संवाद आणि संघर्ष या भूमिकेतून कार्यरत असताना विविध क्षेत्रातील फोफावलेल्या समाजद्रोह्यांना कायम चपराक देण्याचे काम आम्ही केले आहे. मराठी साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेत हा प्रयोग 'दखलपात्र' ठरल्याचे वाचक आवर्जून सांगतात. विविध विषयांवर चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष भावनेने केलेला लेखनप्रपंच म्हणजे 'दखलपात्र' हा ब्लॉग!!
Pages
▼
Monday, May 17, 2021
आश्वासक नेतृत्वाचा अकाली अंत
काँग्रेसच्या मुख्य प्रवाहाचा विचार करता पंडित नेहरू यांची काँग्रेस वेगळी होती. इंदिरा गांधी यांची काँग्रेस त्याहून वेगळी होती. इंदिराजींकडे देशाचं नेतृत्व आल्यावर त्यांनी स्वतःचे सल्लागार निर्माण केले. कार्यकर्त्यांची फळी तयार केली. त्या इंदिरा काँग्रेसमध्ये संजय गांधी यांचा हस्तक्षेप झाल्यावर त्यातून निर्माण झालेली काँग्रेस वेगळी होती. राजीव गांधी यांच्याकडे काँग्रेसचं नेतृत्व आल्यावर जी काँग्रेस उभी राहिली तीही वेगळी होती. पी. व्ही. नरसिंहराव यांच्याकडे या देशाचं नेतृत्व आल्यावर सीताराम केसरी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यावेळी शरद पवार, प्रणव मुखर्जी हे महत्त्वाचे नेते मूळ काँग्रेसमध्ये होते. ती काँग्रेस आणि त्या काँगे्रसची संस्कृती वेगळी होती. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना सोनियांच्या नेतृत्वात जी काँग्रेस होती ती या सगळ्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँगे्रसचं जे स्वरूप आहे ते निराळं आहे.
राहुल गांधी उघडपणे, आक्रमकपणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करतात, तुटून पडतात. राहुल गांधींच्या या काँग्रेसचा सर्वात बिनीचा शिलेदार म्हणजे राजीव सातव होते. राहुल गांधी यांच्या अगदी जवळच्या सहकार्यांपैकी ते एक होते. नव्या पिढीतले आक्रमक नेते काँग्रेसमध्ये आणणे, त्यांना जबाबदारी देणे हे काम राहुल गांधींनी आठ-दहा वर्षांपूर्वी सुरू केले होते. राजीव सातव यांना जेव्हा युवक काँगे्रसचे अध्यक्ष केले गेले त्यावेळच्या मुलाखतीचा एक प्रसंग आहे. सोनिया गांधी या मुलाखती घेत होत्या. त्यांना विचारलं गेलं की, तुमच्या आवडीचा नेता कोणता? त्यावर सातवांनी क्षणाचाही विचार न करता सांगितलं की, माझा आवडता नेता शरद पवार. हे उत्तर खरेपणानं दिल्यानं आपली युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड होणार नाही असंच त्यांना वाटत होतं परंतु हा स्वतंत्र विचारांचा तरूण आहे, स्वतःशी प्रामाणिक असलेला तरूण आहे म्हणून त्यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली गेली.
राजीव सातव हे काँगे्रसच्या आजच्या पिढीचे नेते होते. त्यांचं वक्तृत्व, बारीक भिंगाचा चष्मा, आकर्षक व्यक्तिमत्त्व, शांत, संयमी आणि संयत नेतृत्व हे वेगळं होतं. त्यांच्या अनेक गोष्टी या जुन्या काँग्रसच्या परंपरेला न शोभणार्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांचं राज्य म्हणजे गुजरात. इथं भगदाड पाडायचं म्हणून काँग्रेसचे सर्वतोपरी प्रयत्न होते, अजूनही आहेत. या महत्त्वाच्या राज्याचे प्रभारी म्हणून काँग्रेसने ही जबाबदारी राजीव सातव यांच्याकडे दिली होती. इथं काँग्रेसनं ‘कम बँक’ करावं म्हणून राजीव सातव यांना पुढे केलं असेल तर त्यातच त्यांचं मोठेपण दिसून येतं. मागच्या विधानसभा निवडणुकीतही काँगे्रसनं गुजरातमध्ये चांगली कामगिरी पार पाडली. त्याचं श्रेय उत्तम व्यवस्थापन कौशल्य असलेल्या आणि सर्वांशी सुसंवादी असलेल्या राजीव सातव यांच्याकडं जातं. राजीव सातव हे राष्ट्रीय पातळीवर पोहचलेलं महाराष्ट्राचं, त्यातही मराठवाड्यातलं उमदं नेतृत्व होतं. राष्ट्रीय पातळीवर पोहोचणं तसं सोपं नसतं. वयाच्या साधारण साठीनंतर काहींना अशी संधी मिळते; मात्र राजीव सातवांनी वयाच्या चाळीशीतच दिल्लीत आपल्या कर्तृत्वाचा दबदबा निर्माण केला होता. काँग्रेसमध्ये भविष्य असलेला असा हा नेता होता. राजीव सातव यांच्या रूपानं मराठवाड्याला, महाराष्ट्राला दिल्लीत खूप मोठं स्थान मिळण्याची शक्यता होती. काँग्रेसच्या संस्कृतीला वेगळं वळण देणारा हा नेता होता. त्यांनी एकाचवेळी जनसामान्यांशी संपर्क ठेवणं आणि त्याचवेळी भारतातल्या काँग्रेस नेत्यांशी मैत्रीचे संबंध निर्माण करणं हे कौशल्य साधलं होतं. त्यांच्या निधनानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना ज्या भावना व्यक्त केल्या त्या पाहता त्यांचा संपर्क किती अफाट होता याची पुसटशी कल्पना येते.
पक्ष सोडून, राजकारण सोडून इतर पक्षांतल्या नेत्यांशी असे मैत्रीपूर्ण आणि घरोब्याचे संबंध असणारे जुन्या पिढीतले दोनच नेते आहेत. पहिले शरदराव पवार आणि दुसरे नितीन गडकरी. या दोघांनाच ही किमया साधली होती. नव्या पिढीत हे कसब ज्याला जमलं होतं ते म्हणजे राजीव सातव. अनेकांची मनं जिंकण्याचं मोठं काम त्यांनी केलं. काँग्रेसनं मतं जिंकली असती तर अनेकांची मनं जिंकणार्या या नेत्याला देशाच्या राजकारणात खूप मोठी संधी मिळाली असती हे निर्विवाद सत्य आहे. घरात राजकीय पार्श्वभूमी होती. त्याचा फायदा त्यांनी राजकारणात येण्यासाठी घेतला. सुरूवातीच्या काळात राजकारणात स्थिरावण्यासाठी तो फायदा झाला पण दिल्लीत जाऊन केंंद्रीय नेतृत्वाबरोबर भारतभर काम करणं आणि स्वतःची एक उदयोन्मुख नेता म्हणून प्रतिमा तयार करणं याच्यासाठी अंगात स्वकर्तृत्व असावं लागतं. ते त्यांच्याकडं होतं. आज कोराना काळात युवक काँगे्रसचा अध्यक्ष असलेला श्रीनिवास नावाचा कर्नाटकचा नेता ही राजीव सातव यांचीच देण आहे. एक विश्वासू आणि जिद्दीनं काम करणारा युवा नेता सातवांच्या नजरेस पडला आणि मग त्याला पुढे आणण्यासाठी राजीव सातव यांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली. उत्तरांचलला जेव्हा ढगफुटी झाली त्यावेळी फ्रंटवर लढण्याचं काम आणि खूप मोठी मदत करण्याचं काम काँग्रेसनं केलं त्याचं सगळं नेतृत्व राजीव सातव करत होते. हा एकाचवेळी चळवळीत काम करणारा कार्यकर्ता होता आणि दुसरीकडे निवडणुकांचं राजकारण करणारा नेताही होता. ही किमया खूप कमी लोकांना जमते. जे संघटनेत काम करतात ते निवडणुकीच्या राजकारणात मागं पडतात आणि जे निवडणुकीच्या राजकारणात माहीर असतात ते पक्ष संघटनेच्या कामात मागं पडतात. राजीव सातव यांना या दोन्ही गोष्टी उत्तमपणे साधल्या होत्या. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी जी जी जबाबदारी टाकली ती प्रत्येक जबाबदारी लीलया पार पाडणारा असा हा नेता होता.
एका भाषणात नितीन गडकरी म्हणाले होते, राजकारणात ज्याचा उदय असतो त्याचा अस्त असतो आणि जिथं प्रकाश असतो तिथं अंधारही येतो, हे सर्व राजकीय पक्षांनी नेहमी लक्षात ठेवावं. गडकरींच्या या विधानाचा अर्थ इतकाच की प्रत्येकाला सत्तेत येण्याची आणि विरोधी पक्षात बसण्याचीही संधी मिळते. भविष्यात जेव्हा कधी काँगे्रस पक्ष सत्तेत येईल तेव्हा राजीव सातव यांची मोठी उणीव जाणवेल. या नेत्यानं महाराष्ट्राचं यशस्वी नेतृत्व केलं असतं आणि देशाच्या राजकारणातही मोठं योगदान दिलं असतं. सातव यांचं प्राथमिक शिक्षण पुण्यात नुतन मराठी विद्यालयात आणि पुढचं महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसनसारख्या महत्त्वाच्या कॉलेजमध्ये झालं. त्यामुळं त्यांच्यावर भाषिक संस्कार होते. हिंदी, इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या या नेत्यानं देशभर आपली वेगळी ओळख निर्माण केली. तरूणांचं संघटन केलं. आज त्यांच्या निधनानंतर काँगे्रस संस्कृतीला कट्टर विरोध करणारेही अनेकजण हळहळत आहेत हेच त्यांच्या नेतृत्वाचं मोठं यश आहे.
मराठवाड्यातले शिवराज पाटील चाकुरकर यांच्यासारखे अपवाद वगळता मराठवाड्यातल्या नेत्यांना दिल्ली धार्जिणी नाही असंही अनेकांना वाटतं. अंबेजोगाईच्या प्रमोद महाजन यांची कौटुंबीक कलहातून हत्या झाली. विलासराव देशमुख यांच्यासारखं नेतृत्व अचानक गेलं. गोपीनाथराव मुंडे गेले आणि आता राजीव सातव यांच्यासारखा सुसंस्कृत नेता मराठवाड्यानं गमावला आहे. सातव यांचं असं अकाली जाणं हे त्यांच्या कुटुंबीयांचं मोठं नुकसान आहे, काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान आहे, मात्र त्याहून मोठं नुकसान महाराष्ट्राचं आहे, मराठवाड्याचं आहे. असं नेतृत्व तयार होणं, ते राष्ट्रीय पातळीवर पुढे येणं हे सोपं नसतं. आजच्या बरबटलेल्या राजकारणाची पातळी पाहता या परंपरेत, या संस्कृतीत राजीव सातव कुठंही बसत नव्हते. या परिस्थितीत हा राजहंस वेगळेपणाने उठून दिसायचा. त्यामुळंच त्यांना श्रद्धांजली अर्पण करतानाही आपण खूप काही गमावल्याची भावना आहे.
- घनश्याम पाटील
7057292092
दै. पुण्य नगरी, मंगळवार, दि. 18 मे 2021
घनश्यामदादा खुप चांगल्या पध्दतीने व्यक्त झालात.
ReplyDeleteकाँग्रेस मधील 'राजहंस' ही उपमा खूप भावली. महात्मा गांधींच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पासून काँग्रेसमध्ये होत गेलेले बदल आणि यातून काँग्रेसची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करणारा हा 'राजहंस'! तुमच्या लेखातून खूप माहिती मिळाली. आणि पक्ष बाजूला ठेऊन सर्व पक्षांमध्ये प्रिय असणाऱ्या या नेत्याचं जाणं मनाला दुःख देऊन गेलं! त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!!
ReplyDeleteनमस्कार पाटील सर...
ReplyDeleteमा खा राजीव सातव गेले ही बातमी सर्वांना हेलावून गेली...
मा प्रमोदजी महाजन साहेब, मा विलासरावजी देशमुख साहेब, मा गोपीनाथरावजी मुंडे साहेब
मराठवाड्यातील अशा दिगज नेत्यांच्या अकाली exit नंतर मा राजीव सातव साहेबांसारखं उमद, आश्वासक नेतृत्व अकाली जाणं ही राजकारणाची, देशाची, महाराष्ट्राची आणि निश्चितच मराठवाड्याची अपरिमित हानी झाली आहे... ही पोकळी भरून यायला काही दशकांची वाट पाहावी लागेल...
विनम्र श्रद्धांजली!!!😢👏💐
राजीव सातव यांची एक्जिट ही फक्त काँग्रेसपुरतीच हानीकारक(!) नसून ती महाराष्ट्राची सुद्धा हानी आहे, हे घनश्याम भाऊंनी अगदी नेमक्या शब्दात मांडले आहे.
ReplyDelete@ॲड.लखनसिंह कटरे
नेमकं लिहिलंय..
ReplyDeleteखूपच सुंदर लेख
ReplyDeleteखूपच सुंदर लेख
ReplyDelete