Pages

Saturday, March 11, 2017

पुढे खडतर काळ!

जागतिक महिला दिनाचे कार्यक्रम सर्वत्र जोरदारपणे सुरू असताना, त्याचे नियोजन सुरू असताना आपल्याकडे महिला दिनाच्या आदल्या दिवशी सर्वात मोठी शोकांतिका ठरावी अशी एक बातमी होती. मिरज तालुक्यातल्या म्हैसाळ या गावात बाबासाहेब खिद्रापुरे हा होमिओपॅथिक डॉक्टर होता. त्याच्या ‘भारती हॉस्पिटल’मध्ये तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील स्वाती जमदाडे ही विवाहिता दाखल होती. कशासाठी? तर स्त्रीभ्रूण हत्येसाठी! तिच्या नवर्‍यानेच तिला त्यासाठी दाखल केले होते. त्यात तिचा मृत्यू झाला. मग नवर्‍याने गावात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याचाही प्रयत्न केला पण गावकर्‍यांच्या सजगतेमुळे तो पुर्णत्वास आला नाही. पोलिसांनी वेळीच गुन्हा दाखल केला. डॉ. खिद्रापुरे सारख्या नतद्रष्टावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आणि तो लगेच फरारही झाला. त्याने 19 गर्भ कॅरिबॅगमध्ये घालून पुरल्याचे तपासात समोर आले. क्रौर्याची परिसीमा ठरणारे हे दुष्कृत्य आपल्या महाराष्ट्रात घडले आहे.
यापूर्वी बीड येथील बालाजी मुंडे या डॉक्टरनेही असे उद्योग केले होते. त्याला अटक झाल्यावर अनेक भयंकर सत्ये पुढे आली. समाजसुधारणेत सदैव पुढाकार घेणार्‍या आणि देशाचे वैचारिक नेतृत्व करणार्‍या महाराष्ट्रात असे करंटे लोक आहेत याचा अत्यंत खेद वाटतो. वैद्यकीय क्षेत्राचे आदर्श धुळीला मिळवणारे हे कलंकीत डॉक्टर आणि मुलीची चाहूल लागल्याने गर्भपात करणारे मनोरूग्ण जोडपे, त्यांना पाठिशी घालणारे त्यांचे पालक हे सगळेच समाजद्रोही आहेत. यातील डॉक्टरावर तर कठोर कारवाई व्हायला हवीच पण ज्यांनी ज्यांनी गर्भपात केलाय त्या सर्वांना शिक्षा व्हायला हवी. एकीकडे स्त्री शक्तीचा जागर सुरू असताना आपण तिचा जन्मच नाकारतोय, ही आजच्या काळातील अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. आपण विकासाच्या गप्पा मारत असताना हे आणि असे जे प्रकार सातत्याने पुढे येतात ते निंदाजनक, संतापजनक आणि आपले मनुष्यत्व संपत चालल्याची साक्ष पटवून देणारे आहेत.
सध्या डॉक्टरी पेशाचे हिडीस वास्तव समोर येत असतानाच काही समाजसेवी संघटनांनी एक चळवळ उभारलीय. त्यांना सोनोग्राफीला मान्यता हवीय. कशासाठी? तर गर्भातील बाळात काही व्यंग असेल, तो गतिमंद असेल, त्याच्या शारीरिक क्षमता विकसित होणार नसतील तर वेळीच गर्भपात करून त्या बाळाचा जन्मच होऊ द्यायचा नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. यातून या संस्थांची बुरखा पांघरलेली विकृत मनोवृत्ती दिसून येते. स्त्रीभ्रूणहत्येत जे रॅकेट कार्यरत आहे त्यांचेच हे षडयंत्र असण्याची शक्यता आहे. त्यासाठी मात्र काही समाजसेवक, सामाजिक संस्था यांचा नेहमीप्रमाणे आधार घेतला जातोय. मुलगा किंवा मुलगी कोणत्याही रूपाने निसर्गाने जे काही दिले, त्याचा आदर करत बाळाच्या सर्वांगिण क्षमता विकसित करण्याऐवजी हे महाभाग त्याच्या जन्माच्या आधीपासूनच त्याच्या हत्येची तयारी सुरू करतात. आपल्या संस्कृतीवर, माणूसपणावर श्रद्धा असलेल्या कुणासाठीही ही बाब चीड आणणारी आहे. अशी कारस्थानं आपण हाणून पाडायला हवीत.
डॉक्टर हा घटक जीवदान देतो. त्यामुळे त्याला आपण ‘देवदुता’ची उपमा दिली. मात्र वैद्यकीय क्षेत्राचे इतके बाजारूपण झालेय की आलेल्या प्रत्येकाला कापायचाच विचार हे लोक करतात. काही सन्माननीय अपवाद सोडले तर या क्षेत्राला बर्‍यापैकी कीड लागली आहे. ऍसिडीटीमुळे छातीत थोडीसी जळजळ झाली तरी हृदयापासून अनेक कारणे देऊन त्याची चिकित्सेच्या नावावर चिरफाड केल्याची उदाहरणे आपल्याकडे कमी नाहीत किंवा एक रूपयात हृदयाची शस्त्रक्रिया करणार्‍या एका भोंदूचा विक्रम मध्यंतरी चर्चेत आला होताच. त्याने तर गरीबांच्या किडण्याच गायब केल्या होत्या. हे सारे क्लेषकारक आहे. या क्षेत्रातील सेवाधर्म लयाला जाऊन इतर उद्योगाप्रमाणेच हाही ‘धंदा’ झालाय, हे वास्तव आपण स्वीकारायलाच हवे.
म्हैसाळच्या दुर्दैवी घटनेची चर्चा आमच्या कार्यालयात चालली होती. त्यावेळी आमचे एक ज्येष्ठ सदस्य म्हणाले, ‘मी ऑस्ट्रेलियात मुलीकडे गेलो होतो. तिथे एका हॉटेलमध्ये गेल्यावर एक नवी डिश मेन्यू कार्डवर दिसली. सहज म्हणून मुलीला ती मागवायची का, असे विचारले. तर तिने सांगितले, बाबा, ते आपल्याला चालणार नाही. इथे गायींना दुधासाठी आणि गर्भधारणेसाठी सातत्याने इंजेक्शन दिली जातात. त्यामुळे त्यांचे निम्मे आयुष्य कमी होते. त्यातही गायीला कालवड झाली तर ठीक, कारण ती दुधासाठी कामाला येते; पण गोरा झाला तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. म्हणून त्याला मारले जाते. त्या नवजात गोर्‍याच्या मांसाला मोठी मागणी असते. त्या मांसाची ही डिश आहे...’ त्यांचे बोलणे ऐकून आम्हाला आणि हे सांगताना त्यांनाही गलबलून आले.
जिथली जनावरे सुरक्षित नाहीत, माणसे, बायका सुरक्षित नाहीत, बालके आणि अर्भकेही सुरक्षित नाहीत त्या राष्ट्राचे भवितव्य काय असणार आहे? आपण प्रगतीच्या कितीही गप्पा मारत असलो तरी ही ‘सूज’ संवेदनशील मनाला अस्वस्थ करते. संस्कार आणि संस्कृतीचे टेंभे मिरवणार्‍या आपल्या देशात तर अनैतिकता, कुविचार आणि त्यातून कुकृत्याची मोठी परंपरा निर्माण झाली आहे. कधी काळी हा देश संस्कारशील, चारित्र्यसंपन्न, नीतिमान लोकांचा होता हे सांगितले तरी खरे वाटू नये अशी परिस्थिती निर्माण झालीय.
देशाच्या पंतप्रधानपदापासून ते राष्ट्रपतीपदापर्यंत आपल्याकडे स्त्रियांना संधी मिळाल्या. सर्व क्षेत्रात त्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली. तरीही त्यांना आपण सन्मान देत नाही. ‘चूल आणि मूल’ हे भाग्योदय समजणार्‍या बायकाही आपल्याकडे कमी नाहीत. अनेक रणरागिणींच्या त्यागाची, पराक्रमाची आपण कधी कदर केलीच नाही. म्हणूनच महाराणी ताराबाईसारख्या, अहिल्यादेवींसारख्या स्त्रिया आपल्याकडे तुलनेने खुपच उपेक्षित राहतात. स्त्रीच पुरूषांना जन्म देते आणि आपण तिच्यावरच अन्याय-अत्याचार करतो, तिची हेळसांड करतो, तिला कमी लेखतो, तिचा स्वाभिमान दुखावतो आणि तिचा जन्मही नाकारतो हे कशाचे लक्षण आहे?
अर्थात, हे सगळेच नकारात्मक आहे असेही नाही. आपल्या मुलींनाच भाग्यलक्ष्मी माणून त्यांच्यासाठी बरेच काही करणारे, त्यांना जगरहाट्यात स्वयंसिद्ध करणारे, त्यांची पूजा बांधणारे, त्यांच्या संस्कारछायेत वाढून उमलत्या कळ्यांचे स्वागत करणारेही कमी नाहीत. एकीकडे स्त्री सुरक्षा, स्त्री संरक्षण असे विषय चालू असताना दुसरीकडे ‘स्त्रीच स्त्रीची शत्रू‘ असेही चित्र दिसते. अनेक ठिकाणी स्त्रियाच स्त्रियांना कमी लेखतात, त्यांना अडचणीत ढकलतात. स्त्रीभ्रूणहत्येसारख्या गंभीर प्रकरणांचा अभ्यास केल्यास अनेक ठिकाणी त्या ‘आई’लाच मुलगी नको असल्याने हे घडल्याचे समोर येतेय. मग तिला आई तरी कसे म्हणणार?
बहिणाबाई चौधरी म्हणतात,
दुधावरी आला बुरा, तिले साय कधी म्हणू नये
जिची ममता आटली, तिले माय कधी म्हणू नये!

हे ‘ममत्व’ आटणे आपले राष्ट्र बेचिराख करण्यास कारणीभूत ठरणारे आहे.
व. पु. काळे हे आपल्याला कथाकार म्हणून सुपरिचित आहेत; मात्र त्यांचा ‘नको जन्म देवूस आई’ हा एक छोटासा कवितासंग्रहही प्रकाशित आहे. पुण्यातल्या ‘पृथ्वीराज प्रकाशन’च्या म. भा. चव्हाणांनी तो प्रकाशित केलाय. त्याच्या मुखपृष्ठावर आपल्याला हलवून सोडणार्‍या चार ओळी आहेत. व. पु. लिहितात,
गर्भवतीला म्हणाले
तिच्या गर्भातले बाळ
नको जन्म देवूस आई
पुढे खडतर काळ!

हा ‘खडतर’ काळ आपण आपल्या अविचारातून आणलाय. निसर्गाचे चक्र आपण बिघडवतोय. म्हणूनच खिद्रापुरे आणि मुंडेसारखे नराधम डॉक्टर हे अघोरी धारिष्ठ्य करतात. त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी करतानाच, आता समाजानेही बदलायला हवे! अन्यथा निसर्ग आपला ‘बदला’ घेतल्याशिवाय राहणार नाही!!

- घनश्याम पाटील
7057292092



2 comments:

  1. घनशामसर केवढे भिषण कृत्य आहे हे । तुम्हीतर ह्या त्यांची लक्तरेच काढलीत । आशा प्रवृत्तीं विरुध्द आवाज तर उठवलाच पाहिजे ।

    ReplyDelete
  2. या पृथ्वीवरचा सर्वाधिक क्रूर पशू माणूसच आहे याची खात्री पटली . या नृशंस माणसाला देहदंडाची शिक्षा सुद्धा सौम्पच होईल .एका भीषण वास्तवावरची आतिशय तळमळीने उफाळून आलेली प्रतिक्रिया हेच या लेखाबदल म्हणावे लागेल

    ReplyDelete