Pages

Saturday, June 16, 2018

दोन घडीचा डाव...


अनेकांच्या मनात प्रेरणेची ज्योत चेतवणारे आणि अनेकांना नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढणारे, मदतीचा हात देणारे युवा संत भैय्युजी महाराज यांनी आत्महत्या केली आणि अनेकांना आश्चर्याचा दुःखद धक्का बसला. विविध क्षेत्रातील अनेक दिग्गज लोक, नेते, अभिनेते त्यांचे अनुयायी, भक्त होते. अध्यात्माच्या क्षेत्रातील एका प्रतिभावंताचे असे जाणे चटका लावणारे तर आहेच पण या क्षेत्रातील माणूसही मनावर, इंद्रियावर संयम ठेऊ शकत नाही असा दुर्दैवी संदेश देणारे आहे.

काही दिवसांपूर्वी हिमांशू रॉय या कर्तव्यतत्पर अधिकार्‍याने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. आपल्याकडे जगाचा पोशिंदा ठरणार्‍या बळीराजाच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. धर्मा पाटील या बुजूर्ग शेतकर्‍यानं तर मंत्रालयावरून उडी मारून आत्महत्या केली. विद्यार्थ्यांच्या, तरूण-तरूणींच्या आत्महत्या वाढत चालल्या आहेत. म्हैसकर दांपत्याच्या तरूण मुलाने केलेली आत्महत्याही अनेकांना चुटपूट लावून गेली. कौटुंबिक कलह आणि व्यवसायातील अपयशामुळे अतुल तापकीर या युवा निर्मात्याने काही महिन्यांपूर्वीच फेसबुकवर पोस्ट टाकून आपली जीवनयात्रा संपवली.

जे कोणी नियतीच्या, निसर्गाच्या, दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकलेत, ज्यांची हतबलता विकोपाला गेलीय, ज्यांना नैराश्याने ग्रासलेय, ज्यांच्या ताणतणावाचा अतिरेक होतोय असे अनेकजण आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलताना आढळतात. दुःखाचा आवंढा गिळताना मनातील शल्य कुणालाही सांगावसं न वाटणं यामुळं होणारा कोंडमारा घातक ठरतोय. व्यावसायिक स्पर्धा विकोपाला जात आहेत. या सगळ्याची परिणीती आत्महत्येत होतेय.

अमेरिकेसारख्या महासत्ता असलेल्या देशातही लोकांचे मानसिक संतुलन बिघडतेय. मनोरूग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. या सर्वाचे कारण मन मोकळं करण्यासाठीच कोणी नाही. वाफ फार काळ कोंडून ठेवली तर त्या भांड्याचा स्फोट अटळ असतो. तसंच मानवी मनाचं झालंय. आजूबाजूला असंख्य माणसं असतात पण ज्यांच्याजवळ मन रीतं करावं अशा लोकांची वानवा आहे. विशेषतः जे उच्चपदस्थ आहेत, महत्त्वाच्या जबाबदार्‍या पार पाडणारे आहेत त्यांच्याभोवतीचं माणसांचं कोंडाळं हे स्वार्थापोटी जमलेलं असतं. याची त्यांनाही जाणीव असते. अशा लोकांना आपल्या कर्तव्यापोटी कुटुंबियांसाठीही वेळ देता येत नाही. नवनवीन आव्हानं पेलताना, इतर अनेकांच्या आयुष्यात नंदनवन फुलवताना स्वतःच्या आयुष्याचं मात्र डबकं झालेलं असतं. म्हणूनच रॉय यांच्यासारखे वर्दीतले आणि भय्यूजी महाराजांसारखे गर्दीतले लोक आपली जीवनयात्रा संपवतात.

प्रत्येकाच्या जीवनात काही भलेबुरे प्रसंग येतातच. काहीवेळा त्याचा अतिरेक झाल्यावर असे नकारात्मक विचार सुरू होतात. कितीही खमक्या मनाचा माणूस असला तरी त्यातून त्याची सुटका नाही. अशावेळी मनावर संयम ठेवणं जिकिरीचं असतं. आपल्यावर अवलंबून असणारे लोक, आपल्यावर निर्व्याज प्रेम करणारे लोक आठवले की प्रतिकूलतेतही जगण्याचं बळ मिळतं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमानला काळ्या पाण्याची शिक्षा भोगली. त्यावेळी त्यांच्याही मनात नैराश्याचं मळभ दाटून आलं होतं. त्यांनाही आत्महत्या करावीशी वाटली. सावरकरांना जेव्हा मृत्युचं आकर्षण वाटू लागलं तेव्हा त्यांनी एक निर्धार केेला. ‘‘या कारागृहात जो देशसेवा करील तो खरा देशसेवक. जे मूल्य दिल्याविना देशोद्वार होणेच नाही. ते कारापीडनाचे मूल्य देणे म्हणजे जीवन व्यर्थ जाणे नव्हेच नव्हे. कीर्तीचे, लौकिकाचे, मनाचे मधाचे बोट त्यास लागलेले नाही पण म्हणूनच ते अधिक अव्यर्थ होय. आणि निदान... मग असा का मरतोस? तू सोसलेल्या यातनांचा सूक्ष्म परिणाम देशावर होईलच होईल परंतु ते जर तुला खरे वाटत नसेल आणि ही बातमी देखील देशास कळणार नाही मग त्याचा नैतिक परिणाम कोणता होणार? मग व्यर्थ कष्ट का म्हणून? मरणारच असशील तर असे कुत्र्याचे मोलाने आपल्या हाताने का मरतोस? त्यांना तुला फाशी देऊ नये म्हणून दया आली होती की काय? मग जे त्यांना करता आले नाही ते तू त्यांच्याकरता स्वतःचे हाताने करून आपल्या पक्षाचे हानीत आणि अपजयात आणखी भर का घालतोस? जर मरणे तर सेनेतील तू एक सैनिक आहेस त्या सेनेचे एखादे कार्य करून मग तरी मर.. फाशी घेऊन नव्हे तर... आपल्या एका जीवास्तव... असे मर!’’

भगवतगीता सांगते, ‘‘सुख-दुःख, लाभ-अलाभ, जय-पराजय, पाप-पुण्य या कशाचाही विचार न करता आलेल्या परिस्थितीला सामोरं जायला हवं.’’ कोणत्याही परिस्थितीत स्वतःला सावरणं, आलेल्या परिस्थितीतून निर्धारानं बाहेर पडणं गरजेचं आहे. ‘मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते’ असेच वातावरण अवतीभोवती असले तरी मरण्यात कसली मर्दुमकी आलीय? तो भ्याडपणाच आहे. ‘जन पळभर म्हणतील हाय हाय... मी जाता राहील कार्य काय!’ याचा विचार केला पाहिजे. 

आपण देश बदलू शकत नाही, समाज सुधारू शकत नाही! पण आपल्यामुळे एक माणूस जरी घडला तरी आयुष्याचे सार्थक झाले. मग जीवनाच्या कसोटीवर यशस्वी व्हायचे तर कणखर राहण्याशिवाय पर्याय नाही. 

कवी माधव गिर यांच्या आई एक गोष्ट वारंवार सांगायच्या. त्या म्हणायच्या ‘‘महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात आपलं एक घर असावं!’’

म्हणजे प्रत्येक गावात एकजण तरी इतक्या जवळचा असावा की ते त्याला आणि आपल्याला आपलंच घर वाटावं. अशी मायेची माणसं जोडायला हवीत. त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित व्हावेत. गिर सरांच्या आईच्या म्हणण्यातला व्यापकपणा सोडून द्या! पण किमान चार-दोन मित्र असे असावेत की त्यांच्याशी आपण सगळं काही विश्‍वासानं शेअर करू शकू. एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होऊ शकू. 

मनाचा गुंता सोडवण्यासाठी कुटुंबात, मित्रपरिवारात काही हक्काच्या जागा असतात. त्यांच्याशी मोकळेपणे बोला. विचारांचा, अडचणींचा डोंगर थोडासा बाजूला ठेवा. समस्या नाहीत, दुःख नाहीत असा जगात कोणीच नाही. त्याची तीव्रता आणि ते सहन करण्याची, त्याला सामोरं जाण्याची प्रत्येकाची क्षमता मात्र वेगवेगळी! त्यामुळं दुःखाचा बाजार मांडणं, त्याचा बागुलबुवा करणं, त्यापासून दूर पळणं हा आपल्या मनाचा कमकुवतपणा आहे. संघर्ष आपल्या नसानसात आहे. शौर्य आणि पराक्रमाने पावन झालेली ही भूमी आहे. कितीही मोठं दुःख आलं तरी त्याला आपल्याला कोलता आलं पाहिजे.

रामशास्त्री’ या ऐतिहासिक चित्रपटात छोटा राम आणि त्याची सखी जानकी हे दोघे खेळत असताना एक गीत घालण्यात आलं. शांताराम आठवले यांनी मराठी चित्रपटगीतात मानाचं स्थान प्राप्त झालेलं  हे गीत लिहिलं. जीवनाचं तत्त्वज्ञान इतक्या सोप्या शब्दात सांगितलेलं इतरत्र कुठंही सापडणार नाही. बेबी शकुंतला यांनी या चित्रपटात अभिनय केला होता. आज ते गीत मला आठवतंय.

दोन घडीचा डाव 
याला जीवन ऐसे नाव
जगताचे हे सुरेख अंगण, 
खेळ खेळूया सारे आपण
रंक आणखी राव, 
खेळू या रंक आणखी राव
याला जीवन ऐसे नाव.
माळ यशाची हासत घालू, 
हासत हासत तसेच झेलू
पराजयाचे घाव, 
झेलू या पराजयाचे घाव
याला जीवन ऐसे नाव.
मनासारखा मिळे सौंगडी, 
खेळाया मग अवीट गोडी
दु:खाला नच वाव, 
दु:खाला नच वाव
याला जीवन ऐसे नाव.
(दैनिक 'पुण्य नगरी', १७ जून २०१८)

- घनश्याम पाटील
7057292092

13 comments:

  1. बहोत बढिया...
    जीवन है अगर जहर तो पिना ही पडेगा...।

    ReplyDelete
  2. घनश्याम भाऊ, सुंदर. तुमच्या लेखणीचा "दमदारपणा" अशा लेखातही कायमच आहे. वस्तूतः जीवनाचे गणित सोपेच असते, परंतु आमच्या काही अवास्तव कल्पना आणि काही अनैसर्गिक भावना या गणिताला कठीण बनवतात. या काल्पनिक गणिताच्या उत्तराच्या शोधात मृगजळाशिवाय हाती काही लागत नाही, आणि मग आत्महत्या सारखे प्रकार घडतात, असे माझेही आकलन आहे.
    @लखनसिंह कटरे, बोरकन्हार,गोंदिया

    ReplyDelete
  3. माणूस कितीही ज्ञानी असला, विचारवंत असला, तत्त्वज्ञानी असला, जनतेच्या मनावर राज्य करणारा असला तरीही तो प्रथम सामान्य माणूस आहे हे अशा घटनांवरून लक्षात येते.

    ReplyDelete
  4. नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या माणसाला निश्चितच हा लेख जगण्याचं बळ देऊन जाणारा आहे. जीवनात सुखदुःख येतंच असतात, अश्यात मनाचं समतोल ढळू न देता स्वतःला सावरीत जीवन जगण्याची नवीन उर्मी निर्माण करणारा हा लेख अनेक वाचकांच्या मनावर छाप सोडणारा आहे.
    खूप छान लेख !

    ReplyDelete
  5. दुसऱ्यास आत्महत्येपासून परावृत्त करणारी व्यक्ती इथपर्यंत. विचार करेल असे वाटले नव्हते.
    समुपदेशक नेमण्याची गरज आहे.

    ReplyDelete
  6. मनाच्या घुसमटीला योग्य स्थितीवर आणून सोडणारा लेख....आज नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या अनेकांना बाहेर पडण्यासाठी अतिशय उत्तम मार्ग...सर जी सलाम तुमच्या लेखनीला

    ReplyDelete
  7. मनाच्या घुसमटीला योग्य स्थितीवर आणून सोडणारा लेख....आज नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या अनेकांना बाहेर पडण्यासाठी अतिशय उत्तम मार्ग...सर जी सलाम तुमच्या लेखनीला

    ReplyDelete
  8. माणूस कितीही मोठा होऊ द्या , पण सकारात्मक ऊर्जा हीच खरी संपत्ती आहे..... सर आपला लेख खूपच छान.

    ReplyDelete
  9. घनःशामजी हा लेख म्हणजे समुपदेशनाचा उत्तम नमुना आहे. आपण सर्वस्पर्शी उदाहरणं, दाखले, गीत, संदर्भ देवून या लेखाची श्रीमंती वाढवली आहे.
    याच्या प्रती सर्वत्र, विशेषतः उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी व आय. टी. क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना द्यायला हव्या असे मला वाटते.

    ReplyDelete
  10. समाजसापेक्श संदेश

    ReplyDelete
  11. घनश्याम सर, मानसिक ताण आणि तणाव ह्यावर तुम्हीं अगदी योग्य पद्धतीने लिहून मनातल्या मनात धुमसणाऱ्या व्यक्तींना मनातलं बोलण्याची खूप चांगली दीक्षा दिली आहे. योग्य व्यक्तीशी योग्यवेळी सांधलेला संवाद हेच ह्या समस्येवरचा उपाय होईल.

    ReplyDelete