Pages

Saturday, February 18, 2017

संवेदनशील कल्पनारम्यतेचा परिणामकारक आविष्कार

वाचकांना घडाभर दूध देण्यापेक्षा पेलाभर बासुंदी देणे कधीही श्रेयस्कर! ही किमया सगळ्यांनाच जमते असे नाही. आपल्याला जे मांडायचे आहे ते नेमकेपणे, सुस्पष्ट आणि थेट वाचकांच्या हृदयाला जाऊन भिडणारे असावे. असे लेखन करणार्‍या मोजक्या लेखकांपैकी एक म्हणजे समीर नेर्लेकर! कवी, कथाकार, तंत्रज्ञ, चित्रकार अशा अनेक भूमिकांतून ते सुपरिचित आहेत. यापूर्वी त्यांची ‘एमरल्ड ग्रीन आणि इतर कथा’ व ‘हसण्यावर टॅक्स नाही’ ही पुस्तके ‘चपराक’ने प्रकाशित केली. त्यांचा हा लघुकथा संग्रहही वाचनीय आणि तितकाच उद्बोधक आहे. वाचकांना उपदेशाचे डोस न पाजता साध्या-सोप्या भाषेत त्यांचे मनोरंजनातून प्रबोधन करणे ही नेर्लेकरांची खासीयत असल्याने हा कथासंग्रह सर्वांना हवाहवासा वाटेल.
यात एकूण बारा कथा आहेत. प्रत्येक कथा म्हणजे एक स्वतंत्र तत्त्वज्ञान. त्यात नेर्लेकरांची स्वतंत्र शैली. त्यांची भाषा हेच तर त्यांचे सामर्थ्य. प्रत्येकाला वाचावेसे वाटेल आणि त्यातून वाचनानंदाबरोबरच काहीतरी हरवलेले गवसल्याचे समाधान वाटेल असे त्यांचे लेखन. मराठी कथा सशक्त होण्यासाठी असे प्रयोग व्हायलाच हवेत.
‘पांढरी बट’ ही कथा वरकरणी रूक्ष व खडूस वाटणार्‍या ‘बॉस’ची आहे. असे अनेक वरिष्ठ आपल्या आजुबाजूला असतात आणि अशा ‘नारळा-फणसा’सारख्या माणसांची खरी ओळख व्हायला आपल्याला अनेकदा बराचसा काळ जावा लागतो. ऐन पंचवीशीतले ज्युनिअर सिनेमा पाहण्यासाठी ‘शॉर्ट लिव्ह’ मागायला बॉसच्या केबिनमध्ये जमतात. बॉसचा गंभीर चेहरा पाहून सगळ्यांच्या नजरा खाली जातात. पुढे काय घडणार आणि आपल्या सुटीचे काय होणार या विचारात असतानाच बॉस मात्र पंचवीस वर्षापूर्वीच्या इतिहासात जातात. जेव्हा उमेदवारीच्या काळात बॉसला अशी सुट्टी हवी असते तेव्हा त्याची बॉस त्यांना कशी वागणूक देते याची आठवण जागी होते आणि कथानक फुलत जाते. पंचवीस वर्षांनीही तिची ‘पांढरी बट’ बॉसला ‘माणुसपणाची’ शिकवण देते.
मनुष्य हा मुळातच प्रयोगशील प्राणी आहे. त्यात आजची पिढी तर आणखी चंट! ही मूलं काय काय करत बसतील हे भल्याभल्यांना कळणे शक्य नाही. रविवारच्या रम्य सकाळी वामनरावांच्या घरात अचानक पाणी येणे बंद होते. नळाला पाणी येत नसल्याने सौभाग्यवती त्यांना साखर झोपेतून उठवतात. ते एका प्लंबरला बोलावतात. तोही संपूर्ण पाईपलाईन बदलण्याचा सल्ला देतो. खरेतर वामनरावांच्या चिरंजीवाने केलेला हा प्रताप! गोट्या त्याची करामत सांगतो आणि वामनरावांच्या घरातील पाणीप्रश्‍न सुटतो. म्हटले तर अगदी साधे कथासूत्र असलेले ही कथा; पण नेर्लेकरांनी ज्या शैलीत ती मांडलीय ती पाहता मराठी कथेच्या भवितव्याची कोणीही चिंता करण्याचे कारण नाही.
जसं मुलांचं तसंच बायकांचंही! त्यादृष्टिने त्यांची ‘पियानो वाजवणारी राजकन्या’ ही कथा पहायला हवी. ‘स्त्री म्हणजे काय?’ असा सवाल एक शिष्य त्याच्या गुरूला करतो आणि अंतरात्म्याला साद घालत, सर्व ज्ञानकोश उलगडूनही त्यांना त्याचे उत्तर मिळत नाही. तो साधू, तो शिष्य आणि त्यांच्या शोधाचे साधन असलेली ती राजकन्या यापैकी कोणीही आज हयात नाही; मात्र कथाकार नेर्लेकर यांच्यासह वाचकही या प्रश्‍नाच्या उत्तराच्या प्रतिक्षेत आहेत.
‘वधुपिता आणि मी’ हा मेलोड्रामा आजच्या परिस्थितीवर चपखल भाष्य करतो. प्रत्येक वधुपिता उत्तम जावयाच्या शोधात असतो. जवळपास प्रत्येकाला आपला जावई धनाड्य, कमावता असावा असेच वाटते. ते स्वतः ‘आपण किती शून्यातून वर आलोय’ याच्या फुशारक्या मारत असतात; मात्र जावई मात्र स्थिरस्थावर असलेलाच लागतो. ‘तुमचे लग्न झाले तेव्हा तुमच्याकडे काय होते? तुम्हीदेखील अंगावरच्या कपड्यानिशी खेड्यातून या शहरात आला होता, असं तुमची मुलगी सांगते’ असं थेट वधुपित्याला सुनावण्याचं धारिष्ट्य नेर्लेकरांच्या कथानायकात आहे. आजच्या तमाम तरूणाईचं प्रतिनिधित्व करणारा हा नायक अशा तरूणांना त्यांचा ‘बुलंद’ आवाज वाटल्याशिवाय राहणार नाही. वस्तुस्थितीवर अचूक बोट ठेवत समाजातली, दोन पिढ्यातली, परिस्थितीतली विसंगती दाखवून देण्यात नेर्लेकर पटाईत आहेत. हे काम ते इतक्या खुबीने करतात की, मनातली अढी कधी आणि कशी दूर झाली, अजिबात न दुखता हा काटा कधी आणि केव्हा निघाला हेही संबंधितांना कळत नाही. ‘एक दिवस माझी नायिका प्रेक्षकांमधून धावत येईल रंगमंचावर, माझ्या दिशेने बाहू पसरून...’ असा आशावाद त्यांनी पेरलाय. हा आशावाद म्हणजे आजच्या तरूणांच्या मनातला हुंकारच जणू!
‘पोस्टमार्टम’, ‘स्पर्श’ या कथाही त्यांच्या भावभावनांचं प्रगटीकरणच आहेत. या कथा आजच्या पिढीच्या आहेत. त्यांनी त्या वाचायलाच हव्यात. त्यांच्याच मनातील भावना नेर्लेकरांनी शब्दबद्ध केल्यात. एखादा गुलाब नशिबवान असतोच. तो कुणाच्या हायहील्सच्या सँडलखाली तुडवला जात नाही किंवा त्याचं पोस्टमार्टमही होत नाही. तो टेबलावरच्या फुलदाणीत रूबाबात बसतो!!
‘स्पर्श’ ही एक रहस्यकथा आहे. कथांचे सगळे फॉर्म एकाच पुस्तकात समर्थपणे आणि पूर्ण सामर्थ्यासह हाताळण्याचा यशस्वी प्रयोग नेर्लेकरांनी केलाय. ही कथा वाचताना वाचक स्तब्ध होतात. ‘पुढे काय’ हा कथेचा आत्मा असतो. ही उत्कंठा शेवटपर्यंत जिवंत ठेवण्यात ‘स्पर्श’ यशस्वी ठरलीय. या स्पर्शाचे हे रहस्य जाणून घेण्यासाठी ही कथा मुळातूनच वाचायला हवी.
‘ती सध्या काय करतेय?’ हा प्रश्‍न अनेकांना पडलेला असतो. ‘ती’च्या बद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असणे हा मानवी स्वभावाचा गुणधर्मच आहे. मात्र वैवाहिक आयुष्य सुरळीत चालू असताना ‘ती’चा खूप वर्षांनी अचानक एका ‘मीटिंग’साठी मेल येतो. ही ‘ती’ म्हणजे ‘ती‘च आहे हेही नायकाला माहीत नसते. तिला वाटते आपण खरे सांगितले तर कदाचित तो येणार नाही. म्हणून तिही अशा पद्धतीने त्याला बोलवून घेते. मग या ‘मीटिंग’मध्ये नेमके काय घडते हे जाणून घेण्यासाठी ही कथा वाचण्याशिवाय गत्यंतर राहत नाही.
या कथामाळेतील ‘शिरोमणी’ म्हणजे ‘है क्या आव्वाज’ ही कथा. प्रत्येक बापाने वाचावी आणि आपल्या मुलांना वाचायला द्यावी अशी ही ‘दमदार’ कथा. सध्या अनेकांना ‘स्वत्त्वा’चाच विसर पडतो. हे स्वत्त्व जागे करण्यासाठी ‘है क्या आव्वाज’ म्हणजे मैलाचा दगड ठरेल. अनेक सुप्त गुण, क्षमता आपल्यात मुळातच असतात. रोजच्या कामाच्या धबडग्यात आणि जीवनाच्या रहाटगाड्यात आपल्याला त्याचा विसर पडतो. मग अगदी किरकोळ आणि फुटकळ घटकही आपला गैरफायदा घ्यायला  लागतात. कुणाला रॅगिंगसारख्या प्रकारांना सामोरे जावे लागते. कुणाला सहकार्‍यांचा, इमारतीतील सदस्यांचा त्रास सहन करावा लागतो तर कुणाला दहशतीला, गुंडगिरीला सामोरे जावे लागते.  हतबलतेतून आलेले नैराश्य आणि अन्याय सहन करायची वृत्ती यामुळे आपण ‘ठेविले अनंते तैसेची रहावे’चा जप करतो. थोडेसे धाडस अंगी बाळगले तर अनेक समस्या सहज सुटू शकतात याचाही विवेक आपल्यात उरलेला नसतो. हा विवेक जागा करण्याचे काम नेर्लेकरांची कथा करते. शिक्षणापासून ते राजकारणापर्यंत सगळे काही बरबटलेले असताना त्यावर सामान्य माणूस काय ‘तोडगा’ काढू शकतो यावर ती भाष्य करते.
सिंडल आणि मेगा समुद्रतळावर जेव्हा एकत्र येतात... मग काय घडत असावे? त्यासाठी ‘शिंपला’ ही कथा अवश्य वाचा. इमारतीच्या पॅसेजमधून डक्टमध्ये भिरकावलेला तो शिंपला अजूनही तिथेच तरंगतोय! कथा नायकाच्या घराबाहेर!!
‘अडगळ’ वाचताना तर आपण हेलावून जातो. आपल्या सासूबाई ठणठणीत बर्‍या व्हाव्यात यासाठी त्यांना रूग्णालयात दाखल करणारी सूनबाई बघितली की ‘धन्य’ व्हायला होते. असे नातेवाईक बघितले की ‘नातेवाईट’ असतात यावर कोणीही विश्‍वास ठेवेल. म्हातारीची ‘काळजी’ घेण्यासाठी मुलगा आणि सून किती खालच्या थराला जाऊन त्यांना ‘ऍडमिट’ करतात हे वाचून संताप अनावर होतो. काळ कितीही बदलला तरी मुला-सुनेची ही हरामखोरी आपणाला अस्वस्थ करतेच. हेच अस्वस्थलेपण आपल्या माणूसपणाची, जिवंतपणाची साक्ष देतात. अशा कथांतून परपिडा समजून घ्यायला मदत होते.
‘सप्तमातला केतू’ आणि ‘मुखवटा’ या लघुकथाही समीर नेर्लेकर यांच्या क्षमतेची चुणूक दाखवून देतात.
‘पंधरा त्रिक पंचेचाळीस’ हे संग्रहाचे शीर्षक देण्यामागचा त्यांचा उद्देशही मजेशीर आहे. त्यांच्या आयुष्याचे त्यांनी पंधरा पंधरा वर्षाचे तीन टप्पे केलेत. या प्रत्येक टप्प्याचा एक स्वतंत्र इतिहास आहे. खरेतर नेर्लेरांनी त्यावर आत्मचरित्रात्मक लेखन करायला हवे. त्यांचे वडील स्व. सुधाकर नेर्लेकर यांनी ‘पहाट प्रकाशन’ आणि इतर संस्थांच्या माध्यमातून अनेक लेखक-कवींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. घरचे खाऊन लष्करच्या भाकरी भाजण्याचा ‘उद्योग’ ही नेर्लेकरांची ‘वंशपरंपरागत’ वृत्ती आहे. त्यात स्वार्थाचा लवलेश नसतो. त्यामुळेच माणूस म्हणून असलेले त्यांचे सच्चेपण भावते. याच निरागस आणि निर्मळतेतून त्यांचे साहित्य आल्याने त्याला पावित्र्याची झालर असते. मुख्य म्हणजे या संग्रहाचे आकर्षक, सूचक मुखपृष्ठ दस्तुरखुद्द समीर नेर्लेकरांनीच साकारले आहे. लेखक आणि मुखपृष्ठकार एकच असण्याचा दुर्मीळ योग या पुस्तकाने साधलाय.
समीर नेर्लेकर हे मराठी साहित्यातलं एक चिंतनशील बेट व्हावं आणि भविष्यात त्यांनी उत्तमोत्तम लेखन करून त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार घडवावा यासाठी त्यांना तहे दिल से शुभेच्छा देतो!!

- घनश्याम पाटील 
७०५७२९२०९२

1 comment:

  1. व्वा! ह्रदयाला 'टच'करणारे परीक्षण!

    ReplyDelete