Pages

Saturday, October 21, 2017

अजूनी चालतोची वाट....!



ही गोष्ट आहे 2001 सालातली. माझे वय होते सतरा! मी मराठवाड्यातल्या एका छोट्याशा खेड्यातून येऊन पुण्यासारख्या महानगरात दाखल झालो होतो. ध्येय होते पत्रकारिता करण्याचे. त्यापूर्वी वृत्तपत्रविक्रेता, ग्रामीण वार्ताहर म्हणून बरीच उलथापालथ केलेली. अर्थात, त्याच्या परिणामांची चिंता नव्हती! ती मी का करावी? ज्यांना माझे लेखन झोंबायचे आणि ज्यांचा पोटशूळ उठायचा ते त्या परिणामांची मीमांसा करत असायचे. मी आपला उडाणटप्पू! 

पुण्यात आल्यावर सर्व प्रस्थापित वृत्तपत्रांचे उंबरठे झिजवले. ‘वय कमी’ आणि ‘पत्रकारितेची पदवी नाही’ म्हणून सर्वांनी झिडकारले. काहींनी, ‘बेटा आधी शिक्षण पूर्ण कर, पदवी घे आणि मग आमच्याकडे ये...’ असेही सांगितले. मात्र तितका धीर कोण धरणार? काहीही करून या क्षेत्रात नशीब आजमावयाचेच हा निर्धार पक्का होता. परतीचे दोर कापून टाकलेत असे वाटत होते. म्हणूनच जंग जंग पछाडले.

त्याचवेळी दै. ‘संध्या’चा अंक हाती पडला. हे पुणे जिल्ह्यातलं पहिलं सायंदैनिक. त्यात जाहिरात होती, ‘वृत्तसंपादक, उपसंपादक, बातमीदार, अंक विक्रेते नेमणे आहेत.’ म्हटलं बघावं प्रयत्न करून! पत्ता होता टिळक रस्त्यावरच्या ‘व्हाईट हाऊस’चा. तेव्हा माझा मुक्काम होता सारसबागेच्या फूटपाथवर. तिथून हे ठिकाण हाकेच्या अंतरावर. 

मग गाठले ‘संध्या’चे कार्यालय. सगळेजण आपापल्या कामात व्यग्र. कुणाशी बोलावे काहीच सुचेना. घाबरतच एकाला सांगितले, ‘‘संपादकांना भेटायचे आहे...’’ त्यांनी समोरची केबिन दाखवली. थेट आत गेलो. त्यांनी बघितले आणि विचारले, ‘‘काय रे बाळा? काय काम काढलंस?’’ त्यांना वाटलं, कुणीतरी विद्यार्थी दिसतोय. कसलीशी मदत हवी असणार!

मी नमस्कार केला आणि बसलो त्यांच्या समोरच्या खुर्चिवर! त्यांना म्हणालो, ‘‘मी पत्रकार व्हायला आलोय. तुम्ही काही सहकार्य करू शकाल का? तुमची आजच्या अंकातली जाहिरात बघितली म्हणून इथवर आलोय.’’

ते हसायला लागले. म्हणाले, ‘‘हे इतकं सोपं नसतं. शिक्षण काय तुझं? पुढं काय करायचं ठरवलंय?’’

त्यांना म्हणालो, ‘‘मी गेल्या चार वर्षापासून लिहितोय. ही मी लिहिलेल्या लेखांची आणि बातम्यांची फाईल. बहुतेक लेखन नावासह प्रकाशित झालेले आहे. तुम्ही खात्री करून घेऊ शकता. सांस्कृतिक क्षेत्रात पुण्याचा लौकिक मोठा आहे. माझ्या खेडेगावात फारशा संधी नाहीत. तिथल्या सामान्य माणसाची, शेतकर्‍यांची दुःख मोठ्या प्रवाहात मांडली जात नाहीत. त्यामुळं मला संपादक व्हायचंय. तुम्ही पत्रकारितेची संधी दिलीत तर एक यशस्वी संपादक व्हायची जबाबदारी माझी...’’

ते असे काही बघू लागले की, जणू आफ्रिकेच्या जंगलातला एखादा अजस्त्र प्राणी त्यांच्या दालनात दाखल झालाय.

मग त्यांनी विचारलं, ‘‘इथं काय करू शकशील?’’

त्यांना म्हणालो, ‘‘अंक विक्रीपासून ते जाहिराती मिळवण्यापर्यंत आणि बातमी लिहिण्यापासून ते अग्रलेख लिहिण्यापर्यंत तुम्ही जे सांगाल ते...’’

त्यांनी माझ्या हातातली लेखांची फाईल घेतली. त्यावर नजर टाकत म्हणाले, ‘‘हा घनश्याम पाटील तूच कशावरून? हे लेखन प्रौढ माणसाचे वाटतेय...’’

त्यांना म्हणालो, ‘‘मी खूप सामान्य आहे... पण आज इथे संत ज्ञानेश्वर आले तरी तुम्ही म्हणाल, तू तर खूप लहान दिसतोस. हे तुझे उमेदवारीचे वय नाही. शिक्षण घे, पदवी घे... शिवाय हे तूच लिहिलंय हे सिद्ध कर...’’

मग ते हसायला लागले. त्यांच्यासमोरचा पॅड त्यांनी माझ्यासमोर ढकलला आणि म्हणाले, ‘‘तुला सद्य स्थितीतील ज्या विषयावर लिहावे वाटते ते लिही.’’

त्यांना म्हणालो, ‘‘तुम्ही विषय सांगा. लिहिण्याचा प्रयत्न नक्की करीन!’’

त्यांनी सांगितले, ‘‘आण्विक अस्त्रांविषयी लिही.’’

मी कागद घेतला आणि लिहित सुटलो.

‘देशाला आण्विक अस्त्रांची गरज...’ 
त्यात अटलजींविषयी, त्यांच्या धोरणाविषयी आणि आण्विक अस्त्रांच्या आवश्यकतेविषयी जे वाटेल ते खरडले. त्यांनी त्यावर नजर टाकली. हातातल्या लाल पेनने दोन-चार ठिकाणी व्याकरणाच्या दुरूस्त्या केल्या आणि सांगितले, ‘‘तू लाग कामाला.’’

त्या दिवशी जग जिंकल्याचा आनंद झाला. 
माझी दै. ‘संध्या’मधली बातमीदारी सुरू झाली.

नंतर मला कळले, मी ज्यांच्याशी बोलत होतो ते दै. ‘संध्या’चे संस्थापक, मराठी वृत्तपत्रसृष्टीचे भीष्माचार्य वसंतराव काणे होते. त्यांना सर्वजण ‘तात्या’ म्हणायचे. काही दिवसातच मी त्यांच्या खास मर्जीतला पत्रकार झालो. त्यांनी मला आश्चर्यकारक जबाबदार्‍या दिल्या.

‘संध्या’ला लागल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच मला अग्रलेख लिहायची संधी मिळाली. पान एकसाठीच्या बातम्या निवडू लागलो. विविध विषयांवरील पुरवण्यांचे नियोजन करून त्या साकारू लागलो. महानगपालिकेचे वार्तांकनही त्यांनी माझ्यावर सोपवले. माझे आयुष्य झपाट्याने बदलले. लेखनस्वातंत्र्य आणि योग्य मार्गदर्शन यामुळे माझा वारू सुसाट सुटला. 

त्यांचं सांगणं असायचं, ‘‘बातम्यांची शीर्षकं मसालेदार असावीत. त्यात रंजकता असावी. हे करताना वस्तुनिष्ठपणे सत्य मांडले पाहिले. वाचकांची विश्वासार्हता कोणत्याही परिस्थितीत गमावता कामा नये.’’

मग मी अनेकांना ठोकत रहायचो. नंतर ते हळूवारपणे संबंधितांना त्याची चूक लक्षात आणून द्यायचे.

महादेव बाबर नावाचे एक स्थानिक नेते शिवसेनेचे उपमहापौर होते. त्यांचा कोंढवा हा मतदारसंघ बर्‍यापैकी मुस्लिमबहुल. त्यामुळं त्यांची आणि पक्षाची धोरणंही अनेकदा विसंगत असायची. त्यांच्यावर मी एक लेख लिहून शिवसैनिकांनाच वाटणारी असुरक्षितता, त्यांची नाराजी व्यक्त केली. त्याचे शीर्षक होते, ‘शिवसेनेचे उपमहापौर महादेव आहेत की बाबर?’ तो विषय खुपच चर्चेला आला. बाबर आम्हाला भेटायला ‘संध्या’च्या कार्यालयात आले. ‘एवढासा पोर’ पाहून त्यांचा राग निवळला. त्यांनीच मोठ्या कौतुकानं चहा पाजला.

आणखी एका महापौरांनी त्यावेळी त्यांच्या गाडीच्या चालकाच्या खानाखाली वाजवली. 'महापौरांची कर्मचार्‍यांना मारहाण' म्हणून माध्यमांनी त्यांच्यावर टीकेचे प्रहार केले होते. त्यावेळी मी एक विनोदी लेख लिहिला होता. त्याची सुरूवात दोन कर्मचार्‍यांच्या संवादातून होती.
पहिला कर्मचारी मार बसल्यामुळं रडत असतो. दुसरा त्याला समजावणीच्या सुरात म्हणतो, ‘‘जाऊ दे यार. ही मोठी लोकं. आपण परिस्थितीनं गरीब. सहन केलं पाहिजे. आपल्या पोटाचा प्रश्न आहे. त्यांचं आपण काही वाकडं करू शकत नाही.’’

त्यावर पहिला उसळून म्हणतो, ‘‘काय म्हणून सहन करायचे? एक टेंपररी माणूस एका परमनंट माणसाला मारतो म्हणजे काय?’’

त्यावेळी हा लेख चांगलाच चर्चेत आला होता.

अशीच गंमत ज्येष्ठ नेते मोहन धारिया यांच्याविषयी केली होती. 
मोहन धारिया प्रसिद्धीबाबत फार जागरूक होते. कितीही छोटा कार्यक्रम असला तरी ती बातमी फोटोसह यावी यासाठी त्यांचा आग्रह असायचा. एकेदिवशी मी त्यांच्यावर लिहिले,

‘पत्रकार या नात्यानं एखाद्या बड्या नेत्याची मुलाखत घ्यावी असा विचार मनात आला आणि मी मोहन धारियांचा बंगला गाठला. बंगल्याचे फाटक ढकलूत आत गेलो. घरात प्रवेश केला आणि समोरचे दृश्य पाहून अचंबितच झालो. आदरणीय मोहन धारिया एका स्टुलावर उभे होते. त्यांच्या हातात मोठा दोर होता. ते गळफास लावून घेण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांचे स्वीय सहाय्यक श्रीराम गोमरकर त्यांना परोपरीनं समजावून सांगत होते. ‘अण्णा, तुम्हाला कसला त्रास होतोय का? कोणी काही बोलले का? नैराश्य आलंय का? साने गुरूजींप्रमाणं समाजातील अरिष्ट बघवत नाही का? तुम्ही असा अविचार का करताय? आम्हाला तुमची गरज आहे. असं आम्हाला पोरकं करण्याचा अधिकार तुम्हाला नाही...’

तेवढ्यात मोहन धारियांनी गोमरकरांना आमच्या डोळ्यादेखत बाजूला ढकललं आणि ओरडले, ‘‘मला मरू दे श्री... अरे आज पुण्यातल्या एकाही वृत्तपत्रात माझ्यावर चार ओळीही छापून आल्या नाहीत तर जगून करू काय?’’

त्यावर खूप चर्चा झाली. अण्णांनी ‘संध्या’च्या ऑफिसमध्ये फोन करून मला झापझाप झापडलं. पुढे भेटायलाही बोलावलं. मी गेलो. त्यांच्यासमोर बसून ओळख दिली आणि सांगितलं, ‘‘छोट्या छोट्या बातम्यांसाठी तुमच्या कार्यालयाकडून चार चार फोन येतात त्यामुळं केली थोडीशी गंमत. मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे. खोड्या लहानांनी नाही तर तुमच्यासारख्या मोठ्यांनी काढाव्यात काय?’’

ते हसू लागले. त्यांनी संध्याच्या संपादकांना फोन करून सांगितलं, ‘‘आता तुमचा पेपर जोरात पुढे येणार. तुमच्या खपाची चिंता मिटली.’’

पुढं धारियांनी माझ्यावर विलक्षण प्रेम केलं.

अशा अनेक छोट्या मोठ्या घटनांतून, लेखनातून घडत होतो. काहीवेळा अडखळत होतो. मात्र लहान मुलाचं रांगणं पाहूनही मोठ्यांना कौतुकच वाटावं तशा माझ्या चुका झाकल्या जात होत्या. एक छोटासा मुलगा कुणाचीही भीड न बाळगता, मुलाहिजा न राखता बिनधास्त लिहितोय याचंच अनेकांना कौतुक वाटायचं.

असं सगळं सुरू असतानाच ‘संध्या’चं व्यवस्थापन बदललं. नव्या व्यवस्थापनाशी जुळवून घेणं मला कठीण गेलं आणि पडलो बाहेर. आता पुढं काय हा विचार त्याक्षणी तरी आला नव्हता.

‘संध्या’मध्ये भावनिकदृष्ट्या खूप गुंतलो होतो. त्यामुळं चांगलाच त्रास झाला. एखादा जवळचा नातेवाईक जावा, त्याप्रमाणं रडून घेतलं. आठ-दहा दिवस बेचैनित गेले. मग ठरवलं, आता नोकरी करायची नाही. जे काही करायचे ते स्वतः करायचे. नोकरी सोडल्याचे दुःख होणार नाही. स्वतःचा प्रयत्न फसला तर वाईट वाटणार नाही कारण तो आपला नाकर्तेपणा असेल. त्यात यश-किंवा अपयश जे काही येईल ते स्वतःचे असेल.

दरम्यान, पुण्याच्या पत्रकारिता वर्तुळात चांगली ओळख निर्माण केली होती. त्यामुळं मी ‘संध्या’तून बाहेर पडलोय हे कळताच अनेकांच्या ‘ऑफर’ आल्या. सुरूवातीला ज्यांनी झिडकारले होते तेही आग्रह करत होते. मात्र माझा निर्धार पक्का होता.

अलका टॉकिज चौकात त्यावेळी ‘दरबार’ नावाचं हॉटेल होतं. तो आमच्या सर्वांचाच अड्डा! मी, माझ्या ज्येष्ठ सहकारी शुभांगी गिरमे, महेश कोरडे, महेश मते आम्ही सर्वजण तिथं बसलो होतो. कोरडे यांनीही माझ्या आधी काही दिवस ‘संध्या’ सोडला होता. काहीकाळ आम्ही शुक्रवार पेठेतल्या एका खोलीत ‘कॉट बेसीस’वर एकत्र राहत होतो. माझी फरफट होऊ नये असे त्यांना वाटत होते. त्यामुळं मी ‘संध्या’ सोडू नये, पुन्हा तिथंच जावं यासाठी ते आग्रह करत होते.

त्यांना निश्चयानं सांगितलं, ‘‘आता जे काही करायचं, ते स्वतंत्रपणे करायचं. मी स्वतःच दैनिक सुरू करणार. तुम्ही सगळ्यांनी मला साथ द्या! मी तुमचं कुणाचंही नुकसान होऊ देणार नाही...’’

माझं वय आणि परिस्थिती पाहता सर्वांनाच हे ‘अति’ वाटत होतं. त्यातला फोलपणा दिसत होता. शेवटी कोरडेंनी विचारलं, ‘‘त्यासाठी मोठं भांडवल लागतं. तुझ्याजवळ किती पैसे आहेत?’’

खिशात हात घातला आणि एकशे अडतीस रूपये मी टेबलवर ठेवले. सगळेजण हसू लागले.

कोरडेंना म्हणालो, ‘‘आपल्याला दैनिक सुरू करायला किती भांडवल लागेल? तुम्ही जेवढा आकडा सांगाल त्यापेक्षा एक लक्ष रूपये मी जास्त गोळा करतो. ते आल्यावर तरी तुम्ही साथ द्याल का?’’

शुभांगी गिरमे यांनी सांगितलं, ‘‘मी इथंही पैशासाठी काम करत नाही. माझे चार तास मजेत जातात. तुझ्या ठिकाणी माझा भाऊ असता तर मी नक्कीच त्याच्या पाठिशी राहिले असते. तू कर धाडस. पुढे जे काही हाईल ते होईल.’’

झालं! ठरलं! मला एक भक्कम सहकारी मिळाला. आता माघार नाही! 

नेमकी दिवाळी तोंडावर आलेली. जर दिवाळी अंकापासून सुरूवात केली तर चांगल्या जाहिराती मिळण्याची शक्यता होती. आम्ही एखाद्या अर्थपूर्ण नावाचा विचार सुरू केला. त्याची तयारीही चालवली. मात्र आम्हाला कळलं की ही किमान दीड-दोन महिन्यांची प्रक्रिया आहे. तितका वेळ तर हातात नव्हता. काय करावे काहीच सुचत नव्हते...

आमची तगमग पाहून महेश कोरडेंनी एक पर्याय सुचवला. आमचे आणखी एक रूममेट म्हणजे शिवाजी शिंदे. ते एका वृत्तपत्रात उपसंपादक म्हणून काम करायचे. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते. शिंदे आणि कोरडे दोघे मिळून फलटणहून ‘चपराक’ नावाचा दिवाळी अंक काढत होते. तो चालवणे त्यांना शक्य नव्हते. तो मी विकत घ्यावा, असा पर्याय त्यांनी दिला. 

‘चपराक’ हे नाव थोडे वेगळे होते. माझ्या लेखनवृत्तीशी मिळतेजुळतेही होते. 

आम्ही व्यवहार पूर्ण केला. शिवाजी शिंदे यांनी एका शंभर रूपयांच्या स्टॅम्प पेरवर लिहून दिले की, ‘मी पूर्ण शुद्धीत आणि स्वमर्जीने लिहून देतोय की, यापुढे चपराकचे मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक या नात्याने सर्व अधिकार श्री. घनश्याम पाटील यांच्याकडे असतील. माझा त्यावर कसलाही अधिकार नाही. चपराकचे संपादन, वितरण, जाहिरात अन्य मालकी हे सर्व घनश्याम पाटील यांच्याकडेच असेल.’ त्यावर कोरडे, ननावरे अशा आमच्या रूममेटसनी ‘साक्षीदार’ म्हणून सह्या केल्या.

(आमच्या मूर्खपणाचा तो पुरावा अजूनही मी जपून ठेवलाय.)

पुढे मग मी खूप पळालो. शुभांगी गिरमे यांची त्यांच्या वेळेनुसार साथ होतीच. मुख्य म्हणजे भावनिक आधार होता.

पहिल्या अंकासाठी मी ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांची मुलाखत घेतली. सदानंद भणगे यांच्यापासून अनेक दिग्गज लेखकांचे साहित्य मागवले. सर्वांनी उत्तम प्रतिसाद दिला. जाहिरातीही दणकून मिळाल्या.

ठरल्याप्रमाणे निळूभाऊंच्या हस्ते प्रकाशन झाले. ते सहा तास ‘चपराक’च्या कार्यालयात येणार्‍या जाणार्‍यांशी गप्पा मारत बसले. 

वृत्तपत्रांनी दिवाळी अंकाची जोरदार दखल घेतली.

सुरूवात तर धडाक्यात झाली. त्यावेळी हे फक्त ‘वार्षिका’चे रजिस्ट्रेशन होते. त्यामुळे त्याचे मासिकात रूपांतर करण्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात गेलो. त्यांना अंक दिला. शिवाजी शिंदे यांनी लिहून दिलेला स्टॅॅम्प पेपर दाखवला.

ते पाहून ते हसू लागले. त्यांनी सांगितले, असे लिहून देऊन मालकी मिळत नसते. ही प्रक्रिया दिल्लीहून होते. वृत्तपत्रांचा विभाग केंद्र सरकारशी संबधित येतो.

मग त्यांनी आमचे ‘टायटल’ बघितले. खरा धक्का तर आता आम्हाला बसला. हे टायटल अनियमिततेमुळे 1997 लाच रद्द झाले होते.

म्हणजे ही पूर्णपणे फसवणूक होती. रोज एका ताटात जेवत असताना त्यांनी असे का केले? म्हणून मी महेश कोरडेंना खूप बोललो! पण यात कुणाचीच चूक नव्हती. शिंदे-कोरडे यांनाही याबाबतची वस्तुस्थिती माहीत नव्हती. जे झाले ते झाले म्हणून आम्ही नव्यानं सुरूवात करायची ठरवली. 

हा धक्का कसाबसा पचवल्यानंतर दुसरे नाव घेऊन पुन्हा सुरूवात करायची असा प्रस्ताव पुढे आला. मात्र ‘चपराक’शी पुन्हा भावनिक नाते निर्माण झाले होते. एकदा मूल दत्तक घेतल्यावर त्याचीही नाळ तोडता येत नाही. 

मग आम्ही ‘चपराक’ या नावाचाच आग्रह धरला. त्यासाठी थेट दिल्लीला गेलो. अनेकांची मदत घेतली. हे नाव आधीच रद्द झालेले असल्याने त्यासाठी फार काही अडचण आली नाही. ‘संस्थापक, संपादक’ या नात्याने ‘चपराक’ हे नाव आम्हाला मिळाले. त्याचा आनंद आम्ही धडाक्यात साजरा केला.

त्यानंतर सर्व क्षेत्रातली असंख्य माणसं जोडत गेलो. पुणे शहराचं एक वैशिष्ट्य आहे, इथं चांगल्याला चांगलं म्हणणारी लोकं आहेत. त्यांना स्पष्टपणा आवडतो. इथं टिकायचं तर सातत्यानं चुकीच्या गोष्टींवर टीका करावी लागते. ‘टीका करतो तो टिकतो’ हे या शहराचं सूत्र आहे; मात्र हे करताना सद्गुणांची पूजा बांधायचा संकल्पही केला. जे जे चांगले वाटेल त्याला शब्दशः डोक्यावर घेऊन नाचलो. जिवाला डागण्या देणार्‍या अंनत अडचणी आल्या. एकेक रूपया बैलगाडीच्या चाकासारखा वाटत होता. ज्येष्ठ पत्रकार कै. गोपाळराव बुधकर यांच्यासारख्या माणसांनी खूप जीव लावला. सत्य लिहिण्यासाठी, त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार केले. 

आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे, नीलकंठ खाडीलकर,  गोपाळराव बुधकर, वसंतराव काणे आणि मुरलीधर शिंगोटे हे माझे या क्षेत्रातले आदर्श आहेत. 

पुढे सर्व विचारधारांचा अभ्यास सुरू केला. तो आयुष्यभर पुरा होईल असे वाटत नाही. मात्र विद्यार्थी असण्याचे सुख त्यामुळे सातत्याने अनुभवता येते. ‘चांगलं ते स्वीकारायचं आणि वाईट ते अव्हेरायचं’ हा आमचा मूलमंत्र. त्याच्याशी प्रामाणिक राहत चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष या ‘चपराक’च्या आद्याक्षरांप्रमाणं आमची वाटचाल सुरू आहे.

सध्या एक अत्यंत प्रभावी साप्ताहिक, परिणूर्ण मासिक आणि वैविध्यपूर्ण विषयांवरील दर्जेदार पुस्तकं प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था अशा तीन आघाड्यावर आमचं काम चालतं. अनेक वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्या सातत्यानं ‘चपराक’चे संदर्भ देत आमच्या लेखनावर बातम्या देतात, कार्यक्रम प्रसारित करतात. ‘चपराक’चे अग्रलेख आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा घडवतात. आणखी काय हवं?

‘चपराक’ने सहा राज्यातील वाचक जोडले आहेत. लेखक तयार केले आहेत. नव्यानं लिहिणार्‍यांची फळीच त्यामुळे निर्माण झालीय. विक्रीचे उच्चांक केलेत. अनेक दिवाळी अंकांचे दिवाळं निघत असताना आम्ही पाचशेहून अधिक पानांचा दिवाळी महाविशेषांक प्रकाशित करतो.

‘मराठवाडा आणि भीती’ ही विसंगती आहे. त्यामुळं या मातीच्या मुशीतून आलेला बेडरपणाच माझी निर्भयता जपून ठेवतो. 

‘चपराक’च्या झाडाला अनेक फळं लगडली असली तरी हा बहर ओसरणार आहे आणि पुन्हा पुन्हा पालवीही फुटणार आहे याचा विश्वास आहे. तो विश्वासच मला कार्यरत ठेवतो. 

- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092
(पूर्वप्रसिद्धी - 'दिलासा' दिवाळी अंक २०१७)

39 comments:

  1. पाटीलसाहेब, आपला आजपर्यंतचा खडतर प्रवास आणि आपण आजचे आपल्या जिद्दीने,प्रचंड मेहनतीने उभारलेलं 'चपराक साम्राज्य' या सगळ्यामागील प्रखर वास्तव जाणून आपल्याबद्दलचा अभिमान दुणावला.आपली चपराक घोडदौड अजून वेगाने होत राहो ही सदिच्छा!

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद सर.

      Delete
  2. घनश्यामसर तुमचा आजपर्यंतचा प्रवास खूपच खडतर होता ,तुमची जिद्द वाखाणण्याजोगी आहे , मी चपराकचा सदस्य आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे । अभिनंदन सर

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही सर्वजण माझी शक्ती आहात. धन्यवाद.

      Delete
  3. यशवंत प्रवास आहे आपला ...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद!

      Delete
  4. यशवंत प्रवास आहे आपला ...

    ReplyDelete
  5. ग्रेट.. गर्व वाटतो.... तुमच्याकडून शिकतो....

    ReplyDelete
    Replies
    1. आपले सर्वांचे प्रेम हीच माझी ऊर्जा.

      Delete
  6. हे आपले अल्पचरिञ मोठे विलोभनिय वाटले . हे लातूरचे पाणी काही वेगळेच आहे .मुळा मुठ्याच्या पाण्याशी ते आता चांगलेच एकरुप झाले आहे . भविष्यात आपले आत्मचरिञ वाचायला अधिक आवडेल .

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद.
      पण चरित्र लिहावे असे मी काहीच केले नाही.

      Delete
    2. सर .... हे वाचक आणि जनता जनार्धन ठरवतिल .पण आपले कार्य हे इतरांसाठी मोठे प्रेरणादायक आणि मार्गदर्शक आहे .

      Delete
  7. ज्यावेळी आपले आत्मचरित्र लिहिले जाईल त्यावेळी हा प्रसंग सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. परिश्रम व खडतर मेहनतीने यश मिळते.

    ReplyDelete
  8. सर आपली यशोगाथा खडतर आहे, काबाडकष्ट करून आपण या ठिकाणी पोहोचलात, याचा आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना सार्थ अभिमान आहे.
    आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.

    आपला,
    संदीप खाडे

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद मित्रा.

      Delete
  9. सर आपली यशोगाथा खडतर आहे, काबाडकष्ट करून आपण या ठिकाणी पोहोचलात, याचा आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना सार्थ अभिमान आहे.
    आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.

    आपला,
    संदीप खाडे

    ReplyDelete
  10. सर आपली यशोगाथा खडतर आहे, काबाडकष्ट करून आपण या ठिकाणी पोहोचलात, याचा आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना सार्थ अभिमान आहे.
    आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.

    आपला,
    संदीप खाडे

    ReplyDelete
  11. सर आपली यशोगाथा खडतर आहे, काबाडकष्ट करून आपण या ठिकाणी पोहोचलात, याचा आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना सार्थ अभिमान आहे.
    आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.

    आपला,
    संदीप खाडे

    ReplyDelete
  12. दुर्दम्य आशावाद तसेच कमालीची चिकाटी या दुर्मिळ गुणांमुळेच आपला खडतर प्रवास सुसह् होऊ शकला..!पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा...।

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद भाई काका. यात आपली साथ मोलाची आहे.

      Delete
  13. घनश्याम,पूणे प्रवास तपशीलवार कळाला.जिद्द,परिश्रम, चिकाटी, सातत्य,सचोटी अशा शब्दांचे अर्थ कृतीतून सांगणारा माणूस अशी तुझी नवी ओळख रुढ होत आहे.आपला परिसराला हात लागून गेला याचा आनंद आहे.तुझ्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.
    प्रदीप नणंदकर लातूर

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक आभार सर. पहिली कौतुकाची थाप तुम्ही दिलीत.

      Delete
  14. 17 वर्षाचा मुलगा पत्रकार व्हायचे म्हणतो हेच माझ्यासाठी खूप विशेष आहे त्या वयात माझे वाचन तर शून्य होते,आपण आपल्या बालपणाविषयी व वाचनाविषयी माहिती सांगितली तर आम्ही कुठं चुकत गेलो हे कलेल,तुमच्या बाबतीत सगळंच विलक्षण आहे TV व इतर बाबीचा मोह टाळून इतक्या लहान वयातच तुम्हाला तुमचे ध्येय समजले त्यामुळे मला तुमचा हेवा वाटतो ,तुम्ही कष्ट सोसलेत आणि भाग्यवान ठरलात

    ReplyDelete
    Replies
    1. खूप खूप धन्यवाद दादा. ही तर सुरवात आहे. भविष्यात चांगले काम उभे करू.

      Delete
  15. अभिमानास्पद

    ReplyDelete
  16. अप्रतिम लेख👍

    ReplyDelete
  17. धन्यवाद मित्रा.

    ReplyDelete
  18. हा लेख तर संग्रही कायमचा जपून ठेवण्यासारऱ्खा आहे सर. चपराकचा वेलू गगनावेरी जाताना पाहणारे आम्हीही थोडेफार साक्षीदार आहोत याच्यात धन्यता वाटते. तुमच्या पुढच्या वाटचालीला खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. मनःपूर्वक धन्यवाद. यात तुमचे योगदान मोठे आहे.

      Delete
  19. घनश्याम....छान.

    ReplyDelete
  20. जितना बड़ा संघर्ष उतनी बड़ी जीत अस काहीसे वाचले होते
    घनशामजी म्हणजे अजब रसायन आहे...माणसं जोड़नारा माणूस

    ReplyDelete
  21. दादा, हे आपले सर्वांचे प्रेम!!

    ReplyDelete
  22. घनश्याम जी मानलं तुम्हाला. खूपच खडतर प्रवास आहे मी ही मराठवाड्यातील आहे. नक्कीच प्रेरणा देणारा जीवन प्रवास आहे तुमचा. धन्यवाद सर आम्ही कशातच मागे नाही हे पुन्हा एकदा सिद्ध केलंय तुम्ही.

    ReplyDelete