Pages

Sunday, November 13, 2016

वाचकांविषयी कायम कृतज्ञ!

‘वाचनसंस्कृती कमी होतेय’, अशी ‘अंधश्रद्धा’ काही प्रकाशक, लेखक आणि वृत्तपत्रेही सातत्याने पसरवतात. यामागचा त्यांचा उद्देश काय हे मला अजूनही कळले नाही; मात्र मराठीत अनेकजण उत्तमोत्तम लिहित आहेत आणि ते मोठ्या संख्येने वाचले जात आहे, हा माझा स्वानुभव आहे. बदलत्या पिढीनुसार त्यांची अभिरूची बदलत असेल; पण वाचकांचे प्रमाण झपाट्याने वाढत चालले आहे, ही वस्तुस्थिती आहे. अनेक जिज्ञासू वाचक आमच्याकडे त्यांच्या आवडीची पुस्तके खरेदी करण्यासाठी आमचे कार्यालय शोधत येतात, ग्रंथ प्रदर्शनात आमच्या दालनात तुडूंब गर्दी करतात आणि रोख रक्कम देऊन त्यांना हवी ती पुस्तके विकत घेतात. तरीही ‘वाचक नाहीत’ असे म्हणणे म्हणजे या सर्वांचा अवमान करण्यासारखेच आहे. असा करंटेपणा कोणीही करू नये.
7 मे 2013 ला माझ्या ‘दखलपात्र’ या अग्रलेखसंग्रहाचे प्रकाशन केसरीवाड्यात झाले. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य, निवेदक सुधीर गाडगीळ, श्रीपाल सबनीस, श्रीराम पचिंद्रे, प्रदीप नणंदकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मी अनेक लेखकांची पुस्तके प्रकाशित केली असली तरी माझे स्वत:चे हे पहिलेच पुस्तक होते. त्यामुळे माझ्या हितचिंतकांनी आणि मित्रांनी त्याच्या बारशाचा सोहळा वाजत गाजत पार पाडला. कार्यक्रम संपल्यावर जेवण आणि नंतरच्या गप्पांनी आमच्या दोस्त मंडळींनी रात्र जागवली.
पहाटेच्या सुमारास आम्ही जरा कलंडलो. मला झोप लागते न लागते तोच माझा फोन वाजला. अतिशय त्रासलेल्या मन:स्थितीत मी तो उचलला. समोरची व्यक्ती म्हणाली, ‘‘सर, मी इंदापूर तालुक्यातल्या लासुर्णे गावातून राहुल सवणे बोलतोय. रात्री तुमचे ‘दखलपात्र’ हे पुस्तक वाचले. ते आवडले. तुमचे अभिनंदन करण्यासाठी आणि धन्यवाद देण्यासाठी फोन केलाय.’’
एक तर आदल्या रात्री पुस्तकाचे प्रकाशन झालेले. दुसरे म्हणजे लेखकाबरोबरच प्रकाशकही मीच असल्याने हे मला पक्के ठाऊक होते की पुस्तक अजून बाजारात गेले नाही. मग लासुर्णेसारख्या छोट्या गावात, इतक्या कमी वेळात ते जाणेही शक्य नाही. त्यामुळे माझा कुणी मित्रच गंमत करत असेल म्हणून मी जरा आवाज चढवला.
समोरून सवणे शांतपणे बोलत होते. त्यांनी सांगितले, ‘‘सर, माझा रवीकिरण सासवडे हा मित्र कालच्या प्रकाशनच्या कार्यक्रमासाठी आला होता. त्याने रात्री मला हे पुस्तक दिले. मला वाचनाची आत्यंतिक आवड आहे; मात्र काही दिवसांपूर्वी माझ्या पत्नीचे निधन झाल्याने नवे काही वाचवत नव्हते. रवीने काल पुस्तक दिल्यावर मी चाळायला घेतले आणि वाचतच सुटलो. रात्री अकराच्या सुमारास लोडशेडिंगमुळे ‘लायटीने घोटाळा’ केला. आता पुस्तक वाचल्याशिवाय समाधान होणार नाही म्हणून मी चिमणी लावली. चिमणीच्या प्रकाशात रात्री संपूर्ण पुस्तक वाचून काढले. हे पुस्तक वाचल्यावर मला माझ्या पत्नीच्या मृत्युचाही विसर पडला. त्यामुळे इतक्या पहाटे तुम्हाला फोन करतोय...’’
माझी झोप कुठल्या कुठे पळाली. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर आलेली ही पहिली प्रतिक्रिया. माझेही डोळे पाणावले. मी त्यांना धन्यवाद दिले. त्यावर सवणे म्हणाले, ‘‘सर, मी माझ्या कमाईतील निम्मी रक्कम पुस्तकांच्या खरेदीसाठी खर्च करतो. त्यामुळे माझी झोपडी पुस्तकांनी समृद्ध झालीय. ती पुस्तके मी वाचलीत. माझ्या या दर्जेदार ग्रंथसंग्रहात तुमच्या पुस्तकाने भर पडलीय.’’
मी त्यांना ‘काम काय करता?’ असे विचारले. त्यावर त्यांनी जे उत्तर दिले त्याने तर मी उडालोच. सवणे म्हणाले, ‘‘मी भंगार विक्रेता आहे. गोवागावी फिरून भंगार गोळा करतो आणि ते विकतो.’’ इतक्या प्रतिकूल परिस्थितीत वाचनाची आवड जोपासणार्‍या या अवलियाची दाद मिळाल्याने मी खर्‍याअर्थी श्रीमंत झालो. साहित्यातील मोठ्यात मोठा पुरस्कारही यापुढे फिका ठरावा. भारावलेल्या अवस्थेतच मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही काही लिहिता का?’’ ते म्हणाले, ‘‘होय सर, मी ‘मोजमाप’ नावाचे आत्मचरित्र लिहिलेय. भंगारच्या गाड्यावर ठेऊन, ओरडून हे पुस्तक विकले. त्याची एक हजार प्रतींची आवृत्ती नुकतीच संपलीय.’’
पुढे मी मुद्दाम त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. गावकुसाबाहेर त्यांची वस्ती. त्यांच्याशी चर्चा केली. त्यांचे अफाट वाचन आणि ग्रंथप्रेम पाहून हरखून गेलो. नेमके त्यादिवशी राखीपौर्णिमा होती. त्यांच्या मुलीने मला राखी बांधली. कवी महादेव कोरे, रवीकिरण सासवडे सोबतीला होतेच. आम्ही अक्षरशः भारावून गेलो. लेखणामुळे मिळालेले, कायमस्वरूपी जोडले गेलेले असे लोक हीच तर माझी मोठी संपत्ती आहे. त्यानंतर लवकरच म्हणजे 8 ऑगस्ट 2014 ला ‘दखलपात्र’ची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तेव्हाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर आणि लेखणी व वाणीवर उत्तम प्रभुत्व असणारे प्रा. मिलिंद जोशी यांच्या उपस्थितीत त्याचे प्रकाशन झाले. त्यावेळी मी राहुल सवणे यांना अगत्याने बोलावले. माझ्या पुस्तकाचे ‘पहिले वाचक’ म्हणून कार्यक्रमात त्यांचा सत्कार केला.
दुसरा अनुभव भुवड काकूंचा. आमच्या ‘चपराक’ कार्यालयाजवळ बाफना पेट्रोल पंपाच्यासमोर त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे. तिथे त्या लाडू, चिवडा, शंकरपाळी, करंज्या असे खाद्यपदार्थही विक्रीला ठेवतात. मुख्य म्हणजे हे सारे पदार्थ त्या स्वतः तयार करतात. ‘चपराक’ला बर्‍याचवेळा रात्री उशीरपर्यंत काम झाल्यानंतर सकाळी या दुकानात जाण्याचे प्रसंग अनेकदा येतात. मी ‘चपराक’मध्ये असतो इतकीच जुजबी माहिती त्यांना होती. एकदा ‘सकाळ’ या पुण्यातील आघाडीच्या वृत्तपत्राने माझ्या अग्रलेख संग्रहाचे परीक्षण प्रकाशित केले आणि माझा गौरव केला. त्याच दिवशी नेमका मी त्या दुकानात गेलो. काकूंनी मला सांगितले, ‘‘दादा तू चपराकमध्ये असतोस ना रे? मला ते पाटील सरांचे पुस्तक आणून देतोस का? मी त्याचे पैसे देईन.’’
मला गंमत वाटली. ते पुस्तक मी त्यांना नेऊन दिले. त्यांनी पुस्तकाचे पैसे आग्रहपूर्वक मला दिले. मी तिथून सटकलो. हा प्रसंग विसरूनही गेलो. काही दिवसांनी पुन्हा त्या दुकानात जाणे झाले. काकूंनी ते पुस्तक वाचले होते. मला पाहताच त्या एकदम भारावून गेल्या. अत्यानंदाने म्हणाल्या, ‘‘सर, माफ करा. तुम्हीच घनश्याम पाटील आहात, हे मला माहीत नव्हते. मला पुस्तक खुपच आवडले. लोकांच्या मनातला रोषच तुम्ही लेखणीतून मांडलाय.’’ त्यादिवशी त्यांनी आग्रहपूर्वक खूप ‘खाऊ’ दिला. नंतर जेव्हा कधी त्यांची भेट होते तेव्हा त्या आस्थेने विचारपूस करतात. त्यांची सुखदुःखे सांगतात. हा व्याप सांभाळत काही लिहिण्याचाही प्रयत्न करतात. मला ते आवर्जून दाखवतात आणि माझ्या प्रतिक्रियेवर खुशही होतात.
मध्यंतरी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुका झाल्या. मिलिंद जोशी यांनी त्यांच्या परिवर्तन पॅनेलमधून मला निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. खरेतर मी निवडून यायची शक्यता खुपच कमी होती. यातले राजकारण माहीत नव्हते. सभासद माहीत नव्हते; मात्र त्यांचा आग्रह मोडता आला नाही. अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मी सहमती दर्शवली आणि शेवटचा अर्ज मी भरला. त्यात आमच्या पॅनलचे कार्याध्यक्षपदाचे उमेदवार मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार चांगल्या मतांनी निवडून आले. आमचे पुण्याबाहेरीलही सर्व प्रतिनिधी निवडून आले; मात्र आम्ही पुण्यातले कार्यवाहपदाचे चारही उमेदवार सटकून आपटलो. आपटलो म्हणजे आमचे पूर्णच पानिपत झाले.
या निवडणुकीच्या प्रचारात फिरतानाही अनेक अनुभव आले. प्रामुख्याने ते वाचनसंस्कृतीशी निगडित होते. अरूण किर्लोस्कर हे आपल्याकडील सुप्रसिद्ध उद्योजक. त्यांचे वय जवळपास ऐंशीहून अधिक असावे. त्यांच्याशी माझा कधीच काही संबंध आला नव्हता. एकेदिवशी अचानक त्यांचा फोन आला. ते म्हणाले, ‘‘तुम्ही परिषदेच्या निवडणुकीला उभे आहात याबद्दल अभिनंदन. या निवडणुकीशी माझे काहीही देणेघेणे नाही; मात्र मी परिषदेचा सभासद आहे. मला मतपत्रिकाही आलीय. इथे आवर्जून मतदान करावे असे काहीच नाही; मात्र तुम्ही सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांचे पुस्तक प्रकाशित केलेय. त्यांचे ‘चपराक’ने केलेले ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक मी वाचलेय. ते माझे आवडते लेखक आहेत. इतके चांगले पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल माझे मत तुमच्या पॅनेलला. तुम्ही असेच लिहित रहा. उत्तमोत्तम साहित्य प्रकाशित करा. तुमची साहित्यसेवा मोलाची आहे. आमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद कायम तुमच्यासोबत आहेत.’’
केवळ एक दर्जेदार पुस्तक प्रकाशित केल्याने इतक्या ज्येष्ठ उद्योजकाने माझ्यावर हा विश्‍वास दाखवला होता. पुढे त्यांच्याशी चांगला स्नेह जुळला. माझ्या लेखनाला ते आवर्जून दाद देतात. मी लिहावे यासाठी प्रोत्साहन देतात. असाच प्रसंग हडपसरचा. प्रचारानिमित्त त्या परिसरात फिरताना आम्ही श्रीकांत कुमकर यांच्या घरी गेलो. त्यांच्याशी कसलाच परिचय नव्हता. ते दोघेही पती-पत्नी परिषदेचे सभासद आहेत. उत्तम वाचक आहेत. मी ‘चपराक’चा संपादक आहे हे कळताच त्यांनी अक्षरशः आमचे जोरदार स्वागत केले. मला कारण काही कळेना. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘माझ्या आईची मुलाखत तुम्ही तुमच्या अंकात प्रकाशित केली होती. तेव्हापासून आम्ही ‘चपराक’चे नियमित वाचक आहोत. तुमची अशी भेट होईल असे वाटले नव्हते.’’ कुमकर मॅडमच्या आई भारतीताई पवार. त्या नंदुरबारच्या. हुतात्मा शिरीषकुमार यांच्यासोबत त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत काम केले होते. साने गुरूजींच्या प्रभावाने या चिमुकल्यांनी नंदुरबारमध्ये इंग्रजांना सळो की पळो करून सोडले होते. माझे कर्तव्य म्हणून मी त्यावेळी त्यांची मुलाखत घेतली होती; मात्र तेव्हापासून हे पूर्ण कुटुंब माझे ‘वाचक’ झाले होते.
आणखी एक अनुभव तर फारच वेगळा आहे. एकदा असाच एक फोन आला. त्या वाचकाने माझे पुस्तक वाचले होते. ते वाचून तो ‘चपराक’चा सभासदही झाला होता. त्याने पुस्तकाचे भरभरून कौतुक केले. माझ्या काही लेखांवर बोलला. अशावेळी लेखक म्हणून नकळतपणे आपला अहंकार सुखावतो. नंतर त्याने चाचरतच विचारले, ‘‘सर, मी तुमचे लेखन आवर्जून वाचतो. तुमचे स्पष्ट आणि परखड विचार आवडतात. त्यामुळे तुमच्यावर माझा विश्‍वास आहे. तुम्ही मला काही चुकीचे मार्गदर्शन करणार नाही याची खात्री असल्याने काही मनातले सांगण्यासाठी तुम्हाला फोन केलाय. आपला गैरसमज होऊ नये ही विनंती; पण मला तुमचा सल्ला हवाय...’’
मी त्याला म्हणालो, ‘‘दादा जे काही आहे ते स्पष्टपणे आणि मोकळेपणाने बोला. मला जे शक्य आहे ते सहकार्य नक्कीच करेन.’’
तो म्हणाला, ‘‘सर, मी एका कंपनीत हेल्पर म्हणून कामाला आहे. मला तुटपूंजा पगार मिळतो. त्यात कसेबसे घर चालते. वडिलांना कॅन्सर होता. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांच्या इच्छेखातर नात्यातल्याच एका मुलीशी लग्न केले. नंतर वडील गेले. माझा संसार सुरू झाला पण परिस्थितीने गांजलोय. तुम्हाला कसे सांगावे तेच कळत नाही...’’
मी विचारले, ‘‘तुम्हाला आणखी चांगली नोकरी हवीय का? काही कौटुंबिक अडचणी आहेत का? नेमके कारण सांगा म्हणजे आपल्याला काही मार्ग काढता येईल.’’
तो म्हणाला, ‘‘सर, आपली तशी ओळख नाही. आपण कधी भेटलोही नाही; मात्र तुमचे साहित्य वाचून मी तुमचा चाहता झालो आहे. तुम्ही योग्य तेच सांगाल.’’
मी पुन्हा म्हणालो, ‘‘मित्रा स्पष्ट बोल. मला जे शक्य आहे ते नक्की करेन.’’
त्यावर त्याने सांगितले, ‘‘सर, आम्ही परिस्थितीपुढे हतबल आहोत. घरी वडिलधारी मंडळी कोणीच नाहीत. भावकीचे वाईटावर टपून बसलेत. वडिलांच्या इच्छेखातर लग्न केले. त्यानंतर आम्ही काळजी घेतली, तरीही आमच्याकडून चूक झालीच. बायकोला दिवस गेलेत. हे पहिलेच मूल असणार आहे; मात्र... आम्ही ऍबॉर्शन करायचा विचार करतोय. आमचेच खायचे वांदे आहेत त्यात ही भर. बायको विरोध करतेय पण पर्याय नाही. मी काय करू? मला काहीतरी मार्ग दाखवा...’’
हा वाचक काळा की गोरा हेही मला माहीत नव्हते. मी त्याला कधी भेटलोही नव्हतो. केवळ लेखक या नात्याने तो त्यांची इतकी वैयक्तिक गोष्ट शेअर करत होता. इतक्या नाजूक विषयावर सल्ला मागत होता. मला दोन क्षण काय बोलावे तेच सुचेना. स्वतःला सावरत मी म्हणालो, ‘‘हे बघ मित्रा, आता वेळ गेलीय. निसर्गाने त्याचे काम केलेय. बाळ जन्मण्याच्या आधीच त्याला मारणे हे केवढे मोठे क्रौर्य? कदाचित हे होणारे मुलच तुझा भाग्योदय घेऊन येईल. त्यात बायकोच्या मनाचाही विचार कर. तिला मातृत्वाची आस लागली असेल. आणखी कणखर हो. कठोर परिश्रम कर. तुझ्या वडिलांनी असा काही विचार केला असता तर तुझा जन्मच झाला नसता...’’
तो फोनवरच रडायला लागला. कितीतरी वेळ आम्ही बोलत होतो. सुदैवाने त्याने माझे ऐकले. बाळाचा जन्म झाला. पुढे आमची मैत्रिही झाली. बाळाचे नावही मीच सुचवले. ती मुलगी आता मॉन्टेसरीत जातेय. एक लेखक म्हणून यापेक्षा मोठे समाधान कोणते? लेखनाने जोडलेला हा गोतावळा माझ्यासाठी अनमोल आहे.
अगदी आत्ता आत्ताचा अनुभव. ‘अंतर्नाद’ हे मराठीतले एक दर्जेदार मासिक. भानू काळे यांच्यासारखा साक्षेपी संपादक असल्याने या मासिकाने अल्पावधितच साहित्य क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांना मी माझा अंक नियमितपणे भेट म्हणून पाठवायचो. एका चांगल्या संपादकाने आपला अंक वाचावा ही त्यामागची अपेक्षा. परवा मुसळधार पावसात चिंब भिजलेल्या पोस्टमनने एक पत्र आणून दिले. ‘अंतर्नाद’चे पाकिट बघून मी उत्सुकतेने ते फोडले. आत मला लेखनासाठी शुभेच्छेबरोबरच भानु काळे यांच्यातर्फे पाच हजार रूपयांचा धनादेश होता. केवढी मोठी पावती ही! एका ज्येष्ठ संपादकाने दिलेली दाद कितीपटीने बळ वाढवत असेल, हे शब्दात सांगता येत नाही. बाहेर पडणार्‍या पावसाहून अधिक वृष्टी आता माझ्या मनात होत होती आणि आनंदाश्रूने डबडबलेले माझे डोळे नवसृजनासाठीची मशागत करत होते.
हा लेख लिहित असतानाच मीनल सासणे यांची एक मनीऑर्डर आलीय. कितीची? तर तीन हजार रूपयांची. कोण या सासणे? तर गोविंदराव पवार यांच्या कन्या! बरोबर ओळखलेत!! ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भगिनी. त्यांनी पुस्तकांसाठी म्हणून हे पैसे चक्क टपालाने पाठवलेत. मग वाचक नाहीत असे म्हणणे म्हणजे या सर्वांच्या प्रामाणिक भावनेचा केवढा मोठा अवमान? तो प्रमाद मी कधीच करणार नाही. हे आणि असे वाचक आहेत म्हणून आम्ही आहोत.
असे कितीतरी वाचक आपल्या आजूबाजूला आहेत. पुस्तकांवर, लेखकांवर ते भरभरून प्रेम करतात. त्यामुळेच मराठी प्रकाशन व्यवहार सुरळीत चालू आहे. प्रकाशक आणि लेखक या दोन्ही नात्याने वाचकांचे जे उदंड प्रेम लाभते त्यामुळे मी भरून पावतो. हेच माझे भांडवल आणि सामर्थ्य आहे. ‘वाचनसंस्कृती कमी होतेय’ ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी असे वाचक मोठी भूमिका बजावत आहेत. त्या सर्वांविषयी मी कायम कृतज्ञ आहे. 

- घनश्याम पाटील
प्रकाशक, संपादक 
चपराक प्रकाशन’, पुणे
7057292092

5 comments:

  1. तुम्ही खूप श्रीमंत आहातच..... अजून श्रीमंत व्हा..... मन:पूर्वक शुभेच्छा..........!

    ReplyDelete
  2. मनःपूर्वक शुभेच्छा सर. तुमच्या सुखद व समृद्ध अनुभवाःमुळे
    आम्हा
    आम्हांलापण प्रेरणा व बळ मिळते

    ReplyDelete
  3. सारे गहिवरून सोडणारे अनुभव आहेत.

    ReplyDelete
  4. घनःश्यामजी तुमच्या वाट्याला आलेलं वाचकांचं प्रेम तुम्हालाच नव्हे तर इतर लिहत्या हातांनाही श्रीमंत करणारं आहे.
    आपण लेखक म्हणून छान आहातच पण माणूस म्हणूनही छान आहात. वाचकांचा आपण यथोचित सन्मान तर केलाच आहे शिवाय त्यांना जगासमोरही आणलं आहे.
    अभिनंदन !
    प्रा.बी.एन.चौधरी.

    ReplyDelete
  5. अप्रतिम सुंदर

    ReplyDelete