Pages

Saturday, March 25, 2017

मातृसंस्थेची ऊर्जितावस्था!

एखाद्या शहराच्या प्रगतीचे मूल्यमापन कसे करायचे?
त्यासाठी त्या शहरात किती कारखाने आहेत, लोकांना व्यवसाय-उद्योगाच्या किती संधी आहेत, तेथील वाहतूक व्यवस्था कशी आहे, आरोग्यविषयक सुविधा कितपत उपलब्ध आहेत, शिक्षणव्यवस्था कशी आहे, विद्यालयापेक्षा मद्यालयांची संख्या जास्त नाही ना?, रस्ते, वीज, पाणी याची सुविधा कशी आहे, मनोरंजनाची कोणती साधने उपलब्ध आहेत, गुन्हेगारीचे प्रमाण कितपत आहे या व अशा गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.
शहर विकासासाठी आणि त्या शहराची प्रगती ठरवण्यासाठी हे तर महत्त्वाचे आहेच! पण त्याहून महत्त्वाचे आहे त्या शहरात लेखक-कवी किती आहेत, शास्त्रज्ञ किती आहेत, चित्रकार, अन्य कलाकार किती आहेत, निस्पृहपणे समाजहित पाहणारे विचारवंत किती आहेत, सामाजिक संस्था किती आहेत, वैचारिक वैभव ठरावित अशी नियतकालिके किती आहेत आणि मुख्य म्हणजे समाजाला भान देणार्‍या साहित्यिक संस्था किती आहेत आणि त्या कशा पद्धतीने काम करतात? हेही पहावे लागते. राज्याची सांस्कृतिक राजधानी ठरणारे पुणे शहर या दृष्टीने भाग्यवान म्हटले पाहिजे. आदर्श शहराच्या दृष्टीने जे काही निकष लावायचे असतात ते सगळे या शहराला लागू पडतात. त्यात दुर्मिळात दुर्मीळ म्हणजे हे एकमेव शहर असे असावे की, या शहरात ‘चांगल्याला चांगले’ म्हटले जाते. बुद्धिमत्तेची, पराक्रमाची, कर्तबगारीची योग्य ती दखल घेणारे हे शहर आहे.
या पुणे शहरात महाराष्ट्र साहित्य परिषद नावाची साहित्यातील मातृसंस्था आहे. जवळपास 110 वर्षांची परंपरा असणार्‍या या संस्थेचा वसा आणि वारसा मोठा आहे. मधल्या काही काळात ही संस्था म्हणजे ‘काही निवृत्त प्राध्यापकांचे विश्रांतीस्थान’ झाली होती. कंड्या पिकवणे, एकमेकांची उणीदुणी काढणे आणि साहित्यबाह्य विषयांवरून वाद घालणे यामुळे या संस्थेला मरगळ आली होती. ‘साहित्यिक राजकारणाचा अड्डा’ अशी या संस्थेची प्रतिमा झाली होती. मात्र मागच्या वर्षी बार्शीकर असणार्‍या प्रा. मिलिंद जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे परिवर्तन पॅनेल विजयी झाले आणि या संस्थेचा चेहरामोहराच बदलला. मागच्या वर्षभरात विविध विधायक उपक्रमांचा जो धडाका सुरू आहे तो पाहता साहित्य परिषदेने कात टाकलीय हे सर्वांनाच मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही.
पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग हे जिल्हे परिषदेच्या कार्यक्षेत्रात येतात. तब्बल सत्तर शाखा आणि दहा हजारहून अधिक सभासद असणारी ही मराठी साहित्यातील एकमेव संस्था आहे. महाराष्ट्रभर विविध वाङमयीन कार्यक्रमांचे आयोजन, परिषदेत साहित्यिकांचे स्मृतीदिन, व्याख्यानमाला, चर्चा, परिसंवाद, कवीसंमेलन, मुलाखती, मेळावे अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. येथे पन्नास हजारहून अधिक असलेली महत्त्वपूर्ण पुस्तके ही तर सभासदांसाठी साहित्यिक मेजवानीच ठरते.
मागच्या एक एप्रिलला अस्तित्वात आलेल्या नव्या कार्यकारिणीला येत्या 31 मार्चला एक वर्ष पूर्ण होईल. त्यामुळे त्यांनी केलेल्या कामांचा थोडक्यात आढावा घेणे क्रमप्राप्त ठरते. नव्या कार्यकारी मंडळाने ऐतिहासिक आणि अमृतमहोत्सवी वाटचाल करणार्‍या माधवराव पटवर्धन सभागृहाचे नुतनीकरण केले. बाहेरून रंगकाम केल्याने इमारतीला न्याराच ‘रंग’ प्राप्त झालाय. साहित्य परिषदेचे जन्मस्थळ असलेल्या माळेकर वाड्याच्या आणि संस्थापकांच्या प्रतिमा पटवर्धन सभागृहात स्थापित केल्यात. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. म. श्री. दीक्षित यांचे नाव मसापच्या पायरीला देऊन एका साहित्यसेवकाचे योग्य ते स्मारक जपले आहे. 110 वर्षात साहित्य परिषदेला प्रथमच ई ऍक्टिव केले असून संकेतस्थळ पुनर्निर्मिती, फेसबुक पेज, व्हाट्स ऍपचे ग्रुप या माध्यमातून साहित्य सहभाग वाढवला आहे. प्रा. मिलिंद जोशी यांच्या कल्पकतेतून आणि प्रा. क्षितिज पाटुकले यांच्या निस्वार्थ सहकार्याने हे संकेतस्थळ आकाराला आले आहे. मराठी वाङ्मयाचा इतिहास खंड 1 ते 7, मराठी भाषा : साहित्य आणि संशोधन  हे ग्रंथ वाचकांसाठी ई बुक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या उपस्थितीत 40 लेखकांची बैठक घेण्यात आली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून आजवर एक लाख पत्रे पाठवण्यात आली आहेत. मराठी प्राध्यापकांचा स्नेहमेळावा, शुद्धलेखन कार्यशाळा आणि शुद्धलेखन पुस्तिकेची निर्मिती, संकेतस्थळावरून मोफत डाऊनलोड करण्याची व्यवस्था, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांचे भाषण तात्काळ संकेतस्थळावर उपलब्ध करून देणे, अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने अनुवाद कार्यशाळेचे आयोजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पाटण येथे आंबेडकरी विचाराला वाहिलेले साहित्यसंमेलन, पुणे आणि परिसरात होणारी संमेलने ग्रामीण भागात घेण्याचा निर्णय, वंचित मुलांसाठी अक्षरदिवाळी हा उपक्रम, मसाप गप्पा, कथासुगंध, एक कवी, एक कवयित्री, व्यक्तिवेध असे 25 नवे कार्यक्रम, रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्यावरील कार्यक्रम, अभ्यासक्रमांची पुनर्रचना, विविध शाळांत लेखक तुमच्या भेटीला हा उपक्रम, शाखा तेथे कार्यक्रम, मसाप शाखा आणि तेथील अन्य साहित्य संस्थांत सहयोग करार, शाखा सबलीकरण, नव्या शाखा स्थापन करणे असे कितीतरी उपक्रम परिषदेने हाती घेतले आहेत आणि तडीसही नेले आहेत.
महाराष्ट्र साहित्य परिषदेविषयी मध्यंतरी अतिशय नकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, सुनिताराजे पवार, ऍड. प्रमोद आडकर, उद्धव कानडे, दीपक करंदीकर आणि बंडा जोशी ही पुण्यातील टीम, पुण्याबाहेरील सर्व पदाधिकारी आणि अध्यक्ष रावसाहेब कसबे व कार्यकारिणीवरील सर्व मान्यवर विश्‍वस्त यांच्या धडाकेबाज निर्णयामुळे, त्यांच्या कृतीमुळे एक आश्‍वासक चित्र निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे मराठी भाषा, साहित्य यांच्या अध्ययनाच्या प्रसारासाठी विविध स्तरांवरील परीक्षांचे आयोजन केले जाते. या सर्व उपक्रमांबरोबर परिषदेने साहित्यिक साह्यनिधी उभा केला आहे. अपंग, वृद्ध, निराधार अशा साहित्यिकांना या निधीतून दरमहा मानधन देण्यात येते. अनेक प्रज्ञावंत साहित्यिकांनी आणि निष्ठावंत साहित्यसेवकांनी तन, मन आणि धन अर्पण करुन, आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन ही संस्था नावारूपाला आणली. लोकमान्य टिळक, न. चिं. केळकर, कृ. प. खाडिलकर, वा. गो. आपटे, दा. ग. पाध्ये, विविधवृत्तकार मोरमकर रेव्हरंड जोशी, धनंजयराव पटवर्धन, न. र. फाटक, वा. दा. गोखले, गं. भा. निरंतर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ग. ल. ठोकळ, के. नारायण काळे, रा. श्री. जोग, श्री. के. क्षीरसागर, स. कृ. पाध्ये, अनंतराव कुलकर्णी, रा. ज. देशमुख, रा. शं. वाळिंबे, ग. दि. माडगूळकर, कवी यशवंत, न. का. घारपुरे, वि. भि. कोलते, भालबा केळकर, ना. ग. गोरे, दि. के. बेडेकर, गं. बा. सरदार, ग. वा. बेहेरे, अ. ना. भालेराव, म. वि. फाटक, म. ना. अदवंत, कृ. ब. निकुम्ब, वा. रा. ढवळे, श्री. ना. बनहट्टी, स. गं. मालशे, श्री. ज. जोशी, शंकर पाटील, भालचंद्र फडके, वि. स. वाळिंबे, व. दि. कुलकर्णी, गो. म. कुलकर्णी, शंकरराव खरात, भीमराव कुलकर्णी या मान्यवरांनी संस्थेच्या संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले. या कर्तृत्त्वसंपन्न परंपरेत मोलाची भर घालून परिषदेची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम डॉ. गं. ना. जोगळेकर यांनी केले.
11 कोटीची लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात साहित्य विषयक काम करणार्‍या संस्थेचे सभासद मात्र जेमतेम दहा हजार असणे ही दुर्दैवी बाब आहे. किमान पाच-दहा लाख सभासद झाल्यास परिषदेला आणखी व्यापक काम करता येईल. तशी दूरदृष्टी असणारे पदाधिकारीही सुदैवाने लाभले आहेत. लेखकासह कोणताही सामान्य वाचक साहित्य परिषदेचा आजीव सभासद होऊ शकतो. त्यासाठी आजीव सभासद शूल्क केवळ एक हजार रूपये आहे. त्या एक हजारात त्या सभासदाला ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ हे परिषदेचे मुखपत्र असणारे साहित्यिक त्रैमासिक पाठवले जाते. तसेच आजीव सभासदांना मसापच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार प्राप्त होतो.
मसापविषयी अधिक जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या! तसेच मसापचे उपक्रम आणि अन्य साहित्यिक घडामोडी घरबसल्या जाणून घेण्यासाठी 8446806806 या क्रमांकावर संदेश पाठवून व्हाटस ऍपला जॉईन व्हा!

- घनश्याम पाटील
7057292092

9 comments:

  1. विस्तृत माहितीपूर्ण लेख!

    ReplyDelete
  2. घनशाम सर तुम्हांला मानले पाहिजे. तुमची साहित्यनिष्ठा आणि मसपाबद्दलची आस्था दर्शविणारा लेख आहे हा. समाजात निंदकांचेच पेव माजलेले असतांना तुमच्या सारख्या हितचिंतकांची आज किती मोठ्या प्रमाणात गरज आहे हे जाणवले आणि तुमचा अभिमान वाटला. लेखणीचा आणि ज्ञानाचा सकारात्मक दृष्टीकोनातून कसा उपयोग करावा हे तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे.

    ReplyDelete
  3. घनःशामजी छान लेख !

    ReplyDelete
  4. मसापच्या गेल्या वर्षातील कार्याचा घेतलेला आढावा अतिशय सुरेख .परिवर्तन फक्त पॅनेलच्या नावात नसून तेप्रत्यक्ष घडतय हे पाहून समाधान वाटले. गेली कित्येक वर्ष सामान्य वाचकांच्या दृष्टीने परिषद म्हणजे एक हस्तिदंती मनोरा होती . आता तीवाचकाभिमुख होत असेल स्वागतार्हच आहे .

    ReplyDelete
  5. मराठी साहित्य व भाषेच्या समृद्धी साठी नूतन कार्यकारिणीचे प्रयत्न आणि निरनिराळ्या योजनांना यश प्राप्त होईलच,आपल्यासारखा संपादक या संच्यामध्ये नाही हि खंत वाटतेच

    ReplyDelete
  6. मराठी साहित्य व भाषेच्या समृद्धी साठी नूतन कार्यकारिणीचे प्रयत्न आणि निरनिराळ्या योजनांना यश प्राप्त होईलच,आपल्यासारखा संपादक या संच्यामध्ये नाही हि खंत वाटतेच

    ReplyDelete
  7. उत्कृष्ट लेख

    ReplyDelete
  8. उत्कृष्ट लेख

    ReplyDelete