Pages

Saturday, October 28, 2017

वाचेल तो टिकेल!

मुद्रित माध्यमाच्या भवितव्याविषयी सध्या सातत्याने चर्चा होते. ‘वाचनसंस्कृती कमी होतेय,’ ‘आणखी काही वर्षांनी वृत्तपत्रे बंद पडणार’, ‘सध्याचा जमाना ऑनलाईन असल्याने कोणी फारसे वाचत नाही’ ही व अशी वाक्ये सतत ऐकायला मिळतात. या सर्व प्रकारच्या चर्चा म्हणजे निव्वळ थोतांड आहे हे मी स्वानुभवाने सांगतो.

पूर्वी महानगरातला वाचक सकाळी घरी किंवा प्रवासात वृत्तपत्र वाचायचा. हे चित्र जाऊन सध्या बहुतेकांच्या हातात मोबाईल दिसतो हे खरे आहे. फेसबुक, व्हाटस ऍपसारख्या माध्यमांमुळे ‘वाचणे ही सुंदर सवय’ अशी वाक्ये माग पडत चालल्याचे सांगितले जाते. मात्र हे पूर्ण सत्य नाही. 

मुळात समाजमाध्यमे, दृकश्राव्य माध्यमे आणि मुद्रित माध्यमे यात प्रचंड तफावत आहे हे आपण समजून घ्यायला हवे. समाजमाध्यमात किंवा दृकश्राव्य माध्यमात अभ्यास नसलेली माणसे खपून जातात. मुद्रित माध्यमात मात्र अभ्यासू माणसे लागतात. कारण सर्वाधिक विश्वासार्हता मुद्रित माध्यमांचीच आहे. रात्री क्रिकेटचा सामना वृत्तवाहिनीवर बघितला तरी सकाळी वृत्तपत्रात ती बातमी वाचण्याची मजा काही औरच असते. ‘विराटचे विराट शतक’ ही बातमी वाचताना जितकी मजा येते तो आनंद अनेकदा तो सामना पाहतानाही येत नाही.
 
वृत्तपत्रात संपादकीय लेख असतात. त्यासाठी संबंधित संपादकाला चालू घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे लागते. वर्तमानाचे आणि भूतकाळाचे संदर्भ त्याला माहीत असावे लागतात. भविष्यात काय परिणाम साधले जातील याचा अभ्यास असावा लागतो. त्याउलट वृत्तवाहिन्यांवर ज्या चर्चा होतात त्यात बहुतेकदा वादावादीच असते. इथे निवेदकाचा संबंधित विषयाचा अभ्यास असावाच लागतो असा दंडक नाही. त्यामुळे चर्चेतले लोक मुख्य विषय सोडून काहीही बोलत असतात. एकमेकांना उचकावत असतात. कार्यक्रमाची सुरूवातच गोंधळाने करायची असा त्यांचा खाक्या असतो. म्हणूनच या चर्चा कुणी फार गंभीरपणे घेत नाही. ‘या वृत्तपत्राने अमक्या तमक्याला अग्रलेखातून चांगलाच चोपला’ अशी चर्चा होते. तशी गंभीर चर्चा वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रमाबाबत होताना दिसत नाही. कारण वृत्तपत्रांची विश्वासार्हता कायम टिकून आहे.

सध्याचा जमाना धावपळीचा आहे. त्यामुळे ‘गतिमान आयुष्य नको’ असे वाटणारा एक मोठा वर्ग तयार होतोय. त्यांना आक्रस्थाळेपणा नकोय. निवांतपणा हवाय, शांतता हवीय. ही शांतता दृकश्राव्य माध्यमे देऊ शकत नाहीत. वृत्तपत्रातील महिलांविषयक, आरोग्यविषयक, पुस्तकविषयक, क्रीडाविषयक, चित्रपटविषयक मजकूरावर चर्चा होते. बोधकथेपासून विनोदापर्यंत आणि व्यंग्यचित्रापासून प्रासंगिक लेखापर्यंत हवा तो मजकूर वृत्तपत्रात वाचता येतो. शब्दकोड्यासारखी ज्ञानवर्धक आणि रंजक साधने दृकश्राव्य माध्यमे देऊ शकत नाहीत.

न्यूज आणि व्ह्यूज दोन्ही हवे असेल तर वृत्तपत्रांशिवाय पर्याय नाही. एखादी महत्त्वाची बातमी वृत्तवाहिन्यांनी चालवली तर प्रेक्षक चॅनेल बदलतात आणि ती बातमी खरी आहे का याची खात्री करून घेतात. वृत्तपत्रांबाबत सहसा असे होत नाही. छापील बातमीवर लोकांचा अजूनही विश्वास आहे. वृत्तपत्रातील भाषा लोकांना सोपी आणि सरळ वाटते.
एखादी बातमी वृत्तवाहिन्यांनी चालवली तर ती अचानकच गायब होते. त्याउलट एखाद्या वृत्तपत्राने काही महत्त्वाचा विषय हाताळला तर तो तडीस जाईपर्यंत त्याचा पाठपुरावा करतात. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक वृत्तपत्रांच्या पत्रकारांनी, संपादकांनी लेखनासाठी मोठी किंमत मोजली. सरकारविरोधी रोष व्यक्त केला म्हणून लोकमान्य टिळकांना तुरूंगवास भोगावा लागला. त्याउलट सहकारी बाईवर बलात्कार केला म्हणून तरूण तेजपालसारख्या संपादकाला तुरूंगाची हवा खावी लागली. काही अपवाद वगळता माध्यमात काम करणार्‍या लोकांच्या गुणवत्तेतला हा फरक आहे. अर्थात, दृकश्राव्य माध्यमात काम करणार्‍या सगळ्यांनाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्याचा माझा मानस नाही; परंतु वृत्तपत्रातील लोकांविषयी अजूनही व्यापक विश्वासार्हता आहे हे मान्य करावेच लागेल.

स्थानिक घडामोडींची प्रभावी दखल अजूनही वृत्तपत्रांद्वारेच घेतली जाते. रस्त्यावर पडलेले खड्डे असोत किंवा गावातील अखंड हरीनाम सप्ताह... या बातम्या वृत्तवाहिन्यांवर येणे तितकेसे सोपे नसते. स्थानिक समस्या वृत्तपत्रांतून मांडल्यानंतर प्रशासनही त्याची योग्य ती दखल घेते. वृत्तपत्रांत काम करणार्‍या लोकांचा संबंध भाषेशी येतो. त्यामुळे ते सरस्वतीचे भक्त असतात. विविध सदरे, प्रासंगिक लेख, बातम्या हे तर सोडाच पण ‘स्वयंपाकी हवा’, ‘घरकामाला बाई पाहिजे’, ‘पेस्ट कंट्रोलवाला हवा’, ‘विविध कामासाठी गरजू लोक हवेत’ अशा लोकोपयोगी छोट्या जाहिराती सुद्धा केवळ आणि केवळ वृत्तपत्रांतच वाचावयास मिळतील. सामान्य माणसाला मदत होणे आणि त्याच्या दैनंदिन समस्या सोडविण्यास हातभार लावणे हेच वृत्तपत्रांचे ध्येय असते. गावातील लोकांच्या ‘निधन वार्ता’सुद्धा देऊन वृत्तपत्रे वाचकांची सहवेदना अनुभवतात. त्यामुळे वृत्तपत्रांचे वाचकांशी अनोखे बंध निर्माण होतात. कामगार दिन, स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, दिवाळी अशा जेमतेम चार सुट्ट्या घेतल्या आणि त्याच्या दुसर्‍या दिवशी वृत्तपत्र आले नाही तरी अनेकांना चुकल्याचुकल्या सारखे होते. हेच तर मुद्रित माध्यमांचे मोठे यश आहे.

एक अखबार हूँ, अवकात ही क्या है मेरी
लेकिन पुरे शहर आग लगाने काफी हूँ 

असे वृत्तपत्रांबाबत म्हटले जाते ते उगीच नाही. कोणताही विषय ठामपणे मांडणे ही त्यांची खासियत असते. तरीही सध्या अनेक छोटी आणि विशेषतः जिल्हा दैनिके अडचणीत आहेत. सरकार दरबारी त्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागत नाहीत. ग्रामीण आणि निमशहरी भागातील वार्ताहर तुटपुंज्या मानधनावर काम करतात, पण त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा सोडला नाही. बातम्यांसाठी ते कठोर परिश्रम घेतात. मिळेल त्या साधनांद्वारे प्रवास करतात. लोकांशी बोलतात. खरेखोटे पडताळून पाहतात. आपल्या लेखनातून कुणावर अन्याय होऊ नये याची कटाक्षाने काळजी घेतात. त्याउलट ‘ब्रेकिंग न्यूज’च्या नावावर अनेक वाहिन्या वाटेल तशा बातम्या चालवतात. बहुतेकांना फक्त ‘टीआरपी’शी देणेघेणे असते.

सध्या दुर्दैवाने काही वाङमयीन नियतकालिके बंद पडत आहेत. नव्या काळाची आव्हाने स्वीकारण्याचे सामर्थ्य त्यांच्या व्यवस्थापनात नाही. असे असले तरी राज्यभरातील दैनिके, साप्ताहिके, पाक्षिके, मासिके यांची जनमत घडवण्यातली ताकत मोठी आहे. त्यांची सर कुणालाच येणार नाही. म्हणूनच वाचनसंस्कृती कमी होतेय, भाषा संपत चाललीय असे नकारात्मक सूर लावण्यात अर्थ नाही. केवळ आणि केवळ विश्वासार्हतेच्या बळावर मुद्रित माध्यमे चिरकाल तग धरून राहतील याबाबत माझ्या मनात कसलाही किंतु नाही. मुद्रित माध्यमांच्या भवितव्याची चिंता करणार्‍यांना सांगावेसे वाटते,

ना तोफ से, ना बंदुक से
जो होता नही तलवार से
होता है अखबार से!
- घनश्याम पाटील, पुणे 
7057292092

6 comments:

  1. जे कधीही नष्ट होत नाही ते म्हणजे अक्षर .ज्ञानेश्वरी ,तुकाराम गाथा ,भगवद् गीता तसेच संत साहीत्य आजही काळाच्या ओघात टिकून आहे .पुस्तके हेच खरे माणसांचे मित्र आहे . TV म्हणजे ताबडतोब वाटोळं .मुलांना पालकांनी Mobile देण्या ऐवजी पुस्तके वाचायला द्यायला हवी .पुस्तके आणि चांगले विचारच माणसाला अधिक सुसंस्कृत बनवत असते .वाचनामुळे माणूस समृद्ध होतो TV मुळे वृद्ध होतो .

    ReplyDelete
    Replies
    1. खरंय. पुस्तक हेच मस्तक.

      Delete
  2. TV वरील Breaking News कायम स्मरणात राहत नाही पण साहीत्यिक आचार्य प्र.के.अञे ,शि.म.परांजपे ,न.चिं.केळकर ,अरूण साधू ,ह.मो.मराठे आणि आजचे आघाडीचे पञकार आणि संपादक श्री .घनश्यामजी पाटील यांनी वेळोवेळी लिहीलेले अग्रलेख नेहमीच झोप उडविणारे आणि स्मरणात राहणारे असतात .एक पुस्तक आणि एक विचार जग बदलू शकते .

    ReplyDelete
  3. घरात TV , Mobile , Freez , Car यामुळे घराला घरपण येईल पण घरात " पुस्तके " आली की घराला आणि माणसाला "शहाणपण "येईल .जी माणसे पुस्तके वाचत नाही ती माणसे संपल्यात जमा आहे . पुस्तकामुळे माणूस चिंतन करतो तर TV पाहून चिंता करतो.

    ReplyDelete
  4. वास्तववादी चिंतन

    ReplyDelete
  5. लाईट असेंल तरच TV बघुन व चार्जींग व नेट असेल तरच मोबाईल बघुन ते पण अपुर्णच ज्ञान व माहिती मिळते

    पण पुस्तकांना ना लाईट लागते ना चार्जींग ना नेट लागते

    पण मिळणारी माहिती व ज्ञान पुर्ण व कायमचे स्मरणात राहणारे मिळते

    ReplyDelete