हा काळ आहे मुस्लिम राजवटीतला! नगर जिल्ह्यातील ताहाराबाद ही त्यांचीच जहागीर होती. एकेदिवशी या जहागीरदारांनी त्यांच्या हिशोबनीसाला तातडीनं बोलावणं धाडलं. त्यावेळी हिशोबनीस देवपूजा करत होते. त्यांनी निरोप घेऊन आलेल्या सैनिकाला सांगितलं, ‘‘स्नानसंध्या आटोपून येतो...’’
सैनिक म्हणाले, ‘‘असेल तसे या, असा निरोप आहे.’’
हिशोबनीसांनी नाईलाजाने देवपूजा अर्धवट सोडली. जहागीरदाराकडे गेले. त्यांचा हिशोब पूर्ण करून दिला आणि त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. ते म्हणाले, ‘‘यापुढे तुमची नोकरी नको! चाकरी केली तर ती फक्त भगवंताची करेन!’’
इतक्यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी सांगितलं, ‘‘आपल्या वंशात इथून पुढे सात पिढ्या कुणीही सरकारी नोकरी करू नये! केल्यास तो निपुत्रिक राहील.’’
ते वचन आजची त्यांचे वंशज तंतोतंत पाळतात. ते केवळ भजन, कीर्तन करूनच आपला उदरनिर्वाह भागवतात.
त्यानंतर त्यांनी भगवंतभक्तीसाठी स्वतःचं आयुष्य वाहून घेतलं. महाराष्ट्रातील 168 आणि महाराष्ट्राबाहेरील 116 अशी 284 संतचरित्रे काव्यमय शैलीत लिहिली. या संतचरित्राशिवाय त्यांच्या स्फूट रचनाही मोठ्या आहेत. त्यांनी लिहिलेलं ‘पांडुरंग महात्म्य’ अत्यंत भक्तीरसपूर्ण आहे. पांडुरंगाविषयी इतकं लिहून ते समाधानी झाले असं नाही. त्यामुळं त्यांनी ‘पंढरीमहात्म्य’ आणि ‘पांडुरंगस्त्रोत’ही लिहिले. आज आपल्याला असंख्य संतांची चरित्रे कळतात ती त्यांच्यामुळेच! या संतांच्या कवींचं नाव म्हणजे, संत महिपतीबुवा ताहाराबादकर! 1715 ते 1790 हा त्यांचा कालखंड. मात्र त्यांनी जे संतसाहित्य लिहून ठेवलं आहे ते काळाच्या खूप पुढचं आणि म्हणूनच अजरामर ठरणारं आहे.
त्यांचे मूळ आडनाव कांबळे. वडिलांचे नाव दासोपंत. मंगळवेढ्याचे कांबळे नगर जिल्ह्यातील ताहाराबादला स्थायिक झाले. मुलबाळ नसल्याने ‘आपल्यानंतर पंढरीची वारी कोण करणार?’ असा प्रश्न पडून ते अस्वस्थ झाले. अत्यंत आर्ततेनं त्यांनी त्यांचं गार्हाणं पांडुरंगापुढं मांडलं आणि वयाच्या साठीनंतर त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्याचं नाव ‘महिपती!’ याच मुलानं पुढे वारकरी संप्रदायात भरीव योगदान दिलं. जे कोणी संत हयात असतील त्यांना भेटून, त्यांच्या मुलाखती घेऊन त्यांनी त्यांची काव्यमय चरित्रं लिहिली. जे हयात नाहीत त्यांच्या कुटुंबियांना, नातलगांना, मित्रांना भेटून त्यांनी आपलं लेखनकार्य पुढं नेलं. आपले गुरू संंत तुकाराम महाराज यांनी आपल्या स्वप्नात येऊन दृष्टान्त दिला आणि त्यांनी फर्मावलं की ‘तू संतचरित्रे वर्णन कर’ म्हणून मी इकडे वळलो असं त्यांचं म्हणणं.
संत महिपतींनी संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई, संत गोरोबा, संत चोखोबा, संत कबीर, बोधलेबुवा, गणेशनाथ उद्धव, चिद्घन, विसोबा खेचर, संत सेना महाराज, संत रोहिदास अशा संतांची रसाळ चरित्रे लिहिली आहेत. त्यांचे भक्तविजय, कथा सारामृत, भक्तलीलामृत, संतलीलामृत, संत विजय हे आणि असे अनेक ग्रंथ वारकरी संप्रदायात प्राथःस्मरणीय आहेत. शिवाय त्यांनी लिहिलेलं पंढरी महात्म्य, अनंतव्रतकथा, दत्तात्रेय जन्म, तुळशी महात्म्य, गणेशपुराण, पांडुरंगस्त्रोत, मुक्ताभरणकथा, ऋषिपंचमी महात्म्य, अपराधनिवेदन स्त्रोत या स्फुटांसह अनेक अभंग, आरत्या, पदे, सारांश ज्ञानेश्वरी असं लेखन केलं.
पूर्वी आपल्याकडे देवांची चरित्रे गायली जात. महिपतींनी देवांचे मूर्त रूप असलेल्या संतांची चरित्रे गायिली. त्यामुळेच ते ‘संतांचे कवी’ झाले. मराठी संतसाहित्यात त्यांनी जे अवर्णनीय योगदान दिलं ते म्हणूनच महत्त्वपूर्ण आहे.
वारकरी संप्रदायात त्यांच्याबाबत एक आख्यायिका सांगितली जाते. दादोपंतांची पंढरीची वारी महिपतीबुवांनी पुढे चालू ठेवली. वृद्धावस्थेत ते पंढरपूरला वारीला गेले. त्यावेळी विठ्ठलाचे दर्शन घेऊन त्यांनी आर्तपणे सांगितलं की, ‘‘हे पांडुरंगा, यापुढे म्हातारपणामुळे वारीसाठी तुझ्या दर्शनास येण्यास अंतरेल असे वाटते. तेव्हा मला क्षमा कर व तुझ्या दर्शनाची माझी आसक्ती कायम अशीच राहू दे...’’
त्यानंतर विठ्ठलाने त्यांना स्वप्नदृष्टांत दिला आणि सांगितले की, ‘‘आषाढ शूद्ध एकादशीस भक्त मला भेटावयास पंढरपूरला येतात. आषाढ वद्य एकादशीस मी तुला ताहाराबादेस येऊन दर्शन देईन!’’
त्यानंतर सकाळी बुवांनी चंद्रभागेत स्नान केले. त्यावेळी त्यांना चंद्रभागेत श्री विठ्ठलाची वाळुमिश्रीत पाषाणाची मूर्ती सापडली. ती त्यांनी ताहाराबादला आणून, प्राणप्रतिष्ठापना करून विठ्ठलाचे मंदीर बांधले. आजही ही मूर्ती ताहाराबाद येथे पाहावयास मिळते. भक्ताच्या हाकेला धावून येणारा देव ही कल्पनाच तर आपल्या वैभवशाली परंपरेचा भाग आहे.
महिपतींनी श्री विठ्ठलाला जे पत्र लिहिले त्यात त्यांची आर्त भक्ती दिसून येते. ते लिहितात, ‘‘विठ्ठला, चित्तवृत्ती तुझे पायी ठेवली आहे. त्रितापाचे आघात या देहाने किती सोसावेत? ते या पत्रात किती लिहावेत? शरीरात शक्ती नाही. इतका क्षीण झालो आहे की, हातात लेखणी धरवत नाही. देवा, या देहाचा संबंध तोड. तुझ्या पायाशी ठाव दे. वाचेने आणखी बोलता येत नाही. मागे अंतकाळी जसा भक्तास पावलास तसा मला पाव.’’
संत महिपतींनी 1790 साली वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी श्रावण वद्य द्वादशीला ताहाराबाद येथे समाधी घेतली. आषाढ वद्य त्रयोदशीला तेथे फार मोठी यात्रा भरते. हजारो भाविक तिथे जमून महिपतींच्या समाधीचे भक्तीभावाने दर्शन घेतात. तिथे त्यांच्या नावाने एक ट्रस्टही स्थापन करण्यात आला असून सुंदर मंदिर बांधले आहे.
आजही वारकरी संप्रदायात संत महिपतीबुवांचे दाखले दिल्याशिवाय कीर्तनकारांना पुढे जाता येत नाही. जर संत महिपती नसते तर कित्येक संतांची कामे सोडा त्यांची नावेही आपल्याला कळली नसती. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, असे म्हणताना ही संत परंपरा जिवंत ठेवण्यात मोलाचे योगदान देणार्या संत महिपती बुवांविषयी संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी लेखन केले आहे. प्राचार्य डॉ. रमेश आवलगांवकर, डॉ. वा. ना. उत्पात, विद्याधर ताठे, महिपतींचे वंशज अविनाश कांबळे, माझे स्नेही दत्तात्रय नाईकवाडे, दत्तात्रय गायकवाड अशा काहींनी वेळोवेळी प्रसंगानुरूप त्यांच्याविषयी लिहिले आहे. राहुरी येथील श्री. ज्ञानेश्वर आणि शामबाला माने यांनी पुढाकार घेऊन त्यांच्यावर एक चित्रपटही निर्माण केला होता. मात्र तरीही अनेक संतांना प्रकाशझोतात आणणारे संत महिपती आजच्या पिढीपर्यंत पोहोचू शकले नाहीत हे आपले दुर्दैव आहे. किमान वारकरी संप्रदायातील काही जाणकारांनी पुढाकार घेत संत महिपतींच्या नावे काही उपक्रम सुरू करणे गरजेचे आहे. त्यांच्या माध्यमातून शासनदरबारीही काही प्रयत्न झाले तर या थोर संत चरित्रकाराविषयी कृतज्ञता व्यक्त करता येईल.
- घनश्याम पाटील
7057292092
(प्रसिद्धी - दैनिक पुण्य नगरी, 15 जानेवारी 2023)
अप्रतिम
ReplyDeleteआपल्यामुळे आम्हाला संत महिपतींची ओळख झाली. धन्यवाद माऊली. जय हरी विठ्ठल!
ReplyDeleteमी आपले पुण्यनगरीतील सदर नियमितपणे वाचतो. बाळशास्त्री जांभेकरांचा लेखदेखील माहितीपूर्ण होता. अशा व्यक्तिमत्वांना प्रकाशझोतात आणून प्रबोधन करत रहावे.
ReplyDelete- गजानन कांबळे
धन्यवाद दादा आपले अंक व लेख समाजापर्यंत पोहचतायेत!
ReplyDeleteसुंदर लेख, जय हरी विठ्ठल.
ReplyDeleteसुंदर आणि माहितीपूर्ण लेख
ReplyDeleteयोग्य संशोधन व माहितीपूरक असलेले लेखन...
ReplyDelete