Pages

Saturday, January 21, 2017

‘चपराक’चं संमेलनपूर्व संमेलन!



सध्याच्या नोटाबंदीच्या काळात प्रकाशन व्यवहार ठप्प होत असल्याची ‘अफवा’ तेजीत असतानाच आम्ही पुण्यात चौथा ‘चपराक साहित्य महोत्सव’ घेतला. गुरूवार 19 जानेवारी 2017 रोजी झालेल्या या महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे यात एकाचवेळी तब्बल 19 पुस्तके ‘चपराक‘तर्फे प्रकाशित करण्यात आली. सुप्रसिद्ध लेखक प्रा. द. ता. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. घुमानच्या साहित्य संमेलनाचे आयोजक आणि ‘सरहद’चे प्रुमख संजय नहार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांच्या उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा झाला. ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांची मुलाखत, सागर कळसाईत लिखित ‘कॉलेज गेट’ कादंबरीच्या एका प्रकरणाचे अभिवाचन, माधव गिर यांच्या अध्यक्षतेखाली रंगलेले कवी संमेलन अशा भरगच्च कार्यक्रमामुळे हे खर्‍याअर्थी ‘संमेलनपूर्व संमेलन’ रंगले.
प्रकाशन व्यवहाराला गती मिळण्यासाठी मराठीत उत्तमोत्तम पुस्तके सातत्याने प्रकाशित होणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे ‘चपराक साहित्य महोत्सवा’ची संकल्पना पुढे आली. यापूर्वी या संमेलनास सुप्रसिद्ध व्यवस्थापन तज्ज्ञ प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर, महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. सदानंद मोरे अशा दिग्गजांनी अध्यक्ष, उद्घाटक म्हणून उपस्थिती लावली. गुरूवारी झालेल्या समारंभात ‘चपराक’ने 19 पुस्तके प्रकाशित करून मराठी भाषेच्या भवितव्याची चिंता करणार्‍यांना कृतिशील ‘चपराक’ दिली आहे.
‘‘ग्रामीण भागाची पार्श्‍वभूमी असतानाही पुण्यासारख्या महानगरात येऊन ‘चपराक’च्या प्रकाशकांनी हे कार्य उभे केले आहे. आज महाराष्ट्र साहित्य परिषद आणि चपराक मासिक ही साहित्य चळवळीची दोन अविभाज्य अंग झाली आहेत. या दोन्ही संस्थांचे काम मराठी भाषेच्या विकासासाठी भरीव आणि नैतिक अधिष्ठान असणारे असून ‘चपराक’ हे नवोदितांसाठी हक्काचे व्यासपीठ झाले आहे’’ असे गौरवोद्गार द. ता. भोसले यांनी काढले.
संजय नहार यांनी ‘चपराक’चा पाचशे पानांचा विक्रमी दिवाळी अंक, वेळोवेळी घेतलेल्या धाडसी भूमिका यांचे कौतुक केले. मिलिंद जोशी, स्वागताध्यक्ष संजय सोनवणी यांनीही ‘चपराक’मध्ये लेखन येणे कसे प्रतिष्ठेचे आहे आणि ही साहित्य चळवळ जोमाने कशी पुढे येत आहे हे सविस्तरपणे सांगितले.
‘चपराक’चा प्रकाशक या नात्याने मी आणि ज्येष्ठ पत्रकार आबा माळकर यांनी भाऊ तोरसेकर यांच्याशी संवाद साधला. लेखक, पत्रकार म्हणून भाऊ सर्वांना सुपरिचीत आहेत; मात्र या मुलाखतीतून भाऊंची अनेक रूपे समोर आली. महाविद्यालयीन जीवनात विविध आंदोलनात सक्रिय असणारे भाऊ, भाऊंच्या आईने त्यांच्यावर केलेले संस्कार, बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब विखे या दिलदार नेत्यांच्या आठवणी, शरद पवारांचे राजकारण, मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या गंमतीजंमती आणि त्यांचे भवितव्य, ‘चपराक’चे साहित्यिक योगदान, शिवसेना, मुंबईतील गिरणी कामगार, भाऊंचा ‘पँथर’मधील सहभाग आणि नामदेव ढसाळांच्या आठवणी, त्यांचे लेखन, नरेंद्र मोदी यांच्याबाबतची त्यांची मते, आचार्य अत्रे यांच्या सभेच्या आणि भाऊंच्या ‘मराठा’मधील कामाच्या आठवणी अशा चौफेर विषयांवर ही मुलाखत रंगली. मुख्य म्हणजे भाऊ तोरसेकर हे एक उत्तम कवी आहेत हे अनेकांना माहीत नव्हते. या संमेलनात अनेक दर्जेदार कविता प्रभावीपणे सादर करून त्यांनी ही मुलाखत अत्यंत उंचीवर नेली.
‘मार्मिक’मधील त्यांच्या सहभागाबाबत सांगताना त्यांनी सांगितले की, ‘‘लेखनासंदर्भात एका विषयावर त्यांची बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा होती. सुभाष देसाई, मनोहर जोशी असे नेते त्यात सहभागी होते. बाळासाहेबांनी सांगितले की, हा विषय योग्य होणार नाही. भाऊ निर्धाराने आणि ठामपणे म्हणाले, ‘‘हे असेच आले पाहिजे.’’ तेव्हा बाळासाहेब उभे राहिले आणि म्हणाले, ‘मी शिवसेनाप्रमुख आहे...’ भाऊही उभे राहिले आणि म्हणाले, ‘मीही पत्रकार आहे...’ उपस्थित सर्वच नेत्यांच्या चेहर्‍यावर तणाव जाणवत असताना बाळासाहेब हसू लागले आणि त्यांनी सांगितले, ‘मार्मिकला असा भूमिका घेणारा आणि स्वतःच्या मतावर ठाम असणारा संपादक हवाय....’ त्यानंतर माझं आणि त्यांचं नातं अधिक दृढ झालं.’’
शिवसेनेमुळं मुंबईतील मराठी माणूस कसा सुरक्षित आहे हे सांगतानाच भाऊंचं एक विधान तर खरंच खूप विचार करण्यासारखं होतं. ते म्हणाले, ‘‘मुंबईत पोलीस ठाणे नसले तरी चालेल पण शिवसेनेची शाखा पाहिजेच पाहिजे. मुंबई सुरक्षित आहे ती शिवसेनेमुळे आणि त्यात बाळासाहेबांनी रूजवलेला विश्‍वास लोकांच्या मनात आणि हृदयात आहे.’’
सागर कळसाईत हा मराठीतील एक प्रतिभावंत लेखक. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी या तरूणाने बार्शीहून पुण्यात येऊन एम. बी. ए. केले. त्या अनुभवावर ‘कॉलेज गेट’ ही कादंबरी लिहिली. ‘चपराक’ने ती प्रकाशित केली आणि मागच्या चार वर्षात या कादंबरीच्या चार आवृत्या झाल्यात. यावर लवकरच एक चित्रपटही येतोय. सागरची ‘लायब्ररी फ्रेंड’ ही कादंबरीसुद्धा सध्या वाचकप्रिय ठरतेय. सागर आणि त्याच्या सहकार्‍यांनी या महोत्सवात ‘कॉलेज गेट’चे प्रभावी अभिवाचन केले.
शेवटच्या सत्रात माधव गिर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काव्यसंमेलनाने तर वेगळीच उंची गाठली. स्वप्निल पोरे, रमजान मुल्ला, नागेश शेलार, सरिता कमळापूरकर, लक्ष्मण खेडकर, विद्या बयास, रविंद्र कामठे, प्रल्हाद दुधाळ, सौ. चंद्रलेखा बेलसरे, जयंत वाघ, कस्तुरी देवरूखकर, योगेश राऊत, संगीता झिंजुरके, रमेश जाधव, दत्तु ठोकळे अशा कवींनी मैफल गाजवली.
संजय सोनवणी हे महाराष्ट्रातील सुपरिचित नाव आहे. त्यांनी आजवर 85 कादंबर्‍या लिहिल्या. विपुल वैचारिक आणि संशोधनात्मक पुस्तके लिहिली. त्यांचे ‘चपराक’ने यापूर्वी ‘भाषेचे मूळ’ हे भाषाशास्त्रावरील अत्यंत सुंदर पुस्तक प्रकाशित केले होते. यंदाच्या साहित्य महोत्सवात त्यांचा ‘आदमची गोष्ट’ हा कथासंग्रह प्रकाशित झाला. गंमत म्हणजे या संग्रहाचे मुखपृष्ठही त्यांनीच साकारले आहे. सदानंद भणगे हे सुद्धा एक मोठे लेखक. त्यांच्या विनोदी कथा, नाटके सर्वश्रूत आहेत. अस्सल आणि गुणवत्तापूर्ण लेखन असलेल्या सदानंद भणगे यांची ओळख प्रामुख्याने ‘विनोदी लेखक’ अशीच आहे. यापूर्वी ‘चपराक’नेही त्यांचे विनोदी लेखन प्रकाशित केले आहे; मात्र या महोत्सवात त्यांचा ‘हॅपी रिटर्न्स’ हा गंभीर कथांचा अत्यंत वाचनीय कथासंग्रह प्रकाशित झाला. ‘एमरल्ड ग्रीन’नंतर समीर नेर्लेेकर यांचा ‘पंधरा त्रिक पंचेचाळीस’, गोविंद गव्हाणे यांचा ‘बाजीराव मस्तानी आणि इतर प्रेमकथा’ परभणी येथील लेखिका अर्चना डावरे यांचा ‘जुलूस’ हे कथासंग्रहही यावेळी प्रकाशित झाले.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सध्या कवितासंग्रह फारसे कोणी वाचत नाहीत, अशी ‘अंधश्रद्धा’ असताना ‘चपराक’ने सहा कवितासंग्रह प्रकाशित केलेत. त्यात माधव गिर यांच्या ‘शेतीबाडी’ या तंत्रशुद्ध, अष्टाक्षरी खंडकाव्यासह चंद्रलेखा बेलसरे यांचा ‘अरूणिमा’, रविंद्र कामठे यांचा ‘प्रांजळ’, कस्तुरी देवरूखकर यांचा ‘स्वप्नसखा’, जयंत वाघ यांचा ‘शब्दमाला’, योगेश राऊत यांचा ‘झळा’ आणि दत्तू ठोकळे यांचा ‘माझा सावन’ या संग्रहांचा समावेश आहे.
प्रल्हाद दुधाळ यांचा ‘मना दर्पणा’, विनोद श्रा. पंचभाई यांचे ‘ती’च्या मनातलं’, दत्तात्रय वायचळ यांचं ‘स्वप्नातलं पुणं’ ही पुस्तके प्रकाशित झाली. नाशिक येथील लेखक संजय वाघ यांची ‘जोकर बनला किंगमेकर’ ही प्रेरणादायी किशोर कांदबरीही मराठी साहित्यात नवा विक्रम प्रस्थापित करेल.
करमाळा येथील लेखक निलेश सूर्यवंशी हे एक असेच दुर्लक्षित व्यक्तिमत्त्व! त्यांनी 2009 साली ‘आभाळ फटकलं’ ही ग्रामीण पार्श्‍वभूमी असलेली कादंबरी लिहिली. अनेक प्रकाशकांकडे चकरा मारूनही या हरहुन्नरी लेखकाची फारशी कुणी दखल घेतली नाही. गेल्या वर्षी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेने ‘चपराक’च्या दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार दिला. त्या कार्यक्रमाची बातमी वाचून त्यांनी ही कादंबरी ‘चपराक’कडे पाठवली आणि आता ती वाचकांच्या भेटीस आली आहे. ‘चपराक नवोदित लेखकांच्या दर्जेदार लेखनास हक्काचे व्यासपीठ देते’ असे सांगत सविस्तर बातमी देणारी सोलापूरातील वृत्तपत्रं आणि मसापची जुळे सोलापूर शाखा यांच्यामुळे हा अस्सल लेखक उजेडात येऊ शकला. उद्या या कादंबरीवर आधारित चित्रपट आला तर कुणाला आश्‍चर्य वाटू नये.
जाता जाता आणखी एक महत्त्वाचे.
सध्या ‘लिहिणारे’ प्रकाशक ही कल्पनाच दुर्मीळ होत चाललीय. सातत्याने येणारी पुस्तके, त्यासाठी त्यांचे पुन्हा पुन्हा करावे लागणारे वाचन, त्याचे वितरण आणि विक्री, प्रसिद्धी यात प्रकाशक इतके अडकून पडतात की क्षमता असूनही ते लेखनासाठी वेळ देऊ शकत नाहीत. इतरांना ‘प्रकाशात’ आणणारा प्रकाशकच दुर्लक्षित राहतो. हे आम्ही जाणिवपूर्वक होऊ दिले नाही. माझी ‘दखलपात्र’ आणि ‘झुळूक आणि झळा’  ही अग्रलेखांची दोन पुस्तके प्रकाशित झाली. आता या महोत्सवात ‘अक्षर ऐवज’ हे निवडक प्रस्तावनांचे आणि परीक्षणांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
भविष्यातही आम्ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करू ही ग्वाही देतो. कसदार लेखन असणार्‍यांनी खचून न जाता उमेदीने सातत्याने लिहित रहावे आणि माय मराठीची सेवा करावी हेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते. असे म्हणतात की, ‘प्रत्येक वाचकामध्ये एक लेखक दडलेला असतो.’ त्या लेखकाला ‘जागे’ करणे आणि मराठी भाषेच्या सर्वंकश विकासाला हातभार लावणे यादृष्टिने ‘चपराक’चे उपक्रम आणि हा संमेलनपूर्व संमेलन ठरणारा महोत्सव मोलाचा ठरणार आहे.
- घनश्याम पाटील, पुणे
7057292092

3 comments:

  1. मायमराठीच्या सेवेतील अनमोल सेवाव्रती..... चपराक!!!

    ReplyDelete
  2. चपराक च्या प्रयंत्नाना घवघवीत यश लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना.

    ReplyDelete
  3. प्रेरणादायी व माहितीपूर्ण लेख!

    ReplyDelete