Pages

Monday, June 21, 2021

सरनाईकांचा लवंगी फटाका


प्रताप सरनाईक
हे शिवसेना सोडून भाजपच्या वाटेवर आहेत असं स्पष्ट चित्र आहे. शिवसेना सोडणं म्हणजे राजकीय आत्महत्या! परंतु अशी आत्महत्या करावी लागली तरी चालेल पण आपलं अर्थकारण सांभाळलं गेलं पाहिजे एवढीच काळजी अशा नेत्यांना असते. प्रताप सरनाईक नावाचा एक रिक्षावाला दहा-वीस वर्षाच्या कारकिर्दीत शंभर कोटींचा मालक कसा झाला? हे समजून घेण्यासाठी ईडीच्या चौकशीची आवश्यकता नाहीच असं म्हणण्यात काही अर्थ नाही. दोन-दोन पिढ्या शेतीत राबणार्‍या शेतकर्‍याच्या तिसर्‍या पिढीवर आत्महत्या करण्याची वेळ येते आणि एका रिक्षावाल्याकडं अशी कोणती गोष्ट असते की ज्याच्या जोरावर तो एवढं मोठं साम्राज्य उभं करू शकतो? त्यामुळं या चौकशीला त्यांनी सामोरं जाणं गरजेचं आहे.

गेल्या दोन वर्षाचा कार्यकाल बघितला तर फक्त शिवसेनेच्या आमदारांची आणि मंत्र्यांची चौकशी लागतेय. त्यांना टार्गेट केलं जातंय. शिवसेनेचे अनिल परब, रवींद्र वायकर हे भाजपच्या रडारवर आहेत. संजय राऊतांना ईडीची नोटीस दिली गेली. त्या मानानं काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री धुतल्या तांदळासारखे आहेत असं समजण्याचं कारण नाही. ईडी या स्वायत्त संस्थेचा वापर स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल त्या पद्धतीनं करण्याचा प्रयोग भाजपनं पश्चिम बंगालमध्ये केला असा आरोप केला जातो. तोच प्रयोग महाराष्ट्रातही सुरू आहे का? असा प्रश्न पडतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या या प्रयोगाला ममता बॅनर्जी पुरून उरल्या. त्या ‘खेला होबे’ म्हणाल्या आणि त्यांनी खेळ केला. महाराष्ट्रात मात्र तशी परिस्थिती नाही. ‘मोडेन पण वाकणार नाही’ असे ताठ कण्याचे नेते महाराष्ट्रात कोणत्याही पक्षात दिसत नाहीत. अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी का झाली नाही? आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेली काही वर्षे महाराष्ट्रात भाजपची बी टीम म्हणून काम करतो आहे का? यावरही संशोधन करण्याची वेळ आलीय.

राजकारणात भ्रष्टाचार ही सर्व काळात असलेली फार मोठी समस्या आहे. भ्रष्टाचार, गुंडगिरी आणि मोठेपणा मिरवण्यासाठी राजकारणात आलेले धनदांडगे यामुळं सामान्य माणसाचं आयुष्य कमालीचं हवालदिल होतं. शिवसेनेच्या जुन्या आमदारांना जर अशा पद्धतीनं रणांगणातून पळून जावं वाटत असेल तर शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा आहे. प्रताप सरनाईक हे ‘शिवसेना भाजपबरोबर युती करत नाही,’ या कारणावरून भाजपमध्ये गेले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही. काही लोकांना असं वाटतं की प्रताप सरनाईक हे उद्धव ठाकरे यांचे इतक्या जवळचे आहेत की लिहिलं गेलेलं पत्र, व्हायरल झालेलं पत्र हे उद्धव ठाकरे यांच्या संमतीनंच लिहिलं गेलंय! मात्र पुन्हा भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याची चूक उद्धव ठाकरे करणार नाहीत.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून उद्धव यांना अपेक्षित असेलेला आदर अतिशय चांगल्या पद्धतीनं मिळतोय. सत्तेत असताना, एक सारीपाठ जमलेला असताना, राष्ट्रीस सर्वेक्षणात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून अग्रणी असताना आहे हा डाव मोडायचा आणि भाजपकडे जायचं यात उद्धव ठाकरे यांना काही रस असेल असं वाटत नाही. भाजपाच्या अनेक नेते आणि कार्यकर्त्यांची वाटचाल शिवसेनेच्या दिशेनं सुरू आहे. अशावेळी पक्षविस्तार होतोय, पक्षाचं स्थान बळकट होतंय. हे सगळं सोडून भाजपच्या मागं जाण्याची उद्धव यांना काही गरज आहे असं वाटत नाही.

प्रताप सरनाईक यांचा जेवढा राजकीय गैरफायदा घेता येईल आणि शिवसेनेला अस्थिर करता येईल तेवढे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. सरनाईकांच्या लेटरबॉँबला बाँब म्हणणंही चुकीचं वाटतंय. त्या पत्राचा काहीच धमाका होणार नसल्यानं फार तर याला आपण ‘लवंगी फटाका’ म्हणूया. बरेचसे लवंगी फटाके हे फुसके असतात. ते लावले तरी त्याची वात ओली झाल्यानं पेटत नाही. सरनाईकांचा हा फटाका फुटण्याची, त्याचा स्फोट होण्याची, आवाजाचा धमाका होण्याची शक्यता नाही. सरनाईक हे काही महाराष्ट्राच्या राजकारणातलं फार मोठं नाव नाही. ते गाजलेलं व्यक्तिमत्त्व नाही. त्यांच्याकडं वक्तृत्व नाही किंवा ते पक्षाच्या पहिल्या फळीतले महत्त्वाचे नेतेही नाहीत. पक्षाला महानगरात अर्थपुरवठा करणारे जे आमदार आहेत त्यापैकी एक एवढ्यापुरतं त्यांचं स्थान मर्यादित आहे.

प्रताप सरनाईक असोत अथवा नारायण राणे! शिवसेना हे अशा अनेक नेत्यांसाठीचं ‘करिअर’ आहे का? राजकारणात यायचं, प्रचंड पैसा मिळवायचा आणि धनदांडगे व्हायचं यासाठी शिवसेना हा पक्ष वापरला जातो का? हे सर्व होताना मराठी माणूस मात्र आहे तिथंच राहतोय का? याबद्दलचं आत्मचिंतन पक्षनेतृत्वानं आता पक्षाला 55 वर्षे झाल्यावर तरी पुन्हा एकदा करायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे हे चक्र असं थांबणारं नाही. शिवसेनेच्या आमदारांना, त्यांच्या मंत्र्यांना कायम टार्गेंट केलं जाईल. राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही असंच टार्गेेट करून पदावरून घालवण्यात आलं. आपल्याला जो माणूस नकोय त्याला त्या पदावरून घालवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील सातत्यानं प्रयत्न करत असतील तर महाराष्ट्रातल्या महाआघाडी सरकारला आक्रमक व्हावं लागेल.

महाराष्ट्र सरकारच्या हातातही यंत्रणा आहेत आणि भाजपचा गेल्या पाच वर्षांचा कारभारही खूप चांगला आहे अशातला भाग नाही. भाजपच्या काळातही अनेक भ्रष्ट गोष्टी घडल्या आहेत. सुधीर मुनगंटीवारांनी 33 कोटी झाडं कशी आणि कुठं लावली? तितकी झाडं लावल्यावर महाराष्ट्राचं दंडकारण्यासारखं एक मोठं जंगल झालं नसतं का? फडणवीसांच्या जलयुक्त शिवारमध्ये प्रचंड गैरव्यवहार झाले. पंकजा मुंडे यांचा चिकी घोटाळा गाजला. या व अशा कशाचीही चौकशी सध्याच्या महाआघाडी सरकारकडून होत नाही कारण राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम म्हणून कार्यरत असावी. अशी चौकशी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना अपेक्षित धाडस दाखवावंच लागेल. पक्षाच्या एकेका आमदाराला असं टार्गेंट केलं जात असताना तुम्ही जर त्याच्या मागं उभे रहात नसाल, त्याला मदत करत नसाल तर तुम्हाला पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांना उत्तरं द्यावी लागतील.

उसने नेते गोळा करून पक्ष मोठा होत नाही. पश्चिम बंगालमध्ये भाजपनं तो अनुभव घेतलाच. चित्रा वाघ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष म्हणूनच शोभत होत्या. त्यांना पक्षात आणून महिला आघाडीच्या अध्यक्ष करून काय मिळवलंत? वर्षानुवर्षे भाजपमध्ये निष्ठेनं काम करणार्‍या अनेक कर्तृत्ववान महिला आहेत. प्रा. मेधा कुलकर्णी यांची महिला आघाडीची प्रमुख म्हणून वर्णी लावली असती तर एक धडाडीची आणि लढाऊ  प्राध्यापक तिथं खूप चांगलं काम करताना दिसली असती. आयात केलेल्या लोकांवर किती विश्वास ठेवायचा आणि त्यांच्या मदतीवर पक्ष कसा चालवायचा हे भाजपनंही ठरवण्याची वेळ आली आहे. गोपीचंद पडळकर, प्रवीण दरेकर, राम कदम, मनसेत जाता-जाता राहिलेले अतुल भातखळकर या लोकांनी भाजपचं जेवढं नुकसान केलंय तेवढं नुकसान काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांनी मिळूनही गेल्या दोन वर्षात केलं नाही.

प्रताप सरनाईक, नारायण राणे, अनिल परब यांची चौकशी करायला काहीच हरकत नाही. त्यांना चौकशीला सामोरं जात आर्थिक हिशोब द्यावे लागतील. ते देऊ शकत नसतील तर त्यांच्याविषयी सहानुभूती वाटण्याचं कारण नाही. प्रताप सरनाईक यांच्यासारख्या नेत्याच्या मागं स्वतःशिवाय एकही आमदार नाही. त्याचा कसलाही फायदा भाजपला होणार नाही. उलट असा नेता गेला तर त्या ठिकाणी एखादा नवा कार्यक्षम नेता देणं शिवसेनेला सोपं जाईल. कदाचित भाजपकडून सेनेची वाटचाल अधिक सोपी केली जातेय. अनेक वर्षे जागा अडवून बसलेली अशी जी मंडळी आहेत त्यांची यादी उद्धव यांनीच तर भाजपकडे दिली नाही ना? या जड झालेल्या आणि जागा अडवून बसलेल्या नेत्यांची सोय भाजपनं परस्सर केली तर ते त्यांना चांगलंच आहे असं वाटत असेल.

महाराष्ट्राचं राजकारण कधी नव्हे ते एका वेगळ्या टप्प्यावर आलंय. लोकांच्या प्रश्नांशी काहीही देणंघेणं नसलेल्या सर्वपक्षीय राजकारण्यांचं वागणं कमालीचं दुःखद आहे. प्रत्येकजण स्वतःच्या स्वार्थासाठी काम करताना दिसतोय. आज बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही आणि त्यांचा शिवसैनिकही राहिला नाही. बाळासाहेबांच्या शब्दाखातर रस्त्यावर उतरणारी, तुरूंगात जाणारी पिढी सध्या राजकारणात नाही. त्याऐवजी ते भाजपमध्ये जाण्यात धन्यता मानतात. या सगळ्या परिस्थितीत प्रताप सरनाईक यांच्यासारखी प्यादी पुढे करत ती कशीही फिरवली तरी पक्षाला त्यांचा काहीही उपयोग होणार नाही याची नोंद भाजपनं घ्यायला हवी. मोडेन पण वाकणार नाही, लढेन पण माघार घेणार नाही अशा पद्धतीनं लढणारा एखादा नेता आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणात असायला हवा होता असं वाटतं.
- घनश्याम पाटील
7057292092
दै. पुण्य नगरी, मंगळवार, दि. 22 जून 2021
 

Monday, June 14, 2021

... तर सैतानाशीही हातमिळवणी करू!


पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे
यांनी राजगडावर रोपवेची तयारी सुरू केल्यानंतर काही तथाकथित शिवप्रेमींकडून त्यांना विरोध होत आहे. इतिहासाचं संरक्षण आणि संवर्धन करायचं असेल तर गडावर जाणार्‍यांची संख्या वाढली पाहिजे. रायगडावर रोपवे केला तर तिथं जाणार्‍या-येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढली. तिथल्या पर्यटनालाही चालना मिळाली. ज्यांना रायगडावर जाण्याची इच्छा आहे पण शारीरिक दुर्बलतेमुळं जे तिथं जाऊ शकत नाहीत त्यांची सोय रोपवेमुळं झाली. एखादा माणूस तरूणपणी कायम रायगडला जायचा पण आता वयाच्या सत्तरीत अनेक आजारांनी ग्रासलं असताना त्याला जमत नाही किंवा एखाद्या गृहिणीला वाटतंय की रायगडाची माती कपाळाला लावावी पण तब्येतीमुळं जमत नाही त्यांची सोय रोपवेमुळं झाली. पर्यटकांच्या येण्या-जाण्यानं गडांचं आणि किल्ल्यांचं सौंदर्य नष्ट होईल, अशी भीती व्यक्त करणार्‍यांनी लक्षात घ्यावं की हे सौंदर्य आपण कधीच नष्ट केलंय.

गड आणि किल्ले यांच्याकडं दुर्लक्ष करणं गेली दीडशे-दोनशे वर्षे सुरूच आहे. सातार्‍याच्या समोर अजिंक्यतारा आहे. तिथं किती लोक जातात? फिरायला म्हणून जाणारेही अर्ध्यातूनच परत येतात. तो किल्ला आहे तसाच पडून आहे. राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात प्रिय असणारा किल्ला. शत्रूला सुद्धा महाराज रायगडावर आहेत की राजगडावर याबाबत कायम संभ्रम निर्माण व्हायचा. त्या संभ्रमावस्थेतल्या शत्रूला फसवण्यासाठी महाराजांनी या दोन गडांचा वापर केला. शिवाजी महाराज आग्र्याला जायला बाहेर पडले ते राजगडावरून आणि महाराज जेव्हा आग्र्याहून परत आले तेही थेट राजगडावर. जिजाऊसाहेबांचा मुक्काम अनेक वर्षे राजगडावर होता. महाराज शाहिस्तेखानावर छापा मारायला बाहेर पडले तेही राजगडावरून. ते राजगडावरून खेडशिवापूरला आले, तिथून पुण्यात आले आणि मग सिंहगडावर जाऊन राहिले. सुरत लूट करून आल्यावरही महाराज राजगडावर आले. शिवाजी महाराजांच्या आयुष्याशी, त्यांच्या पराक्रमाशी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्ज्वल्य इतिहासाशी निगडित असणार्‍या अनेक घटना राजगडावर घडलेल्या आहेत.

मग इथं सध्या नेमकं कोण जातं? इथं सामान्य पर्यटक जात नाहीत. राजगडचा टे्रक हा अवघड आहे. सामान्य इतिहासप्रेमी माणसाला जर राजगड बघता आला आणि महाराजांच्या गडकिल्ल्यांचं वैभव बघता आलं आणि त्यासाठी जर रोप वे तयार केला गेला तर कुणाला काही त्रास व्हायचं कारण नाही. राजगडाचं सौंदर्य कमी होईल, इथलं सौंदर्य ढासळेल असं काही होत नाही. रोप वे साठी लागणारी जागा ही अतिशय मर्यादित असते. रायगडावर रोप वे केला गेला तेव्हाही त्याला असाच विरोध केला गेला. रोपवेमुळं रायगड बघणार्‍यांची संख्या वाढली हे वास्तव कोण नाकारणार?

6 जून 1674 ला रायगड जसा होता तसाच आज तो त्यावेळची साधनसामग्री वापरत नव्यानं उभारण्याची गरज आहे. राजगडही पुन्हा तसाच उभारणं शक्य आहे. राजगडावर महाराजांचे महाल कुठं होते, राजसदर कुठं होती, नगारखाना कुठं होता या सगळ्याच्या जागा माहीत आहेत. त्याच्यावर काम करून हे गड पूर्ववत बांधावेत. सामान्य इतिहासप्रेमी शोधतो की या किल्ल्यावर आहे काय? वैराडगड, कमळगड, पालीचा किल्ला, सुमारगड, रसाळगड, महिपतगड, वासोटा, लोहगड, पांडवगड, चंदनगड, वंदनगड, अजिंक्यतारा, तिकोना, सोनगीरचा किल्ला अशा किल्ल्यावर काय शिल्लक आहे? शिवाजीमहाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली माती म्हणून शिवप्रेमी तिथंली माती कपाळाला लावतात आणि साडेतीनशे वर्षानंतरही एखाद्या श्रद्धाळू भाविकांप्रमाणे या इतिहासापासून प्रेरणा घेऊन घरी येतात.

रोपवे झाल्यानंतरही रायगडाची अवस्था बर्‍यापैकी चांगली आहे. राजगड टे्रकरसाठी आहे. मग तिथं जाण्यासाठी काही चांगल्या सुविधा झाल्या तर आपण उगीच आरडाओरडा का करतो? जे अवघड आहेत अशा प्रत्येक किल्ल्यावर रोप वे झाले तर बिघडलं कुठं? बरं, रोप वे केला तरी टे्रकरला कोणी पायी जाण्यासाठी अडवत नाही. आज आपल्या गडांची, किल्ल्यांची काय अवस्था आहे? पन्हाळ्यावर आख्खा तालुका वसवलाय. न्यायकोठीत पोलीस स्टेशन चालू केलंय. जिथून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज न्यायनिवाडे करायचे तिथं खाबूगिरी करणारे पोलीस अधिकारी बसून असतात. प्रतापगडावर लोकांनी घरं बांधली आणि तो कमर्शिअल करून टाकला. सिंहगडावर टिळकांपासून ते लता मंगेशकरांपर्यंत अनेकांनी जागा घेतल्या आणि खाजगी बांधकाम केलं. विशाळगडावर गेलात तर मन विषन्न होतं. एका कोपर्‍यात बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी देशपांडे यांची समाधी आहे. शिवाजी महाराजांना या गडावर पोहोचवण्यासाठी तीनशे बांदल धारातीर्थी पडले. त्यांचं नेतृत्व करणारे बाजीप्रभू आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपल्या धाकट्या भावाच्या नेतृत्वाखाली लढणारे फुलाजी यांनी आदिलशहाचे, जिद्दीचे घाव धाडसानं आपल्या उरावर घेतले. त्यांच्या समाध्या इथं कोपर्‍यात आहेत आणि मस्जिद गडाच्या मध्यभागी आहे. ‘पतीव्रत्तेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणीहार’ हा प्रकार इथं घडत असूनही कुणाला इथलं सौंदर्य नष्ट झालंय असं वाटत नाही.

ज्यांनी इतिहास घडवला, इतिहास निर्माण केला, इतिहासाची चाकं बदलली, इतिहासाचा प्रवाह बदलला त्यांच्या समाध्या कोपर्‍यात असाव्यात? आणि ज्यांचा इतिहासाशी काही संबध नाही, महाराजांच्या विशाळगडाशी काही संबंध नाही त्यांच्या मस्जिदी बांधून तिथं कोंबड्या मारल्या जातात. हे गलिच्छ वातावरण बघून कोणताही शिवप्रेमी विमनस्क झाल्याशिवाय राहणार नाही. अशा सगळ्या विषयावर काम न करता शासन काही चांगलं करत असेल तर इथं हे करू नका, तिथं ते करू नका म्हणत हिरीरिनं पुढं येणारे ढोंगी आहेत.

शिवकाळात रायगडावर राजाराम महाराजांचं लग्न झालं होतं. अनेक मावळ्यांची, सैनिकांची, स्वराज्यातील अनेक महत्त्वाच्या लोकांची लग्नं गडावर झाल्याचे उल्लेख आढळतात. एखाद्याला जर वाटलं की अशा गडाला साक्षी ठेवून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतींना, त्या भगव्याला साक्षी ठेवून मला लग्न करायचंय तर त्याला कशाला अडवताय? निदान पत्नीशी कसं प्रामाणिक वागावं याचं तरी भान त्याला येईल. पत्नीला जाहीरपणानं ‘सखीराज्ञी’ म्हणणारा राजा सतराव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेला हा संस्कार या जोडप्यांवर नाही का होणार? किल्ल्यांवर रिसॉर्ट करू नका, हॉलिडेज होम करू नका पण इथलं पावित्र्य जपत लग्न लावायला काय हरकत आहे? इतिहासाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी त्या वास्तू जपाव्या लागतात. युरोपातल्या अशा अनेक वास्तू त्या देशांनी प्राणपणानं जपल्यात. नेपोलियनच्या आठवणी फ्रान्सनं जपल्यात आणि ड्युक ऑफ वेलिंग्टनच्या आठवणी इंग्लंडनं जपल्यात.

रायगडावरची मोडकी बाजारपेठ, भग्न अवस्थेतील महाराजांचा राजवाडा आणि राणी वसाहत, वरती छप्पर नसलेला आणि अर्धवट भिंती असलेला महाराजांचा दरबार... हे सौंदर्याचं नाही तर पराक्रमाचं प्रतीक आहे. त्यामुळं महाराजांचा इतिहास जपण्याचं काम पर्यटन विभागाला करावं लागेल. त्यासाठी रोप वे सारख्या सुविधा गरजेच्या आहेत. शिवचरित्राचा कोणताही विषय निघाला की तो वादग्रस्त करायचा हा प्रकार लोकांनी आता थांबवला पाहिजे. तात्यासाहेब शिरवाडकरांची कविता आहे, ‘अनाम वीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त, स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात!’ ज्यांनी हा इतिहास घडवला त्यांची काही इच्छा नव्हती की त्यांचा स्तंभ बांधा आणि वात पेटवा. त्यांना भविष्यात आपल्या कर्तृत्वाचे अवशेष ठेवायचे नव्हते. त्यासाठी ते लढले नाहीत. एक उदात्त स्वप्न उराशी घेऊन महाराज आणि त्यांचे मावळे लढले. तो इतिहास चांगल्या पद्धतीनं पुढं नेण्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्या जातील त्यांच्या सोबत आपण उभं रहायला हवं. एखादा सैतान जरी किल्ल्यांच्या रक्षणासाठी पुढं आला तरी आम्ही त्या संदर्भापुरती त्याच्याशी हातमिळवणी करू.

शिवराज्याभिषेकामुळं रायगड, शिवजन्मामुळं शिवनेरी, अफजलखानाचा कोथळा काढला म्हणून प्रतापगड आपल्या स्मरणात असतात पण राजगडांसारख्या किल्ल्यावरही आपण जायला हवं. शिवचरित्र पुढं नेणारे चार मराठी तरूण याच मातीतून आणि याच प्रेरणेतून उभे राहतील. त्यामुळं तो इतिहास त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व प्रकारचे शर्थीचे प्रयत्न करायला हवेत. मग हे प्रयत्न करणारे राज ठाकरे, आदित्य ठाकरे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, भिडे गुरूजी असोत किंवा आणखी कुणी. त्यांच्या पाठिशी आपण समर्थपणे उभं रहायला हवं.
- घनश्याम पाटील

7057292092

दै. पुण्य नगरी,
मंगळवार, 15 जून 2021

Tuesday, June 8, 2021

राष्ट्रवादीची बोलकी बाहुली


संसदेत काश्मीरला दिलेले विशेष अधिकार आणि 370 कलमाच्या अनुषंगानं त्या संदर्भात चर्चा सुरू होती. काश्मीरचे विशेषाधिकार रद्द करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आग्रही होता. काश्मीरचं प्रादेशिक वेगळेपण टिकावं आणि काश्मीरची प्रगती व्हावी यासाठी आम्ही काँग्रेसनं हे विशेषाधिकार दिले आहेत आणि ते तसेच रहावेत अशी काँग्रेसची आग्रही आणि ठाम भूमिका होती. या भूमिकेसाठी काँगे्रस पक्ष अतिशय जिद्दीनं प्रयत्नशील होता. त्यामुळं त्यावर उघडपणे अत्यंत प्रभावी भाषणं सुरू होती. ‘एक देश, एक निशान, एक संविधान’ ही श्यामाप्रसाद मुखर्जी यांची जुनी घोषणा संघाच्या शाखेत गेलेल्या अनेकांनी ऐकली असेल. त्यामुळं या विषयावर भाजपनंही खूप आग्रही भूमिका घेतली होती. 370 रद्द करायचंच आणि काश्मीरचे कोणतेही विशेषाधिकार ठेवायचे नाहीत या मुद्यावर भाजपची मांडणी सुरू होती. अशावेळी स्वतःला राष्ट्रीय पक्ष समजणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून समर्थनार्थ किंवा विरोधात एखादी भूमिका मांडली जाईल आणि राष्ट्रीय राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला आपली थोडीफार तरी छाप पाडता येईल असं वाटलं होतं.

राष्ट्रवादीच्या वतीने सुप्रिया सुळे बोलायला उभ्या राहिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची याबाबत स्वतःची कोणतीही आणि कसलीही भूमिका नव्हती. मुळात काश्मीर प्रश्न काय आहे, याचे स्वरूप काय आहे याबाबतही त्यांच्या डोक्यात सगळा गोंधळ होता. काश्मीर प्रश्नाबाबत स्वतःला राष्ट्रीय पक्ष समजणार्‍या राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाला जर काही ठाम भूमिका घेता येत नसेल तर ते दुर्दैव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कोणती भूमिका घ्यावी याबद्दल आम्हाला काही म्हणायचं नाही. हा पक्ष 370 रद्द करू म्हणत भाजपबरोबर गेला असता तरी चाललं असतं. 370 राहिलं पाहिजे, त्याशिवाय काश्मीरचा विकास होणार नाही असं म्हटलं असतं तरी चाललं असतं! परंतु राष्ट्रवादीनं ना या विधेयकाच्या विरोधात मतदान केलं ना समर्थनार्थ! अशावेळी त्यांच्या खासदारांनी काहीच भूमिका घेतली नाही. सुप्रिया सुळे सभागृहात होत्या. या विषयावर त्यांनी भाषण केलं. त्यांचं हे भाषण ऐकल्यावर लक्षात येईल की, बाईंना काय म्हणायचंय हे त्यांचं त्यांना कळत नव्हतं. त्यांनी भाषणाची सुरूवात अशा वाक्यानं केली, ‘‘या विषयावर आज अपूर्ण चर्चा होणार आहे, अपूर्ण वादविवाद होणार आहे, कारण माझ्या शेजारी बसणारे फारूक अब्दुल्ला आज सदनात नाहीत.’’
'अणीबाणी – लोकशाहीला कलंक'  हे पुस्तक घरपोच मागवा.
आपण काश्मीरच्या प्रश्नावर बोलतोय, फारूक अब्लुल्लांच्या सत्कार सोहळ्यानिमित्त, वाढदिवसानिमित्त किंवा त्यांच्या श्रद्धांजली सभेत बोलत नाही, इतकंही बाईंना कळलं नाही. ‘धिस इज अनकम्लिट डिबेट, फारूक अब्दुल्ला इथं असल्याशिवाय ही चर्चा होऊ शकत नाही’ असं म्हणणं हा मूर्खपणा होता, राजकीय अव्यवहारीपणा होता. हे कोणत्याही परिपक्वतेचं लक्षण तर नव्हतच पण त्यांच्याकडं कोणतीही भूमिका नव्हती हे दाखवून देणारं होतं. म्हणजे ‘इंदिरा इज इंडिया’ हे जेवढं चुकीचं होतं, ‘मोदी इज इंडिया’ हे जेवढं चुकीचं आहे तेवढंच ‘फारूक अब्दुल्ला म्हणजे काश्मीर’ असं अप्रत्यक्षपणे सांगणंही खुळेपणाचं आहे. भारताचे गृहमंत्री अमितभाई शहा उठले आणि त्यांनी सुप्रियाबाईंना सुनावलं की, ‘‘त्याला बोलायचं होतं तर आज सभागृहात यायचं होतं, आम्ही काही अडवलं नव्हतं किंवा घरकैदी केलं नव्हतं.’’

त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘‘त्यांची तब्येत बरी नाही म्हणून ते आले नाहीत.’’

अमितभाई म्हणाले, ‘‘त्याचा आमच्याशी काय संबंध? त्यांना आम्ही आजारी पाडलंय का? आणि आम्ही बरे करणार आहोत का?’’

सुप्रिया सुळे सभागृहात काश्मीर प्रश्नावर बोलायला आल्या होत्या, पक्षाची भूमिका मांडायला आल्या होत्या की अब्दुल्लासोबत आपले कसे घरोब्याचे संबंध आहेत हे दाखवायला आल्या होत्या हे गुलदस्त्यात राहिलं. तुम्हाला काश्मीर प्रश्नाबाबत नेमकं काय म्हणायचंय? तुमचं आकलन काय? नेमकी भूमिका काय? हे शेवटपर्यंत लोकांना कळलं नाही. काश्मीर प्रश्नाबाबत राष्ट्रवादीला काय म्हणायचंय हे त्यांच्या मतदानानंतरही गुपितच राहिलं. आपण याबाबत भाजपसोबत गेलो तर डाव्यांची, मुस्लिमांची मतं जातील ही भीती असावी आणि विरोधात गेलो तर जे सवर्ण हिंदू राष्ट्रवादीला पाठिंबा देतात त्यांची मतं जातील ही भीती असावी. म्हणून मग कोणतीही ठाम भूमिका न घेता या ‘राष्ट्रीय’ म्हणवणार्‍या पक्षानं हा असा मध्यम मार्ग स्वीकारला.

सुप्रिया सुळेंच्या बाबांना अशा विषयावर भूमिका घेता येत नाही. त्यांनी ती घ्यावी यासाठी सुप्रियाबाईंनी त्यांना भाग पाडायला हवं होतं. ते न करता त्यांच्या या भाषणानं त्यांनी स्वतःचं आणि त्यांच्या पक्षाचं संसदेत हसं करून घेतलं. असं असताना त्यांना चार वेळा ‘संसदरत्न’ पुरस्कार कसा दिला गेला ही फार आश्चर्याची गोष्ट आहे.

‘रेनिसान्स स्टेट : द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ हे पुस्तक गिरीश कुबेर यांनी लिहिलं. या पुस्तकात कुबेरांनी अत्यंत सरधोपटपणे छत्रपती संभाजीराजांबाबत मांडणी केलीय. कुबेरांचा इतिहासाचा अभ्यास नसल्यामुळं आणि त्यातही मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांचा अभ्यास नसल्यानं हा प्रकार घडला असावा. छत्रपती संभाजी महाराजांनी सोयराबाईंना सत्तेच्या राजकारणात मारून टाकलं, त्यामुळं शिवाजीराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य गेलं, याची शिक्षा संभाजीराजांना शेवटीशेवटी भोगावी लागली अशा प्रकारची अत्यंत उथळ विधानं या पुस्तकात आहेत. याला इतिहासाचा कसला आधार नाही हे डॉ. कमल गोखले, वा. सी बेंद्रे, डॉ. सदाशिव शिवदे यांनी त्यांच्या लेखनातून पुराव्यासह दाखवून दिलं आहे. असं असताना सुप्रिया सुळे यांनी या पुस्तकाच्या मुखपृष्ठासह ट्विट केलं ‘रिडिंग धिस इंटरेस्टिंग बुक...’ म्हणजे पुस्तकाचा आशय, विषय न पाहता मी किती इंग्रजी पुस्तकं वाचतेय, मला कशी वाचनाची आवड आहे हे दाखवून देण्यासाठी आणि स्वतःची एक नसलेली इमेज तयार करण्यासाठी हा उद्योग केला होता का? की गिरीश कुबेरांसारख्या संपादकाच्या गुडबुकमध्ये राहण्याची ही केविलवाणी धडपड होती? तुम्ही असं कव्हर टाकून हे वाचताय असं सांगण्यापेक्षा तुम्ही जे वाचताय त्याचं तुम्हाला आकलन किती होतंय हे महत्त्वाचं असतं.
घनश्याम पाटील यांचे 'दरवळ'  हे पुस्तक घरपोच मागवा.
तुम्ही गिरीश कुबेर यांच्यासमोर मुलाखतीसाठी बसला होता. त्या आधी त्यांचं ‘इंटरेस्टिंग’ पुस्तक वाचत असल्याची पोस्टही तुम्ही टाकली होती. मग का नाही कुबेरांना विचारलंत, ‘‘संभाजीराजांविषयी आक्षेपार्ह लेखन का केलं?’’ समोर बसून तुम्ही त्यांना मुलाखत देता आणि हा प्रश्न विचारत नाही याचा अर्थच हा आहे की, लोकांच्या प्रश्नाशी, अभ्यासाशी, इतिहासाच्या अस्सल साधनांशी तुम्हाला काही देणं-घेणं नाहीये. तुमच्याकडं काही वेगळेपण नाही. छत्रपती शिवाजीमहाराज आणि छत्रपती संभाजीमहाराज यांचं नाव तुम्ही फक्त राजकारण करण्यासाठीच घेता. त्यांच्या मान आणि अपमानाशी तुम्हाला काहीही देणंघेणं नाही.

सुप्रिया सुळे यांची लोकसभेची ही तिसरी टर्म. बारामती लोकसभा मतदारसंघाचं त्या नेतृत्व करतात. या तीन टर्ममध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ किती बदलला? या मतदारसंघासाठी त्यांनी नेमकं काय केलं? याचा हिशोब सुप्रियाबाईंनी केला पाहिजे. शरद पवारांना भेटायला येणार्‍या लोकांबरोबर फोटो काढून घ्यायचे आणि ते ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्रामवर अपलोड करायचे यापेक्षा त्यांचं सामाजिक योगदान काही आहे का? एखाद्या वक्त्याकडं सभा जिंकण्याचं कौशल्य असावं लागतं. तेही सुप्रियाबाईंकडं नाही. राष्ट्रवादी काँग्रस पक्षाच्या आघाडीमध्ये तुम्ही आजवर काही बदल केलेत का? एखाद्या मतदारसंघात तुम्ही भाषण केलं तर तिथली मत वाढतात का?
भाऊ तोरसेकर यांचे 'इंदिरा ते मोदी'  हे पुस्तक घरपोच मागवा.
राजकारणात इंदिराबाईंबद्दल ‘गुंगी गुडिया’ असा उल्लेख केला जायचा. त्या केवळ पंडित नेहरूंमुळं राजकारणात आहेत असा आरोप त्यांच्यावर केला जायचा. इंदिराबाईंनी त्या अत्यंत सक्षम आहेत, जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा कणखर आहेत हे स्वतःच्या कर्तृत्वानं सिद्ध केलं. इंदिराबाईंच्या बाबत जो उल्लेख व्हायचा तो सुप्रियाबाईंबाबत केला तर फारसं वावगं ठरणार नाही. त्यांना गुंगी गुडिया म्हटलं जायचं, यांचा मात्र कसलाच अभ्यास नसताना कायम बडबड चालू असते म्हणून यांना फार तर ‘बोलकी बाहुली’ म्हणूया.

सत्तेच्या राजकारणात सुप्रियाबाईंचं नेमकं स्थान काय? राष्ट्रवादीची राज्यात सत्ता होती. त्यावेळी त्यांना मंत्रीमंडळात काही स्थान दिलं गेलं नाही. केंद्रातही त्यांना कधी स्थान देता आलं नाही. आत्ता राज्यात पुन्हा पवारांच्या आशीर्वादानं सरकार स्थापन झालंय पण सुप्रिया सुळेंना त्यात स्थान नाही. केंद्राच्या राजकारणात रस असलेल्या नेत्याला काश्मीर प्रश्नाबाबत आकलन असणं आणि त्याबाबत ठाम भूमिका घेणं कळायला हवं होतं. ते झालं नाही. अशा परिस्थितीत सुप्रिया सुळे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी झालेलं ओझं आहे, हे सत्य त्यांना सांगायला हवं. हे ओझं पवारांनी इतकी वर्षे सांभाळून घेतलं. पवारांच्या पक्षाचं भविष्यात नेतृत्व करण्याची क्षमता सुप्रिया सुळे किंवा अजित पवार यांच्यात आहे का? असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो. यशवंतराव चव्हाण यांनी एका सामान्य कुटुंबातून आलेल्या शरद पवार नावाच्या तरूणाला जसं समोर आणलं तसं पवारांनी काही केल्याचं दिसत नाही. पक्षातला एखादा कार्यक्षम वारस पवार नेमतील याची सुतराम शक्यता नाही. त्यांना सुप्रियाबाईंची किंवा अजित पवारांची निवड करावी लागेल. अजित पवारांची निवड करून निवडणुका जिंकता येणार नाहीत आणि सुप्रियाची निवड करून संघटना चालणार नाही, अशाप्रकारचा पेच या पक्षातील नेत्यांसमोर आहे. पुढच्या पिढीचं नेतृत्व म्हणून रोहित पवारांना पुढं आणलं जातंय. ते सगळ्या विषयावर बोलत असतात. मोदींनंतर आपण सर्वज्ञ आहोत, ‘मन की बात’ आपणही करायलाच हवी असा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळं या कुटुंबातील कुणाचीही पवारांइतकी राजकीय समज आणि जनतेची अचूक नाडी ओळखण्याची कला अवगत नाही. भविष्यात पवारांचे हे वारसदार काही करू शकतील असं चित्र नाही. अशा परिस्थितीत, अशा वातावरणात राष्ट्रवादी काँगे्रसचं भविष्य सुप्रिया सुळे नाहीत.
'बाळासाहेब एक अंगार'  हे पुस्तक घरपोच मागवा.
लोकसभेची तिसरी टर्म त्यांना मिळाली. तिसर्‍या टर्मला पराभूत होता होता त्या कशाबशा निवडून आल्या. मतदारसंघात त्यांचा कसलाही प्रभाव नाही. संसदेत बोलत असतात म्हणून त्यांना बोलकी बाहुली म्हणूया! पण या बोलण्याला काहीच अर्थ नाही. ते होपलेस असतं. कोणतीही विचारधारा नसलेलं हे निरर्थक बोलणं असतं. फारूक अब्दुल्ला सभागृहात नाहीत, हे सांगताना त्या सभागृहात सगळ्यांकडं बघत होत्या. त्यांना वाटलं असणार इतर खासदार त्यांच्या या बोलण्याचं कौतुक करतील, दाद देतील. हा असला बालिशपणा पहिल्या टर्मला ठीक होता. पवारांची मुलगी संसदेत आलीय, बोलतेय म्हणून कौतुक झालंही. आता दुसर्‍या, तिसर्‍या टर्मलाही असाच प्रकार घडत असेल तर कोण कशाला कौतुक करेल? निवडणुकीच्या राजकारणात तुम्ही कोणाला कोणती निवडणूक जिंकून देऊ शकत नाही. महाराष्ट्रभर फिरताना तुम्ही तुमचा स्वतःचा काही मतदार घडवलाय, तो एखाद्या मतदारसंघात काही चमत्कार घडवेल अशी परिस्थिती नाही. तुमचं सभा गाजवणारं काही डायनॅमिक वक्तृत्व नाही. ‘मोठ्या बापाची लाडकी लेक’ याच भूमिकेतून कार्यकर्ते तुमच्याकडं बघत असतात. इंदिरा गांधीही बड्या बापाच्या कन्या होत्या पण त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. अशीच मोठ्या बापाची आणखी एक मुलगी आपल्या राजकारणात आहे. पंकजा गोपीनाथ मुंडे. मुंडे साहेब होते तोपर्यंत त्यांचं बरं चाललं होतं. मुंडे साहेबांनंतर एका टर्ममध्येच त्यांचं राजकारण मतदारांनी संपवलं. त्यामुळं सुप्रियाबाईंना भविष्यात इंदिरा गांधी व्हायचं की पंकजा मुंडे व्हायचं हे ठरवायला हवं. इंदिरा गांधी होणं हे तितकं सोपं नाही. ते तितकं साध नाही. इंदिरा गांधी व्हायला वडीलही जवाहरलाल नेहरू असावे लागतात. ही गोष्ट बाजूला ठेवली तरी इंदिरा गांधी व्हायला अंगात एक मूलभूत चातुर्य असावं लागतं. धैर्य असावं लागतं. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल, नेतृत्वाबद्दल एक कमालीचा विश्वास असावा लागतो. जो विश्वास इंदिरा गांधी यांच्यापूर्वी कोणत्या राजकारण्यात दिसला नाही आणि त्यांच्या नंतरही तो कुणात दिसला नाही. त्या सुरूवातीच्या कालखंडात पंतप्रधान झाल्यावर त्यांनी सगळ्या सचिवांची एक बैठक बोलावली. त्यांना काही सूचना दिल्या. त्या बैठकीनंतर सचिवांनी इंदिराबाईंना पत्रं लिहिली. त्या पत्राच्या सुरूवातीला त्यांनी लिहिलं, ‘रिस्पेक्टेड मॅडम प्राईम मिनिस्टर!’

ही पत्रं वाचल्यावर त्यांनी त्या सगळ्या सचिवांना खडसावून विचारलं की ‘‘यापूर्वीच्या पंतप्रधानांना अ‍ॅड्रेस करताना तुम्ही काय करत होता?’’

मुख्य सचिवांनी सांगितलं, ‘‘आम्ही त्यांना ‘सर’ म्हणून अ‍ॅड्रेस करत होतो.’’

बाईंनी सगळ्या सचिवांना फर्मावलं, ‘‘मला यापुढे सर म्हणूनच अ‍ॅड्रेस केलं जाईल...’’
सुरेखा बो-हाडे यांचे 'बाईची भाईगिरी'  हे पुस्तक घरपोच मागवा.
अशी ताकत त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होती. ही ताकत गेल्या पंधरा वर्षाच्या राजकारणात सुप्रिया सुळे यांच्यात कुठं दिसतेय का? पवार साहेबांना भेटायला हा आला आणि मी त्याचं स्वागत केलं, पवार साहेबांना भेटायला तो आला आणि मी त्याचा सत्कार केला, पवार साहेबांचा निरोप घ्यायला तो आला आणि मी त्याला शुभेच्छा दिल्या यापुढं सुप्रियाबाईंचे कोणते फोटो समाजमाध्यमांवर दिसतात का? अधूनमधून सारखे अजित पवारांचे आभार. अजितदादांनी हे केलं, अजितदादांनी ते केलं... आज तर अजित पवार दिल्लीत उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्यासह नरेंद्र मोदींच्या भेटीला गेले. तिथला त्यांचा फोटो शेअर करताना सुप्रिया सुळेंनी लिहिलंय की ‘‘अजितदादांचा हा स्वाभिमान पाहून छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आली. दिल्लीच्या तख्ताला दुसरं असं कोणी स्वाभिमानानं सामोरं गेलं नव्हतं.’’ अरे थू तुमच्या बुद्धिवर! कुठं छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्ज्वल्य स्वाभिमान आणि कुठं अजित पवार? अनेकजण आजवर पवारांना ‘जाणता राजा’ म्हणत होते आणि आता तुम्ही अजित पवारांची तुलना चक्क महाराजांसोबत करताय?

महाराष्ट्रात राजकारण करत असताना तुम्हाला एवढं इन्फ्रास्ट्रक्चर मिळालं होतं. महाराष्ट्रातल्या बहुजन समाजातल्या मुलींना सक्षम करण्यात सुप्रिया सुळेंना मोठा वाटा उचलता आला असता. या मुलींना सार्वजनिक जीवनात उतरवण्याची संधी तुमच्याकडं होती. पवारांची मुलगी सामाजिक जीवनात वावरतेय म्हटल्यावर ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या, सामान्य, मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गातील कुटुंबातल्या, शेतकरी कुटुंबातल्या, कामगारांच्या मुली आत्मविश्वासानं तुमच्यासोबत समाजकारणात, राजकारणात यायला हव्या होत्या. त्यासाठी सुप्रियाबाईंना महाराष्ट्रभर फिरावं लागलं असतं. महाराष्ट्रात स्वतःचे मतदार तयार करावे लागले असते. लोकांशी नाळ जुळवावी लागली असती. यातलं त्या काहीच करत नाहीत.

सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जात होती. त्या जयंती सोहळ्याला सुरूवातीला तुम्ही जात होता. तुम्हाला लॉन्च करण्यासाठी याचं स्वरूप खूप मोठं केलं गेलं. सावित्रीबाईंच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या प्रत्येक स्त्रीचा आवाज बनण्याची संधी तुम्हाला मिळाली होती. मात्र कोणत्याही संधीचं सोनं करण्याची क्षमता तुमच्यात कधीच दिसली नाही. संकटाला संधी मानून काम करणार्‍या इंदिराबाई कुठं आणि संधी मिळालेली असतानाही आपला वाचाळवीरपणा दाखवणार्‍या तुम्ही कुठं?
सुधीर गाडगीळ यांचे 'मानाचे पान' हे पुस्तक घरपोच मागवा.
एका बांगलादेशी अर्थशास्त्रज्ञापासून प्रेरणा घेत शरद पवारांनी महाराष्ट्रात महिला बचत गटाची चळवळ उभारली. ती चळवळही केवळ तुम्हाला प्रमोट करण्यासाठी होती. राज्य सहकारी बँका, जिल्हा बँका, सहकारी बँकांना महिला बचत गटांना मदत करायला भाग पाडलं गेलं. राज्यभरातल्या या बचत गटांच्या महिलांचं प्रभावी नेतृत्व करणं, त्यांच्या जीवनाला नवी दिशा देणं, आकार देणं, त्यांच्यातून निर्माण झालेल्या उद्योजिकांना आणखी मोठ्या संधी उपलब्ध करून देणं, त्यांना सार्वजनिक क्षेत्रात सन्मानानं आणणं आणि त्यांचा आवाज बनणं हे सगळं तुम्ही करणं अपेक्षित होतं. तुमच्यासाठी सगळी पूर्वतयारी करून देऊन, अक्षरशः गालिचे टाकूनही तुम्हाला काहीच करता आलं नाही. एखाद्या सुपरस्टारनं आपला मुलगा सिनेमात यावा म्हणून प्रयत्न करावेत, त्याला ओळीनं एका मागून एक सिनेमे काढून द्यावेत आणि ते सुपरफ्लॉप ठरावेत असंच तुमच्याबाबत घडलं. राजेंद्रकुमार नावाच्या अभिनेत्यानं कुमार गौरव नावाच्या त्याच्या मुलाला असेच सिनेमे काढून दिले आणि ते उताणं पडलं. तीच अवस्था राजकारणात तुमची झाली. एवढं कोण करून देतं? सामान्य मुलीसाठी कोणता बाप एवढं करतो?

इतकं सगळं करून देऊनही या कोणत्याही गोष्टीचा तुम्हाला लोकहितासाठी किंवा स्वतःसाठी काही उपयोग करून घेता आला नाही. एकतर तुमच्यात लढाऊ वृत्ती नाही किंवा तुम्हाला नटणं, फोटो काढणं, कौटुंबीक सोहळ्यात सहभागी होणं अशीच तुमची प्रतिमा असेल तर तुम्ही सार्वजनिक जीवनातून निवृत्त व्हायला हवं. त्यामुळं महाराष्ट्राचा तर फायदा होईलच पण तुमचा आणि तुमच्या कुटुंबियांचाही फायदा होईल. सार्वजनिक जीवनात ज्याला काम कराचंय त्याला संकटांना, प्रश्नांना, अडचणींना सामोरं जावं लागतं. आलेल्या प्रत्येक संधीचं सोनं करण्याऐवजी तुम्ही कायम या संधी झिडकारल्या आहेत. सोशल मीडियावर फोटो अपडेट करण्यात जे स्कील दाखवता ते कामात दाखवा. पक्षाच्या उभारणीत, पक्षाचे मतदार वाढवण्यात, जनाधार वाढवण्यात तुमची भूमिका शून्य आहे. तुम्हाला जशा संधी मिळाल्या तशी संधी भोर, मुळशी, वेल्हा, इंदापूरातल्या एखाद्या झोपडीतल्या गरीब मुलीला मिळाली असती तर तिनं एव्हाना देशाच्या राजकारणात आपली ओळख निर्माण केली असती. ‘आज मैं उपर, आसमाँ निचे, आज मैं आगे, जमाना है पिछे’ हे दाखवून द्यायची संधी आजवर तुम्ही सातत्यानं घालवली आहे.

एक प्रकार आपण आजूबाजूला अनेकदा बघितला असेल. परिस्थितीमुळं एखादी बाई मोलकरीण म्हणून काम करते. त्या बाईचं पोरगं अठरा वर्षाचं होतं आणि एमआयडीसीत कामाला जायला लागतं. कुणाचं पोरगं त्या प्रतिकूल परिस्थितीतही खूप शिक्षण घेतं आणि अधिकारी होतं. कोणी नेटानं चहा टपरीपासून कोणताही छोटा-मोठा उद्योग टाकतं आणि त्यात यश मिळवतं. कुणी अगदी गवंड्याच्या हाताखाली काम करतं आणि रोज चार-पाचशे रूपये मिळवतं. यापैकी कुणाच्याही हातात पैसे आले की ते पोरगं आधी आईला सांगतं, ‘‘तू आता दुसर्‍याच्या घरी भांडी घासायची नाहीत. आजवर माझ्यासाठी जे कष्ट घेतले ते खूप झाले. आता मी तुला काही कमी पडू देणार नाही.’’ ते पोरगं घराची जबाबदारी घेतं आणि थकलेली आई अभिमानानं घरी बसते.

शरद पवारांना वयाच्या ऐंशीव्या वर्षीही नीलम चक्रीवादळात तिथल्या लोकांना धीर द्यायला जावं लागतं. या वयातही सभा घेऊन पावसात भिजावं लागतं आणि त्याचं निवडणुकीसाठी मार्केटिंग करावं लागतं. अशावेळी काय करताहेत सुप्रियाबाई? तुम्हाला भविष्यात हा पक्ष चालवायचाय, पक्षाचं नेतृत्व करायचंय, सगळ्या नेत्यांबरोबर काम करायचंय, तर मग तुमची जबाबदारी नाही का की ऐंशी वर्षाच्या आपल्या म्हातार्‍या वडिलांना सांगावं, ‘‘बाबा, तुम्ही आता घरात बसा, बाहेरचं आम्ही बघू, आमच्या सर्व क्षमता पणाला लावून आम्ही पूर्ण प्रयत्न करू!’’

पक्षाची एक नेता म्हणून तर सुप्रियाबाईंची ही जबाबदारी आहेच पण एक मुलगी म्हणूनही ही त्यांची जबाबदारी आहे. या दोन्ही जबाबदार्‍या जर तुम्हाला पार पाडता येत नसतील तर कोण कशाला तुमच्यावर विश्वास ठेवणार? कोण तुमच्या नेतृत्वाचा आदर करणार? आणि कोण तुम्हाला पवार साहेबांची वारस म्हणून मान्यता देणार? ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवारांच्या चरित्रात्मक पुस्तकाचे कॉपी राईट मिळण्यापर्यंत सुप्रिया सुळेंना पवारांची वारस म्हणून मान्यता मिळेल. यापुढे जाऊन त्यांचं नेतृत्व कोणी स्वीकारेल असं वाटत नाही. अजित पवारांचं नेतृत्व आणि त्यांच्याकडचा वारसा याविषयी आपण स्वतंत्र लेखात चर्चा करणार आहोत पण सुप्रियाबाई पवारांच्या राजकीय वारसदार होऊ शकत नाहीत असंच चित्र आहे. त्यांचा वारसदार होण्याचं कोणतंही चातुर्य, कोणतेही नेतृत्वगुण, किमान असावे लागणारे सद्गुण, कुठल्याही प्रकारची धडाडी आणि कोणत्याही प्रश्नांचं आकलन त्यांना नाही.

मराठा समाज आरक्षणाच्या बाबतीत अतिशय आग्रही आहे. गेल्या काही वर्षात या समाजात फार मोठी अस्वस्थता दिसतेय. त्यांच्यासमोर अनेक प्रश्न आहेत. अशा परिस्थितीत मराठा समाजातील मुलांना सार्वजनिक जीवनात मदत करणं, गरीब मराठा मुलांला शैक्षणिक सुविधा देणं आणि शेतीनं होरपळून गेलेल्या आणि आत्महत्या करणार्‍या मराठा समाजातल्या लोकांना आधार देणं हे काम त्यांनी करणं गरजेचं होतं. या सगळ्या कालखंडात मराठा समाजाची आरक्षणासाठीची मोठी चळवळ उभी राहिली. त्याचवेळी सुप्रिया सुळे औरंगाबाद दौर्‍यावर होत्या. तिथं त्यांना विचारलं गेलं, ‘‘मराठा आरक्षणाबाबत तुम्हाला काय म्हणायचंय?’’

त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘मराठा आरक्षणापेक्षाही आमच्याकडे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत...’’

अरे व्वा! ज्या पक्षाचा मुलाधार मराठा समाज आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांची मुलगी असं विधान करते? तिला आपले वडील चालवत असलेला पक्ष कुणाच्या आधारावर चाललेला आहे, ज्या वर्गाचा आपल्याला पाठिंबा आहे तो कसा सांभाळला पाहिजे हे कळत नसेल तर ती पवारांचा राजकीय वारसदार कशी होऊ शकेल? हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे.

सुप्रिया सुळेंना प्रशासनाचा अनुभव देणं गरजेचं होतं. अगदी बाप-लेक एका मंत्रीमंडळात असते तरी चाललं असतं. उद्धव ठाकरे यांच्यासोबत ‘नुसती लुडबूड’ राजकारणाचे कित्ते गिरवत अनुभव घेत आहे. दहा वर्ष काँग्रेसची सत्ता असताना राहुल गांधी यांना मंत्री मंडळात घेण्यात आलं नाही ही जी चूक काँग्रेसनं केली तसंच सुप्रियाबाईंच्या बाबत घडलं. राहुल गांधींना मंत्रीमंडळात घेऊन कामकाजाचा अनुभव दिला असता तर त्यांचं नेतृत्व थोडंफार प्रगल्भ आणि परिपक्व झालं असतं. तीच चूक सुप्रियाबाईंच्या बाबत होतेय. राज्य मंत्रीमंडळात किंवा पक्ष संघटनेत एखादं महत्त्वाचं पद देऊन त्यांना तयार करणं गरजेचं होतं. त्यांना जोपर्यंत स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळत नाही तोपर्यंत त्या वडिलांना भेटायला येणार्‍यांसोबतचे फोटो सोशल मीडियात टाकून समाधान मानत राहणार. राजकारणात सक्रिय होऊन पंधरा-सोळा वर्षे उलटली. अजून किती वर्षे बोलकी बाहुली किंवा ‘बाबांची लाडकी लेक’ म्हणूनच सर्वत्र मिरवणार? पहिल्या टर्मपुरतं ते ठीक होतं. राज ठाकरे यांनी अजित पवारांना सांगितलं होतं की, ‘‘काकांच्या जीवावर जगायचं एक वय असतं, त्यापुढे आपल्या जीवावर जगायचं असतं.’’ तेच ‘काकांच्या’ ठिकाणी ‘बाबांच्या’ हा शब्द वापरून सुप्रिया सुळे यांना सांगायला हवं.

सुप्रिया सुळे यांना प्रथम राज्यसभेवर पाठवलं त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले. एवढं कुणाला मिळतं? एवढ्या सुविधा, एवढा सुखकर राजकीय प्रवेश महाराष्ट्राच्या राजकारणात ना शरद पवारांना मिळाला, ना बाळासाहेब ठाकरेंना मिळाला, ना महाराष्ट्रातल्या अन्य कोणत्या मोठ्या नेत्यांच्या मुला-मुलींना मिळाला. एवढं तुम्हाला मिळाल्यावर जर तुमच्याकडून सामान्य लोकांनी काही अपेक्षा ठेवल्या असतील तर त्या अपेक्षांना तुम्ही किती खर्‍या उतरलात? त्या अपेक्षा थोड्याफार प्रमाणात तरी खर्‍या ठरवल्यात का? तुम्ही संसदेत बोलत असता हे खरं आहे पण सामान्य माणसाचे काही प्रश्न घेऊन तुम्ही कधी त्यांच्यात मिसळलात का? पेट्रोल-डिझेलचे भाव गगनाला जाऊन भिडलेत. यावर सुप्रिया सुळे यांनी काही जनआंदोलन उभारलंय का? तुम्ही राज्याचं नेतृत्व करावं आणि महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून पुढं यावं अशी तुमच्या काही ठराविक कार्यकर्त्यांची इच्छा आहे. राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री तुम्ही झालात तर सर्वसामान्य माणसाला बरं वाटेल परंतु त्या क्षमता तुमच्यात आहेत का? त्यासाठी तुम्ही काही करू शकता का? त्यासाठी तुमच्याकडून काही परिश्रम घेतले जातील असं वाटतंय का? तुमच्यात त्या अनुषंगानं काही वेगळेपण किंवा गुणवैशिष्ट्ये दिसतात का? या कोरोनाच्या काळात राज्य सरकारनं शेतकर्‍यांची वीज ताड ताड ताड तोडली. काय केलंत सुप्रियाबाई तुम्ही? तुमची या शेतकर्‍यांप्रती काही जबाबदारी नव्हती का?

कोणी तुमच्याकडं आलं की ठरलेलं उत्तर द्यायचं, ‘‘मी पवार साहेबांशी चर्चा करते, मी मुख्यमंत्र्यांशी बोलते, अजितदादांना बोलते, अमूकला सांगते...’’

या कोरोना काळात किती चांगलं काम उभं करता येऊ शकतं हे तुमच्याच पक्षाच्या निलेश लंके नावाच्या आमदारानं दाखवून दिलं. तुमच्या बारामती लोकसभा मतदार संघात कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी, त्यांच्या बचावासाठी तुम्ही काही भरीव काम केलं का? महाराष्ट्र नवनिर्माण सेेनेचे पुणे शहराध्यक्ष वसंततात्या मोरे जेवढी धडाडी दाखवतात, लोकांच्या अडीअडचणीला स्वतः धावून जातात तेवढंही तुम्ही केलं नाही. तुमच्याकडं पन्नास-साठ आमदार, पाच-सहा खासदार आणि महाराष्ट्रभर पसरलेलं कार्यकर्त्यांचं जाळं असूनही तुम्ही काहीच केलं नाही. हिंदीतला कुमार विश्वास नावाचा कवी किंवा सोनू सूद नावाचा अभिनेता लोकांपर्यंत मदत पोहोचविण्याची चळवळ निर्माण करत होते. श्रीनिवास नावाच्या युवक काँगे्रसच्या अध्यक्षानं तर थेट विदेशी दुतावासातील अधिकार्‍यांना ऑक्सीजन सिलेंडर पोहोचवण्यापासून सगळी मदत केली. अशावेळी तुम्ही कुणाला काही मदत केली का? किंवा किमान तशी मदत तुमच्याकडे तरी कुणी विश्वासानं मागितली का? देशाचं-राज्याचं नेतृत्व करण्याची स्वप्नं पाहणं खूप झालं. ते बस्स करा! किमान राजकारणात, समाजकारणात, सार्वजनिक जीवनात स्वतःचं अस्तित्व जरी टिकवून ठेवायचं असेल तर संघर्ष करायला पर्याय नाही. तसा संघर्ष करत रस्त्यावर आलात तरच या पुढच्या काळात तुम्ही तग धरून राहून शकाल. बाबांची लाडकी मुलगी ही ओळख फक्त तुमच्या घरापुरती राहू द्या. तुमच्यापुढे आता दोन मार्ग आहेत. पहिला इंदिरा गांधी यांचा आणि दुसरा पंकजा गोपीनाथ मुंडे यांचा. यातल्या कोणत्या मार्गावर जायचं हे तुमचं तुम्ही ठरवा.

दरवेळी तुमच्या प्रचाराला पवार साहेबांना यावं लागतं. दरवेळी अजितदादांना त्यासाठी त्यांची शक्ती खर्च करावी लागते. तुमच्या विजयासाठी दरवेळी मतदारसंघातले सगळे राजकीय विरोधक पवार साहेबांना हाताशी धरावे लागतात आणि त्यांना जवळ करावं लागतं. काय पद्धत काय? दहा वर्षे घालवूनही तुम्हाला स्वतःचा मतदार तयार करता येत नाही? तुमचे स्वतःचे कार्यकर्तेही तुमच्याबरोबर नाहीत? तुमच्याबाबत ब्रेकिंक न्यूज कोणत्या? तर तुम्ही कोणत्या तरी कार्यकर्त्याला फोन करून धमकावलं, ‘मी बघीन तुझ्याकडं, मी दाखवीन तुला’ अशा तुमच्या धमक्यांना माणसं घाबरतात? पवारसाहेबांकडं बघून लोक हे ऐकून घेतात. एकदा पवार साहेबांना बाजूला ठेवून रस्त्यावर या आणि स्वतःची किंमत पडताळून बघा. भाजपची एखादी महिला आघाडीची तालुका अध्यक्ष तरी तुम्हाला घाबरतेय का ते बघा. भाजयुमोची एखादी महाविद्यालयीन मुलगीही तुम्हाला चर्चासत्रात, भाषणात सहज हरवेल. तुमचं ना बोलणं प्रभावी, ना कोणत्या विषयाचा अभ्यास! शिवसेना महिला आघाडीची एखादी बाईही तुमच्यापेक्षा चांगलं बोलते. मग कसल्या गमजा मारता?

ज्याची ‘तडीपार’ म्हणून तुम्ही कायम हेटाळणी करता ते अमित शहाही तुम्हाला सभागृहात तोंडावर आपटतात. त्यांच्यावर इतरवेळी वाटेल ती चर्चा आपण करूच पण ते सभागृहात येताना कायम तयारी करून येतात इतकं तरी उघड्या डोळ्यांनी बघा. संघर्ष कसा करावा हे तुम्हाला आम्ही सांगायचं का? ऐंशीव्या वर्षी पायाला इतक्या गंभीर जखमा झालेल्या असताना, पावसात भिजत महाराष्ट्रभर फिरणारे तुमचे बाबा तरी एकदा नीट अभ्यासा. संघर्ष करायची तुमची भूमिका आणि वृत्ती आहे का इतकंच महत्त्वाचं.

राजकारण म्हणजे एक संधी असते. त्या संधीचं सोनं करायचं की ती मातीमोल ठरवायची हे ज्यानं त्यानं ठरवायचं असतं. एकदा का खुर्ची गेली, अधिकार गेले की शब्दशः कोणीच विचारत नाही. आज बाबराचे वंशज भजीपावचा गाडा चालवून उदरनिर्वाह करतात. त्यामुळं शरद पवारांच्या नावावर पुढची काही वर्षे तुम्ही टिकून राहू शकाल पण ते शाश्वत नसेल. महापुरूषही काळाच्या ओघात कसे नष्ट होतात याबाबत रॉय किणीकर यांनी खूप सुंदर निरिक्षण नोंदवलंय. तेवढ्या दोन ओळी समजून घेण्याएवढ्या आपण समर्थ आहात. त्यामुळं किणीकरांचा दाखला देतो आणि थांबतो.
कोरून शिळेवर जन्ममृत्युची वार्ता
जा ठेवा त्या जागेवर पणती आता
वाचेल कोणीतरी होताना उत्खनन
म्हणतील कोण हा, कशास याचे स्मरण?


- घनश्याम पाटील

संपादक, प्रकाशक, ‘चपराक’, पुणे
7057292092


Tuesday, June 1, 2021

नवरा मुलगा फिरे नागडा...


महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि विश्वकोश निर्मिती मंडळ या दोन्ही संस्था मराठी भाषेत साहित्य, संस्कृती, तत्त्वज्ञान, इतिहास, संशोधन अशा क्षेत्रात कार्यरत आहेत. या संस्थांच्या अध्यक्षपदी अनुक्रमे डॉ. सदानंद मोरे आणि डॉ. राजा दीक्षित यांची निवड झाली आहे. हे दोन्ही अध्यक्ष पुण्यातील असल्यानं आणि अन्य पदाधिकार्‍यांतही पुण्याचं वर्चस्व असल्यानं साहित्याचा ठेका फक्त पुणेकरांकडंच आहे का? असा प्रश्न उपस्थित केला गेला आहे.


पूर्वी श्रीधर व्यंकटेश केतकरांनी कोणतीही शासकीय मदत नसताना, सहकारी नसताना, आर्थिक निधी उपलब्ध नसताना ज्ञानकोश काढले होते. एका माणसानं ठरवलं तर तो काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिलं. विश्वकोश मंडळानं त्याच ज्ञानकोशावर संस्कार केले असते, संपादन केलं असतं आणि सुधारित आवृत्या प्रकाशित केल्या असत्या तरी मोठं काम उभं झालं असतं. ते न करता तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची सोय करण्यासाठी यशवंतराव चव्हाणांनी विश्वकोश निर्मिती मंडळ काढलं असा आरोप कायम केला जातो. सगळी शासकीय कार्यालयं मुंबईत असताना विश्वकोश निर्मिती मंडळाचं कार्यालय वाईसारख्या छोट्या गावात कशासाठी? तर तर्कतीर्थ वाई सोडायला तयार नव्हते आणि आपल्या स्वतःच्या जिल्ह्यात साहित्यविषयक अशी एखादी संस्था आली तर यशवंतरावांना ते हवंच होतं. यशवंतरावांचे वैचारिक सल्लागार आणि गुरू म्हणून तर्कतीर्थ काम बघतच होते. त्यामुळं हा उद्योग वाईत केला गेला. तर्कतीर्थांच्या हयातीत विश्वकोशाचे किती खंड प्रकाशित झाले आणि त्यांच्यानंतर किती कोश आले याचं उत्तर मिळायला हवं.

विश्वकोशांची निर्मिती हा काही कधीही न संपणारा उद्योग नाही. कधीतरी हे काम पूर्ण व्हायला हवं. ते काम पूर्णत्वाला जातच नाही, हा काय प्रकार आहे? विश्वकोशात काही मंडळी अभ्यागत संपादक म्हणून नेमली गेली आणि त्यांच्याकडून अक्षरशः कामगारासारखं लेखनकाम करून घेण्यात आलं. मराठी भाषेसाठी ही अत्यंत केविलवाणी गोष्ट आहे. विश्वकोश निर्मिती मंडळावर महाराष्ट्र सरकारनं आजवर केलेला खर्च आणि या मंडळाकडून झालेलं काम याचा लेखाजोखा एकदा समोर यायला हवा. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या घरात जशी ज्ञानेश्वरी, तुकारामांची गाथा, शिवलीलामृत, भागवत, अन्य महत्त्वाचे ग्रंथ आहेत तसे घराघरात हे विश्वकोश असायला हवे होते. हे सगळे खंड किमान सगळ्या शाळा, महाविद्यालयं, अन्य ज्ञानाची क्षेत्रं या ठिकाणी तरी उपलब्ध करून देण्याचं काम महाराष्ट्र सरकारला करता आलं असतं.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जे साखर कारखाने आहेत, महाराष्ट्रातल्या मोठ्या बँका, पतसंस्था, अन्य सहकारी संस्था आहेत त्यांनी सभासदांना लाभांश म्हणून त्यांच्यातर्फे विश्वकोशाचं वाटप करायला काय हरकत होती? विश्वकोश निदान प्रत्येक पिढीच्या हातात पडेल यासाठी तरी आजवर काही केलं गेलंय का? विद्यार्थ्यांचे सोडा अनेक शिक्षकांनी आणि प्राध्यापकांनीही हे खंड आजवर कधीही बघीतले नाहीत. असे प्रयत्न ना आपल्या शासनानं केले ना विश्वकोश निर्मिती मंडळानं केले. त्यामुळंच या विश्वकोश निर्मिती मंडळावर ज्यांची वर्णी लावली जाते त्यांची योग्यता काय हा प्रश्न उपस्थित होतो. डॉ. राजा दीक्षित यांच्यासारख्या अभ्यासू आणि व्यासंगी संधोधकाचा सन्मान म्हणून हे पद त्यांना दिलं गेलं असेल तर ते फक्त मिरवण्यापुरतंच आहे का? यासाठी या मंडळाच्या अध्यक्षपदी एखाद्या प्रशासकीय अधिकार्‍याची निवड करायला हवी होती. त्यानं किमान काही शिस्त लावून हे काम तडीस नेलं असतं. विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षपदी लेखक वा संशोधकाची गरज नाही तर तिथं प्रशासकीय कौशल्य असलेल्या आणि सरकारी मदतीशिवाय सुद्धा स्वतःच्या हिंमतीवर निधी उभा करत हे काम पुढं नेणार्‍याची गरज आहे. तुकाराम मुंडे यांच्यासारखा एखादा अधिकारी, एखादा जिल्हाधिकारी या पदाला योग्य न्याय देऊ शकेल. गेला बाजार एखादा पुस्तक विक्रेता किंवा आमच्यासारखा कुणी क्रियाशील प्रकाशकही हे काम नेटानं करू शकेल. यावर्षी किती खंड काढायचे, त्यासाठी कुणाकडून लेखन करून घ्यायचं, सरकारनं हात आखडते घेतले तरी समाजातून निधी कसा उभा करायचा हे कोणत्याही प्रशासकीय कौशल्य असलेल्या माणसालाच सहजी जमू शकेल.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळानं नवोदित लेखक-कवींचं पहिलं पुस्तक प्रकाशित करायचं ठरवलं. त्यासाठी अनुदान दिलं जातं. नवीन लेखक आणि कवींचा शोध घ्यावा यासाठी या मंडळानं स्वतःहून काही काम केलंय का? त्यांच्या माध्यमातून पुढं आलेला कोणता कवी महाराष्ट्राचा महाकवी झालाय? पहिलं पुस्तक प्रकाशित केल्यावर त्यांची जबाबदारी संपली का? त्यांच्यामुळं एखाद्या लेखकाला महाराष्ट्र ओळखतोय असं झालंय का? नवोदित लेखकांची पुस्तकं यांनी अनुदान योजनेतून निवडल्यावरही ती ज्या प्रकाशकांना दिली जातात त्यांच्याकडूनही ते बराच काळ रखडवलं जातं. मराठी साहित्यिकांना वर्षानुवर्षे वाट पहायला शिकवण्याचं काम आपलं साहित्य आणि संस्कृती मंडळ करतं.

विश्वकोश निर्मिती मंडळ आणि साहित्य संस्कृती मंडळावर पदाधिकारी म्हणून ज्या कोणाची निवड होतेय त्यांचं तरी काय काम आहे? कसलंही साहित्यिक योगदान नसताना त्या त्या भागातील राजकारण्यांच्या खूशमस्कर्‍यांना इथं संधी दिली जाते. पूर्वी जसा शनिवारवाड्यावर रमण्याचा कार्यक्रम भरायचा तशाच या नियुक्त्या होतात. फरक इतकाच की शनिवारवाड्यावर जेवण आणि दक्षिणा दिली जायची. सध्या जे कोणी सरकारची हुजरेगिरी करतात त्यांना अशी मंडळांची खिरापत वाटली जाते. स्वाभिमानाचा आणि मराठी लेखकांचा काही संबंधच राहिला नाही. दक्षिणेसाठी देशभरातून जमणारे ब्राह्मण आणि इथं वर्णी लागावी म्हणून धडपडणारे लेखक यांत तसा काही फरक नाही. आज पुन्हा एखाद्या घाशीराम कोतवालाची गरज आहे. तरच या सर्वधर्मिय लाभार्थी साहित्यिकांना थोडीफार दहशत वाटेल.

सदानंद मोरे यांचं स्वतःचं लेखनही फारसं वाचनीय नाही. ते काय इतरांचं लेखन तपासून त्या लेखकांना अनुदान देणार? ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते आणि मागच्या वेळीही त्यांनी साहित्य संस्कृती मंडळावर अध्यक्ष म्हणून काम केलंय. त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात साहित्य आणि संस्कृतीसाठी नेमकं काय केलं गेलंय? सरकार बदललं की रंग बदलायचे आणि सगळे लाभ पदरात पाडून घ्यायचे यात त्यांची मास्टरकी आहे. जिथं अध्यक्षच असा तकलादू आणि दिखाव्यापुरता असतो तिथं साहित्य आणि संस्कृतीचं काम नेमकं काय आणि कसं होणार? महाराष्ट्रात अनेक प्रतिभावंत आणि प्रशासनकौशल्य असलेले अनेक लेखक असूनही सदानंद मोरे यांचा स्वतःत आश्चर्यकारक बदल घडवून आणण्याचा अनुभवच भारी पडतो.

मुळात विश्वकोश निर्मिती मंडळ आणि साहित्य संस्कृती मंडळ यांनी आजवर महाराष्ट्राला काय दिलं? हे पडताळून पहायला हवं. आजवर मराठीतले विश्वकोश तयार होऊन त्याच्या हिंदी, इंग्रजी आवृत्या जगभर जायला हव्या होत्या. मराठी साहित्य जागतिक स्तरावर जावं यासाठी या दोन्ही संस्थांनी आजवर काहीही केलेलं नाही. ज्यांना व्यवस्थापन कळत नाही अशा शोभेच्या बाहुल्या या ठिकाणी कार्यरत असतात. साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे जसं फक्त मिरवण्यापुरतंच मर्यादित राहिलंय तसं या संस्थांच्या अध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांचं झालंय. लोककवी मनमोहनांच्या भाषेत सांगायचं तर, ‘नवरा मुलगा फिरे नागडा, सनईवाला सुटात हिंडे.’ अगदी त्याचप्रमाणे साहित्य क्षेत्रातील तळमळीनं काम करणारे कार्यकर्ते बाजूला राहतात आणि नवरदेवाऐवजी हे सुटाबुटातले बॅन्डवाले लग्नात आत्मसंतुष्ट होऊन मिरवत असतात. हे थांबवलं नाही तर अशा मंडळांचं कामकाज हा फक्त एक फार्स ठरेल इतकंच.

मराठी भाषेचं वैभव आणखी समृद्ध व्हावं यासाठी या संस्थांनी आजवर काय केलं? महाराष्ट्राच्या बाहेर जे मराठी वाचक, लेखक आहेत त्यांच्यासाठी काय केलं? जगभरातील मराठी वाचक एकत्र यावेत यासाठी तुम्ही काही केलंय का? तुम्ही जी पुस्तकं प्रकाशित करता ती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचं कामही तुम्हाला धड जमत नाही. एकतर मराठी साहित्यविश्व अत्यंत छोटं आहे. इथं फार मोठ्या आर्थिक उलाढाली होत नाहीत. ज्यांचा साहित्याच्या जीवावरच उदरनिर्वाह होतो असे मराठीत फार थोडे लेखक आहेत. आजच्या मराठी लेखकांचं जगणं म्हणजे गोनीदांसारखं किंवा व्यंकटेश माडगूळकरांसारखं नको. सिडने शेल्डनसारखं, अगाथा ख्रिस्तीसारखं, जे. के. रॉलिंगसारखं जगता आलं पाहिजे. लेखनाच्या जीवावर सर्व गरजा पूर्ण करणं, विमानानं फिरणं, आलिशान व्हिलात राहणं, सगळी स्वप्नं पूर्ण करून मौजमजा करणं म्हणजे जगणं आणि हे सगळं साहित्याच्या जोरावर व्हायला हवं. त्यासाठी अल्पसंतुष्ठता बाजूला सारायला हवी. ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ असं म्हणताना आपण यापेक्षा जास्त कमवूच शकत नाही हा न्यूनगंड आहे. ‘चित्ती असू द्यावे समाधान’ असं मनोमन वाटणारे मात्र खूप कमी आहेत. हे असं वैभव मराठी भाषेला प्राप्त करून देणं आणि त्यासाठीचं वातावरण तयार करणं हे काम अशा साहित्य संस्थांना, मंडळांना गंभीरपणे करायला हवं.

शरद पवारांच्या भाषेत बोलायचं तर इतकी वर्षे काम करून तुम्ही काय उपटलंत? (गवत)! केलंच काय तुम्ही इतकी वर्षे? तुमचं आम्ही कौतुक करावं असं काय केलं तुम्ही मराठी लेखकांसाठी? एक पिढी सररास इंग्रजी माध्यमांच्या शाळेत गेली. तो प्रवेश रोखण्यासाठी राज्य साहित्य संस्कृती मंडळानं नेमकं काही केलंय का? हे जे सदस्य म्हणून गोळा केलेले सगळीकडचे भाट लेखक आहेत ते कशासाठी? यात तुम्ही जे सदस्य निवडलेत ते फक्त तुमच्या आरत्या ओवाळत असतात. उद्या राजा दीक्षित यांच्यासारख्या विद्वानानं सुप्रिया सुळे यांच्या गौरवाचा लेख लिहिला आणि सदानंद मोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यात कसे प्रबोधनकार ठाकरे दिसतात याची मांडणी केली तर कुणालाही आश्चर्य वाटायला नको.

या अशा लेखकांपेक्षा संजय राऊत परवडले. मालकांनी सांगितलं, इटलीची किटली आपल्याला नको, तर ते तसं लिहितात. मालकांनी पुन्हा सांगितलं की, देशाची आजवरची जडणघडण काँग्रेसमुळं आणि गांधी-नेहरूंमुळं झालीय तर ते तशीही मांडणी करतात! जिथं नोकरी करतो त्या मालकाला खूश ठेवणं हा धर्म असतो. आपले लेखक तेही काम इमानेइतबारे करत नाहीत.

मराठी लेखकांची अशी हीन आणि दयनीय अवस्था करणारी ही मंडळं बरखास्त केली गेली तर मराठी भाषा अधिक समृद्ध होईल. एखाद्या छोट्याशा पदासाठी, पुरस्कारासाठी, सन्मानासाठी मराठी लेखक आपली अस्मिता गहाण टाकतो. त्यासाठी मराठी लेखकांनी किती गयावया करावा आणि किती हां जी, हां जी करावं? लेखकांचा स्वाभिमान सांभाळणारे यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे राज्यकर्ते सध्या नाहीत हे यांना कळत नाही का? दुर्गाबाईंनी साहित्य संमेलनात अणीबाणीचा निषेध केला तरी यशवंतराव शांत बसून राहिले. पु. ल. देशपांडे, पु. भा. भावे अशा लेखकांना यशवंतरावांनी लद्दाख, काश्मीरचा परिसर दाखवून आणला. भावे तर स्वातंत्र्यवीर सावरकरांचे निस्सिम भक्त. कट्टर हिंदुत्त्ववादी. यशवंरावांनी ते काहीही बघितलं नाही. लेखकांची आणि कवींची विचारधारा न पाहता त्यांचे यशवंतरावांनी कायम लाडच केले. ‘श्रीमान योगी’ लिहिणार्‍या रणजित देसाईंना दिल्लीला बोलवून त्यांनी सत्कार केला. ना. धों. महानोरांच्या कविता ऐकायला ते त्यांच्या घरी जाऊन बसले. अजित पवारांना कधी चुकून कुणाची कविता ऐकायची सद्बुद्धी झालीच तर ते फर्मान काढतील, बोलवा बंगल्यावर त्याला! जसं राजकारण्यांचं कल्चर संपलं तशीच मराठी साहित्याची संस्कृतीही ढासाळलीय, डागाळलीय.

साहित्य आणि संस्कृतीचा प्रचार करण्यासाठी आणि मराठी भाषेचं वर्चस्व वाढविण्यासाठी अधिक व्यापक प्रयत्नांची आवश्यकता आहे. जगात बोलल्या जाणार्‍या भाषांत मराठीचा दहावा क्रमांक असेल तर आपण नेटानं काम करण्याची गरज आहे. त्यासाठी अशा मंडळांवर लेखक-कवींना गुंतवून ठेऊ नका. त्यांना उत्तमोत्तम लेखन करण्यासाठी वेळ द्या. इथं चांगल्या प्रशासकाची निवड करा. जो या मंडळांना शिस्त लावेल, वार्षिक खर्चाचा अंदाज घेऊन निधी उपलब्ध करून घेऊ शकेल, महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील तज्ज्ञ आणि अभ्यासू लेखकांकडून लेखन करून घेऊ शकेल अशा अध्यक्षांची या संस्थांना गरज आहे. समजा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाला वर्षाला पाच कोटी रूपयांची आवश्यकता असेल आणि अशा परिस्थितीत सरकार हे पैसे देण्यास सक्षम नसेल तर सदानंद मोरे मान हलवत गप्प बसतील; कारण काही आवाज उठवावा इतकी नैतिकता त्यांच्यात शिल्लक नाही. बक्षीस म्हणून अशी पदं मिळाली की गत्यंतर राहत नाही. म्हणूनच धडपड करून असा निधी जमवणारा अध्यक्ष आपल्याला हवाय. प्रत्येक गोष्ट सरकारी मदतीशिवाय, अनुदानाशिवाय पूर्ण होणारच नाही हे त्यांनी डोक्यातून काढून टाकायला हवं. मराठी माणूस इतकाही कद्रू नक्कीच नाही.

हीच गोष्ट राजा दीक्षित यांची आहे. तुमच्या कोणत्याही योजनेला, कल्पनांना लागणारं भांडवल मराठी माणसांकडून उभं करण्याची धमक तुमच्यात आहे का? तुमच्याकडं बघून कोणी एक रूपया तरी देईल का? तुमचं संशोधन, तुमचा अभ्यास हे सगळं मान्य केलं तरी महाष्ट्रभर तुमची तशी काही क्रेझ नाही. एखाद्या हॉटेलात जेवायला गेलात तर तुम्हाला तिथंही कोणी ओळखणार नाही. तुमच्या अंगभूत कौशल्यानं तुम्ही राजमान्यता मिळवली असली तरी तुम्हाला लोकमान्यता नाही. शासनानं तुम्हाला जे काही दिलंय त्यावरच तुमच्या संस्थांची गुजराण होतेय. त्यामुळं सरकारच्या विरूद्ध तुम्ही कधी आवाजही काढणार नाही. थोडक्यात मोरे असतील किंवा दीक्षीत! अशा काही लोकांना शासनानं उपकृत करून ठेवलंय. विधानपरिषद जशी काही लोकांची सोय करण्यासाठी असते तशीच साहित्य आणि संशोधनातील या संस्थांची गत झालीय.

या संस्थांना स्वायत्तता नाही, पुरेसा निधी नाही हे आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे. सरकारनं किमान तेवढं तरी करायला हवं. विश्वकोश निर्मितीचं काम ‘अनएंडिंग’ आहे हा समज दूर करून त्याचं नियोजन करायला हवं. साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून कोणती नवी पुस्तकं करता येतील, कोणत्या पुस्तकांचं पुनर्मुद्रण करता येईल याचा आराखडा तयार करायला हवा. तुमचा विश्वकोश राहू द्या पण किमान ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा, नामदेवांचे-एकनाथांचे अभंग हे तरी घराघरात कसे जातील ते बघा. अशा कोणत्याही योजना यांच्या डोक्यात नाहीत.

अशा मंडळांवर काम करणं हे विद्वतेचं नाही तर कौशल्याचं काम आहे हे वारंवार दिसून आलंय. सध्याच्या राजकारणाचा ढासळलेला दर्जा पाहता यावर जे सदस्य नेमलेत ते काही आश्चर्यजनक नाही. या मंडळींना त्यांचे भत्ते वेळेत मिळाले तरी सरकारचे स्तुतिपाठक म्हणून ते त्यांचा कार्यकाळ पूर्ण करू शकतील. यांच्या या सदस्यांत एकही प्रकाशक नाही. अरे, आमचा एखादा निष्ठावान पुस्तक विक्रेता सुद्धा या पदावर तुमच्यापेक्षा निश्चितपणे चांगलं काम करू शकेल. अशा संस्थांपैकी एखादी संस्था आता चंद्रपूरसारख्या भागात हवलण्याचीही वेळ आलीय. विश्वकोश निर्मिती मंडळाचं काम वाईसारख्या छोट्या गावात होऊ शकतं तर ते आमच्या जालन्यातल्या मंठ्यात किंवा चंद्रपूरच्या चिमुरमध्येही होऊ शकतं. ज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अशा संस्था तिकडं गेल्या तर त्यात सर्वसमावेशकता येईल आणि सामान्य माणसाशीही त्याची नाळ जोडली जाईल. विश्वकोश निर्मिती मंडळ किंवा साहित्य संस्कृती मंडळ आता चंद्रपूरला हलवायला काहीच हरकत नाही. काही लेखकांना त्याची चिंता वाटत असली तरी आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे चंद्रपूरातून दारूबंदीही उठवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर असे स्थलांतर करायला हरकत नाही.

स्वाभिमानी कवी, लेखक, पत्रकार, संशोधक, विचारवंत यांनी शासनाच्या अशा कोणत्याही मंडळावर जाणं म्हणजे स्वतःची अब्रू घालवून घेण्यासारखं वातावरण सध्या आहे. जिथं काहीच काम करता येत नाही तिथं जाऊन जागा अडवायची आणि या संस्थांचे पदाधिकारी म्हणून सगळीकडून हार-तुरे मिरवून घ्यायचे याला काही अर्थ नाही. त्यापेक्षा त्यांनी आपल्या सर्जनशीलतेकडं आणि उत्तमोत्तम निर्मितीकडं लक्ष द्यावं. भाषेच्या आणि पर्यायानं संस्कृतीच्या वृद्धी आणि संवर्धनासाठी तेच महत्त्वाचे ठरणार आहे.
- घनश्याम पाटील
संस्थापक, संपादक - चपराक
7057292092



Monday, May 24, 2021

मलमपट्टी नको, माणूस उभा करा


कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळं भयप्रद परिस्थिती निर्माण झालेली असतानाच विविध प्रांतात निसर्गाचं तांडवही अनुभवायला येत आहे. मागच्या वर्षी कोकण भागात निसर्ग चक्रीवादळानं हाहाकार उडवला. यंदाही तौैक्ते वादळानं होत्याचं नव्हतं झालं आहे. गेल्या वर्षी निसर्गाच्या तडाख्यानं कोकणवासीयांचं अतोनात नुकसान झालं. नारळ, पोफळी, फणस, कोकम, जायफळाच्या बागा क्षणार्धात उद्ध्वस्त झाल्या. शेकडो वर्षांची झाडं उन्मळून पडली. डोळ्यादेखत सगळं भुईसपाट होऊनही कोकणी माणसानं धीर सोडला नाही. न खचता, न डगमगता तो पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करत होता.

घनश्याम पाटील यांचे 'दरवळ' हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठी येथे क्लीक करा 

निसर्ग चक्रीवादळाच्या वेळीही अनेक नेत्यांनी कोकणचे दौरे केले. आपदग्रस्तांना मदत करायची म्हणून हे दौरे होते की या संकटाच्या काळातही त्यांना पर्यटन दौरे करायचे होते हे कळलं नाही. सरकारकडून तुटपुंजी मदत मिळूनही कोकणी माणूस डगमगला नाही. यंदा पुन्हा त्याला तौक्ते वादळास सामोरं जावं लागल्यानं मात्र तो हवालदील झाला आहे. कोरोनाची परिस्थिती उद्भवल्यानंतर महाराष्ट्रात एकाच माणसानं कटाक्षानं घरकोंडीचे नियम पाळले. काहीही झालं तरी घर सोडायचं नाही असा प्रण केल्याप्रमाणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरात बसून राहिले. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कोमट पाणी पिण्याचा सल्ला त्यांनी सातत्यानं जनतेला दिला. यंदा तौैक्ते वादळात मात्र ते चक्क घराबाहेर पडले आणि अवघ्या चार तासात कोकण दौरा उरकून परत त्यांच्या निवासस्थानी आले. मनसेच्या संदीप देशपांडे यांनी याबाबत उपहासानं त्यांना सुनावलं की, तौैैक्ते वादळापेक्षा मुख्यमंत्र्यांचा हा दौरा अधिक वादळी होता.

खरंतर अशा दौर्‍यांचा फार्स हा फक्त देखावा ठरतो हे यापूर्वीही अनेकदा दिसून आलं आहे. सांगली-सातारा-कोल्हापूर भागात आलेल्या महापूराच्या वेळी तेव्हाचे मुख्यमंत्री असाच देखावा करत इकडं फिरत होते. गिरीश महाजन यांच्यासारख्या नेत्यानं तर तिकडं जाऊन सेल्फी काढल्या म्हणून वाद ओढवून घेतला होता. सत्ता नसतानाही शरद पवार यांनी त्या भागातला दौरा काढून लोकांना धीर दिला होता. आता ते आणि त्यांचा पक्ष सत्तेत असूनही आपदग्रस्तांसाठी भरीव असं काहीच करताना दिसत नाहीत.

‘पंचधारा’ या मुखपृष्ठात परभणी येथील सुप्रसिद्ध लेखिका मनीषा कुलकर्णी-आष्टीकर यांनी ‘दरवळ’ या पुस्तकाची लिहिलेली समीक्षा.

शरद पवारांच्या आपत्ती निवारणाच्या कार्याचं नेहमी कौतुक केलं जातं. त्यासाठी 1993 च्या किल्लारी भूकंपाच्या वेळचं उदाहरण आवर्जून दिलं जातं. तेव्हा संपर्काची साधनं उपलब्ध नव्हती. प्रसारमाध्यमांची इतकी स्पर्धा नव्हती. तरीही शरद पवार किल्लारीला पोहोचले. किल्लारी, लामजना, कवठा, नारंगवाडी, रेबे चिंचोली, सास्तूर, लोहारा, माकणी, उमरगा, बलसूर, बाबळसूर, नाईचाकूर अशा लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील 52 गावांचा त्यांनी आढावा घेतला. स्वतः त्यांनी किल्लारीत तळ ठोकला. लगोलग निर्णय घेत भरीव मदत जाहीर केली. जगभरातून मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री स्वतः भूकंपग्रस्तांची दुभंगलेली मनं सांधण्याचा, त्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत म्हटल्यावर प्रशासनही खडबडून जागं झालं. मदत कार्यात कसलीच उणीव भासू दिली गेली नाही.

त्यानंतर या भागातील 52 गावांचं पुनर्वसन झालं. त्यासाठी जमिनीचं संकलन करताना अनेक अनास्था प्रसंग उद्भवले. दोन घरातील अंतर, कामाचा दर्जा यावरून चर्चा झडल्या. भूकंपग्रस्तांसाठी आलेल्या मदतीत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याचे आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. ज्या कुटुंबातील सदस्य मृत्युमुखी पडले होते त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्यात आली. त्यातही लक्षवेधी घोटाळे झाले. तरूणांना सरकारी नोकर्‍यांचं आश्वासन देण्यात आलं होतं. ते आजतागायत पूर्ण झालेलं नाही. भूकंपग्रस्तांच्या मदतीच्या बहाण्यानं जी लूट करण्यात आली, फसवणूक करण्यात आली त्याची दखल कोणीही आणि कधीही घेतली नाही. स्वभावानं कणखर असलेला मराठवाडी माणूस तशा परिस्थितीतही स्वतःच्या पायावर उभा राहिला. त्याचं आक्रंदणं कुणाच्या लक्षातच आलं नाही. अनेकांनी त्यानंतर गाव सोडलं. मिळेल तिथं आणि मिळेल ते काम करून कुटुंबाची उपजिविका केली. आजही त्यांच्या मनावर जे ओरखडे उमटलेत ते दूर झाले नाहीत. दुसरीकडं शरद पवार यांच्यासारख्या नेत्यानं मात्र किल्लारी भूकंपात किती मोठं योगदान दिलं याचा डांगोरा कायम पिटला जातो. इतकंच काय अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना गुजरातच्या कच्छ येथे झालेल्या भूकंपाच्या वेळी त्यांनी आपत्ती आणि व्यवस्थापनाच्या कामासाठी शरद पवार यांची मदत घेतली. किल्लारी भूकंपग्रस्तांच्या व्यथा-वेदना मात्र आजतागायत कुणाच्याही लक्षात आल्याचं दिसत नाही.

  माणूस व माणुसकी जाणिवेचं अंतरंग : दरवळ

कोकणच्या आपत्तीत जे नुकसान झालंय ते अशा दौर्‍यांनी भरून निघणार नाही. त्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करायला हव्यात. नरेंद्र मोदी यांनी कोरोनापूर्व काळात जगभराचे दौरे केले. त्यावेळी त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. हे सरकारी पैशानं जग फिरत आहेत, मौजमजा करत आहेत असे आरोप झाले. आज मात्र करोनाच्या काळात जगभरातून जी मदत येत आहे, ती पाहता मोदींनी सर्व देशांशी जे संबंध निर्माण केले त्याचं महत्त्व लक्षात येतं. मोदींच्या अनेक धोरणांवर टीका होऊ शकते मात्र त्यांचं हे योगदान कुणालाही नाकारता येणार नाही.

मोदी-शहांनीही वादळाच्या वेळी, महापूराच्या वेळी किमान हेलिकॉप्टरनं गुजरात-महाराष्ट्रात असे धावते दौरे केले. सध्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणच्या दौर्‍यावरून राजकारण करत आहेत. आम्ही तीन दिवस या भागाच्या दौर्‍यावर होतो, तुम्ही चार तासात दौरा आटोपता घेतला, असा आरोपही भाजपकडून केला जातोय. सगळं जग बेचिराख होत असतानाही हे महाभाग आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात मश्गुल आहेत. मेलेल्यांच्या टाळेवरचं लोणी खाणं हा काय प्रकार असतो हे यातून दिसून येतं. महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही या बिकट परिस्थितीचं भान आहे की नाही असा प्रश्न सामान्य माणसाला पडतोय. त्याच्यापुढं जगण्या-मरण्याचं आव्हान असताना कोणी कसे दौरे केले यावरच चर्चा झडताहेत. मदतीच्या नावावर मात्र तोंडाला पानं पुसली जात आहेत. आपदग्रस्तांना तात्पुरती मदत करणं, त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमापर्यंत पोहोचवणं आणि आम्हीच कसे या संकटाच्या वेळी तुमच्या सोबत आहोत हे दाखवून देणं असले घाणेरडे राजकारण सुरू आहे.

जोपर्यंत मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करत नाही, दीर्घकालिन योजना आखत नाही, मोडून पडणार्‍या सामान्य माणसाला पुन्हा उभं राहण्यासाठी मदत करत नाही तोपर्यंत अशा वरवरच्या मदतीला काहीच अर्थ उरत नाही. कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग असताना इथला भोळा-भाबडा आणि प्रामाणिक कोकणी माणूस आर्थिकदृष्या सक्षम कसा होईल याचे दीर्घकालिन नियोजन व्हायला हवे. त्याला तात्पुरत्या कुबड्या न देता, वरवरच्या मदतीचं ढोंग करून सहानुभूती न मिळवता त्याला भरीव मदत करण्याचा प्रामाणिकपणा दाखवायला हवा.

एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात नारायण राणे यांच्यासारखं रांगडं नेतृत्व कोकणी माणसाला मिळालं होतं. त्यांचा कोकणवर एकहाती पगडा होता. आता राज्याच्या राजकारणातही कोकणसाठी संघर्ष करणारा नेता दिसत नाही. जे आहेत ते नेत्यांच्या आशीर्वादाखाली दबले गेलेत. स्वाभिमानी कोकणी माणसाची ही परवड पाहूनही कुणाच्याही हृदयाला पाझर फुटू नये ही शोकांतिका आहे. पश्चिमी किनारपट्टीवरील गेल्या काही काळात सातत्यानं येणारी ही अरिष्टं पाहता काहीतरी ठोस काम करणं गरजेचं आहे. वेगळा विदर्भ, वेगळा मराठवाडा अशा प्रांतिक मागण्यांना अधूनमधून जोर येत असतानाच ज्या सामान्य कोकणी माणसाच्या जिवावर मुंबई उभी आहे त्याचा आत्मसन्मान कोणीही दुखावू नये. मुख्यमंत्र्यांनी चार तासांचा दौरा केला, की विरोधी पक्षनेत्यांनी तीन दिवस कोकणात तळ ठोकला यापेक्षा त्यांना या अडचणीच्या काळात कोणी काय मदत केली हे महत्त्वाचं आहे. सामान्य माणूसही तितकंच लक्षात ठेवतो आणि योग्य वेळी ज्याला त्याला ज्याची त्याची पायरी दाखवून देतो हे ध्यानात घ्यायला हवं.
- घनश्याम पाटील
7057292092

दैनिक ‘पुण्य नगरी’, मंगळवार, दि. 25 मे 2021


Sunday, May 23, 2021

वावटळ निर्माण करणारा दरवळ


सुप्रसिद्ध साहित्यिक आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी सरांसारख्या प्रतिभावंतानं आपल्या पुस्तकाची दखल घेणं ही भावनाच खूप सुखद आहे. 'दरवळ'चे हे अनमोल परीक्षण प्रसिद्ध केल्याबद्दल दैनिक पुण्य नगरी चेही विशेष आभार. 
 
चपराक प्रकाशनचे संपादक, प्रकाशक आणि उत्साही तरूण लेखक घनश्याम पाटील यांचा ‘दरवळ’ हा पंचवीस लेखांचा वैचारिक संग्रह वाचनीय तर आहेच पण विचारांची वावटळ वाचकांच्या मनात निर्माण करणारा संग्रह आहे. वृत्तपत्रांतून केलेले हे प्रासंगिक लेखन असले तरी लेखकाचे दीर्घकालिन पूर्वचिंतन आणि त्याची तर्कशुद्ध विचारसरणी याचा प्रत्यय या लेखनातून येतो. 
 
पुलंनी एका प्रवासवर्णनात असे लिहिले आहे की, फ्रेंच संस्कृती ही द्राक्ष संस्कृती आहे तर भारतीय संस्कृती ही रूद्राक्ष संस्कृती आहे. या रूद्राक्ष संस्कृतीची चिरंतन मूल्ये, तिचे वेधघटक आणि त्यामध्ये काळानुरूप घडलेली चांगली-वाईट परिवर्तने याचे भेदक दर्शन या सर्व लेखांतून होते. यातील काही लेखांची शीर्षकेच किती अर्थगर्भ आहेत ती बघा - स्वतःपासूनची सुरूवात महत्त्वाची,  दुर्बल सबल व्हावेत, उमलत्या अंकुरांना बळ द्या. मी का लिहितो या शेवटच्या लेखात लेखकाने आपली लेखनविषयक भूमिका अनुभवसिद्ध उदाहरणे देऊन स्पष्ट केली आहेत. मी माझ्या आनंदासाठी लिहितो असं उत्तर लेखकानं एका प्राश्निकाला दिलेलं असून उर्वरित चोवीस लेखातून त्याला मिळणार्‍या या आनंदाचे स्वरूप स्पष्ट होते आणि हा आनंद नवरसात्मक आनंद असतो. दुसर्‍याचे दुःख वाचून आकलन होण्याचाही आत्मिक आनंद असतो. लेखकाने अनेक ठिकाणी परखड विवेचनही केले आहे. एकांगी विचार करणार्‍यांच्या ते जिव्हारी झोंबेल पण खर्‍या वैचारिकाला हे परखड विचार आनंदच देतील. उदाहरणार्थ - शाकाहाराची चळवळ राबवा (पृष्ठ 68) या लेखात अभिनिवेशी गोरक्षकाबद्दल लेखकाने आसूडच उगारला आहे. गाय मारू नका म्हणून बेंबीच्या देठापासून ओरडून सांगणारे माणसे कशी मारू धजावतात असा खडा सवाल लेखक करतात. अगम्य आणि अतर्क्य या लेखात स्त्रीवादी संघटनांच्या चळवळींचा परामर्श घेताना त्यातील एकांगी अपूर्णता ते लक्षात आणून देतात. तेव्हा ते असे विचारतात, की तृप्ती देसाई शनीशिंगणापूरला आंदोलन करतात पण स्त्री देहाचे प्रदर्शन करणार्‍या बड्या कंपन्यांच्या उत्पादनाविरूद्ध ब्र काढण्याचे धाडस कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यात नाही. 
 
साहित्य संमेलन आणि त्याला पुढेमागे लटकून येणारे विविध वाद आता नेहमीचेच झालेत. त्याचा परामर्श घेताना लेखकाने सोदाहरण विवेचन केले आहे. यवतमाळचे नयनतारा सेहगल प्रकरण, महाबळेश्वरचे अध्यक्षाविना पार पडलेले संमेलन, लक्ष्मीकांत देशमुख आणि श्रीपाल सबनीस या माजी संमेलनाध्यक्षांची नावे न घेता त्यांच्या विधानांचीही स्फोटक दखल लेखकाने घेतली आहे. ‘राहिलेलं राहू द्या’ हा लेख म्हणजे लेखकाच्या आत्मचरित्राचे एक प्रकरणच आहे. आपण कसे घडत गेलो हे सांगताना शेवटी वैयक्तिक संदर्भाच्या बाहेर पडून लेखकाने एक तात्त्विक निष्कर्ष सांगितला आहे की काही प्रश्न सोडले की सुटतात आणि त्याच न्यायानं राहुन गेलेल्या काही गोष्टी तशाच राहू द्याव्यात यातच सगळ्यांचं भल असतं. 
 
‘दरवळ’मध्ये अनेक घटना, प्रसंग वाचायला मिळतात. गावे आणि शहरे आपण वाचता-वाचता फिरतो. कितीतरी लहानमोठ्या व्यक्ती त्यांच्या एरवी न दिसणार्‍या अंतरंगासह भेटतात आणि वाचक या दरवळीत रमून जातो. दरवळीची इतकी सारी बलस्थाने कौतुकास्पद आहेतच पण आता एकच शबलस्थान दाखवण्याची गरज आहे. वृत्तपत्रे आणि नियतकालिके यामध्ये प्रासंगिक लेखन करताना येणार्‍या स्थळकालमर्यादा सांभाळूनच हे लेखन करावे लागते, तसे हे लेखन आहे. याला ग्रंथरूप देताना याच लेखांची अभ्यासपूर्ण पुनर्बांधणी करून साहित्य, संस्कृती, तत्त्वज्ञान यांचे योग्य संदर्भ देऊन हे लेख मुद्रित केले असते तर त्यांना अधिक वजन प्राप्त झाले असते. पुढील आवृत्तीत लेखकाने असा प्रयत्न करावा म्हणजे अक्षरवाङ्मयाच्या दालनात या पुस्तकाला आतापेक्षा अधिक महत्त्वाचे स्थान प्राप्त होईल. 
दरवळ
लेखक - घनश्याम पाटील
प्रकाशक - चपराक (7057292092)
पाने - 128, मूल्य - 200

- डॉ. न. म. जोशी, पुणे

Saturday, May 22, 2021

अलीबाबा आणि चाळीस चोर

 

- घनश्याम पाटील
संस्थापक, संपादक ‘चपराक’, पुणे
7057292092

शरद पवार यांच्या संसदीय राजकारणाला 54 वर्षे पूर्ण होताहेत ही महत्त्वाची गोष्ट आहे. 54 वर्षाचा काळ हा एका राष्ट्रासाठी छोटा असला तरी एका व्यक्तिच्या दृष्टीने तो त्याचे आयुष्य व्यापून टाकणारा कालखंड असतो. वयाच्या ऐंशीत असलेले पवार इतकी वर्षे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत ही गोष्ट म्हणूनच अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पवार भारताचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि आणि भविष्यात आता परत कधी ती शक्यता नाही हेही स्पष्टपणाने दिसतंय. त्यांचं वय, आरोग्य, प्रकृती आणि प्रवृत्तीचा विचार करता त्यांच्याबाबत ‘न झालेले सर्वोत्तम पंतप्रधान’ म्हटलं जातं ते खरंच आहे.


भाऊ तोरसेकर यांचे 'अर्धशतकातला अधांतर - इंदिरा ते मोदी  हे पुस्तक घरपोच मागवा
 

शरद पवार काँगे्रसच्या मूळ प्रवाहात राहिले आणि वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी केंद्रात संरक्षण, कृषी अशी महत्त्वाची खाती सांभाळली. त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करताच देशातही स्वतःचा वेगळा ठसा उमटवला. त्यांनी केलेल्या सकारात्मक गोष्टीत काही गोष्टींचा उल्लेख आवर्जून करावा लागेल. त्यातली पहिली महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे त्यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रात स्त्रियांना सर्वप्रथम संधी मिळवून दिली. हे त्यांचं विलक्षण कर्तृत्व आहे. जर पवार भाजपसारख्या पक्षात असते तर याची प्रचंड जाहिरात करून  त्यांनी उर्वरित आयुष्यात या एकाच मुद्यावर राजकारण केलं असतं आणि पुढच्या सगळ्या निवडणुका यशस्वीपणे लढल्या असत्या. मात्र याबाबत त्यांना प्रसिद्धीचं तंत्र जमलं नाही. 

'अणीबाणी लोकशाहीला कलंक' हे पुस्तक घरपोच मागवा

त्यांचं दुसरं महत्त्वाचं योगदान म्हणजे महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची जी जमिन लागवड योग्य नव्हती तिथला अभ्यास करून फळबागा लावायला लावल्या. अतिशय दूरदृष्टीनं त्यांनी ही जी फळक्रांती घडवली त्याला तोड नाही. राज्यातल्या आणि देशातल्या शेतकर्‍यांना याचा बर्‍यापैकी फायदा झाला. पवार सुरूवातीपासून स्वतःला शेतकरी आणि शेतकर्‍यांचे नेते समजतात. शेतकर्‍यांच्या हितासाठी काम करणं ही आपली जबाबदारीच आहे असं त्यांना वाटायचं. ही जबाबदारी त्यांनी बराच काळ चांगल्या पद्धतीनं पार पाडली.

पंचायत राज व्यवस्थेत स्त्रियांना पुरूषांच्या बरोबरीनं, समान अधिकार मिळावेत यासाठी त्यांनी जे प्रयत्न केले, निर्णय घेतले, कायदे करून घेतले ते महत्त्चाचे आहेत. ग्रामपंचायत रेकॉर्डला पतीच्या नावानं असलेल्या घरातही पत्नीची नोंद करणं इथपासूनचे बदल त्यांच्या दूरदृष्टीनं झाले. स्त्रियांच्या हितासाठी त्यांनी जे योगदान दिलं ते कधीही विसरता न येण्यासारखं आहे. स्त्रियांविषयीचा व्यापक विचार पवारांनी कायम केला हे कोणीही नाकारू शकणार नाही.
 
शरद पवार यांनी क्रीडा क्षेत्रातही भरीव योगदान दिलं. अनेक संस्था-संघटनांना त्यांनी प्रोत्साहन दिलं. त्यांना पैसा उपलब्ध करून दिला. कुस्तीगीर परिषद, कबड्डी संघटना, खो-खो संघटना आणि क्रिकेटमध्ये बीसीसीआयपर्यंत त्यांनी जे काही उभं केलं ते आपण बघितलंच आहे. अशा प्रत्येक संघटनांत त्यांनी चांगले कार्यकर्ते दिले आणि त्यांना स्वतंत्रपणे काम करण्याचे अधिकारही दिले. अशा कार्यकर्त्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्याबरोबरच पैसा आणि अन्य ताकतही त्यांनी उभी करून दिली. कुस्तीगीर परिषदेत बाळासाहेब लांडगे यांना घेतलं किंवा बीसीसीआयमध्ये सौरव गांगुलीला घेतलं तरी त्यांच्या कामात त्यांनी फारसे हस्तक्षेप केले नाहीत. त्यांच्या कामात लुडबूड न करता आपल्याला अपेक्षित आहे ते साध्य करायचं हे पवारांचं कौशल्य अभूतपूर्व आहे. या सर्व सकारात्मक बाबींसाठी शरद पवारांचं नाव भविष्यातही कायम घेतलं जाईल.

घनश्याम पाटील यांचे 'दरवळ' हे पुस्तक घरपोच मागवा 

 शरद पवार यांच्या राजकारणाचा विचार केला तर पवारांनी राजकारणातून काय मिळवलं आणि त्यांच्या राजकारणानं महाराष्ट्राला काय दिलं याचं मूल्यमापण झालं पाहिजे. ते करताना पवारांच्या बाबत नकारात्मक गोष्टी सर्वाधिक आहेत. पवार यशवंतराव चव्हाण यांचे सहकारी म्हणून राजकारणात आले. असं असूनही ते शेवटपर्यंत यशवंतराव चव्हाण यांच्यासोबत राहिले नाहीत. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे...’ असं आवाहन केल्यावर ‘आता परतीचे सगळे दोर कापून टाकले आहेत’ असं त्यांनी बजावलं. यशवंतराव चव्हाण पुन्हा इंदिरा गांधी यांच्यासोबत गेल्यानं ते न पटलेल्या पवारांनी यशवंतरावांच्या हयातीतच त्यांना सोडून जाण्याचा पराक्रम केला.

यशवंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर मात्र त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुन्हा मुख्य प्रवाहात जायचं म्हणून पवार बाईंसोबत गेले. शरद पवार यांच्यावर यशवंतरावांचा खूप मोठा प्रभाव होता. राज ठाकरे यांना जसं वाटतं की बाळासाहेबांसारखं वागायचं, त्यांची नक्कल करायची तसंच काहीसं पवारांच्या बाबतीत झालं. यशवंरावांसारखाच आयुष्याचा प्रवास करायचा हे त्यांनी पक्कं ठरवलं असावं. यशवंतरावांसारखं बोलायचं, त्यांच्यासारखंच वागायचं, त्यांच्यासारखीच भाषणं करायची आणि यशवंतरावांसारखंच राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात अनेक वर्ष टिकून रहायचं अशी कामाची पद्धत पवारांनी सुरू केली. अर्थात त्यातूनच यशवंतरावांच्या राजकारणाचे सगळे दोषही शरदरावांच्या आयुष्यात निर्माण झाले.
 

संजय गोराडे यांची 'तीर्थरूप'  ही कादंबरी घरपोच मागवा
 

यशवंतराव चव्हाण हे अती सावध राजकारणी होते. तो अती सावधपणा पवारांकडे आला. यशवंतरावांच्या कार्यपद्धतीला त्यावेळी अनेकजण ‘कुंपणनीती’ असं म्हणत. जेव्हा राजकारणात दोन गट पडतात तेव्हा कुणाचीही बाजू न घेता कुंपणावर बसून रहायचं आणि जो विजयी होईल त्याच्या बाजूनं उडी मारायची. याला अनेक राजकीय अभ्यासक ‘यशवंतनीती’ किंवा ‘कुंपणनीती’ म्हणतात. पवारांचंही तसंच आहे. राजकारणात ‘सर्व काही किंवा काहीही’ म्हणून रिस्क घ्यावी लागते. धाडस करावं लागतं. अशी मोठी रिस्क घेणं, असं मोठं धाडस करणं हे यशवंतनीतीचा अनुयायी असल्यामुळं पवारांना कधी जमलंच नाही. त्यामुळंच ते कधीही देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत.


सुरेखा बो-हाडे यांचे 'बाईची भाईगिरी' हे पुस्तक घरपोच मागवा


पप्पू कलानी, भाई ठाकूर या आणि अशा गुंडांना स्वतःच्या पक्षात आणायचं आणि पवित्र करायचं हा फॉर्म्युला पवारांनी राजकारणात आणला. आज अनेकजण या फॉर्म्युल्याचे श्रेय भाजपला देत असले तरी ती वस्तुस्थिती नाही. राजकारणातल्या या अभद्र पद्धतीचं जनकत्व पवारांकडं जातं. त्यांनी हे प्रकार केले. ज्याच्यावर प्रचंड टीका केली तो आपल्या पक्षात आला की पवित्र झाला म्हणायचं हे त्यांनी दाखवून दिलं. शरद पवारांनी स्वतःपुरता केलेला हा फॉर्म्युला आता अतिशय त्रासदायक आणि कटकटीचा ठरत आहे.
 
शरद पवारांनी राजकारणात अनेक चुकीचे निर्णय घेतले. त्यावेळी ते मुख्य प्रवाहात पुन्हा सहभागी झाले. व्ही. पी. सिंगांनी त्यावेळी बोफोर्स प्रकरणानंतर जी राळ उठवली त्यानंतरचं पुढचं पाच-दहा वर्षाचं जे राजकारण होतं त्यात राजकारणात पवारांना खूप मोठं स्थान मिळालं असतं. शरद पवारांनी मात्र मूळ काँग्रेस पक्षात जाण्याची घाई केली. सोनिया गांधींना राजकारणात आणण्याचं काम पवारांनी केलं. ज्या पद्धतीनं ते सोनिया गांधींच्या जवळ गेले तसंच त्यांच्यापासून दूर जाण्यातही त्यांनी घाई गरबड केली. चाचा केसरींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये काम करत असताना त्यांनी राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचा घाट घातला आणि 10 जून 1999 ला राष्ट्रवादीची स्थापना केली. काही निर्णय घेण्यासाठी खूप गरबड करणं आणि आणि निर्णय घेताना खूप उशीर करून ते ताटकळत ठेवणं या दोन्ही चुका त्यांच्या कार्यपद्धतीत दिसतात. या चुका त्यांनी सातत्यानं केल्यात. 


रमेश वाघ यांचे 'महाराष्ट्राचे विचारदुर्ग' हे पुस्तक घरपोच मागवा
 

कोणी काहीही म्हटलं तरी शरद पवारांचं नेतृत्व हे महाराष्ट्रातल्या पाच-दहा जिल्ह्यापुरतं मर्यादित होतं आणि आहे. ‘प्रत्यक्षाहुन प्रतिमा मोठी’ या प्रमाणे ते जसे नाहीत तसेच दाखवण्याचा प्रयत्न सातत्यानं करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागाचा अपवाद वगळता पवारांचं नेतृत्व नाही. खान्देशात त्यांचं नेतृत्व कधी दिसलं नाही. विदर्भात त्यांचं नेतृत्व टिकलं नाही. मुंबईसारख्या अनेक महानगरांतही त्यांचं नेतृत्व आणि त्यांचा पक्ष कधी सामर्थ्यानं उभा राहिलाय हे दिसलं नाही. ग्रामीण महाराष्ट्रातलं विशेषतः पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन प्रांतापुरतं हे मर्यादित नेतृत्व आहे. 10 जून 1999 ला शरद पवारांनी काँग्रेसमधील असंतुष्ठांचा एक वेगळा गट निर्माण केला आणि त्याला ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष’ असं व्यापक नाव दिलं. त्याचा राष्ट्रीय दर्जा टिकवण्यासाठी अनेक खटपटी-लटपटी करून इतर प्रांतात काही मतं मिळवण्यात ते यशस्वी झाले. सुरूवातीच्या काळात पी. ए. संगमा यांच्या सारख्या अमराठी भागातील नेत्यांनीही त्यासाठी त्यांना साथ दिली. मात्र हा करिष्मा ते कधीही निर्माण करू शकले नाहीत, टिकवू शकले नाहीत.

शरद पवारांच्या व्यक्तिमत्त्वात एक चातुर्य आहे. खरंतर ‘चातुर्य’ हा शब्द समर्थ रामदास स्वामींनी वेगळ्या अर्थांनी वापरलाय. त्यामुळं आपण याला चातुर्य नाही तर आजच्या विरोधकांच्या भाषेत लबाडी म्हणूया, खोटारडेपणा म्हणूया! या लबाडीच्या बळावर त्यांनी कायम पाच-पन्नास आमदार निवडून आणले आणि त्या बळावरच राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपली नसलेली प्रतिमा निर्माण केली. प्रत्येक विषयात स्वतःला केंद्रस्थानी ठेवण्यात ते माहीर आहेत. 2014 ला त्यांच्या राष्ट्रवादी काँगे्रसचा महाराष्ट्रात संपूर्ण पराभव झाला. भाजपचे सर्वाधिक आमदार निवडून आले. इतके आमदार निवडून येऊनही तेव्हा भाजपची चर्चा झाली नाही, शिवसेनेची चर्चा झाली नाही, काँग्रेसची तर नाहीच नाही. कुठल्याही अटी आणि शर्थीशिवाय शरद पवारांनी भारतीय जनता पक्षाला सरकार बनविण्यासाठी बाहेरून पाठिंबा जाहीर केला. त्या पवारांच्या निर्णयाचीच सगळीकडं जोरदार चर्चा झाली. कामय चर्चेत कसं रहायचं आणि सगळी चर्चा आपल्याभोवतीच कशी फिरवायची हे वयाच्या ऐंशीव्या वर्षीही पवारांना जसं जमतं तसं अन्य कुणालाच जमत नाही. अशा पद्धतीनं सतत चर्चेत राहून त्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला.

त्यांच्या राजकारणातला घराणेशाहीचा मुद्दाही लक्षात घ्यायला हवा. अजित पवार, सुप्रिया सुळे आणि आता रोहित पवार हे त्यांच्या घराण्यातून पुढं आलेले नेते आहेत. यांचा वकुब, यांची ताकद, यांची क्षमता आणि शरद पवारांची क्षमता याचा विचार केल्यास यातला कोणीही लोकनेता नाही किंवा कुणाला सामाजिक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय प्रश्नांची काही जाण नाही. यातला कोणीही पवारानंतर फार मोठं राजकारण करून त्यांच्याप्रमाणे राजकारणात फार काळ टिकू शकेल अशी तीळमात्रही शक्यता नाही.
 

विनोद पंचभाई यांचे 'मेवाडनरेश महाराणा प्रताप' हे पुस्तक घरपोच मागवा
 

शरद पवारांनी त्यांचं राजकारण करताना काँग्रेसमधील आयात नेते उचचले. त्यांनी स्वतः किती नेते तयार केले? असा प्रश्न केला तर त्याचं उत्तर कुणालाही देता येणार नाही. आर. आर. पाटील यांचा अपवाद वगळला तर पवारांनी प्रस्थापित राजकीय घराण्यातील मुलंच नेते म्हणून पुढं आणले. राजेश टोपे, तनपुरे, जयंत पाटील, वळसे पाटील असे सगळे नेते पाहता त्या प्रत्येकांची राजकीय पार्श्वभूमी आहे. पवार नेहमी म्हणतात की ‘महाराष्ट्रात नवं नेतृत्व निर्माण करणार, युवकांना संधी देणार...’ मात्र हे काम त्यांना आजपर्यंत करता आलं नाही. एखाद्या सामान्य कुटुंबातून आलेला आणि राजकीय पार्श्वभूमी नसलेला नेता पवारांनी मोठ्या पदावर बसवलाय असं आर. आर. आबांचा अपवाद वगळता दिसत नाही.

उलट हे काम बाळासाहेब ठाकरे यांनी करून दाखवलं. भायखळ्यात भाजीपाला विकणार्‍या छगन भुजबळ यांना त्यांनी मुंबईचा महापौर केलं. कुठंतरी एखादी ‘कोहिनूर’सारखी छोटी इन्स्टिट्यूट चालवणार्‍या मनोहर जोशींना मुख्यमंत्री केलं, सभापती केलं. नारायण राणे यांच्यासारख्या नेत्याला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केलं. सामान्य कुटुंबातून आलेल्या अशा सामान्य मुलांना ताकद देऊन त्यांना एक राजकीय शक्ती बनवण्याची अशी जी ताकद बाळासाहेबांकडे होती ती पवारांकडे नाही. पवारांनी तयार केलेले असे राजकारणी कोण? याचं उत्तर मिळायला हवं. ज्याला राजकीय पार्श्वभूमी आहे अशा कुटुंबातली चार मुलं सोबत घ्यायची आणि राजकारण करायचं हा काही फार मोठा पराक्रम नाही.

शरद पवारांच्या भोवती कधी चांगले लोक जमलेत असंही चित्र नाही. चांगली टीम गोळा करायची, त्यांच्याकडून चांगलं काम करून घ्यायचं हे त्यांना कधीच साधलं नाही. महाराष्ट्रात पुलोद आघाडीचा प्रयोग त्यांनी केला. संपूर्ण वेगळी विचारधारा असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घ्यायला ते कचरले नाहीत. पवारांची नेमकी विचारधारा कोणती? स्वार्थ आणि स्वतःला काय मिळेल, जास्तीत जास्त कसं मिळेल यासाठी वाट्टेल ते करणं हीच त्यांची विचारधारा! त्यांचा विचार कुठला? गांधी-नेहरूंचा विचार की आणखी कोणाचा विचार? आपल्याला जिथून आणि जे काही ओरबडा येईल तीच त्यांची स्वतःची विचारधारा!
 
शरद पवारांचं सार्वजनिक जीवनातलं कार्य काय? साठ वर्षे ते महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात कार्यरत आहेत. या साठ वर्षात त्यांनी महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी काय केलं? त्यांच्या हातात इथली साखर कारखानदारी आली. त्यांच्या सोबतच्या नेत्यांनी ती खिळखिळी केली आणि सहकारी साखर कारखाने मोडकळीला आणून ते विकत घेतले. साखर कारखाने चालवणार्‍या त्यांच्याच टग्यांनी ते कवडीमोल भावात विकत घेतले. साखर कारखानदारी टिकवली नाही, सहकार टिकवला नाही. सगळे धनदांडगे आणि टगे त्यांच्या सोबत असतात आणि ते सगळे मिळून नफेखोरी करत असतात.

आता नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातील गेल्या आठ वर्षांतील संबंधाकडं पाहूया. हे दोन्ही नेते निवडणुकींचा अपवाद वगळता शक्यतो एकमेकांवर टीका करत नाहीत. आता कोरोनाच्या दुसर्‍या लाटीनंतर नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीनं परिस्थिती हाताळली त्यावर जगभरातील प्रसारमाध्यमं टिकेचा आसूड ओढत आहेत. सामान्य माणसाची वाताहत होऊन देश म्हणजेच एक स्मशानभूमी होत असतानाही पवारांनी मोदींवर काहीच टीका केली नाही, भूमिका घेतली नाही. जेव्हा तिबेटमध्ये चीननं भारतीय भूमिवर अतिक्रमण केलं आणि भारताचा काही प्रदेश आपल्या ताब्यात घेतला तेव्हाही पवार शांतच होते. चीननं नेमकं काय केलंय हे नेमकं पवारांनाच चांगलं माहीत आहे. हे आकलन त्यांना असण्याचं कारण म्हणजे ते देशाचे संरक्षण मंत्री होते. त्यांचे गुरू यशवंतराव चव्हाण यांनीही त्यावेळी सुनावलं होतं की ‘चीन तो चीन है, लेकिन हम प्राचीन है.’ तिबेट, लद्दाखमधले अनेक स्थानिक मोदींवर चिडलेले असतानाही त्यांना विरोध करणार्‍या पवारांनी त्यावर एक शब्दही काढला नाही. भारताचे माजी संरक्षण मंत्री असलेले पवार यावर काहीतरी बोलतील  आणि देशहीताची भूमिका मांडतील अशी अपेक्षा होती. मात्र पवारांनी सांगितलं, ‘अडचणीचा प्रसंग आहे, अडचणीची वेळ आहे, कठीण काळ आहे, आपण देश म्हणून मोदींच्या पाठिशी उभं रहायला हवं.’ म्हणजे नेमकं काय करायचं साहेब? तुमच्या राजकारणापोटी देशाची वाट लागत असताना आम्ही सामान्य माणसांनी फक्त बघत बसायचं? मोदींना अडचणीत आणायचं नाही आणि प्रसंगी स्वतःची ‘व्होट बँक’ सांभाळायची हेच तर शरद पवार करत आहेत. त्यामुळे मोदीही पवारांवर कधीच काही बोलत नाहीत. पवारांचे मतदार मोदींकडे जात नाहीत आणि मोदींचे मतदार पवारांना कधीही जवळ करू इच्छित नाहीत. त्यामुळे हे दोन्ही नेते परस्सरपूरक भूमिका घेतात. याला साधनशुचिता म्हणत नाहीत.
 

वैद्य ज्योति शिरोडकर यांचे 'आरोग्य तरंग' हे पुस्तक घरपोच मागवा
 

पवारांची विश्वासार्हता हा सदैव चर्चेचा भाग राहिला आहे. पवारांनी काँग्रेस फोडून पुलोद सरकार स्थापन केलं. ते असं वागतील असं वसंतदादा पाटील यांना कधीच वाटलं नव्हतं. वसंतदादा म्हणजे कृष्णाकाठचा काळ्या मातीचा रांगडा शिपाई होता. त्यांनी जर ‘शरद काय करतोय?’ म्हणून अन्य नेत्यांप्रमाणे पवारांचे फोन ट्रॅप केले असते तर त्यांना हे सूडाचं राजकारण कळलं असतं! पण दादांचा त्यांच्या शरदवर विश्वास होता. त्यामुळं त्यांच्याकडून हताश उद्गार काढले गेले की, ‘शरदनं माझ्या पाठीत खंजीर खुपसला!’ शरद असं करणार नाही, असा त्यांचा दृढ विश्वास होता. म्हणजे ज्युलियस सीझरच्या बाबत जो प्रकार केला गेला आणि त्यानं ‘यू टू ब्रूटस्?’ असे उद्गार काढले तीच अवस्था वसंतदादांची होती. ज्युलियस सीझर वेगळं वाक्य बोलला, वसंतदादा वेगळं वाक्य बोलले पण दोघांच्याही वाक्यातला सारांश एकच होता. दादांचं ते प्रसिद्ध वाक्य आहे, ‘शरदनं माझ्या पाठीत खंजीर खुपसला...’ त्यानंतर पवारांची विश्वासार्हता जी लयाला गेली ती अजूनही त्यांना मिळवता आली नाही.

सीतारामचाचा केसरी असताना पवारांनी सोनियाबाईंना राजकारणात यायला भाग पाडलं. त्यांच्या घरी जाऊन ‘तुम्ही राजकारणात आलंच पाहिजे’ असं सांगणं आणि त्यांना राष्ट्राच्या राजकारणात सक्रिय करणं हे काम पवारांनी केलं. त्याच सोनिया गांधीच्या विरूद्ध ‘परदेशी बाई पंतप्रधानपदी नको’ म्हणत त्यांनी दंड थोपटले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. ‘परदेशी बाई देशाच्या सर्वोच्चपदी नको’ असं म्हणत बाहेर पडलेल्या पवारांनी वेगळा पक्ष स्थापन केला आणि लगेचच महाराष्ट्रात त्यांच्यासोबत आघाडी करून सत्तेत सहभाग नोंदवला. हे सगळं पाहता पवारांच्या जगण्यात, वागण्यात कोणती नैतिकता दिसते? असं वागणं म्हणजेच राजकारण करणं अशी आजच्या अनेक नेत्यांची त्यामुळं समजूत झालीय. म्हणूनच अजित पवार यांच्यासारखे नेते कुणालाही काहीही न सांगता सकाळी सकाळी भाजपच्या बरोबरीनं सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांकडं पोहोचतात. हा सगळा पवारांच्या संस्कृतीचा आणि त्यांच्याच संस्काराचा भाग आहे.
 
दुसर्‍यांचे पक्ष फोडणं आणि स्वतःची ताकद वाढवणं हा संस्कार शरद पवारांनी राजकारण्यांना दिला. छगन भुजबळांना पुढं करून पवारांनी पहिल्यांदा शिवसेनेला भगदाड पाडलं. भुजबळांना शिवसेनेतून बाहेर काढण्याचं काम काही सुधाकरराव नाईकांनी केलं नव्हतं. पक्ष फोडणं, घरं फोडणं, कुटुंबाकुटुंबात वाद लावणं असे प्रकार शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा केल्याचं दिसतं. त्यामागं त्यांचा स्वतःचा स्वार्थ सोडला तर कोणतीही विचारधारा, नैतिकता दिसत नाही. आज वयाच्या ऐंशीव्या वर्षीही ते स्वतःचा पक्ष एकखांबी तंबुसारखा चालवतात. ते कोणालाही, कोणतीही संधी देत नाहीत. पक्षीय निर्णय घ्यायला, पक्षात अंतर्गत लोकशाही ठेवायला ते अजूनही तयार नाहीत. बाळासाहेब ठाकरेंची आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परवडला. ते जाहीरपणे सांगतात की ‘आमच्याकडं हुकूमशाहीच आहे, आम्ही लोकशाही मानत नाही.’ त्याउलट ‘मी लोकशाहीचा उपासक आहे, लोकशाहीचा पूजारी आहे, संसदीय लोकशाहीत लोकशाही मार्गानं सलग निवडून आलोय’ असं एका बाजूला म्हणायचं आणि दुसरीकडं मात्र स्वतःच्या पक्षातही कोणतीही लोकशाही ठेवायची नाही, मी म्हणेन तेच आणि तसंच अशी भूमिका घेत स्वतःच्या पुतण्यालाही संधी द्यायची नाही हे त्यांनी दाखवून दिलं आहे. सगळी सत्ता स्वतःच्या हातात केंद्रीत ठेवायची, सगळे निर्णय स्वतःच घ्यायचे हा प्रकार शरद पवार पुन्हा पुन्हा करत असल्याचं दिसून येतं.
 
उद्योगपतींशी प्रेमाचे संबध ठेवायचे, त्यांच्याकडून पैसा मिळवायचा, त्यांच्या हिताचे निर्णय घ्यायचे, त्यांना फायदा करून द्यायचा ही गोष्ट राजकारण्यांना करावीच लागते. पवारांचे राज्यातल्या, देशातल्या आणि जगातल्या अनेक उद्योजकांशी घरोब्याचे संबंध आहेत. त्यांच्या मित्रांत सायरस पूनावाला हे नाव आत्ता सामान्य लोकांना कोरोना लसीमुळं माहीत झालंय. पूनावाला, राहुल बजाज अशा अनेकांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत. अशा अनेक उद्योजक कुटुंबीयांशी चांगले संबंध असताना ‘मी समाजवादी विचारसरणीचा आहे’ असं पवार एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, ग. प्र. प्रधान, पु. ल. देशपांडे अशा अनेकांना सहजी पटवून द्यायचे. या सगळ्यांच्या शरद पवार भविष्यात खूप चांगलं आणि मोठं काम करतील अशा अपेक्षा होत्या. पुलंसारखा लेखकही पवारांवर इतकं प्रेम करायचा. मात्र त्या सर्वांना महाराष्ट्राच्या विकासाचं जे काम अभिप्रेत होतं तसं पवारांनी काहीही केलेलं नाही हे आज दिसून येतंय.

पुणे आणि पिंपरी चिंचवडचा अपवाद वगळता महानगरांशी आपला काही संबंधच नाही, इथली लोकं आपल्याला थारा देणार नाहीत, आपल्याला ग्रामीण महाराष्ट्रातच आपला पक्ष वाढवावा लागेल असा समज किंवा गैरसमज पवारांनी करून घेतलेला दिसतोय. महाराष्ट्राचे नेते, देशाचे नेते असा त्यांचा उल्लेख सतत होत असला तरी यात तथ्य नाही हे कुणाच्याही सहजी लक्षात येईल. पवारांचा प्रत्येक प्रश्न सोडविण्याचा वेगळा दृष्टीकोन असायचा. मराठवाड्यातल्या एका मोठ्या वर्गाला वाटायचं की आमच्या मराठवाड्याच्या नावानं विद्यापीठ आहे तर त्याची ओळख बदलू नका. आंबेडकरांच्या नावाबद्दल, त्यांच्या कर्तृृत्वाबद्दल आमच्या मनात शंका किंवा कसला वाद नाही. इथं आंबेडकरांचं मोठं स्मारक करा, त्यांच्या नावानं काही योजना सुरू करा पण विद्यापीठाचं नाव बदलू नका. त्यावेळच्या महाराष्ट्रातल्या सर्व दलित संघटनांचा मात्र एकच कार्यक्रम होता. तो म्हणजे, मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचंच नाव द्या. या सगळ्यातून नामांतराची चळवळ उभी राहिली. ती हिंसकही झाली. अनेक प्रकारचं राजकारण झालं. पवारांची कार्यपद्धती मात्र अशी की दोघांचंही थोडं थोडं समाधान करायचं. मग त्यांनी त्यावर तोडगा काढत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असं त्याचं नामांतर केलं. ही प्रश्न सोडवायची पद्धत नाही. एकतर उजव्यांची बाजू घ्या किंवा डाव्यांची बाजू घ्या. त्यातून प्रश्नांची उकल होत नाही. हा त्यांच्या कार्यशैलीचा भाग असल्यामुळं अनेक मूळ प्रश्न त्यांच्याकडून कधीही सोडवले गेले नाहीत.


शिरीष देशमुख यांचे 'बारीकसारीक गोष्टी' हे पुस्तक घरपोच मागवा
 

याबाबत सध्याचं उदाहरण द्यायचं तर मराठा आरक्षण. अनेक वर्षे सत्तेत असताना, मराठा समाजातील मुलं गरिबीत, उपेक्षेत जगत असताना त्यांना हा प्रश्न महत्त्वाचा वाटला नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी कधीच काही केलं नाही. 2014 च्या कालखंडात भाजप आणि शिवसेनेचं सरकार आल्यावर मात्र त्यांनी हा विषय सुरू केला. या काळात त्यांनी मराठा आरक्षण चळवळीला बळ दिलं, ताकद दिली. हे बळ देतानाच पवारांनी स्वतःच्या राजकारणासाठी स्वतःभोवती जमवलेले छगन भुजबळ, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे असे नेते मराठा आरक्षणाबाबत अनुकूल नव्हते. पवारांचंही मतलबी मराठा प्रेम पाहता त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायची इच्छा कधीच नव्हती. शालिनीताई पाटील यांनी मराठा आरक्षणाची भूमिका घेतलेली असताना पवारांनी तेव्हाही त्यांना विरोध केला होता. पवारांनी मराठा आरक्षणाचा हा विषय फक्त चिघळत ठेवला.

शरद पवार श्रीमंत कोकाटे यांच्या एका पुस्तक प्रकाशनासाठी आले. त्याचा खूप गाजावाजा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्त्व आंतरराष्ट्रीय कीर्तीचं व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी मानवतेला दिलासा दिला. त्यामुळं संपूर्ण मानवतेसाठी महाराज आदर्श आहेत. असं देदीप्यमान व्यक्तिमत्त्व वादापासून दूर रहावं यासाठी पवारांसारख्या साहित्याची जाण असलेल्या, भरपूर वाचन आणि वाचनाची अत्यंत आवड असलेल्या नेत्यानं काम करणं अपेक्षित होतं. पवारांनी शिवचरित्राबाबत सुद्धा शक्य होतील तितके वाद जाणीवपूर्वक तयार केले. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली का? प्रा. न. र. फाटकांच्या मते त्यांच्यात एकमेकांशी काहीही संबंध नव्हता आणि आचार्य अत्र्यांचं मत आहे की महाराजांचे आणि समर्थांचे अत्यंत स्नेहाचे, प्रेमाचे संबंध होते, दोघांचं कार्य एकमेकांना पुरक होतं. अशावेळी छत्रपती शिवाजी महाराज वादातित व्यक्तिमत्त्व व्हावं यासाठी काहीही प्रयत्न न करता स्वतःचा मतदार तयार करण्यासाठी शिवचरित्राचा वापर पवार करत राहिले. ‘महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान - शरद पवार, शरद पवार’ अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची घोषणा होती. ‘महाराष्ट्राचा बुलंद आवाज-शरद पवार’ अशीही त्यांची टॅगलाईन होती.

प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्यासारखे त्यांचे निष्ठावान अनुयायी जे भाषण करायचे ते अनेकांनी ऐकलेलं असेल. ते म्हणायचे, ‘‘आग्य्राच्या दरबारात छत्रपती शिवाजी महाराज गेले होते. तिथं महाराजांचा अपमान झाला. महाराजांनी तिथं स्वाभिमानाचं दर्शन घडवलं आणि आग्य्राचा दरबार सोडला. आग्रा आणि दिल्लीचा दरबार महाराष्ट्राला कायम सापत्नभावाची वागणूक देतो. या वागणुकीच्या विरूद्ध शिवाजी महाराजांनंतर जर कोण ताठ मानेनं उभा राहिला असेल तर ते पवार साहेब आहेत.’’ त्यांच्या या विधानानंतर उपस्थित कार्यकर्त्यांकडून टाळ्यांचा कडकडाट व्हायचा.
 

सुनील जवंजाळ यांची 'काळीजकाटा'ही कादंबरी घरपोच मागवा
 

शिवाजीराव पाटील निलंगेकर हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी ढोबळे भाषणं देत फिरायचे. सुधा नरवणे या निवेदक आकाशवाणीवरून बातम्या द्यायच्या. ‘आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे प्रादेशिक बातत्या देंत आहेत. जोपर्यंत राजीव गांधींचे पाय माझ्या हातात आहेंत तोपर्यंत महाराष्ट्रांला लाथा मारल्या तरीं चालतील, याचा मुख्यमंत्री शिवाजीरांव पाटील यांनीं पुनरूच्चार केंला...’ नरवणेंची अशी नक्कल ढोबळे कार्यक्रमातून करायचे आणि टाळ्या मिळवायचे. सुधा नरवणेच बोलत आहेत अशी हुबेहूब नक्कल लक्ष्मण ढोबळे यांची असायची. अशा भाषणातून पवार हा बुलंद आवाज आहे आणि तोच स्वाभिमान आहे असा भास सर्वत्र निर्माण करण्यात आला. पवारांना हा आभास सुद्धा जपता आला नाही, सांभाळता आला नाही.

महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी, आत्मसन्मानासाठी शरद पवारांनी एस काँग्रेस काढलीय म्हणून पवारांभोवती गोळा झालेल्या तरूणांचा औरंगाबादला पवारांनी पुन्हा मूळ प्रवाहात प्रवेश केल्यावर भ्रमनिरास झाला. ‘मी बिरोबाची शपथ घेऊन सांगतो की मी भाजपध्ये जाणार नाही’ अशी घोषणा गोपीचंद पडळकर यांनी केली होती. पवारही म्हणाले होते की, ‘मी जर इंदिरा काँग्रेसमध्ये गेलो तर माझ्या तोंडाला डांबर फासा.’ पडळकर भाजपमध्ये आले आणि त्यावेळी पवार राजीव गांधींच्या उपस्थितीत इंदिरा काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळं या दोन्ही नेत्यांच्या विचारधारांत फार काही फरक नाही. पडळकरांच्या मागं जनसमूदाय नव्हता आणि पवारांच्या मागं मोठ्या प्रमाणात जनसमूदाय आहे इतकाच फरक. त्यामुळं उलट पवारांनी त्यांच्या सोबतच्या जनसमूदायाची कायम मोठी फसवणूक केली. पडळकरांना ती तशी फसवणूक करता आली नाही. पवारांची विश्वासार्हता राहिली नाही ती त्यामुळं.
 
देशाच्या राजकारणात जेव्हा विश्वासार्हतेचा प्रश्न येतो तेव्हा पवारांची विश्वासार्हता कधीच कोणी मान्य करत नाही. त्यांची बांधीलकी नेमकी कोणाशी हेही कळत नाही. त्यांची ना उद्योगपतींशी बांधीलकी, ना शेतकर्‍यांशी, ना सामान्य माणसांशी. त्यांची बांधीलकी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आत्मकेंद्री आहे. माझ्याभोवतीच सगळं फिरलं पाहिजे या एकात्मवृत्तीशी त्यांची बांधीलकी आहे. पवारांकडून नवा महाराष्ट्र उभा राहिल म्हणून दलित, वंचित, उपेक्षित, बहुजन, ब्राह्मण समाजाचे अनेक लोक त्यांच्या बरोबर उभे राहिले. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पहिले सेक्रेटरीही गुरूनाथ कुलकर्णी होते. एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, पु. ल. देशपांडे, ग. प्र. प्रधान या सर्व प्रेमळ लोकांचा पवारांनी जसा भ्रमनिरास केला तसाच महाराष्ट्रातल्या पिढ्या न पिढ्यांचा भ्रमनिरास त्यांनी केला.

‘एकवेळ हिमालयात जाईन पण काँग्रेसमध्ये जाणार नाही’ अशी पवारांची त्यावेळची भाषणं आहेत. शिवसेना महाराष्ट्रात मोठी होण्यातही पवारांचा मोठा वाटा आहे. पवारांचं हे रंगबदलूपण त्यांच्यावर प्रेम करणार्‍या अनेक तरूणांना आवडलं नाही. त्यामुळं त्यातले अनेकजण शिवसेनेत गेले. इंदिरा काँग्रेसमध्ये न गेलेल्या या तरूणांच्या बळावर शिवसेना मुंबईतून मराठवाडा, विदर्भापर्यंत पोहोचली. या तरूणांना गोळा करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे गावोगाव फिरले नाहीत. मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान याच्याविषयी काही संकल्पना असलेल्या मराठी माणसाचा भ्रमनिरास पवारांकडून झाल्यानं तो शिवसेनेकडं वळला. पवारांविषयी ज्यांनी ज्यांनी काही अपेक्षा बाळगल्या त्या सर्वांना खड्ड्यात घालण्याचंच काम पवारांनी केलंय.
 
शेतकर्‍यांना ‘वीज बिलं भरू नका’ असं फडणवीस सरकारच्या काळात सांगणारे शरद पवार आता करोना काळात अनेक शेतकर्‍यांची शेतातली, घरातली कनेक्शन तोडली गेल्यावर मात्र मुगाचं आख्खं पोतं गिळून शांत बसलेत. याला काय म्हणावं? सत्तेत नसताना ते कोल्हापूर, सांगली, सातार्‍यातील पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौर्‍यास गेले. त्यांनी लोकांना दिलं काहीच नाही पण त्यांचं सांत्वन केलं. त्यांना धीर दिला, आधार दिला. ते सत्तेत नसल्यानं त्यांनी काही द्यावं अशी अपेक्षाही नव्हती. आता त्यांचा पक्ष सत्तेत सहभागी असताना गेल्या वर्षी नीलम चक्रीवादळ आणि यावर्षी तौक्ते चक्रीवादळ आलं. तौक्तेनं जनजीवन विस्कळीत झालं. लोकांची वाताहत झाली पण या लोकांसाठी पवारांनी काहीही भरीव मदत केली नाही.

पर्यटनाच्या क्षेत्रात महाराष्ट्र जगाच्या व्यासपीठावर आला असता. साठ वर्षे इथं राजकारण करत असताना आणि त्यातील बहुतेक काळ सत्तेत असतानाही पवारांनी त्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील एका चित्ररूप पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यावेळी पवारांचा आणि राज ठाकरे यांचा संबंध आला. लगोलग राज ठाकरे बाळासाहेबांना सोडून गेले. पवारांशी संबंध आल्यानंतर माणसं अशी का वागतात? या प्रश्नाचं उत्तरही पवारांनी कधीतरी द्यायला हवं. माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले जाहीरपणानं म्हणाले होते, ‘‘शरद पवारांनी महाराष्ट्रातल्या मराठा घराण्यात घराघरात भांडणं लावली. त्यांच्यात त्यांनी वाद निर्माण केले.’’ पवारांनी त्यांच्या या आक्षेपांनाही आजवर तरी उत्तर दिलं नाही.
 
‘लोक माझे सांगाती’ नावाचं एक आत्मचरित्र त्यांनी लिहिलं. ज्या आठवणी शरद पवार इतर वेळी सुधीर गाडगीळांना त्यांच्या मुलाखतीत सांगतात, केशवराव धोंडग्यांच्या वाढदिवसाला बोलतात तेही त्यांच्या आत्मचरित्रात आलं नाही. पवारांच्या राजकारणाविषयी वसंत साठे यांनी जे लिहून ठेवलंय ते वाचायला हवं म्हणजे पवार किती खूनशी राजकारणी आहेत ते ध्यानात येईल.

वसंत साठे लिहितात, मी यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात महाराष्ट्रात राजकारण सुरू केलं. त्यांचा मी कडवा विरोधक होतो. यशवंतराव मला विदर्भातून कधीही तिकिट द्यायचे नाहीत. महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आली की ते माझं तिकिट कापायचे आणि माझ्या खांद्यावर हात ठेऊन म्हणायचे, ‘‘वसंता, केंद्राच्या राजकारणात तुझा मोठा उपयोग होईल असं मला वाटतंय. त्यामुळं तुला मी केंद्रात पाठवायचा विचार करतोय.’’ केंंद्रीय राजकारणात लोकसभेच्या निवडणुका लागल्या की ते परत खांद्यावर हात ठेवायचे आणि म्हणायचे, ‘‘वसंता, मला असं वाटतंय की राज्याला तुझी सर्वाधिक गरज आहे.’’
 
वसंत साठे तरीही राजकारणात सक्रिय राहिले. ते इंदिरा गांधींच्या इतक्या जवळ गेले की अणीबाणीच्या काळात सर्वात महत्त्वाचं माहिती आणि नभोवाणी खातं वसंत साठे यांच्याकडं होतं. वसंत साठे वर्धा मतदार संघाचं नेतृत्व करायचे. त्यांनी लिहिलं, ‘‘यशवंतरावांनी मला त्रास दिला, माझ्याविरूद्ध कारवाया केल्या. अनेकदा मला तोंडघशी पाडलं परंतु मी यशवंतराव चव्हाण यांच्या विरूद्ध राजकारण करतच होतो त्यामुळं त्यांनी हा प्रकार केला तरी मला त्याचा त्रास झाला नाही किंवा वाईट वाटलं नाही. मी त्यांचा राजकीय विरोधक होतो. शरद पवार या व्यक्तिशी मात्र माझा कसलाही संबंध नव्हता. या माणसाच्या डोक्यात एकच होतं की मी यशवंतराव चव्हाण यांना त्रास दिला! म्हणून हा माणूस माझ्याशी खूनशीपणानं वागला. लोकसभेच्या निवडुकीवेळी माझी तब्येत खराब होती. त्यावेळी वर्धा मतदार संघातून मला तिकिट द्या म्हणून पवारांनी राजीवजींकडे आग्रह धरला आणि राजीव गांधी यांनी वर्ध्यातून मला तिकिट दिलं. मी जेव्हापासून राजकारण करतोय तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत मी निवडून आलोय. नंतर शरद पवार आणि त्यांना मानणार्‍या सर्वांनी माझ्या विरूद्ध जोरदार प्रचाराला सुरूवात केली. पवारांनी माझ्या मतदार संघात येऊन सभा घेतली पण भाषण एक करायचे आणि रात्री गेस्ट होऊसला बसून दुसराच उद्योग करायचे. वर्धा मतदार संघासाठी राजीवजींची सभा लावली. त्या सभेला नागपूरवरून राजीवजींना आणायचं होतं. दुपारी बाराची सभा होती. पवारांनी त्यांना परस्सर अमरावतीला नेलं. सकाळी दहा पासून लोक सभेत राजीवजींची वाट बघत बसले होते. आधी अमरावती उरकू म्हणून पवारांनी राजीवजींना नेलं आणि संध्याकाळी सहा वाजता ते त्यांना घेऊन सभेला आले. त्यात त्यांनी माझी वाट लावली आणि एकही संसदीय निवडणूक न पडणारा मी पहिल्यांदा पराभूत झालो. त्यानंतर  दीड वर्षांनी पुन्हा सगळे संदर्भ बदलले. पंतप्रधान बदलले. निवडणुका लागल्या. त्यात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाल्यावर पवारांनी स्वतः राजीव गांधींना सांगितलं की, ‘‘साठे साहेबांच्या बाबतीत माझ्याकडून चूक झालीय. ती चूक मला दुरूस्त करायचीय. ती संधी मला द्या.’’ मी थक्क होऊन या माणसाकडं बघत बसलो. राजीव गांधी माझ्यावरील प्रेमानं म्हणाले, ‘‘या माणसाला या वयात पुन्हा उभं करून पराभवाला सामोरं जायला लावणं योग्य नाही.’’ त्यावर पवार म्हणाले, ‘‘त्यांना निवडून आणणं ही माझी जबाबदारी.’’ त्यानंतर मला तिकिट दिलं गेलं. पुन्हा मागचीच पुनरावृत्ती झाली. झाडून सगळ्यांनी माझ्या विरूद्ध काम केलं. राजीव गांधी बॉम्बस्फोटात गेल्यावर तर पवारांनी कशाचीच भीती राहिली नाही. त्यांनी पुन्हा मला पाडलं.’’

पुन्हा नरसिंहराव पंतप्रधान असताना चाचा केसरीकडं पवारांनी आग्रह धरला की ‘‘साठेसाहेबांना संधी द्या, मी निवडून आणतो.’’ त्यावेळी वसंतराव साठे शब्दशः या सगळ्यांपासून पळून गेले. ही अतिखूनशीपणानं वागण्याची शरद पवारांची सवय आहे. त्याचा अनुभव अनेकांनी वेळोवेळी घेतलाय. वसंत साठे, बाळासाहेब विखे पाटील, शालिनीताई पाटील, बाबासाहेब भोसले अशा अनेकांनी हा अनुभव घेतलाय. शालिनीताईंनी वसंतदादांच्या पत्नी म्हणून यशंवतराव चव्हाण यांच्याविरूद्ध विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत दीड-दोन लाख मतांनी शालिनीताईंचा पराभव झाला परंतु त्या सातारा मतदारसंघात आल्या आणि त्यांनी अतिशय अर्वाच्य टीका यशवंतरावांवर केली. ज्यांनी ज्यांनी यशवंतरावांना त्रास दिला अशी माणसं हुडकून काढून त्यांना आयुष्यात उठवण्याचा खेळ पवारांनी केला.

यशवंतरावांच्या अनुयायांना आणि पवारांच्या अनुयायांना याचा आनंद वाटतो. मात्र ही काही फार मोठी अभिमान वाटावी अशी गोष्ट नाही. अजितदादांनी शालिनीताईंना हाताशी धरून कोरेगावमधून उमेदवारी दिली आणि त्या निवडून आल्या. त्यांना मंत्रीमंडळात वगैरे काही स्थान मिळालं नाही. यशवंतराव चव्हाण त्यांना जी शिक्षा त्यांच्या हयातीत देऊ शकले नाहीत ती शिक्षा पवारांनी त्यांना दिली. आपल्या विरोधकांशी अत्यंत वाईट पातळीवर, शक्य तितक्या खालच्या पातळीवर जाऊन अतिशय साळसूदपणानं त्यांना त्रास द्यायचा ही एक वेगळी परंपरा पवारांनी राजकारणात सुरू केली.
 
यशवंतराव चव्हाण यांनी आणखी एक गोष्ट केली होती. महाराष्ट्राच्या राजकारणातून राजघराणी त्यांनी बाजूला टाकली होती. राजघराणी बाजूला सारून सामान्य माणसाच्या हातात सत्ता देण्यात यशवंतराव चव्हाण यशस्वी झाले होते. आपल्या राजकीय विरोधकांना शह देण्यासाठी आणि त्यांच्यावर मात करण्यासाठी या राजघराण्यांचं पुनरूज्जीवन शरद पवारांनी केलं. यशवंतराव चव्हाण राजघराण्यातल्या लोकांना निवडणुकीचं तिकिटही देत नसत. ‘राजगाद्या फाटल्यात’ असं यशवंतराव चव्हाण खासगीत म्हणायचे. शरद पवारांनी तोही प्रकार केला. स्वतःच्या राजकारणासाठी, स्वार्थासाठी, कुरघोड्या करण्यासाठी आणि दुसर्‍यांवर मात करण्यासाठी कसल्याही साधनशुचितेचा विचार न करता शरद पवारांनी त्रास दिला. आत्ताच्या निवडणुकीतीलही त्यांची भाषा बघा. ‘अजून लई लोकं घरी बसवायचीत...’ असं ते म्हणत. पवारांना लोकांना घरी बसवण्याची मोठी खुमखुमी. नवं नेतृत्व नाही, चांगले वक्ते तयार केले नाहीत, पक्षांतर्गत पातळीवर आपल्यापेक्षा मोठा नेता तयार होऊ नये याची पुरेेपूर काळजी त्यांनी घेतली. 


ज्योती भारती यांचा 'बोलावं म्हणतेय' हा कवितासंग्रह घरपोच मागवा
 

पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात बरीचशी साम्यस्थळे आहेत. आपल्यापेक्षा कुणीही मोठा नेता तयार होऊ नये असं यांना वाटत असावं. चांगले वक्ते तयार होण्यासाठी साध्या कार्यशाळाही या नेत्यांनी कधी घेतल्या नाहीत. तशा कार्यशाळा संघात होतात आणि वर्षानुवर्षे अनेक उत्तमोत्तम वक्ते त्यातून तयार होतात. असं काही पवारांनी किंवा ठाकरेंनी केलं नाही. आपण म्हणू तसंच पक्षात व्हायला हवं हे या दोन्ही मित्रांचं समान धोरण होतं. ‘मी सर्व संसदीय निवडणुका जिंकलेल्या आहेत, एकही निवडणूक हरलो नाही’ असा पवारांचा अहंकार आणि ‘संसदीय राजकारणापेक्षा मी मोठा आहे, मी कोणत्याही चिरकुटाला गादीवर बसवू शकतो’ असा बाळासाहेबांचा अहंकार हा कधीही लपून राहिलेला नाही.

आता माध्यमांवर मोदींनी वर्चस्व मिळवल्याचं सांगितलं जातं. मोदींनी माध्यमं ताब्यात घेतली म्हणून त्यांना उपहासानं ‘गोदी मीडिया’ही म्हटलं जातं. अशाच पद्धतीनं पवारांनी महाराष्ट्रातली माध्यमं तीस वर्षांपूर्वी खिशात टाकली होती. पवारांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसाला राज ठाकरे यांनी एक आठवण सांगितली होती. ते म्हणाले, ‘‘त्यावेळी मी एका वृत्तपत्रांसाठी व्यंगचित्रे काढायचो. माधव गडकरी हे संपादक होते. त्यांनी पूर्ण स्वतंत्र्य दिलं होतं की ‘हव्या त्या विषयावर व्यंगचित्रे काढ.’ मी दोन चित्रे पवारांवर काढली. ती अंकात लागली. तिसरंही व्यंगचित्र पवारांवरच काढलं. ते घेऊन गेल्यावर माधवराव गडकरींनी सांगितलं की, ‘‘बाबा रे, पवारांवरची व्यंगचित्रे थांबव. त्यांच्यावरची टीका आपल्याला नको.’’ त्याचवेळी, शरद पवार नावाचा एक अृदश्य हात सगळीकडं असतो याची मला जाणीव झाली!’’

माध्यमं मॅनेज करायची आणि आपल्याला जे हवं तेच आणि तसंच छापून आणायचं हा प्रकार पवारांनी अनेक वर्षे केला. या सगळ्या प्रकारांमुळं शरद पवार यांच्याभोवती गुंड, धनदांडगे, साधनशूचिता नसलेले लोकच गोळा झाले. नालायक लोक सांभाळायचे, त्यांच्याकडून आपल्या अडचणीच्या वेळी हवं ते काम करून घ्यायचं हा प्रकार त्यांनी केला. त्यांचं राजकरण बघतच अनेक नेते तयार झाले. आजच्या बरबटलेल्या परिस्थितीत आपण ते पाहतोच आहोत. आताच्या म्हणजे 2019 च्या निवडणुकीतही पवारांचे अनेक सहकारी त्यांना सोडून गेले. त्याचं त्यांना वाईट वाटणार नाही कारण या संस्कृतीचे जनकच ते आहेत. पवार यशवंतरावांना असेच सोडून गेले होते. सोनिया गांधी अडचणीत असताना त्यांनी असाच ठेंगा त्यांना दाखवला. अर्थात त्यावेळी त्यांनी स्वाभिमानानं काँग्रेस सोडली असंही नाही. या सगळ्या उचापत्या पाहून शरद पवारांची सोनिया गांधींनी पक्षातून हकालपट्टी केलीय हा इतिहास आहे.

सोनिया गांधी यांना काँग्रेस पक्षात आणताना, त्या काँग्रेसच्या अध्यक्षा होताना त्या परदेशी आहेत हे पवारांना माहीत नव्हतं का? मग याच मुद्यावरून राष्ट्रवादीचा एक वेगळा गट स्थापन करण्याचा त्यांना कोणता नैतिक अधिकार उरतो? उलट ज्या महिलेला त्यांनी देशाच्या राजकारणात आणलंय तिच्या पाठिशी त्यांनी खंबीरपणे उभं राहणं अपेक्षित होतं. तसं झालं असतं तर सरदार मनमोहन सिंगाच्या ऐवजी शरद पवार देशाचे पंतप्रधान झाले असते. अप्रामाणिक वर्तनामुळं त्यांना देशाचं सर्वोच्च पद कधीच मिळू शकलं नाही. त्यांच्या निष्ठा बेगडी होत्या. यशवंतराव चव्हाण, इंदिरा गांधी, सोनिया गांधी या सर्वांशी त्यांनी गद्दारीच केली. स्वतःच्या स्वार्थावर सोडलं तर त्यांची बाकी कशावरच आणि कुणावरच निष्ठा नव्हती, नाही.

शरद पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या लक्षात राहतील अशा कोणत्याही गोष्टी महाराष्ट्राला दिल्या नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जपण्यासाठी त्यांनी काही केलं नाही की महाराष्ट्राचा भविष्यकाळ घडविण्याचं व्हिजन त्यांनी कधी महाराष्ट्राला दिलं नाही. स्थानिक राजकारण, गावागावातील वाद यांची माहिती घेणं आणि त्याचा जास्तीतजास्त फायदा आपल्याला कसा होईल यासाठी प्रयत्न करत राहणं हेच त्यांनी केलं. इतकं करूनही सत्तर-पंचाहत्तर आमदाराच्या पुढं त्यांची कधी ताकद गेली नाही. पवार भारताचे पंतप्रधान व्हावेत असं त्यांच्या अनेक बगलबच्च्यांना वाटत होतं, अनेक मराठी माणसांचीही तशी इच्छा होती पण त्यासाठी लागणारं संख्याबळ त्यांना कधीच जमवता आलं नाही. 48 पैकी जेमतेम दहा खासदार निवडून आणणं हेही त्यांना साधलं नाही. या सगळ्या गोष्टीला त्यांची वर्तणुक आणि त्यांचं वागणं जबाबदार आहे.

सिंधू बॉर्डरवर असंख्य शेतकरी आंदोलनाला बसले पण त्यांच्याबाबत पवारांनी काहीच सक्रिय भूमिका घेतली नाही. यापूर्वीच्या कृषी कायद्याची सुरूवात कोणी केली याचा मागोवा घेताना त्यामागचा पवारांचा हात दिसून येतो. जे कृषी कायदे तयार केले गेले त्यामागची पार्श्वभूमी पवारांनी तयार केली होती. आपण शेतकर्‍यांचे नेते म्हणायचं आणि त्याचवेळी उद्योजकांच्या हिताचे निर्णय घ्यायचे हे पवारांनी केलं आहे. कलंकित माणसांना नेहमी आपल्या सोबत घ्यायचं, त्यांना उपकृत करायचं आणि आपल्याला जे हवं ते साध्य करायचं हा त्यांच्या कार्यपद्धतीचा भाग आहे. हा अजेंडा त्यांनी वेळोवेळी राबवल्याचे दिसून येते. लाचारांच्या फौजा तयार करायच्या आणि त्यांचं नेतृत्व करायचं यातून एक सजग आणि चांगला समाज उभा राहत नाही. त्यातून उभी राहते ती अलीबाबा आणि चाळीस चोरांची टोळी. यापेक्षा दुसरं यातून काहीच उभं राहत नाही.

घरकोंडीच्या काळात बारमालकांची वीज बिलं माफ करण्याची सूचना त्यांनी सरकारला केली. त्याचवेळी अजित पवार शेतकर्‍यांची वीज तोडत असतात. नेमका कोणता प्रकार आहे का?

 
किरण लोखंडे यांचे 'काळीज गोंदण' हे पुस्तक घरपोच मागवा
 

शरद पवारांनी त्यांच्या घरातली जी नवीन पिढी राजकारणात आणली त्या पिढीकडं ना वक्तृत्व आहे, ना कर्तृत्व आहे, ना कुठल्या जनसमूहाचं नेतृत्व करण्याची कुवत त्यांच्याकडं आहे. मागं एकदा राज ठाकरे अजित पवारांना उद्देशून म्हणाले होते की, ‘‘काकांचा हात डोक्यावर आहे म्हणून बाबा रे तुझं बरं चाललंय! एकदा तो हात निघाला तर पानटपरीवालाही तुला विचारणार नाही!’’ अजित पवारांना इतकं पांगळं करून ठेवण्याचं काम शरद पवारांनी केलंय. केंद्र, केंद्रातलं राजकारण, तिथले नेते, तिथली संस्कृती या कशाचीही आणि कसलीही माहिती अजित पवारांना नाही. अशा परिस्थितीत शरद पवार सोडून त्यांचा पक्ष चालणं हे अत्यंत अवघड आहे. आपल्यानंतर आपला पक्ष मोठा व्हावा, माणसं टिकावीत आणि आपली जी काही विचारधारा आहे ती पुढं जावी यासाठी लढणार्‍या तरूणांची एक फळी तयार व्हावी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं. पवारांनी असं काहीच केलं नाही. त्यांनी फक्त प्रस्थापितांना संधी दिली, त्यांनाच मोठं केलं.

सातारा, सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यानं तर त्यांना सातत्यानं अत्यंतिक साथ दिली. या जिल्ह्यासाठी सुद्धा त्यांनी काहीच केलं नाही. महाराष्ट्राची साखर कारखानदारी मोडून खायचा उद्योग यांनी केला. कर्जबाजारी होऊन बंद पडलेले साखर कारखाने आणि आज ते चालवणारे साखर कारखान्यांचे मालक हे बघितल्यावर याचा अंदाज कुणालाही येईल. म्हणून वाटतं की, शरद पवार हे अलीबाबा आहेत आणि अशा चाळीस चोरांची त्यांची टोळी आहे. सगळे मिळून महाराष्ट्राची यथेच्छ लूट करत आहेत. महाराष्ट्रातले जितके साखर कारखाने मोडकळीस आले, मोडीत निघाले ते कोणी चालवायला घेतले हे एकदा पडताळून बघा. मग हे पाप कोणी केलं ते कळेल.

महाराष्ट्रातल्या युवकांच्या तीन पिढ्या शरद पवार नावाच्या या नेत्यानं अक्षरशः बदबाद केल्या. महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या आशा-आकांक्षांना त्यांनी कायम नख लावलंय. मराठा आरक्षण असेल किंवा सामान्य शेतकर्‍यांच्या कल्याणाची, हिताची भूमिका असेल यातून हे दिसून येतं. बाकी सगळं सोडा पण फक्त पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा निपक्षपणे पाणी सोडण्याचं काम या लोकांनी केलं नाही. ज्याप्रमाणे बारामतीत मोठ्या प्रमाणात कालवे आहेत, बंदारे आहेत तसं त्यांच्या मतदार संघात इतर ठिकाणीही दिसत नाही. इंदापूर आणि भोर या त्यांच्या जवळील तालुक्यातही त्यांनी न्यायानं पाणी सोडलं नाही. ‘महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे’ असं म्हणणं वेगळं आणि त्यासाठी काही भरीव योगदान देणं वेगळं.

यशवंतराव चव्हाण यांनी मराठी साहित्य क्षेत्रात योगदान दिलं. अनेक साहित्यिकांवर त्यांनी प्रेम केलं. साहित्यात एक चांगलं वातावरण त्यांनी निर्माण केलं. विश्वकोश निर्मिती मंडळाची त्यांनी स्थापना केली. मराठी भाषा समृद्ध व्हावी यासाठी त्यांचे काही प्रयत्न होते. मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीसाठी पवारांनी काय केलंय? यशवंतरावांना ज्यांनी त्रास दिला त्यांना ‘चुन चुन के’ संपवताना त्यांच्या चार चांगल्या योजना, चांगले विचार तरी पुढे न्यावेत. या सगळ्याचा लेखाजोखा पवार समर्थकांनी मांडण्याची आवश्यकता आहे. या क्षेत्रात दुर्दैवानं पवारांकडून काहीही झालं नाही. अनेकदा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होऊनही त्यांनी भाषेसाठी काही योगदान दिलं नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असे प्रयत्न असताना पवारांचं स्वतःचं तिकडंही लक्ष दिसत नाही. उलट साहित्य क्षेत्रात त्यांनी घाणेरडं राजकारण आणलं. त्यांच्या पाठिंब्यामुळं गेल्या काही काळात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला अतिशय सुमार अध्यक्ष मिळाले. 


सुधीर गाडगीळ यांचे 'मानाचे पान' हे पुस्तक घरपोच मागवा
 

गेल्या साठ वर्षांचा विचार करता पवारांच्या राजकारणातले सर्व प्रकारचे दोष ठळकपणे दिसून येतात. लबाड, स्वार्थी, घराणेशाही निर्माण करणारं हे नेतृत्व आहे. त्याहीपेक्षा ते स्वकेंद्रित आहेत. त्यांच्यातील जातियवाद आणि विशेषतः ब्राह्मणद्वेषही अनेकदा दिसून येतो. फडणवीस मुख्यमंत्री असताना श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची आणि पेशव्यांच्या गादीची आठवण काढणं, शेंडी-जाणव्याचा उल्लेख करणं, बाकी सोडा राजू शेट्टी यांच्यासाख्या शेतकरी नेत्यालाही जातीवरून बोलणं हे महाराष्ट्रानं बघितलं आहे, अनुभवलं आहे. जातीनिर्मुलनाची, जातिअंताची भाषा बोलणारे शरद पवार अत्यंत जातीवादी आहेत हे अनेकदा दिसून आलं आहे.

आज वयाच्या ऐंशीतही ते पक्षसंघटनेचं विकेंद्रिकरण करत नाहीत. राज्य सरकारवर स्वतःचं जास्तीत जास्त नियंत्रण रहावं यासाठी ते धडपडत असतात. भाषणं करणं, नकला करणं आणि लोकांना बोलून गप्प करणं म्हणजे राजकारण नाही. महाराष्ट्रातल्या गावागावांची इत्यंभूत माहिती असलेला हा माणूस. त्यांच्याकडून अनेकांच्या केवढ्या अपेक्षा होत्या! सामान्य माणसांच्या अपेक्षांच्या लाटांवर स्वार झालेल्या या नेत्यानं चाळीस चोरांची एक टोळी तयार केली. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राची मोठी लूट सुरू आहे. एकीकडं कमालीचा स्वार्थ, दुसरीकडं विलक्षण अहंकार, तिसरीकडं स्वतःचा मतदारसंघ आणि पक्षाचा मतदार सतत ‘प्रोटक्ट’ करण्याची अतियश केविलवाणी धडपड असंच पवारांच्या राजकारणाचं एकंदरीत स्वरूप राहिलेलं आहे.

सिस्टिम मॅनेज करणं आणि ती स्वतःच्या स्वार्थासाठी वापरणं हा प्रकार महाराष्ट्रात पवारांनी वेळोवेळी केला. महाराष्ट्रात मोठे उद्योगधंदे यावेत यासाठी त्यांच्या राजकारणाचा उपयोग झाला नाही. आपल्या शेतकर्‍यांची अवस्था सुधारली नाही. कांद्याच्या दरासाठी शेतकर्‍यांना आजही आंदोलन करावं लागतं आणि अडचणीचे कृषी कायदे रद्द करा म्हणून त्यांना उपोषणाला बसावं लागतं. कापसाला, तूर डाळीला हमीभाव मिळावा म्हणून अजूनही शेतकर्‍याला रस्त्यावर यावं लागतं. शेतकर्‍याला पुरेशी वीज मिळत नाही, त्याची बीलं भरणं परवडत नाही. या सगळ्यांसाठी पवार नेमकं करतात तरी काय?

यशवंतराव चव्हाण यांच्याकडं एक विचार होता, एक संस्कार होता. त्यांचं ‘कृष्णाकाठ’ हे आत्मचरित्र वाचताना त्यातला निरलसपणा, त्यांचा प्रामाणिकपणा मनावर बिंबतो. ‘लोक माझे सांगाती’ वाचताना पवारांच्या अशा असंख्य उठाठेवीच डोळ्यासमोर येतात. सध्या मराठी माणूस जगाच्या कानाकोपर्‍यात दिसतो. अशा परिस्थितीत पवारांचं राजकारण, त्यांचा पक्ष याचं भवितव्य काय? याचा विचार केला तर स्वार्थापोटी एकत्र असलेल्या अलीबाबाचे आणि त्याच्यासोबतच्या चाळीस चोरांचे कारनामे दिसतात. निवडक टग्यांचे हितसंबंध साधण्यासाठी तयार झालेली ही टोळी आहे. आपल्या पक्षात माणूस आला की तो स्वच्छ होतो याचा पहिला डेमो पवारांनी दिलाय. भाजपची वॉशिंग मशिन पाहताना पवारांचे त्याआधीचे कारनामेही बघायला हवेत.
 

सदानंद भणगे यांची भयकादंबरी 'अमानवी विनवणी' घरपोच मागवा
 

समाजवादाची भाषा बोलणारा, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणारा, शाहू, फुले, आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि तिथं काहीही वावगं आम्ही सहन करणार नाही असं म्हणणारा, वैचारिक आधार असलेला नेता म्हणून लोक पवारांकडं बघायचे. भ्रष्ट, गुंड, लबाड लोकांना संरक्षण आणि अधिकाराची पदे देऊन पवारांनी हा विश्वास गमावला. सामान्य माणसाच्या आशा-अपेक्षांची राखरांगोळी करण्याचा प्रकारच शरद पवारांनी वर्षानुवर्षे केलेला आहे. लोकांकडून, जनतेकडून जे जे देणं शक्य आहे ते लोकांनी पवारांना दिलं. आता पवारांनी लोकांना नेमकं काय दिलं याचा लेखाजोखा त्यांनी पडताळून बघितला पाहिजे.

नव्या पिढीला, नव्या महाराष्ट्राला पवारांचा विचार कोणता ते कळायला हवं. शेतकर्‍यांशी, महाराष्ट्राशी, इतकंच काय स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांशी आणि नेत्यांशीही ते प्रामाणिक नाहीत. विचारधारांशी प्रामाणिक नाहीत किंवा ज्या समाजाचे नेते म्हणून ते राजकारण करतात त्या मराठा समाजाशीही ते प्रामाणिक नाहीत. कुणाशीही तडजोड करत सगळं ओरबाडून घेणं हाच त्यांचा विचार आहे. असल्या विचारधारेवर पक्ष फार काळ टिकत नाही. आजही शरद पवार सामाजिक-राजकीय जीवनात सक्रिय आहेत. त्यांची बुद्धी शाबूत आहे. त्यामुळं त्यांनी सिंहावलोकन करावं. महाराष्ट्रानं आपल्याला इतकं दिलेलं असताना आपण महाराष्ट्राला नेमकं काय दिलंय याची जाणीव मनात ठेऊन त्यांना अजूनही काही करावं वाटलं, महाराष्ट्रासाठी योगदान द्यावं वाटलं तर महाराष्ट्रावर ते मोठे उपकार ठरतील अन्यथा हा अलीबाबा आणि त्याची चाळीस चोरांची टोळी महाराष्ट्राला अजून खायीत घातल्याशिवाय राहणार नाही.
- घनश्याम पाटील
संस्थापक, संपादक ‘चपराक’, पुणे
7057292092