Pages

Sunday, November 20, 2022

व्यथितेच्या भावभावनांचं शब्दरूप प्रतिनिधित्व

परभणी जिल्ह्याच्या सेलू येथील शिक्षिका आणि प्रतिभावंत कवयित्री, लेखिका जयश्रीताई सोन्नेकर यांचा ‘व्यथिता’ हा स्त्रियांच्या काळजातील कालवाकालव मांडणारा कथासंग्रह प्रकाशित होत आहे. एकीकडे स्त्रीला लक्ष्मी-सरस्वतीपासून दुर्गा-चंडिकेपर्यंत सर्वांच्या रूपात पाहण्याची आपली संस्कृती असताना दुसरीकडे मात्र स्त्रियांवरील अन्याय-अत्याचारांची मालिका सुरूच आहे. या सर्वांच्या व्यथा-वेदनांचं, त्यांच्या भावभावनांचं शब्दरूप प्रतिनिधित्व करणारी लेखिका म्हणून जयश्रीताईंचा उल्लेख करावा लागेल. एखाद्याच्या असह्य वेदना, त्याचं अपार दुःख, त्याचा जिवघेणा संघर्ष पाहून करूणाभाव जागृत होणं, हृदयाला पाझर फुटत त्याच्यासाठी व्यथित होणं, परपिडा समजून घेत शोक व्यक्त करणं वेगळं आणि हे सर्व स्वतःच्या वाट्याला आल्यानं या अशा व्यथा सहन करणं वेगळं. जयश्रीताईंनी आजूबाजूच्या माता-भगिनींच्या व्यथा समजून घेऊन त्या शब्दबद्ध केल्या आहेत. मातृसंस्कृतीच्या गौरवाची परंपरा अभिमानानं मिरवणार्‍या मुर्दाड समाजाच्या मनोवृत्तीचा भंडाफोडच या सगळ्या कथांतून त्यांनी प्रभावीपणे केला आहे.
या संग्रहातील दहा कथा म्हणजे दहा जीवांच्या आयुष्याची घेतलेली कथारूप दखलच आहे. यातल्या सर्व नायिका आपल्याला खिळवून ठेवतात. आपल्यातील माणुसकीचा अंश जागवतात. आपल्याला आपल्या कर्तव्याची जाणीव करून देतात आणि माणूस म्हणून जगण्याची शिकवणही देतात. मुख्य म्हणजे यात कुठंही एकसुरीपणा आला नाही. संपूर्ण पुरूष वर्गाविषयी टोकाचा द्वेष किंवा स्त्रीवादाच्या बंडाचा झेंडा फडकवणंही नाही. जयश्रीताई त्यांच्यासोबतच्या चारचौघींकडं उघड्या डोळ्यानं पाहतात, त्यांना समजून घेऊन त्यांच्या दुःखाला वाहण्याचा मार्ग मोकळा करून देतात. 

 ‘वेदना अंतरीची’ ही पहिली कथा वाचतानाच आपल्याला गलबलून येतं. ट्रेनिंग ऑर्डर निघाल्यानंतर सगळे एकत्र येतात आणि विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमात प्रत्येकानं स्वतःविषयी बोलावं असं ठरतं. ‘विधवेचं जीवन कसं जगावं हे त्या विधवेपेक्षा समाजानं निश्चित केलेलं असतं’ हे विदारक वास्तव या कथेत लेखिकेनं खूप सामर्थ्यानं मांडलंय. यातील कथानायिका असलेल्या आसावरीचं नाव अनपेक्षितपणे घेतलं जातं आणि तिला बोलण्याचा आग्रह होतो. त्यावेळी ती म्हणते, ‘‘ज्या घरात कुटुंबप्रमुख समजला जाणारा नवराच आडदांट, बेजबाबदार, बायकोला मारणारा असतो, त्या कुटुुंंबाला कुटुंब म्हणायचं का हो? ज्यानं वारशात दु:ख ठेवलेलं असतं, ज्या घराची स्थिती विस्कळीत असते, त्या घराला कुटुंब नावाची संस्था असते का हो? मी आणि माझा मुलगा एवढंच कुटुंब!’’ ही कथा वाचताना कुणाचेही डोळे खाडकन उघडतील. 

तशा म्हटल्या तर या लघुकथा; मात्र जयश्रीताईंनी आशय आणि विषयाच्या दृष्टीनं त्या अत्यंत उंचीवर नेऊन ठेवल्या आहेत. दारूच्या नशेत नवरा दाराला बाहेरून कडी लावतो आणि शेजारच्या गाडीतून पेट्रोल काढून दारावर टाकतो. त्यातच त्याच्या अंगावरही पेट्रोल सांडतं आणि दरवाजा पेटवताना भडका उडून तोही पेटतो. नवरा डोळ्यासमोर जळत असताना आतून आसावरी काहीच करू शकत नाही. ही ‘अंतरीची वेदना’ वाचताना, अनुभवताना वाचक मात्र व्याकुळ होतो. ‘मृदू झंकार’ या कथेत ‘मनोरंजनासाठी गाणार्‍या गायकांकडं पाहण्याचा दृष्टिकोन स्वच्छ का नसतो?’ असा प्रश्न पडलेल्या सविताच्या मनाची घालमेल आली आहे.

समाजातील सत्प्रवृत्तीचा दाखला देताना यात अनेक सुभाषितांसारखी जीवनमूल्यं आली आहेत. ‘स्टेजवर भले तुझं कुणी किती कौतुक करो पण लोकांना घरी राहणारी बायको जास्त पसंत असते. स्त्रियांचं थोरपण सहन करणारे कमीच!’ असं वास्तव मंजू मांडते खरी; पण संदीप आणि त्याच्या घरच्यासारखे प्रेमळ लोक सविताला मिळतात. ‘अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं की व्यक्ती बावरून जाते, संभ्रमात पडते. उणीवेत जगणार्‍याला त्याच पठडीतलं जीवन अंगवळणी पडतं. परमेश्वराकडूनही त्याच्या अपेक्षा संपलेल्या असतात’ असं जीवनविषयक तत्त्वज्ञान या कथेत येतं. ‘आधार नसलेल्या व्यक्तिवर लोक टपून असतात बोलण्यासाठी आणि जेव्हा सौंदर्य, बुद्धिमत्ता एकत्र येऊनही साधारण परिस्थिती असेल नं... मग तर त्या व्यक्तिच्या प्रत्येक हालचालीची बातमीच होते...’ हे वास्तव जयश्रीताईंनी कथेच्या माध्यमातून अधोरेखित केलंय. 

 ‘सगळ्या घराचा केंद्रबिंदू असलेल्या स्त्रीकडं दुर्लक्ष झालं की ती स्वतःला एकटेपणा बहाल करत स्वतःचीच कीव करू लागते’ हे सांगणारी ‘कोलाहल’ ही कथा स्त्री मनाच्या द्वंद्वाचा समर्पक आढावा घेते. कुटुंबातील जबाबदार्‍या पार पाडताना इतरांशी तुलना का करायची? आणि नेमकं कुणाला ‘भाग्यवान म्हणायचं’ ते या कथेत खूप प्रभावीपणे मांडलंय. यातला मतितार्थ समजून घेतला तर उद्ध्वस्त होऊ पाहणारे अनेक संसार वाचतील आणि वेगळ्या कौन्सिलरची गरजही भासणार नाही. 

कथेच्या माध्यमातून अनेक गंभीर विषयही सहजपणे मांडणं आणि वाचकांना अंतर्मुख व्हायला भाग पाडणं हे जयश्रीताईंचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणूनच हा कथासंग्रह अनेक व्यथा-वेदना मांडण्याबरोबरच माणसाला माणूस म्हणून जोडून ठेवणारा आहे. नवरा गेल्यावर ‘चांगलं दिसणं’ लोकांना खुपणार्‍या कुसूमची व्यथा ‘एकटी’ या कथेत आलीय. ‘विधवांना मनं नसतात? त्यांनी जगू नये?’ असा रोकडा सवाल या कथेत लेखिका करते. 

पदरात तीन मुलं आणि वाट्याला फाटका संसार आलेल्या ‘शांता’ची गोष्ट वाचतानाही अंतःकरण भरून येतं. जयंतीचं आणि तिचं नातं समजून घेताना स्त्री मनाचे अनेक पदर आपोआप उलगडत जातात. जिवंतपणी साधी रिक्षा मिळाली नाही पण शांताला न्यायला नंतर स्वर्गरथ येतो, हे पाहून जयंती टाहो फोडते. तिचा आक्रोश म्हणजे समाजाला दिलेली सणसणीत चपराक आहे. ‘पुन्हा येऊ नकोस या स्वार्थी जगात, आपलं समर्पण द्यायला’ हे निरोपाचे शब्द वाचकांना हेलावून सोडतात. ‘इंद्रजाल’ या कथेत रेणू आणि अलकाचं जगणं आलंय. आयुष्याची केरसुणी होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक बहुरूप्यांप्रमाणे चेहरा रंगवत भावना लपवाव्या लागतात याचं शल्य आहे. अलकाचं रेणूसाठी व्याकूळ होणं आणि परमेश्वराकडं ‘रेणूचं सौंदर्य अबाधित ठेव आणि तिचं सौभाग्य मर्यादित’ असं मागणं मागणं आपलं सामाजिक वास्तव दाखवून देतं. 

 ‘उत्तरार्ध’ या कथेत मंदाताईंच्या वार्धक्याची कहाणी मांडताना लेक सुरभीसोबतचे अनुबंधही आलेत. आयुष्याकडं सकारात्मकतेनं पहायला शिकवणारी ही कथा आहे. हृदयाला छिद्र असलेल्या मुलीचं चार दिवसाचं तरी बाईचं जगणं पहावं म्हणून तिच्या लग्नाचा घाट घालणारी आई ‘काळीज’ या कथेत येते. ‘आई’ या कथेतील शिक्षिका रिना, विद्यार्थी सिद्धेश्वर, त्याची जन्मदात्री गेल्यावर भाजलेल्या हातांचा पाळणा करून त्याला फुलांप्रमाणं वाढवणारी आणि त्याच्या ‘आई’च्याच भूमिकेत गेलेली आजी हे सगळं वाचताना मन भरून येतं. ‘जन्मदात्री होता येतं पण ‘आई’ सर्वांनाच होता येत नाही’ असा विचार मांडणारी ही कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेते. ‘पिल्लू’ ही या संग्रहातली शेवटची कथा. ही कथा अक्षरशः हेलावून टाकते. आपलं पिल्लू, आपलं बाळ आपल्या डोळ्यादेखत जाणं यापेक्षा वाईट काही नसतं. नियतीपुढं मात्र आपण हतबल असतो. तरीही परमेश्वरी लीला समजावून घेत उभं राहणं गरजेचं असतं. या कथेतील ही आर्तता, हे दुःख, या वेदना अनुभूतीच्या पातळीवर समजून घेतल्यास या ‘व्यथिते’चा हुंकार कळेल. 

 प्रथमदर्शनी या शोकात्मिका वाटल्या तरी यात मानवी भावभावना आल्यात. रोजच्या जगण्यातील वास्तव आलंय. या कथा म्हजणे स्त्री जीवनाची व्यथा आहे. ‘हृदयी अमृत नयनी पाणी’ असं तिचं जे वर्णन केलं जातं ते यात कथारूपांतून मांडलं आहे. वर्षानुवर्षे किंबहुना शतकानुशतके तिच्या डोळ्यातील हे ‘पाणी’ आपण उघड्या नजरेनं बघू शकलो नाही तर हे आपल्या पुरूषार्थाला काळीमा फासणारं आहे. मराठवाड्यातल्या सेलूसारख्या भागात वास्तव्यास असलेल्या जयश्रीताईंनी मानवतावादी दृष्टिकोनातून या कथांची मांडणी केली आहे. यात शब्दांचं अवडंबर नाही. कसली रूक्षता नाही. उपदेशाचा आवही नाही. अन्यायाची तक्रार नाही. जे आहे, जसं आहे ते मात्र प्रभावीपणे मांडलंय. छोट्या-छोट्या संवादाच्या माध्यमातून त्यांनी वाचकांच्या मनाची पकड घेतलीय. त्यांचं लेखन काळजाचा तळ ढवळून काढतं. प्रत्येक संवेदनशील व्यक्ती हे वाचून स्वतःत काही बदल करण्याचा प्रयत्न नक्की करेल. हेच जयश्रीताईंच्या लेखणीचं यश म्हणावं लागेल. 

कथा हा प्रांत सध्या दुर्लक्षित राहत असताना त्यांनी केलेला हा प्रयत्न निश्चितच दखलपात्र आहे. विशेषतः ‘जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे’ या संतवचनाप्रमाणे एका महिलेनं मांडलेल्या समस्त स्त्री जातीच्या व्यथांचा हा आक्रोश आहे. तो समजून घेणं आणि स्वतःत काही बदल करणं हाच त्यावरील एकमात्र उपाय असेल. जयश्रीताईंच्या भावी लेखनासाठी माझ्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा! 

  - व्यथिता 
लेखिका - जयश्री सोन्नेकर 
प्रकाशक - चपराक, पुणे 
हा कथासंग्रह घरपोच मागविण्यासाठी www.chaprak.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. 

  - घनश्याम पाटील 
लेखक, प्रकाशक आणि संपादक 7057292092

No comments:

Post a Comment