Pages

Saturday, March 18, 2023

सतत जळणारा आणि फुलणारा लोककवी

उद्याचा कालिदास अनवानी पायाने फिरत असेल तर त्यात अब्रू त्याची नव्हे; राजा भोजाची जाते, असे सांगणारे लोककवी मनमोहन तथा गोपाळ नरहर नातू प्रतिभेचा स्फोट घडविणारे अद्भूत किमयागार होते. 7 मे 1991 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या साहित्य कारकिर्दीमुळे ते अजरामर आहेत. 
अफाट सामर्थ्य असलेल्या या कविराजांच्या आयुष्यात अनेक विलक्षण घटना घडल्या. व्यावहारिक पातळीवर कदाचित ते मागे राहिले असतील; पण कवी केशवसूत ते मर्ढेेकर या परंपरेचा मागोवा घेताना सर्वाधिक झगमगणारं उंचच उंच शिखर म्हणजे मनमोहन हे कोणीही नाकारू शकणार नाही.
मनमोहनांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले आणि त्यांचे अनोखे कारनामे जवळून न्याहाळणारे ‘तरणे बॉण्ड कवी’ रमेश गोविंद वैद्य आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विख्यात साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांच्याकडून मनमोहनांचे व्यक्तिमत्त्व समजून घेताना अनेक गोष्टी उलगडत गेल्या.
कुणी शाईने लिहिली कविता
कुणी रक्ताने लिहिली कविता
करी लव्हाळी लवचिक घेऊन
मी पाण्यावर लिहिली कविता
असे सांगणारे मनमोहन स्वच्छंदी वृत्तीचे होते.
रॉय किणीकर नावाच्या एका बलाढ्य संपादकाने मनमोहनांची पहिली कविता प्रकाशित केली आणि पुढे किणीकर-मनमोहन ही जोडी अजरामर झाली. घरात दारिद्य्राचा सागर वहात असल्याने मनमोहन त्यांच्या मित्रांना ‘मला दहा रूपये उसने देण्याएवढे तुम्ही श्रीमंत आहात काय?’ असा प्रश्न रूबाबात विचारत. त्यांच्या मागणीचा ढंग आणि स्वभावातली सच्चाई बघून त्यांना नकार देण्याची हिंमत कोणालाही होत नसे. अशा परिस्थितीत दिवस काढतानाही त्यांनी लक्ष्मीची उपासना कधी केलीच नाही.
याबाबतीतली डॉ. न. म. जोशी यांनी सांगितलेली एक आठवण फारच बोलकी आहे. लोककवी मनमोहन यांचा तो शेवटचा काळ होता. वृद्धापकाळाने त्यांना घेरले होते. अंथरूणावरून उठून बसणेही त्यांना अशक्य झाले होते. ही वार्ता तेव्हाचे तरूण नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यापर्यंत गेली. शिंदे त्यांच्या लवाजम्यासह तातडीने मनमोहनांच्या सदाशिव पेठेतील निवासस्थानी दाखल झाले. ते म्हणाले, ‘‘कविराज, माझ्या लहानपणी मी तुमच्या कविता रेडिओवरून ऐकायचो. गावागावातील यात्रा आणि जत्रात जाऊन लोकांना त्या गाऊन दाखवायचो. लोक मला पाच पैसे, दहा पैसे द्यायचे. त्यातूनच मी शिक्षण पूर्ण केले आणि प्रगती साधली. आज मला कशाचीच कमतरता नाही. मी तुम्हाला काय देऊ? तुमच्यासाठी काय करू, ते निसंकोचपणे सांगा.’’   
आजारपणामुळे मनमोहनांना बोलता येत नव्हते. त्यांनी खुणेनेच कागद आणि पेन मागवून घेतला आणि त्यावर चार ओळी लिहिल्या. त्यांचा हात थरथरत होता. त्यामुळे अक्षर व्यवस्थित लागत नव्हते. त्यांच्याच शेजारी राहणारे न. म. त्यांचे अक्षर वाचू शकतात म्हणून त्यांना बोलावले. डॉ. न. म. जोशी यांनी त्या कागदावर वाचलेला मजकूर असा होता-
मी तर नृपती खाटेवरचा
मला कुणाचं दान नको
तुम्हास जर का काही घेणे
देऊन टाकीन मी त्रिभुवने!
आयुष्याच्या संध्याकाळीही कसलीच आसक्ती नसलेला हा राजा माणूस होता, हे या उदाहरणावरून लक्षात येते. स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगणारे मनमोहन जगरहाटीची पर्वा कधीच करत नसत. निःस्पृह वृत्तीचे मनमोहन एकदा त्यांच्या घरासमोर उघडे उभे होते. त्याचवेळी एक नेता त्यांच्या घरासमोरून कार्यकर्त्यांसह जात होता. मनमोहनांची अकारण खोड काढत त्याने त्यांच्या कपड्यावरून मल्लिनाथी केली. कपडे घातल्यावर माणूस कसा रूबाबदार दिसतो यावर प्रवचन दिले. त्याला थांबवत मनमोहन म्हणाले, ‘‘हे बघ मित्रा, तू पुढारी असल्यामुळे तुला कपड्यांची झूल अंगावर वागवावीच लागेल. मी कवी असल्यामुळे आंतर्बाह्य उघडाच असतो.’’ त्या पुढार्‍याला त्यांनी तिथल्या तिथे चार ओळी ऐकवल्या. 
राजकीय पुरूषांची कीर्ती
मुळीच मजला मत्सर नाही
आज हुमायू बाबरपेक्षा
गालिब हृदये वेधित राही
आपल्या पत्नीच्या निधनानंतर वेड्यापिशा झालेल्या मनमोहनांनी  ‘वृंदावनातली तुळस जळाली, मागे उरल्या दगडविटा’ हे अजरामर शोकगीत लिहिले. मनमोहन इतके भावूक आणि हळवे होते की, त्यांच्या घरासमोर असलेला सुंदर गुलमोहोर कोसळला तर त्याची त्यांनी शोकसभा घेतली. या सभेला रणजित देसाई, बापू वाटवे यांच्यासारखे दिग्गज हजर होते. 
मनमोहनांनी अनेक कादंबर्‍या लिहिल्या. संपूर्ण शिवकाल काव्यात्मक भाषेत उभा केला.
या कलंदर कवीने कविबद्दलच लिहिलेल्या चार ओळी त्यांची ओळख पटवून देण्यास पुरेशा ठरतात.
शव हे कविचे जाळू नका हो
जन्मभरी तो जळतचि होता;
फुले तयावरी उधळू नका हो
जन्मभरी तो फुलतचि होता.
अशा या सतत जळणार्‍या आणि फुलणार्‍या महाकवीस आमची मानवंदना!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092
प्रसिद्दी - दैनिक पुण्य नगरी, रविवार, दि. 19 मार्च 23

No comments:

Post a Comment