Pages

Wednesday, August 16, 2017

व्यर्थ न हो बलिदान!


  देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्षे पूर्ण झाली. सत्तर वर्षांचा कालखंड हा एका देशासाठी, जगासाठी छोटा असू शकतो. मात्र एका व्यक्तिचा विचार करता तो त्याचे आयुष्य व्यापून टाकणारा कालखंड असतो. देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी जन्मलेली एक पिढी आता वृद्धावस्थेत आहे. या पिढीने जी स्थित्यंतरे बघितली ती महत्त्वाची आहेत. गेल्या दशकापासून थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या दूरदृष्टीमुळे आपण महासत्तेची स्वप्ने बघितली. धड चांगला माणूस होण्याचीही आपली योग्यता नसल्याने महासत्ता हे दिवास्वप्नच ठरते आहे. स्वार्थाच्या मागे लागल्याने आपल्याला 'स्वअर्थ' काही लक्षात येत नाही. 

  उत्तरप्रदेशमधील गोरखपूरात प्राणवायुच्या अभावामुळे साठहून अधिक बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा आकडा आणखी वाढल्याचे कळते. हा प्रकार कशामुळे झाला, कुणामुळे झाला, त्यांच्यावर काय कारवाई करणार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ चूक की बरोबर या व अशा विषयावर जोरदार रणकंदन सुरू आहे. हे करतानाच आपली गोकुळाष्टमीची तयारीही जोरदारपणे सुरू आहे. लाखोंच्या दहीहंड्यांचे थर राजकारण्यांनी लावलेत. बायका तालासुरात नाचवल्या जात आहेत. मद्यांचे पाट वाहत आहेत. साठहून अधिक बालके मरूनही आम्हाला त्याचे काहीच वैषम्य वाटत नाही. या आपत्तीचे सूतक देशबांधव म्हणून आम्ही पाळत नाही. उलट नवरात्रोत्सव आणखी जोरात साजरा करण्यासाठी काय करता येईल याचे चर्वीतचर्वण मेजवान्या झोडत करतो. या सत्तर वर्षात इतका निर्ढावलेपणा आमच्यात भिनलाय. जवळच आलेल्या गणेशोत्सवासाठी रस्त्यांची तोडफोड करण्यात आलीय. मांडव टाकण्यासाठी, देखावे उभे करण्यासाठी कोट्यवधींचा चुराडा होतोय. लोकोपयोगी योजनांच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्रभर फिरणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काजू-बदाम खातानाचे फोटो टाकणारे, वातानुकुलीत गाडीतून संघर्षयात्रा केली म्हणून अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडणारे हेच 'उत्सवी' लोक आहेत. नवरात्र मंडळ आणि गणेश मंडळात ते पाण्यासारखा पैसा खर्च करतील आणि आपली जबाबदारी सत्ताधारी किंवा विरोधी पक्षावर ढकलतील. यांना सारे काही आयते हवे. हा दुटप्पीपणा दाखवून दिल्यास हे आयतोबा काही मंडळांनी केलेली विधायक कामे छाती फुगवून दाखवितात किंवा अशी टीका मुस्लिम, ख्रिश्चन अथवा अन्य धर्मियांवर व त्यांच्या उत्सव, चालीरीतींवर, परंपरांवर करून दाखवा म्हणत उडवून लावतात. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश आणि आजचे त्याचे विकृत स्वरूप पाहता हा उत्सव बंद करावा असे वाटणारा एक मोठा वर्ग निर्माण होतोय. राजकारण्यांची सोय आणि अब्जावधींचे अर्थकारण हा त्याचा पाया झालाय. पुण्यासारख्या महानगरात दस्तुरखुद्द लोकमान्य टिळकांच्या घरातील महापौर असतानाही पालिकेच्या कार्यक्रमपत्रिकेतून लोकमान्य टिळकांचा फोटो वगळण्यात आला आहे. जात्यांधांना भीक घालत आपण आणखी किती खाली घसरणार?

   हिंदू धर्म हा सुधारणावादी आहे. त्यात सातत्याने परिवर्तन झाल्यानेच त्याचे डबके झाले नाही हे मान्य करण्यास आम्ही तयार नाही. स्वामी विवेकानंद यांनी मनुष्यत्त्वाच्या दिव्यत्त्वाच्या प्रगटीकरणाची अपेक्षा व्यक्त केली होती. हे दिव्यत्त्व तर दिसत नाहीच पण गुन्हेगारी, बेरोजगारी, भ्रष्टाचार या दिव्यातून बाहेर कसे पडावे याची सामान्य माणसाला वंचना आहे. अशा परिस्थितीत आपण देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करतो. 

  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासीयांशी संवाद साधतील. काही लोकांना प्रोत्साहन देतील. त्यांच्या कामाची कदर करून गौरवतील. दरवर्षी यापेक्षा वेगळे काय होते? काय व्हावे? सामान्य माणसाला या सर्वांशी काहीच देणे-घेणे नसते. सत्तेतील नेते मात्र आपल्याच मस्तीत मश्गुल आहेत. विरोधक हतबल आहेत. 

  विनोद तावडे नावाचे एक गृहस्थ सध्या महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री आहेत. मान्यता नसलेल्या ज्ञानेश्वर विद्यापीठातून त्यांनी पदवी मिळवली. सभागृहात सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून बोलताना ते म्हणाले, "या विद्यापीठाला अहिल्याबाईंचे नाव देऊ नकात. ते दिले तर ते जातीयवादी ठरेल.'' विद्यापीठाला कुणाचे नाव द्यावे किंवा देऊ नये, याबाबत त्यांची मते असू शकतात. मात्र राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे नाव देणे जातीयवादी कसे ठरते हे आम्हास कळले नाही. 'मन की बात' करणाऱ्या मोदींना कदाचित याचे काही वाटणारही नाही, कदाचित असे विषय त्यांच्यापर्यंत जाणारही नाहीत. मात्र यातून या लोकांची द्वेषमूलक भावना दिसून येते.

  देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणक्षेत्रात क्रांती घडली. आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले. विविध क्षेत्रात माणसाने प्रगती केली. जग एका क्लिकवर आले. मात्र हे सर्व होतानाच आमच्यातील माणूस म्हणून मुळातच असलेले चांगुलपण नष्ट होत गेले. पर्यावरण आणि शेतीपासून आम्ही कोसो मैल दूर गेलो. भाषा, साहित्य, संस्कृती, समीक्षा या विषयीचा अभिमान केवळ शैक्षणिक गुणवत्तेसाठी आणि बढत्या मिळविण्यासाठी दाखविला जातोय. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षालाही सातत्याने पोलीस संरक्षणात फिरावे लागते. स्त्रीवादाच्या नावावर स्वैराचार वाढीस लागलाय. कायद्याचा गैरवापर करत कुणालाही, कधीही सहजपणे धमकावले जात आहे. एकेरी रस्ता ओलांडतानाही जीव मुठीत धरून दोन्ही बाजूला बघत रस्ता ओलांडावा लागतो. हेल्मेटचा वापर करणे ही आम्हाला सक्ती वाटते. नो एन्ट्रीत घुसणे, सिग्नल मोडणे, चालत्या गाडीतून किंवा गाडीवरून पिचकाऱ्या मारणे याचे आम्हास काहीच वाटत नाही. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी तीच आम्ही अभिमानाने मिरवतो आणि हेच आजच्या लोकशाहीचे वास्तव आहे. 
  
या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबतचा एक किस्सा आवर्जुन सांगावासा वाटतो. बापुजी साबरमतीच्या आश्रमात सूतकताई करत बसले होते. त्यावेळी एक गृहस्थ त्यांच्याकडे आले. ते बापुजींना म्हणाले, "मला देशाची सेवा करायची आहे. त्यासाठी काहीतरी मार्ग दाखवा. मला देशसेवेची एखादी जबाबदारी द्या." 

  बापुजींचे काम सुरू असल्याने त्यांनी त्यांना थोडा वेळ थांबण्याची विनंती केली. हे गृहस्थ धनदांडगे असल्याने वाट पाहणे त्यांच्या रक्तात नव्हते. तरीही बापुजींच्या सुचनेचा अनादर नको म्हणून चुळबुळ करत ते बसून राहिले. थोड्यावेळाने सूतकताई झाल्यावर बापुजींनी त्यांना विचारले, "बोला काय म्हणताय?" त्यावर ते गृहस्थ म्हणाले, " बापुजी आयुष्यभर खूप पैसा कमावला. चारही मुले मार्गी लागली. आता देशासाठी काहीतरी करायची इच्छा आहे. काय करू ते सांगा?"

  बापुजी म्हणाले, "भल्या गृहस्था, मी सूतकताई करताना माझे लक्ष तुझ्याकडेच होते. तू इतका वेळ काहीही काम न करता बसून राहिलास, चार वेळा या माठातले पाणी घेतले. अर्धा ग्लास पाणी प्यायलास आणि अर्धा ग्लास पाणी टाकून दिले. यापुढे एक कर, जेवढी तहान असेल तेवढेच पाणी घे. इतका नियम पाळला तरी तुझ्या हातून देशाची मोठी सेवा घडेल."

  आपणही देशभक्तीच्या वल्गना करण्यापेक्षा अशा छोट्याछोट्या गोष्टीतून आपली देशभक्ती दाखवून द्यायला हवी. इतिहासाची माहिती नाही, वर्तमानाचे ज्ञान नाही आणि भविष्यावर श्रद्धा नाही अशी अनेकांची अवस्था झाली. त्यातूनच कमालीचे नैराश्य वाढलेय. तरूण हतबल होत चाललेत. आपण सर्वांनी एकत्र येऊन हे थांबवायला हवे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलेय ते व्यर्थ जाऊ द्यायचे नसेल तर आपल्याला कृतीशिलतेची गरज आहे.
- घनश्याम पाटील 
७०५७२९२०९२

14 comments:

  1. असे स्पष्ट सडेतोड लिहिण्याचीच गरज आ हे

    ReplyDelete
  2. सद्या वाचाळ विरांची संख्या वाढत चालली आहे .

    ReplyDelete
  3. सरस सुंदर आणि परखड लेख.

    ReplyDelete
  4. सरस सुंदर आणि परखड लेख.

    ReplyDelete
  5. सरस सुंदर आणि परखड लेख.

    ReplyDelete
  6. इतिहासाची माहिती नाही, वर्तमानाचे ज्ञान नाही आणि भविष्यावर श्रद्धा नाही अशी अनेकांची अवस्था झाली. त्यातूनच कमालीचे नैराश्य वाढलेय. तरूण हतबल होत चाललेत.

    ReplyDelete
  7. बऱ्याच वेळेस समाजातील बऱ्याच गोष्टी आपल्याला खटकतात पण त्या अशा शब्दरूपी मांडणे आणि लोकांना त्याची जाणीव करून देणे ह्या गोष्टीचीहि खरंच आज गरज आहे. लेख खूप सुंदर आहे.

    ReplyDelete
  8. बऱ्याच वेळेस समाजातील बऱ्याच गोष्टी आपल्याला खटकतात पण त्या अशा शब्दरूपी मांडणे आणि लोकांना त्याची जाणीव करून देणे ह्या गोष्टीचीहि खरंच आज गरज आहे. लेख खूप सुंदर आहे.

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. आदरणीय पाटिल सर
    तुम्ही आग्रलेखात एकच बाजू मांडली दूसरी बाजू का मांडली नाही कारण राजा वराट हां तुमचा मित्र आहे
    पण अंकुश बूब या विषयी काहीच भाष्य केले नाही
    कारण मी ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल केलि
    त्यांच्यावर संगमनेर शहर पोलिस स्टेशनला आधीच खुप गुन्हे दाखल आहे त्यांच्यावर 354 महिला विनय भंगाचा गुन्हा दाखल आहे 323 504 506 427 384 34 2 एनसी एक खंडणी प्रकरणी अर्ज असे अनेक गुन्हे दाखल असलेला व्यक्ति चांगला की वाइट हे सांगा
    दुसरा विषय सामना तर आमचा जिव की प्राण त्याबद्दल आम्ही बोलुच शकत नाही

    ReplyDelete
  11. इतिहास ची माहिति नाही, वर्तमानचे ज्ञान नाही आणि भविष्यावर श्रद्धा नाही , खूपच चांगला लेख.

    ReplyDelete
  12. आतिशय योग्य विचार मांडलेत हल्ली सगळ्याच गोष्टींचा बाजार झालाय सगळे उत्सव ही स्टंटबाजी झालीय व्यर्थ पैसा खर्च, भितीचे वातावरण त्यावर सुरक्षा राक्षकांचे हाल व त्यावरचा खर्च पहाता सर्व वातावरणात उत्साह न रहाता घृणा निर्माण होत आहे आपण म्हणालात हे बंद व्हावेसे वाटायला लागणे हे खरं आहे .सणांमधलं पावित्र्य कमी होत चाललंय टिळकांच्या फोटोला बगल हे नक्कीच निंदनिय आपली चपराक वाखणण्या योग्य

    ReplyDelete