Pages

Saturday, June 25, 2016

‘माणसां’ची गाथा...


‘पुस्तक हेच मस्तक’ किंवा ‘वाचाल तर वाचाल’ अशी अर्थपूर्ण वाक्यं आपण कायम ऐकत असतो. पुस्तकांचं वाचन हे तर आवश्यकच; पण त्याहूनही अत्यावश्यक असतं ते म्हणजे माणसांची मनं वाचणं. राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय विषयावरील राजकीय विश्‍लेषक आणि अभ्यासक राजू परूळेकर यांना माणसांची मनं वाचण्याचा असाच छंद जडला. त्यातूनच ई टिव्हीला
संवाद’ हा कार्यक्रम सुरू झाला आणि त्यात त्यांनी थोड्या-थोडक्या नव्हे तर तब्बल सव्वा तीन हजार मुलाखती घेतल्या. इतक्या हरहुन्नरी माणसांची व्यक्तिमत्त्वं उलगडून दाखविणं हे सोपं काम नाही. ही किमया परूळेकरांनी साध्य केली. त्यातील ‘भारतरत्न’ बनण्याची योग्यता असलेल्या माणसांच्या मुलाखतींची पुस्तकं प्रकाशित करण्याचा घाट त्यांनी घातला आहे. या मालिकेतील ते आणि मी’ हे पुस्तक ‘नवचैतन्य प्रकाशन’च्या सुप्रिया मराठे यांनी देखण्या स्वरूपात प्रकाशित केले आहे. या मुलाखतींवरील साधारण सहाशे पुस्तके प्रकाशित होतील असा परूळेकरांचा आशावाद आहे. (तो मूर्त रूपात आल्यास दर्जेदार मराठी साहित्यात मोठी भर पडेल.)
राजू परूळेकर हे नाव महाराष्ट्राच्या पत्रकारितेत आदराने घेतले जाते. या माणसाने अनेकांना बोलते केले, लिहिते केले. असंख्य वादळे झेलूनही ते कधी डगमगले नाहीत. आव्हानांना धीरोदात्तपणे सामोर्‍या जाणार्‍या परूळेकरांनी आजच्या पत्रकारांसाठी आदर्शांचे  मनोरे उभारले. परूळेकर म्हणतात,
बर्‍याचवेळा आपण प्रश्‍नांची उत्तरे शोधत राहतो; पण संपूर्ण आयुष्याचा प्रवास पूर्ण झाला तरी उत्तरे काही मिळत नाहीत. प्रश्‍नांची उत्तरे नसतातच मुळी. आपण प्रश्‍न शोधायला विसरतो.’’
 ‘मुलाखत घेणं ही एक कला आहे. ते शास्त्र, तंत्र किंवा मंत्र अजिबात नाही’ हे ठासून सांगतानाच या पुस्तकाद्वारे त्यांनी त्यांचे विधान सिद्धही केले आहे. आपल्या सभोवताली अनेक
भारतरत्न’ आणि ’महाहिरो’आहेत. ज्यांना आपण ओळखलेलंच नाही. अशांची ओळख या पुस्तकाद्वारे करून देण्याचा प्रयत्न राजू परूळेकर यांनी यशस्वीरित्या केला आहे. विजय तेंडुलकर, योद्धा शेतकरी शरद जोशी, गिरीश कर्नाड, प्रसिद्ध कथालेखिका सानिया, डॉ. अभय बंग, डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. रविंद्र कोल्हे यांच्या प्रेरणादायी मुलाखती या पुस्तकात आहेत. मुख्य म्हणजे शेवटी त्यांनी ’सेल्फ प्रोटे्रट’ही दिलं आहे. (साहित्यसूचीच्या दिवाळी अंकात आलेली राजू परूळेकर यांची ही मुलाखत म्हणजे जेवणानंतरची स्वीट डिशच!) त्यामुळं या पुस्तकाचं पान न पान वाचनीय आणि शब्द न शब्द मननीय झाला आहे. विजय तेंडुलकर यांची अत्यंत प्रगल्भ मुलाखत, त्यांचा जीवनपट उलगडून दाखवतेच; पण ’विजय तेंडुलकर : एका प्रश्‍नाचा शोध’ हा या पुस्तकातील परूळेकरांचा लेखही प्रत्येकाने वाचायलाच हवा असा आहे.
चांगलं लिहिणं आणि ते सातत्याने लिहिणं याविषयी बोलताना तेंडुलकर म्हणतात,
कुणीही लेखक हा मधून मधून चांगलं लिहितो. सातत्याने चांगलं लिहिणारा लेखक अजून मला भेटायचा आहे’ तेंडुलकरांसारखी पर्वतप्राय व्यक्तिमत्त्वं समजून घेण्याासाठी अशी पुस्तकं वाचायलाच हवीत. केवळ गरज’ म्हणून आणि प्रसंग निभावून नेण्यासाठी विविध साहित्यप्रकार ताकतीनं हाताळणारे तेंडुलकर येथे भेटतात.तेंडुलकरपूर्व’ आणि तेंडुलकरोत्तर’ अशी रेषा आखण्यास भाग पाडणारा हा महालेखक; मात्र आमच्यावर कोण प्रेम करणार?’ ही पहिली कथा त्यांनी केवळ दिवाळी अंकाची गरज म्हणून लिहिली. व्यंकटेश माडगूळकरांनी ऐनवेळी कथा लिहायला नकार दिल्यानंतर संपादक श्री. रा. बिवलकर यांनी त्यांना चक्क एका खोलीत कोंडलं आणि ‘कथा लिहून झाल्याशिवाय सुटका होणार नाही’ असं सांगितलं.
या पुस्तकात समावेश असणारी सर्वच ‘बाप’माणसं आहेत. त्यामुळे प्रत्येक मुलाखत एखाद्याचं आयुष्य घडवायला पुरेशी!
साहित्य म्हणजे विरंगुळ्याबरोबर येणारा उपदेश असा समज पक्का होत गेला. ज्या दोन-तीन लेखकांनी हा समज पुसून टाकला त्यात तेंडुलकर बिनीचे होते’ असे परूळेकर सांगतात. जगताना भूमिका घेऊन त्यासाठी लढणं आणि त्यासाठी ती भूमिका जगणं या दोन वेगळ्या व एकाचवेळी निभावण्यासाठी अत्यंत कठीण गोष्टी आहेत’ हे तेंडुलकर खूप सुक्ष्मपणे सूचित करतात, असे निरीक्षण नोंदवतानाच शिवसेना व जनसंघ प्रतिगामी होता म्हणून त्यांनी तेंडुलकरांना विरोध केला व समाजवादी व कम्युनिस्ट पुरोगामी होते म्हणून त्यांनी तेंडुलकरांना पाठिंबा दिला असं मानणं ही घोर फसवणूक होय’ असे मत परूळेकरांनी या पुस्तकात स्पष्टपणे नोंदवलं आहे. मला लहानपणापासून स्वातंत्र्याची तहान आहे’ असं सांगणार्‍या शरद जोशी यांची मुलाखत खूप काही सांगून जाते. किंबहूना ज्यांनी सामान्य शेतकर्‍याला योद्धा बनविलं आणि सामान्य शेतकरी स्त्रीला लक्ष्मी बनविलं त्या शेतकरी संघटनेच्या आत्म्यास...’ अशा शब्दात परूळेकरांनी शरद जोशी यांना हे पुस्तक कृतज्ञतापूर्वक अर्पण केलं आहे. एडिसनने दिव्याचा शोध लावून काय मिळवलं? काहीच नाही मिळवलं. त्याच्यामुळे प्रकाश सगळ्या लोकांना मिळाला असं शरद जोशी सांगतात.  इंडिया-भारत’ची कल्पना मांडणार्‍या शरद जोशी यांनी गरिबांच्या नावाने भीक मागण्याचा धंदा ते हिंदुस्थानातले मोठमोठे डिप्लोमॅटसुद्धा करत आहेत. याची शिसारी त्याहीवेळी आली होती’ असं सांगितलं आहे. स्विर्त्झलँडमधील ऐशोआरामी नोकरी सोडून चाकणमध्ये  शेती करणारे शरद जोशी म्हणतात, कोेणत्याही पुस्तकाच्या दुकानात गेलं आणि एखादं पुस्तक आवडलं तर ते घेताना पुस्तक वळवून त्याची किंमत पडताळून पाहण्याची आवश्यकता पडता कामा नये. हे पुस्तक मला आवडलं, हे मला घ्यायचं आहे, संपला विषय.’
आपल्याकडे सध्या देशाच्या लोकसंख्येइतकीच सल्लागारांची संख्या झालीय. जो तो उठतो आणि सल्ले देत सुटतो. म्हणूनच शरद जोशी म्हणतात,
कोणाही माणसाचा शेतीविषयी सल्ला घेण्याआधी त्याने निदान सहा महिने तरी शेतीवर आपलं पोट भरलं आहे का ते बघा. जो मनुष्य मंत्र्यांच्या पगारावर जगतो आणि शेतकर्‍यांविषयी गोष्टी करतो त्याला शेतीचं दु:ख समजणे शक्य नाही.’  जोशी यांच्यासारख्या अफाट ताकतीचा महानायक या मुलाखतीतून उलगडतो. माझी स्वत:ची आत्मविश्‍वासावर निष्ठा आहे की, कोणताही प्रश्‍न सुटत नसेल तर तो प्रश्‍न सोडविण्यासाठी पुस्तक वाचण्यापेक्षा त्या परिस्थितीत आपण स्वत:ला ठेवल्यास त्यामध्ये काय रहस्य आहे याचा उलगडा निश्‍चित होतो’ असा महामंत्र त्यांनी या मुलाखतीतून दिलाय. म्हणूनच ते सांगतात की, मी पुस्तकांपेक्षा शेतकर्‍यांकडून अधिक शिकत गेलो’
शेतीतून दारिद्य्र का निघतं याचं चिंतन करून, जाणीवपूर्वक शेतकरी बनून शरद जोशींनी कामाला सुरूवात केली. शेतीत त्यांना आपटी बसली; मात्र चावडीवर सर्वच शेतकरी झालेल्या नफ्याच्या बढाया मारायचे. अपयश पदरी आल्यानं न राहवून शेतकर्‍यांना विचारलं की,
तुम्ही शेती नक्की कशी करता? त्यात तुम्हाला एवढा नफा कसा झाला?’ त्यावर एका म्हातार्‍याने त्यांना बाजूला घेतले आणि म्हणाला, साहेब, हे सगळे थापा मारतात. हे जर का असं चावडीवर बोलले नाहीत तर त्यांच्या मुलींची लग्न ठरणार नाहीत म्हणून ते खोटं बोलतात. तुम्ही म्हणताय तेच खरं आहे. आपण जे कष्ट करतो, खर्च करतो त्यामानाने आपल्या हातामध्ये पैसा येत नाही.’ हे विदारक वास्तव लक्षात घेऊन त्यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली. ऊसाला तीनशे रूपये भाव मिळाल्यानंतरही एक बाई त्यांना सांगते, मालक दारू पिऊन येतात. मला फक्त मार पडतो. त्यापेक्षा ऊसाला भाव मिळाला नसता तर फार चांगलं झालं असतं. शेतकर्‍याच्या घरची बाई सुखी होईल का?’ असा अंतर्मुख करणारा सवाल तिने उपस्थित केल्याने शरद जोशी यांनी लक्ष्मीमुक्ती आंदोलन’ आणि महिला संघटन’उभं केलं. शेतामध्ये गळणार्‍या घामाच्या शंभर थेंबांपैकी साठ थेंब जर बाईचे असतील तर तिला प्रत्यक्ष काय मिळणार?, निदान रोजगार हमीमध्ये पाट्या टाकणार्‍या बाई इतका दर तरी तिला द्याल की नाही? असा खडा सवाल शरद जोशी यांनी या पुस्तकाद्वारे केला आहे.
 भामरागड येथील आदीवासींसाठी आख्खं आयुष्य समर्पित करणार्‍या पद्मश्री डॉ. प्रकाश आणि डॉ.मंदा आमटे यांची मुलाखत वाचताना अंगावर शहारे येतात. मन रोमांचित होतं.
देवमाणूस’ याच शब्दात त्यांच्या कार्याचं वर्णन करावं लागेल. कोणतीही साधने नसताना उघड्यावरच होणार्‍या शस्त्रक्रिया, प्रारंभी रूग्णांची उपचारासाठी यायची टाळाटाळ, पशू-पक्षी आणि प्राण्यांशी आमटे दांपत्याने केलेली मैत्री, सरकारी अनास्था, त्यातूनही फुलविलेलं नंदनवन हे सारेच मुळातून वाचण्यासारखे आहे. या मुलाखती घेताना राजू परूळेकर यांचं कौशल्य आणि अभ्यास पूर्णपणे पणाला लागला असावं. ज्यांच्या मुलाखती आहेत ते आणि मुलाखतकार आपल्या समोरच बसले आहेत आणि एकमेकांशी संवाद साधत आहेत असं हे पुस्तक वाचताना कायम जाणवत राहतं.
आचार्य विनोबा भावे आणि महात्मा गांधींच्या संस्कारात वाढल्यामुळे डॉक्टर झाल्यानंतर धारणीपासून चाळीस किलोमीटर चालत जाऊन बैरागड या गावातील लोकांची सेवा करण्यासाठी तिथेच जाऊन राहणार्‍या डॉ. रविंद्र कोल्हे यांची मुलाखत या पुस्तकात आहे. एक रूपया कन्सल्टन्सी फी आकारणारे डॉ. कोल्हे यांनाही प्रचंड संघर्ष करावा लागला. डॉ. रविंद्र आणि डॉ. स्मिता कोल्हे यांच्या आयुष्याचा प्रवास उत्कटतेने उलगडून दाखविल्याने हे पुस्तक प्रेरणेचा झरा बनलं आहे. गडचिरोलीतील ‘सेवाग्राम’मध्ये काम करणारे डॉ. अभय आणि डॉ.राणी बंग यांचं आयुष्यही दीपस्तंभाप्रमाणंच.
 ज्यांनी आपल्या असामान्य प्रतिभेने स्वत:च्या नावाचं युग निर्माण केलं ते सुप्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, भाषणकार, टीकाकार आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांची आणि मराठी साहित्य विश्‍वात आपल्या स्वतंत्र शैलीने स्वत:चं स्थान निर्माण करणार्‍या प्रसिद्ध कथालेखिका सानिया यांच्या जीवनप्रवासातील अनेक बारकावे परूळेकरांनी नेमकेपणे टिपले आहेत. मुळात या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेल्या सर्वच मुलाखती उत्तुंगतेचा साक्षात्कार घडविणार्‍या आहेत. त्यातून ज्ञानाची, प्रेरणेची, संघर्षाची, अचाट कर्तृत्वाची, मानवी सुख-दु:खांची बेटं परूळेकरांनी उभारलीत. अत्यंत खडतर परिस्थितीतून समाजापुढे विधायकतेचा, सकारात्मक आदर्शांचा ठेवा ठेवणार्‍या या ’माणसांच्या यशोगाथे’च्या निर्मितीबद्दल राजू परूळेकर यांचे अभिनंदन. प्रत्येकाने वाचावं, आचरणात आणावं आणि स्वत:च्या आयुष्यात परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकावं अशा ऊर्जेचा स्त्रोत म्हणजे
ते आणि मी’ हे पुस्तक आहे हे मात्र नक्की!
ते आणि मी’
लेखक - राजू परूळेकर
प्रकाशक - नवचैतन्य प्रकाशन, मुंबई (9869027399)
पाने-207, किंमत 210/-
घनश्याम पाटील 

7057292092

1 comment:

  1. जबरदस्त, उत्कृष्ट लेख!

    ReplyDelete