Pages

Friday, March 24, 2023

राष्ट्रज्योत तेवत ठेवणारे बेंद्रे


असे म्हणतात की, एकेक पायरी सोडवत गेल्यास गणित सुटते; मात्र इतिहासाचे तसे नसते! इतिहासलेखन जेव्हा पूर्ण होते तेव्हाच त्याला खरे फाटे फुटतात! म्हणूनच इतिहास लेखन हे आत्यंतिक जिकिरीचे आणि कष्टाचे काम असते. त्यासाठी प्रचंड अभ्यास लागतो. तटस्थ वृत्ती लागते. ते जीवनध्येयच बनायला हवे. महाभारतकार व्यास मुनींनी म्हटलंय की, ‘इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे’ आपल्या राष्ट्राचा उज्ज्वल आणि स्फूर्तिदायी इतिहास समाजापुढे यावा यासाठी अनेकजण प्रामाणिकपणे झटत असतात. ज्यांना इतिहासलेखन क्षेत्रातील भीष्माचार्य म्हटले जाते असे बहुव्यासंगी संशोधक वा. सी. बेंद्रे हे त्यापैकीच एक!
13 फेब्रुवारी 1894 ला पेण येथे जन्मलेल्या बेंद्रे यांनी 1918 ला प्रथम भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल टाकले आणि नंतर हयातभर स्वतःला महाराष्ट्राच्या इतिहास संशोधनासाठी वाहून घेतले. त्यांनी महाराष्ट्राचा ‘17 व्या शतकाचा इतिहास’ हे संशोधनाचे क्षेत्र निवडले. एक साधन-संग्राहक, साधनसंपादक, साधनचिकित्सक, संशोधक व इतिहासकार अशा भूमिका त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. सन 1928 मध्ये शिवशाहीच्या इतिहासाचा प्रास्ताविक खंड ‘साधन चिकित्सा’ हा त्यांचा पहिला ग्रंथ प्रसिद्ध झाला. त्याद्वारे त्यांनी नवीन अभ्यासक आणि संशोधकांना बहुमोलाचे मार्गदर्शन केले. महाराष्ट्राच्या राष्ट्रीय इतिहासाची रचना करणे हेच त्यांचे जीवनध्येय होते. बेंद्रे यांचे अफाट कार्य, चिकाटी व इतिहासाविषयीचा त्यांचा अभ्यास पाहून 1938 मध्ये त्यांना खास शिष्यवृत्ती मिळाली व ते हिस्टॉरिकल रिसर्च स्कॉलर म्हणून इतिहास संशोधनासाठी युरोप व इंग्लंडला गेले. पेशवे दप्तरातील सुमारे चार कोटी विस्कळीत कागदपत्रांचे कॅटलॉगिंग व विषयवार मांडणी करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले.
त्यावेळी इब्राहिम खान या परदेशी चित्रकाराने काढलेले मुस्लिम पेहरावातील छ. शिवाजी महाराजांचे चित्र प्रचलित होते. ते योग्य नाही हे बेंद्रेंच्या लक्षात आले होते. त्यामुळे शिवरायांच्या मूळ चित्राच्या संशोधनासाठी ते पुढे सरसावले. मॅकेनझीच्या ग्रंथाचे अवलोकन करताना त्यांना व्हलेंटाईन या डच चित्रकाराने काढलेले सुरतेच्या वखारीतील तिथल्या गव्हर्नराच्या भेटीचे महाराजांचे चित्र मिळाले. ज्यावेळी ते इंग्लंडला गेले त्यावेळी त्यांनी प्रथम या चित्राची खातरी केली. हे चित्र पुढे आणण्यासाठी ‘इंडिया हाऊस’कडून परवानगी मिळवली आणि पुण्याच्या शिवाजी मंदिरात साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी ते प्रसिद्ध केले. आज आपल्या सरकारी कार्यालयात लावले जाणारे छत्रपती शिवरायांचे हेच ते चित्र! वा. सी. बेंद्रे यांची ही कामगिरी इतिहास संशोधन क्षेत्रात उत्तुंग ठरली.
त्याकाळी संभाजी महाराजांच्या जीवनावर मराठी भाषेत पुष्कळ नाटके लिहिली गेली. त्यातील बहुतेक नाटकात संभाजीराजे व्यसनाधीन, बदफैली, व्यभिचारी, दुर्वर्तनी असेच चित्र नाटककारांनी उभे केले होते. सोनाबाई केरकर या पहिल्या महिला नाटककार. 1886 साली त्यांनी संभाजीराजांचे चरित्र लिहिले होते. त्यातही राजांचे असेच वर्णन होते. इतिहास संशोधनाच्या अपुर्‍या साधनांमुळे छ. संभाजीराजांची मलिन झालेली प्रतिमा प्रथम धुवून काढण्याचे प्रचंड मेहनती काम बेंद्रे यांनी केले. त्यासाठी त्यांनी चाळीस वर्षे संशोधन केले. परदेशात जाऊन साधने मिळवली. इंग्लंडहून त्यांनी 25 खंड होतील इतकी कागदपत्रे भारतात आणली. पुढे सन 1958 साली ‘छ. संभाजीराजांचे चरित्र’ हा 650 पानांचा चिकित्सक ग्रंथ त्यांनी लिहून पूर्ण केला. त्यामुळे संभाजीराजांची युद्धनीती, त्यांची धर्मप्रवणवृत्ती, त्यांचा तेजस्वी पराक्रम लोकांना ज्ञात झाला. मराठ्यांची अस्मिता ठरणार्‍या या राजांच्या बदनामीचा कलंक पुसून काढण्याचे काम करणार्‍या या ग्रंथाच्या प्रसिद्धीसाठी तेव्हा स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सात हजार रूपयांचे अनुदान दिले होते. छत्रपती संभाजीराजांची समाधी वढू ब्रुद्रुक येथे आहे हे सर्वप्रमथ त्यांच्याच लक्षात आले. त्यासाठीचे त्यांचे संशोधन महत्त्वाचे ठरले.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेने त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचेही चरित्र लिहिले. मालोजीराजे, शहाजीराजे, शिवाजी महाराज यांची चरित्रे लिहिली. विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, शिवराज्याभिषेक प्रयोग, संत तुकाराम महाराजांचे अप्रकाशित अभंग, साठहून अधिक ग्रंथांचे लेखन, वयाच्या ऐंशीव्या वर्षी लिहिलेला ‘राजाराम चरित्रम्’ हा ग्रंथ, महाराष्ट्र इतिहास परिषदेची स्थापना अशा अफाट कार्यामुळे ते इतिहास संशोधन क्षेत्रातील भीष्माचार्य ठरतात. आपल्या सिद्धहस्त लेखणीद्वारे हे अफाट कार्य उभे करतानाच त्यांनी हुंडाविरोधी चळवळही उभी केली. ब्रदरहुड स्काऊट संघटना काढली. वयाच्या 90 व्या वर्षी म्हणजे 16 जुलै 1984 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांनी उभ्या केलेल्या अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेला त्यांची नात साधना डहाणूकर यांनी दीड लाख रूपये देणगी दिली. त्यातून दरवर्षी एका इतिहास संशोधकाला कै. वा. सी. बेंद्रे पुरस्कार दिला जातो. 
जाता जाता एक गोष्ट मात्र प्रांजळपणे सांगाविशी वाटते. प्रारंभी उल्लेख केल्याप्रमाणे इतिहास लेखन जिथे संपते तिथूनच त्याला खर्‍याअर्थी फाटे फुटतात. बेंद्रे यांनी छत्रपती संभाजीराजांचे ‘चंपा’ नावाच्या एका रजपूत मुलीशी लग्न झाल्याचे लिहिले आहे. या विवाहाचे सविस्तर वर्णनही त्यांनी केले आहे. वस्तुतः त्यावर पी. आर. गोडे या संशोधकाने शोधनिबंध लिहून ही घटना नंदुरबारच्या शंभूराजे देसाई यांच्याबाबत घडल्याचे सप्रमाण सिद्ध केले आहे. तरीही त्यांच्या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीतून हा मजकूर काढून टाकण्यात आला नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतिथी फाल्गुन वद्य तृतिया, शके 1551, (19 फेब्रुवारी, सन 1630) ही नक्की करण्याचे अभूतपूर्व कामही वा. सी. बेंद्रे यांनीच केले. या महान इतिहास संशोधकाची नव्या पिढीला माहिती व्हावी आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता जपली जावी यासाठी त्यांचे कार्य आजच्या तरुणाईपर्यंत पोहचायला हवे. त्यांना भावपूर्ण आदरांजली!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092
पूर्वप्रसिद्धी : दैनिक पुण्य नगरी, शनिवार, दि. 25 मार्च 23

Saturday, March 18, 2023

सतत जळणारा आणि फुलणारा लोककवी

उद्याचा कालिदास अनवानी पायाने फिरत असेल तर त्यात अब्रू त्याची नव्हे; राजा भोजाची जाते, असे सांगणारे लोककवी मनमोहन तथा गोपाळ नरहर नातू प्रतिभेचा स्फोट घडविणारे अद्भूत किमयागार होते. 7 मे 1991 ला त्यांनी जगाचा निरोप घेतला असला तरी त्यांच्या साहित्य कारकिर्दीमुळे ते अजरामर आहेत. 
अफाट सामर्थ्य असलेल्या या कविराजांच्या आयुष्यात अनेक विलक्षण घटना घडल्या. व्यावहारिक पातळीवर कदाचित ते मागे राहिले असतील; पण कवी केशवसूत ते मर्ढेेकर या परंपरेचा मागोवा घेताना सर्वाधिक झगमगणारं उंचच उंच शिखर म्हणजे मनमोहन हे कोणीही नाकारू शकणार नाही.
मनमोहनांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले आणि त्यांचे अनोखे कारनामे जवळून न्याहाळणारे ‘तरणे बॉण्ड कवी’ रमेश गोविंद वैद्य आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विख्यात साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांच्याकडून मनमोहनांचे व्यक्तिमत्त्व समजून घेताना अनेक गोष्टी उलगडत गेल्या.
कुणी शाईने लिहिली कविता
कुणी रक्ताने लिहिली कविता
करी लव्हाळी लवचिक घेऊन
मी पाण्यावर लिहिली कविता
असे सांगणारे मनमोहन स्वच्छंदी वृत्तीचे होते.
रॉय किणीकर नावाच्या एका बलाढ्य संपादकाने मनमोहनांची पहिली कविता प्रकाशित केली आणि पुढे किणीकर-मनमोहन ही जोडी अजरामर झाली. घरात दारिद्य्राचा सागर वहात असल्याने मनमोहन त्यांच्या मित्रांना ‘मला दहा रूपये उसने देण्याएवढे तुम्ही श्रीमंत आहात काय?’ असा प्रश्न रूबाबात विचारत. त्यांच्या मागणीचा ढंग आणि स्वभावातली सच्चाई बघून त्यांना नकार देण्याची हिंमत कोणालाही होत नसे. अशा परिस्थितीत दिवस काढतानाही त्यांनी लक्ष्मीची उपासना कधी केलीच नाही.
याबाबतीतली डॉ. न. म. जोशी यांनी सांगितलेली एक आठवण फारच बोलकी आहे. लोककवी मनमोहन यांचा तो शेवटचा काळ होता. वृद्धापकाळाने त्यांना घेरले होते. अंथरूणावरून उठून बसणेही त्यांना अशक्य झाले होते. ही वार्ता तेव्हाचे तरूण नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यापर्यंत गेली. शिंदे त्यांच्या लवाजम्यासह तातडीने मनमोहनांच्या सदाशिव पेठेतील निवासस्थानी दाखल झाले. ते म्हणाले, ‘‘कविराज, माझ्या लहानपणी मी तुमच्या कविता रेडिओवरून ऐकायचो. गावागावातील यात्रा आणि जत्रात जाऊन लोकांना त्या गाऊन दाखवायचो. लोक मला पाच पैसे, दहा पैसे द्यायचे. त्यातूनच मी शिक्षण पूर्ण केले आणि प्रगती साधली. आज मला कशाचीच कमतरता नाही. मी तुम्हाला काय देऊ? तुमच्यासाठी काय करू, ते निसंकोचपणे सांगा.’’   
आजारपणामुळे मनमोहनांना बोलता येत नव्हते. त्यांनी खुणेनेच कागद आणि पेन मागवून घेतला आणि त्यावर चार ओळी लिहिल्या. त्यांचा हात थरथरत होता. त्यामुळे अक्षर व्यवस्थित लागत नव्हते. त्यांच्याच शेजारी राहणारे न. म. त्यांचे अक्षर वाचू शकतात म्हणून त्यांना बोलावले. डॉ. न. म. जोशी यांनी त्या कागदावर वाचलेला मजकूर असा होता-
मी तर नृपती खाटेवरचा
मला कुणाचं दान नको
तुम्हास जर का काही घेणे
देऊन टाकीन मी त्रिभुवने!
आयुष्याच्या संध्याकाळीही कसलीच आसक्ती नसलेला हा राजा माणूस होता, हे या उदाहरणावरून लक्षात येते. स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगणारे मनमोहन जगरहाटीची पर्वा कधीच करत नसत. निःस्पृह वृत्तीचे मनमोहन एकदा त्यांच्या घरासमोर उघडे उभे होते. त्याचवेळी एक नेता त्यांच्या घरासमोरून कार्यकर्त्यांसह जात होता. मनमोहनांची अकारण खोड काढत त्याने त्यांच्या कपड्यावरून मल्लिनाथी केली. कपडे घातल्यावर माणूस कसा रूबाबदार दिसतो यावर प्रवचन दिले. त्याला थांबवत मनमोहन म्हणाले, ‘‘हे बघ मित्रा, तू पुढारी असल्यामुळे तुला कपड्यांची झूल अंगावर वागवावीच लागेल. मी कवी असल्यामुळे आंतर्बाह्य उघडाच असतो.’’ त्या पुढार्‍याला त्यांनी तिथल्या तिथे चार ओळी ऐकवल्या. 
राजकीय पुरूषांची कीर्ती
मुळीच मजला मत्सर नाही
आज हुमायू बाबरपेक्षा
गालिब हृदये वेधित राही
आपल्या पत्नीच्या निधनानंतर वेड्यापिशा झालेल्या मनमोहनांनी  ‘वृंदावनातली तुळस जळाली, मागे उरल्या दगडविटा’ हे अजरामर शोकगीत लिहिले. मनमोहन इतके भावूक आणि हळवे होते की, त्यांच्या घरासमोर असलेला सुंदर गुलमोहोर कोसळला तर त्याची त्यांनी शोकसभा घेतली. या सभेला रणजित देसाई, बापू वाटवे यांच्यासारखे दिग्गज हजर होते. 
मनमोहनांनी अनेक कादंबर्‍या लिहिल्या. संपूर्ण शिवकाल काव्यात्मक भाषेत उभा केला.
या कलंदर कवीने कविबद्दलच लिहिलेल्या चार ओळी त्यांची ओळख पटवून देण्यास पुरेशा ठरतात.
शव हे कविचे जाळू नका हो
जन्मभरी तो जळतचि होता;
फुले तयावरी उधळू नका हो
जन्मभरी तो फुलतचि होता.
अशा या सतत जळणार्‍या आणि फुलणार्‍या महाकवीस आमची मानवंदना!
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092
प्रसिद्दी - दैनिक पुण्य नगरी, रविवार, दि. 19 मार्च 23