Pages

Saturday, June 30, 2018

हे करायलाच हवे!


मध्यंतरी एक अत्यंत हृदयद्रावक गोष्ट ऐकली होती. सातारचे एक गृहस्थ. त्यांचा मुलगा उच्चशिक्षणासाठी म्हणून पुण्यात एका वसतीगृहात रहात होता. ते त्याला भेटायला आले होते. त्यावेळी त्याच्या लग्नावरून चर्चा झाली. मुलाने ठाम नकार दिला. दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली. तो ऐकत नाही म्हणून ते पुण्यात एका मित्राच्या घरी गेले. त्याच्याकडे पाहुणचार घेऊन रात्री सातार्‍याला परतले. 

दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना कळले की काल त्यांच्या मुलाचा अपघात झाला. वडिलांसोबत कधी नव्हे ते भांडण झाल्याने दुखावलेला मुलगा त्यांची माफी मागण्यासाठी दुचाकीवर पुण्याहून सातार्‍याला निघाला होता. ‘सरप्राईज’ म्हणून त्याने वडिलांनाही कळवले नाही. त्याचा गंभीर अपघात झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने त्यात तो गेला. दुर्दैव हे की, आदल्या रात्री वडील जेव्हा सातार्‍याला त्यांच्या कारने परत येत होते तेव्हा शिरवळजवळ गर्दी होती. लोक सांगत होते, की ‘‘मुलाचा दुचाकीवरून जाताना अपघात झालाय. तो गंभीर आहे. रूग्णवाहिका वेळेत येत नाहीये. त्याला उपचाराला नेण्यासाठी गाडी हवीय. कोणीही थांबायला तयार नाही.’’ तिथल्या कार्यकर्त्यांनी यांनाही विनंती केली, पण ‘नसते लचांड नको’ म्हणून त्यांनीही नकार दिला. आज कळले की तो त्यांचा एकूलता एक मुलगा होता. 

या गोष्टीतला खरेखोटेपणा मला माहीत नाही. एकाकडून ऐकलेली ही बातमी! पण आपल्या आजूबाजूला अशा कितीतरी घटना घडतात. वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. यावर सातत्याने प्रबोधन करूनही आपली मानसिकता काही बदलत नाही. कुणाचा अपघात झाल्यास आधी त्याच्यावर उपचार करण्याच्या सूचना रूग्णालयांना देण्यात आल्यात. तरीही काहीजण पोलीस येण्याची वाट पाहतात. उपचाराला टाळाटाळ करतात. हे सगळे थांबायला हवे. अपघात काही सांगून किंवा ठरवून होत नाहीत. त्यामुळे अशावेळी सर्वांनीच किमान माणुसकी दाखवत एकमेकांना सहकार्य करायला हवे.

आपल्याकडे युद्धापेक्षा जास्त माणसे अपघातात मरतात. त्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या वाहतुकीतला बेशिस्तपणा. एकतर रस्त्यावर गरजेपेक्षा अधिक कितीतरी वाहने आहेत. ते थांबवणे आपल्या हातात नाही. घरापासून दहा मीनिटाच्या अंतरावर कॉलेज असले तरी पोरांना सध्या गाड्या लागतात. ती प्रत्येकाची गरज झालीय! मात्र ही वाहने चालवताना वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांचे प्रमाण लक्षवेधी आहे. किंबहुना ‘नियम हे मोडण्यासाठीच असतात’ असा एक मिजासखोरपणा अनेकांच्या अंगात मुरलाय.

मध्यंतरी एक विनोद वाचला होता, ‘आम्ही कुत्रा पाळतो, मांजर पाळतो, गायी-म्हशीही पाळतो; पण वाहतुकीचे नियम ही काय ‘पाळायची’ गोष्ट आहे काय?’ या आणि अशा प्रवृत्तीमुळेच तर अनेक गंभीर समस्या उद्भवत आहेत.

आपल्याकडे 18 ते 30 या वयोगटातील मुलांचे गाडा दामटण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यात अनेकजण व्यसनाच्या आहारी गेलेत. गाड्या चालवताना सेल्फी, फेसबुक लाईव्ह यामुळेही काही दुर्दैवी प्रसंग ओढवल्याच्या घटना पुढे येत आहेत. मद्यपान करून वाहने चालविण्यात अशिक्षितांपेक्षा कितीतरी मोठे प्रमाण उच्चशिक्षितांचे असल्याचा एक अहवाल मध्यंतरी वाचण्यात आला.

नो एन्ट्रीतून गाडी चालवणे, चारचाकी चालवताना सिट बेल्ट न लावणे, दुचाकीवर हेल्मेट न वापरणे, वाहन परवाना नसतानाही केवळ कौतुक म्हणून अल्पवयीन मुला-मुलींना गाडी चालवण्यास देणे आणि त्यांच्या त्या कृतीचे समर्थन आणि कौतुक करणे, वाहतूक दिव्यांच्या सूचनांचे पालन न करणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी गाडीत घेणे हे सगळे प्रकार थांबायला हवेत. अनेकांच्या गाड्या नादुरूस्त असतात. दुचाकींचे ब्रेक व्यवस्थित लागत नसतील तर ते सुरळीत करायला अक्षरशः एक मिनिट लागतो! पण तितकेही तारतम्य आपण दाखवत नाही. काही वर्षापूर्वी कोकणात एका एसटी बसचा गंभीर अपघात झाला होता. त्यात गाडी पूलावरून सरळ नदीत गेल्याने चाळीस प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. नंतर तपासात कळले की त्या गाडीला वायपर नसल्याने पावसात पुलाच्या वळणाचा अंदाज आला नाही. पावसामुळे पुढचा रस्ताच दिसत नव्हता. म्हणजे केवळ चाळीस रूपयांचे वायपर बसवण्यास टाळाटाळ केल्याने चाळीस जणांचा मृत्यू ओढवला होता. 

महत्त्वाच्या शहरातील भाजी मंडईत सकाळी सर्वप्रथम येणार्‍या वाहन चालकास काही रोख बक्षिसी दिली जाते. ही रक्कम वेगवेगळ्या शहरात शंभर रूपयांपासून ते पाचशे रूपयांपर्यंत आहे. त्यामुळे तरकारीची सेवा देणारे अनेक वाहनचालक गाड्या भरधाव वेगाने दामटतात. भल्या पहाटे त्यांच्यावर कुणाचेच नियंत्रण नसते. थोडक्या लाभासाठी ते आपला आणि इतरांचा अनमोल जीव धोक्यात घालतात. काही प्रवासी भाड्याच्या गाडीतून प्रवासास जाताना गाडी वेगात नेण्यासाठी चालकास काही आमिषे दाखवतात. थोडासा वेळ वाचवण्यासाठी अशाप्रकारे जीव धोक्यात घालणे हे काही प्रगल्भतेचे लक्षण नाही. 

वाहतूक सुव्यवस्थेची जबाबदारी पार पाडणार्‍या पोलिसांची संख्या वाढवणेही गरजेचे आहे. अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे वाहतूक नियंत्रणात त्यांना अनेक अडचणी येतात. बहुसंख्य पोलीस इमानेइतबारे त्यांची जबाबदारी पार पाडत असतात; मात्र काहीजण चिरीमिरी घेऊन वाहतुकीचे उल्लंघण करणार्‍यांना सोडून देतात. त्यामुळे नियम मोडणार्‍यांचे तर फावतेच पण पोलिसांची प्रतिमाही मलीन होते. महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरात आजही साधी सिग्नल यंत्रणानाही नाही. मग हे अपयश कुणाचे?

ट्रक ड्रायव्हर हा तर एक अजबच प्रकार. ट्रान्सपोर्टचे ते एक महत्त्वाचे माध्यम. त्यामुळे त्यांना देशभर मोठमोठ्या गाड्या घेऊन जावे लागते. अनेक ट्रक चालक हे अशिक्षित किंवा अल्पशिक्षित आहेत. लांबच्या पल्ल्यावर असताना ते जेवणासाठी ढाब्यावर हमखास थांबतात. अर्थातच त्यावेळी अनेकजण मद्यपान करतात. नंतर पुन्हा अवजड सामान घेऊन जाणे आलेच. त्यामुळे त्यांच्या अपघाताचे प्रमाणही मोठे आहे. त्यांच्यात याविषयी जागृती करणे, त्यांचे प्रबोधन करणे हे व्यवस्थेचे कर्तव्य आहे. 

सिग्नलला थांबणे, नो एन्ट्रीत न घुसणे, चालत्या गाड्यावरून गुटखा-तंबाखूसारखे घातक पदार्थ खाऊन न थुंकणे, गाड्यावरून किंवा गाड्यातून कोणत्याही वस्तू रस्त्यावर न फेकणे अशा छोट्या छोट्या गोष्टीतूनही आपण मोठे काम करू शकतो. राष्ट्रसेवा करण्यासाठी हे पुरेसे आहे. आपली एक कृती एक अनर्थ टाळण्यासाठी पुरेशी ठरणारी असते. इतर देशातील वाहतुकीच्या शिस्तीची उदाहरणे देताना आपण स्वतःत बदल घडवणे कधीही श्रेयस्कर! एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला हे करायलाच हवे. ही जागृती ज्या दिवशी निर्माण होईल तो आपल्यासाठी सुदिन! 
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

9 comments:

  1. निष्काळजीपणाने आपला अनमोल जीव धोक्यात घालणा-या जनतेच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख...

    ReplyDelete
  2. निष्काळजीपणाने आपला अनमोल जीव धोक्यात घालणा-या जनतेच्या डोळ्यात अंजन घालणारा लेख...

    ReplyDelete
  3. सर , आपला लेख निश्चितच तरुणाईला दिशादर्शक ठरणार आहे.. पण ड्रायविंग साठी संयमही तितकाच आवश्यक आहे... खूप छान लेख

    ReplyDelete
  4. अगदी उपयुक्त लेख.

    ReplyDelete
  5. विचार करण्यास भाग पाडणारा लेख...

    ReplyDelete
  6. विचार करायला भाग पाडणारा लेख.. नेहमी प्रमाणेच अप्रतिम सर.

    ReplyDelete
  7. लेख उपयुक्त

    ReplyDelete
  8. घनश्याम सर, तुम्हीं काजळा हात घालणारे उदाहरण देऊन नेमका संदेश समाजास देण्याचा प्रयत्न केला आहे जो वाखाणण्याजोगा आहे. अशा घटनांच्या वाच्यतेमुळे काही प्रमाणत समाज प्रबोधन नक्कीच होईल ह्याची मला तरी खात्री आहे आणि साहित्याची हीच तर शक्ती आहे. खूपच छान.

    ReplyDelete
  9. नमस्कार स्वागत है आपका 🙏
    OneAd भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त एक एसी एप्लीकेशन है जो आपको बिना पैसा लगाये बहुत कम मेहनत मे ज्यादा इंकम देती है ।
    *यह एप्लीकेशन ई-कॉमर्स कंपनी से जुड़कर ऐड लाती है जिसे अपने यूजर्स बनाकर ऐड दिखाने का पैसा देती है ।*
    जबतक यह एप्लीकेशन आपके मोबाइल मे रहती है आपको इंकम आती रहेगी । सबसे बड़ी बात यह है कि आपको एड देखने की भी जरूरत नही पड़ेगी क्योंकि जब आप मोबाइल फोन को बंद या चालू करते है तभी यह एड चलती है ।
    अगर इस तरह से हमे हर रोज 500 से 5000 तक कि इंकम होती है तो इस एप्लीकेशन को मोबाइल मे रखना कोई बुरी बात नही है ।
    और सबसे महत्वपूर्ण बात यह है कि यह कंपनी जब आप चाहे आपका पैसा paytm या बैंक मे ट्रांसफर कर देती है । कमसे कम पांच रुपये भी आपको ट्रांसफर कर देती है ।
    अगर आप भी चाहते है कि महंगाई के इस दौर मे साईड इंकम कि जाऐ तो यह बेस्ट प्लेटफार्म है ईसलिये मोबाईल हेही रखे (DON'T UNINSTALL)आपके लिए जहा पर कुछ ही महीनो कि मेहनत से आप लाखो रूपये कमा सकते है ।
    तो आइए हम बताते है
    👉🏽 Play store से onead एप्लीकेशन डाउनलोड करले और अपने मोबाईल नंबर से रजिस्ट्रेशन कर लिजिए । रेफर आइडी मे (note kijiye)
    98R9HGMB Sponsor ID
    98QXRDCF Sponsor ID
    डाले और फिर आपकी मदद के लिए मुझे मेसेज करे कि आपकि आईडी एक्टिवेट हो गई है हम आपको पुरी सहायता करेंगे ।
    WhatsApp message [छिपाई गई जानकारी]

    Sponsor I'd 98R9HGMB
    Sponsor I,d 98QXRDCF
    धन्यवाद ।

    ReplyDelete