Pages

Saturday, October 1, 2016

‘आपले राष्ट्रसंत’

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे समाजप्रबोधन आणि राष्ट्रभक्तिचे मूर्तिमंत रूप! सध्याच्या काळात काही अपप्रवृत्तीमुळे ‘संत’ हा शब्दच बदनाम झाला आहे. मात्र आपल्याला अनेक देदीप्यमान संतांची परंपरा लाभली असून आपले राष्ट्र टिकवून ठेवण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. भक्तिमार्गाच्या माध्यमातून लोकजीवन घडवण्यात त्यांनी जो वाटा उचलला त्याला तोड नाही. समाज घडविण्यात मोलाचा वाटा असलेल्या अशा संतांपैकी एक आघाडीचे नाव म्हणजे तुकड्यादास!
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे चरित्र आणि चारित्र्य सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. अशा या महापुरूषाची सेवा करण्याची संधी मिळणे म्हणजे अहोभाग्य! नागपूरातील श्रावणजी पंचभाई यांना ते लाभले. राष्ट्रसंतांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या पंचभाईंनी श्रद्धाभावाने त्यांची सेवा केली. राष्ट्रसंतांविषयी वाटणार्‍या अतीव आदरापोटी त्यांनी आपली स्वतःची काही जमीन विकली आणि आलेल्या पैशातून ‘ग्रामगीते’च्या भरपूर प्रती छापल्या. लोककल्याणार्थ त्या घरोघरी मोफत वाटल्या. अशा सत्पुरूषाच्या पोटी जन्म घेतलेल्या विनोदजी पंचभाई यांनीही ज्ञानदानाचा हा वारसा जपला आहे. सरकारी खात्यात नोकरीस असूनही त्यांनी आपल्या वडिलांनी घालून दिलेला मार्ग सोडला नाही. ‘शिकावे आणि शिकतच रहावे’ हा मूलमंत्र जपत ते सातत्याने वैविध्यपूर्ण विषयांवर लिहीत आहेत. त्याचाच परिपाक म्हणजे ‘थोडं मनातलं’ आणि ‘मुलांच्या मनातलं’ या पुस्तकांच्या घवघवीत यशानंतर त्यांनी तिसरे पुस्तक त्यांचे ‘कुलसंत’ असलेल्या राष्ट्रसंतांवर लिहिले आहे.
हे पुस्तक म्हणजे पंचभाई यांच्या अंतःकरणातून राष्ट्रसंतांविषयी वाहणार्‍या श्रद्धेचा दीप आहे. यातून इतरांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होईल. राष्ट्रसंतांचे आयुष्य आणि त्यांचे साहित्य याविषयी आजच्या पिढीच्या मनात थोडीसी जरी उत्सुकता चाळवली गेली तरी या पुस्तकाचे सार्थक झाले असे म्हणावे लागेल. पंचभाई यांच्या रसाळ भाषेमुळे आणि मुद्देसूद, नीटनेटक्या, अर्थपूर्ण मांडणीमुळे हे साध्य होईल. लाघवी भाषा, छोेटेछोटे परिच्छेद, नेमकी उपशीर्षके यामुळे कंटाळवाणे किंवा बोजड न होता हे पुस्तक सहजपणे वाचून होते आणि वाचनानंदाबरोबरच प्रेरणाही जागृत होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे कर्मकांडं, बुवाबाजी, तंत्र-मंत्र याच्या विरूद्ध होते. निकोप आणि सुदृढ समाजनिर्मितीचे अथांग ध्येय उराशी बाळगणार्‍या या संतांने मानवतेची शिकवण दिली. त्याच्या कितीतरी नोंदी या पुस्तकात आढळतात. बंडोजी आणि मंजुळादेवी ठाकूर यांच्या पोटी जन्मलेल्या माणिक या पुत्राच्या बाललीला भाईंनी थोडक्यात सांगितल्यात. ‘राष्ट्रसंत’ अशी मान्यता मिळण्यापूर्वीचा हा संदर्भ पाहता त्यांच्यातील अफाट सामर्थ्य, व्यापक दृष्टिकोन आणि दिव्यदृष्टिची प्रचिती येते. छोट्या माणिकला आई घरातील देव पूजेसाठी धुण्यास सांगते. माणिक ते देव गोळा करतो आणि शेजारच्या विहिरीजवळ जातो. दोर बांधलेल्या बादलीत ते देव टाकून बादली चक्क विहिरीत सोडतो. तीनदा बादली पाण्यात बुडवून त्यांना आंघोळ घालतो. वर आईने जाब विचारल्यानंतर ‘भाव तिथे देव’ असेही ठासून सांगतो. त्याकाळातले हे वर्तन म्हणजे भविष्याची नांदीच होती.
लहानपणी शिक्षणाअभावी फरफट झाली तरी राष्ट्रसंतांनी स्वतःला घडवण्याची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवली. जगाला मोहवून टाकणारे खंजरी भजन, सुश्राव्य गायन, आईवडिलांची सेवा यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक धुमारे फुटत गेले. आडकोजी महाराजांकडून आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या आयुष्याला वेगळी दिशा मिळाली. अंधश्रद्धेच्या विरूद्ध पेटून उठणारे, समाजाला व्यापक दृष्टी देणारे वंदनीय राष्ट्रसंत म्हणजे सद्गुणांची खाण होते. देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी डोळसपणे कार्यरत रहा, अंधश्रद्धांना बळी पडू नका, असे त्यांचे सांगणे असायचे. नेरी या गावातील नादूशहा नावाच्या भोंदू फकिराला त्यांनी त्यामुळेच पळवून लावले होते. भोळ्याभाबड्या लोकाना मूर्ख बनवणे हे त्यांना मोठे पाप वाटायचे.
नेरीजवळ गोंदोडा नावाचे गाव आहे. तेथील घनदाट जंगलात तुकडोजी महाराज कधीकधी ध्यानधारणेसाठी जात. तेथील गुहेत बिनदिक्कत जाऊन बसत. काहीवेळा वाघासारखे हिंस्त्र श्‍वापद त्यांच्या शेजारी येऊन निमुटपणे झोपत असे. सापासारखे प्राणी त्यांच्या अंगावरून जात. अशा सत्य घटना काहीवेळा अंधश्रद्धा वाटतील, मात्र त्यात वस्तुस्थिती होती. आजही आपण प्रकाशजी आमटे आणि त्यांच्या मुला-नातवंडांना वाघासोबत खेळताना पाहतोच की! मात्र एखाद्या संताच्या आयुष्यात असे काही घडले की तिकडे अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करण्याचा आणि त्यांची टर उडवण्याचा रोग काहींना जडलाय. त्याला आपला इलाज नाही. ‘वाघाच्या डोळ्यात आपले डोळे भिडवले की आपल्या डोळ्यात एवढे प्रेम व आपलेपणा येतो की वाघाचेही क्रौर्य आपोआप नाहीसे होते. ताडोबाच्या जंगलात मी हा प्रयोग आणि ही साधना करून पाहिली आहे’ असे राष्ट्रसंत सांगतात.
1930 साली मोझरी या गावी सर्वप्रथम आल्यानंतर टाळ्यांच्या गजरात त्यांच्या खंजरी भजनाला प्रतिसाद मिळाला. अनेकांना त्यांच्या महानतेची साक्ष पटली. मात्र वेदशास्त्रसंपन्न बाळशास्त्री कात्यायन आणि काशीकर शास्त्रींनी त्यांचा अभ्यास तपासून पाहायचे ठरवले. त्यानुसार त्यांनी तुकडोजी महाराजांना काही प्रश्‍न विचारले. वंदनीय महाराजांनी त्याची समर्पक उत्तरे दिली आणि ‘हा वेडा अवलिया नाही तर आत्मप्रचिती असलेला परात्पर कोटीतील महात्मा आहे’ यावर त्यांनी डोळसपणे शिक्कामोर्तब केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चैतन्याचा जागृत ज्वालामुखी होते. जातीभेद, धर्मभेद दूर होऊन समाज सांधला जावा यासाठी त्यांचे प्रयत्न असायचे. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात सर्वांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे होते. इतकेच नाही तर त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही मोठे योगदान दिले. त्यासंदर्भात आणखी संशोधन करून विस्ताराने लिहिण्याची गरज आहे. वर्धा येथील सेवाग्राम आश्रमात त्यांची आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची भेट झाली. गांधीजी राष्ट्रसंतांच्या प्रेमात पडले. त्यांच्या खंजरी भजनाने ते प्रभावीत होत. अनेकवेळी मौन व्रत सुरू असतानाही गांधीजींनी ‘बहुत बढियॉं’ अशी दिलखुलास दाद दिल्याचे संदर्भ खुद्द राष्ट्रसंतांच्याच साहित्यात आले आहेत. राष्ट्रसंत आजारी असताना स्वतः महात्मा गांधी त्यांना आपल्या हाताने जेवायला वाढायचे आणि राष्ट्रसंतांचे जेवण झाल्यानंतर ते जेवायचे, अशी नोंद पंचभाई यांनी या पुस्तकात संदर्भासह साक्षांकित केली आहे.
अध्यात्माबरोबरच राष्ट्रसंतांची भजने राष्ट्रप्रेमाने ओतप्रोत भरलेली असत. 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनावेळी ‘हाक आली क्रांतिची’ असे म्हणत त्यांनी लोकाना भजनातून जागे केले. ‘पत्थर सारे बन बनेंगे, भक्त बनेगी सेना’ असेही त्यांनी ठणकावून सांगितले. स्वातंत्र्यचळवळीतील या योगदानामुळे त्यांना तुरूंगवासही झाला. नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणि मध्यप्रदेश येथील रायपूर कारागृहात त्यांना बंदी म्हणून ठेवण्यात आले होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी इतकी मोठी किंमत मोजणारे, त्याग, सेवा, समर्पण भाव लोकात रूजवणारे तुकडोजी महाराज म्हणूनच खर्‍याअर्थी ‘राष्ट्रसंत’ आहेत.
‘ज्या मंदिरात हरिजनांना प्रवेश नसेल त्या मंदिरात सामुदायिक प्रार्थना घेता कामा नये’ असा आदेश त्यांनी काढला होता. म्हणूनच हरिजन बांधवांना घेऊन ते पंढरपूरला विठ्ठल मंदिरात गेले. पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्यावेळी साने गुरूजींनी त्यांना आनंदाने आलिंगन दिले होते.
15 ऑगस्ट 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला; मात्र काही संस्थाने स्वतंत्र व्हायची होती. हैद्राबादचे निजाम संस्थान त्यापैकीच एक. सर्वसामान्य लोकावर तिथे क्रूर अत्याचार होऊ लागल्याने त्या लोकांनी विदर्भाचा रस्ता धरला. ही बाब कळताच राष्ट्रसंत अस्वस्थ झाले. या अन्यायाविरूद्ध त्यांनी सशस्त्र बंड पुकारले. बाबुराव धनवटे यांच्याकडून अकरा हजार रूपये घेतले आणि बंदुका खरेदी केल्या. सेवामंडळामार्फत कार्यकर्त्यांची फौज सज्ज केली. ‘दैववादापेक्षा प्रयत्नवाद महत्त्वाचा’ असे सांगत त्यांनी अन्याय, असत्याविरूद्ध कायम युद्ध पुकारले. म्हणूनच भारतीय स्वातंत्र्यलढा आणि हैद्राबाद मुक्ती संग्राम यातील त्यांचे योगदान अद्वितीय आणि अविस्मरणीय राहिले.
राष्ट्रसंतांनी भजनासाठी थेट राष्ट्रपती भवनापर्यंत धडक मारली. गुरूकुंज मोझरी येथे 1949 च्या गांधी स्मृतीदिन महोत्सवात राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी त्यांचे भावोत्कट भजन ऐकून त्यांना ‘राष्ट्रसंत’ ही उपाधी बहाल केली. 23 जुलै 1955 साली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जपान येथील विश्‍वधर्म परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व केले. तेथील त्यांचे भाषण अजरामर ठरले. ‘माणसांनी माणसाचा विनाश करण्याची प्रवृत्ती जेव्हा नष्ट होईल तेव्हाच जग जवळ आले, धार्मिक झाले असे म्हणता येईल. त्याचे नुसते ठराव घेऊन चालणार नाही, त्यासाठी सर्व धार्मिक नेत्यांनी सतत प्रयत्नशील रहायला पाहिजे’ असे त्यांनी सांगितले आणि विश्‍वधर्म परिषदेत भारताचा लौकिक वाढला.
विनोद श्रावणजी पंचभाई यांनी या सर्व घटना, प्रसंग साध्यासोप्या भाषेत मांडल्याने वाचकांना ते खिळवून ठेवतात. आपल्या राष्ट्राचा, संतांचा, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांचा, संस्कृतीचा परिचय होण्यास हे पुस्तक हातभार लावणारे आहे. पंचभाई यांची राष्ट्रसंतांवरील श्रद्धा आणि बालपणापासून त्यांनी केलेले वाचन यामुळे या पुस्तकात अनेक संदर्भ सापडतात. राष्ट्रसंतांसारख्या महापुरूषाचे शब्द थोडक्यात मांडताना मोठी कसरत करावी लागते; मात्र हे शिवधनुष्य पंचभाई यांनी ताकतीने पेलले आहे.
भारतातील साधू संघटना, राष्ट्रसंतांचे साहित्य वैभव, त्यांची भारत दर्शन यात्रा, ‘जय जवान, जय किसान’ला दिलेला पाठिंबा हे सारेच वाचण्यासारखे आहे. राष्ट्रसंत आणि आचार्य अत्रे यांची भेट झाल्यानंतर अत्र्यांनी त्यांच्या स्वभाववैशिष्ट्याप्रमाणे गुगली टाकली की, ‘तुमची ही ओघवती, प्रासादिक काव्यरचना, गद्य लेखन व विचार तुमचे नाहीत. ते दुसरेच कोणीतरी लिहितो आणि तुमच्या नावाने प्रकाशित करतो अशी माहिती आम्हाला मिळाली आहे.’ अत्रे साहेबांचे हे बोलणे शांतपणे ऐकल्यानंतर वंदनीय राष्ट्रसंतांनी अवघ्या दहा मिनिटात दोन भजने तिथल्या तिथे कागदावर लिहून काढली आणि अत्र्यांना गाऊनही दाखवली. ती भजने ऐकताना आचार्य अत्रे डोलू लागले आणि त्यांच्या प्रेमातच पडले. दुसर्‍या दिवशी अत्र्यांनी ‘नवयुग’मध्ये पहिल्या पानावर लिहिले, ‘वंदनीय राष्ट्रसंत हे साक्षात्कारी राष्ट्रसंत आहेत. त्यांच्या जिभेवर साक्षात सरस्वती नाचते आहे. राष्ट्रसंत केवळ कवीच नाहीत तर देदीप्यमान गायकही आहेत. त्यांची वाणी भक्तिरसाने अंतर्बाह्य ओथंबलेली आहे. नवभारताचा नवसमाज निर्माण करणारे ते एक प्रतिभाकारी शिल्पकार आहेत...’
राष्ट्रसंत कवीबाबत म्हणतात, ‘कवी हा प्रसंगाचे वर्णन करण्यापेक्षा आदर्शांची मशाल जगाला दाखवणाराच असावा लागतो. यातच त्याचे श्रेष्ठत्व असते.’
पंचभाई यांनी अशा अनेक बोलक्या साक्षी या पुस्तकात देऊन ह्या घटना जिवंत केल्या आहेत. शालेय विद्यार्थ्यांनी, तरूणांनी हे पुस्तक आधी वाचायला हवे. पंचभाईंना राष्ट्रसंत ‘आपले’च वाटत असल्याने ते लेखणीशी एकरूप झाले आहेत. म्हणूनच ‘आपले राष्ट्रसंत’ आपल्याला नवी दिशा देण्यास प्रेरणादायी ठरेल!
- घनश्याम पाटील
संपादक, प्रकाशक ‘चपराक’, पुणे
7057292092


6 comments:

  1. तरुणांना दिशा देणार्‍या पुस्तकाची दिशादर्शक ओळख... सुंदर..... शुभेच्छा.....

    ReplyDelete
  2. तरुणांना दिशा देणार्‍या पुस्तकाची दिशादर्शक ओळख... सुंदर..... शुभेच्छा.....

    ReplyDelete
  3. उत्तम पुस्तक परिचय !👌👍

    ReplyDelete
  4. उत्तम पुस्तक परिचय !👌👍

    ReplyDelete
  5. अप्रतिम! धन्यवाद पाटील सर!
    खूप खूप धन्यवाद'दिलासा'

    ReplyDelete
  6. अप्रतिम! धन्यवाद पाटील सर!
    खूप खूप धन्यवाद'दिलासा'

    ReplyDelete