एखादा जवळचा माणूस अचानक आपल्यातून गेला की, त्याच्या आठवणीने मन व्याकुळ होते. त्याचे ‘नसणे’ मान्य करणे आपल्याला अवघड जाते. निसर्गनियमापुढे कुणाचे काही चालत नाही, ते अटळ आहे हे माहीत असूनही आपण प्रचंड अस्वस्थ होतो. त्या माणसाच्या आठवणी दाटून आल्या की अश्रूंचा बांध फुटतो. परमेश्वर इतका निष्ठुर कसा, असे उगीचच वाटू लागते. अतीव दुःखाने आपण भयकंपित होतो. जवळच्या माणसाचे चटका लावून जाणारे ‘जाणे’ पचवणे फार अवघड असते.
विलासराव देशमुख असेच अचानक गेले. महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांसह त्यांच्यावर प्रेम करणार्या सर्व क्षेत्रातील लोकांना हा मोठा धक्का होता. माणूस गेल्यानंतर त्याचे मोठेपण कळते. जिवंतपणी त्याची कदर करणारे तुलनेने फारच कमी असतात. आपल्याकडे माणसापेक्षा माणसाच्या राखेचा इतिहास पूजण्याचा रिवाज तसा नवीन नाही. विलासरावांच्या जाण्याने एक अफाट क्षमतेचे पर्व संपले. याच आठवड्यात, म्हणजे 26 मे रोजी त्यांची जयंती! त्यामुळे या राजहंसाचे स्मरण करताना डोळे आपोआपच पाणावतात. हीच या लोकनेत्याची पुण्याई!
एक जळणारा दोरा मेणबत्तीला विचारतो, ‘‘जेव्हा मी जळत असतो तेव्हा तू स्वतःला का संपवतेस?’’ मेणबत्ती म्हणते, ‘‘अरे, ज्याला आपल्या हृदयात स्थान दिलं तो जळतोय हे पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येणारच ना!’’ विलासरावांच्या बाबतही काहीसं असंच झालं. लोकांना आपल्या भावनांचा बांध आवरणे अवघड जात होते. हे रडणे नाटकी नव्हते. एक विकासपर्व संपल्याची जाणीव झाल्याने प्रत्येकाला पोरके झाल्यासारखे वाटत होते.
सरपंच ते केंद्रीय मंत्री अशा दीर्घ प्रवासात विलासरावांनी असंख्य माणसे जोडली. त्यांनी आपल्या राजकीय जीवनात अनेक चढउतार अनुभवले; मात्र कधी कुणाविषयी आपल्या मनात द्वेष बाळगला नाही. शत्रू असला तरी त्याचे निष्कपटपणे हसून स्वागत करणारे विलासराव राजकारणात त्यामुळेच दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरतात. ते शरीराने गेले असले तरी त्यांचे विचार कायम जिवंत राहतील. राजकारणात भवितव्य आजमावू पाहणार्यांना प्रेरणा देतील.
आपल्या जगण्यावर आणि जन्मावर विलक्षण प्रेम करणारे विलासराव हे वैभवशाली कुटुंबातून पुढे आले होते. ‘गढीवरच्या देशमुखांचे’ त्यांचे घराणे! त्यांच्या रूबाबदार व्यक्तिमत्त्वाचा सरंजामशाही थाट प्रत्येकाला लुभावणारा होता. रयतेची काळजी घेणारे विलासराव गरिबीत कधी जगले नाहीत; मात्र गरिबांविषयी त्यांच्या मनात कनवाळा होता. श्रीमंतीची, अधिकाराची किंवा पदाची मिजास त्यांना कधी वाटलीच नाही. प्रत्येक क्षण हा लोकांच्या भल्यासाठी जगायचा हेच त्यांचे तत्त्वज्ञान! यश-अपयशाची पर्वा न करता ते अखंडपणे राजहंसी डौलात चालत राहिले.
लातूरविषयी त्यांंच्या मनात प्रचंड जिव्हाळा होता. 1982 साली धाराशिव जिल्ह्यातून लातूर जिल्हा अस्तित्वात आला. त्यांनतर लातूरच्या विकासात त्यांनी भरीव योगदान दिले. ‘जे नवे; ते लातूरला हवे!’ असा त्यांचा अट्टाहास असायचा. त्यांनी अनेक कर्तबगार अधिकारी लातूरला आणल्यानेच लातूरचा विकास शक्य झाला. प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देणे, सुख-दुःखात सहभागी होणे हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विशेष!
त्यावेळी नव्यानेच लातूर महानगरपालिका अस्तित्वात आली होती. लातूरचा पहिला महापौर कॉंग्रेसचा होऊ नये यासाठी विरोधकांनी जंग जंग पछाडले. देवेन्द्र फडणवीसांसारख्या नेत्याने लातूरात ठाण मांडून वातावरण तापविले. त्यात त्यांना यश आले नाही हा भाग निराळा; पण या काळात विलासरावांनी लातूरमध्येच आपला तळ ठोकला. एक केंद्रीय मंत्री लातूरसारख्या स्थानिक निवडणुकीत इतके लक्ष का घालतात, अशी टीका त्यांच्यावर झाली. त्यावेळी त्यांनी दिलेले उत्तर त्यांच्यातील प्रेमळ नेत्याचे दर्शन घडवून देते.
ते म्हणाले, ‘‘मी लातूरात फक्त माझ्या कार्यकर्त्यांच्या आव्हानाच्या काळात त्यांची साथ द्यायला आलोय. महानगरपालिकेचा नगरसेवक हे माझ्या दृष्टीने छोटे पद असले तरी या कार्यकर्त्यांचे ते फार मोठे स्वप्न आहे. माझ्या प्रत्येक निवडणुकीत हेच कार्यकर्ते पूर्णवेळ सक्रीय असतात; सर्व कामकाज, प्रचार हेच लोक पाहतात. त्यांच्यामुळेच माझे अस्तित्व आहे. मग त्यांच्या कठीण काळात मी त्यांच्यासोबत राहिलो तर बिघडले कुठे?’’ असे होते विलासराव!!
कुणालाही ‘नाही’ म्हणणे त्यांना कधीच जमले नाही. त्यांच्याकडे कुणीही, कुठलेही काम घेऊन गेले तरी त्यावर हमखास मार्ग निघायचा. आलेला प्रत्येक फोन स्वतः घेणे आणि प्रत्येकाशी त्याच्या अडचणींसंदर्भात बोलणे ही त्यांची खासीयत! त्यांच्या भिडस्त स्वभावाचा अनेकांनी फायदा घेतला पण त्यांनी त्यांचे चांगुलपण कधी सोडले नाही.
साहित्य, संगीत, नाट्य अशा कलांची अमर्याद आवड जोपासणारे विलासराव संस्कृतीचे जतन व्हावे, यासाठी आग्रही असायचे. विरोधकांशीही वैयक्तिक जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करणारा हा नेता म्हणूनच कॉंग्रेसचा ‘आधारवड’ होता. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अनेकवेळा आंदोलनाचा इशारा दिला; मात्र प्रत्येकवेळी त्यांना थोपवून ठेवण्यात विलासराव यशस्वी ठरले. इतकेच काय पण दिल्लीत अण्णांनी आंदोलनाचे अस्त्र उपसल्यानंतर सरकारच्यावतीने मध्यस्थी करण्याची जबाबदारीही त्यांच्यावरच पडली आणि त्यांनी ती चोखपणे पारही पाडली.
आमच्या लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यात वेळ आमावस्या मोठ्या उत्साहात साजरी होते. त्यादिवशी पांडवांचे पूजन केले जाते. रानात आपल्या आप्तेष्टांना, मित्रांना बोलवून वनभोजनाचा आनंद लुटला जातो. आंबील, खीर, भज्जी, भाकरी, तिळाच्या पोळ्या हे त्यादिवशीचे विशेष! विलासराव यादिवशी मुंबईहून न चुकता बाभळगावला येत. ‘देशमुख गडी’वर त्यादिवशी आनंदाला भरते आलेले असे. मुंबईहून येताना ते तेथील अधिकारी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील आपल्या मित्रांना आवर्जून सोबत आणत. लातूरपासून बाभळगावपर्यंत असणारा हा गाड्यांचा ताफा त्यांच्यातील उत्साहाचे प्रतिक असायचा. आता हे चित्र दिसत नसल्याने अनेकांच्या दुःखाचे बांध फुटत आहेत.
1971 साली विलासराव शिक्षणासाठी म्हणून पुण्यात होते. त्यावेळी त्यांना सिनेमाची जबरदस्त आवड होती. पुढे हा मुलगा ‘राजकारणातला सुपरस्टार’ होईल असे कोणी भाकित केले असते तर कदाचित त्यावर कुणी विश्वात ठेवला नसता पण ही किमया घडली. पुणे आणि लातूर येथे जेमतेम साडेतीन वर्षे वकिली केल्यानंतर ते बाभळगावच्या राजकारणात सक्रिय झाले. गावची ‘देशमुखी’ असल्याने सरपंचपद त्यांच्याकडे चालत आले. पुढे उल्हासदादा पवार यांच्या शिफारशीनुसार त्यांना धाराशिव जिल्हा युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून बघितलेच नाही. आमदार झाल्यानंतर वेगवेगळ्या मंत्रीपदाच्या खात्याचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळताना त्यांनी आपली छाप उमटवली.
1995 साली त्यांच्या सुसाट सुटलेल्या वारूला लगाम बसला. विधानसभेत त्यांना प्रथमच पराभवाला सामोरे जावे लागले. अशी अचानक खिळ बसल्याने त्यांना नैराश्य आले होते. कॉंग्रेसनेही त्यांच्याकडे याकाळात दुर्लक्ष केले पण पराभवातून आलेल्या या संधीचा फायदा उठवत त्यांनी आपला दिल्लीतील संपर्क वाढवला. प्रत्येकाशी चांगले संबंध प्रस्थापित केले. पुढे 1999 ला मोठ्या मताधिक्क्याने आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली.
त्यांनी आपल्याला मदत करणार्या प्रत्येकाला भरभरून दिले. मध्यंतरी अडगळीत पडलेल्या उल्हास पवारांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांनी हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले.
या नेत्याचे अचानक जाणे त्यामुळेच चटका लावणारे आहे. सध्याच्या भयंकर राजकीय वातावरणात मुळातच ‘चांगल्या’ राजकारण्यांची कमतरता आहे. ज्यांच्याकडून देशहिताच्या काही अपेक्षा ठेवता येतील, असे नेते प्रमाणाने खूपच कमी आहेत. विलासराव देशमुखांच्या अकल्पित जाण्याने महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान झाले आहे. सध्या राज्यात आणि देशात मोेठे परिवर्तन घडलेय. विलासरावानंतर लातूरचीही गणिते बदललीत. त्यांनी लातूरात मोठ्या प्रमाणात उद्योग आणले होते पण त्यांच्या जाण्याने त्यातील अनेक प्रकल्प परत गेले. आता तर उगवत्या सूर्याला नमस्कार करावा याप्रमाणे लातूरकरांनी अनेक बदल स्वीकारलेत पण तरीही विलासराव देशमुख यांच्यासारख्या द्रष्ट्या नेत्याची उणीव पावलापावलाला जाणवते. लातूर आणखी विकासासाठी आतूर आहे. विलासरावांच्या जाण्याने अनेक योजनांना खीळ बसलीय. राजकीय नेता म्हणून त्यांच्याबाबत काहींची मतमतांतरे नक्की असू शकतात पण त्यांच्या आठवणीने माझ्यासारख्या सामान्य पत्रकाराचे व्याकूळ होणे हे त्यांचे माणूस म्हणून असलेले मोठेपणच आहे. ते नाकारणे त्यांच्या तथाकथित विरोधकांनाही शक्य नाही.
- घनश्याम पाटील
7057292092
अतिशय भावनाप्रधान लेख!
ReplyDeleteसोडून गेल्यावरच माणसाची खरी किंमत कळते हेच खरे!!
तुमच्या लेखणीतून साहेबांच्या आठवणी ताज्या झाल्या 💐
ReplyDeleteसर अतिशय छान आहे लेख । विलासराव्यांच्या व्यक्तिमत्ववाचे विविध पैलू सर्व सामन्यांना आवगत झाले । धन्यवाद
ReplyDeleteघनःश्यामजी,
ReplyDeleteखूप सुंदर व्यक्त झालात. आपली लेखणी जशी विघातक प्रवृत्तीवर चपराक ओढते तशीच ती सज्जनाचा गौरवही करते. या लेखाने खरच आपण एका अजातशत्रू व्यक्तीमत्वाचे विविध कंगोरे दाखविले. पापण्यांच्या कडाही ओलावल्या.
सुंदर.... भारदस्त व्यक्तीमत्वासाठी... पैलूदार लेखणी.... धन्यवाद
ReplyDeleteविलासराव देशमुख शरीराने गेले पण त्यांच्या विचाराने ते अजूनही आमच्यात आहेत . लेख मनापासून आवडला . विलासराव देशमुख यांच्या विषयी चांगली माहिती वाचायला मिळाली . जो आवडे सर्वांना ..... तोचि आवडे देवाला .
ReplyDeleteKharch sahebanchi athavan zli
ReplyDeleteKharch sahebanchi athavan zli
ReplyDeleteलेख उत्तमच!आणि विलासरावही! !
ReplyDeleteविलासराव देशमुख यांच्याबद्दल खूप चांगली माहिती मिळाली. विलासराव एक व्यक्ती म्हणून ही चांगले होते हे समजले. लेख आवडला.
ReplyDeleteछान🙏🙏💐
ReplyDeleteआदरणीय स्व विलासराव देशमुख साहेबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!!!👏💐
ReplyDeleteउत्तम लेख...
ReplyDelete