Pages

Wednesday, April 6, 2016

जल है तो कल है!



महात्मा गांधींच्या गुजरातेतील साबरमती आश्रमातला प्रसंग. गांधीजी सूत कताई करत होते. तेवढ्यात त्यांच्याकडे एक ग्रहस्थ आले. ते म्हणाले, ‘‘बापूजी, मी आयुष्यभर नेकीने व्यापार केला. मला चार मुले आहेत. तीही मार्गी लागलीत. आता काहीतरी समाजसेवा करावीशी वाटतेय. तुम्ही मला एखादे काम सुचवा.’’
गांधीजी म्हणाले, ‘‘माझे हातातले काम पूर्ण होईपर्यंत थांबा.’’
ते सद्गृहस्थ बाहेर बसून होते. श्रीमंती थाटात आयुष्य गेल्याने कुणाची वाट पाहणे त्यांना माहीत नव्हते. तरीही महात्मा गांधी यांच्या सूचनेनुसार ते बाहेर बसून होते. पंधरा मिनिट, वीस मिनिट, अर्धा तास, पाऊण तास असे करत करत सव्वा तास गेला. हे उद्योजक कमालीचे बेचैन झाले होते. शेवटी बापूजी आले आणि म्हणाले, ‘‘बोला काय म्हणताय?’’
गृहस्थ म्हणाले, ‘‘मला समाजसेवा करायचीय. काय करू ते सुचत नाही. तुम्ही मार्गदर्शन करा.’’
बापूजी म्हणाले, ‘‘मिस्टर जंटलमन, मी तुम्हाला बसायला सांगितले. या दरम्यान तुम्ही चलबिचल होऊन चार-पाच वेळा उठलात. माठातून ग्लासभर पाणी घेतले. अर्धे पाणी प्यालात आणि अर्धे पाणी टाकून दिले. यापुढे एक काम करा, तुम्हाला जेवढी तहान असेल तेवढेच पाणी ग्लासात घ्या. पाण्याचा अपव्यय टाळा. एवढे जरी करू शकलात तरी तुमच्या हातून खूप मोठी समाजसेवा घडेल.’’ आणि ते आश्रमात निघून गेले.
महात्मा गांधींनी त्याकाळात पाणी बचतीचा दिलेला हा संदेश आजही आम्ही ध्यानात घेत नाही. त्यामुळे सगळीकडे पाण्याचे दुर्भीक्ष्य निर्माण झाले आहे. मैलोनमैल पायपीट करूनही घोटभर पाणी मिळत नाही. तिसरे महायुद्ध केवळ आणि केवळ पाण्यासाठी होईल असे जागतिक स्तरावरील अनेक संशोधक अभ्यासपूर्वक सांगत आहेत. इतके सारे असूनही पर्यावरणाच्या संवर्धनाबाबत आपण ढिम्मच आहोत.
‘त्याने निवडणुकीत, लग्नात ‘पाण्यासारखा’ पैसा उधळला’ असे वाक्य आपण सर्रासपणे ऐकतो. म्हणजे पाणी हे ‘उधळण्यासाठी’च असते अशी आपली मानसिकता तयार झाली आहे. सध्या सर्वत्रच पाणी टंचाई जाणवत असून त्यामुळे समाजजीवन अडचणीत आले आहे. शेतीसाठी, घरातील वापरासाठी आणि पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. पुण्यापासून दूर असलेला मराठवाडा, विदर्भ तर सोडाच पण पुणे शहरातल्याच बावधनसारख्या महत्त्वाच्या उपनगरातही तब्बल बावीस ते पंचवीस दिवसात एकदा पिण्याचे पाणी येते. राजकीय महत्त्वकांक्षेपोटी बारामती लोकसभा मतदार संघाची भौगोलिक रचना विचित्र केल्याने बावधन परिसरही त्याला जोडला गेला. सुप्रिया सुळे या खासदार म्हणून या भागाचे प्रतिनिधित्व करतात. बारामतीजवळील अनेक खेड्यांचा पाणी प्रश्‍न तर गंभीर आहेच; मात्र पुण्याजवळील बावधनसारखी गावेही पाणी टंचाईला सामोरे जात आहेत.
परवा लातूरमधील एक स्नेही आमच्याकडे आले होते. त्यांनी सांगितले, त्यांच्या कुटुंबासाठी पाणी विकतच आणावे लागते. लातूरात सातशे रूपयात पाण्याचा टँकर येतो. पिण्याच्या पाण्याचे जार वेगळेच विकत आणावे लागतात. अर्ध्या बादलीत लातूरकरांना आता आंघोळ उरकावी लागते. भांडी घासण्यासाठी पाणी लागू नये म्हणून रोजच्या जेवणासाठी प्लास्टिकचे ताट, पत्रावळ्या, द्रोणांचा वापर करावा लागतो.
नांदेडमधील ज्येष्ठ पत्रकार कै. सुधाकर डोईफोडे यांनी मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्‍नाबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. सपाट रस्ते, डोंगरांचा अभाव यामुळे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात रेल्वेचे जाळे निर्माण करता येणे सहज शक्य आहे. कोकणपेक्षा मराठवाड्यात रेल्वेमार्ग तयार करणे तुलनेने खूपच सोपे आहे. दळणवळणाची अशी साधने निर्माण झाली तर व्यावसायिकदृष्ट्या मराठवाड्याचा विकास होऊ शकतो. हातात पैसा खुळखुळू लागला तर जनजीवन समृद्ध होईल. मराठवाड्यात रेल्वेने पाणी आणता येईल, असा विचार त्याकाळात डोईफोडे यांनी मांडला होता. तेव्हा अनेकांना ही कल्पनाच विनोदी वाटली. अनेक छोट्या देशात हा प्रयोग होत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले होते; मात्र तरीही हा विषय कोणी गंभीरपणे घेतला नव्हता. आता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मराठवाड्याला, प्रामुख्याने लातूरला रेल्वेने पाणी देण्याचा प्रकल्प पुढे आणला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातून लवकरच लातूरला ‘पाण्याची रेल्वे’ सुसाट सुटेल.
पृथ्वीवर आणि माणसाच्या शरीरातही पाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. तरीही पाण्यासाठी जंगजंग पछाडावे लागते. पाण्याची पातळी वाढावी यासाठी जगभर प्रयत्न सुरू आहेत. आपल्याकडे ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’सारख्या योजना राबवण्याचा प्रयत्न सरकारने केला. ‘वनराई’सारख्या संस्थांनीही अनेक अभिनव उपक्रम राबवले. सध्या महाराष्ट्र सरकार ‘जलयुक्त शिवार’सारख्या योजना राबवत आहे. त्यात त्यांना यशही येत आहे. गावोगावी जलाशये निर्माण करण्याची कल्पना छत्रपती शिवरायांनी मांडली होती. मात्र आपण ते गंभीरपणे न घेतल्याचे परिणाम सध्या भोगत आहोत. अजूनही वेळ गेलेली नाही. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड थांबवली पाहिजे. वृक्षसंवर्धन करणे आणि पर्यावरण जपणे अत्यंत गरजेचे आहे.
शरीराला जखम झाली तर त्यातून रक्त बाहेर येते; मात्र एखादी गोष्ट मनाला लागली तर डोळ्यातून पाणी येते. रक्ताचा संबंध जखमेशी आहे तर पाण्याचा संबंध भावनेशी आहे. एखाद्याच्या भावना जपणे जितके पुण्याचे काम आहे तितकेच पाण्याचे जतन करणे ही काळाची गरज आहे. ‘जल है तो कल है’ हे सत्य आपण स्वीकारायलाच हवे!
- घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
7057292092

1 comment:

  1. एकदम सही बात है !
    जल है तो कल है !

    ReplyDelete