Pages

Monday, August 29, 2016

आईपणाच्या कविता!

पूर्वीच्या काळी एखादी निपुत्रिक दायी अनेक बाळंतपणं  यशस्वीरित्या पार पाडायची. तिच्याकडे जी कला असायची तो झाला तिचा अनुभव आणि ज्या बायका आई व्हायच्या ती झाली त्यांची अनुभूती!
माणसाकडे अनेक कला असतात. त्या कलांचा ते आपापल्या पद्धतीने उपयोगही करतात; मात्र अनुभूतीतून पुढे आलेले वास्तव म्हणजे साधनेचा सर्वोत्कृष्ठ आविष्कार! त्यातूनच आयुष्य समृद्ध होत जातं. सौ. चंद्रलेखाताई बेलसरे यांनी तब्बल 21 वर्षांपूर्वी मातृत्वाचा सोहळा अनुभवला. त्यावेळचे अनुभव, सोबतच येणारी अनुभूती शब्दबद्ध केली आणि या रचनांचा जन्म झाला.
असे म्हणतात, ‘जन्म से पहले और भाग्यसे जादा कभी किसीको कुछ नही मिलता!’ मात्र हे विधान या कविता वाचल्यानंतर खोटे वाटू लागते. बाळाच्या जन्मापूर्वी नऊ महिने नऊ दिवस आईचे पोट त्याला लाभते! म्हणजे ‘जन्म से’ पहले त्याला खूप काही मिळते; आणि आईने दिलेला जन्म हेच खूप मोठे भाग्य आहे. त्यामुळे संपूर्ण आयुष्य म्हणजे ‘भाग्यसे जादा’ असेच म्हणावे लागेल.
कवयित्री आपल्या पहिल्याच रचनेत लिहितात,
गर्भसंस्काराच्या वेळी
मी ऐकवल्या गर्भाला
थोर जिजाऊंच्या अन्
महाराजा शिवछत्रपतींच्या गोष्टी
कारण मला हव्या होत्या
आऊसाहेब
परत एका
शिवाजीच्या जन्मासाठी!

वाढलेल्या अराजकतेच्या काळात छत्रपती शिवरायांच्या पुनर्आगमनाची वाट पाहणारी ही माऊली खरेच धन्य होय! बाळाच्या आगमनाची चाहूल लागल्यानंतर मनातील हुरहूर, बाळाविषयी पाहिलेली स्वप्ने, कुटुंबियांची मिळणारी समर्थ साथ, रूग्णालयातील दिवस, प्रत्यक्ष बाळाचा जन्म, डॉक्टरांच्या आश्‍वासक सूचना, बाळाची घेतलेली काळजी हे सर्व काही नेमकेपणाने आणि प्रत्येक आईच्या हृदयातील हुंकार त्यांनी प्रभावीरित्या शब्दबद्ध केलेत. ‘नऊ महिन्यांचे गर्भारपण पेलताना, नऊ युगे व्यतीत झाल्यासारखी वाटली’ असे सांगणार्‍या कवयित्री आशावादाचा नवा अर्थही सृजनाच्या याच प्रक्रियेतून कळल्याचे आवर्जून नमूद करतात. ‘पेढा की बर्फी?’ या रूढीला त्यांनी कधीच मूठमाती दिली. आपल्या हाडामांसाची निर्मिती त्यांना विस्मयकारक वाटते.
बाळाच्या आत्याचे पोटावर कान ठेऊन हालचालींचा कानोसा घेणे हे किती लोभसवाणे असते याचे वर्णन त्यांनी या संग्रहात केले आहे.
एका गरीब बाईने
सात महिने डोहाळे पुरविले
आणि काय आश्‍चर्य?
तेच पदार्थ बाळही
चवीने खाऊ लागले!

अशा शब्दात त्यांनी गर्भसंस्काराचे महत्त्व विशद केले आहे. बाळ पोटात असताना आईचे खाणे-पिणे, मनात येणारे विचार, घरातील वातावरण, त्या काळात केलेले वाचन अशा सर्व गोष्टींचा परिणाम बाळावर होतो, हे अध्यात्माने आणि विज्ञानानेही सिद्ध केले आहे. निर्मिती प्रक्रियेचे हे सारे अनुभव काव्यबद्ध करताना उंचबळून आलेले आईचे वात्सल्य या संग्रहातील शब्दाशब्दांतून दिसून येते.
ऑपरेशन थिएटरमध्ये शिरताना एकटेपणाची भीती वाटू लागली. तेवढ्यात बाळाने आतून ‘ठुशी’ मारली आणि कवयित्री निर्धास्त झाल्या. जणू काही बाळ आयुष्यभर ‘मी तुझ्या सुखात, दुःखात सोबतीला आहे’ असेच सांगत असल्यासारखे त्यांना वाटते.
प्रसुतीपूर्वीच्या रात्रीही देवीला विनवणी करताना कवयित्री दैत्याच्या निःपातासाठी आणखी एका महिषासुरमर्दिनीची मागणी करतात. एकवीस वर्षापूर्वीच्या काळात मुलाऐवजी मुलगी व्हावी आणि ती लढावू, संघर्षशील, अन्याय-असत्यावर तुटून पडणारी असावी अशी अपेक्षा बाळगणारी आई हे खरे आपल्या सांस्कृतिक फलिताचे संचित आहे. परमेश्‍वराकडे ‘धनाची पेटी’ मागणार्‍या (आणि एकाच ‘बेटी’वर थांबणार्‍या) कवयित्री एकेठिकाणी मात्र लिहितात,
हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी
क्षणभर उगाचंच वाटले
येऊच नये बाळाने बाहेर
राहावं त्यानं असंच माझ्या कुशीत
माझ्याशी एकरूप होऊन!

बाळाशी एकरूप होणारी आई आणि पुढे त्याच्या कल्याणासाठीच स्वतःला झिजवणारी, त्याच्यात आपले प्रतिरूप शोधणारी, त्याला योग्य संस्कार देणारी आई हा आपल्या संस्कृतीचा पाया आहे. परमेश्‍वराने निर्मितीचे कार्य फक्त स्त्रीकडेच सोपविलेले असते. याचा अभिमान बाळगून, त्याच्या जडणघडणीसाठी कार्यरत असणार्‍या कवयित्री आपल्या ‘बेटी’ला आपणास राजमातेचे राज्ञीपद बहाल केल्याचे सांगतात.
बाळाच्या जन्मानंतर हॉस्पिटलमध्ये शुभेच्छा देणार्‍या मित्र, नातेवाईक आणि हितचिंतकांच्या शुभाशीर्वादाची दखलही त्यांनी घेतली आहे.
तू येण्यापूर्वी
जीवन अपूर्ण होते
आज परिपूर्ण मी आई
बाळा कशी होऊ रे?
तुझ्या ऋणातून उतराई!

असे सांगत बाळाने आपणास आईपणाचा सर्वोंच्च किताब दिल्याची भावना त्या अभिमानाने मिरवतात. कन्यारत्नाचे दान पदरात पडल्यानंतर बाळाच्या वडिलांचा भांबावलेला चेहराही त्यांनी मिष्किलपणे टिपलाय. बाळ कुशीत आल्यावर सहस्त्र हत्तींचे बळ अंगात आल्याचे सांगून ‘माझ्या चिमुकल्या विश्‍वातील मी जगज्जेती झाले’ असे त्यांना वाटते. बाळाच्या काळजीने त्यांचे मन विचारमग्न होते आणि ‘आईचीच दृष्ट बाळाला लागेल’ म्हणून थोडी धास्तावतेही! बाळाला कवेत घेताना त्याच्या डोळ्यात जन्मोजन्मीची ओळख असल्याचे भाव दिसतात; कारण नऊ महिने गर्भात राहिल्याने हे बंध इतके घट्ट झालेत अशी त्यांची श्रद्धा आहे.
या संग्रहात फक्त भावभावनांचे आणि शब्दांचे खेळ नाहीत. हॉस्पिटलमध्ये त्यांच्या बाळाची काळजी घेणार्‍या नर्स त्यांना मदर तेरेसांचा अवतार वाटतात. सेवा करणार्‍यांची आणि श्रमिकांची ‘डोळसपणे’ घेतलेली ही दखल सौ. चंद्रलेखाताई बेलसरे यांच्या विशाल अंतःकरणाची साक्ष पटवून देते.
बाळाचे बोबडे बोबडे बोलणे, बाळाने चवीने पहिला घास खाणे, त्याच्या येण्याने बापाच्या हृदयाचे सूर झंकारणे, बाळाचे माऊच्या गोजिरवाण्या पिलासोबत खेळणे, टी. व्ही. पाहण्यात दंग होणे अशी सर्व रूपे पहाताना, अनुभवताना त्यांच्यातील मातृत्वाच्या भावना सार्वत्रिक, वैश्‍विक आणि म्हणूनच ‘शाश्‍वत’ही वाटतात!
मराठी साहित्यात आजवर आईवर विपुल लेखन झाले आहे. आईवर कविता न करणारा कवी अभावानेच सापडेल; मात्र आपल्या कन्येच्यावेळी आईपणाची अनुभूती घेताना मांडलेल्या भावना या मराठी साहित्यात कदाचित प्रथमच आलेल्या असाव्यात! या कविता फक्त बेलसरे कुटुंबियांच्या नाहीत. आई होणार्‍या, झालेल्या प्रत्येक स्त्रीच्या मनोवृत्तीचे दर्शन या संग्रहातून घडते. चंद्रलेखाताई बेलसरे यांच्या ‘आईपणाच्या’ या कविता वाचल्यानंतर प्रत्येक संवेदनशील मनास या वैश्‍विक सत्याची निश्‍चितपणे खात्री पटेल!

पाने ६४, मूल्य ६०
चपराक प्रकाशन, पुणे (०२०-२४४६०९०९)

No comments:

Post a Comment