सेनापती बापट, आचार्य अत्रे अशा धुरिणांच्या प्रयत्नाने 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 106 हुतात्म्यांनी त्यासाठी बलिदान दिले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले आणि ‘लोककल्याणकारी’ राज्याचं स्वप्नं जनतेनं बघितलं. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी ठरली. महाराष्ट्राने अनेक स्थित्यंतरे पचवली. मराठी माणूस काळासोबत बदलत गेला. आधुनिक तंत्रज्ञान आले. नवनवीन शोध लागल्याने लोकांचे जगणे समृद्ध झाले. मात्र आजवर महाराष्ट्राला मोठमोठे नेते लाभूनही महाराष्ट्र एका अराजकतेतून जातोय. महाराष्ट्र दिन साजरा करत असताना आज राज्याची काय परिस्थिती आहे हे पाहणे गरजेचे आहे.
बहुतांश काळ सत्तेत कॉंग्रेसच होती. शरद पवार हेच मागच्या पन्नास वर्षात महाराष्ट्राचे राजकारण ढवळून काढत आहेत. लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर तितक्याच ताकतीच्या असलेल्या पवार साहेबांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान दिले. देशभर त्यामुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली. अटलबिहारी वाजपेयी असोत अथवा नरेंद्र मोदी! पवारांच्या सल्ल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाहीत, हे महाराष्ट्राने अनेकवेळा पाहिले आहे, अनुभवले आहे. वाजपेयी-मोदी यांनी तशी जाहीर कबुलीही दिली आहे. मात्र या ‘जाणत्या राजा’ची दूरदृष्टी विकासात परावर्तीत झालेली दिसत नाही. त्यांच्या चेल्यांची मात्र ‘कोटीच्या कोटी उड्डाणे’ समोर येत आहेत.
सध्या महाराष्ट्राची परिस्थिती फारच दयनीय आहे. लोकांना रोजगार नाही. पाण्याचे दुर्भिक्ष्य असल्याने जनावरे मरत आहेत. शेतकर्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत. हे सारे अराजक गेली अनेक वर्षे सुरू आहे. शरद पवार जेव्हा केंद्रीय कृषीमंत्री होते तेव्हा त्यांनी सभागृहात सांगितले की, ‘आपल्याकडील शेतकरी प्रेमप्रकरणामुळे आत्महत्या करतात...’ यापेक्षा देशाचे आणि आपल्या राज्याचे आणखी मोठे दुर्दैव ते कोणते असणार? पुढे मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपवाले सत्तेत आले आणि तेही हाच कित्ता गिरवत आहेत. आजचे केंद्रीय मंत्रीही शेतकर्यांच्या आत्महत्यांची ही आणि अशीच कारणे सांगत आहेत.
‘इंग्रज गेले आणि कॉंग्रेसवाले आले’ अशी परिस्थिती देशात दीर्घकाळ होती. ‘सबका साथ, सबका विकास’ अशी गाजरं मोदींनी दाखवली. त्यामुळे देशात परिवर्तन घडले. मोदी यांच्यासारखा स्वच्छ चारित्र्याचा, देशहितदक्ष पंतप्रधान देशाला मिळाला. आपल्या राज्यातही परिवर्तन घडले आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा तुलनेने नवखा नेता आपल्याला मुख्यमंत्री म्हणून मिळाला. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्र भाजपला प्रभावी नेतृत्व नव्हते. मात्र फडणवीस यांनी प्रयत्नपूर्वक ती जागा भरून काढली. मुंडे यांच्यासारखा जनाधार त्यांना अजूनतरी मिळाला नाही, हे वास्तव असले तरी सत्तेत असल्याने त्यांच्याकडून अनेकांच्या अनेक अपेक्षा आहेत.
एकनाथराव खडसे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांतदादा पाटील, पंकजा पालवे असे त्यांचे सहकारी त्यांना समर्थ साथ देत आहेत. मात्र महाराष्ट्रात सध्या नको तेच विषय चर्चेला येतात आणि गाजतातही. पाण्याअभावी जनजीवन धोक्यात आले आहे आणि सध्या कोणते विषय चर्चेत आहेत? तर मंदिर प्रवेश आणि पंकजा मुंडे यांचा ‘सेल्फी!’
या सेल्फी वरून अनेक ‘सेल्फिश’ लोकांचे चेहरे उघड होत आहेत. पाण्याचा एकेक थेंब दुर्मीळ झालेला असताना पुण्या-मुंबईत क्रिकेटचे सामने होतात. त्यात कोट्यवधींचा चुराडा होेतो. लाखो लीटर पाणी त्यासाठी वाया जाते. मिरजकरांनी मोठ्या मनाने लातूरला पाणी दिल्याने ‘जलराणी’ लातूरला पोहोचली. मात्र तिथेही ‘श्रेयवादा’चा विषय चर्चेत आला. इतक्याशा पाण्याने काय होणार? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय. रेल्वेने पाणी मागवणे लातूरकरांसाठी भूषणावह आहे का? आपण लातूरमध्येच पाणी नियोजनासाठी काय करणार आहोत? असे एक ना अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.
मराठवाड्यात पाण्याची कमतरता असतानाही मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन घेतले गेले. साखर कारखाने, दारूचे कारखाने यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले गेले. अजूनही ते पाणी सुरूच आहे. एकेका घोटासाठी लोक तडफडत असताना ‘उद्योगांना पाणी मिळालेच पाहिजे’ अशी भूमिका सत्ताधारी आणि विरोधक एकदिलाने घेत आहेत. कारण याच मंडळींची कारखानदारी या पाण्यावर अवलंबून आहे. हे राजकारण न समजण्याएवढा मराठवाडी बांधव दुधखुळा नाही; मात्र ‘आलीया भोगासी असावे सादर’ म्हणत तो दिवस कंठत आहे.
माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे याच्यासारखे एखादे पिल्लू सोडून मराठवाडा, विदर्भ वेगळा करण्याची मागणी काही बांडगुळं करतात. कन्हैय्यावरून अकारण वातावरण तापवले जाते. तरूणांची माथी भडकवली जातात. कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात एका पाठोपाठ एक घोटाळे उघड व्हायचे. त्यावर जोरदार रणकंदन व्हायचे; मात्र विरोधकांकडे सध्या असे मुद्देच नाहीत. त्यांच्या दुर्दैवाने सत्ताधारी अजूनतरी कोणत्याही मोठ्या घोटाळ्यात अडकली नाहीत. त्यामुळे ‘असहिष्णुता’, ‘राष्ट्रवाद’, ‘मंदिर प्रवेश’, ‘सेल्फी’ असली काहीतरी खुसपट काढली जातात.
मराठवाड्याचा दुष्काळवाडा होतोय. मराठवाड्याचे राजस्थानसारखे वाळवंट होईल, असे अनेक अहवाल सांगत आहेत. त्याचवेळी ‘जलयुक्त शिवार’ सारखी प्रभावी योजना अंमलात येत असताना त्या विभागाच्या मंत्र्याने एखादा ‘सेल्फी’ काढला तर बिघडले कुठे? आपण करत असलेल्या कामाची होत असलेली पूर्तता पाहणे हा समाधानाचाच विषय असतो. मात्र ‘धरणात पाणीच नाही तर मी आता त्यात मुतू का?’ असा बिनडोक सवाल करणारे नेते आणि त्यांचे बगलबच्चे पंकजा मुंडे-पालवे यांना ‘सेल्फी’वरून जाब विचारत आहेत. या सगळ्या चोराच्या उलट्या बोंेबा आहेत.
यांच्या अकार्यक्षमतेचा मोठा फटका महाराष्ट्राला बसलाय. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची नेतेमंडळी हे चित्र बदलण्यासाठी काही प्रयत्न करत आहेत. राज ठाकरे यांच्यासारखा नेता मराठवाडा पिंजून काढतोय. शेतकर्यांची दुःखे समजून घेतोय! आणि दुसरीकडे हताश, हतबल झालेले, नैराश्य आलेले कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसवाले नको ते वाद निर्माण करत आहेत.
महाराष्ट्राचे चित्रच त्यामुळे गंभीर दिसतेय. मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा डाव हाणून पाडला पाहिजे. त्याचवेळी त्यांच्या चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना सहकार्यही केले पाहिजे. शिवसेनेसारखा मराठमोळा पक्ष शेतकरी हिताचे निर्णय घेतोय, त्यांच्या मदतीसाठी धावून जातोय, हे चित्र फारच आश्वासक आहे.
सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी परवा म्हणाले, ‘हिमालय गेले, सह्याद्री गेले, डोंगर आणि टेकड्याही गेल्या... आता आहेत काही उंच तर काही खुजी वारूळे! आणि वारूळातल्या उंचीतली स्पर्धा जास्त भिषण असते...!’
संजय सोनवणी यांनी ही धोक्याची घंटा दिलीय. त्यातले सत्य सर्वांनाच ठाऊक आहे. तरीही काहीजण झोपेचे सोंग घेतात. त्यांनी आता जागे झाले पाहिजे. हे चित्र बदलण्यासाठी मोठे प्रयत्न होणे ही काळाजी गरज आहे. महाराष्ट्र दिन ‘साजरा’ करणे, त्यासाठी सरकारी तिजोरीतून कोट्यवधींची जाहिरातबाजी करणे याऐवजी थोडीशी संवेदनशीलता वाढवली तर ते अधिक लाभदायक ठरेल! आपल्या नाकर्तेपणामुळे, स्वार्थसंकुचित वृत्तीमुळे, वैयक्तिक हेवेदावे आणि ईर्षेमुळे महाराष्ट्र विनाशाकडे ढकलला जाऊ नये, एवढेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते. शेवटी सेनापती बापटांच्याच ओळी आठवतात,
महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले
मराठ्याविना राष्ट्रगाडा न चाले;
खरा वीर वैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार या भारताचा!
- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092