Pages

Sunday, August 28, 2016

मुख्यमंत्री महोदय, ढेरीबरोबर गुन्हेगारी कमी करा!

पंढरपूर हे महाराष्ट्राचं आराध्यदैवत. विठूरायाच्या या नगरीत काही महिन्यांपूर्वी एक अजब प्रकार घडला होता. पंढरपूर जवळील एका ढाब्यावर येथील पोलीस रोज रात्री ढाबा मालकाशी दमदाटी करून फुकटात जेवायचे. दारूच्या नशेत अधिकारी जेवणावर ताव मारत असतानाच तेथील पोलीस शिपाई एक महत्त्वाचा निरोप घेऊन आपल्या वरिष्ठांकडे आला. त्यावेळी त्याने बघितले की, दोन तीन माणसे एका गाढवाला घेऊन ढाब्याच्या मागच्या बाजूला जात आहेत. पंढरपुरात गाढवे हरवल्याच्या अनेक तक्रारी आल्याने त्या शिपायाने ही वार्ता वरिष्ठांना दिली ते सगळेजण ढाब्याच्या मागच्या बाजूला गेले तर तिथे त्यांना अनेक गाढवांचे सापळे आढळून आले. फुकटात जेवणारे पोलीस रोज गाढवाचे मांस खात होते. ढाबा मालकावर त्यांनी गुन्हे दाखल करून चांगलेच उट्टे काढले. अशी गाढवे खाऊन पंढरपूर पोलिसांच्या बुद्धीला कदाचित गंज चढला असावा. त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनाही या गाढवाच्या मनोवृत्तीची लागण झाली असावी. खरेतर गाढव हे त्याचे काम अत्यंत इमानेइतबारे करते. मालकाने पाठीवर टाकलेले ओझे इच्छित स्थळी ते विनातक्रार पोहचवते; मात्र पंढरपूर पोलीस सरकारी पगार घेऊन आणखी कुण्या खासगी मालकाच्या मुठीत आहेत की काय, अशी शंका घ्यावी असे वातावरण निर्माण झाले आहे.
पंढरपुरातील एका मुलीचा सातत्याने विनयभंग केला जातो, रस्त्यात गाठून अश्‍लील चाळे केले जातात, तिच्या लग्नाची पत्रिका छापून तिची बदनामीही केली जाते. त्या मुलीचे नातेवाईक तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे गेल्यानंतर त्यांना हाकलून दिले जाते. कायदा आणि न्यायव्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगण्याचे काम अशा पोलिसांकडून सुरू आहे. एकीकडे पोलिसांवरील असणारा असाह्य ताण, त्यांची जागेची असलेली कमतरता हे सर्व पाहता पोलिसांची कीव केली जाते आणि दुसरीकडे पोलीस त्यांच्या खाकीचा माज दाखवत सामान्य माणसांशी मग्रुरीने वागतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या विश्‍वासू सहकार्‍यांना बाजूला ठेवत गृहखाते स्वत:च्या हातात ठेवतात. सत्तेचे विकेंद्रीकरण न करता सर्व जबाबदार्‍या आपल्याकडेच ठेवायच्या या भिकार मानसिकतेतून मुख्यमंत्री बाहेर पडत नसल्याने राज्यातील असे काही पोलीस बोकाळले आहेत. कायद्याचे रक्षण करणारेच जर सामान्यांचे भक्षण करत असतील तर न्याय कोणाला मागणार? एकवेळ इंग्रजी राजवट परवडली पण असे जुलमी पोलीस नको असे म्हणण्याची वेळ महाराष्ट्रात आणि दुर्दैवाने त्यातही पंढरपुरसारख्या अध्यात्मनगरीत आली आहे.
काही वर्षांपूर्वी पिंपरी चिंचवड येथील एका हॉटेल मालकाने एका बारबालेसोबत विवाह केला. काही दिवस मजेत गेल्यानंतर त्या दोघात विसंवाद निर्माण झाले. त्यातून त्याने पुणे शहरात त्या बारबालेचे म्हणजे स्वत:च्याच बायकोचे फोटो असलेले पोस्टर छापून ते सर्वत्र लावले. ‘या बाईला एड्स झालेला असून तिच्याशी संबंध ठेवताना सर्वांनी विचार करावा’ अशा आशयाचा मजकूर त्या फोटोवर होता. भांडारकर रस्त्यापासून ते थेट विधी महाविद्यालय, सेनापती बापट रस्ता, गोखलेनगर या परिसरात असे पोस्टर झळकत होते. पुणे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई केली. पंढरपुरातील या घटनेत मुलीच्या मनाविरूद्ध तिचे नाव टाकून विक्रांत कासेगावकर, अमोल पंडित, आनंद कासेगावकर या आरोपींनी तिची खोटी लग्नपत्रिका छापली. मुलीसाठी स्थळे आल्यानंतर त्या पाहुण्यांना ते ही पत्रिका दाखवतात आणि तिचे लग्न आपल्यासोबत ठरल्याचे ठासून सांगतात. या अपप्रवृत्तीविरूद्ध दाद मागितल्यानंतर पोलीसही निर्ढावलेपणा दाखवतात. शेवटी एका आमदाराच्या फोनवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल केला जातो. हे सारेच लांच्छनास्पद आहे. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?’ असा सवाल एकेकाळी विचारणार्‍या देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी हा प्रकार गांभीर्याने घ्यावा. या मुलीची आणि तिच्या कुटुंबियांची मानसिकता प्रचंड उद्विग्न असून त्यांना संरक्षण देणे, तिची काळजी घेणे, तिच्यावरील अन्याय दूर करणे ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पंढरपुरातील मस्तवाल पोलीस अधिकार्‍यांचे कान मुख्यमंत्र्यांनी वेळीच उपटले नाहीत, तर त्यांच्या नाकर्तेपणाचे खापर स्वाभाविकपणे फडणवीसांच्या डोक्यावर फोडले जाईल.
दुसरी प्रचंड क्रौर्याची घटनाही सोलापूर जवळच्याच व्हनसळ या गावातील आहे. येथील सेवालालनगर परिसरातील एका तेवीस वर्षाच्या युवतीवर अत्याचार करून तिला जिवंत जाळल्याची तक्रार तिच्या अशिक्षित पालकांनी दिली आहे. या मुलीच्या अर्धवट जळालेल्या प्रेताचे लचके चक्क कुत्रे तोडत होते. अत्यंत अमानवीय, क्रौर्याची परिसीमा असलेली ही घटना घडून चार महिने उलटले. यातील संशयीत आरोपींची नावे मुलीच्या आईने पोलिसांकडे दिली. सुदर्शन बंडा गायकवाड, महावीर गायकवाड, सुहास गायकवाड तसेच बंडा विश्‍वनाथ गायकवाड आणि संगिता बंडा गायकवाड अशी या आरोपींची नावे आहेत; मात्र पोलीस तक्रारीत त्यांची नावे घ्यायला तयार नाहीत. मुलीचे आई आणि वडील अतिशय हतबल होऊन या प्रकाराने आपण लवकरच आत्महत्या करणार, असा इशारा देत आहेत; मात्र तरीही पोलिसांना त्याचे गांभीर्य नाही. संतप्त जनता सर्व मर्यादा, कायदा बाजूला ठेऊन अशा पोलिसांच्या ढुंगणाखाली हिरव्या मिरच्यांची धुरी देईल. मुर्दाड मानसिकतेच्या अधिकार्‍यांनी थोडीशी संवेदनशीलता दाखवून या प्रकरणांचा छडा लावायला हवा. एकीकडे स्त्री शक्तिचा जयघोष करणारे सरकार अशा मस्तवाल अधिकार्‍यांना का पोसते? याचा जाब लोकांना देण्याची वेळ आली आहे.
आजूबाजूला इतक्या दुर्दैवी घटना घडत असताना समाजही त्याकडे तटस्थपणे पाहतोय. अशा चालत्या बोलत्या प्रेतांचा सुळसुळाट वाढल्याने भविष्यात आपल्याला आणखी काय पहावे लागेल याचा नेम नाही. पोलीस अधिकारी, सरकारी यंत्रणा आणि समाज यांनी आतातरी जागे होणे ही काळाची गरज आहे. सोलापूर जिल्ह्यातील या हृदयद्रावक घटना बघून अजून कोणत्याही सामाजिक संस्था, स्त्रीमुक्तीसाठी लढणार्‍या संघटना, मानवी हक्क आयोगवाले, प्रसार माध्यमे यापैकी कोणीही पुढे आले नाही. प्रत्येक गोष्टीचे सोयीस्कर राजकारण आणि प्रसंगी अर्थकारण पाहणार्‍या धेंडांची संख्या कमी व्हायला हवी. माणुसकीला काळीमा फासणार्‍या आणि चांगुलपण संपुष्टात आणणार्‍या अशा घटना आपल्यासाठी चिंतनीय आहेत. महासत्तेच्या गप्पा मारणार्‍यांनी अशा घटनांचा विचार करून संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई केली जाईल याकडे लक्ष द्यावे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तुमच्या पोटाचा सुटलेला घेर प्रयत्नपूर्वक तुम्ही कमी केलाय; मात्र गृहखाते सांभाळताना तुमच्या मस्तवाल पोलिसांवर तुमचे नियंत्रण राहिले नाही हेच यातून दिसून येते. गुन्हेगारी प्रवृत्ती रोखण्यासाठी तुम्ही तातडीने काही केले नाही, तर तुम्ही अखंड महाराष्ट्राचे शेवटचे मुख्यमंत्री ठराल हे आमचे भाकीत दुर्दैवाने खरे ठरेल.
- घनश्याम पाटील
प्रकाशक, संपादक ‘चपराक’, पुणे
संपर्क : 7057292092

सोलापूर पोलिसांची खाबुगिरी
तरूणीला जाळूनही आरोपी मोकाटच

‘चपराक विशेष वृत्त’
* सागर सुरवसे : 9769179823

सोलापूर : एकीकडे राज्यात महिला छेडछाड, लैंगिक अत्याचाराच्या घटनांविरोधात मोठमोठ्या घोषणा गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देत आहेत. दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस प्रशासन मात्र चांगलंच सुस्तावलंय. अतिशय संताप आणणार्‍या घटना आणि त्याचे भांडवल करत पोलिसांची होणारी चंगळ यामुळे जिल्ह्यातील नागरिक हतबल झाला आहेत. एखादी बलात्काराची घटना घडल्यानंतर समाजातील सर्व घटक जागे होतात; मात्र डोळ्यादेखत गुन्हा घडत असताना पंढरपूर पोलीस स्टेशन आणि सोलापूर ग्रामीण पोलीस प्रशासन मात्र धृतराष्ट्राच्या भूमिकेत असल्याचं पहायला मिळतंय.
हे सर्व गार्‍हाणं मांडण्याचं कारण म्हणजे एका युवतीला आत्महत्येस प्रवृत्त करायला लावणारा एक युवक आणि येथील पोलीस यंत्रणा. जणू त्या युवतीने मरणाच्या दरीत टप्प्याटप्प्याने प्रवेश करावा अशीच ही ग्रामीण पोलीस यंत्रणा काम करतेय. इथे फक्त खाबुगिरीलाच जागा उरलीय. तुम्ही गुन्हा करा, आम्ही तुम्हाला पकडतो. तुम्ही पैसे खाऊ घाला, आम्ही तुम्हाला सोडतो, अगदी अशाच पद्धतीचा कारभार जिल्ह्यासह पंढरपुरातील शहर पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे.

अत्याचार क्रमांक 1 -
एका युवतीला विक्रांत बाळासाहेब कासेगावकर या युवकाच्या वेड्या हट्टापायी आपली नोकरी सोडावी लागली. आपल्या दैनंदिन जीवनाचा क्रमही बदलावा लागला. चार महिने आपले गावही सोडावे लागले. एवढंच नव्हे तर चक्क आत्महत्येचा प्रयत्नही तिने केला. तरीही गेंड्याच्या कातडीचे पोलीस हातावर हात धरून मख्खपणे पाहत राहिले. खाकी वर्दीविषयी अतिशय संताप आणणारी ही घटना विठूरायाच्या पंढरपुरात घडली.    
पंढरपुरातील एका युवतीने आणि तिच्या कुुटुंबियांनी 1 मे 2016 रोजी पंढरपूर पोलीस स्टेशनमध्ये विक्रांत बाळासाहेब कासेगावकर हा लग्नपत्रिका आणि भविष्य पाहणारा युवक छेडछाड आणि मानसिक छळ करीत असल्याची तक्रार पंढरपूर शहर पोलीस स्टेशनला दिली. मात्र त्यावर पोलिसांनी तातडीने कोणतीही कारवाई केली नाही. सांगोल्याचे आमदार गणपतराव देशमुख यांचा फोन गेल्यानंतर 5 मे रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावेळी पोलीस निरीक्षक म्हणून किशोर नावंदे हे तेथे कार्यरत होते. तर तपास अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले हे काम पाहत होते.
 त्यानंतर पोलिसांनी त्या आरोपी विक्रांत कासेगावकरसह त्याचे दोन साथीदार अमोल पंडीत आणि आनंद विश्‍वंभर कासेगावकर यांना ताब्यात घेतले. दरम्यान त्यांना लगेच जामीनही मंजूर झाला. या घटनेमुळे आरोपीचे मनोबल वाढले. आपण पैशाच्या जीवावर कसंही वागू शकतो, ही भावना त्याच्या मनात दृढ झाली.
कालांतराने 23 जून रोजी आरोपी विक्रांत बाळासाहेब कासेगावकरने पुन्हा एकदा त्या युवतीकडे लग्नासाठी तगादा सुरू केला. तिला पोस्टाद्वारे मेमरी कार्डमध्ये दोघांच्या नावाच्या लग्नपत्रिकेचा फोटो पाठवला. तसेच ही पत्रिका पाहुण्यांना पाठवेन असा दमही भरला. त्या युवतीला दोनवेळा जीवे मारण्याचा प्रयत्नही केला गेला. एकदा अंंगावर चारचाकी घालण्याचा प्रयत्न केला तर दुसर्‍यावेळी दुचाकीवर तोंडाला काळे मास्क लावून तिला पाडण्याचा प्रयत्न केला. ही सर्व आपबीती पीडितेने पोलिसांना सांगितली तरीही पोलीस शांत राहिले. आम्हाला काय तेवढीच कामे आहेत का? अशी उर्मट उत्तरेही पोलिसांनी युवतीच्या कुटुंबियांना दिली. पोलीस प्रशासनाच्या या सर्व अनास्थेमुळे आरोपी आणखी मोकाट सुटला. पुढे त्याची हिंमत इतकी वाढली की, त्याने तिला जीवे मारण्याची धमकी द्यायला सुरूवात केली. पुढे तिला अश्‍लील पत्रे, मेमरीकार्डमध्ये अश्‍लील व्हिडीओही पाठवले.
आरोपीची मजल इतकी वाढली की, मुलीच्या पाहुण्यांना, आमच्या दोघांचे लग्न जमले असून अमूक अमूक या दिवशी लग्नाला येण्याची लग्नपत्रिकाही पाठवली. पाहुण्यांचे फोन सुरू झाले. त्यामुळे ती युवती आणखी खचली. त्यानंतर तिने अन्नग्रहण करणे सोडले, एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला. सुदैवाने त्यातून ती बचावली.
पंढरपूर पोलीस स्टेशनमधील पोलीस काहीही कृती करत नसल्याने या घटनेनंतर भांबावलेल्या कुटुंबियांनी 4 जुलै रोजी सोलापूर पोलीस अधिक्षक कार्यालयात येऊन उपअधिक्षक मनीषा दुबुले यांच्याकडेही गार्‍हाणे गायले. त्यानंतर पोलीस निरीक्षक नावंदे यांनी तात्पुरती कारवाई करत मुख्य आरोपी वगळता त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले आणि दुसर्‍या दिवशी सोडून दिले.
या प्रकारानंतर हे कुटुंबीय पोलीस स्टेशनला जाऊन जाऊन हताश झाले; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पुढे 5 ऑगस्ट रोजी कुटुंबियांनी पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांची भेट घेतली, मात्र परिस्थिती जैसे थे. आता तिचे कुटुंबीय हतबल झालेत. त्यांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे; मात्र अद्यापही आरोपी विक्रांत बाळासाहेब कासेगावकर मोकाटच फिरत आहे. तू माझ्याशिवाय इतर कोणाशी विवाह केला तर त्याला उभा चिरून टाकेन, असा दमही त्याने युवतीला दिलाय. त्यामुळे पोलीस यंत्रणा जिवंतपणी या युवतीला व तिच्या कुटुंबाला न्याय देतील का? की या युवतीचा देखील हकनाक बळी जाणार?
गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असला तरी जे गुन्हे घडतायत त्याबाबत मात्र ते कोणतीच दक्षता घेत नाहीत. सर्रासपणे राज्यातील अनेक भागात पोलीस कसल्याही प्रकारची तक्रार नोंदवून घेत नाहीत. घेतली तरी ती फारशी तडीस नेत नाहीत. अनेकदा जे आरोपी नाहीत त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जातेय. त्यामुळे मूळ आरोपी बाजूला राहत आहेत. याकडे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री अशी दोन मंत्रीपदे मिरवणारे देवेंद्र फडणवीस तरी या युवतीला न्याय देणार की नाही?

अत्याचार क्रमांक - 2
साधारणपणे चार महिन्यापूर्वी उत्तर सोलापूर तालुक्यातील व्हनसळ या गावी एका युवतीच्या मृतदेहाचे अर्धवट जळालेले तुकडे व्हनसळ-सेवालाल नगर शिवारात मिळून आले. तो मृतदेह ज्योती खेडकर या युवतीचा होता. ही घटना पोलिसांना सांगितल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करून कुटुंबियांचे जबाब घेतले. त्या जबाबात कुटुंबियांनी संशयित आरोपी सुदर्शन बंडा गायकवाड, महावीर गायकवाड, सुहास गायकवाड तसेच बंडा विश्‍वनाथ गायकवाड आणि संगिता बंडा गायकवाड यांची नावे पोलिसांना सांगितली; मात्र निर्लज्जपणाचा कळस गाठत तत्कालीन पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍याने संशयित आरोपींची नावेच पंचनाम्यात नोंदविली नाहीत.
खेडकर कुटुंबीय हे अशिक्षित असल्याने त्यांना या सर्व प्रकाराचा गंधही आला नाही. ते वारंवार पोलिसांकडे खेटे मारत राहिले. न्याय मागत राहिले मात्र गेल्या चार महिन्यात त्यांना न्याय सोडाच पण किमान एकाही संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले नाही. सुदर्शन गायकवाड आणि ज्योती खेडकर यांच्यात प्रेमसंबंध होते; मात्र सुदर्शन लग्नाला टाळाटाळ करू लागल्याने तिने स्वतःला पेटवून घेतले. त्यातून तिच्या कुटुंबियांनी तिला जीवाचे रान करून वाचवले. ज्योतीने पेटवून घेतले हे कळताच आपल्याला जेलची हवा खावी लागेल अशी भीती निर्माण झाल्याने सुदर्शनने ज्योतीशी लग्न करतो असे आश्‍वासन देऊन प्रकरण मिटविले; मात्र कालांतराने तिला टाळू लागला. अखेरीस एकेदिवशी ज्योती अचानक गायब झाली. भरपूर ठिकाणी तिचा शोध घेऊनही तिचा पत्ता लागला नाही. दोन-तीन दिवसांनी तिचा मृतदेह खेडकर यांच्या शेतात अर्धवट जळालेला आणि तुकडे तुकडे पडलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेला साधारण चार महिने लोटले मात्र अद्यापही खेडकर कुटुंबियांना न्याय मिळेल या आशेचा किरणही दिसलेला नाही. खेडकर कुटुंबियांनी अनेकवेळा पोलीस स्टेशनचे उंबरठे झिजवले, पोलीस अधिक्षकांची भेट घेतली तरीही परिस्थिती जैसे थेच.
सोलापूर जिल्ह्यातील या दोन घटना हृदय पिळवटून टाकणार्‍या तर आहेतच शिवाय पैशासाठी चटावलेल्या या खाकी वर्दीतील धेंडांचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणणार्‍या आहेत. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री, पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधिक्षक या प्रकाराची गंभीर दखल घेऊन पीडित युवतींना न्याय देणार का? हाच खरा प्रश्‍न आहे.

साप्ताहिक ‘चपराक’, पुणे

No comments:

Post a Comment