Pages

Sunday, October 15, 2017

इवलासा वेलू... गेला गगनावरी!


सध्याचे दिवस वाचनसंस्कृतीसाठी अत्यंत पोषक आहेत. तरूण पिढी त्यादृष्टिनं सजग आहे. मराठी साहित्यात कधी नव्हे इतका वाचक तयार होतोय आणि हे केवळ नव्यानं लिहिणार्‍यांमुळं शक्य होतंय. दीपस्तंभ ठरावी अशी एक पिढी बाजूला पडून आजच्या काळाचं प्रतिनिधित्व करणारे लेखक तयार होत आहेत आणि मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षेच्या दृष्टिनं हे चित्र अत्यंत सकारात्मक असं आहे. काही जुने लेखक आणि प्रकाशक ‘वाचतं कोण?’ असा अप्रस्तुत प्रश्न सातत्यानं उभा करत असतानाच मराठीतील सशक्त साहित्य जोमात पुढं येत आहे. हा बदल लक्षात न आल्यानं ‘अंतर्नाद’सारखी काही दर्जेदार नियतकालिकं उचक्या घेत आहेत. काहींनी केव्हाच माना टाकल्यात. वाचकांची ही बदलती अभिरूची लक्षात घेणारे, स्वतःचा नवा वाचक तयार करणारे, बदलत्या तंत्रज्ञानाची आव्हानं स्वीकारणारे मात्र यशस्वी घोडदौड करत आहेत. सर्व नकारात्मकता बाजूला सारून ‘मासिक’ या संकल्पनेलाच ऊर्जितावस्था देण्यात ‘चपराक’नंही खारीचा वाटा उचलला आहे.

एक दर्जेदार वृत्तसाप्ताहिक, परिपूर्ण मासिक आणि वैविध्यपूर्ण विषयांवरील उत्तमोत्तम पुस्तकं प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था म्हणून ‘चपराक’ सर्वदूर पोहोचला आहे. त्यात ‘चपराक‘चा दिवाळी महाविशेषांक म्हणजे तर शिरोमणीच असतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातील सर्व प्रमुख शहरात आणि इतर काही देशातही ‘चपराक’चे वाचक आहेत. मायमराठीची ही पताका डौलात फडकत असताना वाचनसंस्कृतीची कोणीही चिंता करण्याचं कारण नाही. 

मराठी साहित्याला प्रतिसादशून्यतेचं ग्रहण नवं नाही. प्रस्थापितांची उदासीनता कायम मारकच ठरत आलीय. त्यामुळं कुणालाही न जुमानता स्वतःची जागा स्वतः तयार करणं हाच आजच्या साहित्यिकांपुढील पर्याय आहे. समाजमाध्यमांचा वाढता आवाका ध्यानात घेता हे मुळीच अवघड नाही. तरूणांचे लाखोंनी वाचले जाणारे ब्लॉग याची साक्ष पटवून देतात. शिवाय ‘चपराक’सारखी नियतकालिकं नवोदित लेखकांच्या पाठिशी भक्कमपणं उभी आहेत. सध्या भूमिका घेणारी वृत्तपत्रं, मासिकं, साहित्यिक, साहित्यसंस्था दुर्मीळ होत चालल्यानं मराठी साहित्याचं मोठं नुकसान होत आहे.

विषय कोणताही असो, सर्वत्र गुडीगुडीचा मामला. ‘तू मला ओवाळ आता मी तुला ओवाळतो’ असं चित्र! मराठीत ‘समीक्षा’ नावाचा प्रकार अस्तित्वात आहे की नाही असा प्रश्न पडण्यासारखी परिस्थिती. ज्या दगडांना शेंदूर फासून ठेवलाय त्यांचंच सातत्यानं महात्म्य, त्यांचीच पूजा! नव्यांसाठी मात्र कायमस्वरूपी ‘प्रवेश बंद’चा अलिखित फलक! वर उमलते अंकुर फुलत नाहीत, नवोदितांचं दर्जेदार लेखन पुढे येत नाही, वाचक कमी होत चाललेत अशी नेहमीची रड आहेच. या बजबजपुरीत अनेकजण आपापल्यापरीनं धडपडत आहेत, स्वतःचं विश्व निर्माण करत आहेत ही म्हणूनच सुखावह बाब आहे.

उत्तुंगतेचा ध्यास घेताना जुन्यांचा आदर्श  ठेवला पाहिजे. त्यांनी जे ‘मनोरे’ उभारलेत त्याविषयी कायम कृतज्ञ राहिलं पाहिजे. मात्र ही कृतार्थता जपताना आपल्याला आणखी पुढं जाता आलं पाहिजे. आपण त्यातच अडकून पडतो. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, मंगेश पाडगांवकर अशांच्या कर्तृत्वाविषयी मनात श्रद्धाभाव जरूर असू द्या; त्यांचा आदर्श ठेवा पण ‘त्यांच्यापेक्षा भारी कोणी होणारच नाही’ हा न्यूनगंड काढून टाका. जे जे अचाट आहे ते ते मराठी माणूस करतो. साहस त्याच्या रक्तातच आहे. त्याला कसल्याच सीमा नाहीत. त्याला कोणी रोखू शकत नाही. मूठभर मावळे हाताशी घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे शिवराय ज्या मातीत होऊन गेलेत ती माती पराक्रमाची परंपरा कधीही खंडित होऊ देणार नाही. आपण फक्त भक्कमपणं उभं राहणं गरजेचं आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवे मानदंड रचण्यासाठी तरूणाईनं सज्ज झालं पाहिजे. आजच्या काळाची आव्हानं लक्षात घेऊन मार्गक्रमणा केल्यास आपल्याला कोणीही थांबवू शकणार नाही. प्रत्येक क्षेत्रात मराठी माणसानं इतकं अफाट योगदान दिलं पाहिजे की त्याचा जगालाही हेवा वाटावा. हा विश्वास जागविण्यासाठीच ‘चपराक’ कार्यरत आहे.

आपल्याकडची राजकीय अस्थिरता कधीही संपली नाही, संपणार नाही. लोकशाही व्यवस्थेत ती संपेल असं गृहितही धरता येणार नाही. आपल्यावर सातत्यानं निसर्ग कोपतोय. काही ठिकाणी मानवनिर्मित दुष्काळही पडतोय. सरकारची उदासीनता याला खतपाणीच घालते. ‘देश आगे बढ रहा है’, ‘सब का साथ, सब का विकास’ असं म्हणत आपण किती मागे जातोय याचा पत्ताही नाही. बरं, तूर्तास तरी याला काही पर्यायही दिसत नाही. कॉंग्रेसच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळलेल्या लोकांनी परिवर्तन घडवलं. हे परिवर्तन मात्र ‘आगीतून उठून फुफाट्यात’ यापेक्षा फारसं वेगळं नाही. 
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर सध्याच्या विरोधकांची सर्वात मोठी कर्तबगारी कोणती? तर त्यांनी आपल्या जातीय अस्मिता कमालीच्या टोकदार केल्या. कालपर्यंत सत्तेत असणारे आज सामान्य माणसाचा, त्याच्या जगण्याचा विचार करत असल्याचं भासवू लागले. ज्यांनी कोमात ढकललं तेच ‘बघा बघा माय, कसा मरणाला टेकलाय...’ म्हणून गळे काढू लागले. वेश्येनं पतिव्रता धर्म शिकवणं म्हणतात ते यालाच! सामान्य माणूस म्हणून आपलं दुर्दैव इतकंच की, ही परिस्थिती बदलावी म्हणून आपण ज्या विश्वासानं नव्या राज्यासाठी नवे गडी निवडले तेही याच माळेचे मणी निघाले. त्यांचा शिरोमणी त्यातल्या त्यात बराय एवढंच! 

मोदी सरकारनं मागच्या वर्षी नोटाबंदी केली. सामान्य माणसाला त्याचा मोठा फटका बसला. त्यानं तो कसलीही कुरबूर न करता सहन केला कारण त्यामागं पंतप्रधानांनी दाखवलेली स्वप्नं होती. काळा पैसा बाहेर येईल, भ्रष्टाचाराला चाप बसेल या भावनेनं कुणीही त्याचा बागुलबुवा केला नाही. स्वकमाईच्या छोट्या छोट्या रकमा हातात येणं ही देशभक्ती वाटू लागली. त्यातून पुढं काय साध्य झालं या फक्त चर्चेच्याच गोष्टी ठरल्या.

नंतर जीएसटीनं कंबरडं मोडलं. त्यातूल ‘आर्थिक शिस्त’ लागेल असं सांगितलं जातंय. प्रत्यक्षात मात्र अनेकजण कोलमडून पडलेत. छोट्या उद्योजकांना त्याची मोठी किंमत मोजावी लागलीय. केवळ ‘चपराक’बाबत बोलायचं झालं तर गेल्या वर्षी झालेल्या नोटबंदीमुळं दिवाळी अंक विक्रीवर वाईट परिणाम झाला. जाहिराती रोडावल्या. नंतर डोंबिवलीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं. आजवरच्या इतिहासात प्रथमच असं झालं की संमेलनात प्रकाशकांचा वाहतूक खर्चही निघाला नाही. त्यात ‘संमेलनात पुस्तक ‘प्रदर्शन’ असतं. प्रदर्शनात फक्त पुस्तकांच्या एक-दोन प्रती आणून त्या दाखवायच्या असतात’ असं विधान करून अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांनी प्रकाशकांच्या जखमेवर मीठ चोळलं. ‘संमेलनात ग्रंथप्रदर्शन आणि ‘विक्री’ असते’ याचा त्यांना सोयीस्कर विसर पडला. म्हणूनच सामान्य वाचकांकडून, रसिकांकडून दहा-दहा रूपयांची मदत वारंवार मागूनही साहित्य महामंडळाला मराठी माणसानं ठेंगा दाखवलाय.

ग्रंथव्यवहाराच्या दृष्टिनं नोटाबंदी, साहित्य संमेलन यानंतर पुढचं अरिष्ट आलं ते जीएसटीचं. या काळात पुस्तकांची विक्री मंदावलीय. कागदाचे, शाईचे दर वाढलेत. अनेक दिवाळी अंक त्यामुळं नेहमीपेक्षा कमी पानांचे झालेत. काहींना किंमती वाढवाव्या लागल्यात. आर्थिक गणितं जुळवणं भल्याभल्यांना कठीण गेलंय.

असं सारं चित्र असताना ‘चपराक’ला मात्र वाचकाश्रय मिळालाय. या काळात ‘चपराक’ तगून राहिला तो वाचकांच्या निर्व्याज प्रेमामुळं. अंकाच्या वर्गण्या येण्याचं प्रमाण दुपटीनं वाढलंय. जाहिरातदारांनीही नेहमीप्रमाणं विश्वास दाखवलाय. पुस्तकांच्या दुकानातून अत्यल्प विक्री होत असली तरी थेट ‘चपराक’च्या कार्यालयातून, ऑनलाईन विक्री मात्र वाढलीय. शालेय जीवनानंतर ज्यांचा वाचनाशी दुरान्वयानेही संबंध नव्हता त्यांच्या डोक्यात आम्ही नवनवे विषय घातले. त्यांना लिहितं केलं, बोलतं केलं. त्यांची अभिरूची जागृत करून संबंधित पुस्तकं त्यांच्यापर्यंत पोहोचवली. त्या अनुषंगानं त्यांनी इतर पुस्तकांचंही वाचन सुरू केलं. ‘चपराक’नं असा स्वतःचा वाचक निर्माण केलाय. ज्यांना ‘मासिक’ म्हणजे काय? हे कधी माहीतच नव्हतं किंवा ज्यांनी अभ्यासक्रमाच्या पुस्तकांशिवाय एकाही ललित, वाङमयीन पुस्तकाला कधीच हात लावला नव्हता त्यांच्याकडं आज ‘चपराक’चे सर्व अंक आहेत. आपल्या पुस्तकांचा संच त्यांच्या घरी त्यांनी अभिमानानं ठेवलाय. ती पुस्तकं त्यांनी वाचलीत आणि त्यावर ते वेळोवेळी चर्चाही करतात. ही आमची खरी उपलब्धी! सहा राज्यातील अशा नव्या मराठी वाचक आणि लेखकांपर्यंत ‘चपराक’चा विस्तार झालाय. यंदाच्या या दिवाळी महाविशेषांकाचीही विक्रमी स्वरूपात पूर्वनोंदणी झालीय. इवलासा वेलू गगनावर गेलाय. चित्रकार संतोष घोंगडे यांनी साकारलेलं या अंकाचं मुखमृष्ठ हेच तर सुचवतं.

समाजानं साहित्याभिमुख झालं पाहिजे असं म्हणताना साहित्यिकांनीही समाजाभिमुख होणं गरजेचं आहे. सामान्य माणसाच्या व्यथा, वेदना कागदावर उतरल्या तरच तो तुम्हाला स्वीकारेल. हातात लेखणी किंवा एखाद्या वाहिनीचा बूम आहे म्हणून कुणाचे तरी लांगुलचालन केलेच पाहिजे, त्यांची तळी उचललीच पाहिजे असा काही नियम नसतो. सत्याची चाड असणारे आणि त्यासाठी वाटेल ती किंमत मोजणारे अनेक पत्रकार आपल्याकडं होऊन गेलेत. त्यांच्याच पुण्याईमुळं आपली थोडीफार विश्वासार्हता टिकून आहे. अन्यथा लोकांनी आजच्या पत्रकारांना धोबीपछाड केलं असतं.

‘मराठीतला सगळ्यात विक्रमी दिवाळी महाविशेषांक’ अशी गेल्या काही काळात ‘चपराक‘ची ओळख झालीय. नव्या-जुन्या लेखकांचा संगम साधत आम्ही सर्वोत्तम ते दिलेय. या अंकात ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक अकिलन, डॉ. द. ता. भोसले, सदानंद भणगे, विद्या बयास, अमर कुसाळकर, अविनाश हळबे, चंद्रलेखा बेलसरे, सरिता कमळापूरकर यांच्या कथा दिल्यात. प्रा. बी. एन. चौधरींची अहिराणी कथा दिलीय. दुर्दैवी योगायोग म्हणजे ‘चपराक’ परिवाराचे लेखक ह. मो. मराठे यांची ‘श्रद्धांजली’ ही व्यंग्यकथा. त्यांची ही शेवटची कथा ठरावी आणि त्यांनाच ‘श्रद्धांजली’ वहावी लागावी ही फार वेदनादायी बाब आहे. ‘चपराक’ परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली!

रमेश वाकनीस यांची संपूर्ण कादंबरी या अंकात दिलीय. ती आपणास निश्चितच आवडेल. व्यक्तिचित्रण विभाग सशक्त आणि प्रेरणादायी झालाय. डॉ. माधव पोतदार, डॉ. चित्रलेखा पुरंदरे, सुनिताराजे पवार, लक्ष्मीकांत देशमुख, शुभांगी गिरमे, अर्चना डावरे, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. सदाशिव शिवदे, सुरेखा शहा आदींनी त्यासाठी हातभार लावलाय. शंभरहून अधिक कविता दिल्यात. प्रस्थापितांबरोबर नवोदितांनाही हक्काचं व्यासपीठ दिलंय. भाऊ आणि स्वाती तोरसेकर, डॉ. न. म. जोशी, प्राचार्य प्र. चिं. शेजवलकर, प्रा. मिलिंद जोशी, संजय सोनवणी, उषा मंगेशकर, उमेश सणस, श्रीराम पचिंद्रे, उद्धव कानडे, प्रिया धारूरकर, संजय क्षीरसागर, संजय वाघ, अनिरूद्ध जोशी, श्रीपाद ब्रह्मे अशा सर्वच मान्यवरांचे लेख आपला दिवाळीचा आनंद द्विगुणित करतील. किमान पंधरा पुस्तकांचा खाऊ या एकाच दिवाळी महाविशेषांकात दिलाय. त्यामुळं तो आपल्या पसंतीस उतरेल याची संपादक म्हणून खात्री आहे. 

आपणा सर्वांना या प्रकाशोत्सवाच्या शुभेच्छा देतो, सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आगामी काळातही ‘चपराक’ कायम विविध क्षेत्रातील समाजद्रोह्यांवर तुटून पडेल, चांगले ते स्वीकारेल आणि वाईट ते अव्हेरेल याची ग्वाही देतो आणि थांबतो.
- घनश्याम पाटील 
संपादक, 'चपराक', पुणे 
७०५७२९२०९२


1 comment:

  1. परखड तरीही आशादायी.
    मराठी लेखक-वाचकांचं हक्काचं व्यासपिठ !

    ReplyDelete