Pages

Saturday, December 17, 2016

कृतज्ञ आठवणींचे बेट

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे सेनापती आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी ‘कर्‍हेचे पाणी’ आणि ‘मी कसा झालो’ ही आत्मचरित्रात्मक पुस्तके लिहून त्यांचे समग्र जीवन अतिशय प्राजंळपणे मराठी वाचकांसमोर मांडले आहे. प्रत्येक मराठी वाचकाने किमान ‘मी कसा झालो’ हे पुस्तक पुन्हा पुन्हा वाचायला हवे. अत्रे नावाचं प्रतिभेचं लखलखतं बेट त्यातून आपणास थोडंफार उमजू शकतं. मुंबईसह महाराष्ट्राच्या निर्मितीत मोठे योगदान देणार्‍या आचार्यांची कारकीर्द देदीप्यमान आहे. त्यांच्याविषयी कितीही लिहून आले तरी ते कमीच. हा प्रतिभेचा जागृत ज्वालामुखी पुढच्या अनेक पिढ्यांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरेल. अत्रे साहेबांच्या कन्या, मराठीतील ख्यातनाम कवयित्री आणि लेखिका शिरीष पै यांनी ‘वडिलांच्या सेवेसी’ हे पुस्तक लिहून आठवणींचे बेट तेवते ठेवले आहे. या आठवणी गोड आहेत, कटू आहेत, सुखद आहेत तशाच दु:खदही आहेत. मात्र जे आहे ते कृतज्ञतेच्या भावनेने मांडलेले सत्य आहे. त्यात निर्भयता आहे, प्रांजळता आहे, धैर्य आहे. खुद्द शिरिषताईच म्हणतात, ‘‘पप्पांसाठी जे करू शकले नाही त्याची उणीव या आठवणी लिहून भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.’’ आचार्य अत्रे यांची मुलगी म्हणूनच नव्हे तर एक समर्थ, सशक्त लेखिका म्हणून शिरीषताईंचे लेखन नेहमीच लुभावणारे असते. त्यांचे शब्द अंत:करणातून येतात. वाचकांना प्रेरणा देतात. लिहिले पाहिजे, जे लिहितो त्याहून सुंदर लिहिता आलं पाहिजे. लेखन म्हणजे आपले समग्र जीवन झाले पाहिजे’ अशी आकांक्षा, अशी धारणा अत्रे साहेबांनी शिरीषताईंच्या मनात बालपणीच रूजवली. पुढे त्यांचे पती व्यंकटेश पै यांच्यामुळे त्यांच्यात आत्मपरीक्षणाची दृष्टी आली. त्यामुळे या पुस्तकात आई, वडील, नवरा आणि स्वत:विषयी त्यांनी मोकळेपणे लिहिले आहे. त्यातील प्रांजळता भावते. या महामानवाची खरी ओळख करून देते. ‘कर्‍हेचे पाणी’मधून जे अत्रेसाहेब कळतात तितकेच किंबहुना त्याहून अधिक या पुस्तकातून त्यांच्या मनोवृत्तीचे दर्शन घडते. ‘पप्पा’, ‘आई’, ‘व्यंकटेश’ आणि ‘मी’ अशा चार विभागात या पुस्तकाची मांडणी केली आहे.
शिरीषताई सांगतात, ‘पप्पा जलद वाचतात पण त्यांच्या वाचनात त्यांच्या ताणलेल्या भावनांचा सारा पूर वाहून जात असतो.’ खंडाळ्याचा बंगला हे अत्रे साहेबांच्या आयुष्यातले समाधानाचे एक मोठे ठिकाण. या बंगल्याच्या रस्त्याने चढावर चढताना बाबासाहेब आंबेडकरांची मोटर कशी अडली होती, खंडाळा कराराची बोलणी बंगल्यात चालली असताना आपल्या मांडीवर छतामधून तोंडात धरलेल्या बेडकासकट साप कसा धपकन आदळला होता असे अनेक अनुभव या पुस्तकात आलेत. या पुस्तकातून अत्रे साहेबांचे भावविश्‍व अचुकपणे उलगडते. ‘पप्पा, तुम्हाला एकट्याला कंटाळा नाही का येत?’ असे विचारल्यावर अत्रेसाहेब शिरिषताईंना म्हणतात, ‘मी एकटा असतो तेव्हा मला माझी सोबत असते ना! मला माझी सोबत फार आवडते. मी एकटा असतो तेव्हा मी माझ्याशीच बोलत असतो.’
म्हणूनच शिरीषताई म्हणतात, ‘ खंडाळा हे पप्पांच्या जीवनातले ‘काव्यस्थळ’ आहे. सासवड हा त्यांचा देह आहे तर खंडाळा हा त्यांचा आत्मा आहे.’ अत्रे साहेबांच्या डोक्यात कल्पनाशक्तीचे कुंड चोवीस तास कसे धगधगत असायचे हे या पुस्तकातच वाचावे. शिरीषताई म्हणतात, ‘कल्पनेचा लगाम धरून शब्दावर स्वार होणे त्यांना फारसे कठीण कधीच गेले नाही.’
छत्रपती शिवरायांनंतर महाराष्ट्राच्या भल्यासाठी अहोरात्र धगधगणारे अत्रे साहेबांसारखे दुसरे व्यक्तिमत्त्व दिसत नाही. हे अग्निहोत्र कायम पेटलेले असायचे. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी स्वत:ला पणाला लावले. लेखणीला धार लावून तिची तलवार बनवली. दुष्प्रवृत्तीवर सपासप वार केले. ‘नवयुग’ आणि नंतर ‘मराठा’ ही नियतकालिके मराठी माणसांचा आवाज बनली.
अत्रे साहेबांना भव्यतेचा ध्यास होता. किरकोळ गोष्टी कधी त्यांना सहनच व्हायच्या नाहीत. जे करायचे ते प्रचंडच. त्यातूनच त्यांनी जीवनाचे सर्व रंग अनुभवले. सर्व क्षेत्रात त्यांनी चमकदार कामगिरी पार पाडली. मराठी माणूस त्यांच्याविषयी कायम कृतज्ञ असेल.
शिरीषताईंनी त्याकाळी प्रेमविवाह केला. त्यांची निवड चुकीची होती असे अत्रे साहेबांनी लग्नाच्या दिवशीच सांगितले; मात्र मुलीवरील प्रेमाखातर त्यांनी सर्वकाही स्वीकारले. जावयाशी जमवून घेतले. कन्या‘दाना’च्या कल्पनेने त्यांचे पितृहृदय गलबलून गेले. पुढे व्यंकटेश पै यांनी त्यांच्या सणकू स्वभावामुळे काही चुका केल्या. आपले सर्वस्व मातीमोल करून त्यांनी अत्रे साहेब आणि ‘मराठा’साठी स्वत:च्या छातीची ढाल केली. हे सगळं काही या पुस्तकात आलं आहे. दोन्ही मुलींची लग्ने लावून दिल्यानंतर लग्नात पंगती बसल्या. अत्रे साहेब सर्वांना आग्रह करूकरू जेवायला वाढत होते. परंतु ते स्वत: काही जेवावयास बसेनात. सर्वात शेवटी नोकरांची पंगत बसली. त्या पंक्तीबरोबर ते जेवायला बसले. असे होते अत्रे साहेब! त्यांनी यशाची अनेक शिखरे पाहिली आणि अपयशाच्या दरीतूनही मनसोक्त भटकंती केली. शिरीषताईंना बालपणापासून ते सांगायचे, ‘पहाडाशी टक्कर देताना पहाड फुटला पाहिजे, डोकेे फुटता कामा नये.’ शिरीषताई लिहितात, ‘नित्य नवे हा त्यांचा छंद स्थिर आहे. सदैव पराक्रम ही त्यांची वृत्ती स्थिर आहे. त्यांचे जीवनावरचे प्रेम स्थिर आहे. साठ वर्षे संपताना ते असे स्थिर आहेत नि अस्थिरही आहेत. चंचल आहेत आणि अविचल आहेत.
एका विशिष्ट टप्प्यावर त्यांना जडलेले श्‍वानप्रेम, त्यांची लाडकी कुत्री, इतरांसाठी खात असलेल्या खस्ता, त्यांची व्यापक ध्येयनिष्ठा, कुटुंबवत्सलता, त्यांचे प्रेम, त्यांचा राग, त्यांचा संताप हे सारे काही वाचताना उर अभिमानाने भरून येतो, मन गलबलते, डोळे पाणावतात. नातवाने लिहिलेले पत्र जपून ठेवणे, ते प्रत्येकाला वाचून दाखवणे याविषयी शिरीषताई लिहितात, ‘वेड्यावाकड्या अक्षरातलं दित्यूचं ते बोबडं पत्र तुम्ही एखाद्या तरूण मुलीनं आपल्याला आलेलं आपल्या प्रियकराचं पहिलं प्रेमपत्र जितक्या काळजीपूर्वक हृदयाशी जपून ठेवावं तितक्या काळजीने आपल्या कोटाच्या खिशात ठेवून दिलेलं होतं. तुमच्या स्वत:च्या कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही आयुष्यभर सहज हरवून टाकल्यात. त्याची एवढीसुद्धा खंत मनात ठेवली नाहीत; पण माझी ती लहानपणीची लहानशी पत्रं मात्र तुम्ही इतर मोठ्यामोठ्या माणसांच्या पत्राबरोबरच इतक्या प्रेमानं जपून ठेवलीत.’
अत्रे साहेबांच्या खाण्याच्या आवडीनिवडी, त्यांचा स्वभाव व त्यांचे गुण-दोष याविषयी या पुस्तकात अंत:करणापासून लिहिले आहे. त्या लिहितात, ‘पप्पांना एकटं जेवायला फारसं आवडत नसे. ते जेवत असताना कोणी पाहुणा आला की ते त्याला जेवायला घातल्याशिवाय परत पाठवीत नसत. मोठ्यामोठ्या नामवंत माणसांना मेजवानी द्यायची पप्पांना फार हौस. गरीब भुकेल्या माणसालाही त्यांनी कनवाळुपणानं जेवायला घातल्याशिवाय कधी सोडलं नाही. स्वयंपाक करण्याच्या जितक्या शैली दुनियेत असतील तितक्या त्यांनी स्वीकारल्या; मात्र त्यांची खाण्याची अखेरची इच्छा काय असावी तर ऊनऊन मऊ भात, त्यावर तूप आणि मेतकूट... आयुष्यभर इतकं खाऊन-पिऊन शेवटी इतकं साधंच मागितलं... तूपभात आणि मेतकूट... मात्र दुर्दैवाने त्यांची ही इच्छा शिरीषताई पुरवू शकल्या नाहीत.
त्यांच्या शेवटच्या काळातील विमनस्क अवस्था, वाढलेले मद्यपान, तृप्ततेचे समाधान हे वाचून कोणीही भारावून जाईल. शिरीषताईंच्या आई हुजूरपागेतल्या शिक्षिका. त्यांनी नाशिकलाही नोकरी केली. अत्रे साहेबांच्या कार्यविस्तारामुळे या माऊलीच्या संसाराचा ताप आणि व्याप वाढतच गेलेला. मात्र शेवटी त्यांना मधुमेह झाला. त्यात शस्त्रक्रिया करून आधी एक आणि नंतर एक असे दोन्ही पाय काढावे लागले पण त्यांनी धैर्यानं, चिकाटीनं दुखण्याला टक्कर दिली. अखेरच्या घटकेपर्यंत जीवनाला नकार दिला नाही. ‘एक छोटसं घरकुल, सतत जवळीक देणारा समव्यवसायी जोडीदार आणि चिमणी पाखरं’ इतकंच त्यांचं स्वप्न होतं; पण घरकुल जंगलभर पसरलं. समव्यवसायी जोडीदाराने अनेक धंदे अंगावर घेतले. त्यामुळे ती गांगरली-गोंधळली. हळूहळू सावरलीही; पण त्यात तिला न पेलवणार्‍या लढाया खेळाव्या लागल्या. दोन्ही मुलींवर या माऊलीने काळजाची सावली धरली. महाराष्ट्राच्या हृदयावर अनभिक्षिक्त राज्य करणार्‍या एका प्रतिभावंत बादशहाच्या कीर्तीच्या, वैभवाच्या, कर्तबगारीच्या आणि विजयाच्या ऐन शिखरावर ती त्यांच्या सिंहासनाशेजारी बसली होती. त्या सिंहासनावर उधळल्या गेलेल्या प्रत्येक फुलातली पाकळी न पाकळी तिच्याही पायावर पडत होती. त्यांच्या यशाचा सूर्यप्रकाश तिला जवळून पहायला मिळाला. शिरीषताई म्हणतात, ‘हा आनंद मिळाला नसता तर ह्या संघर्षात, इतक्या दुबळ्या देहानं ती इथवर टिकलीच नसती.’
विधी शाखेचे शिक्षण घेताना शिरीषताईंची आणि व्यंकटेश पै यांची ओळख झाली. व्यंकटेश यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत प्रभावी. त्यात देखणे. शिवाय राजकारणी. त्यामुळे शिरीषताई त्यांच्या प्रेमात पडल्या. मग काय झालं? त्या परीक्षेत नापास झाल्या. पुढे? इकडे-तिकडे चोहीकडे जे होत असतं तेच झालं. त्यांचं लग्न ठरलं. ज्याला लोक ‘प्रेमविवाह’ म्हणतात! व्यंकटेश यांची राजकीय विचारधारा, त्यांच्या मॉं, त्यांची भाषा, व्यंकटेश यांनी चांगली चालणारी वकीली सोडून मराठीसाठी खाल्लेल्या खस्ता, वाढलेले मद्यपान, त्यातून आलेले नैराश्य, अत्रे साहेब आणि त्यांच्यातील संघर्ष व त्यांचे एकमेकांवरील दृढ प्रेम... हे सर्वकाही वाचताना कुणालाही हेवा वाटावा.
लग्नानंतर शिरीषताईंनी आणि व्यंकटेश यांनी ‘मराठा’त नोकरी केली. त्यावेळी अत्रेसाहेबांनी कर्जाच्या मर्यादा ओलांडल्या होत्या. नोकरांचे पगार थकलेले. त्यांचा हा पडता काळ. रोजच्या रोज दारात सावकार मंडळी पैशासाठी तगादा लावायची. त्यांचा वाट्टेल तसा अपमान करायची. कर्जापायी प्राण कंठाशी आलेले! ‘नवयुग’च्या छपाईची बीलं भरता न आल्यानं छापखान्याचा मालक घाणेरड्या शिव्या द्यायचा. त्यातच अत्रे साहेबांच्या आयुष्यात एक विलक्षण घटना घडली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा लढा उभारला गेला. मग त्यांच्या कर्तबगारीची तेजस्वी पहाट उगवली. एका रात्रीत ते या आंदोलनाचे सेनापती झाले. त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. नवयुगचा खप महाराष्ट्रभर हजारोंनी वाढला. त्याचे संपादकीय कामकाज अत्रे साहेब बघायचे, तर वितरण व्यवस्था, रोजचा कारभार आणि आर्थिक उलाढाली व्यंकटेश यांच्यावर आल्या. त्यातून व्यंकटेश यांच्या दारूचा आरंभ झाला. हा आरंभ अंतापर्यंत घेऊन जाणारा ठरला. व्यंकटेश यांच्याकडून होणारा छळ शिरीषताई व्यक्तही करू शकत नव्हत्या. कारण हा प्रेमविवाह! कोणत्या तोंडानं नवर्‍याविरूद्ध बोलणार?
1969 च्या जूनमध्ये शिरीषताईंनी ‘मराठा’च्या संपादनाची सुरूवात केली. त्याकाळी व्यंकटेश पै आणि शिरीषताईंनी दोन मोठ्या संकटांना तोंड दिलं. एक आचार्य अत्रे यांचं मृत्युपत्र आणि दुसरे ‘मराठा’तील कामगारांनी केलेला संप. या संपामुळे ‘मराठा’ची आर्थिक स्थिती एकदम खालावली. सरकारनं ‘मराठा’ला काळ्या यादीत टाकलं. शासकीय जाहिराती बंद झाल्या. या प्रसंगाविषयी शिरीषताई लिहितात, ‘मराठाच्या निर्मितीत आणि विकासात पप्पांइतकाच व्यंकटेशचा घामही गळला होता. तितकंच रक्त त्यानंही आटवलं होतं. जो ‘मराठा’ व्यंकटेशचं समग्र जीवन होता, ज्या ‘मराठा’साठी मी व्यक्तिगत सुखांना तिलांजली दिली होती, तो ‘मराठा’ अखेर हातचा गेला. संपाच्या काळात कामगारांनी आमच्या दारात उभे राहून व्यंकटेशला आणि मला गलिच्छ शिव्या मोजल्या होत्या. ‘मराठा’च्या संपादक खात्यात काम करणार्‍या ज्या संपादकांना मी नेहमीच उत्तेजन दिलं, त्यांनीच कामगारांना मला ‘रांड’ ही शिवी आमच्या घरासमोर भर रस्त्यावर उभे राहून देण्याची चिथावणी दिली होती. ‘व्यंकटेश पै मेला रे, उशाला बाटली ठेवा रे’ अशा अर्वाच्च घोषणा कोणी दिल्या होत्या, तर ज्या कामगारांना सणासुदीला व्यंकटेश घट्ट मिठी मारून हृदयाशी धरीत होता त्यांनी!’
21 मे 1983 ला व्यंकटेश यांचं निधन झालं. लिव्हरचं दुखणं असं डॉक्टरांचं निदान होतं; पण विकोपाला गेलेलं नैराश्य हे खरं दुखणं असल्याचं निरिक्षण शिरीषताई नोंदवितात.
शिरीषताई बालपणापासूनच सकस आणि दर्जेदार लिहितात. पुढे त्यांनी ‘मराठा’त काम केले. रविवार  पुरवणीचे संपादन केले. अत्रे साहेबांनंतरही शक्य त्या अवस्थेत खमकेपणे मराठा चालवला. सुरूवातीला पुस्तकं, चित्रपट, नाटकांची परीक्षणं लिहिली, मुलाखती  घेतल्या. अत्रे साहेब त्या काळात लेखणी आणि वाणीच्या माध्यमातून आग ओकत असताना शिरीषताईही त्यात योगदान पेरत होत्या. ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या ध्येयाने पछाडलेले अत्रे साहेब ‘जनतेचा कसाई, मोरारजी देसाई’ अशा प्रक्षोभक मथळ्यांनी अग्रलेख लिहीत होते. त्यांच्यावर सगळीकडून मानहानीचे दावे दाखल होत होते. त्यावेळी व्यंकटेश पै यांनी वकीलाच्या भूमिकेतून हे हल्ले परतून लावले. हे सगळे आणि इतरही बरेचसे सत्य जाणून घेण्यासाठी, महाराष्ट्राच्या निर्मितीत सर्वात मोठे आणि भरीव योगदान देणार्‍या आचार्य अत्रे आणि त्यांच्या कुटुंबियांना समजून घेण्यासाठी हे पुस्तक प्रत्येकाने वाचायलाच हवे. शिरीषताईंनी यात जागवलेल्या आठवणी सर्वांनाच प्रेरणा देणार्‍या आहेत. आचार्य अत्रे यांच्यासारखा अफाट प्रतिभेचा बेफाट माणूस ‘वडिलांच्या सेवेसी’ मधून वाचकांच्या समोर येतो. वडिलांविषयी कृतज्ञता म्हणून शिरीषताईंनी हा लेखन प्रपंच केला असला तरी इतक्या वैयक्तिक गोष्टी स्पष्टपणे मांडल्याबद्दल वाचक या नात्याने आम्हीही अत्रे साहेबांबरोबरच शिरीषताई यांच्याविषयीही कृतज्ञता व्यक्त करतो.
लेखिका - शिरीष पै
प्रकाशक - डिंपल पब्लिकेशन, ठाणे (0250-2335203)
पाने - 239, किंमत - 250/-

- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक ‘चपराक’
7057292092

4 comments:

  1. दादा लिहण्यातील स्पष्टता व भावूकता �� अप्रतिम !!

    ReplyDelete
  2. जबरदस्त लेख! 'वडिलांच्या सेवेशी' वाचण्याची उत्सुकता वाढली!

    ReplyDelete
  3. शिरीषताईंनी वडिलांविषयी जितक्या तन्मयतेने या पुस्तकात लिहिले आहे, तितक्याच ममत्वतेने आपण या पुस्तकाविषयी लिहिले आहे.अप्रतिम।

    ReplyDelete
  4. खुपच सुंदर.... सहज आणि अप्रतिम लेख..... पुस्तकाची अशी ओळख... की त्यातली पात्र शेजारी येवून स्वगत मांडल्यासारखे वाटते...... ग्रेट......

    ReplyDelete