगामित्वाची व्याख्या येऊन ठेपली आहे. ही मंडळी केवळ वयाने वाढली आहेत. त्यांची बौद्धिक उंची मात्र कधीच खुंटली आहे, हे इवलेसे पोरही सांगेल. म्हणूनच त्यांची सातत्याने चर्चेत राहण्याची केविलवाणी धडपड सुरू असते. आचार्य अत्रे यांनी त्या काळात समाजवादी विचारधारेविषयी लिहिले होते की, ‘‘समाजवाद या शब्दातला स कधीच गळून पडलाय आणि केवळ ‘माजवाद’ उरलाय!’’ अत्रेंच्या या निरीक्षणात आजदेखील तसूभरही फरक पडल्याचे दिसत नाही.
सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर विचारतात, ‘‘विचारांची लढाई विचाराने झाली पाहिजे, ही भाषा पुरोगाम्यांना कधी कळली? सोवियत युनियन कोसळल्यानंतरचा हा साक्षात्कार आहे का?’’ भाऊंचा हा सवाल बिनतोड आहे. आजचे समाजवादी या प्रश्‍नाचे उत्तर देण्याएवढे सक्षम नाहीत. त्यांची तेवढी वैचारिक कुवतही नाही. जाती-जातीत, धर्मा-धर्मात, प्रांता-प्रांतात फूट पाडणे, येनकेनप्रकारे स्वत:चा स्वार्थ साधणे आणि आपल्या आडमुठ्या भूमिकेपायी समाजाला वेठीस धरणे हा यांचा उद्योग नवा नाही.
कन्हैयाकुमार पुण्यात आल्याने विशेष असे काय घडेल? कुमार सप्तर्षी यांच्यासारखे अडगळीत पडलेले ‘विकारवंत’ चर्चेत येतील, काही राष्ट्रीय माध्यमांचे लक्ष यांच्याकडे केंद्रीत होईल. आजच्या तथाकथीत पुरोगाम्यांचे, समाजवाद्यांचे ‘बापजादे’ काय करत होते याचेही ज्ञान या भामट्यांना नाही. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कम्युनिष्टांविषयीची मते काय होती, याचा अभ्यास आपण करणार की नाही? प्रकाश आंबेडकर ज्या दिशेने आजच्या समाजाला नेऊ पाहत आहेत ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होते का? हिंदुंचा, ब्राह्मणांचा द्वेष हा एकमेव अजेंडा घेऊन या लोकांची वाटचाल सुरू आहे. एकीकडे जातीच्या आधारावर मिळणारे ‘सर्वप्रकारचे’ लाभ घ्यायचे, आरक्षणासारख्या विषयावरून रान पेटवायचे आणि दुसरीकडे जातीयवाद संपवण्याची भाषा करायची, ब्राह्मणांना शिव्या घालायच्या अशी दुटप्पी भूमिका हे लोक घेतात.
कन्हैयाकुमार आणि राहुल गांधी या दोघांच्या बौद्धिक पातळीत तसा फारसा फरक दिसत नाही. दुर्दैवाने अशी बिनडोक मंडळी आजच्या तरूणाईचे नेतृत्व करू पाहत आहेत. राष्ट्रभक्ती हे पाप वाटावे अशी परिस्थिती या लोकांनी निर्माण केली आहे. आपल्या नेत्यांनी अशा भामट्यांना पाठिशी घातल्याने समाजात दुफळी निर्माण होत आहे. केजरीवाल, हार्दीक पटेल, रोहित वेमुला, कन्हैयाकुमार अशांनी समाजाला कोणता नवा विचार दिला किंवा ते समाजाचे नेतृत्व करण्याच्या लायकीचे आहेत का? हे तटस्थपणे पडताळून पाहिले पाहिजे. महाराष्ट्रात तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘सुविद्य’ आमदार जितेंद्र आव्हाड कायम नौटंकी करत असतात. ‘फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांचे वारसदार’ अशी त्यांची ओळख करून दिली जाते. त्यांचा कोणता ‘वारसा’ आव्हाडांनी चालवला हे मात्र सिद्ध होत नाही. दहीहंडीच्या कार्यक्रमात मुली नाचवणे, अतिक्रमणाच्या प्रश्‍नावरून प्रशासकीय अधिकार्‍याशी अरेरावी करणे, पोलिसांवर हात उगारणे, फर्ग्युसनसारख्या ठिकाणी येऊन महाविद्यालयाच्या स्थापनेविषयीच तारे तोडणे ही व अशी कामे ‘वारसा प्रकारा’त मोडतात का?
‘आम्ही मराठे कुणाला घाबरत नाही. आम्हा सगळ्यांनाच तुरूंगात टाका’ असे बालिश विधान खासदार सुप्रिया सुळे यांनीही नुकतेच केले आहे. (भुजबळ, तटकरे, अजितदादा यांचे भवितव्य त्यांना दिसत असणार!) सुप्रियाताईंच्या ‘बाबां’नी आजवर कायम जातीचे राजकारणच केंद्रस्थानी ठेवले आहे. ‘मराठा लीडर’ अशी प्रतिमा असूनही त्यांनी मराठा समाजासाठी नेमके काय केले याचेही उत्तर कोणी देऊ शकणार नाही. पवारांमुळे किती ‘मराठा’ शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या किंवा पवारांनी किती ‘मराठा’ नेते तयार केले? हा प्रश्‍न उपस्थित केला तर त्याचे उत्तरही नकारात्मकच येते. केवळ गरजेपुरते जातीय अस्मितेचे राजकारण करून या लोकांनी कायम स्वत:ची तुंबडी भरलेली आहे.
कन्हैयाकुमार, कुमार सप्तर्षीपासून ते राजदीप सरदेसाई, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळेपर्यंत प्रत्यक्षात ज्यांचा धिक्कार करायला हवा त्यांना काहीजण ‘नेते’ मानून त्यांची पूजा बांधत आहेत.
राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे हेही सध्या चर्चेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्यादे असलेल्या अणेंनी वेगळ्या विदर्भाबरोबरच स्वतंत्र मराठवाड्याचीही मागणी केली आहे. मुंबईतील 106 हुतात्म्यांनी जे बलिदान दिले त्याचा विदर्भ किंवा मराठवाड्याशी काहीही संबंध नाही, असा युक्तिवाद ते करतात. राज्य सरकारचा वकील राहिलेला हा पाखंडी ‘विचारवंत’ कसा असू शकेल? सध्या जिकडे-तिकडे अशा ‘लकवामार विकारवंतां‘चीच संख्या फोफावली आहे.
आचार्य अत्रे यांनी मालोजीबुवा निंबाळकर यांच्याविषयी लिहिताना सांगितले होते की, ‘‘जन्मभर देहविक्रय करणार्‍या वेश्येने म्हातारपणी लग्न लावल्यानंतर ‘माझा नवरा मेला तर मी सती जाईन!’ अशा पातिव्रत्याच्या वल्गना करू नयेत!’’
पुरोगामित्वाच्या नावावर नाचणार्‍या आजच्या ‘विकारवंतां’चीही अशीच अवस्था आहे. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात काहीच तारतम्य नसते. सामान्य माणसापुढे जगण्यामरण्याचे अनेक गंभीर प्रश्‍न असताना अशा पद्धतीचे राजकारण कोणीही करू नये! देशातील सर्व प्रश्‍न संपले अशा आविर्भावातच कन्हैयासारख्या भुलभुलैयाचे उदात्तीकरण सुरू आहे. स्वार्थसंकुचित राजकारण, कुटीलतावाद, सर्व प्रकारचा कट्टरतावाद वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या ‘लकवामार विकारवंतां’कडे दुर्लक्ष करून प्रत्येकाने आता माणुसकीच्या धर्मातून कार्यरत राहिले पाहिजे; तरच येणारे आरिष्ट्य थोपविण्यात आपण यशस्वी ठरू!

-घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Saturday, March 19, 2016

लोकसत्ता की शोकसत्ता?

लोकशाही व्यवस्थेत वृत्तपत्रांचे स्थान महत्त्वाचे आहे. व्यवस्थेचा हा चौथा स्तंभ समजला जातो. लोकमान्य टिळक, आचार्य अत्रे, पु. भा. भावे, बाळासाहेब ठाकरे, नीलकंठ खाडीलकर अशा धुरीणांनी लेखणीची ताकत अनेकवेळा दाखवून दिली. परिवर्तनाच्या चळवळीत माध्यमांना पर्याय नाही. मात्र भारतीय वृत्तपत्र सृष्टीत महत्त्वाचे स्थान असलेल्या ‘इंडियन एक्सप्रेस’ समूहाच्या ‘लोकसत्ता‘ने या वैचारिक परंपरेला तडा दिला आहे. ‘लोकसत्ता’सारख्या अग्रणी वृत्तपत्राने माफी मागत चक्क अग्रलेख परत घेतल्याने ‘लोकसत्ता’चा ‘शोकसत्ता’ झाल्याची चर्चा आहे. मराठी वृत्तपत्रांसाठी तर ही अतिशय दुर्दैवी आणि काळीकुट्ट घटना आहे. ‘कुबेर’ आडनावाच्या एका संपादकाची ही ‘गरिबी’ समजून घेणे वाटते तेवढी सोपी घटना नाही.

असंतांचे संत
क्षमस्व! प्रिय वाचक! ‘असंतांचे संत’ या 17 मार्च 2016 च्या अंकातील संपादकीयाने वाचकांच्या भावना दुखावल्याबद्दल मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो. हे संपादकीय मागे घेण्यात येत आहे. - संपादक


अशी इवलीशी चौकट कुबेरांनी 18 मार्चच्या ‘लोकसत्ता’मध्ये छापून ‘अग्रलेख वापसी’ केली आहे. काही साहित्यिकांनी यापूर्वी ‘पुरस्कार वापसी’ची मोहीम राबवली होती. हे परत केलेले पुरस्कार पुन्हा काहींनी स्वीकारले. देशात अशा नाट्यपूर्ण घडामोडी सुरू असतानाच आपल्याकडे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजले. श्रीपाल सबनीस नावाचा एक समीक्षक संमेलनाध्यक्ष झाला. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी एकेरी भाषा वापरत काही तारे तोडले. ‘कोण हे सबनीस?’ असा प्रश्‍न त्यावेळी केला जात होता. हे चित्र पाहून ‘लोकसत्ता’ने त्यांच्याविषयी ‘श्रीपाल की शिशुपाल?’ असा अग्रलेख लिहिला. ‘चपराक’नेही सबनीसांचे ‘बौद्धिक’ घेतले. या प्रकाराने सबनीसांनी ‘मी माझे भाषण माघार घेतो’ असे म्हणत भाषण वापसी केली. झालेले भाषण माघार कसे घ्यायचे हा प्रश्‍न आम्हाला पडला होता. मात्र वादावर पडदा पडतोय म्हणून आम्ही त्यावर फारशी चर्चा केली नाही. मराठी साहित्य, संस्कृती, समीक्षा, भाषा या दृष्टीने दिलगिरी व्यक्त करत भाषण माघार घेणे हे अत्यंत दुर्दैवी होते. संमेलनाध्यक्षांची बौद्धिक क्षमता आणि त्यांना लागलेली प्रसिद्धीची चटक पाहता तिकडे आमच्याप्रमाणेच अनेकांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. असाच प्रकार कुबेरांच्या बाबत घडल्याने सांस्कृतिक क्षेत्रात असलेली दहशत पुन्हा एकदा वाचकांसमोर आली आहे.
सबनीस, कुबेर अशा माणसांची तशीही फारशी विश्‍वासार्हता नाही. त्यांनी काय लिहावे आणि काय बोलावे हा त्यांच्या आणि त्यांच्या मालकांचा प्रश्‍न आहे. मात्र ते ज्या संस्थांचे, पदांचे प्रतिनिधित्व करतात त्याला मात्र यामुळे अप्रतिष्ठा येत आहे. सबनीस फारसे गंभीरपणे घेण्यालायक व्यक्तिमत्त्व नाही; मात्र गिरीश कुबेर भूमिका घेणारे संपादक म्हणून ओळखले जातात. चेंबरमध्ये बसून अग्रलेखाची पानेच्या पाने खरडणारे कुबेर आंतरराष्ट्रीय प्रश्‍नांचे अभ्यासक आहेत. बर्‍याचवेळा त्यांचे अग्रलेख भांडवलदारधार्जिने असतात. ते चूक की बरोबर हा चर्चेचा विषय असू शकतो; पण ‘अग्रलेख वापसी’चे समर्थन कुणीही सुज्ञ व्यक्ती करू शकणार नाही. कालचा अग्रलेख आज दिलगिरी व्यक्त करत माघार घ्यावा लागतो म्हणजे गिरीश कुबेर यांच्यावर किती दबाव आला असेल याची आपण कल्पना करू शकतो. त्यातही त्यांनी ‘मी मन:पूर्वक दिलगिरी व्यक्त करतो’ अशी संपादकाला न शोभणारी एकेरी भाषा वापरली आहे. ‘पगारी संपादकां’चे कसे हाल होतात यावर अनेक वेळा चर्चा होत असली तरी कुबेरांच्या या कृतीतून ते प्रत्यक्ष दिसून आले आहे.
अग्रलेख माघार न घेता अन्य सहकार्‍यांनी त्याचा प्रतिवाद करणे, तटस्थपणे त्याविषयीची दुसरी बाजू मांडणे, ज्यांना तो अग्रलेख पटला नाही त्यांनी लोकशाही मार्गाने कुबेरांना आणि ‘लोकसत्ते’ला न्यायालयात खेचणे असे लोकशाही मार्ग उपलब्ध असताना कुबेरांनी चक्क माघार घेत वृत्तपत्राच्या मूलतत्वालाच तिलांजली दिली आहे. असा नामुष्कीचा प्रकार आजवर कोणत्याही संपादकावर आला नाही आणि यापुढेही येऊ नये. ‘पत्रकारांनी नेहमी दुसरी बाजू बघावी. विरोधी प्रवाह समजून घेतले तरच तुम्ही ठामपणे लिहू शकता’ असे उपदेशाचे प्रवचन झाडणारे गिरीश कुबेर हेच का? असाही प्रश्‍न अनेकांना पडला आहे. कुबेर लोकसत्तेच्या चेंबरमध्ये बसून अग्रलेख लिहित असल्याने त्यावेळी त्यांनी मद्यपान केले असण्याचीही शक्यता नाही! मग हे कसे घडले?
मदर तेरेसा या संत नव्हत्या तर एक सामान्य धर्मप्रसारक होत्या हे अनेकांनी अनेकवेळा सिद्ध केलेले सत्य आहे. त्यांचे सेवा-सुश्रुषेचे कार्य महत्त्वाचे असले तरी त्यातून त्यांनी ख्रिश्‍चन धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठीच स्वत:ला वाहून घेतले होेते हे सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे. खुद्द मदर तेरेसा यांनीही हे आपल्या कृतीतून कायम दाखवून दिले आहे. हिंदू धर्मातील विविध संत-महंतांवर आपल्या लेखणीद्वारे तुटून पडणार्‍या कुबेरांनी कधी नव्हे ते या विषयाला हात घालत सत्य मांडले. विविध समाजमाध्यमांद्वारे त्यांचा तो अग्रलेख मोठ्या प्रमाणात वाचला गेला. एकांगी भूमिकेमुळे ज्या वाचकांनी ‘लोकसत्ता’ वाचणे कायमचे सोडून दिले त्यांनीही फेसबुक, ट्वीटरसारख्या माध्यमातून या अग्रलेखाचे समर्थन केले. हा अग्रलेख वाचकप्रिय होत असतानाच कुबेरांनी तो माघार घेण्याची घोषणा केली.
बरे! कालच्या वृत्तपत्रातील अग्रलेख आज कसा माघार घ्यायचा हेही आम्हास कळले नाही. त्यांच्या वृत्तपत्राचा जेवढा खप आहे त्याहून कितीतरी मोठ्या प्रमाणात हा अग्रलेख वाचला गेला. मध्यंतरी शेतकर्‍यांच्या विरोधी कुबेरांनी अग्रलेख लिहिला आणि त्यांचे लेखन म्हणजे अग्रलेख नसतात तर ‘हाग्रलेख’ असतात अशी टीका झाली. संपादकांनी कोणत्या विषयावर काय लिहावे हा त्यांचा अधिकार आहे. घटनेच्या कलम 19 अ अन्वये आपणास विचारस्वातंत्र्य देण्यात आले आहे. मात्र हिंदू धर्मावर कायम पोटतिडिकेने लिहिणार्‍या आणि ‘असहिष्णूते’वरून रान पेटवणार्‍या कुबेरांना इतर धर्मावर टीका केली की कसे शेपूट घालून पळावे लागते याची प्रचिती आली. हिंदू धर्मावर कुणी काहीही लिहिले तरी आपण खपवून घेतो. ख्रिश्‍चन-मुस्लिम अशा कडवट धर्मावर लिहिल्यानंतर मात्र अग्रलेख माघार घ्यावे लागतात; व्यंग्यचित्रे छापल्यावरही खुनाच्या राशी पडतात हा इतिहास सर्वपरिचित आहे. कुबेरांनी पळपुटेपणा करत माघार घेतल्याने मराठी वृत्तपत्रसृष्टीचे नाक कापले गेले आहे.
एखाद्या चित्रपटावर, नाटकावर बंदी आणणे, अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाने दिलगिरी व्यक्त करत भाषण माघार घेणे आणि आता एका आघाडीच्या वृत्तपत्राने त्याचाच कित्ता गिरवत चक्क अग्रलेख मागे घेणे हे प्रचंड क्लेशकारक आहे. मुळात बहुतांश वृत्तपत्रातील संपादकीय लेख वाचक सध्या वाचत नाहीत. संपादकांनीही केवळ औपचारिकता पूर्ण करायची आणि तेवढी जागा भरायची असा खेळ सुरू आहे. याला जी चार-दोन वृत्तपत्रे अपवाद होती त्यात ‘लोकसत्ता’चा समावेश आवर्जून व्हायचा. या प्रतिमेला कुबेरांनी तडा दिला आहे. त्यांनी हा अग्रलेख का माघार घेतला, नक्की कोणत्या वाचकांच्या भावना दुखावल्या गेल्या हे तरी स्पष्ट करायला हवे होते.
‘जॅकेट कव्हर’ या नावाने पहिल्या पानावर पूर्ण पानभर जाहिरात छापणे ‘लोकसत्ता’ने सुरू केले त्यावेळी ‘बाईने कपाळावरील कुंकू कधीही विकू नये’ अशी प्रतिक्रिया आम्ही दिली होती. पुढे जॅकेट कव्हर हा प्रकार सर्वच वृत्तपत्रांनी सुरू केला. ‘लोकसत्ता’ने  अग्रलेख माघार घेऊन एक दुर्दैवी पाऊल टाकले आहे. याची री इतर वृत्तपत्रांनी ओढू नये म्हणजे मिळवली. ‘लोकसत्ता’ आज खर्‍याअर्थी ‘शोकसत्ता’ झाला अशा ज्या प्रतिक्रिया येत आहेत त्या दुर्दैवाने सत्य ठरू नयेत असेच आम्हास अजूनही वाटते. 

- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२

Saturday, February 20, 2016

‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे’

महाराष्ट्र साहित्य परिषद ही साहित्यातील मातृसंस्था आहे. लोकमान्य टिळकांच्या कल्पनेतून साकारलेल्या या संस्थेचे नेतृत्व अनेक दिग्गजांनी केले. मात्र गेल्या काही वर्षात या संस्थेची रयाच गेली. वादविवाद आणि वितंडवाद यामुळे साहित्य परिषद चर्चेत येतेय. साहित्य परिषदेतून साहित्यच हरवलेय असे वाटते. आजीव सभासदांचाही परिषदेशी फारसा संबंध राहिलेला नाही. ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ हे परिषदेचे मुखपत्र असलेले त्रैमासिक आणि पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी आलीच तर मतपत्रिका, एवढाच काय तो आजीव सभासदांचा परिषदेशी संबंध येतोय.
मात्र यंदा चित्र बदलतेय. अतिशय परखड बाण्याचे, प्रामाणिक आणि शिस्तप्रिय निवडणूक निर्णय अधिकारी लाभल्याने त्यांनी अनेक विधायक, सकारात्मक बदल घडविले आहेत. निवडणूक प्रक्रियेत त्यांनी केलेले आमुलाग्र बदल स्वागतार्ह आहेत. त्यामुळे यापूर्वी मतदान प्रक्रियेतील गैरव्यवहाराबाबत जी उलटसुलट चर्चा व्हायची त्याला चाप बसला. एकतर त्यांनी यावेळी प्रत्येक मतपत्रिकेला सांकेतिक क्रमांक (बारकोड) दिले आहेत. शिवाय मतदारांचे ओळखपत्र अनिवार्य केल्याने या प्रक्रियेत पारदर्शकता दिसून येते. त्यामुळे आमच्यासारख्या काहींनी या व्यवस्थेचे आणि प्रक्रियेचे जोरदार स्वागत केले आहे तर काहींच्या पायाखालची वाळू सरकली.
पत्रकार या नात्याने आम्ही आजवर अनेक निवडणुका अनुभवल्या. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे जाण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे. हा अनुभव खूप काही शिकवून जाणारा, समृद्ध करणारा आहे. परिषदेतील अपप्रवृत्तींवर बाहेरून अनेकवेळा मी धाडसाने दगडफेक केली; मात्र त्याचा फारसा काही परिणाम झाल्याचे दिसले नाही. त्यामुळे स्वतः परिषदेत उतरून आपण काहीतरी करावे या विचाराने मी निवडणुकीच्या मैदानात उतरलो. विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांना कायम ‘चपराक’ देताना आम्ही कधीही डगमगलो नाही. त्यामुळेच ‘तुमच्यासारखे साहित्यिक कार्यकर्ते परिषदेत हवेत’ असे अनेक मान्यवर आवर्जुन सांगत आहेत. सभासदांचा मिळणारा हा प्रतिसाद उत्साहवर्धक आहे. त्यांच्याकडून मिळणारी कौतुकाची थाप ही मोठी पावती होय.
निवडणुकीच्या निमित्ताने अनेक बरेवाईट अनुभव येत असून त्यावर आधारित ‘जावे त्याच्या वंशा’ हे पुस्तक मी लवकरच आपणास वाचावयास देईन! साहित्य परिषद साहित्याभिमुख व्हावी, समाजाभिमुख व्हावी यासाठी आमच्या ‘परिवर्तन आघाडी’चे प्रमुख प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे आणि सुनिताराजे पवार प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच त्यांनी साहित्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या उमेदवारांचाच या आघाडीत समावेश केला. समोरच्या पॅनलने एकाही महिलेला स्थान दिले नसताना ‘परिवर्तन’ने मात्र बारा जागांपैकी चार ठिकाणी महिला उमेदवारांना संधी देऊन साहित्य क्षेत्रातील स्त्री शक्तीचा सन्मान केला आहे. ‘पुरूषी मानसिकतेतून मला त्रास दिला जातो आणि माझी कुचंबणा होते’ असे गळे काढणारी विदुशी मात्र खुल्या दिलाने या निर्णयाचे स्वागत करत नाही!
साहित्य परिषदेचे 11300 मतदार आहेत. त्यात पुण्यातील 2865 जणांचा समावेश आहे. परिषदेने उमेदवारांना या सभासदांची जी यादी दिली त्यात कुणाचेही संपर्क क्रमांक किंवा मेल आयडी नाहीत. त्यामुळे संपर्कात अनंत अडचणी येत आहेत. त्यातील कित्येक सभासद हयात नाहीत, काहींची नावे दुबार आहेत तर काहींचे पत्ते बदलले आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या वेळेचा आणि पैशाचा अपव्यय मोठ्या प्रमाणावर होतोय. शिवाय या यादीत सर्वांची नावे आद्याक्षराप्रमाणे असल्याने त्या त्या भागातील सभासदांची यादी वेगळी करणे हे जिकिरीचे काम आहे. वेळेच्या मर्यादा लक्षात घेता यातील सभासदांपर्यंत थेट पोहोचणे कुणालाही शक्य होत नाही. त्यामुळे पत्रव्यवहाराला पर्याय नाही. त्यातही पत्ते किंवा पिन कोड क्रमांक चुकीचे असतील तर पत्रं त्यांच्यापर्यंत जात नाहीत. या सार्‍या अडचणींवर मात करण्याचे आव्हान दोन्ही पॅनलपुढे आहे.
व्यक्तीशः मला या निवडणुकीत प्रचंड प्रतिसाद मिळतोय. मतदारांच्या घरी गेल्यानंतर ते जोरदार स्वागत करतात. साहित्यावर चर्चा होते. त्यांची ग्रंथसंपदा कळते. माणसाच्या वृत्ती-प्रवृत्ती कळतात. अनेक सभासद गेल्यानंतर आधी ‘चपराक’ची वर्गणी हातात टेकवतात. ते सांगतात, ‘‘आम्ही परिवर्तन आघाडीला मत तर देणार आहोतच, पण आधी ‘चपराक’च्या अंकाची वर्गणी घ्या! तुमचा अंक आमच्यापर्यंत आलाच पाहिजे...’’ हा प्रतिसाद उमेद वाढवणारा आहे. लोकांना परिवर्तन हवेय. साहित्य परिषद साहित्यिक उपक्रमांनी चर्चेत यावी, या मातृसंस्थेची अप्रतिष्ठा होऊ नये असेच अनेकांना वाटते.
अर्थात, काही कटू अनुभवही आहेत पण ते मोजकेच! एका नामवंत लेखकाने विचारले, ‘‘तुम्हाला व्हर्र्च्युअल रिऍलिटी माहिती आहे का?’’ मी त्यांना म्हणालो, ‘‘हो, म्हणजे भासात्मक सत्य!’’
त्यांनी सांगितले, ‘‘अगदी बरोबर! आता एक भासात्मक सत्य मनावर बिंबवा की, मागील वर्षभर मी तुमच्याकडे लेखन केले आहे. त्याचे मानधन आणून द्या आणि आमची इतकी मते घेऊन जा!’’
लेखन केलेले नसतानाही असे मानधन मागणे हा केवढा मोठा गैरव्यवहार! राजकारण्यांना लाजवेल असा हा अनुभव! त्यामुळे आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिला आणि बाहेर पडलो.
काहीजण घरी बोलवून प्रेमाने पाच-दहा कविता ऐकवतात आणि मत आमच्याच परिवर्तन पॅनलला देणार असल्याचे सांगतात. लेखणी-वाणीवर जबरदस्त प्रभूत्व असलेले प्रा. मिलिंद जोशी हे महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. प्रकाश पायगुडे यांनी परिषदेच्या माध्यमातून यापूर्वी चांगले कार्य केले आहे. सुनिताराजे पवार या ‘संस्कृती प्रकाशन’च्या माध्यमातून साहित्य शारदेची उपासना करतात. ज्योत्स्ना चांदगुडे या ‘साहित्यदीप प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा आहेत. निलिमा बोरवणकर यांची सकस ग्रंथसंपदा आहे. स्वप्निल पोरे हे ‘केसरी’चे वृत्तसंपादक आहेत, उत्तम कवी आणि कथाकार आहेत. चित्रपटविषयक लेखनात त्यांचा हातखंडा आहे. वि. दा. पिंगळे हे शिक्षक आहेत, कवी आहेत. त्यांची बिनविरोध निवड झाली. मी ‘चपराक’च्या माध्यमातून गेली चौदा वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत आहे. नंदा सुर्वे गेली अनेक वर्षे परिषदेवर कार्यरत आहेत. प्रा. क्षितिज पाटुकले हे उत्तम लेखक असून दत्तोपासक आहेत. त्यांच्या ‘कर्दळीवन’ या पुस्तकाने इतिहास रचला. श्रीधर कसबेकर हे विधिज्ञ आहेत. असा हा भक्कम संघ परिषदेच्या विकासासाठी, मराठीच्या संवर्धनासाठी मैदानात उतरलाय. त्यामुळे त्याला बळकटी देणे हे सुजाण मतदारांचे कर्तव्य आहे.
आमच्यासारख्या तरूणांनी या निवडणुकीत भाग घेतल्याने साहित्य परिषदेचे वय कमी झाले आहे. प्रा. मिलिंद जोशी हे सर्वात कमी वयाचे कार्याध्यक्ष होतील. हा विक्रम नोंदविला गेला तर साहजिकच परिषदेशी तरूणांचे नाते अधिक घट्ट होईल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि तरूणांची खंबीर साथ या बळावरच हा मराठीचा गाडा हाकावा लागेल. त्यासाठी आता परिवर्तन घडवा. कोणतेही किंतु मनात न ठेवता आमच्या आघाडीचे हात मजबूत करा. मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा, संशोधन यासाठी हे पूरक आणि पोषक ठरणार आहे. केवळ मराठी भाषा दिन साजरा करणे, मराठी सप्ताह साजरा करणे यामुळे फारसे काही होणार नाही. ‘क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे’ हे सूत्र लक्षात घ्यायला हवे. आम्हाला चांगली कृती करायचीय. त्यासाठी आपणा सर्वांचा पाठिंबा मिळावा, इतकेच या निमित्ताने सांगावेसे वाटते. बाकी या सार्‍या प्रक्रियेविषयी लवकरच एक पुस्तक लिहून साहित्य क्षेत्राचा चेहरा लख्खपणे दाखवतोय. तूर्तास, परिवर्तनाच्या प्रतिक्षेत! 

- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२