Pages

Saturday, April 1, 2017

गेली पत्रकारिता कुणीकडे?

भाऊ तोरसेकर हे मराठीतील एक ध्येयनिष्ठ पत्रकार आहेत.  आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’मधून त्यांच्या पत्रकारितेचा आरंभ झाला. सातत्यपूर्ण आणि दर्जेदार लेखनासाठी प्रसिद्ध असलेल्या भाऊंनी कधीही आपली लेखणी गहाण ठेवली नाही. म्हणूनच त्यांच्यासारखे पत्रकार आजच्या जमान्यात दुर्मीळ आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तर हे भाऊ सांगत होते, ‘यापुढचा काळ असा येईल की, रस्त्यावर पत्रकार दिसला रे दिसला की लोक त्याला बदडायला सुरू करतील. त्यासाठी काही कारणही लागणार नाही! तो पत्रकार आहे ना! मग ठोकायला इतकेच कारण पुरेसे आहे! बडवा! अशी लोकभावना तयार होतेय...’
बारकाईने पाहिल्यास भाऊंच्या या निरीक्षणातील तथ्य कोणीही नाकारू शकणार नाही. भ्रष्टाचाराने वैतागलेले लोक एकेकाळी खाकी आणि खादीला शिव्या घालायचे. राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याविषयी त्यांच्या मनात तीव्र नाराजी होती. ही जागा आता प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी घेतलीय. हातात ‘बूम’ आला की आपण जगाचे राजे झालो, ब्रह्मदेवाचे बाप झालो अशा आविर्भावात अनेकजण वावरत असतात. मग त्यासाठी लागणारा अभ्यास, परिश्रम, सातत्य, निष्ठा हे सगळे गौण ठरते.
रवींद्र गायकवाड हे शिवसेनेचे एक खासदार आहेत. या आठवड्यात त्यांनी ‘एअर इंडिया’च्या एका अधिकार्‍याला चप्पलने मारण्याचा पराक्रम केला. हातातील ‘शिवबंधन’ दाखवत त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर त्याची कबुलीही दिली. हा प्रकार का घडला, तो योग्य की अयोग्य या विषयावर थेट न्यायाधीशांप्रमाणे न्यायनिवाडा करणार्‍या माध्यम प्रतिनिधींनी ‘चप्पलमार खासदार’ असेच त्यांचे नामकरण केले. खरेतर गायकवाड हे प्राध्यापक आहेत. प्रवचनकार आहेत. किल्लारी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ते बराच काळ अध्यक्ष होते. उमरगा मतदार संघाचे आमदार होते आणि मुख्य म्हणजे ते सध्या खासदार आहेत. ‘अंदर ले के मारते है साले को, यहॉं कोई देखने नही आएगा’ असे विमान तळावरील अधिकार्‍याने म्हटल्यावर साहजिकच त्यांच्यातील ‘शिवसैनिक’ जागा झाला. त्यांनी त्या अधिकार्‍याला चप्पलने बदडून काढले. लोकशाही व्यवस्थेत या घटनेचे समर्थन करणे शक्य नसले तरी अधिकार्‍यांचा मुजोरपणाही दुर्लक्षून चालणार नाही. ‘ग्राहकांशी’ असे वागणे सरकारी विमानसेवेतल्या लोकांना सोडा पण खासगी उद्योगातील लोकांनाही शोभत नाही; मात्र त्यावर काहीच न बोलता रवींद्र गायकवाड यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात आले. विमान कंपन्यांकडून त्यांच्या विमान प्रवासावर बंदी घालण्यात आली. राज्यातील आणि देशातील सर्व समस्या सुटल्या असे वाटल्याने सलग त्यांच्यावरच बातमीपत्रे करण्यात आली.
मुख्य म्हणजे एका दूरचित्रवाणी वाहिनीने तर कहरच केला. त्यांच्या उमरग्यातील घरी जाऊन या प्रतिनिधीने त्यांच्या घरी येण्याची विचारपूस केली. ते नसल्याने यांनी त्यांच्या घरच्यांची मुलाखत केली. ते करताना खासदार गायकवाड यांच्या दोन पाळीव कुत्र्यांवर बातमी केली. ‘खासदार साहेब तर आपल्याला भेटू शकले नाहीत, मात्र त्यांची ही दोन परदेशी कुत्री याठिकाणी आहेत. आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊ...’ असे म्हणत त्यांनी ती कुत्री कुठून आणली, कशी आणली, खातात काय, खासदारांचे त्यांच्यावर किती प्रेम आहे, ती चावत कशी नाहीत, त्यांनाही खासदार साहेबांच्या येण्याची कशी प्रतिक्षा आहे यावर विशेष कार्यक्रम केला. वर ‘यातून लोकांना माहिती मिळते आणि त्यांचे मनोरंजनही होते’ असा दावा या वृत्तवाहिनीने केला. हा आजच्या पत्रकारितेचा ‘चेहरा’ आहे. यांना कोणताही विषय बातमी ‘चालवण्यासाठी’ पुरतो!
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणत्या नाव्ह्याकडून केस कापतात, ते किती छोटे कापतात, त्यांची जात कोणती इथपासूनच्या बातम्या दिल्या गेल्या. त्यातल्या त्यात वृत्तवाहिन्यांच्या आणि हिंदी वृत्तपत्रांच्या ‘ऑनलाईन आवृत्ती’ म्हणजे तर एक भयंकर प्रकरण असते. लैंगिकतेशी संबधित असलेल्या चटकदार बातम्या म्हणजेच त्यांना लोकांची आवड वाटते. मग त्यावर तुम्हाला कितीही विकृत आणि किळसवाणे वाचणे भाग पडते.
ग्रामीण भागातील मुलं मोठ्या आशेनं या क्षेत्रात येतात. त्यांना वाटते आपण काहीतरी सत्यशोधन करू शकू! लेखणीच्या माध्यमातून थोडासा काळोख दूर करू! काहीजण नेटाने या क्षेत्रातील पदवी मिळवून काम सुरू करतात; पण त्यांचा अपेक्षाभंग होतो. सध्या सर्वाधिक बदनाम हे क्षेत्र झाले आहे. ‘पेडन्यूज’चा सुळसुळाट झालाय. मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांची विश्‍वासार्हता कधीच लयास गेलीय. संपादकांवर व्यवस्थापनाचा दबाव असतो. त्यातूनच आज लिहिलेला अग्रलेख दुसर्‍या दिवशी माघार घेण्यापर्यंतचे प्रकार घडताना दिसून येतात. ‘तहलका’च्या तरूण निस्‘तेजपाल’चे गोव्यातील प्रकरण आपणास ज्ञातच आहे. काही पत्रकार संघटना पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढताना दिसतात तर तालुका स्तरावरील अनेक पत्रकार संघ म्हणजे चक्क ‘संघटीत गुन्हेगारांच्या टोळ्या’ झाल्यात हे कोण नाकारणार? ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ असलेल्या माध्यमांचे हे रूप कुणालाही अस्वस्थ करणारे आहे.
सध्या माध्यमांत अनेक मुली जिद्दीने काम करताना दिसतात. विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमात हे प्रमाण मोठे आहे. ही अतिशय चांगली गोष्ट आहे! मात्र महाराष्ट्रात वृत्तवाहिनी अथवा वृत्तपत्रांच्या मुख्य संपादकपदी महिला किती? असा प्रश्‍न केला तर त्याचेही उत्तर निराशाजनकच येते. शिरीष पै, जयश्रीताई खाडिलकर-पांडे, राही भिडे अशा काही अपवाद वगळता एकाही स्त्रिला दैनिकाची संपादक म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करता आली नाही. (त्यातही स्वतंत्र मालक आणि संपादक तर नाहीच नाही.) त्यांच्याकडे कुटुंबाची जबाबदारी असते, त्यांना अनुल्लेखाने मारले जाते अशी फुटकळ कारणे देऊन त्यावर कोणीही बोलत नाही.
सत्य मांडण्यासाठी अहोरात्र झटणार्‍या पत्रकारांचे भवितव्य काय, याचाही विचार झाला पाहिजे. मोठ्या शहरात किमान त्यांच्या गरजेपुरते मानधन मिळते; मात्र ग्रामीण वार्ताहरांचे मानधन विचारल्यावर आणि ते ऐकल्यावर कुणालाही धक्का बसेल. मोठमोठ्या वृत्तपत्रांसाठी आणि वाहिन्यांसाठी काम करणार्‍या ग्रामीण वार्ताहरांना शब्दशः अडीचतीन हजार रूपये महिना इतक्या मानधनात काम करावे लागते. तेही कधी वेळेवर मिळते असे नाही. मग यातील काहीजण विमा पॉलिसी चालवतात, काहीजण भाजीपाला विकतात, काहीजण वृत्तपत्र विक्रीचे गाळे चालवतात तर काहीजण शिक्षकीसारख्या पेशात काम करून उरलेल्या वेळेत पत्रकारिता करतात. त्यांच्याकडून मग ‘पत्रकार’ म्हणून आपण काय अपेक्षा ठेऊ शकतो? त्यांनी इमाने इतबारे काम केले तरी त्यांना या क्षेत्रात खरेच न्याय मिळतो का? एखाद्या वृत्तपत्राचे ओळखपत्र खिशात ठेऊन केवळ ‘प्रतिष्ठे’साठी वार्ताहर म्हणून मिरवणारे अनेकजण तुम्हाला गावागावात भेटतील.
पुण्या-मुंबईसारख्या शहरात तर काही पत्रकार ‘ठेकेदार’ झालेत. क्षेत्र पत्रकारिता (बीट रिपोर्टींग) या प्रकारामुळे ते संबंधितांना वेठीस धरतात. आपण म्हणू त्याप्रमाणेच सगळे काही घडायला हवे असा यांचा आविर्भाव असतो. आपण कुणावरही वाटेल तशी टीका करू शकतो, त्याचे भवितव्य धोक्यात आणू शकतो, त्याला उद्ध्वस्त करू शकतो असा अहंकार त्यांच्या मनात निर्माण झालाय. त्यातूनच अनेकदा दुसरी बाजू न पाहता सत्याचा विपर्यास केला जातो. एखादा माणूस अडचणीत असेल तर त्याला सावरण्याऐवजी आणखी गाळात ढकलले जाते. विरोधकावर त्याने बेछुट आरोप करावेत, सतत वादग्रस्त विधाने करावीत, यांना खाद्य पुरवावे याची दक्षता घेतली जाते. त्या मंथनातून हातात काही सकारात्मक येणार का हे न पाहताच विषय चर्चेला आणले जातात. वृत्तवाहिन्यांवर रोज होणार्‍या चर्चा या प्रवृत्तीमुळेच हास्यास्पद ठरल्यात.
मालकशाही आणि व्यवस्थापनाचा दबाव यामुळे या क्षेत्रातील प्रामाणिक लोकांची होणारी कुचंबना व्यवस्था संपवायला निघणार्‍यांच्या इराद्याला खतपाणी घालणारी आहे. सध्याचे भीषण वास्तव लक्षात घेतले तरी निष्ठेने, प्रामाणिकपणे काम करणार्‍या पत्रकारांची संख्याही कमी नाही. त्यांच्याचमुळे या क्षेत्राचा गाडा चालतोय; मात्र त्यांना प्रतिष्ठा राहिला नाही. असण्यापेक्षा दिसण्यालाच अधिक महत्त्व प्राप्त झाल्याने गुणवत्तेची, परिश्रमाची कदर केली जात नाही. आलेल्या प्रेसनोटवरून बातम्या करण्यापलीकडे त्यांच्या हातात काही राहिले नाही.
असे सारे चित्र असताना छोटी वृत्तपत्रे मात्र सर्व प्रकारचे धोके स्वीकारत, धाडसाने सत्य मांडण्याचे काम करताना दिसतात. त्यांना वाचकांकडून बळ मिळाले तरच हे चित्र बदलू शकेल. जिल्हा वृत्तपत्रे आणि स्थानिक वृत्तपत्रे जगायला हवीत. जाहिरात पत्रे आणि मतपत्रे यामध्ये वृत्तपत्रे शोधायची झाल्यास अशा नियतकालिकांशिवाय पर्याय नाही.
- घनश्याम पाटील
७०५७२९२०९२

3 comments:

  1. Jai Shri Krishna
    Khasdar Shri Gayakvadanche samarhan hovuch shakat nahi
    Patrakaranche reporting hi chukiche aahe
    Abhar

    ReplyDelete
  2. वास्तव मांडलात सर. आमच्या सारख्या शिकाऊ पत्रकारांना ह्या गोष्ट कळणे गरजेचे आहे.

    ReplyDelete