Pages

Tuesday, February 6, 2018

संमेलनाची शंभरी!

यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोदा येथे होत आहे. हे 91 वं संमेलन असल्यानं त्याची वाटचाल शंभरीकडं सुरू आहे. दरवर्षी असं साहित्य संमेलन घेणारी मराठी ही जगातली एकमेव भाषा असावी. आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर बडोद्यात होणारं हे पहिलंच संमेलन आहे. यापूर्वी स्वातंत्र्यपूर्व काळात बडोद्यात तीन साहित्य संमेलनं झाली होती. 1909, 1921 आणि 1934 साली झालेल्या या संमेलनांच्या अध्यक्षपदी अनुक्रमे कान्होबा रणछोडदास कीर्तिकर, साहित्यसम्राट न. चिं. केळकर आणि बडोद्याचे सुपूत्र चिं. वि. जोशी हे होते. यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत लक्ष्मीकांत देशमुख. पहिल्या तीन नावांची आणि देशमुखांची तुलना कुणीही करू नये! अशी तुलना अप्रस्तुत आहे. ‘खांडेकर-शिरवाडकरांच्या तुलनेचे साहित्यिक आज नाहीत,’ असं काही संपादक सांगत असले तरी ‘आज अत्रे-भावेंच्या तुलनेचे संपादकही नाहीत’ हेही सत्य आपण ध्यानात घ्यायला हवं. सगळ्याच क्षेत्रातला कस हरवत जाणं हा तर काळाचा महिमा आहे. त्यामुळं ‘आलिया भोगासी असावे सादर...’ म्हणत नव्या आव्हानांना सामोरं जायला हवं. 

कोणती आहेत ही आव्हानं? नव्या पिढीवर त्याचा काय परिणाम होईल? मराठी भाषेच्या अस्तित्वाची गेल्या काही काळात होणारी चर्चा कशाचं द्योतक आहे? या व अशा सगळ्या प्रश्नांचा आपण गांभिर्यानं विचार केला पाहिजे.

आपण आधी साहित्य संमेलनांचा विचार करूया! आपल्याकडं आधी ‘ग्रंथकारांचं संमेलन’ होतं. 1909 साली बडोद्यात झालेलं सातवं साहित्य संमेलन ‘महाराष्ट्र साहित्य संमेलन’ म्हणून ओळखलं गेलं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1954 साली दिल्लीत झालेल्या या संमेलनाची ही प्रादेशिक ओळखही पुसली गेली आणि ते ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ झालं. या नावाचा असा व्यापक विस्तार करण्यामागं त्यांची महत्त्वाची भूमिका होती. मराठी ही जगातील प्रमुख वीस भाषांपैकी एक भाषा आहे. त्यामुळं ते अखिल भारतीय व्हावं असं त्यांना वाटणं रास्तच आहे. आजची परिस्थिती मात्र फारच वेगळी आहे. आज या संमेलनाचं शब्दशः डबकं झालंय.

गेल्या काही वर्षात साहित्य संमेलनांची झालेली घसरण हा चिंतेचा विषय आहे. कोणीही उठतंय आणि समंलनाध्यक्ष होतंय. बरं, त्यांना दुषणं द्यावीत तर ते साहित्य महामंडळाच्या घटनेकडं बोट दाखवतात. जेमतेम हजार लोक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ठरवतात. त्यात काय राजकारण होतं? कोणत्या खटपटी-लटपटी केल्या जातात, त्यांचा चेहरा आणि मुखवटा कसा असतो? हे सर्व यापूर्वी आम्ही ‘चपराक’च्या वाचकांसमोर आणलंच आहे. 

औरंगाबादला कौतुकराव ठाले पाटील नावाचे एक गृहस्थ आहेत. या माणसाच्या नावापासूनच मला कौतुक वाटतं. साहित्यिक राजकारणातला हा ‘ढाण्या वाघ’ आहे. आजवर त्यांनी अनेक ‘चिरकुटांना’ संमेलनाध्यक्ष केलं आहे. त्यांनी ठरवलं तर शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अजित पवार असतील! तसं झालं तर आयोजकांना निधी गोळा करण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही. संमेलनात मद्याचे पाट वाहतील. सहभागी साहित्यिकांना उत्तम प्रतीचं शाकाहारी-मांसाहारी जेवण मिळेल. निवासाची पंचतारांकित व्यवस्था होईल. प्रसारमाध्यमांना वेगळे ‘प्रायोजक’ शोधावे लागणार नाहीत. संमेलनात नाचवण्यासाठी जगभरातील ‘हव्या त्या’ देखण्या ‘मॉडेल्स’ बोलावल्या जातील. सनी लिओनी किंवा पुनम पांडेसारख्या तेव्हाच्या ज्या कोणी ‘स्टार’ असतील त्या त्यांची ‘कला’ सादर करण्यासाठी निमंत्रित केल्या जातील. आयोजकांपुढचा गर्दी गोळा करण्याचा प्रश्‍न सुटेल आणि अशा निमंत्रितांमुळं ती नियंत्रित कशी करावी? असा काहीसा प्रश्‍न पडेल. गेल्या काही वर्षातले अध्यक्ष, साहित्यिक आणि साहित्य संस्थांचं राजकारण, संमेलनातील साहित्यिक कार्यक्रम हे सर्व पाहता वरचं ‘चित्र’ सहजपणे सत्यात येऊ शकतं. म्हणूनच संमेलनाची शंभरी भरत चाललीय असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये!

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभे राहिलेले उमेदवार शरद पवारांपासून नितिन गडकरीपर्यंत सर्वांचे उंबरठे झिजवतात. काही बड्या वृत्तपत्राचे संपादक एखाद्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी त्यांचं अस्तित्व पणाला लावतात. काही संपादक थेट निवडणुकीला सामोरं जात त्यांच्या त्या त्या भागातील वार्ताहरांना मतदारांची यादी देऊन मतपत्रिका हातात घेण्यासाठी पिटाळतात. काहीजण समीक्षकांना-प्रकाशकांना मेजवान्या देतात आणि त्यांचे त्यांचे ‘मतदार लेखक’ गाठण्याचा प्रयत्न करतात. काही प्रकाशकही आपापले लेखक संमेलनाध्यक्ष व्हावेत आणि आपली पुस्तकं खपावीत यासाठी प्रयत्नशील असतात. इच्छुक उमेदवार तयारीला लागल्यापासून आधी पाच-दहा वर्षे पेरणीही उत्तम करतात. साहित्य वर्तुळातील महत्त्वाच्या लोकांचे सातत्यानं दिवे ओवाळणं, त्यांच्या पुस्तकांवर गौरवपूर्ण परीक्षणं लिहिणं, त्यांचे सत्कार-सोहळे घडवून आणणं, त्यांची जितकी तळी उचलता येतील तितकी उचलणं हे सारं काही करतात. किंबहुना कोणते साहित्यिक प्रांतवाद जपतात, कोणाची कोणती विचारधारा असते, कोण कोणत्या जातीचा अभिमान बाळगणारे आहे, कोणाचे कुणाशी हितसंबंध आहेत, कोण कुणासोबत ‘मधुर’ संबंध जोपासतोय या सर्वांचा त्यांचा कमालीचा अभ्यास असतो. म्हणूनच संमेलनाध्यक्षाची प्रतिभा, त्याचा साहित्यिक वकुब, त्याचं वाचन, भाषेचं ज्ञान, सामाजिक आणि साहित्यिक भान, त्याचं व्याकरण, त्याचं निर्मळ अंतःकरण या व असल्या मूल्यांना या बाजारात काही किंमत नाही.

येनेकेनप्रकारे संमेलनाध्यक्ष होणं, सगळीकडं मिरवून घेणं, नंतर वर्षभर वाटेल ती उथळ विधानं करून चर्चेत राहणं हेच या लोकांचं जीवितकर्म झालंय. आपल्याकडं ‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ म्हटलं जायचं; पण या बिनडोक लोकांना मिळणारा प्रतिसाद आणि त्यांचे कौतुकसोहळे पाहता समाजाचीही कीव कराविशी वाटते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवाराच्या प्रसिद्धीची जबाबदारी पाहणारे, त्यांच्या मतपत्रिका घरोघरी जाऊन गोळा करणारे दलाल हमखास साहित्य संमेलनात ‘निमंत्रित’ म्हणून सहभागी असतात. गेल्या काही काळातल्या निमंत्रणपत्रिका पाहता ही नावं सहजपणे कुणाच्याही लक्षात येतील. 

बरं, संमेलनाध्यक्षपदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांची मजल कुठपर्यंत जावी? तर.. ‘‘मी निवडून आल्यास इतक्या कोटीचा प्रायोजक संमेलनासाठी मिळवून देतो’’ अशी हमी ते आयोजकांना देतात. मग त्यांच्या मतांचा ‘कोटा’ कुणाच्या पारड्यात पडेल हे सांगायलाच नको. पिंपरीत झालेल्या साहित्य संमेलनाचे आयोजक ‘गब्बर’ होते. त्यांनी मात्र साहित्यक्षेत्रावर पैशांची खैरात केली. पी. डी. पाटील नावाच्या एका धनदांडग्याचा आर्थिक उन्माद प्रत्येकाला दिसत होता. तेव्हाचे अध्यक्ष तर सोडाच पण माजी अध्यक्षांनाही त्यांनी लाखोंच्या थैल्या दिल्या. बाकीच्यांचे सोडा, पण सदानंद मोरे, नागनाथ कोत्तापल्ले अशा ज्येष्ठांनीही हे पैसे स्वीकारले. ‘शिक्षणसम्राट’ म्हणून मिरवणार्‍यांकडून असे पैसे घेताना आम्हाला संमेलनाचे पूर्वाध्यक्ष ‘भाट’ झालेले दिसत होते. सरकारकडून निधी स्वरूपात मिळणारे पंचवीस लाख रूपयेही परत करणारे पाटील हे  कदाचित एकमेव आयोजक असावेत. जे ‘लक्ष्मीपूत्र’ म्हणूनच कुविख्यात आहेत त्यांच्याकडं तथाकथित ‘सरस्वती मातेचे उपासक’ पाणी भरत होते.

यंदाची परिस्थिती याउलट आहे. ‘सहभागी लेखकांनी प्रवासखर्च आणि मानधनाचीही अपेक्षा ठेऊ नये’ असं आयोजकांनी जाहीर केलं आहे. हाही सगळा काळाचा महिमा! आमचे उस्मानाबादवाले गेली कित्येक वर्षे साहित्य संमेलन घ्यायची तयारी करत आहेत. ‘आमच्याकडे या, साधी चटणी-भाकरी खा आणि साहित्यिक कार्यक्रम करा’ असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना मात्र ती संधी दिली जात नाही. कारण यांच्या ‘हरतर्‍हेच्या’ मागण्या कशा पूर्ण होतील?

पिंपरीतील थाटामाटाचं दडपण आल्यानं मागच्या वर्षी डोंबिवलीच्या  साहित्य संमेलनाकडं अनेक साहित्यरसिकांनी पाठ फिरवली. आमचा सुनील जवंजाळ सांगोला तालुक्यातील चोपडीसारख्या दुष्काळी गावात त्याच्या कादंबरीच्या प्रकाशनाचा कार्यक्रम घेतो; तरी हजार-पाचशे लोक सहजपणे जमतात; मात्र डोंबिवलीच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कवी संमेलनाला जेमतेम शे-दीडशे लोक उपस्थित असणं हे कशाचं लक्षण आहे? वर्षानुवर्षे निष्ठेनं साहित्य संमेलनाला येणारे साहित्यरसिकही संमेलनाकडं का पाठ फिरवत आहेत याचा विचार झाला नाही तर संमेलन म्हणजे केवळ एक सोपस्कार उरेल.

साहित्य संमेलनात साहित्यिक कार्यक्रमापेक्षा सांस्कृतिक कार्यक्रमांचीच अधिक चर्चा होते. कोणत्या नट-नट्या सहभागी झाल्यात, उद्धाटनाला कोण येणार, राजकीय नेते काय गंमतीजमती करणार, कोण कुणाची खेचणार, कोणते नवे वाद उद्भवणार, इतकेच काय तर जेवणाचे ‘मेन्यू’ काय असणार यावरच आमच्याकडे अधिक चर्चा होते. संमेलनात वर्षानुवर्षे तेच ते ठराव मांडले जातात. बेळगावसारख्या विषयावर ठराव मांडणे हा केवळ सोपस्कारच झालाय का? त्यांच्या वेदना आपल्याला खरंच कळल्यात का? कळल्या असतील तर संमेलनाध्यक्ष, महामंडळाचे अध्यक्ष, आयोजक आणि अर्थातच पर्यायानं सरकार त्यावर वर्षभर काय विचार करतं, काय कारवाई करतं? हे तपासलं तर आपल्याला नैराश्यच येईल. मग साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणजे तीन दिवसांचा गुळाचा गणपती, संमेलन म्हणजे बैलबाजार किंवा संमेलन म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग अशी टीका झाली तर त्यात गैर ते काय?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविता सादर केली आणि तो कवी महाराष्ट्रापुढं ताकतीनं आला अशी उदाहरणं मोजकीच आहेत. संमेलनाध्यक्ष, आयोजक आणि साहित्य संस्थांच्या पदाधिकार्‍यापुढं लाळघोटेपणा करणारे तेच ते कवी मराठीला ऊर्जितावस्था मिळावी यासाठी काय घंटा योगदान देणार? आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून येणार? म्हणून हे ग्रहण सुटलं पाहिजे. आज खेड्यापाड्यात जी छोटी संमेलनं होतात ती या अखिल भारतीयच्या तुलनेत अधिक दमदार होतात. सातारा ग्रंथ महोत्सवाला जी प्रतिष्ठा प्राप्त झालीय तितकीही प्रतिष्ठा अखिल भारतीयला राहिली नाही. उलट महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी म्हणतात, ‘‘हे फक्त प्रदर्शन आहे, विक्री केंद्र नाही. त्यामुळं इथं या, तुमच्या पुस्तकाची एक एक प्रत दाखवा आणि निघा....’’ मग साहित्य संमेलनात ‘ग्रंथ प्रदर्शन आणि विक्री’ या कारणासाठी विक्रेत्यांकडून आणि प्रकाशकांकडून भाडं वसूल करताना तुम्हाला लाज वाटत नाही का? ‘साहित्य महामंडळ आर्थिक अडचणीत आहे. प्रत्येकानं किमान एक-एक रूपया द्यावा’ अशी अपेक्षा व्यक्त करूनही तुमच्या आवाहनाला कोणी भीक घालत नाही त्याची हीच कारणं आहेत. साहित्याविषयी, साहित्य संस्थांविषयी, साहित्यिकांविषयी नव्या पिढीला आदर नसण्याचं द्योतक अशा लोकांच्या मानसिकतेत आहे. 

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या पुस्तकांविषयी नव्या पिढीला विचारा. त्यांची चार-दोन पुस्तकं सांगता आली तरी खूप झालं. सदानंद मोरेंना राजकीय पाठबळ असल्यानं किंवा उत्तम कांबळे बर्‍याच काळ एका बड्या वृत्तपत्राचे संपादक राहिल्यानं ‘साहित्यिक चर्चेत’ तरी आहेत. सबनीसांसारखा वाचाळवीर मात्र रोज नवनवे वाद आणि वितंडवाद घालत असताना त्यांची किती पुस्तकं आजच्या तरूणाईपर्यंत गेलीत? अक्षयकुमार काळेसारखा ‘विद्वान’ अनेक विषयांवर ‘संशोधन’ करून लिहितो पण ते आजच्या पिढीपर्यंत पोहोचतं का? फ. मु. शिंदेसारख्या मंचीय कवीच्या त्याच त्या कविता किती काळ ऐकणार? लक्ष्मीकांत देशमुख त्यांच्या ‘प्रशासकीय’ मानसिकतेतून बाहेर पडलेत का? रा. ग. जाधव, द. भि. कुलकर्णी अशा दिग्गजांची समीक्षा सामान्य वाचकांपर्यंत पोहोचलीय का? नसेल तर यासाठी साहित्य संमेलनांनी, साहित्य संस्थांनी किंवा आपल्या सरकारनं काही भरीव केलंय का? 

एखाद्या वर्षी साहित्य संमेलन रद्द करा आणि काही चांगली पुस्तकं प्रकाशित करा. भले, इथंही कमिशनबाजी केली तरी चालेल पण काही प्रकाशकांची दर्जेदार पुस्तकं विकत घेऊन ती शाळा, महाविद्यालयांपर्यंत, खेड्यापाड्यातील ग्रंथालयांपर्यंत पोहोचवा. काही पुस्तकांवर चर्चा घडवून आणा. लेखक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवा. तुमची संमेलनातील अय्याशी आणि मिरवून घेण्याची हौस यापेक्षा हे निश्चितच महत्त्वाचं आहे. 

एकीकडं परंपरा-परंपरा म्हणून मिरवायचं आणि दुसरीकडं आपणच भाषेचा, साहित्याचा खून करायचा हे काही बरं नाही. आजच्या पिढीनं सकस साहित्य वाचावं, त्यांच्यात ‘विचार’ करण्याची क्षमता वाढावी यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. साहित्य संमेलनाचं जत्रा-यात्रांचं स्वरूप भाषेची धुगधुगी जिवंत ठेवतं हे जरी खरं असलं तरी ‘अशा जगण्यापेक्षा मरण परवडलं’ असं वाटायला नको. 

मुळात आपण ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’ या संदेशाप्रमाणे खूप अल्पसंतुष्ट आहोत. म्हणजे एखाद्याला महिना चाळीस हजार रूपये पगार असेल तर तो म्हणेल, ‘मला देवानं भरपूर दिलंय. मी आहे त्यात समाधानी आहे.’ पण वस्तुस्थिती ही असते की साल्या यापेक्षा जास्त कमावण्याची तुझी लायकीच नाही! तू ना कुठला चांगला व्यवसाय करून यशस्वी होणार ना तुझा पगार चाळीस हजारांवरून दहा लाखावर जाणार! मग तुला ‘समाधान’ मानण्यावाचून पर्यायच नाही. तशी आपलीच फसवणूक आपणच करू नये! साहित्य संमेलनं किती महत्त्वाची आहेत, ती कसा साहित्यिक झरा पाझरत ठेवतात, त्यांचं साहित्यिक योगदान किती मोठं आणि श्रेष्ठ आहे हे सांगताना यात आणखी काय विधायक आणि सकारात्मक बदल घडवता येतील, ते जास्तीत जास्त सर्वसमावेशक कसे होईल, इथं केवळ आणि केवळ निखळ साहित्यालाच कशी प्रतिष्ठा मिळेल, सर्व राजकारण बाजूला सारून गुणवंतांना संमेलनं कसा न्याय देतील या दृष्टिनं विचार झाला पाहिजे. 

असं झालं तरच संमेलनाध्यक्ष तीन दिवसाचा गुळाचा गणपती वाटणार नाही. साहित्य संस्थांविषयी लोकांच्या मनात प्रेमभाव निर्माण होईल. साहित्यिकांविषयी आदर वाटेल! आणि नाही झाले तर शंभरीकडं वाटचाल करणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची शंभरी भरेल हे नक्की!
घनश्याम पाटील
संपादक, ‘चपराक’, पुणे
चलभाष - 7057292092

13 comments:

  1. खरच पुस्तकं वाटली पाहिजेत....साहित्यातील वास्तव विस्तव मांडला आहे...

    ReplyDelete
  2. दाग अच्छे है म्हणणारांची तडफेने केलेली धुलाई .....साहित्य स्वच्छता अभियानास मनापासून शुभेच्छा.......

    ReplyDelete
  3. खरच पुस्तकं वाटली पाहिजेत....साहित्यातील वास्तव विस्तव मांडला आहे...

    ReplyDelete
  4. परखड आणि साक्षेपी.
    सत्याची कास धरतांना आपण कुणाची भिडभाड ठेवत नाही. कुणाचे लांगुलचालन करत नाही. मळलेल्या वाटेवर चालत नाही. स्वतः नवा मार्ग दाखवतात आणि त्यावर स्वतः पहिलं पाऊल टाकतात. तेही हातात एक दीप घेवून. सोबत येणाऱ्यांची पाऊल वाट प्रकाशित करण्यासाठी.

    ReplyDelete
  5. अखिल भारतीय साहित्य संमेलन हे आता राजकीय अधिवेशन झाले आहे. हे असेच चालू राहिल्यास शंभराव्या संमेलनात व्यासपीठावर सर्व पक्षीय राजकीय नेता आणि श्रोते राजकीय कार्यकर्ते असतील. त्यावेळी विविध पक्षाची माहिती देणारे स्टॉल असतील, जेथे पक्षांचे अहवाल, स्मरणीका आणि फोटोंचे प्रदर्शन असेल. असो. या संमेलनाला पर्यायी संमेलन चालू व्हावे. साहित्यीकांचा आणि वाचाकांचा प्रचंड प्रतिसाद मिळेल. ज्याप्रमाणे कॉग्रेस पक्षाच्या नेतृत्वाला कंटाळलेल्या जनतेला नरेंद्र मोदींच्या रूपाने पर्याय मिळाला होता त्याप्रमाणे.

    ReplyDelete
  6. खूपच सडेतोड आणि परखड लेख...
    जिंदाबाद...

    ReplyDelete
  7. धू धू धुलाई! परखड लेख....

    ReplyDelete
  8. लग्नात नवरा नवरीसाठी आणि व-हाड जेवणासाठी येतं . तसे साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष मिरवण्यासाठी / भाषण देण्यासाठी येतात तर रसिक वाचक साहित्य मेजवानी करिता येतात परंतु पदरी फक्त निराशाच पडत असते . साहित्य संमेलनातून फार काही घडताना दिसून येत नाही . त्यामुळे साहित्य संमेलना पेक्षा "अखिल भारतीय मराठी ग्रंथ प्रदर्शन "तेवढेच आयोजित करावीत .

    ReplyDelete
  9. अतिशय चोख शब्दात झाडाझडती घेतलीय. अध्यक्षीय निवडणूक हा तर फार्सचं झालाय। अकरा कोटी मराठी माणसांचा हा आनंदोत्सव आणि अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मतदार फक्त १०७०. बरं यांना हा मतदानाचा अधिकार कोणत्या निकषावर दिला जातो यावर कोणी प्रकाश टाकेल का. मतपत्रिका निवडणूक अधिकाऱ्यांकडे थेट जाणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र मतदार त्या आपल्या पसंतीच्या उमेदवाराकडे सुपूर्द करतात. म्हणजे गोपनीयतेची ऐसी की तैसी. निवडणुकीतील भिकार राजकारणामुळे कितीतरी नामवंत साहित्यिक अध्यक्षपदापासून दूर राहिले आहेत. निवडणुकीला खरंच पर्याय नाही का ? साहित्यिक कर्तृत्वाची दखल घेऊन हे पद सन्मानाने मिळेल अशी काही व्यवस्था नाही का निर्माण करता येणार.?

    ReplyDelete
  10. घनश्याम पाटील साहेब , तुम्ही आचार्य अञे यांचे वारसदार आहात .

    ReplyDelete
  11. सडेतोड बेधडक लेख अभिनंदन

    ReplyDelete
  12. अतिशय पोटतिडकीतून मांडले आहेत विचार सर ।

    ReplyDelete
  13. चपराक नावाला साजेसा फटका!
    चहुबाजूला लांगुलचालनाचं वारं वाहत असताना घनश्याम पाटील नावाचं सडेतोड वादळ वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमत दाखवतंय, हे फार म्हणजे फारच आशादायी आहे हो!

    ReplyDelete