मेघराज राजेभोसले (चित्रपट निर्माते) |
चित्रपट समाजमनावर परिणाम घडवणारा एक महत्त्वाचा घटक आहे. लोकजागृती, समाजप्रबोधन, मनोरंजन यासाठी चित्रपटासारखे अन्य प्रभावी माध्यम नाही. चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेचा विचार केला तर लेखक, पटकथाकार, अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ या सर्वांचाच मोठा वाटा असतो. अनेक खटपटी, लटपटी करून निर्माते चित्रपटावर काम सुरू करतात. त्यात त्यांना महामंडळाकडून सेन्सॉरचे प्रमाणपत्र आवश्यक असते. अर्थात असे प्रमाणपत्र देण्यासाठी ‘इम्पा’सारख्या अन्य संस्थाही आहेत; मात्र अखिल भारतीय चित्रपट महामंडळाला तुलनेने अधिक महत्त्व दिले जाते. सरकार आणि चित्रपट निर्माते यांच्यात समन्वय साधन्याचा महत्त्वाचा दुवा म्हणजे चित्रपट महामंडळ. महामंडळाच्या प्रमाणपत्रानंतरच चित्रपटाला अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होतो.
ज्या चित्रपटांना सरकारकडून अनुदान मिळते त्यातील दीड टक्के रक्कम महामंडळाला मिळते. त्यामुळे साहजिकच महामंडळाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले. पूर्वी प्रामुख्याने मराठी चित्रपटाचे चित्रीकरण कोल्हापूरात व्हायचे. तो केंद्रबिंदू पुण्याकडे सरकला. सध्या अनेक मराठी चित्रपटांचे चित्रीकरण पुणे आणि पुणे जिल्ह्याच्या परिसरातच केले जाते. असे असतानाही पुण्यातील कार्यालय बंद करण्याचा अविवेकी निर्णय महामंडळाने घेतला. वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि राजकारण यामुळे महामंडळाचे पुरते वाटोळे झाले आहे. कार्यक्रमासाठी महामंडळाच्या ठेवी मोडणे आणि त्यातून आर्थिक गैरव्यवहार करणे असेही प्रकार उघड होऊनही संबंधितांवर काहीच कारवाई केली जात नाही. उलट ‘माझ्या जवळील साडे सात लाख रूपये आयकर अधिकार्याला लाच देण्यासाठी ठेवले आहेत’ असे लाज आणणारे वक्तव्य महामंडळाचे अध्यक्ष सर्वसाधारण सभेत करतात. याबाबत जाब विचारल्यानंतर विषय अर्धवट सोडून सभेतून पळ काढतात. एखाद्या चित्रपटाला शोभावी अशीच चित्रपट महामंडळाची ही सारी कथा आहे.
परिवर्तन हा सृष्टीचा अटळ नियम असतो. त्यामुळे हे चित्र बदलणे आवश्यक आहे. स्वच्छ चारित्र्याचे, निष्कलंक, प्रामाणिक आणि काहीतरी भरीव करू पाहणार्या, या क्षेत्रात आपले योगदान पेरणार्या नेतृत्वाची महामंडळाला गरज आहे. गेली पाच वर्षे सातत्याने महामंडळातील अपप्रवृत्तीवर तुटून पडणारे निर्माते मेघराज राजेभोसले यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. चित्रपटाशी संबंधित सर्वच घटकांचा गंभीरपणे विचार करणारे, त्यांच्यासाठी अनेकानेक उपक्रम राबवणारे राजेभोसले महामंडळाला शिस्त लावण्यासाठी समर्थ आहेत. या क्षेत्रातील जुन्या नव्या कलाकारांचा, निर्मात्यांचा, तंत्रज्ञांचा समावेश करत त्यांनी ‘समर्थ पॅनेल’ची स्थापना करून निवडणुकीचे आव्हान स्वीकारले आहे. वर्षा उसगावकर यांच्यासारख्या ज्येष्ठ अभिनेत्रीपासून ते वितरक असलेल्या मधुकरअण्णा देशपांडे यांच्यापर्यंत सर्वांचा संगम घडून आला आहे. ‘चमकोगिरी’ न करता सतत निरपेक्षपणे कार्यरत असलेले संजय ठुबे यांच्यासारखे सत्शील उमेदवार या पॅनेलमध्ये आहेत. जे काम करतात पण प्रसिद्धीच्या मागे धावत नाहीत अशा उमेदवारांचा हा समूह आहे.
आजूबाजूला अनेक दुर्दैवी घटना सातत्याने घडतात. गुन्हेगारी वाढत चाललीय. प्रत्येकजण आत्मकेंद्रीत बनत चाललाय. अशावेळी व्यवस्थेच्या नावाने खडे फोडण्याऐवजी प्रत्यक्ष बदल घडवू पाहणारे कुशल कर्मवीर नेहमीच श्रेष्ठ ठरतात. मेघराज राजेभोसले यांच्यासारखा क्रियाशील निर्माता चित्रपट महामंडळात बदल घडविण्यासाठी पुढाकार घेतोय हे चित्र आश्वासक आहे. आपण त्यांचे हात बळकट करायला हवेत. आधीच्या कार्यकारिणीने ज्या चुका केल्यात त्या सुधारायच्या असतील तर नेतृत्वबदल ही काळाची गरज आहे.
कोणतेही कार्य जिद्दीने, समर्थपणे हाती घेतल्यास त्यात यश येतेच येते. मराठी चित्रपटाला सध्या चांगले दिवस येत आहेत. त्यात आणखी सुधारणा घडाव्यात यासाठी निर्माते, सरकार आणि महामंडळ यांच्यात योग्य तो समन्वय असायला हवा. राजकीय बजबजपुरी बाजूला ठेवून हे सारे घडवून आणण्याचे कसब आणि कौशल्य राजेभोसले यांच्याकडे आहे. उमेदवारांची निवड करताना त्यांनी एकही डागाळलेला आणि भ्रष्ट चेहरा आपल्या पॅनलमध्ये घेतला नाही. शिवाय मुंबई, कोल्हापूर, सातारा, पुणे अशा सर्व परिसरातील उमेदवारांना प्राधान्य देऊन त्यांनी व्यापकता दाखवली आहे. या पॅनलमध्ये तीन महिलांचा असलेला समावेश हीदेखील महत्त्वाची बाब आहे. त्यामुळेच चारूकाका सरपोतदार यांच्यासारख्या ऋषितुल्य माणसानेही मेघराज राजेभोसले यांच्या ‘समर्थ पॅनेल’ला जाहीर पाठिंबा दिला आहे. सुप्रसिद्ध लेखक, कवी आणि निर्माते रामदास फुटाणे यांनी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष असताना या संस्थेच्या कार्यालयाला जागा उपलब्ध करून दिली. पुणे आणि कोल्हापूर येथील कार्यालये त्यांच्याच कारकिर्दित झाली. इतकेच नाही तर फुटाणे उत्तम चित्रकार असून चित्रपट महामंडळाचा लोगोही त्यांनीच तयार केला आहे. रामदास फुटाणे यांच्यासारख्या दिग्गजानेही या पॅनेलला दिलेला पाठिंबा ही मोठी उपलब्धी म्हणावी लागेल.
मेघराज राजेभोसले यांचे ‘समर्थ पॅनेल’ या निवडणुकीत संपूर्ण सामर्थ्यासह उतरले आहे. ‘ध्येयं पारदर्शी, धोरणं दुरदर्शी’ हे मूलतत्व घेऊन त्यांनी या पॅनेलची रचना केली आहे. पतंग हे त्यांच्या पॅनलचे चिन्ह आहे. येत्या 24 तारखेला ही निवडणूक होणार असून ’समर्थ पॅनेल’ प्रचंड मताधिक्याने विजयी होईल आणि महामंडळाला आणखी चांगले दिवस येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ‘चपराक’ परिवारातर्फे त्यांना पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा देतो.
- घनश्याम पाटील,
संपादक ‘चपराक’
7057292092
उत्कृष्ण लेख!
ReplyDeleteसमर्थ पॅनेलला खूप खूप शुभेच्छा!!
सुंदर
ReplyDeleteमस्त सरजी..... आपल्या शब्दांचा नक्कीच प्रभाव दिसेल!
ReplyDeleteमस्त सरजी..... आपल्या शब्दांचा नक्कीच प्रभाव दिसेल!
ReplyDelete