Pages

Sunday, January 8, 2017

मराठवाड्याची बहिणाबाई!


आभाळ दाटल्यावर काय होतं?
पाऊस कोसळतो!

आणि ‘अंतरी’चे आभाळ दाटल्यावर?
अस्सल कविता बरसतात!!

पाऊस पडल्यानंतरची प्रसन्नता आणि अंतःकरणातले काव्यमय विचार कागदावर उतरल्यानंतरची भाव्यात्मकता फारशी वेगळी नसते. धो धो बरसणार्‍या सरी पाण्याचा दुष्काळ नष्ट करतात आणि अंतरीच्या सरसर येणार्‍या ओळी मन मोकळे करतात. ‘आकाश’ आणि ‘आभाळ’ याच्यात हाच तर फरक आहे. आकाश कसं? नेहमीच निरभ्र! ‘आभाळ’ मात्र भरून आलेलं! आपल्या वर्षावानं धरतीला तृप्त करण्यासाठी सरसावलेलं! आमची मराठवाड्याची ‘बहिणाबाई’ म्हणजे कवयित्री सौ. विद्या बयास ठाकूर यांचा ‘आभाळ अंतरीचे’ हा कवितासंग्रह याच पठडीतला! मनातलं सारंसारं व्यक्त करताना त्यांची काव्यात्म अनुभूती वेगळ्याच उंचीवर जाते.
सुटून जातात माणसं
तुटून जातात नाती
आयुष्यभर काळजावरती
एक जखम भळभळती

असं लिहिणार्‍या विद्या बयास यांनी त्यांचे जीवनानुभव समर्थपणे मांडले आहेत. अर्थात, यातल्या सर्वच कविता अनुभवातून आल्यात असंही नाही. स्त्रीत्त्वाच्या हृदयानं घेतलेली अनुभूतीही त्यांनी लेखणीच्या माध्यमातून मांडली आहे. कवयित्री मुळूमुळू रडत बसणारी कोणी अबला नाही. स्वतंत्र विचारधारेची, आजच्या पिढीचे नेतृत्व करणारी, अन्याय-असत्यावर तुटून पडणारी ती एक बंडखोर प्रतिनिधी आहे. ‘फिनिक्स’ या पहिल्याच कवितेत ती म्हणते,
मी एक फिनिक्स राखेआड दडलेला
कितीही गाडलं तरी पुन्हा पुन्हा उडणारा

स्त्रीत्वाचं सामर्थ्य मांडतानाच
झुंजूमुंजू होण्याआधी
रात नको होऊ देऊ
गर्भातल्या अंधारात माझा
घात नको होऊ देऊ

अशी रास्त अपेक्षा व्यक्त करत ही ‘माय माऊली’ स्त्री भ्रुणहत्या थांबविण्याचे कळकळीचे आवाहन करते.
आपल्या मनातल्या जोडीदाराविषयी लिहिताना या कवयित्रीचा आविष्कार पहा -
असा हवा जोडीदार
स्वप्नातला राजकुमार
धडपडत्या पावलांना
नकळत जो देईल आधार
आकाशाची ओढ मला
क्षितिजापर्यंत माझ्या कक्षा

धावण्याचा कैफ मला
उडण्याची डोक्यात नशा

विद्या बयास यांचा हा पहिलाच कवितासंग्रह! तरीही मी त्यांना ‘मराठवाड्याची बहिणाबाई’ असंच म्हणतो. काहींना हे विशेषण म्हणजे अतिशयोक्ती वाटेल. वाटू देत! पण त्या त्या क्षेत्रातील मनोर्‍यांचा वारसा पुढे कुणीतरी चालू ठेवावा लागतो. विद्याताई हा वारसा जपत आहेत. त्यांच्या काही ओळी बघाच -
एखादी स्त्री मुक्त होताना
समाज इतका का अस्वस्थ होतो?
बाईच्या देहातसुद्धा
एक स्वतंत्र आत्मा वसतो
/ (अनुत्तरीत प्रश्‍न)

रोज नवीन प्रश्‍न समोर
रोज नवी आव्हाने
सांग कसे लक्षात राहिल
जीवनाचे मंजूळ गाणे
/ (झिंग)

माझ्या बदलत्या मोसमांचा
तुला कधीच अंदाज नसतो
रम्य, अहंकारी मोरसुद्धा
मेघांसाठी नाही
त्याच्या सहचारिणीसाठी नाचतो
/ (शिकायत)

प्रेताचं एक बरं असतं
एकदाच ते तर जळत असतं
बाईतल्या रूपातलं एक जीवन
रोज कितीदा मरत असतं
/ (बाई)

विद्या बयास यांच्या या संग्रहात 59 रचना आहेत. मम्मटाची ‘स्वान्तसुखाय’ची कल्पना इथे दिसत नाही. विद्याताई त्यांच्या लेखणीतून आजचे प्रश्‍न मांडतात. अनेक तरल भावना व्यक्त करतानाच मधुनच अंगार फुलवतात. जीवनात समरसून गेलेल्या प्रत्येकालाच हा आपल्याच भावनांचा आविष्कार वाटेल. मनातील वेदना शब्दबद्ध झाल्याची जाणीव होईल. आभाळ कोसळल्यानंतर जो मृद्गंध दरवळतो तशी प्रसन्नता अनुभवता येईल. शब्दलालित्य आणि यमकांचा हव्यास न धरता, त्यात न गुरफटता विद्याताई प्रांजळपणे आणि उत्फुर्तपणे व्यक्त होतात. जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या लेखणीत उमटते. मानवी स्वभावाचे मुलभूत चिंतन त्यातून प्रगट होते.
संघर्षातून शिक्षण पूर्ण केेलेल्या विद्याताई मराठवाड्यातील शिरूर ताजबंद येथे प्राध्यापक या नात्याने विद्यादानाचेच काम करतात. या परिसरावर उर्दू आणि कन्नड भाषेचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे काही ठिकाणी त्यांनी हिंदी (खरंतर उर्दू) शब्दांचा चपखल वापर केला आहे. मात्र हे शब्द मराठवाड्याच्या लोकजीवनात इतके एकरूप झालेत की ते मराठी नाहीत हे कुणाला सांगूनही पटणार नाही.
बाईच्या काळजाचा
कुणा लागना कधी ठाव
वरून शिनगार साजरा
काळजात खोल घाव

असं मानणार्‍या विद्याताईंनी अनेक घाव यशस्वीरित्या पचवलेत. त्याची तमा मात्र त्या बाळगत नाहीत.
आभाळ अंतरीचे
तू चंद्र त्यात माझा
चुकवून चांदण्याला
उधळून ऊन गेला

अशी स्त्रीसुलभ अंतर्व्यथा त्या मांडतात.
आई, मुलगी, जोडीदार यांच्याविषयीच्या त्यांच्या प्रामाणिक भावना या कवितांतून शब्दांकित झाल्या आहेत. त्यामुळे वाचकांना या कविता आपल्याच आयुष्याचा चलचित्रपट वाटेल. त्यात कुठंही नैराश्य नाही तर नव्याने उभं राहण्याची, सुसज्ज होण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आहे. हा असा आशावादच प्रत्येकाच्या आयुष्यात सुखाची दारं उघडतो. हतबलता, नैराश्य पळवून लावून वाचकांचे मनोरंजनातून प्रबोधन करतो. हीच तर कोणत्याही प्रतिभावंताची कसोटी असते. विद्याताई या कसोटीत अव्वल उतरल्यात. प्रेमाचा आविष्कार व्यक्त करतानाच त्यांनी जीवनातील सत्य त्यांच्या कवितेतून ठळकपणे अधोरेखित केले आहे. काव्यक्षेत्रातील त्यांची सुरूवात दमदार झाली असून भविष्यात त्यांच्याकडून विपुल साहित्यनिर्मिती होईल अशी अपेक्षा ठेवायला मोठा वाव आहे. त्यांच्या भावी लेखनप्रवासास आमच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
कवयित्री - विद्या बयास (7841968366)
प्रकाशक - निर्मल प्रकाशन नांदेड
पाने - 71, किंमत - 80


- घनश्याम पाटील, पुणे 
७०५७२९२०९२ 

1 comment:

  1. खरंच विद्याताई या मराठवाड्याच्या बहिणाबाई आहेत

    ReplyDelete