दैनिक पुण्य नगरी, 30 मार्च, 2021
पश्चिम बंगाल हा नेहमी परिवर्तनाच्या बाजूनं उभा राहिलेला प्रांत आहे. या देशात महाराष्ट्र, पंजाब आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यात सर्वाधिक क्रांतिकारक निर्माण झाले. त्यातल्या दोन राज्यात भाजपची सत्ता नाही. पश्चिम बंगालमध्येही त्यांना फार काही अनुकूल चित्र आहे अशी परिस्थिती नाही. नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं विरोधकांची पर्वा न करता शासन चालवतात, वाटेल तसे निर्णय घेतात तशाच ‘मिनी नरेंद्र मोदी’ म्हणून पश्चिम बंगालमध्ये ममतादीदी काम करतात. या बाई मोदींचेच दुसरे रूप आहेत. अतिशय आक्रमक असलेल्या ममता एकछत्री पक्ष चालवतात. स्वतःच्या प्रतिमेची आत्यंतिक काळजी घेत कुठंही फिरतात.
पश्चिम बंगालमधला मतदार हा एका संक्रमणावस्थेत आणि संभ्रमावस्थेत आहे. तिथं अनेक वर्षे डाव्या आघाडीचं आणि कम्युनिस्टांचं वर्चस्व राहिलेलं आहे. ती भूमी स्वामी विवेकानंद, योगी अरविंद, नेताजी सुभाषचंद्र बोस, गुरूवर्य रवींद्रनाथ टागोर यांची भूमी म्हणून भारताला परिचित आहे. विकासाच्या दृष्टीनं विचार केल्यास कोलकत्ता शहर सोडलं तर हे राज्य महाराष्ट्रापेक्षा किमान पाच-पंचवीस वर्षे मागं आहे. तिथं अजूनही भिंती रंगवून प्रचार सुरू आहे. जग हायटेक होत असताना हे लोक आहेत तिथंच आहेत. बांगलादेशातून आलेले सर्वाधिक घुसखोर हे पश्चिम बंगालमध्ये आहेत. राजकीय नेतृत्वाच्या आशीर्वादानं ते तिथं आनंदानं राहतात.
डावी आघाडी आणि काँग्रेस या दोनच विचारधारा तिथं प्रभावी आहेत. भाजपाच्या विचारधारेला तिथं पूर्वी कधी फारसं स्थान नव्हतं आणि आजही नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपत्तीच्या काळात दिवसरात्र खपून तिथं जे सेवाकार्य केलं त्यामुळेच भाजपचं तिथलं अस्तित्त्व टिकून आहे. सेवा आणि संघटन या संघाच्या गुणांचा भाजपला लाभ होईल. तिथं आयात केलेले जे उमेदवार आहेत त्यांच्या जोरावरच भाजप निवडणूक लढवतो आहे. पश्चिम बंगालचा भाजपचा नेता कोण? सत्ता आलीच तर राज्याचं तिथलं नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न केला तर अनेकांना लवकर कोणतंच नाव आठवणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच तिथल्या प्रचाराचे आयडॉल आहेत. पंतप्रधानपद सोडून ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री पदासाठी उभे असावेत इतकं त्यांचं लक्ष त्या राज्यात आहे. प्रत्येक फ्लेक्सवर फक्त मोदी आहेत. ‘पश्चिम बंगालमध्ये सत्ता दिल्यास आम्ही सर्व भ्रष्टाचार्यांना शिक्षा देऊ’ असं मोदी आणि शहा सांगत असले तरी सत्ता आलीच तर शिक्षा देण्यासाठी त्यांच्याकडं कोणीच उरलं नाही; कारण ज्यांना शिक्षा द्यायला हवी ते भाजपमध्ये येऊन पावन झालेत. जर सत्ता आलीच तर हरियाणात जसा एक मनोहरलाल खट्टर पकडला तसा तिथं एखादा नेता पकडून राज्याची सूत्रं त्याच्या हाती देण्याची वेळ भाजपवर येईल.
ममता बॅनर्जी यांचे आडाखे, राजकीय गणितं, समीकरणं, मतांचं राजकारण हे सगळं नीट अभ्यासलं पाहिजे. या बाईनं बुद्धदेव भट्टाचार्य यांची सत्ता उलथवून लावली. पश्चिम बंगालच्या विकासाचा, विचारांचा, संस्कारांचा वारसा आपल्याकडं यावा असं भाजपवाल्यांना वाटत असलं तरी तसं त्यांचं तिथं काही काम नाही. कोलकत्ता हे धर्मनिरपेक्ष शहर आहे. जिथं सामाजिक क्षेत्रात अनेक पिढ्या अव्याहतपणे खपल्यात तिथं जात-धर्म असे निकष चालत नाहीत. राजाराम मोहन रॉय यांच्यापासून जी काही सामाजिक आंदोलनं झालीत ती पाहता इथं धार्मिक संघर्षावर मतविभाजन होईल असं वाटत नाही. ममतादीदींनी तिथं फार मोठ्या प्रमाणात घुसखोरांना आश्रय दिला असा विरोधकांचा आक्षेप आहे. तो असताना मोदी सांगतात की बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात मी सहभागी होतो. यामागे तिथल्या मुस्लिमांना खूश करण्याचा प्रयत्न असू शकतो. भाजपचं तिथलं दुर्दैव असं की त्यांना तिथं युती करायलाही कोणी सोबत नाही. त्यांना बिहारमध्ये नितीशकुमार सापडले, महाराष्ट्रात अनेक वर्षे शिवसेना सोबतीला होती. तिथं मात्र डावे भाजपबरोबर युती करायला तयार नाहीत, काँग्रेस युती करायला तयार नाही आणि ममता तर नाहीतच नाहीत. त्यामुळं तिथं भाजप एकटा पडलाय. या निवडणुकांपूर्वी राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन ममता बॅनर्जी यांना ईव्हीएममध्ये घोटाळा होतोय, त्यामुळे तुम्ही इव्हीएमद्वारे निवडणुका घेऊ नका असा वैधानिक इशारा दिला होता. ममता यांनी त्यांच्या सवयीप्रमाणे आणि स्वभावाप्रमाणे तिकडं पूर्ण दुर्लक्ष केलं. दुसर्याचं ऐकायचं, तिकडं लक्ष देऊन त्याला किंमत द्यायची हे जसं ममतांना सल्ला देणार्या राज ठाकरे यांना माहिती नाही तसंच तो सल्ला ज्यांना दिला गेला त्या ममतांनाही माहिती नाही. त्यामुळं जर या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला तर राजसाहेबांचं ऐकलं नाही, साहेबांनी वेळीच इशारा दिला होता पण त्यांनी दुर्लक्ष केलं, म्हणूनच त्यांचा पराभव झाला असं मनसैनिकांना आनंदानं म्हणता येईल.
आत्तापर्यंत भाजपला स्वबळावर किंवा कुणाशी युती करून पश्चिम बंगालमध्ये कोणतीही मोठी संधी मिळाली नाही. अत्यंत प्रयत्न करून आपले पाय तिथं रोवण्याचा प्रयत्न भाजपनं केलाय. त्यामुळं भाजपचं स्वरूप थोडं अधिक व्यापक होईल असं वाटतंय. निवडणुकांचे ट्रेंडस, त्यांचं स्वरूप पाहता ममता बॅनर्जी काँग्रेस किंवा डाव्यांची मदत घेऊन सरकार स्थापन करू शकतात. जशी मागच्यावेळी एकहाती सत्ता होती तशी मात्र मिळण्याची शक्यता नाही. तिथं भाजपही ओरिजनल नाही. इतर पक्षातले नेतेच त्यांच्याकडं आयात केलेले आहेत. इथला मुस्लिम मतदार काँगे्रसकडे जातो, डाव्यांबरोबर जातो की भाजपची बी टीम असलेल्या एमआयएमच्या माध्यमातून छुप्या मार्गानं भाजपला मतदान करतो हे लवकर कळेल.
भाजपच्या हातात जी राज्ये आहेत तिथं त्यांनी फार चमकदार कामगिरी केलीय असंही नाही. पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीपर्यंत गेलेत. कन्हैय्याकुमारनं परवा पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभेत बोलताना सांगितलं की एकजण म्हणतोय की आम्ही ‘शेर’ पाळलाय. शेर पाळणं ही सामान्य गोष्ट नाही. त्यामुळं पेट्रोल शंभर रूपये लिटरनं खरेदी करावंच लागणार आहे. भाजपच्या या अशा बोलघेवड्या लोकांच्या नादाला लागू नका. त्यांच्या आविर्भावाला बळी पडून तुम्ही परत सत्ता त्यांच्याकडं दिली तर पेट्रोल दीडशे रूपये लिटर झाल्याशिवाय राहणार नाही.
उद्योगपती, धनदांडग्यांच्या विरोधात जेव्हा जेव्हा सशस्त्र क्रांती झालीय तेव्हा तेव्हा पश्चिम बंगाल अग्रेसर राहिलेला आहे. ‘माटी, माँ आणि मानूस’ या तत्त्वावर बंगाली लोक प्रेम करतात. त्यांना नौटंकी चालत नाही. त्यांच्याकडे सगळे ओरिजनल हिरो आहेत. त्यामुळं त्यांना स्टंटबाज चालत नाहीत. पश्चिम बंगालचा मतदार विचारानं, शिक्षणानं आणि संस्कारानं अधिक प्रगल्भ आहे. एक मोठी साहित्यिक आणि सुधारणांची परंपरा त्यांच्याकडं आहे. या पार्श्वभूमीवर एकविसाव्या शतकातल्या तिसर्या दशकातली पहिली निवडणूक तिथं होत आहे. या राज्यात मोदी आणि शहांचा अश्वमेध रोखण्यात डाव्यांना आणि ममतांना यश आलं तर ती भाजपला 2024 साठी धोक्याची फार मोठी घंटा असेल. मात्र ही निवडणूक मोदी आणि शहा जिंकू शकले तर 2029 पर्यंत देशात सत्तेत येण्याचं स्वप्न हे काँग्रेसनं आणि भाजपच्या अन्य विरोधकांनी सोडून द्यावं. इथं भाजपला स्पष्ट बहुमत मिळणं तसं अवघड आहे. ममता किंवा, काँग्रेसला, डाव्यांना स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर ते एकमेकांना पाठिंबा देतील. भाजपचं तसं नाही. त्यांचं तिथं ‘एकला चलो रे’ आहे. त्यामुळं तिथं नेमलेल्या राज्यपालांशिवाय त्यांच्यासोबत कोणीही राहणार नाही.
पश्चिम बंगालमध्ये आजवर भाजपला कधीही कौल मिळाला नाही. त्यामुळं मोदी-शहांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. भारतीय राजकारणावर पुढची किमान दहा वर्षे या निवडणुकीचा प्रभाव असेल. यात ममता जिंकल्या तर हा प्रांत कधीही जिंकण्याची मनीषा भाजपने बाळगू नये, हा संदेश जाईल आणि आयात केलेल्या, उसन्या घेतलेल्या माणसांच्या बळावर लढाया जिंकल्या जात नाहीत हा धडाही मिळेल. मात्र या निवडणुकीत मोदी-शहा जिंकले तर 2029 पर्यंत भारतीय राजकारणात काही परिवर्तन घडेल हा विचारही राहुलबाबाने सोडून द्यावा आणि बँकॉकला परत विपश्यनेला जायला सुरूवात करावी.
आणखी एक गोष्ट यावेळी चर्चेत राहिली ती म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांच्यासारखी वेशभूषा आणि त्यांच्यासारखी दाढी पंतप्रधानांनी राखली. भाजपकडे आजही त्यांच्याशिवाय दुसरा कोणी स्टार प्रचारक नाही. कोणी कोणासारखं दिसून निवडणुका जिंकू शकतं का? या प्रश्नाचं उत्तरही या निवडणुकीत मिळणार आहे. भारताला नोबेल मिळवून देणारे साहित्यिक म्हणून रवींद्रनाथ टागोर सुपरिचित आहेत. त्यांच्या स्वप्नातला भारत खूप वेगळा होता. आजवर कोणत्याही सत्ताधार्यांना त्यांचं स्वप्न पूर्ण करता आलेलं नाही. ही भूमी योगी अरविंदांची आहे. क्रांती आणि परिवर्तनाचे विचार सर्वप्रथम तिथून येतात. अशा परिस्थितीत तिथले मतदार काय करतात याबाबत उत्सुकता आहे.
देवेंदू बरूवा हे तिथले एक नेते होते. इंदिरा गांधीवर इथल्या लोकांनी खूप प्रेम केलं. देवेंदू बरूवा त्यावेळी जाहीरपणे म्हणाले होते की, आमच्या मंत्रीमंडळात एकच पोलादी पुरूष आहे तो म्हणजे इंदिरा गांधी. बाकी सगळे आम्ही मंत्रीमंडळातल्या पुरूषी वेशातल्या बायका आहोत. अशा भाटगिरीमुळे नेतृत्वाला कसं खूश करावं आणि बदलाचे वारे कसे स्वीकारले जावेत हे समजण्याइतका बंगाली माणूस कायमच चतुर राहिलेला आहे हे दिसून येतं. त्यातही बदलाचे वारे स्वीकारले नाहीत तर सार्या जगाच्या विरोधात काम करण्याची ताकतही बंगाली माणूस ठेवतो. त्यामुळंच या निवडणुकीत नेमकं काय होतं हे पाहणं औत्स्तुक्याचं असेल.
- घनश्याम पाटील
7057292092
संवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम चपराक देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरल्याचे वाचक आवर्जून सांगतात. विविध विषयांवर चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष भावनेने केलेला लेखनप्रपंच म्हणजे 'दखलपात्र' हा ब्लॉग!!
Pages
▼
सविस्तर आणि माहितीपूर्ण लेख लिहिलाय...
ReplyDeleteखूप छान आढावा घेतला... अगदी रोखठोक!
घनश्यामजी अभिनंदन.!
ReplyDelete🌷🌷😊🌷🌷
अतिशय समतोल तरीही परखड असं हे धडक बेधडक आहे. सत्तेचा प्रचंड दुरुपयोग करणाऱ्या भाजप आणि तृणमूललाही आपण आरसा दाखविला आहे. येणाऱ्या काळाचं प्रतिबिंबही आपल्या लेखातून दृष्टीगोचर होते. जर तरच्या शक्यताही आपण ठळकपणे मांडल्या आहेत. दोन्ही पक्षांची ताकद सत्ता असली तरी जनतेच्या हितासाठी ती कुठेही वापरली गेली नाही हे सांगण्याचं धाडस म्हणजे या लेखातली बिटविन द लाईन आहे.!
तुम्ही खऱ्या अर्थाने चतुरस्त्र संपादक आहात.
👍
परखड दादा.
ReplyDeleteमोमता दिदी या नोरेंद्र भाईं. . .
छान
ReplyDeleteबंगालच्या राजकारणाला धरून देशाचे राजकारणही लक्षात येतय. अभ्यासपूर्ण खूप छान लेख झालाय.
ReplyDeleteभाजप बंगाल मध्ये ३ वरुन शंभरीच्या पार गेला तरी तो बंगाल च्या राजकारणात/ राजकीय वातावरणात फार मोठा बदल असेल. आयात उमेदवार आणि पक्षाचे मुळ कार्यकर्ते यांचे निवडून आलेल्या सदस्यातील फरक मुळ पक्षनिष्ठांच्या अनुकूल असेल तर त्याचे दुरगामी परीणाम होतील .
ReplyDeleteभाजप येईल
ReplyDelete