Pages

Monday, June 27, 2016

‘पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा’

सुभाष कुदळे (लेखक)


जाणारे जातील येणार्‍यांनी यावे
या चषकामधले मद्य चमकते प्यावे
क्षणभंगुर सगळे त्यावर नंतर बोलू
ही मैफिल मित्रा सदा पाहिजे चालू...


रमेश गोविंद वैद्य यांच्या रूबाया मी कार्यालयात बसून वाचत होतो. माझे सहकारी ऐकत होते. मध्येच सुभाष कुदळे यांनी मला थांबवले. ते म्हणाले, ‘‘जाणारा गेला. माझ्या आयुष्यात फार मोठी पोकळी निर्माण झालीय. ही मैफिल फार काळ चालू राहिल असे मला वाटत नाही...’’
हृदयात चर्र झाले! आमचे सर्वांचे लाडके राजाभाऊ परदेशी आम्हाला सोडून गेले होते. त्यांची आणि कुदळे सरांची बालपणापासूनची गट्टी. दोघेही पुणे महानगरपालिकेच्या परिवहन महामंडळात कामाला. वास्तव्यही शेजारी शेजारीच. कुदळे आणि परदेशी म्हणजे ‘दो हंसो का जोडा’. कुठेही गेले तरी दोघंही एकत्रच जाणार!
आम्ही घुमानच्या संमेलनाची तयारी करत होतो. त्या दिवशी दुपारी बाराच्या दरम्यान राजाभाऊ एकटेच कार्यालयात आले. मला म्हणाले, ‘‘सुभाषच्या पुस्तकाचे डीटीपी झालेले स्क्रीप्ट द्या. तुम्ही घुमानहून येईपर्यंत मी वाचून घेतो.’’ माझ्या सहकार्‍याने त्यांना प्रिंटस् दिल्या. ते घेऊन ते कुदळेंच्या घरी गेले. दोघेजण थोडावेळ क्रिकेट पाहत होते. साडेतीनच्या दरम्यान कुदळेंच्या घरून ते बाहेर पडले आणि चार वाजता अचानक त्यांना फोन आला की, ‘राजाभाऊ गेले...’ साश्रू नयनांनी त्यांनी आम्हाला फोन केला. तीन-चार तासापूर्वी भेटून गेलेला माणूस असा अचानक जातो हे सत्य पचवणे अवघड होते. मात्र नियतीपुढे कुणाचे काय चालणार?
त्यानंतर सुभाष कुदळे सर खंगत गेले. त्यांचा एकटेपणा सहजपणे कुणालाही जाणवायचा. ‘चपराक’च्या कार्यालयात आल्यानंतर त्यांचे डोळे आपोआप पाणवायचे. आम्हीही अस्वस्थ व्हायचो आणि आज सकाळी फोन आला की, ‘‘अण्णा गेले.’’ हा आमच्यासाठी धक्काच आहे. ‘चपराक’चे एक महत्त्वाचे लेखक गेल्याने आम्ही शोकसागरात आहोत.
तेव्हा ‘चपराक’चे कार्यालय काळ्या हौदाजवळ होते. प्रकाश खानविलकर, राजाभाऊ परदेशी, सुभाष कुदळे ही पीएमटीतील मंडळी ‘चपराक’मध्ये सातत्याने लिहायची. एकदा राजाभाऊ आणि कुदळे सर आमच्याकडे आले आणि त्यांनी गंभीरपणे मला सांगितले, ‘‘मी ‘समईची वात’ आणि ‘दंगल’ या कादंबर्‍या लिहिल्या. ‘प्रितीची ओंजळ’ हा काव्यसंग्रह आहे. मात्र कुणी फारसे वाचत नाही. लेखक म्हणून माझी वाढ संपलीय का? तुम्ही संपादक आहात. न्याय करा...’’
मी त्यांची पुस्तके ठेऊन घेतली. त्याची धाटणी लक्षात आली होती. त्याच्या पुढच्या भेटीत मी त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही आता निवृत्त झाला आहात. आजोबांच्या भूमिकेत आहात. आता त्याच नात्याने बालसाहित्य लिहा. तुमची पुस्तके मी छापतो. ती वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवतो.’’
‘बालसाहित्य लिहिणे जमेल का?’ अशी शंका त्यांच्या मनात होती. त्यांना म्हणालो, ‘‘आजोबा म्हणून पुढच्या पिढीला अंतःकरणापासून जे सांगावेसे वाटते ते सांगा. बिनधास्त लिहा. पुस्तकाची आणि विक्रीची चिंता करू नकात. ती माझी जबाबदारी. तुम्ही फक्त लिहा.’’ राजाभाऊंनीही माझ्या म्हणण्याला पाठिंबा दिला. ते म्हणाले, ‘‘सुभाष तू मनावर घे. लिही. ही पुस्तके खपली नाहीत तर मी विकतो. नुकसान होणार नाही हा माझा शब्द.’’
त्यानंतर काही दिवसातच त्यांनी मला त्यांच्या लेखनाचं बाड आणून दिलं. साध्या, सोप्या, रसाळ भाषेतून त्यांनी संस्काराचे बीज पेरले होते. चिमुकल्यांच्या भावविश्‍वात आनंद पेरताना ते हरखून गेले होते. त्यांचे आम्ही ‘नवलकथा’ हे बालसाहित्याचे पुस्तक प्रकाशित केले. त्याची आवृत्ती हातोहात गेली. त्यानंतर त्यांचा उत्साह वाढला आणि त्यांनी ‘चार शिलेदार’ ही किशोर कादंबरी लिहिली. तीही आम्ही ‘चपराक’कडून प्रकाशित केली. सर्व वृत्तपत्रांनी त्यांच्या या कसदार लेखनाची दखल घेतली. दूरदर्शनने त्यांची मुलाखत घेतली आणि ती ‘सह्याद्री’ वरून प्रसारितही केली. मग मात्र ते खुलले. सातत्याने लिहू लागले. ‘या चिमण्यांनो परत फिरा रे’ हे पुस्तकही त्यांनी तितक्याच उत्साहात पूर्ण केले.
त्यांच्या पुस्तकासाठी ते माझ्या प्रस्तावना आग्रहपूर्वक घ्यायचे. ‘यांच्यामुळे मी लिहिता झालो, हे नसते तर लेखक म्हणून मी संपलो असतो’ असे प्रत्येक व्यासपीठावरून ते अभिमानाने सांगायचे. मी संकोचायचो. ‘असे सांगू नका’ असे मी त्यांना बजावल्यावर ते सांगायचे, ‘मला समाधान मिळते. सत्य लोकांसमोर आले पाहिजे. तुम्ही वयाने लहान आहात; मात्र मी पुन्हा तुमच्यामुळे उभारी आणि भरारी घेतलीय...’ मीही तिथल्या तिथे तो विषय सोडून द्यायचो.
ज्येष्ठ पत्रकार विनायक लिमये यांनी एकदा ‘चपराक’ कार्यालयात त्यांना सुचवले, ‘‘तुम्ही पीएमटीत होता. आता पीएमटीचा इतिहास लिहा. तुमचे आयुष्यच त्यात गेल्याने त्यात जिवंतपणा येईल.. राजाभाऊ तुम्हाला त्यात मदत करतीलच...’’ हे त्यांनी मनावर घेतले. मात्र त्यात थोडा बदल करून त्यांनी पीएमटीचे चालक आणि वाहक यांच्या सुखदुःखावर आधारित कादंबरी लिहायचा घाट घातला. कात्रज ते निगडी हा बसमार्ग डोळ्यासमोर ठेऊन ‘बस नंबर बेचाळीस’ ही लघुकादंबरी लिहिली. ‘सजग नागरिक मंच’चे विवेक वेलणकर यांची प्रस्तावना त्यासाठी त्यांनी प्रयत्नपूर्वक मिळवली.
महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. श्रीपाल सबनीस अशा मान्यवरांच्या उपस्थित त्यांच्या पुस्तकांची प्रकाशने ‘चपराक’च्या व्यासपीठावर झाली. त्यामुळे ते म्हणायचे, ‘‘माझ्या आयुष्याचे सार्थक झाले.’’ त्यांचे ‘बस नंबर बेचाळीस’ हे पुस्तक शेवटच्या टप्प्यात असतानाच राजाभाऊंनी आम्हा सर्वांचा कायमचा निरोप घेतला. त्यामुळे ते हादरले. ‘आता माझे काय होणार?’ असे ते सातत्याने म्हणायचे. मित्रवियोगाचे दुःख त्यांना कधीच लपवता आले नाही. त्यांची काळजी वाढली होती. पुढे हे पुस्तक प्रकाशित झाले. एका पिशवीत प्रती घेऊन ते प्रत्येक बस डेपोत फिरायचे. अधिकारी, कर्मचार्‍यांना दाखवायचे. पहिली आवृत्ती त्यांनी अवघ्या पंधरा दिवसात स्वतःच खपवली. ‘हे बघायला राजा असायला हवा होता’ असे ते कित्येकदा म्हणायचे. या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीचे काम आता सुरू आहे. मुखपृष्ठ छापून झालेय. दुसर्‍या आवृत्तीच्या निमित्ताने त्यांचे मनोगत थोडेसे बदलून आतील पाने छपाईला द्यायची होती... आणि आज ही बातमी आलीय. ‘पराधीन आहे जगती पूत्र मानवाचा’ हे असे दुर्दैवीरित्या कायम सिद्ध होते.
‘‘माझा नातू इंग्रजी माध्यमात आहे. त्याला अजिबात मराठी वाचता आणि बोलता येत नव्हते. मात्र ‘आजोबांचे पुस्तक’ म्हणून तो माझ्याकडून या कथा सतत ऐकायचा. हळूहळू तो वाचायला लागला. आता तो उत्तम मराठी बोलतो आणि मराठी वाचतो देखील. ‘चपराक’मुळे बालसाहित्य लिहू लागलो. मात्र त्यातून माझा नातू मराठी वाचतोय हा माझ्यासाठी सर्वोच्च पुरस्कार आहे’’ असे ते सातत्याने सर्वांना सांगायचे.
काही दिवसापूर्वीच त्यांचे पीएमपीएममधील सहकारी मोहन ननावरे यांचा दूरध्वनी आला. त्यांनी सांगितले, ‘‘कुदळेंना दवाखान्यात दाखल केलेय. प्रकृती स्थिर आहे. ऍन्जीओप्लास्टीची शस्त्रक्रिया व्यवस्थित पार पडलीय.’’
मागच्या आठवड्यात ‘चपराक’चे सलग चार कार्यक्रम झाले. त्या धावपळीत त्यांच्याकडे जायचे जायचे म्हणत तसेच राहून गेले. कालच त्या व्यापातून थोडा निवांत झालो. आमच्या कार्यकारी संपादिका म्हणाल्या, ‘‘उद्या आपण कुदळेंना भेटून येऊ...’’ आणि आज सकाळी सकाळीच फोन आला, ‘‘अण्णा गेले....’’
काय बोलावे? नियतीच्या मनातले कोणीच ओळखू शकत नाही. आपल्या भावनांच्या भळभळत्या जखमा कायम वाहत राहतात. अनेकवेळा रंगवलेल्या मैफली, विविध विषयांवरील चर्चा, सुखदुःखाचे प्रसंग हे सारे सारे फक्त आठवणीतच राहते.
या दुःखातून सावरायचे बळ त्यांच्या घरच्यांना मिळो आणि सुभाष कुदळे सरांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्‍वरचरणी प्रार्थना. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली!!
- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092



3 comments:

  1. प्रिय घन:श्याम जी, नेमक्या शब्दात दिवंगत सुभाष कुदळे सरांविषयी आपण आठवणी जागविल्या आहेत. यापेक्षा परिपूर्ण श्रद्धांजली दूसरी कोणती असू शकेल?

    ReplyDelete
  2. सुभाषजींच्या आठवणी अत्यंत कळकळीने जागवल्या पाटील सर! खरंच डोळे भरून आलेत!

    ReplyDelete
  3. सुभाषजींच्या आठवणी अत्यंत कळकळीने जागवल्या पाटील सर! खरंच डोळे भरून आलेत!

    ReplyDelete