Pages

Friday, June 22, 2018

भय इथले संपत नाही!


तानाजी धोंडिराम कोरके हा लातूर जिल्ह्यातील एक तरूण. पुण्यात वाढप्याचे काम करायचा. गेल्या शनिवारी (दि. 16) तो ऑटोरिक्षाने रविवार पेठेत उतरला. ऑटोचे बिल चाळीस रूपये झाले. तानाजीकडे केवळ वीस रूपये होते. त्यावरून रिक्षाचालक अतुल उर्फ ईश्‍वर दशरत हराडे याच्यासोबत त्याची बाचाबाची झाली. रिक्षाचालकाने त्याचा सहकारी रोहन गोडसेच्या मदतीने तानाजीला जबर मारहाण केली. तानाजी बेशुद्धावस्थेत पडल्याचे परिसरातील लोकांनी पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी त्याच रिक्षाचालकाच्या मदतीने तानाजीला ससून रूग्णालयात नेले. तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. तो जिथे बेशुद्ध पडला होता तिथल्या दुकानातील एका सीसीटीव्हीत घटना दिसत होती. त्याच रिक्षाचालकाने केवळ वीस रूपयांसाठी तानाजीचा जीव घेतला.

आपल्या अनेक वाचकांना या बातमीचे काहीच वाटणार नाही. कारण अशा घटना आजूबाजूला नित्याच्या झाल्या आहेत. काहीजण हळहळतील. काहीजण केवळ वीस रूपयांसाठी (?) असे करायला नको होते म्हणून शिव्याही घालतील. एकंदरीत आपल्या समाजाच्या खालावलेल्या आणि दळभद्री मानसिकतेचे हे उदाहरण आहे. 

अशा घटना घडल्या की आपण चार-दोन दिवस प्रतिक्रिया देतो. ‘महाराष्ट्राचा बिहार होतोय’ अशी चिंता व्यक्त करतो. खरंतर बिहारही आपल्यापेक्षा कितीतरी पुढे जातोय; पण नसलेल्या गोष्टींचा अहंकार बाळगत आपण स्वतःची भलावण करतो. 

गरिबी, बेरोजगारी, दारिद्य्र हे पिढ्या न पिढ्या सुरूच आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांचे जोरदार प्रयत्न सुरूच आहेत. सामान्य माणसाला जगण्याचा आधार देण्यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. प्रश्‍न उरतो तो आपल्या इच्छाशक्तीचा. एकीकडे कोणत्याही क्षेत्रात जा, सर्वांची ओरड आहे की, कामगारच मिळत नाहीत आणि दुसरीकडे एक मोठा वर्ग सातत्याने गळे काढतोय की, कामच मिळत नाही. मग असे ऐतोबा परिस्थितीने गांजतात. आपल्या नाकर्तेपणाचे खापर इतरांवर फोडतात. त्यातून नैराश्य वाढते. काहीजण व्यसनाच्या आहारी जातात. त्यातून पुढे अनेक समाजविघात कृत्ये घडतात.

ज्या देशात वीस रूपयांसाठी एखाद्याला आपला जीव गमवावा लागत असेल त्या देशाच्या भवितव्याची आपण कल्पना करू शकाल. महासत्तेच्या गप्पा मारताना आपल्यासमोरी आव्हानांचा अंदाज येण्यासाठी हे उदाहरण पुरेसे बोलके आहे. बरं, या घटनेत या रिक्षाचालकाचे आणि मयत तानाजी कोरकेचे काहीच नाते नव्हते. आपण दुसरी घटना बघूया. 

लातूरच्याच साधुराम आणि गयाबाई कोटंबे या दुर्दैवी दांम्पत्याचा ज्ञानदीप हा मुलगा. साधुराम प्राचार्य पदावरून निवृत्त झालेले. ज्ञानदीपने एम.एस्सी. पर्यंत उच्चशिक्षण घेतलेले. त्याला लातूरच्या मोरेनगर परिसरातील राहते घर स्वतःच्या नावे करून हवे होते. वडिलांची त्याला तयारी नव्हती. ज्ञानदीपचे महिनाभरापूर्वी लग्न झाले. ‘माझा संसार बघायला या’ म्हणून त्याने आईवडिलांकडे आग्रह केला. आईवडिल मोठ्या मनाने मुलाकडे आले. नव्या सूनबाईला साडी घ्यावी म्हणून तिला घेऊन सासूसासरे बाजारात गेले. परत आल्यावर ज्ञानदीपने त्यांना प्यायला नारळपाणी दिले. वडील घेत नसतानाही त्याने सांगितले की, ‘घ्या, तरतरी येईल...!’ आईवडिलांनी ते घेतले. या पठ्ठ्याने त्या नारळपाण्यात घूस मारण्याचे विषारी औषध मिसळले होते. ती कडवट चव जाणवू नये म्हणून त्यात साखरही मिसळली. हे पाणी पिऊन वडील जागीच गेले. आई अत्यवस्थ आहे...

आपल्या समाजाच्या खालावलेल्या मनोवृत्तीचे भिकार रूप यातून दिसेल. असे क्रौर्य हा आपल्या समाजजीवनाचा एक भाग बनतोय. सत्तेसाठी आपल्या आप्तेष्टांना ठार मारणारा क्रूरकर्मा औरंगजेब आणि आपल्या जन्मदात्यांचा बळी घेणारा ज्ञानदीप यात फरक तो कोणता? जिथे बाप मुलीवर बलात्कार करतोय, पोर्न साईट पाहून चौदा वर्षाचा मुलगा आपल्या सोळा वर्षाच्या बहिणीवर अत्याचार करतोय त्या देशाचे आपण नागरिक आहोत. आपली संस्कृती, आपले आदर्श, आपल्या रूढी-परंपरा, आपले तत्त्वज्ञान याच्या बाता करणार्‍यांनी, प्रगतीच्या, विकासाच्या, सुधारलेपणाच्या गोष्टी मांडणार्‍यांनी आजच्या भारताचे हे वास्तव चित्र आधी समजून घ्यायला हवे.

विकास ही संथ गतीने होणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे ‘देश आगे बढ रहा है’ अशी जाहिरात कोट्यवधी रूपये खर्च करून करणे सहजशक्य असते. भौतिक प्रगती, नवनवे शोध-संशोधन, विविध क्षेत्रातील उपलब्ध करून दिलेल्या संधी, उद्योग-व्यवसायातील फुगवलेले आकडे यावरून कागदोपत्री कोटीच्या कोटी उड्डाणे जरूर घेता येतील. मात्र आपल्या ढासळलेल्या या मनोवृत्तीचे काय? त्याला कोण अपवाद राहिलंय? इथे जात-पात, धर्म, लिंग, वय, प्रांत, भाषा, गरीब-श्रीमंत असे कसलेही निकष नाहीत. शोषित, पिडीत अन्याय सहन करत आहेत. संधी मिळताच तेही इतरांवर अन्याय करत आहेत. त्यातून आलेला मुजोरपणा त्यांचे मनोबल वाढवतो. कायद्याचा धाक नसणे आणि ढिम्म व्यवस्थेला विकत घेणे यामुळे गुन्हेगार कोणतेही कृत्य करायला धजावतात. नैतिक-अनैतिक अशा कोणत्याही फूटपट्ट्या तिथे नसतात. 

इतरांचे नुकसान करणे, त्याला त्रास देणे यात आसुरी आनंद मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्याची कारणमीमांसा होऊ शकत नाही. ‘तो असा का वागला?’ याचे उत्तर देणे सोपे नाही. चांगुलपण हरवत चाललेल्या समाजात त्यामुळेच आपली जबाबदारी मोठी आहे. ‘भय इथले संपत नाही’ हे तर खरेच! त्यामुळे समाजसुधारणा गेली खड्ड्यात! तो आविर्भाव आपण आणायलाच नको. आपण फक्त स्वतः बदलूया! कोणीतरी म्हटलेच आहे, ‘‘जर आपण स्वतः बदललो तर जगातला एक वाईट माणूस कमी होईल.’’ हे वाईटपण संपवणं, निदान कमी करणं आपल्याच हातात आहे. कोणताही ‘देवदूत’ त्यासाठी काहीही करू शकणार नाही. 

आपण सध्या जिथे आहोत तिथे विचाराला, सुधारणेला थोडाफार वाव आहे. आणखी काही वर्षे अशीच गेली तर येणारी पिढी आणखी अंधारात ढकलली जाईल. काळही आपल्याला माफ करणार नाही!
- घनश्याम पाटील
7057292092

5 comments:

  1. घनश्याम भाऊ, हा लेख सुद्धा नेहमीप्रमाणे सडेतोडच! यावर माझी प्रतिक्रिया जरा वेगळ्या पद्धतीने मांडतो.
    1972-73 मध्ये मी B.Sc.(PCM)च्या प्रथम वर्षाला असताना माझे दूरचे जिजाजी(भाऊजी) सेवांतर्गत अल्पकालीन B.Ed.करायला आमच्या सोबतच गोंदिया या शहरात राहत होते.मला अवांतर वाचनाचे भयंकर व्यसन(?) असल्याने मी त्यांची B.Ed.ची सारी पुस्तके वाचली व त्यांच्यासोबत वाद घातला की,या B.Ed.च्या अभ्यासक्रमातील I.Q.ही संकल्पना आणि विद्यार्थ्यांना अजिबात शिक्षा करू नये/मारू(?) नये ही उद्घोषणा(?), या अवास्तव तथा पूर्णतः फालतू बाबी आहेत. यांचे 100% अवलंब झाल्यास येणारी पिढी समाजकंटकांचा भरमार असलेली व असंस्कृत/असभ्य अशी असेल. माझे जिजाजी (जे आज हयात नाहीत)यावर मला म्हणायचे, तू अजून खूप लहान आहेस,तुला या बाबी समजणार नाहीत.पुढे मीच सहा वर्षे शिक्षक होतो, B.Ed.ही केले.पण मी "मारखूंड्या शिक्षक" म्हणूनच कुप्रसिद्ध होतो.तरी या सहा वर्षात एकाही विद्यार्थ्याची किंवा त्यांच्या पालकांची माझ्या या "शिक्षा करण्याबद्दल व मारखूंड्यापणाबद्दल" एकही तक्रार मात्र आली नाही.उलट विद्यार्थी मला पसंत करत आणि आजही ते माझा विद्यार्थी राहिल्याचे व मार खाल्ल्याचे(तसे असेल तर) न संकोचता सांगतात. माझ्या त्या विद्यार्थ्यांपैकी काही रिमोट भागातील आदिवासी विद्यार्थी नक्षलवादी झाल्याचे कळते,पण बहुसंख्य विद्यार्थी मात्र आज समाजसुसंगत व सन्मानपूर्वक जीवन जगत आहेत व भेटल्यावर आवर्जुन "त्या दिवसांची" आठवण काढून डोळ्यांचे कडे पाणावून घेतात.
    1975 मध्ये महाराष्ट्रात EGS सुरू(?) झाल्यावर लवकरच मी यावर जबरदस्त टिका केली होती व आता हळूहळू शेतकरी मरतील आणि श्रमाची लाज वाटू लागून श्रमिक हे ऐतखाऊ,बेईमान,आळशी,जुगारी,दारूबाज होतील, असे जणू भविष्यच वर्तवले होते.यावर माझ्या बालमित्रांसोबत, बिरेन्द्रकुमार शूक्ला व श्रावण मटाले यांच्या सोबत मी शर्तही लावली होती. आज यावर कोणत्याही भाष्याची आवश्यकता नसावी.मी शेतकरी आत्महत्या साठी कुप्रसिद्ध असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात जिउनि असताना माझ्याकडे तेथील 6-7वर्षापासून बंद असलेल्या जयकिसान ससाका चे एकल अवसायक पद सोपवून तो कारखाना सुरू करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती.वारणा समूहाच्या मदतीने मी त्यात सफलही ठरलो,पण कारखान्यासाठी श्रमिक मात्र आम्हाला यवतमाळ जिल्ह्यात न मिळाल्याने बिहार वरून श्रमिक आयात(?) करावे लागले होते.यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक छोट्यामोठ्या शहरात(?) मात्र खालीपिली(!) श्रमिकांची गर्दी ओसंडून वाहत होती.
    जवळपास सगळ्याच कमावणा-यांकडून कर रूपाने सरकारने जमा केलेल्या अवाढव्य रकमेचा विनियोग(?) जेव्हा तथाकथित BPL/अंत्यज आदि कल्पित संकल्पनेमधील लोकांना(?) 1,2,3 रुपये किलो दराने धान्य देण्यासाठी करण्यात आला, तेव्हासुद्धा मी त्यावर टीका करून यामुळे हिंसक वृत्ती व ऐतखाऊपणाला चांगले दिवस येतील आणि शेतकरी मात्र मरतील,असे जणू भविष्यच वर्तविले होते.त्यावर आज काही भाष्य करण्याची गरज नसावी.असो.
    आपल्या या सडेतोड लेखात "दडलेली" वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठीच हे बढाईपुराण रचले(?) आहे.असो.असोच.
    चूक-भूल देणे-घेणे तथा क्षमस्व सुद्धा!
    आपला एक वाचक,
    @लखनसिंह कटरे, बोरकन्हार (जि.गोंदिया)
    ~~~~~~~~~२२.०६.२०१८~~~~~~~~~~~~~~~~

    ReplyDelete
  2. सर्वच भयानक आहे.

    ReplyDelete
  3. मानसिकता बदलणे गरजेचे आहे.

    ReplyDelete