सोमवार ते रविवार असा विचार आपण करत असलो तरी महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक वार महत्त्वाचा आहे. त्याशिवाय महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी घडूच शकत नाहीत. तो वार आहे, ‘प-वार!’
देशातील बलाढ्य नेत्यांपैकी एक असलेल्या पवारांचे कर्तृत्व आणि त्यांचा दबदबा सर्वश्रूत आहे. आपले दुर्दैव हे की, या लोकनेत्याच्या कार्यकर्तृत्वाची म्हणावी तशी दखल आपण घेतली नाही. असा नेता जर कोणत्याही पाश्चात्य राष्ट्रात असता तर जागतिक राजकारणातले ते एक महत्त्वाचे नाव असते. तब्बल 45 वर्षे अव्याहतपणे कार्यरत असलेल्या आणि ‘जाणता राजा’ अशी बिरूदावली सार्थ ठरविणार्या शरदराव पवार यांच्याविषयी एव्हाना शे-पाचशे पुस्तके तरी यायला हवी होती; मात्र वर्तमानाचे तर्कसुसंगत वर्णन करत, त्यांच्या आयुष्याचा पट उलगडून दाखवत, तटस्थपणे लेखन करण्याचे कार्य आपले लेखक आणि साहित्यातील संशोधक करत नाहीत.
10 जून 1999 ला त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली आणि देशाचे नेतृत्व करण्याच्या त्यांच्या शक्यता संपुष्टात आल्या. त्यांनी जे राजकीय डावपेच आणि प्रसंगी तडजोडी केल्या त्यामुळे देशाच्या राजकारणात त्यांची विश्वासार्हता संपुष्टात आली. अटलबिहारी वाजपेयी असोत की, नरेंद्र मोदी! हे सारे नेते ‘बारामती पॅटर्न’चे कौतुक करत पवारांचे गोडवे गातात; मात्र वेळोवेळी पाय खेचण्याच्या वृत्तीने महाराष्ट्राने या अफाट क्षमतेच्या नेत्यावर अन्यायच केला आहे.
पुण्यातील स्वामी विजयकुमार हे ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक. ‘ज्योतीष’ आणि ‘साहेब’ ही खरे तर विसंगतीच! नियती न मानणारे पवार साहेब नियतीच्या अनेक तडाख्यातून सहीसलामत सुटले आहेत! तर या स्वामींनी त्यांचे अल्पचरित्र वाचकांसमोर मांडले आहे. शरद पवार यांच्यासारख्या तगड्या नेत्याला इतक्या नेमक्या शब्दात आणि नेमकेपणे टिपणे हे काम तसे जिकिरीचेच. तरीही विजयकुमार स्वामी यांनी या विषयाला पुरेपूर न्याय देत पवारांच्या कार्य आणि कर्तृत्वाची ‘तोंडओळख’ करून दिली आहे. ही ओळख करून घेताना वाचकांना ‘शरद पवार’ या ऊर्जाकेंद्राची पुसटशी कल्पना येऊ शकते. साधी, सोपी, ओघवती शैली आणि महाराष्ट्राबरोबरच देशाच्या राजकीय पटाची दखल लेखकाने सजगतेने घेतली आहे.
केवळ ‘दिवे ओवाळणे’ असाही या पुस्तकाचा सूर नाही. शरद पवार यांनी आणीबाणीचे समर्थन करताना ज्या खेळ्या केल्या त्याविषयी सूचक भाष्य करताना लेखक म्हणतात, ‘साहेबांची आजच्या एवढी प्रगल्भता पस्तीसाव्या वर्षी नव्हती.’ त्यामुळेच हे पुस्तक प्रत्येक राजकीय अभ्यासकाने, कार्यकर्त्याने वाचले पाहिजे. शरद पवार हा माणूस आहे तरी काय? हे भल्याभल्यांना उलगडले नसताना ‘कर्णधार’ या पुस्तकाद्वारे स्वामीजींनी ते ताकदीने मांडले आहे.
‘राजकारण हा आपला व्यवसाय नाही तर ते आपले नैसर्गिक कर्तव्य आहे’ ही पवार साहेबांची नीतिमूल्ये या पुस्तकात आली आहेत. ‘विदेशी बाई पंतप्रधानपदी नको’ असे म्हणत संगमा, तारिक अन्वर, प्रफुल्ल पटेल अशा सहकार्यांना सोबत घेऊन पवार साहेबांनी ‘राष्ट्रवादी कॉंग्रेस’ या ‘राष्ट्रीय’ पक्षाची स्थापना केली. देशाचे कृषीमंत्री असतानाही त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या उमेदवारांसाठी सभा घेतल्या होत्या. हीच त्यांची ‘राष्ट्रीय’ कामगिरी का? असा सवाल काहीजण उपहासाने विचारत असले तरी कार्यकर्त्यांशी जोडलेली त्यांची नाळ, ‘साहेब’ या नावाची जादू महाराष्ट्राने अनेकवेळा अनुभवली आहे.
वाजपेयींनी पंतप्रधान असताना गुजरातच्या भूकंपावेळी साहेबांची मदत घेतली होती. साहेबांनी किल्लारी भूकंपात केलेल्या निस्वार्थ कामाची ती पावती होती. राजकारणात टीका-टिपण्या कायम सुरूच असतात; मात्र आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बारामतीत येऊन साहेबांचा जो गौरव केला त्यातून त्यांच्या नेतृत्वाचा आवाका ध्यानात येतो. बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून त्यांच्या अनेक विरोधकांपर्यंत त्यांचे मैत्रीचे आणि जिव्हाळ्याचे संबंध या महानेत्याचे मोठेपण सिद्ध करतात.
गोपीनाथ मुंडे यांनी एकदा सांगितले होते की, ‘जो माणूस शरद पवार यांच्यावर टीका करतो तोच मोठा होतो. त्यामुळे आम्हाला आमचे भवितव्य सुधारण्यासाठी त्यांच्यावर टीका करावी लागते.’ म्हणूनच महाराष्ट्रातील आणि भारतातील कोणताही विषय निघाला की त्याच्याशी पवार साहेबांचे नाव जोडले जाते. ‘या आरोपांचे तुम्हाला काहीच वाटत नाही का?’ असे विचारल्यानंतर त्यांनी एकदा फारच मार्मिक उत्तर दिले होते. ते म्हणाले, ‘जोपर्यंत तुम्ही किल्लारीचा भूकंप माझ्यामुळे झालाय असे म्हणत नाही तोपर्यंत मी या आरोपांचा विचार करत नाही.’
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना फलोत्पादनाला त्यांनी दिलेले प्रोत्साहन असेल, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर असेल, स्थानिक स्वराज्य संस्थात महिलांना पन्नास टक्के आरक्षण असेल या सगळ्यात त्यांची दूरदृष्टी दिसते आणि याचा नेमकेपणे वेध स्वामी विजयकुमार यांनी या पुस्तकाद्वारे घेतला आहे.
शरद पवार यांचे राजकीय मूल्यमापन करताना स्वाभाविकपणे यात कॉंग्रेसचीही बरीचशी वाटचाल आली आहे. स्वर्गीय नेते यशवंतराव चव्हाण यांच्याशी पवारांची तुलना लेखकाने अनेक ठिकाणी केली आहे आणि ती रास्तही आहे. छत्रपती शिवरायानंतर यशवंतराव आणि त्यांच्यानंतर पवार साहेब यांनीच महाराष्ट्रावर खर्याअर्थी छाप टाकलीय. लोककल्याणकारी असे नेतृत्व या नेत्यांनी दिले. त्यामुळे महाराष्ट्र कायम त्यांच्या ऋणात असेल.
पवार साहेबांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात एकही पराभव स्वीकारला नाही. त्यांना कोणत्याही विधानावरून कधी माफी मागावी लागली नाही; मात्र ‘इतर नेत्यांनी काही चुकीचे विधान केल्यास पक्षाध्यक्ष या नात्याने साहेबांनी माफी मागितली’ असे स्पष्ट मत नोंदवत स्वामी यांनी अजित पवारांच्या ‘त्या’ विधानाची आठवण करून दिली आहे.
शरद पवार हे नाव नाही! हा शब्द नाही! हा आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा एक मंत्र झालाय. इतक्या दीर्घकाळ राजकारण करताना त्यांच्यावर असंख्य आरोप झाले; मात्र त्यातील एकही आरोप सिद्ध झाला नाही हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. (फारतर आपण त्याला राजकीय ‘कसब’ म्हणूया.)
या पुस्तकात त्यांची जशी राजकीय कारकिर्द आलीय तशीच कौटुंबिक पार्श्वभूमीही आलीय. ते कसे कुटुंबवत्सल आहेत, हे लेखकाने अचूकपणे टिपले आहे. किंबहुना नंतरच्या काळात त्यांना पानपराग (खरेतर ‘माणिकचंद’ गुटखा) खाल्ल्याने कर्करोग झाला. त्यानंतर त्यांना झालेल्या त्रासाचे वर्णन केवळ एका परिच्छेदात आले आहे. तरीही ते वाचून कुणी तंबाखू, गुटखा खाण्याचे ‘धाडस’ करणार नाही. विलासराव देशमुख, आर. आर. पाटील अशा सच्च्या आणि अच्छ्या नेत्यांवरही व्यसनांनी घाला घातला. त्यामुळे आजच्या नेत्यांनी ‘व्यसनापासून दूर रहावे’ हा संदेश ते तळमळीने मांडतात आणि त्याचे यथायोग्य वर्णन या पुस्तकात आले आहे.
स्वामी विजयकुमार यांचे आडनाव ‘जंगम’; मात्र या क्षेत्रातील त्यांचा अभ्यास आणि अधिकार यामुळे सर्वजण त्यांना ‘स्वामी’ असेच म्हणतात. स्वामींनी आजवर पंधरा पुस्तके लिहिली आहेत. ‘भविष्य’ हा दिवाळी अंक ते एकहाती लिहितात आणि स्वतःच प्रकाशित करतात. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी त्यांच्याकडे भविष्य पहायला येतात; तरीही या पुस्तकाचे ‘भविष्य’ चांगलेच आहे हे सांगण्यासाठी माझ्यासारख्या कुण्याही बोरूबहाद्दराची गरज नाही.
भारतीय राजकारणावर प्रभाव पाडणार्या या बलाढ्य नेत्याने ‘कर्णधार’ बनून आपल्या कामाची छाप समाजमनावर उमटवलेली आहेच. आर. आर. पाटील, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, ह. भ. प. बबनराव पाचपुते (पूर्वाश्रमीचे), काही प्रमाणात छगन भुजबळ (हेही पूर्वाश्रमीचेच!), सुनील तटकरे असे अनेक नेते साहेबांनी त्यांच्या मुशीत घडवले. या सर्व नेत्यांनी त्यांच्या ‘गुणदोषांसकट’ महाराष्ट्राच्या राजकारणाचा गाडा प्रभावीपणे हाकला आणि त्याचे सारे श्रेय या लोकनेत्याकडे जाते.
म्हणूनच या पुस्तकाचे महत्त्व मोठे आहे. सर्वांनी हे पुस्तक अवश्य वाचावे आणि या लोकनेत्याविषयी माहिती मिळवण्याबरोबरच आपापल्या सामाजिक, राजकीय क्षमता विकसित कराव्यात इतकेच या निमित्ताने सांगतो. स्वामी विजयकुमार यांचे आणखी लेखन वाचकांना पुढच्या काळात वाचायला मिळो याच सदिच्छा व्यक्त करतो.
कर्णधार
लेखक - स्वामी विजयकुमार
प्रकाशक - भक्ती प्रकाशन, पुणे (9822785055)
पाने - 48, मूल्य - 100/-
-घनश्याम पाटील
संपाकद, ‘चपराक’, पुणे
7057292092
No comments:
Post a Comment