Pages

Wednesday, April 18, 2018

प्रज्ञावंत इतिहास संशोधक डॉ. सदाशिव शिवदे

ही गोष्ट आहे 2006 ची. त्यावेळी आम्ही ‘चपराक’तर्फे उमेश सणस यांची ‘शिवप्रताप’ ही ऐतिहासिक कादंबरी प्रकाशित केली होती. छत्रपती शिवाजीमहाराज आणि अफजलखान यांच्यातील संघर्षावर ही अत्यंत रोमहर्षक कादंबरी आहे. या कादंबरीचे प्रकाशन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते झाले होते. शिवदिग्विजयाची रोमांचकारी कहाणी म्हणून ती वाचकप्रिय होत होती. या कादंबरीचे पहिले सविस्तर परीक्षण डॉ. सदाशिव शिवदे यांनी केले. ते दैनिक ‘सकाळ’च्या ‘सप्तरंग’ पुरवणीत प्रकाशित झाले. त्यावेळी त्यांच्याशी माझी जुजबी ओळख होती. लेखकाला तर ते ओळखतच नव्हते. 

या परीक्षणानंतर त्यांनी मला घरी भेटायला बोलावले. ‘चपराक’च्या मासिकाविषयीही तोपर्यंत त्यांना पुरेशी कल्पना नव्हती. आमच्या बराच वेळ गप्पा झाल्या. नंतर मी त्यांना ‘चपराक’चे अंक दिले आणि त्यासाठी लेखन करण्याची विनंतीही केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की ‘चपराक’ हे नाव त्यांना आवडले नाही. मी त्यांच्या मताचा आदर केला आणि बाहेर पडलो. 

रात्री दीडच्या दरम्यान त्यांचा फोन आला. इतक्या उशिरा फोन केल्याबद्दल प्रथम त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि म्हणाले, ‘‘तुम्ही गेल्यापासून मी ‘चपराक’चे अंक वाचतोय. ही फक्त चुकीच्या प्रवृत्तीला ‘चपराक’ नाही; हा तर आई तुळजाभवानीने तुम्हाला दिलेला आशीर्वाद आहे. ‘चपराक’ ही मला आद्याक्षरे वाटली. चतुरस्त्र, परखड, रास्त आणि कर्तव्यदक्ष! गजांतलक्ष्मी कायम तुमच्याकडे पाणी भरेल. या क्षेत्रात तुम्ही खूप यशस्वी व्हाल. ‘चपराक’चा अंक हातात येईपर्यंत नाव विचित्र वाटते; पण एकदा अंक वाचला की वाचणारा प्रेमात पडतो. अशा चपराकीची महाराष्ट्राला नितांत गरज आहे. आजपासून मला तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून मान्यता द्या!’’

त्यानंतर त्यांनी अंकावर सविस्तर लेखी अभिप्राय पाठवला. एक मोठा लेखक आमच्या परिवाराचा महत्त्वाचा घटक बनला. पुढे शिवदे सरांशी घनिष्ट संबंध आले. सातत्याने भेटी होऊ लागल्या. आम्ही एकत्र प्रवास केला. ‘आकाशवाणी’ सारख्या माध्यमातून एकत्र कार्यक्रमही केले. ‘चपराक’च्या अनेक कार्यक्रमांना ते अध्यक्ष, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. ‘चपराक’साठी त्यांनी विपुल लेखन केले. आमच्या काही ग्रंथांना प्रस्तावनाही लिहिल्या. 

डॉ. सदाशिव शिवदे हे मुळचे जावळी तालुक्यातील कुडाळचे. पेशाने गुरांचे डॉक्टर. त्यांच्या आयुष्यात एक घटना घडली आणि ते इतिहास संशोधनाकडे वळले. 

ही साधारण तीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पाचगणी जवळच्या हुमगावची. या गावात जत्रा भरली होती. पहिल्या दिवशी छबीना निघाला. दुसर्‍या दिवशी कुस्तीचा आणि तमाशाचा फड रंगला. या फडात एकाने छत्रपती संभाजीराजांचा इतिहास सांगितला. गर्दीतले लोक ऐकत होते. त्यात डॉक्टर सदाशिव शिवदेही होते. तरूण वयातल्या शिवदेंनी महाराजांचे ते चरित्र ऐकले आणि ते अस्वस्थ झाले. ते तो फड अर्धवट सोडून निघाले. कुडाळी नदीवरून जाताना ते बेचैन झाले. राजांचे असे अय्याशी, रंगेल वर्णन त्यांच्या डोक्यातून काही जाईना! मग ते परत फिरले. फडावरील मंडळींची आवराआवर सुरू होती. त्यांनी विचारले, ‘‘मगाशी संभाजीराजांची भूमिका कोणी केली?’’ त्यांनी सांगितले ते त्या तमाशा कंपनीचे मालकच होते. शिवदे त्यांना भेटले आणि रागाच्या भरात त्यांनी त्याच्या कानाखाली जाळ काढला. ‘‘संभाजीराजांचे हे विकृत चित्रण का रंगवता?’’ असे त्यांनी दरडावून विचारले.

त्याने सांगितले, ‘‘साहेब आम्हाला माफ करा. आम्ही वर्षानुवर्षे जे ऐकतोय तेच सादर करतो. महाराजांची आम्हाला खरी माहिती नाही. कुणाचा अभ्यासच नसल्याने आम्हाला पोटासाठी हे ऐकीव लोकांपुढे मांडावं लागतं.’’ त्यावर तेही चमकले. आपल्याला तरी महाराजांचा पूर्ण अभ्यास कुठे आहे, असा विचार करत ते बाहेर पडले. ही घटना मात्र त्यांच्या मनावर कोरली गेली.

सदाशिव शिवदे यांना बालपणापासून कवितांची आवड. अधूनमधून ते वृत्तपत्रातून लिहित असत. गुरांचे डॉक्टर असल्याने शेती, शेतकरी, गुरं हेच त्यांचं विश्‍व. 1995 ला ते सरकारी सेवेतून निवृत्त झाले आणि पुण्यात दाखल झाले. इथे आल्यावर सर्वप्रथम ते अखिल भारतीय इतिहास परिषदेत गेले. ललित साहित्याबरोबरच त्यांनी इतिहासाचा अभ्यास सुरू केला. भरपूर वाचन करणं, असंख्य संदर्भ तपासून पाहणं, भाषेचा अभ्यास करणं यात त्यांनी स्वतःला गाडून घेतलं. शिवाजी विद्यापीठातून त्यांनी एम. ए. मराठी केलं होतंच. पुण्यात त्यांनी इतिहास आणि संस्कृतचा अभ्यास केला. ‘मराठ्यांच्या इतिहासाची संस्कृत साधने’ या विषयावर पीएच. डी. केली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने तो प्रबंधही प्रकाशित केला.

कोणी न केलेलं काम आपण करायचं असा चंग त्यांनी बांधला. हुमगावची घटना डोक्यातून गेली नव्हतीच. त्यामुळे आधी त्यांनी छत्रपती संभाजीराजांच्या चरित्राचा अभ्यास सुरू केला. त्यातून ‘ज्वलज्ज्वलनतेजस संभाजीराजा’ हा संशोधनात्मक ग्रंथ साकार झाला. या चरित्रग्रंथाने छत्रपती संभाजीराजांविषयीचे अनेक गैरसमज दूर सारले. विश्वाास पाटील यांनाही ‘संभाजी’ ही कादंबरी लिहिताना या ग्रंथाचा संदर्भ घ्यावा लागला.
महाभारतात व्यास मुनींनी इतिहासाची जी व्याख्या केलीय तशी व्याख्या जगात आजवर कोणत्याच इतिहासकाराने केली नाही. ते म्हणतात,

इतिहास प्रदीपेन मोहावरणघातिना ।
लोकगर्भगृहं कृत्स्नं यथावत् संप्रकाशितम्॥

याचा अर्थ आहे, ‘‘इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे. या ज्योतीने अज्ञानरूपी अंधःकाराचा नाश होऊन आपल्या नगरीचे, पूर्वजांचे व राजाचे सत्य स्वरूप आपल्या नजरेसमोर उभे राहते.’’

त्यामुळे राष्ट्राची ही ज्योत काळवंडू नये यासाठी गेल्या वीस वर्षात जे सातत्याने झिजत आहेत, देहाची काडं करत आहेत त्यापैकी डॉ. सदाशिव शिवदे हे आजच्या महाराष्ट्रातलं एक महत्त्वाचं नाव होतं. ‘महाराणी येसूबाई’, ‘रणरागिणी ताराराणी’, ‘दर्याराज कान्होजी आंग्रे’, ‘सेनापती हंबीरराव मोहिते’, ‘शिवपत्नी सईबाई’, ‘छत्रपती राजाराम-महाराणी ताराराणी’ हे संशोधनात्मक ग्रंथ त्यांनी अभ्यासपूर्णरित्या साकारून आपला वैभवशाली इतिहास नव्या पिढीपुढे सशक्तपणे मांडला आहे. ‘परमानन्द् काव्यम्’चा अनुवाद त्यांनी केला. ‘मराठ्यांचे लष्करी प्रशासन’ हा त्यांचा अनुवादित ग्रंथही सर्वांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक आहे.  ‘युद्धभूमीवर श्रीशंभूराजे’, ‘स्वराज्याचे पंतप्रधान - मोरोपंत पिंगळे’ हे ग्रंथ इतिहासाच्या अभ्यासकांसाठी संजीवनी देणारे ठरलेत.

15 मे 1915 साली भारत इतिहास संशोधक परिषदेच्या व्यासपीठावर बोलताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणाले होते, ‘‘जर तुमच्या पूर्वजांच्या यशोदुंदुभीचा तुम्हास आदर असेल, जर तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या रक्तामांसाचे असाल, जर त्यांची स्मृती तुम्हाला कायम ठेवावी वाटत असेल तर तुम्ही इतिहास संशोधनाच्या या कार्यास मदत करा.’’ 

‘केसरी’तील लोकमान्यांचे हे भाषण वाचून प्रभावित झालेल्या डॉ. सदाशिव शिवदे यांनी निवृत्तीनंतर हा वेगळा मार्ग चोखंदळपणे निवडला आणि आज ते या क्षेत्रातील ‘मनोरा’ बनले आहेत. प्रताप दुर्गा महात्म्य (1749), सईदाकेकदी नोंदी नाटकम् (तमिळ नाटकातील ऐतिहासिक उल्लेख), मोरोपंत पिंगळे पंतप्रधान यांच्या वंशजांचा ब्रिटिश सरकारकडे अर्ज, भुईंजकर जाधवराव घराण्यातील एक महजर, तुळजाभवानीची भोपे यांना निजामाने दिलेली पर्शियन सनद, डोंगरगाव-जोरी पाटील घराण्याची हकिकत व महजर यावर त्यांनी संशोधन केले.

अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे सभासद ते अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. महाराष्ट्रातील युवा इतिहासकारांची त्यांनी एक फळी निर्माण केलीय. वृत्तपत्रातून, विविध नियतकालिकातून सातत्याने लेखन, अनेक इतिहास परिषदांत सहभाग, शोधनिबंध वाचन आणि मार्गदर्शन यामुळे त्यांची सुकीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. महाराष्ट्रातील अनेक ऐतिहासिक वाडे त्यांनी उजेडात आणले. पुणे सोडून महाराष्ट्रातील शंभर वाड्यांना त्यांनी भेटी दिल्या आणि लेखमाला चालवली. ‘महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे’ हा त्यांचा ग्रंथ दोन खंडात प्रकाशित झालाय. गुरांचे डॉक्टर असल्याने त्यांचे शेती जीवनाशी संबंधित अनुभवविश्व समृद्ध आहे. गुरं कसा लळा लावतात हे त्यांनी अनुभवलं. त्यातूनच त्यांनी ‘माझी गुरं, माझी माणसं’ हा अस्सल ग्रामीण कथासंग्रह लिहिला. तोही वाचकप्रिय ठरला. त्यांनी जी ऐतिहासिक काव्ये लिहिली त्यातील निवडक गीतांची ‘महाराष्ट्राचे महामेरू’ ही सीडीही प्रसिद्ध झाली आहे. मुख्य म्हणजे महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची मानपत्रे त्यांनी अस्सल ऐतिहासिक भाषेत लिहिली आहेत. लवकरच या मानपत्रांचे पुस्तक प्रकाशित करायचा त्यांचा मानस होता. ‘मानपत्र’ हा स्वतंत्र साहित्य प्रकार होऊ शकतो हे केवळ डॉ. सदाशिव शिवदे यांच्यामुळेच महाराष्ट्राला कळले.

छत्रपती शिवाजी महाराज हे अत्यंत विवेकशील व प्रज्ञावंत असल्यामुळे त्यांचे अत्यंत विश्वासू चिटणीस बाळाजी आवजी यांचा वंश त्यांच्या कारकिर्दीत वर आला. रियासतकार सरदेसाई यांनी लिहिले आहे -
‘‘शिवाजी महाराजांच्या राज्य स्थापनेत पेशवा मोरोपंत किंवा सेनापती प्रतापराव गुजर यांजप्रमाणे, किंबहुना त्यांच्याहून जास्त बाळाजी आवजी चिटणीस यांचा उपयोग झाला आहे. 32 वर्षे शिवाजी महाराजांचा हा विश्वासू लेखक असल्यामुळे तो त्यांचा केवळ द्वितीय अंतःकरण होता असे म्हटले तरी चालेल.’’
बाळाजी आवजी चिटणीसांचे सुपूत्र खंडो बल्लाळ चिटणीस या व्यक्तीचे कर्तृत्व हे मराठेशाहीच्या स्थैर्यास कारणीभूत आहे. त्यामुळेच बाळाजी आवजी चिटणीस चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ‘स्वामीनिष्ठ खंडो बल्लाळ चिटणीस’ पुरस्कार दिला जातो. गेल्यावर्षी तो डॉ. सदाशिव शिवदे यांना प्रदान करण्यात आला. यानिमित्त एका सच्च्या इतिहासकाराचा गौरव झाला. संभाजीराजांचे कर्तृत्व संशोधनातून वाचकांपुढे आणणार्‍या डॉ. शिवदे यांची कामगिरी मोलाची आहे. संभाजीराजांवर त्यांनी आजवर 750 हून अधिक व्याख्याने दिली असून शेवटपर्यंत त्यांचे अग्निहोत्र सुरूच होते. पत्नीच्या निधनानंतर खचून न जाता ते अव्याहतपणे कार्यरत होते. पूर्वी घरी गेल्यावर मायी जसे स्वागत करायच्या त्यात शिवदे सरांनी कधीही खंड पडू दिला नाही. म्हणूनच त्यांच्याकडे माणसांचा राबता असायचा.

इतिहास संशोधनाचे कार्य कसे असावे? असे विचारल्यावर डॉ. सदाशिव शिवदे काश्मीरचे कवी कल्हण यांच्या भाषेत सांगायचे,

श्लाणघ्यः स एव गुणवान्रागद्वेषबहिष्कृतः ।
भूतार्थकथने यस्स स्थेयस्येव सरस्वती ॥

(ज्याची वाणी राग-द्वेषांपासून अलिप्त होऊन ऐतिहासिक घटनांचे वर्णन करण्याच्या कामी दृढ राहते (कुठेही पक्षपात करीत नाही) तोच गुणवान पुरूष (अर्थात इतिहासलेखक) प्रशंसनीय समजावा.)

आजच्या वातावरणात इतिहास संशोधन म्हणजे मोठी शिक्षा वाटावी असे चित्र आहे. या द्वेषमूलक वातावरणात डॉ. शिवदे यांच्यासारखे अभ्यासक ठामपणे भूमिका मांडत होते. नवनवीन संशोधन पुढे आणत होते. म्हणूनच त्यांच्या या कार्याचे मोल शब्दातित आहे. 

मध्यंतरी मी फेसबुकला एक पोस्ट टाकली होती. ‘‘वा. सी. बेंद्रे यांच्यानंतर संभाजीराजांना जर कोणी खरा न्याय दिला असेल तर तो डॉक्टर सदाशिव शिवद्यांनी! बाकी विश्वास पाटलांसारख्या लेखकांनी यू ट्यूबसारख्या माध्यमांसाठी मनोरंजक ‘क्लिप’चे लेखन करावे.’’

आपण ही वस्तुस्थिती नाकारू शकत नाही. मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, मोडी या भाषा, लिपींचा अभ्यास, तर्कशुद्ध विवेचन, पुराव्यासह मांडणी, स्पष्ट भूमिका यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे ठरतात. 

सेवानिवृतीनंतर अविरत ध्यास घेऊन इतिहासाची ज्योत तेवत ठेवणारे डॉ. सदाशिव शिवदे हे खरे आजच्या पिढीचे आदर्श आहेत. त्यांच्या जाण्याने व्यक्तिशः माझे मोठे नुकसान झाले आहे. खरंतर मी त्यांच्या नातवंडाच्या वयाचा! पण त्यांनी माझ्याशी ‘मैत्री’ केली. ‘चपराक’साठी त्यांनी अनेकांना लिहिते केले. नवनवीन लेखकांना ते आमच्याकडे आवर्जून पाठवायचे. सर्वत्र ‘चपराक’विषयी भरभरून बोलायचे. सातत्याने फोन करून चर्चा करायचे. भेटायला बोलवायचे. त्यांनी मोडी लिपीत लफ्फेदार सही करून मला भेट दिलेली अनेक पुस्तके माझ्या संग्रहात आहेत.

मध्यंतरी त्यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली. त्यावेळी त्यांचा फोन आला की ‘‘आधी भेटायला या..’’ नेमके त्याचवेळी माझी आईही रुग्णालयात दाखल होती. प्रथमच त्यांनी बोलवूनही भेटायला गेलो नाही. त्यामुळे पुन्हा आता आमची भेट होणारच नाही ही कल्पनाही करवत नाही. 

डॉ. सदाशिव शिवदे यांच्यासारखे प्रज्ञावंत संशोधक त्यांच्या अभ्यासातून, कृतीशील विचारातून कायम जिवंत राहतात. त्यांच्या अनेक स्मृती आमच्याकडे आहेत आणि त्या आम्हाला प्रेरणा देत राहतील. एक अफाट ताकतीचा व्यासंगी इतिहासकार काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली.
- घनश्याम पाटील 
संपादक, प्रकाशक 'चपराक' पुणे 
७०५७२९२०९२ 

2 comments:

  1. खूपच छान शब्दांकन केलेत सर. माझीही भावपूर्ण आदरांजली शिवदे सरांना.

    ReplyDelete
  2. डॉ. शिवदे सरांना भावपूर्ण श्रद्धांजली !

    ReplyDelete