Pages

Saturday, April 22, 2017

साहित्यिक जीवनव्रती निर्माण व्हावेत!

‘योद्धा संन्याशी’ अशी ओळख असलेल्या युगपुरूष स्वामी विवेकानंद यांनी सांगितले होते की, ‘‘आपल्या देशाला बौद्धिक क्षत्रियांची गरज आहे आणि असे क्षत्रिय निर्माण झाले तर शस्त्रास्त्रांची मुळीच कमतरता पडणार नाही..’’ महापुरूषांच्या विचारधारांवरून वाद आणि वितंडवाद घालताना आपण त्यांच्या अशा मतांकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करतो.
सध्याचा जमाना विज्ञानाचा आहे, तंत्रज्ञानाचा आहे. आपण सर्व क्षेत्रात लक्षवेधी प्रगती करतोय. पुण्यामुंबईसारख्या महानगरातील तर घरटी एक मुलगा विदेशात आहे. असे सारे असताना दुर्दैवाने आपल्या संस्कृतीशी असलेली त्याची नाळ मात्र कायमची तोडली जातेय. ‘एनआरआय’ मुलांचे वृद्ध आईबाबा ‘येणाराय येणाराय’ म्हणत दिवस कंठतात. बाहेर गेलेली मुले आणि आपल्या देशात असणारे तरूण यांच्यापैकी काही अपवाद वगळता बहुतेकजण पाश्‍चात्य विचारधारांचे पालन करताना दिसतात. अगदी योगापासून ते गुरूकुल शिक्षणपद्धतीपर्यंत इतर प्रगत राष्ट्रे आपले अनुकरण करत असताना आपण मात्र त्यांनी फेकून दिलेल्या इहवादी परंपरांचे अंधानुकरण करतोय. नात्यातील दुरावा, उदासीनता, नैराश्य, भौतिक सुखसुविधा असूनही निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना हे सर्व त्यातूनच येत आहे. आपल्या राष्ट्रापुढील ही मोठी समस्या आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशात एका नव्या राजकीय, सामाजिक पर्वाची नांदी सुरू झाली. ‘या देशात माझ्या गुणवत्तेची कदर केली जात नाही, येथे माझ्या क्षमता सिद्ध करण्याची संधी नाही, हा देश माझ्यासाठी सुरक्षित नाही, इथे उद्योग-व्यवसायासाठी पुरक वातावरण नाही, चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध नाहीत’ ही व अशी कारणे मागे पडत चालल्याने आपला देशही प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतोय. या परिवर्तनात जे सहभागी होत आहेत ते देशाच्या विकासात हातभार लावत आहेत. ‘यथा राजा तथा प्रजा’ असे म्हटले जाते ते उगीच नाही. नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, देवेंद्र फ़डणवीस, मनोहर पर्रीकर अशी नेतेमंडळी एक ध्येय घेऊन देशाला पुढे नेत आहेत. हा बदल निश्‍चितच सुखावह आहे.
आपल्या देशातील तरूण दिशाहीन आहेत, असा आरोप सातत्याने केला जातो. त्यात काही तथ्य नाही; असे चित्र लख्खपणे दिसून येते. दिशाहीन तरूणांपेक्षा आपल्याकडे सध्या ध्येयवादी तरूणांची संख्या मोठी आहे. या तरूणाईला स्वतःबरोबर देशाचा विकास घडवायचाय. त्यांची सामाजिक बांधिलकी कमालीची आहे. विविध ठिकाणी एकत्र येऊन वेगवेगळे उपक्रम निस्पृहपणे राबवणारे तरूण त्याची साक्ष पटवून देतात. मात्र ‘आमच्यावेळी असे नव्हते’ असे खोटे खोटे सांगत आजच्या तरूणाईला दुषणे देणार्‍या आणि बोल लावणार्‍यांनी एकदा त्यांच्या जीवनाच्या आरशात नीट न्याहाळून पहायला हवे. भारतात कदाचित आजवर जितक्या पिढ्या झाल्या त्यातील सर्वात कर्तबगार आणि व्यापक, सर्वसमावेशक दृष्टिकोन असणारी आजची पिढी आहे असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरू नये! या तरूणाईच्या ऊर्जास्त्रोतांचा, त्यांच्या उन्मेषाचा उपयोग राष्ट्रासाठी करून घेता येत नसेल तर हा दोष त्यांचा नाही तर इथल्या व्यवस्थेचा आहे. तरूण त्यांचे काम त्यांच्या पद्धतीने उत्तमरित्या करीत आहेत. स्वतःला सिद्ध करताना दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर नवनवीन प्रयोग करत आहेत. ही बाब अत्यंत अभिमानास्पद आहे.
स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला बौद्धिक क्षत्रियांची निर्मिती करायची असेल तर ज्ञानाच्या क्षेत्रात काम करणार्‍यांची संख्या वाढायला हवी. हे ज्ञान म्हणजे फक्त विज्ञान-तंत्रज्ञानापुरते मर्यादित नाही. त्याला संगीत, नाट्य, नृत्य, चित्र, शिल्प अशा ललित कलांत आणखी मोठे व्यासपीठ द्यायला हवे. अनेक नामवंत डॉक्टर, अभियंते, वित्तीय अधिकारी यांच्यापेक्षा अनेक कलाकार प्रचंड पैसा कमावतात आणि त्यांना सामाजिक प्रतिष्ठाही आहे, हे सत्य आता ठळकपणे अधोरेखित केले पाहिजे. गलेलठ्ठ शूल्क भरून केवळ विज्ञान आणि वाणिज्य शाखांत प्रवेश घेण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते. त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार होतात. संबंधित संस्थांना हवा तितका निधी देणगी म्हणून देण्यापासून ते राजकीय हस्तक्षेपापर्यंत अनेक उद्योग केले जातात. अशा परिस्थितीत अनेक महाविद्यालयांतील कला शाखांचे वर्ग मात्र ओस पडत आहेत.
या देशातील प्रशासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी, राज्यकर्ते, विरोधी पक्ष नेते, वकील, पत्रकार, प्राध्यापक, शिक्षक, इतर खाजगी उद्योगातील कर्मचारी असे कित्येकजण कला शाखांतून जातात. नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या शाळांत मराठी माध्यमातून शिक्षण पूर्ण करून आपले इप्सित साध्य करतात. आपल्याकडे प्राध्यापकांना पगारही लाखोंच्या घरात आहे. तितकी कमाई तर अनेक डॉक्टरांचीही होत नाही. शिवाय प्राध्यापकांना, कलाकारांना समाजात मोठी प्रतिष्ठा आहे. त्यामुळे कला शाखांकडे  अक्षम्य दुर्लक्ष करण्याचा अविचार मुलांनी आणि पालकांनी मुळीच करू नये. विद्यार्थ्याच्या कलागुणांनुसार जर कुणाला डॉक्टर, अभियंता व्हावे वाटले तर त्यात गैर काही नाही; मात्र काही खुळचट कल्पना मनाशी बाळगून त्यांच्यावर पालकांनी सक्ती करू नये; किंवा माझा अमुक नातेवाईक, तमुक मित्र तिकडे गेलाय म्हणून त्याचे अनुकरणही विद्यार्थ्यांनी करू नये!
सध्या अत्यंत महत्त्वाचे आणि सर्वात दुर्लक्षित राहिलेले क्षेत्र म्हणजे साहित्य! मराठी आणि अन्य भाषांत लेखन करणार्‍या तरूणांची संख्या वाढणे ही काळाची गरज आहे. आपली पिढी जागतिकिकरण अनुभवतेय, मोठमोठे सत्तांतर पाहतेय, देश-विदेशातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा अनुभव घेतेय. आपले अनुभवविश्‍व इतके समृद्ध असतानाही ते अपवादानेच कागदावर उतरते. जे लिहिते हात आहेत त्यांना आपण ताकद दिली पाहिजे. आजच्या तरूणाईचे लेखन अव्वल आहे आणि त्याला गुणात्मकदृष्ट्या मोठे महत्त्व आहे. कुणाच्याही प्रभावाखाली दडपून न जाता ते त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार घडवत आहेत. प्रस्थापित यंत्रणेला चपराक देत त्यांची निश्‍चित ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. हे चांगले चित्र आणखी चांगले व्हावे यासाठी मात्र काही प्रयत्न जाणिवपूर्वक करावे लागतील.
मराठीतील प्रकाशक या नात्याने मी कायम सांगत असतो की, नव्याने लिहिणार्‍यांची, बोलणार्‍यांची एक मोठी फळी आपल्याकडे निर्माण झाली पाहिजे. विविध समाजमाध्यमांद्वारे सातत्याने व्यक्त होणार्‍या तरूणाईला थोडी दिशा दिली तर प्रतिभेचे अनेक कवडसे गवसू शकतात. आपल्याकडे ‘पूर्णवेळ लेखन’ ही कल्पना आजही अनेकांना ‘भिकेचे डोहाळे’ वाटते; कारण त्यादृष्टिने काही प्रयत्नच होताना दिसत नाहीत. ‘साहित्य’ आपल्याला आत्मभान देते, स्वओळख देते, अर्थकारण साधते हे सांगितले तर तो विनोद ठरावा अशी परिस्थिती काहींनी निर्माण केलीय. मात्र हे सत्य आहे. फक्त त्यासाठी लेखकांनी सजग असायला हवे. त्यांचा दृष्टिकोन व्यापक आणि निकोप असावा. अभ्यासाची आणि कठोर परिश्रमाची तयारी असावी. वाचन असावे. गुणात्मकतेचा ध्यास हवा आणि महत्त्वाचे म्हणजे त्याने सातत्याने लिहिते असायला हवे. एक ठराविक वर्ग सातत्याने लिहिणार्‍यांना ‘बहुप्रसवा’ म्हणून कुचेष्टेने हिणवतो. आपाल्याकडे गाणार्‍याने रोज रियाज केला पाहिजे. खेळाडूने, संगीतकाराने, चित्रकाराने, नृत्यकाराने रोज सराव केला पाहिजे. पैलवानाने रोज व्यायाम केला पाहिजे, वक्त्याने सातत्याने बोलले पाहिजे! मग लेखकाने रोज काहीतरी लिहिले पाहिजे ही अपेक्षा ठेवण्यात गैर ते काय? लेखकाने सातत्याने दर्जेदार वाचले पाहिजे, उत्तमोत्तम लिहिले पाहिजे, जिथे जिथे सद्गुणांचा स्फोट आहे तिथे जाऊन चांगले ऐकले पाहिजे. असे झाले तरच सर्जनशीलतेला वाव मिळेल. रामदास स्वामींनी ‘दिसामाजी काहीतरी लिहावे’ असे सांगितलेय; त्यात ‘दिसामाजी काहीतरी ‘चांगले’ लिहावे’ असे त्यांना अभिप्रेत होते. ‘काहीतरीच’ लिहिणार्‍यांनी याचे भान ठेवले तर आपल्याकडील साहित्य व्यवहाराला मोठी गती मिळू शकेल. एखादी गृहिणी रोज स्वयंपाक करते म्हणून तो उत्तम होतो. ती कधीतरीच चपात्या लाटायला गेली तर जगाचा नकाशा तयार झालाच म्हणून समजा! लेखनाचेही तसेच आहे. तुम्ही रोज काहीतरी लिहिले, काहीतरी वाचले तरच तुम्हाला त्यात प्रगती करता येईल.
सध्या लेखनासाठी खूप चांगला काळ आहे. विविध मालिकांसाठी संहिता, चित्रपटासाठी पटकथा, लघुचित्रफितीसाठी लेखन, विविध जाहिरातींसाठी अर्थपूर्ण मजकूर तयार करून देणे, आकाशवाणी-दूरचित्रवाणीसाठी संहिता लेखन करणार्‍यांना चांगले पैसे मिळतात.  चित्रपटात आणि मालिकांत गाणे लिहिणार्‍यांनाही बरे मानधन मिळते. नवीन लेखकांच्या पुस्तकांना चांगली मागणी येतेय. आधीच्या पिढीतील बायकोचा किंवा प्रेयसीचा हात हातात घेतल्यास फार मोठा तीर मारल्याचे दिवस कधीच संपलेत. नव्या युगाच्या गरजा लक्षात घेऊन, नव्या पिढीचा हुंकार समजून घेऊन लेखन केल्यास त्याला हमखास यश येते. चेतन भगतसारखा लेखक ‘हाफ गर्लफ्रेंड’ सारखी कादंबरी लिहितो आणि त्याची पहिलीच आवृत्ती सत्तर लाख प्रतींची छापतो व ती खपवतो हे केवढे मोठे उदाहरण आपल्यासमोर आहे. आमचा सागर कळसाईत आज असंख्य तरूणाईच्या गळ्यातला ताईत बनलाय.
मराठीत एक झालेय! लेखन हा ‘अर्धवेळ’ उद्योग झालाय. आपापल्या नोकर्‍या, व्यवसाय सांभाळून लिहिणार्‍यांची संख्या मोठी आहे. अनेक प्रशासकीय अधिकारी, इतर क्षेत्रातील महत्त्वाच्या हुद्यावर असणारी मंडळी प्रतिष्ठेसाठी वाटेल तेवढी गुंतवणूक करून सुमार दर्जाची पुस्तके प्रकाशित करतात. त्यामुळे नवसाहित्याकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन बदललाय. इतकेच काय अनेक चुकीच्या संकल्पना, अविचारी आणि समाजद्रोही ‘नायक’ आपल्या माथी मारले जातात. पद आणि प्रतिष्ठेचा वापर करत अशा कलाकृती गाजवल्या जातात, खपवल्या जातात. याबाबत नरेंद्र जाधव यांचे नाव उदाहरण म्हणून घेता येईल. त्यांच्या ‘आमचा बाप आन् आम्ही’च्या अनेक आवृत्या गेल्यात. जाधव आरबीआयचे अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, नियोजन मंडळाचे अध्यक्ष होते. त्याचा वापर करत त्यांनी असंख्य पुस्तके खपवलीत हे सत्य नाकारण्याचे धाडस कोणात आहे? त्या पुस्तकाचा गाभा म्हणून त्यांच्या वडिलांचे उदाहरण सातत्याने सांगितले जाते. त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितले, ‘जे काही करशील त्यात टापला जा; भलेही गुंड झालास तरी बी चालल पर टापचा गुंड हो!’ काहीही करून यश मिळवायचेच अशी शिकवण त्यांना त्यांच्या वडिलांनी दिली. ‘एकवेळ टापला गेला नाहीस तरी चालेल पण आधी एक चांगला माणूस हो’ अशी शिकवण मात्र त्यांना त्यांच्या वडिलांनी दिली नाही! तरीही या पुस्तकाच्या इतक्या आवृत्त्या जात असतील  तर आनंदच आहे.
नवीन लेखक आणखी लिहिते व्हावेत, त्यांना प्रस्थापित यंत्रणेकडून डावलले जाऊ नये, विविध विषयांवर त्यांनी सातत्याने गुणवत्तापूर्ण लिहावे, जुन्या-नव्या लेखकांचा आणि त्यांच्या साहित्यकृतींचा त्यांचा अभ्यास व्हावा, त्यांना व्यासपीठ मिळावे आणि मुख्य म्हणजे त्यांना लेखनाच्या समाधानाबरोबरच आर्थिक लाभही व्हावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. लेखनाची न आवरण्याइतकी हौस असेल, साहित्यविषयक जीवननिष्ठा प्रबळ असतील, अखंडपणे अभ्यासाची आणि सतत नव्याचा ध्यास घ्यायची तयारी असेल तर त्यांनी माझ्याशी 7057292092 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा. मराठी साहित्याला फार मोठा वारसा आहे आणि तो अधिक सशक्त करणे, जागतिक साहित्यविश्‍वात माय मराठीचा विजयध्वज फ़डकवत ठेवणे यासाठी आता साहित्यिक जीवनव्रतींची गरज आहे. ते पुढे आले तर आणि तरच स्वामीजींना अपेक्षित असलेले ‘बौद्धिक क्षत्रिय’ निर्माण होऊ शकतील.
- घनश्याम पाटील
7057292092

2 comments:

  1. वास्तववादी आणि सकारात्मक लेख

    ReplyDelete
  2. घनश्यामसर तुमचे विचार तर परखड आणि सध्याच्या परिस्थितीचे अतिशय योग्य शब्दांमधे विमोचन आहे ।

    ReplyDelete