Pages

Sunday, March 26, 2017

आजार रेड्याला आणि इंजेक्शन पखालीला!

31 वर्षापूर्वी साहेबराव करपे या शेतकर्‍याने शेती परवडत नाही म्हणून सहकुटुंब आत्महत्या केली. आजही शेतकर्‍यांच्या परिस्थितीत काडीमात्र फरक नाही. दुष्काळ, नापिकी आणि सरकारी धोरणांची उदासीनता यामुळे शेतकरी कायम नागवला जातो. साहेबराव करपे यांच्या स्मृतीनिमित्त आणि शेतकरी बांधवांविषयी सहवेदना प्रगट करण्याच्या उद्देशाने ज्येष्ठ पत्रकार आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नासाठी सातत्याने आग्रही भूमिका घेत लढणारे, त्यासाठी व्यापक संघर्ष करणारे अंबेजोगाई येथील अमर हबीब यांनी एक दिवस ‘अन्नत्याग सत्याग्रहा’चे आवाहन केले होते. करपे यांच्या स्मृतीदिनी म्हणजेच 19 मार्च रोजी हे उपोषण मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले. महाराष्ट्रातील, भारतातील आणि भारताबाहेरीलही किसानपुत्रांनी आपापल्या जागी 19 मार्चला अन्नत्याग करून अमर हबीब यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. मी आणि आमचे ‘चपराक प्रकाशन’चे सर्व सहकारीही त्यात सहभागी झालो होतो.
असा अन्नत्याग करून काही फायदा होतो का? हा प्रश्‍न काही असंवेदनशील लोकांनी उपस्थित केला. यामुळे ढिम्म सरकारवर कसलाही परिणाम होणार नाही हेही त्यांनी सांगितले. मात्र शेतकर्‍यांविषयी सहवेदना म्हणून एक दिवस अन्नत्याग केल्याने काय फरक पडतो? आपण त्यांच्या दु:खात, वेदनेत सहभागी आहोत, इथला बळीराजा एकटा नाही हे धाडसाने सांगण्याचे काम यातून प्रभावीपणे साध्य झाले. या वर्षभरात सातत्याने अन्नत्याग करून आत्मक्लेश करून घेणार असल्याचे हबीब यांनी जाहीर केले आहे. लोकशाही व्यवस्थेत अशी आंदोलने व्हायला हवीत. इतरांना त्रास न देता वंचित आणि उपेक्षितांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणे महत्त्वाचे आणि गरजेचेही आहे.
औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील घाटशेंद्रा या गावातील शेतकरी रामेश्‍वर हरिभाऊ भुसारे यांनी शेडनेट बसवण्यासाठी मित्रांकडून दहा लाख रूपयांचे कर्ज घेतले. मात्र 11 व 14 एप्रिल 2015 रोजी आलेल्या वादळी वारे व गारपिटीने त्यांचे शेडनेट पिकासह जमिनदोस्त झाले. या नैसर्गिक संकटामुळे हादरलेल्या भुसारे यांनी औरंगाबादच्या जिल्हाधिकार्‍यांकडे नुकसान भरपाईसाठी अर्ज केला. त्यानंतर कन्नड तालुका तहसिलदारांनी गावातील इतरांच्या नुकसानीचे पंचनामे कृषीविभागाकडून केले. भुसारे यांना मात्र कसलीच नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी सातत्याने मंत्रालयात पाठपुरावा केला. मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांना त्यांनी सातत्याने दूरध्वनी केले, भेटण्याचे प्रयत्न केले; मात्र त्यांना कुणीही प्रतिसाद दिला नाही. शेवटी त्यांनी शेतीत घेतलेल्या पिकाला बाजारभाव मिळत नसल्याने, कर्ज फिटत नसल्याने आत्महत्या करण्याऐवजी गांजाची शेती करण्याची परवानगी थेट मुख्यमंत्र्यांकडे मागितली. पिकातून जे मिळणार नाही ते गांजातून मिळेल असा त्यांना विश्‍वास होता. औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडेही त्यांनी न्याय मिळावा म्हणून सातत्याने पाठपुरावा केला. कुणीही प्रतिसाद देत नसल्याने ते थेट मंत्रालयात पोहोचले.
मंत्रालयाचा सहावा मजला व्यवस्थित केल्यास शेतकर्‍यांच्या अनेक अडचणी सहजपणे सुटतील, असे आमदार बच्चु कडू सातत्याने सांगतात. भुसारे यांनीही मंत्रालयाचा सहावा मजला गाठला. तिथे त्यांना मुख्यमंत्री तर भेटलेच नाहीत पण पोलिसांकडून चांगलाच ‘प्रसाद’ मिळाला. पोलिसांनी त्यांची उचलबांगडी करताना त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लिफ्टमध्ये कोंबून बदडले आणि पोलीस ठाण्यात बंद केले. त्यांच्या बातमीचा पाठपुरावा करणार्‍या ‘सकाळ’च्या युवा पत्रकार ब्रह्मा चट्टे यांचा संपर्क क्रमांक भुसारे यांच्याकडे होता. चट्टे यांना दूरध्वनी करून त्यांनी आपबिती सांगितली. काही पत्रकार घटनास्थळी पोहोचले. त्यांना पोलिसांनी मात्र भुसारे यांच्याशी संपर्कच साधू दिला नाही. त्यांच्यावर उपचार करायचे आहेत असे सांगत त्यांना जबरदस्तीने तेथून हलवण्यात आले. उलट भुसारे यांनी लिफ्टमध्ये पोलिसांचा चावा घेतल्याचे अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. आपले तोंड, ओठ, जबडा कसा फुटला? मी इजा करून घेण्यासाठी स्वत:लाच चावून घेणे शक्य आहे का? मंत्रालयाच्या सिसिटीव्ही कॅमेर्‍यात आपण वस्तुस्थिती बघू शकाल असे भुसारे यांचे म्हणणे आहे.
त्याउलट भुसारे यांना बत्तीस लाख रूपयांचे नियमबाह्य कर्ज हवे होते. कोणतीही बँक किंवा मुख्यमंत्री असे कर्ज देऊ शकणार नाहीत. सर्व विभागातील अधिकार्‍यांना भुसारे सातत्याने त्रास देत असल्याने पोलिसांनी त्यांना येथून नेले; मात्र प्रसिद्धीसाठी म्हणून ते या गोेष्टीचा बागुलबुवा करत आहेत, असे मंत्रालयातील अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.
शेती आणि शेतकरी हे दोन्ही घटक कायम उपेक्षित राहतात. सरकार कुणाचेही असो शेतकर्‍यांची काळजी केवळ विरोधकांनाच असते असे आजवरचे चित्र आहे. विरोधक सत्तेत आले की ते शेतकरी विरोधी निर्णयच घेतात आणि एकेकाळी सत्तेत असलेले विरोधक शेतकर्‍यांना न्याय मिळावा म्हणून गळे काढतात. शेतकरी केवळ मतांच्या राजकारणाचा भाग बनलेत हे अनेकवेळा सप्रमाण दिसून आले आहे. अन्नदात्यांच्या जीवावर राजकारण करणारी ही बेईमानी जमात आपली कृषी संस्कृती लयास नेत आहे. कहर म्हणजे ‘विरोधक असताना शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्यासाठी आग्रही होतो मात्र आता सत्तेत आल्यानंतर सरकारच्या अडचणी कळतात. शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविणे आम्हाला शक्य नाही’ असे निलाजरे वक्तव्य यापूर्वीच्या एका मुख्यमंत्र्याने केलेले आपल्याला ज्ञातच आहे.
शेतकर्‍यांची कर्जमाफी व्हावी यासाठी अनेकजण प्रयत्न करत आहेत. इतिहासात महाराष्ट्रात शेतकर्‍यांना कर्जमाफी दिली होती ती केवळ युगपुरूष छत्रपती शिवाजीराजे यांनी! त्यानंतर ज्या ज्या वेळी आणि ज्यांनी ज्यांनी कर्जमाफी केली त्याचा फायदा सामान्य शेतकर्‍याला कधी झालाच नाही. उलट त्यातून भ्रष्टाचाराचे डोंगरच निर्माण झाले. कर्जमाफीच्या नावावर ही कुरणे वाढत गेली. ‘माफी ही गुन्हेगारांना दिली जाते. त्यामुळे शेतकर्‍यांना कर्जमाफी नाही तर कर्जमुक्त करू’ असा शब्दच्छल काही नेते करतात. तेव्हाचे कृषीमंत्री शरद पवार यांनी एकाच वेळी देशभरातील शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला मात्र त्याचे परिणाम आपण पाहतोच आहोत. सरकारवरील वाढता बोजा आणि भ्रष्टाचाराचा कळस यापेक्षा त्यातून वेगळे काही साध्य होताना दिसत नाही. मागील सरकारने कर्जमाफी करूनही शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबण्याऐवजी त्या वाढल्याचे चित्र आहे. म्हणूनच ‘रोग रेड्याला आणि इंजेक्शन पखालीला’ अशी काहीशी गत झालेली दिसते.
शेतकर्‍यांनी पिकवलेल्या पिकाला योग्य बाजारभाव मिळणे, त्याला खते, बि-बियाणे, शेतीसाठी लागणारी आणि आधुनिक स्वरूपात उपलब्ध असणारी साधने देणे, त्याचे आवश्यक ते प्रशिक्षण घेणे, त्याला जोडधंदा करण्यास प्रवृत्त करणे, प्रक्रिया उद्योग वाढवणे, त्यांच्या मुलांना उत्तम शिक्षण आणि प्रसंगी शिष्यवृत्ती देणे, त्यांच्यासाठी आरोग्यविषयक सोयीसुविधा नाममात्र दरात उपलब्ध करून देणे, शेतमालाची ने-आण करण्यासाठी वाहतुकीची साधने उपलब्ध करून देणे अशा मार्गाने त्यांना मदत केल्यास भुसारेच काय तर कुणालाही मंत्रालयापर्यंत यावे लागणार नाही. आपला बळीराजा चिरडला जाणार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळेही तो खचणार नाही. सरकारी माफी किंवा मुक्तीच्या कुबड्या घ्याव्या लागणार नाहीत. ‘भारत हा कृषीप्रधान देश आहे’ असे म्हणताना सरकार शेतकर्‍यांविषयी सहानुभूतीपूर्वक आणि संवेदनशीलपणे विचार करेल आणि जगाच्या पोशिंद्याच्या चेहर्‍यावरील वेदना दूर होतील असा आशावाद व्यक्त करतो.

- घनश्याम पाटील
7057292092

7 comments:

  1. पाटील सर खूपच संवेदनशील लिखाण!
    बळीराजाच्या वेदना अतिशय योग्य शब्दात मांडल्यात!

    ReplyDelete
  2. पाटील सर खूपच संवेदनशील लिखाण!
    बळीराजाच्या वेदना योग्य शब्दात मांडल्यात!!

    ReplyDelete
  3. लेख सरकारच्या आणि विरोधकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. शेवटचा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आजचीच बातमी आहे. नागपूरात संत्रीचे भरपूर उत्पादन झाल्याने बजारात भाव कोसळले. शेतकरी संकटात पडला, मात्र हीच संत्री दुसर्या राज्यात विकण्याची व्यवस्था होऊ शकणार नाही का ? सध्या गोव्यात संत्रीला खूप मागणी आहे. येथे काही दिवसापूर्वी ₹ 50 ला चार संत्री विकताना मी पहिले आहे. मग नागपूरची संत्रीला गोव्यात बाजार मिळाला तर ? वरील लेखातून मला सूचले. जबाबदार अधिकार्यांनी लक्ष घालावे. असे अनेक ठीकाणी शेतकर्यांसाठी बाजार उपलब्ध करून देण्याचा विचार करावा असे मला वाटते.

    ReplyDelete
  4. खूपच छान लेख सर । नाण्याच्या दोनही बाजूंचे अतिशय संवेदनशीलतेने केलेले अभ्यासपूर्ण विश्लेषण केलेत । विचारमंथनाला चालना देणारा प्रग्लभ लेख । 👌🏻👌🏻👍🏻🙏🙏💐

    ReplyDelete
  5. पुणे( दिन वार्ता )- आपला लेख खूपच चांगला असून तो आंम्ही दिनांक २६ च्या वेब पोर्टल मध्ये ब्लॉग या मध्ये घेत आहोत.

    धन्यवाद !
    हुमायून सय्यद
    दिनवार्ता.कॉम

    ReplyDelete
  6. आपण लेख खुपच छान लिहीलेला आहे .

    ReplyDelete
  7. आपण लेख खुपच छान लिहीलेला आहे .

    ReplyDelete