Pages

Monday, June 21, 2021

सरनाईकांचा लवंगी फटाका


प्रताप सरनाईक
हे शिवसेना सोडून भाजपच्या वाटेवर आहेत असं स्पष्ट चित्र आहे. शिवसेना सोडणं म्हणजे राजकीय आत्महत्या! परंतु अशी आत्महत्या करावी लागली तरी चालेल पण आपलं अर्थकारण सांभाळलं गेलं पाहिजे एवढीच काळजी अशा नेत्यांना असते. प्रताप सरनाईक नावाचा एक रिक्षावाला दहा-वीस वर्षाच्या कारकिर्दीत शंभर कोटींचा मालक कसा झाला? हे समजून घेण्यासाठी ईडीच्या चौकशीची आवश्यकता नाहीच असं म्हणण्यात काही अर्थ नाही. दोन-दोन पिढ्या शेतीत राबणार्‍या शेतकर्‍याच्या तिसर्‍या पिढीवर आत्महत्या करण्याची वेळ येते आणि एका रिक्षावाल्याकडं अशी कोणती गोष्ट असते की ज्याच्या जोरावर तो एवढं मोठं साम्राज्य उभं करू शकतो? त्यामुळं या चौकशीला त्यांनी सामोरं जाणं गरजेचं आहे.

गेल्या दोन वर्षाचा कार्यकाल बघितला तर फक्त शिवसेनेच्या आमदारांची आणि मंत्र्यांची चौकशी लागतेय. त्यांना टार्गेट केलं जातंय. शिवसेनेचे अनिल परब, रवींद्र वायकर हे भाजपच्या रडारवर आहेत. संजय राऊतांना ईडीची नोटीस दिली गेली. त्या मानानं काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री धुतल्या तांदळासारखे आहेत असं समजण्याचं कारण नाही. ईडी या स्वायत्त संस्थेचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल त्या पद्धतीनं करण्याचा प्रयोग भाजपनं पश्चिम बंगालमध्ये केला असा आरोप केला जातो. तोच प्रयोग महाराष्ट्रातही सुरू आहे का? असा प्रश्न पडतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या या प्रयोगाला ममता बॅनर्जी पुरून उरल्या. त्या ‘खेला होबे’ म्हणाल्या आणि त्यांनी खेळ केला. महाराष्ट्रात मात्र तशी परिस्थिती नाही. ‘मोडेन पण वाकणार नाही’ असे ताठ कण्याचे नेते महाराष्ट्रात कोणत्याही पक्षात दिसत नाहीत. अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी का झाली नाही? आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली काही वर्षे महाराष्ट्रात भाजपची बी टीम म्हणून काम करतो आहे का? यावरही संशोधन करण्याची वेळ आलीय.

राजकारणात भ्रष्टाचार ही सर्व काळात असलेली फार मोठी समस्या आहे. भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि मोठेपणा मिरवण्यासाठी राजकारणात आलेले धनदांडगे यामुळं सामान्य माणसाचं आयुष्य कमालीचं हवालदिल होतं. शिवसेनेच्या जुन्या आमदारांना जर अशा पद्धतीनं रणांगणातून पळून जावं वाटत असेल तर शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा आहे. प्रताप सरनाईक हे ‘शिवसेना भाजपबरोबर युती करत नाही,’ या कारणावरून भाजपमध्ये गेले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. काही लोकांना असं वाटतं की प्रताप सरनाईक हे उद्धव ठाकरे यांचे इतक्या जवळचे आहेत की लिहिलं गेलेलं पत्र, व्हायरल झालेलं पत्र हे उद्धव ठाकरे यांच्या संमतीनंच लिहिलं गेलंय! मात्र पुन्हा भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याची चूक उद्धव ठाकरे करणार नाहीत.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उद्धव यांना अपेक्षित असेलेला आदर अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळतोय. सत्तेत असताना, एक सारीपाठ जमलेला असताना, राष्ट्रीस सर्वेक्षणात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून अग्रणी असताना आहे हा डाव मोडायचा आणि भाजपकडे जायचं यात उद्धव ठाकरे यांना काही रस असेल असं वाटत नाही. भाजपाच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांची वाटचाल शिवसेनेच्या दिशेनं सुरू आहे. अशावेळी पक्षविस्तार होतोय, पक्षाचं स्थान बळकट होतंय. हे सगळं सोडून भाजपच्या मागं जाण्याची उद्धव यांना काही गरज आहे असं वाटत नाही.

प्रताप सरनाईक यांचा जेवढा राजकीय गैरफायदा घेता येईल आणि शिवसेनेला अस्थिर करता येईल तेवढे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. सरनाईकांच्या लेटरबॉँबला बाँब म्हणणंही चुकीचं वाटतंय. त्या पत्राचा काहीच धमाका होणार नसल्यानं फार तर याला आपण ‘लवंगी फटाका’ म्हणूया. बरेचसे लवंगी फटाके हे फुसके असतात. ते लावले तरी त्याची वात ओली झाल्यानं पेटत नाही. सरनाईकांचा हा फटाका फुटण्याची, त्याचा स्फोट होण्याची, आवाजाचा धमाका होण्याची शक्यता नाही. सरनाईक हे काही महाराष्ट्राच्या राजकारणातलं फार मोठं नाव नाही. ते गाजलेलं व्यक्तिमत्त्व नाही. त्यांच्याकडं वक्तृत्व नाही किंवा ते पक्षाच्या पहिल्या फळीतले महत्त्वाचे नेतेही नाहीत. पक्षाला महानगरात अर्थपुरवठा करणारे जे आमदार आहेत त्यापैकी एक एवढ्यापुरतं त्यांचं स्थान मर्यादित आहे.

प्रताप सरनाईक असोत अथवा नारायण राणे! शिवसेना हे अशा अनेक नेत्यांसाठीचं ‘करिअर’ आहे का? राजकारणात यायचं, प्रचंड पैसा मिळवायचा आणि धनदांडगे व्हायचं यासाठी शिवसेना हा पक्ष वापरला जातो का? हे सर्व होताना मराठी माणूस मात्र आहे तिथंच राहतोय का? याबद्दलचं आत्मचिंतन पक्षनेतृत्वानं आता पक्षाला 55 वर्षे झाल्यावर तरी पुन्हा एकदा करायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे हे चक्र असं थांबणारं नाही. शिवसेनेच्या आमदारांना, त्यांच्या मंत्र्यांना कायम टार्गेंट केलं जाईल. राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही असंच टार्गेेट करून पदावरून घालवण्यात आलं. आपल्याला जो माणूस नकोय त्याला त्या पदावरून घालवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील सातत्यानं प्रयत्न करत असतील तर महाराष्ट्रातल्या महाआघाडी सरकारला आक्रमक व्हावं लागेल.

महाराष्ट्र सरकारच्या हातातही यंत्रणा आहेत आणि भाजपचा गेल्या पाच वर्षांचा कारभारही खूप चांगला आहे अशातला भाग नाही. भाजपच्या काळातही अनेक भ्रष्ट गोष्टी घडल्या आहेत. सुधीर मुनगंटीवारांनी 33 कोटी झाडं कशी आणि कुठं लावली? तितकी झाडं लावल्यावर महाराष्ट्राचं दंडकारण्यासारखं एक मोठं जंगल झालं नसतं का? फडणवीसांच्या जलयुक्त शिवारमध्ये प्रचंड गैरव्यवहार झाले. पंकजा मुंडे यांचा चिकी घोटाळा गाजला. या व अशा कशाचीही चौकशी सध्याच्या महाआघाडी सरकारकडून होत नाही कारण राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम म्हणून कार्यरत असावी. अशी चौकशी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना अपेक्षित धाडस दाखवावंच लागेल. पक्षाच्या एकेका आमदाराला असं टार्गेंट केलं जात असताना तुम्ही जर त्याच्या मागं उभे रहात नसाल, त्याला मदत करत नसाल तर तुम्हाला पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना उत्तरं द्यावी लागतील.

उसने नेते गोळा करून पक्ष मोठा होत नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं तो अनुभव घेतलाच. चित्रा वाघ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणूनच शोभत होत्या. त्यांना पक्षात आणून महिला आघाडीच्या अध्यक्ष करून काय मिळवलंत? वर्षानुवर्षे भाजपमध्ये निष्ठेनं काम करणार्‍या अनेक कर्तृत्ववान महिला आहेत. प्रा. मेधा कुलकर्णी यांची महिला आघाडीची प्रमुख म्हणून वर्णी लावली असती तर एक धडाडीची आणि लढाऊ  प्राध्यापक तिथं खूप चांगलं काम करताना दिसली असती. आयात केलेल्या लोकांवर किती विश्वास ठेवायचा आणि त्यांच्या मदतीवर पक्ष कसा चालवायचा हे भाजपनंही ठरवण्याची वेळ आली आहे. गोपीचंद पडळकर, प्रवीण दरेकर, राम कदम, मनसेत जाता-जाता राहिलेले अतुल भातखळकर या लोकांनी भाजपचं जेवढं नुकसान केलंय तेवढं नुकसान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी मिळूनही गेल्या दोन वर्षात केलं नाही.

प्रताप सरनाईक, नारायण राणे, अनिल परब यांची चौकशी करायला काहीच हरकत नाही. त्यांना चौकशीला सामोरं जात आर्थिक हिशोब द्यावे लागतील. ते देऊ शकत नसतील तर त्यांच्याविषयी सहानुभूती वाटण्याचं कारण नाही. प्रताप सरनाईक यांच्यासारख्या नेत्याच्या मागं स्वतःशिवाय एकही आमदार नाही. त्याचा कसलाही फायदा भाजपला होणार नाही. उलट असा नेता गेला तर त्या ठिकाणी एखादा नवा कार्यक्षम नेता देणं शिवसेनेला सोपं जाईल. कदाचित भाजपकडून सेनेची वाटचाल अधिक सोपी केली जातेय. अनेक वर्षे जागा अडवून बसलेली अशी जी मंडळी आहेत त्यांची यादी उद्धव यांनीच तर भाजपकडे दिली नाही ना? या जड झालेल्या आणि जागा अडवून बसलेल्या नेत्यांची सोय भाजपनं परस्सर केली तर ते त्यांना चांगलंच आहे असं वाटत असेल.

महाराष्ट्राचं राजकारण कधी नव्हे ते एका वेगळ्या टप्प्यावर आलंय. लोकांच्या प्रश्नांशी काहीही देणंघेणं नसलेल्या सर्वपक्षीय राजकारण्यांचं वागणं कमालीचं दुःखद आहे. प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थासाठी काम करताना दिसतोय. आज बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही आणि त्यांचा शिवसैनिकही राहिला नाही. बाळासाहेबांच्या शब्दाखातर रस्त्यावर उतरणारी, तुरूंगात जाणारी पिढी सध्या राजकारणात नाही. त्याऐवजी ते भाजपमध्ये जाण्यात धन्यता मानतात. या सगळ्या परिस्थितीत प्रताप सरनाईक यांच्यासारखी प्यादी पुढे करत ती कशीही फिरवली तरी पक्षाला त्यांचा काहीही उपयोग होणार नाही याची नोंद भाजपनं घ्यायला हवी. मोडेन पण वाकणार नाही, लढेन पण माघार घेणार नाही अशा पद्धतीनं लढणारा एखादा नेता आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात असायला हवा होता असं वाटतं.
- घनश्याम पाटील
7057292092
दै. पुण्य नगरी, मंगळवार, दि. 22 जून 2021
 

8 comments:

  1. बाळासाहेबांची शिवसेना त
    यांच्या बरोबरच संपली.. आता कातडी पांघरलेले वाघ.
    भाजपची सर्वात मोठी चुक.म्हणजे शिवसेनेचा सोडलेला हात.जे आता आहे ते भाजपने दिले असते तरी काही बिघडल नसत.आता पंगत उठलउठल्ययावर खरकट गोळा करण्यात काय अर्थ.लोकांनी अक्षता टाकल्यावर हनीमूनला नवरदेव बदलावा तस झाल आणि नवरदेव गेली तर जाऊदे आणि वर्हाडी हताश होऊन पहात बसले.
    आता वर्हाडान शहाण व्हाव आणि लिव्ह इन मधे राणावर अक्षता टाकू नयेत.

    राजकारणात जनतेला गृहीत धरण्याइयकी जनता मुर्दाड झाली आहे. घुगर्या त्याचा उदो..आयुष्य.. भविष्य याचा विचार नाही.
    २५ वर्षापुर्वी भाजी विकणारे..रिक्षा चालवणारे..कोंबड्या पळवणारे..लिंब विकणारे करोडपती होतात. कुणी एकरात कोटी ची भाजी पिकवत.. कुणी कुड्यात कोटीची भाजी.. सारे चमत्कार जनता पहात ..वाचत जनता काही घेण नसल्यासारखी..तर विरोधात बसणारे राखणदार.. अशांंच शुद्धीकरण करण्याचा धंदा करतात.
    तेरीभी चुप..मेरीभी चुप..
    *एखादा चपराक आवाज काढतो पण तोही जनतेच्या कानापर्यंतच पोचतो*.
    अशा समाजाच देवच भल करो..

    🙏🙏©अनिल कोठे.

    ReplyDelete

  2. अनिल कोठेJune 22, 2021 at 12:44 AM
    बाळासाहेबांची शिवसेना तर
    यांच्या बरोबरच संपली..
    आता कातडी पांघरलेले वाघ.
    भाजपची सर्वात मोठी चुक म्हणजे शिवसेनेचा सोडलेला हात.जे आता आहे ते जर भाजपने दिले असते तरी काही बिघडल नसत.आता पंगत उठल्यावर खरकट गोळा करण्यात काय अर्थ.
    लोकांनी अक्षता टाकल्यावर हनीमूनला नवरदेव बदलावा तस झाल आणि नवरदेव गेली तर जाऊदे या भुमिकेत आणि वर्हाडी हताश होऊन पहात बसले.
    आता वर्हाडान शहाण व्हाव आणि लिव्ह इन मधे रहाणारावर अक्षता टाकू नयेत.

    राजकारणात जनतेला गृहीत धरण्याइयकी जनता मुर्दाड झाली आहे. घुगर्या त्याचा उदो..आयुष्य.. भविष्य याचा विचार नाही.
    २५ वर्षापुर्वी भाजी विकणारे..रिक्षा चालवणारे..कोंबड्या पळवणारे..लिंब विकणारे करोडपती होतात. कुणी एकरात कोटी ची भाजी पिकवत.. कुणी कुंंड्यात कोटीची भाजी.. सारे चमत्कार जनता पहात ..वाचत जनता काही घेण नसल्यासारखी..
    तर विरोधात बसणारे राखणदार अशांंच शुद्धीकरण करण्याचा धंदा करतात.
    तेरीभी चुप..मेरीभी चुप..सारे घोटाळे.. गाठोड्यात..हव तेंव्हा गाठ सोडायची.. हवा त्याचा पेपर काढायचा..जनतेला नादी लावायच आणि हे परत गळ्यात गळा घालून लग्नमंडपात आणि वर्हाडी अक्षता घेऊन तयार..


    *एखादा चपराक आवाज काढतो पण तोही जनतेच्या कानापर्यंतच पोचतो*.
    अशा समाजाच देवच भल करो..

    🙏🙏©अनिल कोठे.

    ReplyDelete
  3. आताच्या घडीला सगळेच दिशाहीन, भ्रमित आणि संकुचित झाले आहेत ! देशकारण हा विषय नाहीच केवळ स्वार्थ आणि सत्तालोलुप राजकारण सुरू आहे ! भारत संपवण्यामध्ये ममता, अखिलेश, राहुल, सोनिया ,शरद हे सक्रीय असतील तर जनतेची आणि काही प्रमाणात देशभक्त राजकारण्यांची निष्क्रीयता त्यांना मदत ठरते आहे !
    एकुणात काय तर हिंदु आणि हिंदुस्थान लवकरच नष्ट होणार हे सत्य अटळ आहे !

    ReplyDelete
  4. पाटील सर असा नेता म्हणून आपण पुढे यावे ही प्रांजल अपेक्षा आहे.

    ReplyDelete
  5. This letter is just to pressurize NCP and Congress not more than that. And bJP leaders like Chandrakant Patil falled in the trap. And politics is just a career for almost all the politicians not only whom you have mentioned. How come young chaps have a property of crore without doing any considerable business of their own. So nothing will happen, if any of party will go out and tie up with BJP will not be surprise and will give it a sweet name like, महाराष्ट्र हितासाठी आम्ही हे केले आहे.

    ReplyDelete
  6. वास्तवशिल लेखन...

    ReplyDelete
  7. स्वार्थाने भरलेलं राजकारण
    कुणालाच कुणाचं काही पडलेलं नाही.

    ReplyDelete