ज्ञान ही कुण्या एका विशिष्ठ जातीची मक्तेदारी नाही. शिक्षणावर, ज्ञानावर सर्वांचा अधिकार आहे. सूर्यप्रकाश काय फक्त कुण्या एका जातीसाठी-समुदायासाठी असतो का? मात्र एक मोठा वर्ग त्यापासून दीर्घकाळ दूर राहिल्यानं अनेकांच्या मनात न्यूनगंड आहे. तो दूर करण्यासाठी सर्वच जाती-धर्मातील अनेक महापुरूष पुढं सरसावले. त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ज्ञानाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःची झिज करून घेतली. तरीही अनेकांची उपेक्षा झाली. काहींची समाजाने केली आणि बहुतेकजण स्वतःच खितपत पडले! काय करावे याचे निश्चित ज्ञान त्यांना नव्हते. शिक्षण, आरोग्य याची प्रचंड हेळसांड झाल्याने त्यांचा विकास खुंटला. हा समाज व्यसनाच्या आहारी गेला. आपल्या देशाला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं असलं तरी एका मोठ्या वर्गाला अजूनही त्याचा अर्थ कळलाय असं वाटत नाही.
आपल्याकडं जातीअंताची चळवळ कित्येक वर्षापासून सुरू असली तरी लोकांच्या मनातून जात काही जात नाही. बहुतेकांना आपल्या जातीचा अभिमान असतो. हे एकवेळ परवडलं! मात्र आता जातीयवाद इतक्या टोकाला गेलाय की स्वजातीच्या विकासापेक्षा इतर जातींचा द्वेष करण्यातच यांचा अधिक वेळ जातो. त्यातही ब्राह्मणांना झोडपणं, मराठ्यांची टर उडवणं, दलितांचं आणि दलित असण्याचं राजकारण करणं हे काही नवीन नाही. या सर्वात वडार समाज मात्र कुठे दिसत नाही. त्याचं वेगळं असं अस्तित्वही जाणवत नाही. गरीबी, बेकारी, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव यामुळं हा समाज विकासापासून कोसो मैल दूर आहे.
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की पर्याय निर्माण होतात. वडार समाजाच्या विकासासाठीही काही सुशिक्षित, कर्तबगार लोक पुढं आले. त्यांनी इतर जाती-ज्ञातीप्रमाणं वडार समाजाच्या संघटना काढल्या. वेगवेगळ्या क्षेत्रात काम उभं केलं. मात्र त्यांच्यातही संघटन नाही. त्यामुळे गरजूपर्यंत पोहोचता येत नाही. सरकार दरबारी त्यांना त्यांच्या मागण्या रेटून धरता येत नाहीत. अशा सगळ्या बिकट वातावरणात अमर कुसाळकर नावाचा एक कार्यकर्ता पुढं येतो आणि नेतेगिरी न करता समाजाच्या भल्यासाठी धडपडतो ही म्हणूनच कौतुकाची गोष्ट आहे. कुसाळकरांनी समाजातील गरजूंना हात देण्याबरोबरच शिक्षणाचा प्रचार केला. बुद्धिच्या क्षेत्रात काम करावं म्हणून, वडार समाजात साहित्यिक आवड निर्माण व्हावी म्हणून प्रयत्न सुरू केले. म्हणूनच त्यांची दखल घेणं क्रमप्राप्त ठरतं. इतर जातींचा द्वेष न करता त्यांनी ‘स्वाभिमानी वडार संघटना’ स्थापन केलीय. त्या माध्यमातून ते विविध उपक्रम, कार्यक्रम राबवत आहेत.
व्यसनाच्या आहारी गेलेला, दगडकाम, मातीकाम यात अहोरात्र अडकून पडलेला, दारिद्य्रात खीतपत पडलेला हा समाज! शिक्षणाचा फारसा गंध नाही, त्यामुळं मिळेल ते काम करायचं, आलेला दिवस काढायचा अशी त्यांची गत. खरंतर आपल्याकडील मूर्तिशास्त्र त्यांनी विकसित केलं. मोठमोठे राजेरजवाडे, किल्ले बांधण्यात मोलाचं योगदान दिलं. ज्या हातांनी दगडाच्या मूर्तीला देवत्वाचं रूप दिलं ते हात ‘माणूस’ म्हणूनही इतर समाज हातात घेत नाही, हे त्यांचं शल्य. एखाद्या गावात तंबू टाकून रहावं, पाटा-वरवंटे तयार करावीत, मिळतील त्या रकमेला, अगदी धान्याच्या मोबदल्यात ती विकावीत, गावच्या पाटलाकडून गुन्हेगार नसल्याचं आणि चांगल्या वर्तणुकीचं पत्र घ्यावं आणि पुढच्या गावात चालू लागावं असा त्यांचा प्रवास. छन्नी आणि हातोडा घेऊन सुंदर शिल्प साकारणारी ही भटकी जमात त्यामुळं शिक्षणापासून कोसो मैल दूर राहिली.
याला अमर कुसाळकर यांच्यासारखे काही अपवाद ठरले. नुसते अपवाद ठरून ते थांबले नाहीत तर आपल्या समाजाच्या भल्याचा विचार करून त्यांनी वैयक्तिक सुखांची आहुती दिली. समाजाचं प्रबोधन सुरू केलं. शिक्षणाचा प्रचार केला. लग्नं जुळवण्यात पुढाकार घेतला. आरोग्याचे प्रश्न सुटावेत यासाठी काही उपक्रम राबवले. पदरमोड करून शालेय विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचं सहाय्य केलं. विविध क्षेत्रातील गुणवंतांचा वेळोवेळी गौरव केला. तो करतानाच त्यांची सामाजिक जाणीव वाढावी, त्यांनीही समाजाच्या विकासात योगदान द्यावं यासाठी त्यांना प्रवृत्त केलं.
अमर कुसाळकरांनी हणुमंत कुर्हाडे नावाच्या एका तरूण लेखकाला माझ्याकडं आणलं. एका खाणीत काम करताना त्याचे एक नातेवाईक दरडीखाली अडकले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. त्या घटनेनं हादरलेल्या हणुमंतनं ‘दगडखाणीतील उद्ध्वस्त आयुष्य’ ही लघुकादंबरी लिहिली. साहित्याचा आणि या समाजाचा तसा फारसा संबंध नसल्यानं अर्थातच प्रकाशक मिळत नव्हता. कुसाळकरांनी ही संहिता वाचली होती. त्यासाठी प्रस्तावनाही त्यांनी आंतरिक जिव्हाळ्याने आणि पोटतिडिकेने लिहिली. ती कादंबरी आम्ही ‘चपराक’कडून प्रकाशित केली. इतकंच नाही तर महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते त्या कादंबरीचं प्रकाशन केलं. कुसाळकर नसते तर कदाचित हा प्रतिभावंत लेखक मराठीला कळलाही नसता.
भरत दौंडकर, लक्ष्मण खेडकर, सुरेश धोत्रे असे या समाजातील ताकतीचे कवी गेल्या काही काळात पुढे आलेत. शशिकांत धोत्रे यांच्यासारखा जागतिक दर्जाचा चित्रकार मिळालाय. नागराज मंजुळेसारखा अफाट ताकतीचा दिग्दर्शक वडार समाजातून पुढं आलाय. यापैकी कुणीही जातीचं राजकारण केलं नाही. ते जातीमुळे पुढं आले नाहीत. त्यांच्या त्यांच्या कलागुणानं, साधनेनं ते पुढं आले. त्यासाठी अहोरात्र संघर्ष केला. मात्र हे समाजाचे ‘आयडॉल’ ठरले. कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होता येते हा संदेश त्यांनी दिला. जात, दारिद्य्र यामुळे खचता कामा नये हे त्यांनी कृतीशिलतेतून दाखवून दिलं. जातीअंताची भाषा करताना काहींना जात मिरवण्याची लाजही वाटत असावी; मात्र या समाजाचं अज्ञान दूर करण्यासाठी, त्यांचं मनोबल वाढविण्यासाठी हा आदर्श त्यांच्यासमोर ठेवणं ही काळाजी गरज आहे. कुसाळकर नेमकं तेच काम करत आहेत.
अमर कुसाळकरांसारखे लोक फक्त एक व्यक्ती राहत नाहीत. ते स्वतःच एक संघटना बनतात. त्यामुळेच त्यांनी एक चळवळ उभी केली आहे. संजय सोनवणी, राजू परूळेकर, हरी नरके असे विचारवंत त्यामुळंच काही तत्त्वांना मुरड घालून त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहतात. जातीअंत तर व्हायलाच हवा पण त्याआधी या समाजाची किमान माणूस म्हणून दखल घेतली जावी, इतकीच माफक अपेक्षा त्यामागं या सर्वांची असते.
कुसाळकरांनी ‘ओडर संदेश’ हे मासिक सुरू केलं. भलीभली मासिकं उचक्या घेत असताना ते चालणं सोपंही नव्हतं. मात्र त्यांनी तो प्रयोग केला. व्यावसायिक मर्यादा असूनही दिवाळी अंक काढला. खरंतर अशी मासिकं जगायला हवीत, पण त्यामागच्या भावना समजून घेण्याइतकी आपल्या समाजाची अजून प्रगल्भता वाढली नाही. वडार समाजाचं मासिक आहे ना? मग ते आम्ही विकत घेऊन का वाचावं? असाच बहुतेकांचा मानस दिसला.
कुसाळकर खचणार्यांपैकी नाहीत. मासिक चालवणं हे काही त्यांच्या उदरनिर्वाहाचं साधन नव्हतं. त्यामुळंच त्यांनी ती गोष्ट फारशी मनाला लावून घेतली नाही. वडार समाजातील लेखक शोधले. त्यासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांची पुस्तकं विकत घेतली. ती इतरांना मोफत वाटली. नुकताच त्यांनी वडार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेतला. त्यासाठी आमच्या किल्लारीपासून ते अगदी औरंगाबाद, नांदेड, बुलडाणा, यवतमाळ, अमरावतीपर्यंतचे विद्यार्थी आणि पालक आले होते. सर्वांना पुस्तकांचा संच, सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ याबरोबरच त्यांनी चक्क प्रवासखर्चही दिला. हे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या किती दुर्बल आहेत आणि कोणत्या परिस्थितीतून त्यांनी हे यश मिळवलंय याची कल्पना त्यांना होती. हा दृष्टिकोन किती जणांकडे आहे? अशा सहवेदना समजून घेणारी माणसं खरंच मोठ्या मनाची असतात.
त्यांच्या सामाजिक कामात काहीजण अडथळेही आणत आहेत. त्यात त्यांचे काही समाजबांधवही आहेत. मात्र हा त्रास कुणाला चुकलाय? प्रबोधनकार ठाकरे यांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढण्यात आली होती. सावित्रीबाईंच्या अंगावर शेण फेकले गेले. र. धों. कर्वे असतील किंवा आगरकर असतील प्रत्येकाला उपहास सहन करावा लागला, अवहेलना वाट्याला आली. पण यापैकी कुणीही कधी हार मानली नाही. घेतलेला वसा सोडला नाही. अमर कुसाकळरांनाही थकून भागुन चालणार नाही. समाजासाठी काही करायचे तर वैयक्तिक सुखांचा त्याग करावाच लागतो. बरं, इतकं करूनही समाज तुम्हाला डोक्यावर घेईल असंही काही नाही. नाव ठेवणारे ठेवतीलच. नेत्यानं त्याला जुमानायचं नसतं.
अमर कुसाळकर यांनी नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला. वडार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांनी पुढाकार घेतलाय. ‘सारे भारतीय माझे बांधव आहेत’ असं म्हणताना आपणही थोडा आत्मीयतेने विचार करून या समाजाला यातून बाहेर काढण्यासाठी हातभार लावायला हवा. यांचा शैक्षणिक विकास घडवण्यासाठी जमेल तशी मदत करायला हवी. सध्याच्या काळात एखादा गरीब विद्यार्थी शिक्षणासाठी दत्तक घेणं (त्यासाठीचा त्याचा खर्च उचलणं) अनेकांना शक्य आहे. अशा मार्गानंच सामाजिक एकोपा साधला जाईल. त्यासाठी आपण सर्वांनी एक पाऊल पुढं टाकायची गरज आहे. तसं झालं तरच अमर कुसाळकर यांच्यासारख्या प्रामाणिक माणसाला सुखा-समाधानानं जगता येईल.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092