Pages

Monday, March 1, 2021

अहंकाराचा वारा न लागो राजसा...

संतशिरोमणी नामदेव महाराज यांनी महाराष्ट्राच्या आणि मराठी भाषेच्या विकासाची पताका भारतभर पसरवली. वारकरी संप्रदायाचा पाया भक्कमपणे भरण्यात खूप मोठं योगदान दिलं. त्यांचं हे 750 वं जयंती वर्ष आहे. या वर्षात शासकीय पातळीवर त्यांच्याविषयी काही विशेष कार्यक्रम व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या अनुषंगानं शासकीय जयंती, दिन साजरे करण्याच्या महापुरूषांच्या यादीत संतश्रेष्ठ नामदेव महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या नावाचा समावेश करावा अशी मागणी जोर धरत आहे.


संत नामदेव महाराज हे फक्त महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण भारताचे आराध्य संत आहेत. पांडुरंगाच्या सर्वश्रेष्ठ भक्तराजात त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या कीर्तनात स्वतः विठुमाउलीही डोलत, अशी आख्यायिका आहे. आपल्या संतपरंपरेनं भागवत संप्रदायाचा पाया भक्कम केला. त्यामुळं या यादीतून विठ्ठलाच्या लाडक्या भक्ताला दूर ठेवणं हा आपले सर्वांचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाचाही अपमान ठरेल. मराठी साहित्याचा एक नम्र अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की मराठी साहित्य भारतभर नेण्याचं काम संतशिरोमणी नामदेव महाराजांनी केलं. भागवतधर्माची पताका हातात धरणं ही अभिमानाची गोष्ट आहे हे जातीधर्माच्या पलीकडं जाऊन सांगितलं. संत ज्ञानेश्वरांना समकालीन असलेल्या संत नामदेवांनी माउलींनंतर पन्नास वर्षे भक्तीचा महिमा सांगितला. त्यांचं नाव या यादीत असणं हे राज्य सरकारसाठीही म्हणूनच भूषणावह ठरेल.

महाराष्ट्रात वारकर्‍यांचं एक वेगळं योगदान आहे, वेगळं अधिष्ठान आहे. संतपरंपरेचा फायदा हिंदवी स्वराज्यासाठीही झालाय हे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी  साधार आणि सप्रमाण दाखवून दिलंय. त्यामुळं संतांचं महत्त्व आणि संतांच्या कार्याचं वेगळेपण अधोरेखित केलं जात असताना, महाराष्ट्र या संतपरंपरेमुळं इतरांपेक्षा वेगळा कसा आहे हे माहीत असताना संतशिरोमणींना दूर सारू नये. संतशिरोमणी नामदेव महाराजांच्या 750 व्या जयंती वर्षानिमित्त शासकीय पातळीवर संत नामदेव महाराजांविषयी जागृती करणारे उपक्रम राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त करतानाच संतसेवेत आमचा खारीचा वाटा म्हणून यंदा ‘चपराक प्रकाशन’ आणि ‘वारकरी दर्पण’च्या माध्यमातून आम्ही एक दिवसीय संतशिरोमणी नामदेव महाराज साहित्य महोत्सवाचे आयोजन करणार आहोत. त्यात संत नामदेव महाराजांविषयी, त्यांच्या साहित्याविषयी चर्चासत्रं आणि नामदेव महाराजांवरच कीर्तन होईल. त्यावेळी त्यांच्यावरील काही पुस्तकंही ‘चपराक’कडून प्रकाशित होतील.


संत नामदेवांचं सगळ्यात मोठं योगदान म्हणजे ते मानवतावादी संत आहेत. भारतभर पोहोचलेले ते पहिले सहिष्णुतावादी संत आहेत. पंजाबपर्यंत जाऊन घुमानमध्ये त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. गुरूग्रंथसाहिबात त्यांना सन्मानाचं स्थान मिळालं. सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्या पुढाकारातून पंजाबमधील घुमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. डॉ. सदानंद मोरे यांच्यासारखा व्यासंगी लेखक त्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होता. त्यावेळी पंजाबी आणि मराठी या भाषाभगिनी एकत्र आल्या होत्या. आता या वर्षी महाराष्ट्र सरकारनं पुढाकार घेतल्यास संत नामदेवांचे अभंग, त्यांचं तत्त्वज्ञान सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. 


यानिमित्तानं मला आठवण येते ती संत तुकाराम महाराजांच्या श्रेष्ठ शिष्या संत बहिणाबाईंची. त्या लिहितात,


संतकृपा झाली । इमारत फळा आली ॥
ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिलें देवालया ॥
नामा तयाचा कंकर । तेणें केला हा विस्तार ॥
जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ॥
तुका झालासें कळस । भजन करा सावकाश ॥  
बहेणी फडकते ध्वजा । निरूपण आलें ओजा ॥


महाराष्ट्र भागवतधर्माची ही इमारत किती भक्कम आहे हे संत बहिणाबाईंनी इतक्या समर्थ शैलीत नोंदवून ठेवलं आहे. त्याचा विसर आपल्या राज्यकर्त्यांना पडू नये. समाजाला तर मुळीच पडू नये. 


गेल्या काही वर्षात दुर्दैवानं वारकरी संप्रदायातही काही वाईट प्रवृत्ती घुसल्या आहेत. त्या प्रवृत्ती या भक्तिमार्गाचंही राजकारण करतात. इथंही जातीवाद आणतात. राजकारण्यांच्या आहारी जाऊन मतांचं राजकारण करतात. त्याचाच एक भाग म्हणून वरील अभंगात ‘ज्ञानदेवे रचिला पाया’ याऐवजी त्यांनी ‘नामदेवे रचिला पाया’ अशी मांडणी सुरू केली आहे. इतकंच काय, जे वारकरी वर्षानुवर्षे ‘ज्ञानोबामाउली तुकाराम’चा घोष करत वारीत एकोप्यानं सहभागी होतात त्यांच्यातही भेद निर्माण करण्याचं कारस्थान सुरू आहे. ‘ज्ञानदेव-तुकाराम’ ऐवजी ‘नामदेव-तुकाराम’ हे कसं बरोबर आहे हे ते पटवून देत असतात. खरंतर संतशिरोमणी नामदेव महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हे समकालिन आहेत. माउलींच्या संजीवन समाधीनंतर पुढे संत नामदेव महाराजांनी पन्नास वर्षे ही भक्तीमार्गाची पताका सर्वदूर अभिमानानं फडकावली. त्यामुळं या संतांच्या मांदियाळीत आपण असं विषमतेचं विष कालवणं हे अक्षम्य पाप आहे. आजवर सर्व संतांनी व्यापक समाजकल्याणाचीच भूमिका घेतली आहे. त्यामुळे कोणत्याही संताचा उपमर्द होऊ नये. त्यांची निंदा होऊ नये. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्याच भाषेत सांगायचं झालं तर, 

‘संतनिंदा ज्याचे घरी । नव्हे घर ते यमपुरी ॥’ 

 
संतशिरोमणी नामदेव महाराज म्हणतात, 


अहंकाचार वारा न लागो राजसा ।
माझिया विष्णुदासा भाविकांसी ॥


आज हेच तत्त्वज्ञान आपण जगणं, आचरणात आणणं गरजेचं आहे. जिथं अहंकार आला तिथं उद्ध्वस्त होणं आलं, नष्ट होणं आलं. भलीभली साम्राज्ये येतात, जातात. नंतर त्याच्या अस्तित्वाच्या खुणा दिसणंही दुरापास्त होऊन जातं. आज आपण विजयनगरला गेलो तर तिथं मातीच्या ढिगार्‍याशिवाय काहीच मिळणार नाही. फार लांब कशाला, शनिवारवाड्याचं वैभवही आज त्याच्या पडक्या भिंतीवरूनच अनुभवावं लागतं. त्यामुळं सत्ताधार्‍यांनी हे व असे विषय चर्चेला आणून जनक्षोभ उसळेल याची वाट पाहू नये. संतविचारांवर आपल्या राज्याची, राष्ट्राची उभारणी झालीय. आपल्यावरील संस्काराचा पगडा त्यामळेच अजून कोणी दूर करू शकले नाही. अनेक आक्रमणे झाली, जुलूमी सत्ता आल्या पण अशा कोणत्याही अरिष्टांवर मात करत आपण टिकून आहोत, मानसिकदृष्ट्या सुदृढ आहोत याचे बरेचसे श्रेय संतविचारांकडे जाते.


वारकरी संप्रदायाचे उपासक असलेल्या सचिन पवार यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे की, आपल्या राष्ट्राच्या उभारणीत वैचारिक योगदान देणार्‍या संतांच्या विचारांचा गौरव महाराष्ट्र सरकारने नव्हे तर पाकिस्तान सरकारने करायचा का? त्यांच्या या भावना आपल्याकडील तमाम वारकरी बांधवांच्या म्हणून स्वीकारायला हव्यात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी संतशिरोमणी नामदेव महाराज, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, शांतिब्रह्म एकनाथ महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज या किमान प्रमुख संतांची नावं महापुरूषांच्या यादीत घालावीत. त्यामुळं या संतांच्या कीर्तीत भर पडेल असे नाही तर महाराष्ट्र सरकारसाठी ही बाब गौरवाची, अभिमानाची असेल. शासकीय पातळीवरून हा विचार सामान्य माणसांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत गेला तर आपल्या राष्ट्राच्या बौद्धिक विकासास बळकटी मिळू शकेल.
- घनश्याम पाटील
7057292092


प्रसिद्धी - दैनिक पुण्य नगरी, २ मार्च २०२१

19 comments:

  1. जातींची ही विषवल्ली प्रखर व मान्यताप्राप्त होत आहे हे दुर्दैवाने खरे आहे.

    ReplyDelete
  2. नलगे मुक्ती धनसंपदा... संतसंग देई सदा...

    ReplyDelete
  3. नलगे मुक्ती धनसंपदा... संतसंग देई सदा...

    ReplyDelete
  4. लेख वाचला. घनश्याम सरांचा संतसाहित्याचा अभ्यास सखोल आहे. महाराष्ट्रातील संतसाहित्याच्या परंपरेचे त्यांनी फार सुंदर वर्णन केले आहे. त्याच बरोबर वारकरी संप्रदायाच्या अपेक्षाही नमूद केल्या आहेत. ज्यामुळे महाराष्ट्रात संतांविषयी आदर द्विगुणित होणार आहे. लेख आवडला.

    ReplyDelete
  5. अत्यंत जबाबदारीने लिहिलेला अप्रतिम लेख!

    ReplyDelete
  6. मुळात सगळ्याच संतांना जातीभेदाचे वावडे असताना त्यांचे अनुयायी बनून हे असंं जातीपातीचं राजकारण करणाऱ्यांना ती माउली समतेचं बाळकडू पाजो हीच प्रार्थना

    ReplyDelete
  7. कोणत्याही संताची उपेक्षा होऊ नये हीच अपेक्षा !

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर बोललात.

      Delete
  8. खूप सुंदर झालाय लेख

    ReplyDelete
  9. हा जातिभेद अखेरीस सर्व हिंदू समाजाचे इस्लामीकरण करुन च राहील! हे दुर्दैव आता कोणीही टाळू शकत नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. हे मत अवास्तव आहे

      Delete
  10. रमेश वाघMarch 2, 2021 at 12:17 AM

    नामा म्हणे रंगी रंगला सुरंग। अंगे स्वयंमेव पांडुरंग।।
    संतांच्या नाही आपल्या भल्यासाठी संतांचा आदर व्हावा.

    ReplyDelete
  11. सर्वंकश सुसंगत मांडणी.
    होय हल्ली हा एक नवा प्रवाद समोर येतोय.
    ज्ञानदेव रचला पाया ऐवजी नामदेव रचला पाया म्हणण्याचा.
    यासाठी असा तर्क दिला जातो की.....
    नामदेवांनी सर्व भारत भ्रमण करुन राभ कृष्ण हरीचा प्रसार केला तेव्हा माऊली शुध्दी पत्रिका आठी वणवण फिरत होते. मग ते कसे काय पाया होवू शकतात.
    मात्र हा बुध्दी भ्रम आहे.
    नामदेवांचं उचित स्थान बहिणींनी त्यांना दिलंच आहे.

    आपण छान विवेचन केलंय.

    ReplyDelete
  12. भेदाभेद भ्रम अमंगळ असं संतानीच सांगितलेलं असताना आम्ही जातीपातीच्या आधारावर भेदभाव करून त्या थोर संतांच्या शिकवणुकीचा पराभव करतो आहोत.

    ReplyDelete
  13. अतिशय छान लिहिले आहे

    ReplyDelete
  14. संत आणि त्यांची शिकवण, त्यांचे विचार आपण निस्पृह पणे आत्मसात करून घेणे, ही आजच्या काळाची गरज आहे. आजच्या या घाई गडबडीच्या,बेभरवशाच्या काळात मनाची स्थिरताच मानसाला तारु शकते, त्या साठी संत विचार आवश्यक आहे. सर्व संत मानवतावादी आहेत. त्यांच्या मध्ये भेदभाव करणे क्षुद्रतेचे लक्षण आहे. वारकऱ्यांच्या ठायी आमची नितांत श्रद्धा आहे. कृपया त्यांनी यापासून दूर रहावे. लेख छान वाटला म्हणून लिहावेसे वाटले.

    ReplyDelete
  15. सुंदर लेख खूप छान मांडणी

    ReplyDelete